Friday, January 13, 2017

सोलापुरात उमटला मुक समाजाचा साहित्यिक आवाज!

Image may contain: 6 people, people standing

"आवाज उद्याचा...उद्गार उद्याचा" हा नारा देत भारतातील पहिले "आदिवासी धनगर सहित्य संमेलन" ७ व ८ जानेवारीला पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही आम्ही नवविचारांनी नवे आशय देवू शकतो हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वैशिष्ट्य होते. या संमेलनात विविध विचारप्रवाहच नव्हे तर समाजघटकही वक्त्यांच्या रुपात सहभागी होते. या विविध विचारप्रवाहांना गंभीरतापुर्वक समजावून घेणा-या हजारावर श्रोत्यांची दोन दिवस सलग उपस्थिती हेही एक वैशिष्ट्य होते. भुतकाळ समजावून घेत वर्तमानाचे विश्लेशन करत भविष्याच्या दिशा ठरवणे हे साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य असते. ते या संमेलनत एवढे प्रकर्षाने दिसले कि प्रस्थापित साहित्य संमेलनांनाही त्याची दखल घेणे भाग पडले.

या पहिल्यवहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. हा एक ऐतिहासिक बहुमान माझ्या वाट्याला आला. आदिम समाजाशी आधुनिक युगातही नाळ घट्ट करत त्यांच्या भावविश्वात सहित्यिक दृष्टीकोनातुनही मला जोडून घेता आले. या समाजाला साहित्याची, नवविचारांची भूक आहे याची तीव्र जाणीव या सम्मेलनाने झाली. अनेक वक्ते असे होते कि त्यांना कधी जाहीर बोलण्याची संधीही मिळाली नव्हती. पण त्यांच्या भाषणांत जो गंभीर अभ्यास, विश्लेशनात्मक पद्धती व भविष्याच्या दिशांचा विचार उमटत होता ते पाहून अशा व्यासपीठाची तीव्र गरजही लक्षात आली. प्रस्थापितांनी ज्यांना कधी जवळ केले नाही, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय बनू शकतो याचा विचार केला नाही त्यांनी स्वत:चे विश्व बनवण्यासाठी कष्ट उपसले तर काय चूक हा प्रश्नही माझ्या मनात उपस्थित झाला होता. या संमेलनाने ती वाट करून दिली. रानावनांत खुल्या आभाळाखाली वाढलेली, बहरलेली धनगर संस्कृती नव्या युगावर धनगरांचेच पुर्वज मौर्य व सातवाहनांप्रमाणे नव्या युगावरही आपला ठसा उमटवायला सज्ज झाल्याचे चित्र ठळक झाले ही या संमेलनाची फलश्रुती होती.

महाराष्ट्राला संस्कृती दिली ते ४३० वर्ष राज्य करणा-या सातवाहन घराण्याने. हे घराणे पुढे आले ते धनगरांतूनच. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा मराठीतील आद्य महाराष्ट्री प्राकृतातील काव्यसंग्रह. त्यातील जनजीवनाचे लोभस चित्रण हा आजही जागतिक वाड्मयात चर्चेचा व अभ्यासाचा विषय. आजच्या मराठीचा हा आद्य स्त्रोत. एका धनगरानेच मराठी साहित्य संस्कृतीचा पाया घातला. पण त्याची जाण मराठी सारस्वताने कधी ठेवली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने तर कधी त्याचा नामोल्लेखही केला नाही. पण सोलापुरमधील ग्रंथदिंडीत मानाने विराजमान होती "गाथा सप्तशती". एवढेच नव्हे तर ग्रंथदालनाचेही नांव होते "हाल सातवाहन ग्रंथनगरी." हालाच्याच पावलावर पाऊल ठेवत धनगरी ओव्या आजपर्यंण्त कालौघातील भाषाबदल पचवत आजवर पोहोचले. आता पुन्हा नव्या स्वरुपात नवा साहित्य-उद्गार निघेल याची ग्वाही या संमेलनाने दिली. मीही माझ्या भाषणात, "जरी प्रस्थापित मराठी साहित्यातून धनगरांना अदृष्य ठेवण्यात आले असले तरी धनगर साहित्याची स्वतंत्र शैली निर्माण करणार..." असे सांगितले. हे उद्गार वृत्तपत्रांचे मथळे बनले. एकविसशे वर्षांनंतर हाल सातवाहनाचा जयजयकार महराष्ट्र भुमीवर निनादला.

या संमेलनात विविध परिसंवादांतील सहभागी सिद्धराम पाटील, सौ. संगीता चित्रकुटे, विकास पांढरे, सुभाष बोंद्रे, सारख्या विविध वक्त्यांनी धनगरी समाजाचे साहित्य व माध्यमांतील चित्रण समाधानकारक का नाही यावर अत्यंत अभ्यासपुर्ण चर्चा केल्या. परिसंवादांचे अध्यक्ष असलेल्या घनश्याम पाटील, सचीन परब यांच्यासारख्या महनीय अभ्यासक वक्त्यांनी त्यात अधिक आशय भरत चर्चांना निर्णायक स्वरुप दिले. प्राचार्य शिवाजी दलनर, डा. यशपाल भिंगेंने इतिहास व वर्तमानातील आव्हानांवर गांभिर्यपुर्वक विचार मांडले. अगदी आरक्षणावरही मुद्देसुद चर्चा झाल्या. कोणावरही टीका अथवा आगपाखड न करता एका संवेदनशील विषयावर चर्चा झाली हे विशेष. अन्यथा वाद आणि साहित्य संमेलन हे समीकरणच बनलेल्या काळात "निर्विवाद" झालेले हे एकमेव साहित्य संमेलन म्हणावे लागेल. अगदी समारोप सत्राचे अध्यक्ष व राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही राजकारणाला नव्हे तर साहित्य प्रेरणांना आपल्या भाषणात महत्व दिले हे महत्वाचे आहे.

हे साहित्य संमेलन भरवण्याचा विचार येणेच मुळात क्रांतीकारी होते. डा. अभिमन्यू टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील यांनी नुसती कल्पना माम्डुन न थंबता हे संमेलन प्रत्यक्ष नेटकेपने होईल यासाठी अविरत कष्ट उपसले. अमोल पांढरे यांनी गेले तीन-चार महिने रात्रंदिवस मेहनत घेतली. संमेलनात एकदा निवेदन करत असतांना त्यांच्या आनंदाश्रुंचा बांध फुटला. एवढी ध्येयावरील अविचल निष्ठा आजकाल दुर्मिळ झाली आहे. पण एक इतिहास घडला तो या चौघांमुळे व त्यंना साथ देणा-या समाजबांधवांमुळे हे साहित्य इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल हे मात्र नक्कीच.

धनगरांचे स्वतंत्र संमेलन भरवणे म्हणजे जातीवाद नव्हे काय असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देई कि "मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे!" आणि खरेच संमेलनात जवळपास ४०% वक्ते हे अन्य समाजांतील होते. कसलाही भेदभाव अथवा कोणा जातीचे माहात्म्य गाण्याचा प्रयत्नही नव्हता. सर्वच वक्ते समरसून तळमळीने बोलले. आज महाराष्ट्रातील गढूळलेल्या जातीय वातावरणात सर्वैक्याचा संदेश देणारे हे संमेलन घडले हे या संमेलनाचे सर्वात मोठे यश होय. धनगरांनी भरवलेले सर्व जातीय संमेलन हेच त्याचे स्वरुप राहिले. यासाठी अखिल धनगर बांधव कोटीश: अभिनंदनास पात्र आहेत यात शंका नाही.

आता मुक समाजही बोलू लागले. राज्यकर्ते असोत कि समाजातील वर्चस्वतावादी घटक...ते जर घाबरत असतील तर संख्येला नव्हे तर विचारांना. समाज विचार करणारा व्हावा हे त्यांना मान्य नसते. धनगरच काय अन्य भटक्या विमुक्तांकडे, ओबीसेंकडे पाहण्याची जी साहित्य-उदासिनता आली आहे ती यातुनच! आता ते होनार नाही. अनेक समाजबांधवही आता आपला साहित्य उद्गार काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठे लातूर शहराने निमंत्रण दिल्याचे श्री. संभाजी सूळ यांनी घोषित केले आहे. हा प्रवाह फोफावत एका नदाचे रुप घेईल...सारे बांधव साहित्य-विचारी होत प्रगल्भ भारताच्या दिशेने वाट चालतील याचा मला विश्वास आहे. त्यातच माझी कृतार्थता आहे.

येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषात भंडारा उधळत या संमेक्लनाचे अभिनव व खास धनगरी सांस्कृतिक पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन झाले. हा येळकोट साहित्याच्या विशाल वैश्विक प्रांगणात असाच निनादत राहील व नव्या पिढ्या अत्यंत सक्षमतेने आपल्या संवेदनांना...विचारांना मूक्त आवाज देत राहतील याचा मला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...