Tuesday, November 24, 2015

धर्मांची भ्रामकता!

सर्व धर्मांनी बदलायला पाहिजे. आधुनिक व्हायला पाहिजे. ज्यूंनी, ख्रिश्चनांनी, मुस्लिमांनी, बौद्ध-जैनांनी, वैदिक आणि हिंदुंनी...सर्वांनी बदलायला पाहिजे. सर्व धर्मशास्त्रे आणि जातीधर्मनियम त्यागायला पाहिजेत. जगात कोणताही धर्म महान नाही. प्रत्येक धर्म आपल्या भुगोल आणि वर्तमान परिस्थितीवर मात करायला जन्माला आला. अगणित धर्म नष्ट झाले आणि जेही उरलेत ते अनेक आज मुळच्या स्वरुपात नाहीत. परिस्थिती बदललेली आहे. त्यांची कालसापेक्षता आज निरर्थक झाली आहे.

धर्म प्राप्त परिस्थितीतील नीतिचौकटींचे आणि जगण्याचे साधन होता. त्यातील असंख्य धर्मनीतिनियम बाष्कळ होते, पण त्या त्य कालची परिस्थिती आणि स्वधार्मिक लोकांवरील नियंत्रणासाठे ते अनिर्बंध वापरले गेले. जशी राष्ट्र ही संकल्पना निरर्थक आहे तशीच धर्मही. राष्ट्र आणि धर्म केवळ आणि केवळ दुर्बलांवर अधिराज्य गाजवायच्या या सोयी होत्या...ते धर्म नव्हतेच...कारण धर्मांनीच, किंबहुना पागल धर्मनियंत्यांनीच धर्माच्या असण्याचा होता तो पाया खच्ची करून टाकला. पोट भरायचे, पेटण्याचे आणि पेटवण्याचे साधन बनवून टाकला. हा धर्म नाही. खरा धर्म प्रवाही असतो. त्या धर्मला कोणतीही इश्वरी आज्ञांची भंकस नियमावली नसते. एक साच्यातले इश्वरदत्त तत्वज्ञन नसते. धर्म काळाच्या गरजेनुसार बदलत जात असतो. कुराणात, बायबलात किंवा जुन्या करारात, किंवा वेदात-स्मृत्यांत अथवा तंत्रांत धर्म बंदिस्त नसतो. धर्म त्याहीपार व्यापक असतो.

व्यक्तिनिर्मित धर्म तर अधिक मुर्ख असतात कारण व्यक्ति त्याला भावलेले/पटलेले तत्वज्ञान सांगत असला व त्याला त्याच्या काळाच्या गरजेप्रमाणे काही लोक धर्मच मानू लागले असतील तर ते पुढच्या पिढ्यांना अवाक्षरनेही न बदलता कसे लागू असेल? खरे पाहता येशुने स्वत: कोणताही धर्म स्थापन केला नाही. बुद्धाने नाही कि महावीरानेही नाही. पैगंबर स्वत:ला प्रेषित समजतो...आब्राहमी परंपरेतील...पण तोही नवा धर्म सांगत नाही तर त्याला त्या काळी त्याच्या परिस्थितीत योग्य वाटले ते तत्वज्ञान सांगतो. पुन्हा सर्वांनीच सांगितलेले खरे तत्वज्ञान आपल्याला उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर किती धादांत असत्ये नंतरच्या अधार्मिक धर्ममार्तंडांनी खपवत खपवत केवळ स्वार्थी बनवत मुळ धर्माचे वाटोळे केले हेही आपण पाहू शकतो. माझेच प्रेषित/देअव/अवतार खरे बाकीचे खोटे हे भ्रम जोपासण्यात सर्व धर्मियांची अक्कल खर्ची पडलेली आहे. हे भ्रम उजेडात आननेही या अशा अधार्मिकांमुळे अशक्य बनून जाते.

सारे धर्मग्रंथ म्हणतात कि ते परमेश्वरी अथवा अल्लाहचे अथवा आकाशातल्या बापाचे शब्द आहेत. ही लबाडी तर आहेच पण अवेस्ता, वेद ते कुराण-बायबल हे नंतरच्या काळात कसे घालघुसडीने भरलेले आहेत हे आधुनिक विद्वानांनीच सिद्ध केले आहे. मुळ कुराण माहित नाही, आयतांचा खरा अर्थ काय यावर आजही मतभेद आहेत...मग हे आम्ही उराशी धरून का बसलो आहोत?

आज धर्म हे माणसाला लुटायचे, गुलाम करण्याचे सर्व धर्मातील धर्ममार्तंड ते राजकारणी लोकांचे, दहशतवाद्यांचे साधन झाले आहे. मणसांचे ते भ्रामक अस्मिता जपत इतरांचा द्वेष करण्याचे साधन झाले आहे. आपण, मनुष्यजात, कोणाहातचे साधन व्हायला जन्माला आलोत कि काय? आम्ही त्यांच्या हातच्या कठपुतळ्या आहोत कि काय? आज दहशतवादी सर्वच धर्मांत आहेत. स्वरूप वेगळे वेगळे दर्शवले जाते एवढेच. आम्ही स्वेच्छेने गुलाम बनत मानवी महनीय स्वातंत्र्याचीच संकल्पना पायतळी तुडवत नाहीत काय?

यात माणसं मरतात. धर्म मरतो. याचे भान आम्हाला कधी येणार? स्त्रीयांबाबत सर्वच धर्म अनुदार आहेत. माणसांबाबत सर्वच धर्म अनुदार आहेत. या पापाची फळे सर्वधर्मीय कशी भोगणार?

मी माझ्या "कल्की" कादंबरीत कल्की सर्वच धर्मस्थळे नष्ट करतो हे दाखवले होते. आज प्रत्येक माणसाने धर्मस्थळे नाकारली पाहिजेत. पंडत-मुल्ला-पाद्री वगैरे मध्यस्थांना नाकारत-लाथाडत पुढे जायला हवे. धर्माची गरज असेल तर ती विश्वधर्माची. आणि सर्वांना निर्माण करणारा कोणी असेलच तर त्याच्याशी श्रद्धा बाळगायला कोणा मंदिर, मसजिद, सिनेगाग, यज्ञ किंवा स्तुपांचीही गरज नाही. पुराकथांतील भाकडकथा केवळ आपल्याला मानसिक गुलाम करण्यासाठी रचल्या गेल्या. त्यांवर विश्वास आजही ठेवणे हा आपण गुलामीत राहण्याच्याच लायकीचे आहोत एवढेच सिद्ध करेल. मिथकांनीच आपल्याला मोहवून टाकत धर्म नांवाच्या मोहक कायाजालात फसवत आपले भावनिक/आर्थिक शोषण करत नागवले आहे.

धर्म हे माणसाला मणसापासून तोडायची साधने आहेत. हे पाप ज्यू, ख्रिस्ती, मुस्लिम, वैदिक, बौद्ध, जैन, हिंदू आणि इतर जेही धर्म असतील त्यांनी कमी-अधिक प्रमाणात केलेले आहे. ते स्वता:ही त्यातून स्वत:चा विनाश घडवत बसले व इतराचाही केला हाच आजतागायतचा इतिहास आहे.

थोडक्यात आजचेही जागतिक राजकारण टुक्कार धर्मांनीच प्रदुषित आहे. सहिष्णू शब्द बदनाम करण्याची चाल जोरात आहे. पुरोगामी हा शब्द शिवी बनवणारे जोमात आहेत. पण या मुर्खांना माहित नाहीय कि तेही सुपात आहेत.

सहिष्णू म्हणजे मानवता मानणारे. धर्मापार जात धर्मांची निरर्थकता सांगणारे. प्रासंगिक संघर्ष धर्माचे स्तोम माजवतात त्यांच्याशी होणे स्वाभाविक आहे. काही छुपे तर काहे उघड. काही लोक असुरक्षित फील करतात म्हणून नाइलाजाने त्यांना सर्वधर्मसमभाव वगैरे फालतू बाबी बोलाव्या लागत असतील तर तो असहिष्णू लोकांचा पराभव आहे. सहिष्णू म्हणजे फक्त एकच धर्म पाळनारे लोक...तो म्हणजे मानवता. तोच मानवाच्या जीवनाचा जगण्याचा धर्म आहे. तिकडे १२८ मेले म्हणून त्याचा सुड घेण्यासाठी इकडे हजारो निरपराधांसोबत पाच-पन्नास अपराध्यांना मारणे हा धर्म नोहे.

माणुस मारणे आणि माझा माणुस मेला म्हनून सुड घेणे या चक्रातून बाहेर पडण्यासाठी पहिले सारे धर्मग्रंथ आदिम मानसिकतेतून, तत्कालीन निकडितून लिहिले गेलेले, फेकावे लागतील. मानवेतिहासाच्या संदर्भाची साधने म्हणून वापरण्यापार त्यांची काहीएक लायकी नाही हे समजावून घ्यावे लागेल. कोणताही धर्म हा इश्वरप्रणित नसून सामान्य माणसानेच निर्माण केलेत हेही समजावून घ्यावे लागेल.

आणि माणूस हा आपापल्या परिस्थीतीचे अपत्य असतो...जसे धर्म आणि त्यांचे निर्माते! आपल्याला धर्मविहिन परिस्थिती निर्माण करावी लागेल. 

3 comments:

  1. धर्म विषयक विचारांशी मी सहमत आहे.

    ReplyDelete
  2. समाजातील दीनदुबळ्यांना जेव्हा दु:ख सहन करावे लागते तेव्हा ते धर्मामध्ये सुख शोधत असतात. ते खरे सुख नसून केवळ सुखाचा आभास असतो. धर्माच्या रुपाने व्यक्त होणारे दु:ख हे एकात वेळी खर्या दु:खाचे प्रकट रूप असते.
    धर्म हा दबलेल्या दीनदुबळ्यांचा उसासा असतो व ह्रदयशून्य जगाचे ह्रदय असते, तो निरूत्साही परिस्थतीतला उत्साह असतो.
    कार्ल मार्क्स ने म्हटल्याप्रमाणे धर्म हा बहूसंख्य लोकांची अफू असते. सुखाचा केवळ आभास असणारा धर्मच मुळात नाहीसा होणे आवश्यक आहे, आणि अशी ईच्छा करणे म्हणजे खर्या सुखाची मागणी करणे होय.
    ज्या परिस्थिती मुळे अशा आभासाची अथवा भ्रामक सुखाची गरज भासते ती परिस्थितीतला पूर्णपणे बदलली तर धर्माची गरजच भासणार नाही. भोवतालच्या जगाच्या अस्तित्वाचे माणसाच्या कल्पनाशक्तीवर जे परिणाम होतात त्यातूनच धर्मकल्पनांचा उगम होतो.
    शोषण व गुलामगिरीतून आलेल्या निकृष्ट दर्जाच्या जीवनपद्धती मध्ये येणार्या न संपणारे दु:ख व अवहेलना ची तीव्रता कमी करण्यासाठी माणसाने शोधलेला एक मार्ग व भ्रामक सुखाचा आभास म्हणजे धर्म होय.
    धर्म म्हणजे दुःखितांचा दिलासा व शोषितांचा विश्वास असतो. धर्म म्हणजे निष्प्राण जगाच्या प्राण आहे व निरूत्साही परिस्थितीतला उत्साह आहे. धर्म म्हणजे दुःखी जंगलातले दु:ख विसरायला मदत करणारी अफूची गोळी आहे.
    धर्माच्या रुपाने मिळणार्या काल्पनिक सुखातून पिडीतांना बाहेर काढल्याखेरीज त्यांना खरे सुख मिळणार नाही. ज्या परिस्थितीमुळे घर्माची आवश्यकता निर्माण झाली, ती क्लेषकारक परिस्थिती नाहीशी करणे हाच धर्माचे काल्पनिक सुख नाहीसे करण्याच खरा मार्ग आहे. ज्या परिस्थितीमुळे धर्मभावना उदभवल्या ती परिस्थितीत नाहीशी करणे हा एकमेव मार्ग आहे. लोक सहभागातून येणारी क्रांतीच हा बदल घडवून आणू शकेल तेव्हा धर्माची गरजच राहणार नाही.

    ReplyDelete
  3. जीवनातील प्रवाहात अनेक माणसे त्यांची मन यांना वेगवेगळी विषय खाद्ये सतत निसर्गत: प्राप्त होत असतात. आणि ती अभिव्यक्त होण्यासाठी कडवट मध्यममार्गी, तटस्थ/उदास अशी प्रवाही मने ही मानवास प्राप्त आहेत. तसेच अनेक भौतिक रसायन, जैविक अजून आणी काही प्रवाहांनी युक्त मानवी जीवन युक्त आहे. तसे म्हणाल तर तो त्या परिस्थितीचा बरा वाईट वापर करणारा न करणारा सदैव चंचलता मग ती स्त्रीची असो किंवा वातावरणाची विश्वाची उपरोक्त जैविक रासायनिक मानसिक गतीचीची लक्षणे मानली पाहिजे. त्यामुळेच जीवनाची निसर्गाची परिवर्तनीयता अनुभवास येते. त्या सर्वांच्या समज किंवा सहाय्य/ असहाय्यातून काही संस्थांची निर्मिती मानवाने निवाऱ्याबरोबर हळहूळ प्रथा परंपरा त्यातू धर्म हा आलाच. त्यात मानसिक नियंत्रणाचे एक मोठे साधन म्हणून त्याचा वापर झाला. अर्थात त्यात काळानुसार वेळोवेळी परिवर्तन न झाले तर तो साचेबध्द जुनाट जसे 1925 चे बीएमडब्ल्यू गाडीचे मॉडेल तसा झाला आहे. व हे जुने साचे सांभाळणारे ठेकेदार त्यांची रोजीरोटी आवडीने सांभाळतात किंवा त्याच जगात राहतात. पण हे मानवी मन / जीवन नीती विवेक जाणीवेच्या वेळोवेळी बदलत्या प्रेरणा व पिढीपरत्वे नव्याने अनुभव यामुळे धर्माच्या साच्याविनाही चालू ठेवता येईल नव्हे त्या एका बाजूने अव्याहतपणे नैतिक अनैतिक रितीने सुरुच आहे. धर्माच्या नियमांत जुनी नवी कृत्रिम नैसर्गिक अनुभवांची भेसळ सोयीनुसार चालूच राहणार आहे. पण नवी पिढीला जेव्हा ते अगतिक नकोनको होईल तसा त्यांना नीती विवेक जाणीव, विज्ञान शिकविणारा मार्ग अनुभवास येईल तेव्हाच वरीलप्रमाणे संजय सरांनी म्हटल्याप्रमाणे धर्माची गरजच राहणार नाही. अतिशय प्रबोधनपर वस्तुस्थितीचे सातत्याने आकलन करण्यास लावणारा लेख. अभय पवार,वांद्रे, मुंबई

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...