Sunday, June 2, 2013

भारतीय प्राचीन नाणी:भाषा:चिन्ह्प्रतिकात्मकता

भारतीय विद्वानांची प्राय: प्रवृती ही आपली संस्कृती पुरातन, स्वतंत्रपणे विकसीत झाली असे दर्शवण्याची असते तर पाश्चात्य विद्वानांची प्रवृत्ती ही भारतीय संस्कृतीच्या विकासावर झालेला ग्रीक, रोमन व ख्रिस्ती तत्वांचा प्रभाव दाखवण्याकडे असते असे डा. डी. आर. भांडारकर यांनी प्राच्यविद्येवर झालेल्या एका चर्चासत्राच्या अध्यक्षांचे मत उद्घृत केले आहे. (१) या मताशी सहमत होतांना हेही स्पष्टपणे नमूद केले पाहिजे कि भारतेय विद्वानांची प्रवृत्ती ही ज्या बाबींना कसलेही भौतिक पुरावे नाहीत अशा काही सिद्धांतांना, केवळ सोयिस्कर आहेत म्हणून, केंद्रीभूत धरत आपल्या मांडण्या करण्याचा हव्यास आहे व पुराव्यांच्या प्रकाशातही ते आपल्या सिद्धांतनांना मुरड घालू शकत नाहीत.

इंडो-युरोपियन भाषा-समूह सिद्धांत हा असाच एक सिद्धांत आहे. एकाच भाषेतून झालेला भिन्नदिश उत्क्रांतीसिद्धांत आज जवळपास सर्वमान्य आहे. चर्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाशी ब-यापैकी मिळताजुळता हा सिद्धांत आहे. एवढेच नव्हे तर विश्वनिर्मिती शास्त्रातही एकाच आत्यंतिक घनीभूत अशा शुन्यमय केंद्रकाचा विस्फोट होत अविरत विस्तार पावणारे विश्व निर्माण झाले असा सिद्धांतही एकनिर्मितीकारणतत्वाचा पाठपुरावा करतो हेही आपल्या लक्षात येईल. याबाबत विस्ताराने स्वतंत्र चर्चा करणे आवश्यक असून स्वतंत्र-निर्मिती-विकासतत्व सिद्धांताचा मी पुरस्कार करतो एवढेच मी येथे नमूद करून ठेवतो.

भारतात संस्कृत भाषा हा सांस्कृतिक कळीचा मुद्दा अनेक काळ बनलेला आहे. द्राविडी भाषा वगळता अन्य सर्व भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत असे मानण्याचा प्रघात आहे. अलीकडे माझे बंधुतूल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी स्प्रुहनीय प्रयत्न केले असून ते समन्वयक असलेल्या समितीचा अहवालही राज्य सरकारला सादर झाला आहे. त्यावर केंद्र सरकार नक्कीच विचार करेल व मराठीला अभिजाततेचा दर्जा बहाल करेल अशी आशा आहे. असे असले तरी संस्कृतचा प्रश्न सुटणे मला आवश्यक वाटते. इंयुभा (इंडो-युरोपियन भाषा) समुहाचे मिथक कसे गैर आहे हेही आपल्याला सिद्ध करावे लागणार आहे. थोडक्यात मुळात वैदिक भाषेचा व  संस्क्रुतचा काळही निश्चित करावा लागणार आहे.

प्रस्तूत लेखात आपण संस्कृतचे भौतिक अस्तित्व नाणकशास्त्रानुसार आढळते काय यावर प्रकाश टाकणार आहोत. माझ्या या लेखात  सनपूर्व सातव्या शतकापासून ते इसपू साडेतिनशे पर्यंतच्या विविध जानपदांत सापडलेल्या नाण्यांवर मी प्रकाश टाकलेला आहे. तत्कालीन प्रत्येक जानपदाचे स्वतंत्र असे प्रतीकचिन्ह असे. प्रतीकचिन्ह हे त्या त्या जानपदाची स्वतंत्र ओळख देण्यासाठी जसे असे तसेच ते त्या त्या भागातील जनसमुहांच्या धार्मिक कल्पनांचेही प्रकटन असे. तत्कालीन नाणी ही प्राय: श्रेणी, निगम अशा व्यापारी संस्थाणी पाडलेली असत तरीही मूख्य प्रतीकचिन्हात प्रदिर्घ काळ कसलाही बदल झाल्याचे आढळुन येत नाही. मौत्य काळातही नामाक्षरांकित नाणी नसली तरी मूख्य प्रतीकचिन्हात फरक पडलेला दिसत नाही. बौद्धकाळात नाण्यांवर चैत्य, बोधीवृक्षादि चिन्हे (नंतर कुशाणकाळात तर खुद्द बुद्धप्रतिमा) आढळु लागतात. दक्षीणेतील कलभ्रा नाण्यांवर बसलेला जैनमुनी-वाघ-हत्ती-घोडा व माशाचे चिन्ह आहे. ग्रीक, शक, कुशाण नाण्यांवर ग्रीक देवता ते पारशी देवता ठळकपणे चिन्हांकित केलेल्या दिसतात. म्हणजेच सत्ताधिशांच्या/प्रजेच्या धर्मकल्पना नाण्यांवर अपरिहार्यपणे येतात. परंतू सनपुर्व सातवे शतक ते पहिले शतक एवढ्या आठशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात संपुर्ण देशभरच्या नाण्यांवर एकही वैदिक प्रतीकचिन्ह अथवा दैवतनाम येत नाही तसेच संस्कृत भाषेचेही अस्तित्व आढळुन येत नाही. ज्या भागांत वैदिक धर्माचा उदय झाला असे मानले जाते त्या भागात, म्हणजे सिंध, पंजाब व गांधार भागातील नाणीही याला अपवाद नाहीत.

भारतातील गणराज्ये, नगरराज्ये, राज्ये व साम्राज्ये यांचा इतिहास पुरातन आहे व तो नाण्यांवरून अधिक सुस्पष्ट होतो. नाण्यांवरील मुख्य प्रतीकचिन्ह हे ते कोणत्या जानपदातून आले हे जसे स्पष्ट करते तसेच सहचिन्हे ती नाणी कोणत्या नगरराज्यातून, नगरातून, टांकसाळीतून आले हेही स्पष्ट करते. विसुद्धीमग्गात एक भिक्खु ठामपणे विधान करतो कि "मला फक्त नाणे दाखवा...ते कोणत्या जानपदातून, गांवातून, श्रेणीतून, टांकसाळीतून व नदीकाठावरून आले हे मी सांगू शकतो." चिन्हांमद्धे असे काय होते हे आपल्याला आज माहित नसले तरी परमानंद गुप्ता यांनी त्याच अंगाने नाण्यांच्या मुलस्थानांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. (२)

मौर्य नाणी:

१.
 

२.

३.



४.


५.


मौर्य नाण्यांवर सनपूर्व चवथ्या शतकानंतर वरील प्रतीकचिन्हे दिसतात. मागधी लोक हे पुरातन काळापासून सूर्यपूजक आहेत त्यामुळे सनपूर्व सातवे शतक ते मौर्यकालापर्यंत सूर्य हे त्यांचे प्रधान प्रतीकचिन्ह सातत्याने राहिलेले आहे.  बिंदुकार वर्तुळ व त्याला जोडुन असणा-या तीन बाणाक्रुती आणि Y आकाराच्या मधोमध वर्तुलाला चिकटून असणा-या आकृत्या हे दुय्यम चिन्ह म्हणुन येते. (मौर्यकाळापुवीच्या चिन्हांकित नाण्यांवर y आकार हा वरुळाला चिकटुन नसे तर किंचित अंतर ठेवून असे हे माझ्या या अन्य लेखात पाहता येईल.  

यातील काही चिन्हे ही नगरचिन्हे व श्रेणीचिन्हे असावीत असा परमानंद गुप्ता यांचा अंदाज आहे. बोधीवृक्ष चिन्ह, मयुर चिन्ह, पर्वतचिन्ह काही नाण्यांत ठळक दिसत असले तरी केवळ तेवढ्यावरून विसुद्धीमग्गात म्हटल्याप्रमाणे गांव, पर्वत, नदी, टांकसाळ समजेल हे संभवत नाही. म्हणजेच ही चिन्हे वाचण्याची स्वतंत्र पद्धती अस्तित्वात असली पाहिजे. आपण बारकाईने पाहिले तर लक्षात येईल कि यातील अनेक चिन्हे ही सिंधू लिपीचिन्हांशीही सादृष्य ठेवतात. ही चिन्हे धर्मप्रतीके नसून सिंधू लिपीची मध्ययुगीन (सनपूर्व सातवे शतक ते चवथे शतक) अवस्था असण्याचा संभव आहे व यावर अधिक काम व्हायला हवे हे मी येथे आवर्जून नमूद करू इच्छितो.

 

नाण्यांवर चिन्हे आहत करतांना ती अप्रयोजनबद्ध असू शकत नाहीत. त्या काळी नाणी पाडण्याचे काम (मौर्य काळापर्यंत) राजसत्ता करत नसे तर श्रेणी अथवा निगम करत असत. मौर्य कालात हे काम राजसत्तेने हाती घेतले असले तरी मुख्य चिन्हांत (प्रत्येक चिन्हांतील क्रमांक एक व दोन) फरक दिसत नाही. म्हणजे उर्वरीत चिन्हे नाण्याचे मूल्य व अन्य मजकूर नोंदवत असले पाहिजे. त्यावर लिपीतज्ञांनी अधिक लक्ष पुरवले पाहिजे. ही नाणी हाताळणा-या तत्कालीन विराट भुप्रदेशातील लोकांना त्याचा अर्थ समजत होता हेही विसुद्धीमग्गावरून स्पष्ट दिसते आहे. थोडक्यात या चिन्हांकित प्रतीकात्मकतेसोबतच अन्य चिन्हांची भाषा समजावून घ्यावी लागणार आहे.

आता आपण भारतीय राजांनी/गणसत्तांनी कोणती भाषा (जी वाचता येते) नाण्यांवर अविरत वापरली तिकडे जाण्याआधी परकीय सत्तांनी  कोनत्या भाषा वापरल्या याचा आढावा घेवूयात.

ग्रीक, ब्यक्ट्रीयन ते आरंभीची कुशाण नाणी ही नामाक्षरांकित असून ती ग्रीक भाषा व लिपीतील आहेत. परंतु नंतर ही नाणी द्वैभाषिक होत जातांना आपल्याला दिसतात. सनपूर्व १८०-८५ मधील ब्यक्ट्रियात पाडले गेलेले पण भारतीय समुदायासाठी प्रसृत केले गेलेले नाणे पेंटलेओन या ब्यक्ट्रियन राजाचे आहे.




या नाण्यावर द्वैभाषिक मजकुर असून ब्राह्मी लिपीत सिंधी प्राकृत भाषेत (माहाराष्ट्री प्राकृताची उपशाखा) "राजने पाटलेवासा" असा मजकूर असून शक्तीप्रतिमा स्पष्टपने प्रतिमांकित केलेली असून नाण्याच्या मागील बाजुला देवीवाहन सिंहाची प्रतिमा चिन्हांकित केलेली आहे. . परकीय राजांनी भारतीय समुहाला उद्देशून हे नाणे जारी केले त्यामुळे या नाण्याचे ऐतिहासिक (व सांस्कृतीक) महत्व खूप मोठे आहे. अशाच प्रकारचे नाणे (देवी व सिंहमुद्रांकित) नंतर ब्यक्ट्रियाचा राजा अगाथोक्लिज याने प्रसृत केले असून त्यावरही ब्राह्मी लिपीत "राजने अगाथुक्लेयासा" असा प्राकृत मजकूर आहे.



हे उदाहरण सर्वात आधी घेतले कारण या उपरोल्लिखित राजांनी भारतातील कोणत्याही भुभागावर राज्य केले नाही, त्यांची अन्य सत्व नानी ही ग्रीक भाषेत व ग्रीक दैवते दर्शवणारी आहेत. व्यापारानिमित्त त्यांनी ही नाणी पाडली. असे करत असतांना जो त्यातल्या त्यात नजिकचा प्रांत सिंध त्या भागातील प्रचलित भाषा व जनश्रद्धा याचे भान ठेवले जाणे क्रमप्राप्त होते. तसे ते ठेवलेही गेले. सुफलतेची शक्ती प्रतिमा व तिचे वाहन सिंह याला जसे ग्रीक दैवते वगळुन प्राधान्य दिले गेले तसेच भाषेलाही.

आपल्याला अजून हजारो पुराव्यांच्या प्रकाशातून जायचे आहे. पण येथे लक्षात घ्यायची एकच बाब आहे व ती म्हणजे नाण्यांवर शिष्टभाषा अपरिहार्यपणे येते. दैवतप्रतिमाही जनमान्य अशाच येतात. परकियांच्या दृष्टीने भारतीय "शिष्टभाषा" प्राकृत होती व दैवतेही अवैदिक होती हे वर उल्लेखलेल्या परकीयांनी प्रसृत केलेल्या दोन नाण्यांवरुन स्पष्ट दिसते.

येथील परकीय राजसत्तांनी कोणती नाणी प्रसृत केली, त्यांची आरंभीची आणि नंतरचीही नाणी कोणती, त्यांवरील भाषा कोणत्या हा आढावा आपल्याला इसपू साडेतिनशे ते सहाव्या शतकापर्यंतचा घ्यायचा आहे. तथाकथित ईंयुभा गटाचाही उहापोह करायचा आहे. दरम्यान आपली बहुमोल मते कळवावीत.

(संदर्भ: १: Lectures on Ancient Indian Numismatics: D. R. Bhandarkar.
२. Geography from Ancient Indian Coins & Seals: Parmanand Gupta
3. Coinindia.com
and many other articles dedicated to this issue.

SEE ALSO:

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...