Wednesday, August 29, 2012

शेवटी सावल्याच त्या!




मी फिरस्ता नाही. भटकंती मला मुळात आवडतच नाही. म्हणजे माझ्याकडे निवांत असे क्षणच नसतात असे कोणी म्हणू शकणार नाही. खूप असतात...अगदी अनेक दिवस गच्च भरुन जातील एवढे निवांत क्षण...पण बाहेर पडावे...कोठेतरी निर्जनवासात गवत-झुडुपे तुडवत, झरे-ओढे ओलांडत कड्याकपा-यांतुन वाट शोधत आभाळावर चढाई करावी असे मला कधी वाटलेच नाही हेही तेवढेच खरे.
मी आपला घरातच निवांतपणाचे ओझे पेलत इतिहासाची जीर्ण-शीर्ण गोधडी उसवत बसलेला असतो. कोणाचा इतिहास? खरे तर कोणाचा असा नाही. म्हटलं तर सर्वांचाच. पण जे उसवत असतो तो असतो इतिहासच. एक धागा उसवला कि आपला दुसरा उसवायला घ्यायचा. उसवल्या धाग्याचे करायचे काय? काही नाही! त्याच्या जीर्णतेचा गंध मनात साठवत, त्याला शब्दांच्या तेवढ्याच कोंदट कुपीत बंद करत दुस-या जीर्णतेकडॆ वळायचं! का...कशासाठी? नाही माहित मला...पण इतिहासालाही आठवणार नाही एवढी वर्ष मी हेच करतोय हेही तेवढच खरं!

* * *

पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. माझ्याकडे कधीच कोणी येत नाही. खरं सांगायचं तर मला मित्रच नाही...एक सुद्धा! साध्या तोंडओळखीही मी ठेवत नाही. म्हणजे कधी काळी सहज बाहेर जरी पडलो आणि एखादा माणुस हजारदा दिसला असला तरी तो मला नवीनच वाटतो. त्यांनीही मला पाहिले असेल कदाचित पण त्यांनी आता ओळख दाखवायचा प्रयत्न करणेही सोडुन दिले असावे. नक्की का? आठवत नाही. माणसे म्हणजे माझ्या दृष्टीने केवळ सावल्या...अस्तित्वहीन हलणा-या-डुलणा-या, रस्ते अडवणा-या सावल्या. माझ्या घरात इतिहास सोडुन सावल्यांना प्रवेश नाही.
पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. वेगळा अशासाठी कि माझ्या नकळत घरात एक सावली घुसली. आधी ती माझ्याही लक्षात आली नाही. मी तेंव्हा उसवत असलेल्या धाग्यात जरा जास्तच अडकलो होतो. होते असे कधी कधी. काही धागे मस्तक चक्रावून टाकतात. काही छातीत तीक्ष्ण आ-या खुपसतात. काही मोहवुन टाकतात. काही सरळ कडेलोटच करुन टाकतात. तसा मी काही भावनाशील जंतू नव्हे. असण्याचे काही कारणही नाही.  पण क्वचित कधी असे होते हे मात्र खरे. साला हा इतिहास मोठा अजब प्राणी आहे. डायनासोरसारखा. लोभस वाटला तरी कृर. कक्षेत जे येईल ते गिळंकृत करणारा. बरे झाले मी डायनासोरांचा इतिहास फार लवकर उसवून मोकळा झालो...नाहीतर माझाच डायनासोर झाला असता!

असो. घरात माझ्या नकळत एक सावली घुसली हे मात्र खरे. असे कधी झाले नव्हते. पहिलीच वेळ असं काही घडायची. मी जरा अस्वस्थ झालो. समोर मान उचलुन पाहतो तर एक तरुण सावली. पुरुषाची. अनोळखी. अर्थातच! मी चिडुन विचारलं, "कोण तू?"
"काय फरक पडतो?" तो काहीशा उर्मटपणे म्हणाला. दार उघडं दिसलं...आलो झालं आत."
"चालता हो प्रथम..." मी ओरडुन त्याला दाराकडे बोट दाखवलं. मला धक्का बसला...दार बंद होतं. आणि मला आठवलं मी दार नेहमीच बंद ठेवत असे. "आत कसा आलास तू?" मी अधिकच अस्वस्थ झाल्याने माझा संताप अजुनच वाढला होता.
"दार उघडंच होतं..." तो ठामपणे म्हणाला..."अगदी सहज आत येता येईल एवढं उघडं..."
माझा विश्वास बसत नव्हता. पण आली बला टाळायला तर हवीच होती. मी जरा सावरलो.
"काय काम होत?"
"काही नाही. नुकताच आलोय मी या वस्तीत रहायला. ओळख करुन घ्यावं असं कोणी भेटलं नाही. म्हटलं चला तुमच्याशी ओळख करुन घ्यावी. माझं नांव विकी...तुमचं?"
"मला नांव नाही. असलं कधी काळी तरी विसरलोय ते मी..." मी धुमसत म्हनालो. "आता झाली ओळख...या आपण आता. मी कामात आहे."
"काय करता आपण?"
"इतिहासाच्या गोधड्या उसवतो. आलं लक्षात? आता कृपा करुन..."
"इतिहास? अरे वा!...म्हणजे मला इतिहास आवडत नाही फारसा...त्याच त्या सनावळ्या आणि तेच ते ऐतिहासिक वाद...हा खरा कोण होता खरा कोण नव्हता...छी! किळस वाटते मला इतिहासाची. पण म्हणजे इतिहास हा विषय काही फारसा टाकावु आहे असे मला वाटतं असंही नाही. असतो आपला इतिहास...असा असो कि तसा...पण काहीतरी  घडलेलं असतं एवढं तर खरं..नाही का? तुम्हाला ब-याच गोष्टी कळत असतील...म्हणजे आम्हाला माहित नसलेल्या. कधीतरी वाटतं आपल्यालाही माहित असायला पाहिजे. पण मग शेवटी तेच ते...काय उपयोग माहित होवून? त्यापेक्षा आपलं मस्त भटकावं...मुक्त जगावं. कशाला पाहिजे कटकट? बरं...तुमची मग बरीच पुस्तकंही प्रकाशित झाली असतील...नाही?"
"मी इतिहासाच्या गोधड्या उसवतो आणि ट्रंकेत भरतो." मी म्हणालो.
"हे मात्र चांगलं. नाहीतरी काय उपयोग लिहुन? फुकटचा, म्हणजे लोकांना विकत घ्यायचा ताप! आपलं आपण शोधावं आणि आपल्याशीच ठेवुन द्यावं. हे खरं इतिहासकाराचं काम. पण आजकाल लोकांना प्रसिद्धीचा हव्यासच मोठा...असुद्यात. असतो काही लोकांना छंद. तुमचं मात्र आवडलं बुवा! हेच म्हणजे गोधड्या उसवनं आणि पेटा-यात पुन्हा बंद करुन टाकणं. कटकटच नाही कसली. ना स्वत:ला ना दुस-यांना. बरं...सध्या कसलं संशोधन सुरु आहे?"
"कसलंही नाही. मी कोणत्याही काळाचा धागा पकडतो नि बसतो उसवत. मजा येते उसवायला. सांगितलेल्या गोष्टी कशा धादांत खोट्या आहेत एवढं नक्कीच समजतं मला. मी जर खरा इतिहास सांगायला लागलो ना तर सावल्या हद्दपारच करतील मला या पृथ्वीवरुन. सध्या तरी मला पृथ्वीच बरी वाटतेय. पुढचं माहित नाही."
"मग तुम्ही गडकोट खुप हिंडले असाल...?"
"छे! काय गरज त्याची?"
"म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ठिकाणांना भेट न देताच अभ्यास करता?"
"भेट देवुन मला जे समजेल ते या गोधड्यांमद्धेही आहेच कि! सर्व साफ आणि स्वच्छ दिसतं मला..."
"कमाल आहे!" तो म्हणाला. "ही गोधडी कोणत्या काळाची आहे...म्हणजे तुम्ही आता उसवत बसलाय ती?"
  "या गोधडीची जरा गुंतागुंत आहे. म्हणजे उसवला धागा कधी भुतकाळात जातो तर कधी पुढे...पार दुरच्या भविष्यकाळात. म्हणजे इतिहास भविष्यकाळातुन इकडे आल्यागत वाटतं. बरं. जा आता. मला सावल्यांशी बोलायला आवडत नाही..."
तो हसला. काही क्षण मौन राहिला. मग एकाएकी खर्जातल्या स्वरात म्हणाला...
"मी सावली नाही. तुम्ही अजुन माझ्याकडे नीट पाहिलेच नाही..."

मी चमकुन त्याच्याकडे पाहिले. न्याहाळले.
कसं शक्य होतं?
तो तरुण सावली नव्हता.
चक्क जीवंत माणुस होता.
आणि तो होता...
इतिहासातुन आलेला माझा मुलगा...
कि भविष्यकाळातुन आला होता तो?
छे!
मी माझ्या इतिहासाचा धागा कधीच उसवायला घेतला नव्हता. पुर्ण दुर्लक्षच ते. जणु काही तो कधी अस्तित्वातंच नव्हता.
मला धक्का वगैरे सहसा बसत नाही...
आज बसला एवढे मात्र खरे.

* * *

त्या रात्री मी स्वत:तच भरकटत राहिलो. घोंगावत राहिलो. आदळत-आपटत राहिलो.
मग कोठे स्थिर झालो.
सकाळी तो पुन्हा आला. तसाच मंद हसत.
"म्हणजे तुम्ही मला ओळखले तर!"
"तू येशील असे मला वाटलेच नव्हते. कसं शक्य होतं ते? तेही इतक्यात? सावल्यांच्या जगात मी एवढा हरवलो आहे कि जीवंत माणसांची आशाच संपल्यागत झालेलं. हे बघ इतिहासाच्या गोधड्या मला एकच गोष्ट शिकवतात. काहीच अनपेक्षीत नाही. त्यामुळे मला धक्का वगैरे काही बसलेला नाही हेही तेवढच खरं. भावनांना कधी मी तिलांजली दिली...कि द्यावी लागली बरं? ते जावु दे.  इतिहासात तुला कधीच रस नव्हता आणि ते चांगलंच होतं असं म्हणेन मी. इतिहास रमवतो..छळण्यासाठी. इतिहास आमंत्रण देतो आपल्या विकराल पाशात अडकवण्यासाठी. पण त्या पाशातही एक मौज असते. भवितव्याचेही तसेच. मी माझा धागा उसवायला घेतला असता तर कदाचित तु येणार हे समजलंही असतं मला! पण म्हटलं नकोच ते! कशाला उगाच? पण आता तू गेलास तरी चालेल. जीवंत माणसं हताश करतात मला. मला खुप काम आहे."
तो तसाच मंद हसत राहिला.
म्हणाला...
"कल्पना आहे मला. पण एवढं कशाला या कामात अडकावून घेताय? स्वत:चा इतिहास विसरुन या दुस-यांच्या गोधड्या कशाला उसवत बसताय? मी म्हणतो काय उपयोग होता आणि आहे त्याचा? तुम्ही पुर्वी असे नव्हता. इतिहास तुम्हालाही आवडत नसे...माहिताय मला. जाऊद्या ते उसवत बसनं आज. चला. आज कोठेतरी भटकायला जावू..."
"भटकायला? काय वेड लागलय कि काय??
"काय हरकत आहे?"
"नाही. मला अजुन शेकडो गोधड्या उसवायच्यात...कि लाखो? माहित नाही मला. जा तू. मी काही तुला बोलावले नव्हते."
"म्हणुन काय झालं? वडील आहात माझे. भेटावसं तर वाटणारच कि! शोधलं शेवटी तुम्हाला. तुम्ही इतिहास शोधता...मी तुमचा वर्तमान शोधला...अवघड होतं ते हे खरं...पण शोधलं हे महत्वाचं. चला...खरंच भटकुन येवूयात. तुम्हाला नसेल आठवत पण तुम्ही मला लहानपणी फिरायला घेवून जायचे. मम्मी आणि आपण केरळलाही गेलो होतो...आठवतंय?"
"नाही. मी माझ्या इतिहासाचा धागा उसवायचाच नाही असं एकदा ठरवलं नि मग विसरलो सगळं..."
"मग मला कसं ओळखलत?"
"माहित नाही." मी नि:ष्प्राण स्वरात म्हणालो. खरंच...कसं? वैतागच सारा. ही काय अवदसा आली होती? नको ते समोर येणे...तेही जीवंत...अनपेक्षीत...
खरे तर मला वेदना व्हायला हव्या होत्या...किंवा किमान आनंद तरी. पण मला चीड येत होती. इतिहासाचे न शोधलेले धागे मला बोलावत होते. घडलेल्या अगम्य-गहन गोष्टी मंत्रवत निमंत्रीत करत होत्या. माझ्या इतिहासाचा धागा कोठेतरी कुजत पडला होता. कोणी लावून दिलं हे काम माझ्यामागे? मीच कि! पण मग आठवत का नाही? अरे आठवायचेच नसले कि होते असे. सावल्यांच्या जगात स्मृतींना तसा अर्थ तरी काय असतो? आणि स्मृती तरी ख-या असतात हे कशावरुन? कोणीतरी लिहुन ठेवलं म्हणुन कोणीतरी एक होवुन गेला हे माहित पडतं...नाहीतर तो कधी झालाच नाही असंच नाही कि काय? आपलं बरं आहे. या गोधड्या नेतात तेथे, जेथे घटना होत्या...कोणाला ठावुक आहे जे मला ठावूक आहे? खरच सांगायला लागलो कि लागलीच जगाची नाहीतर माझी वाट.
आणि काय उपयोग आहे या सावल्यांना समजा खरं माहित झालं तरी?
मला खोटं ठरवायला मोकळेच कि!
बरंय मी ते जीर्ण-शीर्ण धागे उसवून पुन्हा कुपीत बंदिस्त करुन टाकतो...
    बसा लेको कुरवाळत तुम्हाला हवा वाटतो तो आणि तेवढाच इतिहास!

"चला...जावूयात आपण." तो म्हणाला.
"नको..."
"तुम्ही पार विसरलात आम्हाला. तुम्हाला किमान मम्मीची आठवण येत नाही? का अचानक घर सोडुन बेपत्ता झालात? मम्मी भांडायची तुमच्याशी खुप...पण ती प्रेमही करायची तुमच्यावर...रोज रडायची ती...अर्थात काही काळ. सापडला नाहीत तुम्ही...एवढा शोध घेवूनही. नंतर नाईलाजानं लग्न करावं लागलं तिला दुस-याशी. आठवण नाही येत तिची?"
"नाही. मी लग्न केलं होतं हेच विसरलोय मी."
"कमाल आहे...लग्नच केलं नसतं तर मी कोठुन आलो असतो?"
"मुलं व्हायला लग्नच करावी लागतात असं कोणी सांगितलं तुला?"
यावर तो दिलखुलास हसला.
"खरय..." त्यानं कबुली दिली. "आता सांगायला हरकत नाही...माझीही तीच गत आहे. म्हणजे प्रेयसी गरोदर आहे आणि ती मी लग्न केलं नाही तरी मूल वाढवणार आहे. गेली झकत! पण तुमचं तसं नाही. लग्न केलं तुम्ही मम्मीशी."
"हे बघ हे फालतु तुनतुनं वाजवू नकोस. आता तू गेलास तरी चालेल...मला काम आहे खुप. दिवसरात्र चालणारं काम.."
"पण आहे काय त्याचा उपयोग?"
"सारी कामं उपयोगासाठी असतात हे कोणी सांगितलं तुला? हे माझं नियत काम आहे असं समज."
"तुमचं अजबच असतं सगळं. काही बदल नाही. पण एवढा बदल कि तुम्ही माझे बाप आहात यावर विश्वास बसु नये."
"तू जा आता. तू गेलास कि मीही मला मुलगा होता यावर विश्वास ठेवणार नाही."
"ठीक आहे. पण माझी एक शेवटची विनंती...थोडं फिरुन येवुयात...मला काही अजब गोष्टी सांगायच्यात तुम्हाला...मला तुमची आठवण यायची पण नंतर धुसर होत गेली ती. पण अलीकडे का कोणासठावूक...एवढ्या तीव्रतेने आठवणी यायला लागल्या कि मी शेवटी शोधलंच तुम्हाला...नवल नाही वाटत?"
"मला कसलंच नवल वाटत नाही." मी कोरड्या स्वरात म्हणालो.
त्याने खांदे उडवले.
"बरं... येतो मग मी. पुन्हा येईल आलो तर..."
तो गेला.
मी सभोवताली अचानक पसरुन आलेल्या काळोखाच्या लाटांखाली पुरता चिरडला गेलो.
साला प्रकाश होताच कधी आणि कोठे?
* * *
तो आलाच. आज त्याच्या चेह-यावर हसू नव्हतं.
अत्यंत भयभीत वाटत होता तो.
"मला...मला..."
त्याला काय म्हणायचय हे मला माहितच होतं.
"सर्वत्र हिंडत्या फिरत्या सावल्या दिसायला लागल्यात ना?"
मी अत्यंत कोरड्या स्वरात विचारलं.
त्याने चमकुन माझ्याकडे पाहिलं.
"तुम्हाला कसं माहित?"
काय बोलावं? कसं सांगावं त्याला?
पण कसंही सांगितलं तरी आता काय फरक पडतोय?
हळु-हळु जीवंत माणसं सावल्यांत कशी बदलतात
आणि सावल्या जीवंत का वाटु लागतात..
हे त्याला इतक्या चटकन थोडंच कळणार?

शेवटी आपण मेलोय हे आधी समजावं तरी लागेल कि नाही?

* * * * * * *

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

4 comments:

  1. संजय सोनवणी हे एक कादंबरीकार म्हणूनच मला आजपर्यंत जास्त परिचित होते. कथाकार संजय सोनवणी हा त्यांचा एक नवाच पैलू मला आज कळाला. अजून कोणकोणते पैलू या हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वाचे मला अजून कळायचे आहेत हेच कळत नाही कथा अर्थातच आवडली देवी सरस्वती तुमच्यावर अगदी मुक्तहस्ताने प्रसन्न आहे.

    संजय सर, अगदी छोटी पण मनात उरणारी कथा लिहिल्याबद्दल धन्यवाद ... लवकरच वाचकांना तुमच्याकडून एका नव्या अत्भुतरम्य कादंबरीचे सृजन पहावयास मिळो अशी देवाधिदेव महादेवाकडे मनापासून प्रार्थना ;)

    ReplyDelete
  2. संजयजी, तुमची कथा पहिल्यांदाच वाचतोय, ती वाचताना आणि वाचल्यावर वाटले की आजवर तुम्ही जे 'जात महात्म्य' वाढवणारे लिखाण करत आहात ते तुम्ही ताबडतोब बंद करायला पाहिजे. तुमचे कथा लेखन इतके उच्च दर्जाचे आहे की त्याच्यापुढे तुमचे जातीय साहित्य म्हणजे अगदी कचरा वाटतो. अर्थात तुमची ही कथा सामान्य अर्थात बहुजनवादी (बहुजन नव्हे) लोकांच्या डोक्यावरूनच जाईल, पण उत्कृष्ठ साहित्य म्हणजे काय याची ज्यांना जाणीव आहे, ते लोक अशा कथा डोक्यावर घेतील. तेंव्हा आपल्याला एकच विनंती की आपली प्रतिभा नको तेथे वाया घालवू नका. बहुजनवादी विकारी साहित्यनिर्मितीपासून दूर राहा.

    ReplyDelete
  3. Superb!
    Kharach jati patinche lekh lihinyapeksha asle kathalekhan kara Sonawni.

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी साहेब आपण जातीविषयक लेखन कृपया बंद करू नये. कितीही अडथळे आले तरी हि कारण हाच एक समाज आहे कि ज्याच्या वर इतिहास लेखन करावयाला लोकांना आवडत नाही. आणि त्यांचा जातीचा स्वाभिमान दुखावला जातो.

    आह्मी कधी मराठा समाजाला म्हंटले नाही इतिहास संशोधन बंद करा, परंतु काही स्वतःला सवर्ण म्हणणारे मराठा, ब्राह्मण यांना महाराष्ट्राची आद्य प्राचीन संस्कृती असणार्या धनगर समाजाचा इतिहास डोळ्यामध्ये खुपत आहे. (फेसबुक वर मी काही फडतूस लोक धनगर इतिहास सांगू नका असा सल्ला देत आहेत.)

    संजय साहेब तुह्माला प्राचीन इतिहास लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा

    विठ्ठल खोत

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...