Saturday, May 27, 2017

विचारांचा दुष्काळ!


Image result for drought of thinking



कोणी कोणत्या विचारसरणीचे असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विशिष्ट विचारसरणीचे म्हणवून घेणा-यांनाही ती विचारसरणी समजलेली असते असे म्हणणे धारिष्ट्याचे आहे. बव्हंशीवेळा भंपकांचाच भरणा कोणत्याही विचारधारेत अधिक असल्याचे दिसते. या भंपकांमुळे मूळ विचारसरणी, मग ती कोणतीही असो, साध्यापासून ढळत जात अस्तांचलाकडे वाट चालू लागते. कोण आधी आणि कोण नंतर एवढेच काय ते ठरायचे बाकी असते.

आज आपण सारेच प्रतिक्रियावादी झालो आहोत. पुरोगामी म्हणवणा-या वर्गात तर हे प्रमाण चिंता वाटावी एवढे मोठे झाले आहे. कोणतीही विचारसरणी सत्तेत आली की ती आपल्या विचारांच्याच लोकांची काळजी घेणार हे उघड आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा साहित्यिक संस्थाही आपापल्या विचारसरणीचेच ढोल बडवणार हेही उघड आहे. त्यांनी काहीही केले की विरोधी विचारसरणीही ढोल बडवू लागते व या ढोलबडवीच्या गदारोळात मुलभूत प्रश्न बाजुलाच पडतात. रोज कोणीतरी काहीतरी बरळते. कोठे ना कोठे काही ना काही घटना घडते. बाजुने वा विरोधात लगेच गदारोळ सुरु होतो. कृती काय करायची याचा मात्र संभ्रम सुटत नाही. प्रतिक्रियावादी व्हायचे की प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतील अशा सकारात्मक कृती करायच्या हा प्रश्न मात्र दुरच राहून जातो.

भारतीय राजकारणात आज एक विचित्र तिढा आहे. भाजप सत्तेवर आहे हे त्याचे कारण नसून विरोधी पक्षच अस्तित्वशून्य झालेत हे खरे कारण आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला संधी मिळावी एवढे उदंड मुद्दे सध्याचे सरकार देत असतांना त्यावर आवाज तर सोडा...साधी कुईही ऐकायला येत नाही. ते कशाला घाबरले आहेत? अशा कोणत्या त्यांच्या फाइल्स त्यांना आवाज उठवण्यापासून रोखत आहेत? की त्यांना देशातील स्थिती अत्यंत उत्तम आहे असा समज सत्ताधारी पक्षाने करवून दिला आहे? संधी नसतांनाही संधी शोधणारे राजकारणी असतात. आज तर त्यांची रेलचेल आहे. पण त्याचा कसलाही लाभ पदरात पाडून घ्यायला कोणी सज्ज दिसत नाही.

सत्ताधा-यांनी निर्माण केलेल्या गारुडात कट्टर विरोध करणारे, करू पाहणारे विचारवंतही या तिढ्यातून सुटलेले नाहीत. जगात अनेक विचारसरण्या असतात. त्यांचे सहअस्तित्व मान्य करावेच लागते. पण विचारसरण्यांतील संघर्ष जिंकतो तो विचारसरनीचे तत्वज्ञान किती प्रबळ आहे आणि ते कितपत लोकांपर्यंत पोहोचवता येते यावर ठरते. प्रतिक्रियावादी विचारवंतीय लेखन वाचून साध्य काय होणार? दोषदिग्दर्शन होईल हे खरे आहे पण त्याला पर्यायी मार्ग कसा मिळेल? रस्ता खराब आहे. तो अमुकमुळे खराब झाला. हे कोणी सांगून काय उपयोग? त्यावर चालणा-या प्रत्येकाला ते माहितच आहे. तुम्ही नवा रस्ता देता का..तर बोला अशीच प्रतिक्रिया येणार हे उघड आहे.

संघवादी विचारसरणी आपली पाळेमुळे घट्ट रोवत चालली आहे. त्यांच्याच विचारांचे सरकार असल्याने ते तसेच होणार हे गृहित धरायला हवे. तसे न करतील तर त्यांना मुर्खच म्हणायला हवे. संघवादाशी संघर्ष हा केवळ राजकीय नाही तर तो सांस्कृतिक, धार्मिक , आर्थिक आणि सामाजिक तत्वज्ञानाच्या पातळीवर लढावा लागेल. उपटसुंभी नेत्यांच्या बोलांना व मुर्ख क्रियांना फक्त प्रतिक्रिया देत बसले तर हा संघर्ष कधीही संपणार नाही, उलट तो दिवसेंदिवस जगड्व्याळ होत सर्वव्यापी बनेल आणि त्यात हार कोणाची होणार हे सरळ आहे. राजकीय पराभव हा विचारसरणीचाही पराभव असतो हे मान्य करावे लागते. संघविरोधी विचारवंतांनी यावर कितपत विचार केला आहे? आपल्या तत्वज्ञानाची मुळे जे गांधीवादात शोधत आहेत त्याच गांधीजींचे अपहरण का होत आहे यावर विचार कोण करणार? बाबासाहेबांचे काय होत आहे? राजकीय आकांक्षा असणारे अनेक समाजघटक आजही नेत्याच्या शोधात आहेत, हे चित्र काय सांगते?

म्हणजे आम्हीच सैरभैर झालो आहोत. अनेक संधीसाधू, मग ते विचारवंत असोत की राजकीय, आधीच संघ-जलात नहात पवित्र झाले आहेत. प्रबळ विरोधी पक्ष नसणे ही मोठी समस्या नसून प्रभावी विरोधी विचारवंत नाहीत ही जास्त मोठी शोकांतिका आहे. ते प्रभावी होत नाहीत कारण तत्वज्ञानाची सुसंगत फेरमांडणी करण्यात अपयश आले आहे. सबळ तत्वज्ञानाच्या पायाखेरीज कोणतीही वैचारिक अथवा समाज-सांस्कृतिक चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. गांधीजींचे यश हे त्यांच्या तत्वज्ञानात होते. गांधीजींचा जप करून अणि त्यांच्या खुन्याचे रोज शिवीरुपात नामस्मरण करून गांधीवादी होता येत नाही. आजच्या वर्तमानासाठी आवश्यक कालसुसंगत तत्वज्ञान व त्यावर आधारित चळवळ उभी करावी लागते. अन्यथा गांधीजींचे नांव घ्यायला अथवा त्यांचे अपहरणही करायला फारशा बुद्धीमत्तेची गरज लागत नाही.

ज्यांना काही उभे करता येत नाही त्यांना प्रतिक्रियावादी होणे सोपे जाते. समाजमाध्यमांमुळे तर प्रतिक्रियांचा पाऊस पाडता येतो. पण त्यामुळे समाजमन बदलत नाही. आज विरोधी पक्ष संपल्यासारखे दिसत असतांना ते एवढी अपयशे गाठीला जमा असुनही मोदींकडेच आशेने पहात असतील तर लोकांचा काय दोष? असंवेदनाशील भडभुंज्या नेत्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी त्यांना रोखणार कोण? मुळात समाजमनाची वैचारिक मशागत करण्यासाठी आम्ही काय केले आहे हा प्रश्न तर पडायलाच हवा. आज काही विचारवंतही विरोधाच्या नादात उन्मादी होतात पण समस्येच्या मुळाशी जात मग नंतरच त्याचे विश्लेशन करावे अथवा प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना समजत नाही. समाजमाध्यमांच्या झटपट प्रसिद्धीमुळे तेही बिघडले आहेत की काय हा प्रश्न पडतो. पण त्यामुळे समाजाचे प्रश्न त्यामुळे सुटत नाहीत. उद्याची आशा त्यांना यातून मिळणार नाही. भविष्यातील समस्यांशी लढण्याची उमेद मिळणे ही तर फार दुरची बाब झाली.

आपल्या समस्यांची मुळे मुळात आपल्या समाजविचारदुष्काळात आहेत हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. सरकारे येतील व जातील, पण हा दुष्काळ असाच राहिला तर स्थितीत काही फरक पडेल असे नाही. आज संघवादाचा डंका पिटला जात असेल तर उद्या कोंग्रेसवादाचा वा साम्यवादाचा पिटला जाईल. पण त्यामुळे आमचे आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत. उन्न्हीस-बीस फरकच काय तो राहील. याचे कारण म्हणजे हे प्रश्नच एवढ्या गुंतागुंतीचे बनवले गेले आहेत की त्यांच्या मुळाशी न जाता वरवरची सोपी व भावनिक उत्तरे शोधण्यातच सर्वांना रस आहे. जो आकर्षक वेष्टणे वापरतो तो जिंकतो. विरोधकांकडे वेष्टणे तरी आहेत की नाही हा प्रश्न आहे. त्यांना दबावाखाली आणून गप्प बसवले गेले असेल व ते बसत असतील तर मग नशीबाच्या हवाल्यावर राहणेच योग्य असे कोणीही म्हणेल!

समस्या विचारवंतांची आहे. आज त्यांचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. तेही कंपुवादात अडकलेत की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. नवविचारांना समाज आज पारखा झाला आहे. त्यामुळे जर तो विगतवासी स्वप्नांच्या मोहात अडकत जात असेल तर कोणाला दोष देणार? वर्तमानाला भारुन टाकणारे नवविचार आपल्याला हवे आहेत व विचारवंतांनीच त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे. अन्यथा अंधारयूग दूर नाही हे पक्के समजून चालावे. 

2 comments:

  1. सर तुम्हाला खोटे वाटेल पण कित्येक मंडळी कि ज्यांना संघ विचारसरणी मान्य नाही तरी त्यांनी सुद्धा मोदीं कडे बघून मत दिले. का तर काँग्रेस चा नाकर्तेपणा, corruption आणि राष्ट्रवादी चा मस्तवाल पणा, जातीयवाद

    ReplyDelete
  2. राजकीय कानोसा घेता, आपली उक्त मते जे दिसते, जाणवते विचार करायला लावते अगदी बरोबर विचार वेध ठेवतात.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...