भारतीयांवरील
रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे
शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्मिकीला आदिकवी मानण्याचा प्रघात आहे.
रामायण हे वाल्मिकीरचित महाकाव्य नेमके कधी लिहिले गेले याबाबत मात्र विद्वानांत
अनेक मतांतरे आहेत. शिवाय हे पहिले रामकाव्य आहे काय याबाबत साधार शंका उपस्थित
केल्या गेलेल्या आहेत. वाल्मिकीरचित संस्कृत भाषेतील रामायण आणि विमल सुरी रचित
“पउमचरिय” (संस्कृत- पद्मचरित) हे माहाराष्ट्री प्राकृतातील महाकाव्य यात आधीचे
कोणते आणि पहिले महाकाव्य लिहिणारा महाकवी वाल्मिकी कि विमल सुरी या प्रश्नाची
ग्रंथांतर्गत येणा-या पुराव्यानुसार मराठी भाषेच्या पुरातन वैभवाबाबत निश्चिती
करण्यासाठी चर्चा करणे महत्वाचे ठरते. या काव्यात येणा-या कथांचे मूळ स्त्रोत
कोणते हेही या निमित्ताने तपासून पहायचे आहे. त्यासाठी संस्कृत भाषेचा उदय नेमका
कधी झाला हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. मराठी भाषेची प्राचीनता आणि त्या भाषेला
असणारे जैनांचे योगदान समजावून घेण्यासाठी आणि एका महत्वाच्या, भारतीय मानसिकतेवर
व्यापक परिणाम करणा-या रामावरील आद्य महाकाव्य कोणते हे तपासण्यासाठीही या चर्चेचा
उपयोग होऊ शकतो, म्हणून मी ही चर्चा विस्ताराने केली आहे.
पाश्चात्य
विद्वान एकोणीसाव्या शतकातच रामकथेकडे वळाले असले तरी रामकथेबाबत शिस्तबद्ध
संशोधने व्हायला १९५० नंतर वेग आला. रामायणाच्या जैन, बौद्ध अशा विविध धर्मीय आणि
भाषिक आवृत्यांचाही तुलनात्मक अभ्यास सुरु झाला. जैन रामायणाबाबत जे. डब्ल्यू.
डी-जोंग यांनी जर्नल ऑफ ओरीएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोडात तीन टिपणे लिहिली. जैन
रामायणाच्या जुन्या प्रतीवरील जे. सी. जैन यांचे संशोधनात्मक लेख १९७५ साली जर्नल
ऑफ ओरीएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोडाने प्रकाशित केले होते. बौद्ध साहित्यात येणा-या
रामकथांबाबत मात्र तुलनात्मक अभ्यास करण्यात
किंचित दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. अपवाद फक्त डी. सी. सरकार यांनी
लिहिलेल्या आणि १९७६ साली “The
Ramayana and Dasharatha
Jataka” या प्रकाशित केलेल्या प्रदीर्घ लेखाचा. वाल्मिकी
रामायणाचा उत्तरकालीन रामकथांवरील प्रभावावरही विपुल लेखन झाले असले तरी रामकथेचे
रहस्य उलगडले आहे असे नाही. वाल्मिकी रामायणातील धर्म, नीती, समाजव्यवस्था, भूगोल,
सैनिकी व्यवस्था, नगररचना, काव्यातील विसंगती इ. बाबतही विपुल लेखन झालेले आहे.
पुरातत्वीय अंगानेही रामायणाचे विश्लेषण केले गेलेले आहे.१ सांस्कृतिक आणि सामाजिक समस्यांच्या आणि
नैतिकतेच्या संदर्भातही विविधांगी चर्चा झालेली असून रामकथा नकळत सामाजिक
संघर्षांनाही जन्म देत आलेली आपल्याला दिसते. आपल्याला या निबंधात कोणते महाकाव्य
आधीचे यावर चर्चा करायची असून परंपरागत मान्यता अनेकदा भावनिक आणि अनुमानित
कालरेखेच्या बंधनात अडकून कशी चुकते याचाही आढावा घ्यायचा आहे.
या विषयाची
चिकित्सा येथे महत्वाची यासाठी आहे कि संस्कृतने प्राकृत भाषांचे रास्त श्रेय
हिरावून घेतले कसे याची नोंदही होणे आवश्यक आहे. रामाबर कितवेही असले तरी महाकाव्य
मराठीत प्राचीन काळीच लिहिले गेले होते हे अभिमानाचे असले तरी पहिलेपण हिरावले
गेलेले आहे ही दुर्दैवाची बाब आहे. मराठी भाषा अभिजात आहे कारण त्यात पहिले
महाकाव्य लिहिले गेलेले आहे यावरही अभ्यासपूर्ण शिक्का-मोर्तब होणे आवश्यक आहे.
खरे तर ज्याचे
श्रेय त्याला दिले गेले पाहिजे, याचे भान संस्कृत-समर्थकांनी न ठेवल्याने प्राकृत
भाषांवर जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे. एकंदरीत भारतीय विचारविश्वच विकारांनी
प्रदूषित असल्याने आपले श्रेय आपण मिळवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात त्याला
नाईलाज आहे. त्यामुळे आपण आधी ‘आद्य’ म्हटल्या जाणा-या वाल्मिकी रामायणाचे वास्तव
समजावून घेऊ आणि मग महाकवी विमल सुरींकडे वळू.
पण विमल
सुरींचे रामायण हे महाराष्ट्री प्राकृतातील एक अनुपम लेणे आहे हे मात्र आवर्जून नमूद
करू इच्छितो.
वाल्मिकी
रामायणाचा काळ
खुद्द
रामायणात कवीने लेखनाचा काळ नोंदला नसल्याने हे काव्य कधी लिहिले गेले याबाबत अनेक
विवादास्पद मते आहेत. या काव्याचा कर्ता वाल्मिकी, काव्यनायकाच्या, म्हणजे रामाचा
समकालीन दाखवला गेला असल्याने वाल्मिकीही त्रेतायुगातीलच हे असे गृहीत धरूनही
कालनिश्चिती केली गेली आहे. पण ही कालनिश्चिती कल्पोपकल्पित असल्याने व तर्काच्या आधारावर
मुळीच टिकत नसल्याने आता ती कोणताही विद्वान स्वीकारत नाही. रामायणातील अंतर्गत
पुराव्यानुसार इसवी सन पूर्व पाचवे शतक ते इसवी सनाचे सहावे शतक असे विविध काळ
रामायणाच्या लेखनाचे दिले गेले आहे. बहुतेक अभ्यासकानी आपापली कालनिश्चिती करताना
रामायणातील विविध संदर्भांचा उपयोग केलेला आहे, पण त्यावर काही गैर-मान्यताचा अमिट
प्रभाव असल्याने त्याच संदर्भांचा उपयोग करून यथायोग्य कालनिश्चिती करण्यात
त्यांना अपयश आले आहे. पारंपारिक कर्मठ मतांचा अधिक प्रभाव असणारे अभ्यासक रामायण
लेखनाचा काळ जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करतात तर काही तटस्थ संशोधक
रामायण काळ सांगितला जातो तेवढा प्राचीन नसल्याचे पुरावे रामायणातीलच आलेल्या अनेक
उत्तरकालीन संदर्भानुसार देतात. त्याच वेळेस रामायणात आलेले यवन, शक, दिनार वगैरे
उल्लेख हे रामायणातील प्रक्षेप मानून पारंपारिक मताचे संशोधक ती मते फेटाळून
लावतात. थोडक्यात रामायणाची तारीख विवादांच्या भोव-यात आहे. पण काही सज्जड पुरावे
असे आहेत जे आजवर फारसे विचारात घेतले गेले नसले तरी रामायण लेखनाची कालनिश्चिती
करण्यास ते उपयुक्त आहेत.
सध्या जे
रामायण उपलब्ध आहे त्यातील बालकांड आणि उत्तरकांड हे मूळ पाच कांडांच्या रामायणाला
फार नंतर जोडले गेले आहे असे आता सर्वमान्य मत असले तरी बालकांड आणि उत्तरकांडातील
काही भाग तरी मूळ लेखकाचा असला पाहिजे असेही मत अनेकांनी व्यक्त केलेले आहे. या
कांडांतील भाषा शैली, रचना पद्धती उर्वरीत कांडांपेक्षा वेगळी आणि काव्यदृष्ट्या
सामान्य आहे. अर्थात मुळची मानली गेलेली कांडेही प्रक्षेपांपासून अलिप्त नाहीत.
अन्य अनेक अनाम कवींनी त्यात कालौघात घाल-घुसड केलेली आहे. हे प्रक्षेप कोणत्या
शतकात केले गेले असावेत याबाबतही एकमत नाही.
रामायण
लिहिण्यामागील उद्देश आर्य (वैदिक) धर्माचा आणि संस्कृतीचा दक्षिण भारतासह
श्रीलंकेत करणे हा होता असे मत वेबर यांनी व्यक्त केलेले आहे. किंबहुना प्राचीन
साहित्य हे कोणत्या ना कोणत्या धर्ममताचे समर्थन करण्यासाठी लिहिला जात असल्याने
वाल्मिकी रामायणाबाबत तसेच घडणेही स्वाभाविक आहे. रामायणाचे कथासूत्र वाल्मिकीने प्राचीन
व लोकप्रिय वीरगीते व लोककथांमधून घेतली व हे काव्य रचले असे त्यांचे कथन आहे. २
याचाच अर्थ वाल्मिकीपूर्वीच रामकथा वेगवेगळ्या स्वरूपात व कथानकात ब-यापैकी
प्रसिद्ध होती, पण तिची रूपे कथानकांसहित स्थानपरत्वे बदललेली होती. पण वाल्मिकीने
हे काव्य रचले कधी? विंटरनिट्झसारखे विद्वान म्हणतात की आताचे
रामायण हे वाल्मीकीने सनपुर्व तिनशेमध्ये पुरातन लोकगीतांचा आधार घेत रचले.३ रामायण लिहिण्यासाठी
लोकगीतांचा आधार घेतला हे त्यांचे म्हणणे योग्य असले तरी इसपू तिसरे शतकच का याचा
त्यांनी उलगडा केलेला नाही. रामायण इसवीपूर्व काळातील असणे शक्य नाही हे अनेक
पुराव्यांवरून दाखवता येते.
बौद्ध
जातककथातील दशरथ जातकात (सुत्तपिटक, खुद्दक निकाय, ४६१) येणारी रामकथा अत्यंत
वेगळ्या स्वरूपाची असून आज आपल्याला माहित असलेल्या रामकथेपेक्षा तिचे स्वरूप
अत्यंत वेगळे आहे. रामायणामुळे लोकप्रिय झालेल्या रामकथेपेक्षा अत्यंत वेगळे व
विसंगत रूप यात येते. प्रो. कामिल बुल्के यांनी त्यांच्या 'रामकथा का
इतिहास' या पुस्तकात
लिहिले आहे. रामकथेचा पहिला उल्लेख 'दशरथ जातक कथा' मध्ये आढळतो.
जे ख्रिस्ताच्या 400 वर्षांपूर्वी (आतापासून 2600 वर्षे) लिहिले गेले होते. या
कथेनुसार दशरथ हा अयोद्ध्येचा नव्हे तर वाराणसीसा राजा होता आणि यात राम, लक्ष्मण
व सीता भाऊ-बहिण असल्याचे दाखवले गेलेले आहे. एकंदरीत रचना पाहता बौद्ध काळात जर वाल्मिकी
रामायण उपलब्ध असते तर कथेत एवढा विरोधाभास आला नसता.
जातककथा
इसपूच्या पहिल्या शतकापर्यंत पाली भाषेत लिखित स्वरूपात आल्या होत्या. आज त्या
उपलब्ध नसून पाचव्या शतकात श्रीलंकेत सिंहली भाषेतून पुन्हा पालीत झालेल्या
अनुवादावरून आपल्याला माहित आहेत. पण आज उपलब्ध झालेले जातक हे मूळ स्वरूपाचे असले
पाहिजे, कारण त्यावर वाल्मिकी रामायणाचा यत्किंचितही प्रभाव नाही, त्यामुळे
जातककथांचे संस्करण करणा-या लेखकाला वाल्मिकीरचित रामकथा महित नव्हती असे आपण
स्पष्ट म्हणू शकतो कारण तेव्हा वाल्मिकी रामायण सिद्ध झालेले नव्हते. यातून
दिसणारी दुसरी बाब अशी कि बुद्ध-महावीर काळापासून ते इसपूच्या पहिल्या शतकानंतरही
बराच काळ रामकथेत एकवाक्यता नसून तिची अनेक परस्परविरोधी रूपे प्रचलित होती.
त्यामुळे
वाल्मिकीने आपले काव्य लिहिताना कच्चा माल म्हणून नेमक्या कोणत्या स्त्रोतांचा
अथवा रूपांचा उपयोग केला आणि त्यातून आपली कथावस्तुनिर्माण करण्यासाठी काय बदल
केले हे सांगता येणे अवघड आहे. शिवाय वाल्मिकी रामायणाच्या भिन्न प्रादेशिक पाठांत
असलेले विभेदही खूप असल्याने मूळचे रामायण नेमके कोणत्या स्वरूपाचे असेल याबाबत
तर्कच बांधावे लागतात. त्यातल्या त्यात दाक्षिणात्य आवृत्त्या मुळ रचनेशी अधिक जवळ
जाणा-या आहेत असे मत हर्मान याकोबीसारख्या विद्वानाने व्यक्त केले आहे.
महाभारत जसे
“इतिहास” या संज्ञेने प्रसिद्ध आहे तसे रामायणाचे नाही. ते “काव्य” आहे. परंतु
प्राचीन काळी रामायणाला इतिहास किंवा पुराण म्हणण्याची पद्धत होती. असे असले तरी
महाकाव्य शैलीचा प्रारंभ रामायणापासून सुरु झाला असेही सर्वसाधारण मत आहे.
चवदाव्या शतकात विश्वनाथाने रामायणाला आर्ष महाकाव्य असे संबोधले. असे असले तरी
महाकाव्याची समीक्षकांनी वर्णन केलेली रचनापद्धती साधारणपणे रामायण पाळते.
अश्वघोषाच्या बुद्धचरित या महाकाव्यांवर रामायणाचा प्रभाव आहे, तसेच
अभिधर्मविभाषाशास्त्र या इसवी सनाच्या तिस-या शतकातील ग्रंथात रामकथांचा उल्लेख
आहे असे कौशिक म्हणतात. ४ पण हा ग्रंथ रामकथा उल्लेखात असला तरी वाल्मिकी
रामायणाचा उल्लेख करत नाही. अश्वघोषाच्या रचनेवर रामायणाचा प्रभाव आहे हे मतही सबळ
पुराव्यांअभावी टिकणारे नाही. रामाची कथा अन्य स्त्रोतांतून माहित असणे आणि
वाल्मिकी रामायण अस्तित्वात असणे यात फरक आहे. रामायण हे पारंपारिक वीरगीतांतून व
लोककथांतून सामुग्री गोळा करून लिहिलेले आहे असे मत सर्वच विद्वानांनी व्यक्त
केलेले आहे. म्हणजेच रामाच्या ज्या विविध प्रकारच्या काव्यमय कथा आधीच प्रसिद्ध
होत्या त्यातील आपल्या कथावस्तूला साजेशा सोयीच्या कथा कथा निवडून व त्यात कलात्मक
बदल करून त्यांना काव्यदृष्ट्या सुसंगत प्रवाही रूप देत वाल्मिकीने रामायण लिहिले
गेले असे म्हणता येईल.५ रामकथा
वेगवेगळया अस्तित्वात असल्या पाहिजेत कारण तिस-या ते चवथ्या शतकात ब-यापैकी अंतिम
स्वरूप प्राप्त खालेल्या पुराणांनीही रामकथा देतांना परस्पर विसंगत माहिती दिलेली
आहे. त्यांनीही वाल्मिकी रामायण पाहिले होते कि नाही, किंवा पुराणे रचली गेली
तेव्हा वाल्मिकी रामायण उपलब्ध होते कि नाही हे खात्रीशीर सांगता येत नाही, कारण
वाल्मिकी रामायणाने वापरलेले मुलस्त्रोत वेगळे आहेत तर पुराणे आणि विमल सुरीने आपले
महाकाव्य लिहिताना वापरलेले मुलस्त्रोत वेगळे आहेत, त्यामुळे हि विसंगती निर्माण
झाली आहे असे मात्र आपल्याला म्हणता येईल. उदा. वाल्मिकी रामायणात जनकाला सीता व
उर्मिला या दोन कन्या असल्याचे दिसते. (वा.रा. १. ७३.२६,३०) पउमचरीयनुसार मात्र जनकाला
वैदेही नामक पत्नीपासून सीता आणि भामंडल नामक जुळे कन्या व पुत्र झाले. भामंडल
जनकाकडून हरवला होता जो नंतर चंद्रगतीने दत्तक
घेऊन त्याला वाढवले. विष्णू व वायू पुराणानुसार सीतेच्या पित्याचे नाव जनक
नाही तर शिरध्वज असे आहे. (वि.पु. ४.५..३० व वा.पु. २.२८.१८) कालिका पुराण मात्र जनकाला दोन पुत्र आणि एक
कन्या असल्याचे म्हणते. (का.पु. ३८.११, १२, १३) वैदिक पुराणांमध्येही या अशा अनेक
विसंगती आहेत ज्या वाल्मिकी रामायणाच्या कथनाशी जुळत नाहीत, कारण सर्वांची सूत्रे
वेगवेगळी आहेत हेच त्यावरून स्पष्ट होते. सीतेच्या जन्माबाबतही दोन वेगळे मतप्रवाह
आहेत. पउमचरियनुसार ती जनकाला वैदेहीपासून झाली तर वाल्मीकी रामायणानुसार ती
जनकाला शेत नांगरताना सापडली. (वा. रा. १.६६.१३-१४) याचाच अर्थ असा कि रामकथेचे
वेगवेगळे स्त्रोत होते व आपापल्या आवडीने ते विकसित केले गेलेले होते. त्यांच्यात
एकवाक्यता नव्हती.
पुराणांना
तिस-या ते चवथ्या शतकात अंतिम रूप मिळाले हे लक्षात घेतले तर तोवर वाल्मिकी रामायण
अस्तित्वात आलेले नव्हते असे आपल्याला अंदाजिता येते. कारण वाल्मिकी रामायण तेव्हा
उपलब्ध असते व ते मानले जाते तसे आदिकाव्य असते व तेच या माहितीचा स्त्रोत असते तर
अशा विसंगती निर्माण झाल्या नसत्या.
महत्वाचा
पुरावा असा कि या काव्याचा संबंध स्मृती आणि वेदांशी जोडलेला असून हे काव्य
वेदांतून निघालेले असून हा हे काव्य म्हणजे वेदविस्तार आहे असेही काव्यात नमूद
करण्यात आलेले आहे. यातून दोन महत्वाचे अर्थ निघतात. रामायण हे वैदिक धर्माला
लोकप्रिय करण्याच्या हेतूने व त्या धर्माचा व धर्मतत्वांच्या प्रचारासाठी लिहिले
गेलेले आहे. रामायणात येणारी नीती, कर्मकांड, आचारधर्म आणि समाजरचना वैदिक धर्मतत्वांना
अनुसरुन आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यात तीन वेदांचा प्रत्यक्ष आणि अथर्ववेदाचा
अप्रत्यक्ष संकेत मिळतो. वैदिक धर्मात आधी तीनच वेद मान्य असून दुस-या शतकापर्यंत
अंतिम स्वरूप मिळालेली मनुस्मृतीही ऋक, साम, यजुस या वेदत्रयीचाच उल्लेख करते,
चवथा वेद अथर्ववेदाचा पुसटसा उल्लेखही करत नाही. अथर्ववेद सर्वात शेवटी लिहिला
गेला अशीही मान्यता आहे. वैदिक धर्मियांनी अथर्ववेदाला प्रतिष्ठा दिली ती
मनुस्मृतीचे अंतिम रूप क्रमश: सिद्ध झाल्यानंतर. इसवी सनाच्या दुस-या शतकापूर्वी
संस्कृत भाषेच्या अस्तित्वाचे शिलालेखीय अथवा नाणकीय लेखांचे अन्य पुरावे उपलब्ध
नसल्यामुळे तीही इसवीसनापूर्वीची नाही हे स्पष्ट आहे. या वैदिक धर्माचे नियमन करणा-या ग्रंथात शक,
काम्बोज, यवन, चीन, इत्यादी जमातींचा उल्लेख असल्याने मनुस्मृतीच्या लेखकाना या
जमाती नुसत्या माहितच नव्हत्या तर त्यांचे समाजजीवनातील अस्तित्वही दखलपात्र
बनलेले होते, त्यामुळेच धार्मिक स्मृतीत त्यांचा उल्लेख अनिवार्य झालेले दिसते. हा
काळ निश्चयाने इसवी सनाच्या दुस-या शतकानंतरचा आहे. या काळापर्यंत तरी अथर्ववेदाला
वैदिक धर्मियांनी वेद म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मनुस्मृतीच्या काळानंतर पुढील
शंभरेक वर्षात अथर्ववेदाला मान्यता मिळण्यास वैदिक धर्मीय अनुकूल झाले आणि पुढे ती
मान्यता कायम झाली. रामायणाचे लेखन या संधी काळातील, म्हणजे इसवी सनाचे तिसरे शतक
ते पाचवे शतक, असणे सहज शक्य आहे. म्हणजे मनुस्मृतीला अंतिम रूप मिळाल्यानंतर,
म्हणजे तिस-या शतकात अथर्ववेदाला चवथा वेद म्हणून मान्यता मिळाल्यानंतर परंतू
कालिदासाच्या अनुमानित काळापूर्वी (म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकापूर्वी)
वाल्मिकी रामायण लिहिले गेले असे निश्चयाने म्हणता येईल. रामायणाच्या लेखनकाळाबाबत
पी. सी. सेन गुप्ताही रामायणात अवतरणा-या बुद्ध, तथागत, चैत्य, भिक्षु, श्रमण या
शब्दांवरून हेच मत नोंदवतात. ६ बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतर
वैदिकांनी त्यांचा हिरीरीने विरोध सुरु केला हे ऐतिहासिक वास्तव आहे. गुप्त काळात
राजाश्रय मिळाल्यामुळे साहित्यातून हिरीरीने बुद्धनिंदा व्हायला सुरुवात झाली.
रामायणातील “यथा हि चोर: तथा हि बुद्ध” व बुद्धाला नास्तिक म्हणणारा श्लोक आपल्याला
ही रचना गुप्तकाळातील असल्याचेच दर्शवते. चिं. वि. वैद्य रामायणात येणा-या
ग्रह-राशींच्या आधारावर रामायण लेखनाचा काळ इसपू पहिल्या शतकाच्या पार जाऊ शकत
नाही असे विधान करतात आणि आत्ताचे उपलब्ध रामायण मात्र महाभारताच्या रचनेनंतर
त्यातील सभापर्वातील भाग जसाच्या तसा अयोध्याकांडातील एका सर्गात घेऊन सिद्ध केले
गेले व हा प्रक्षेप उत्तरकालीन आहे असेही त्यांचे विवेचन आहे. ७
भवभूतीच्या
उत्तररामचरितवरून उपलब्ध होणारा पुरावा असा कि त्याच्या काळात उपलब्ध असणारे
रामायण सर्गांत विभागले गेलेले नव्हते तर अध्यायांत विभागलेले होते. ८ भवभूतीचा
काळ हा साधारणपणे सन ७०० ते ७४० असा मानला जातो. थोडक्यात मूळ लेखनापासून वाल्मिकी
रामायणात रचनेच्या बाबतीतही बदल केले गेले व त्यात भरही पडत राहिली. भवभूतीच्या
काळापर्यंत बालकांड व उत्तरकांडही रामायणाला जोडले गेले होते. रामायणातीलच विसंगत आणि अनेक परस्परविरोधी
माहितीवरून रामायण ही एका व्यक्तीची रचना नसावी अशी शंकाही वैद्य यांनी व्यक्त
केलेली आहे. रामायणकर्ता वाल्मिकी नामक कवी खरेच झाला असेल तर त्याने लिहिलेले मूळ
काव्य हे संक्षिप्त स्वरूपाचे, सलग आणि कोणतीही अंतर्गत विसंगती ठेवणारे नसले
पाहिजे असे अनुमानही आपण काढू शकतो. मूळ रचनेत अन्यही लोकप्रिय काव्यांचा
श्लोकबद्ध समावेश करत रामायणात भर घातली गेल्याने आताच्या रामायणात विसंगती
उत्पन्न झाल्या असाव्यात असा अर्थही आपण वैद्यांच्या विवेचनावरून काढू शकतो. पण ही भर घालायला दीर्घ काळ लागला असावा या
म्हणण्यात फारसा अर्थ नाही, कारण गुप्त काळात रामायणाचा उपयोग एका धार्मिक आणि
सांस्कृतिक शस्त्रासारखा करून दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करणे हाच उद्देश
असल्याने हे मुळ रामायणात भर घालण्याचे कार्य मुळ लेखन झाल्यानंतर अवघ्या शतकभरात
व घाईत करण्यात आले. या ‘घाई’मुळेच वाल्मिकी रामायणात अनेक अक्षम्य विसंगती व
पुनरावृत्त्या असे दोष निर्माण झाले आहेत असेही आपल्या लक्षात येईल.
रघुवंश
लिहिणा-या कालिदासाला रामायण महाकाव्य माहित नव्हते असे मत कुन्हन राजा या संशोधकाने
व्यक्त केलेले आहे त्यामुळे वाल्मिकी हा कालोदासोत्तर काळातील, म्हणजे पाचव्या
शतकानंतर झाला असावा असा मतितार्थ निघतो. ९ शिवाय रघुवंशात रामाची राजधानी अयोध्येचा नव्हे
तर साकेतचा उल्लेख आहे.(रघुवंश- १३,६२). परंतु राजा गंभीर चूक करत आहेत. याचे कारण
म्हणजे कालिदास साकेत व अयोध्या या दोन्ही नावांचा उल्लेख करतो, त्यामुळे रामायण
त्याच्या आधीचे नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कालिदासाने साकेत या मुळच्या नावाचा
उपयोग अयोध्येच्या सोबत केला तर वाल्मिकीने त्याच्या काळातील प्रचलित फक्त अयोध्या
या नावाचा उपयोग केला असे म्हणावे लागेल. चिं. वि. वैद्य मात्र कालीदासासमोर
निश्चितपणे वाल्मिकीरचित रामायण होते असे म्हणतात. त्यांच्या मताप्रमाणे
कालिदासाने काही वेळा रघुवंशात रामायणातील श्लोकार्ध जसेच्या तसे वापरले आहेत.
कोणता श्लोक आधी कोणी लिहिला याचे पौर्वापपौर्य ठरवता येणे अवघड आहे. फार फार तर
अयोध्येचे प्राचीन नाव साकेत आहे याचे ज्ञान त्याला असेल. वाल्मिकीने मात्र गुप्त
राजाश्रयामुळे वर्तमानकालीन प्रचलित व लोकप्रसिद्ध अयोध्या हेच नाव साकेतऐवजी वापरले
असण्याची शक्यता आहे.
रघुवंशात
रामायणात मुळातच नसलेली अनेक वर्णने आलेली आहेत त्यामुळे वाल्मिकीने न वापरलेल्या
कथासूत्रांचा आधार घेत कालिदासाने आपल्या कल्पनाशक्तीने आपले काव्य सिद्ध केलेले
असू शकेल. थोडक्यात इसपू पाचवे शतक ते इसवी सनाचे सहावे शतक असे रामायणाचे
वेगवेगळे काळ अनुमानित केले गेले असले तरी
बव्हंशी संशोधकांचे मत रामायण लिहिण्याचा काळ इसवी सनाचे तिसरे शतक ते पाचवे शतक
असावे असे आहे. आणि ते उपलब्ध
पुराव्यांनुसार सत्याच्या जवळपास जाणारे आहे.
वैदिक
लेखकांप्रमाणेच हिंदू लेखकांतही ‘आपल्या साहित्याला वेदमान्यता आहे’ हे दाखवण्याची
प्रवृत्ती भारतात सरासरी गुप्तकाळात निर्माण झाली. किंबहुना सांस्कृतिक
वर्चस्ववादी भूमिकेतून ही बंधने निर्माण केली गेली कारण वेदमान्यता दर्शवल्याशिवाय
कोणत्याही साहित्याला प्रतिष्ठा मिळेनासे होऊ लागले होते. वेद मान्य न करणारे पण
ईश्वर मानणारेही नास्तिक ही वैचारिक संकल्पना गुप्त काळात वैदिक धर्माला राजमान्यता
मिळल्यानंतर निर्माण झाली. त्यामुळे बहुतेक साहित्यिक आपल्या लेखनाचा उगम
वेदांतूनच झाला असे दाखवण्याचा हिरीरीने प्रयत्न करत. प्रत्यक्षात वाल्मिकी
रामायणातील राम-रावण-सीता ही पात्रे कोठेही कोणत्याही वेदांत रामायणातील
पार्श्वभूमीनिशी अवतरत नसली तरी वैदिक ऋषींना रामाच्या समकालीन दाखवण्याची
रामायणात वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती दिसते. ही कवीची कल्पकता असली तरी त्यामागील
धार्मिक अभिनिवेश लपण्यासारखा नाही. त्यामुळे कालनिश्चिती करायलाही मदत होते हे
वेगळेच.
साकेत कि
अयोध्या?
वाल्मिकी
रामायणात कोसल राज्याची राजधानी अयोध्या दिलेली आहे, हे आपण पाहिले आहे. पण मुळात अयोध्या
हे नाव प्राचीन नव्हे हे मात्र रामायणाची कालनिश्चिती करताना फारसे लक्षात घेतले
गेलेले नाही. . अयोध्या नगराचे मुळचे नाव विनिय अथवा विनिता हे होते आणि या नगरीचे
स्थापना आद्य जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांनी केली अशी “जम्बुद्दीवपन्नती” या इसपु तिस-या
शतकातील जैन ग्रंथातून माहिती मिळते. पुढे याच नगरीला इक्ख्खागु हेही नाव मिळाले.
त्यानंतर इसपू सहाव्या शतकापूर्वी साकेत (सागेय व साएय) हे नाव कायम झाले. १०
तत्कालीन बौद्ध व जैन साहित्यात साकेत हेच नाव प्रामुख्याने आलेले आहे, अयोध्या
नव्हे हेही येथे लक्षणीय आहे.
“संयुक्तनिकाय”
या बौद्ध साहित्यातील चवथ्या अध्यायात आपल्याला अयोध्येचा उल्लेख मिळतो, पण ही
अयोध्या शरयूच्या तीरावरील नसून गंगेच्या तीरावरील आहे. पाली त्रिपिटक आणि अठ्ठकथेतही
अयोध्या हे नाव आले असून ते शरयू काठचे नव्हे तर गंगा नदीकाठचे छोटे नगर होते असे
नमूद करण्यात आले आहे. भगवान गौतम येथे गेले होते असा उल्लेख आलेला आहे. बुद्धाने
साकेत नगरीला मात्र कधी भेट दिली असल्याचे विवरण या ग्रंथात मिळत नाही. महत्वाची दुसरी
बाब अशी कि सहाव्या शतकात भारतात आलेल्या चीनी भिक्षु ह्यु-एन-त्संगनेही आपण गंगा
नदी ओलांडून अयोध्येत प्रवेश केला असे नमूद केले आहे.११
याचा अर्थ
एकच होऊ शकतो तो असा कि गंगातीरी असलेली अयोध्या हे एक वेगळेच शहर होते तर
शरयूतिरी असलेले साकेत हे वेगळे स्वतंत्र शहर होते. या दोन शहरांचा काहीही संबंध
नाही. गंगातीरीची अयोध्या नेमकी कोठे होते व तिचे काय झाले हे आज आपल्याला माहित
नसले तरी साकेत या शहराचे पर्यायी नाव अयोध्या असे किमान गुप्तकाळापर्यंत तरी
अस्तित्वात आलेले नव्हते. उलट अयोध्या शहर गंगातीरी असल्याचा आणि साकेत हे नगर
वेगळे असून त्यात चैत्य व विहार असल्याचा उल्लेख संयुक्त निकायमध्ये आलेला आहे.
याचाच अर्थ बुद्धकाळात साकेत व अयोध्या ही वेगळ्या ठिकाणची वेगळी नगरे होती. १२
आजच्या
अयोध्येसाठी साकेत याच नावाचा उल्लेख प्राचीन जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी
साहित्यात येतो. पउमचरिय महाकाव्यातही साकेत असाच उल्लेख आहे, अयोध्या नाही. पण
पुढे साकेत हे नाव पूर्णपणे व्यवहारातून बाद होत अयोध्या हेच नाव कायम झाले ते
गुप्तकाळात गुप्तांनी हे नगर अयोध्या नाव देत कोसल प्रांताची राजधानी केली तेव्हा.
पुढे गुप्त साम्राज्याचे सम्राट कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त यांनी पाटलीपुत्रहून
अयोध्येला गुप्त साम्राज्याची राजधानी हलवली तेव्हा अयोध्येचे साकेत हे मुळचे नाव
मागे पडत अयोध्या नावाला प्रतिष्ठा आली. १३ सम्राट नरसिंहगुप्ताच्या काळात (इसवी सनाचे
सहावे शतक) हुणांच्या स्वा-यामुळे अयोध्या ही राजधानी बदलून कनौज येथे हलवण्यात
आली आणि अयोध्येचे राजकीय महत्व पुन्हा कमी झाले. वाल्मिकी बहुदा अयोध्या ही गुप्त
साम्राज्याची प्रांतिक राजधानी असताना आणि गुप्तांचा वैदिक धर्माला राजाश्रय
असताना झाला असावा. त्यामुळेच त्याने अयोध्या हे समकालीन प्रचलित नाव वापरले असे
म्हणता येते. असे असेल तर वाल्मिकीचा काळही चवथे ते पाचवे शतक असा येईल.
गुप्त काळात
वैदिक धर्माचा जोर वाढला आणि सर्वत्र प्रसाराची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असे
मानले जाते. आणि वाल्मिकी रामायणाचाही हेतू वैदिक धर्माचा प्रसार करणे हाच
असल्याने याच वैदिक धर्माच्या उत्कर्षकाळात वाल्मिकीला या महाकाव्याची प्रेरणा
मिळाली असणे शक्य आहे. त्यामुळे वाल्मिकी रामायणाची रचना सन तिसरे शतक (मूळ गाभा)
ते पाचवे शतक (विस्तारित आवृत्ती) या काळातच झाली असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
थोडक्यात इसपू
सहावे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक या काळात साकेत हेच नाव लोकप्रिय होते.
समांतररित्या अयोध्या हेही नाव अस्तित्वात असले तरी ते वेगळ्या ठिकाणावरचे दुय्यम
शहर होते, साकेत आणि अयोध्येचा काही संबंध दिसून येत नाही. पातंजलीही आपल्या महाभाष्य' मध्ये इसपु दुस-या शतकातील ग्रीक आक्रमणाच्या संदर्भात 'अरुणत् यवनः साकेतम्, अरुणत् यवनः माध्यमिकाम्,' असे उल्लेखतो. तोही
अयोध्येचा उल्लेख करत नाही. काही विद्वान म्हणतात त्याप्रमाणे साकेत जर त्यावेळी
उजाड झालेल्या अयोध्येचे उपनगर असते तर ही चूक झाली नसती. शिवाय कालिदासानेही
रघुवंशात साकेतचाच उल्लेख रघुवंशाची राजधानी म्हणून केला असून अयोध्येचा उल्लेख
तुरळक केला आहे. म्हणजे पाचव्या शतकापर्यंत अयोध्येपेक्षा प्राचीन नाव साकेत हेच
विद्वतवर्तुळात वापरले जात होते.
कुशाण सम्राट
कनिष्कानेही राबटक शिलालेखात आपली सत्ता कोणत्या कोणत्या प्रांतावर आहे हे
सांगताना त्या यादीत येणा-या नगरांची नावे नोंदवलेली आहेत. त्यातही अयोध्या नव्हे
तर साकेत हेच नाव आलेले आहे. हा राबटक शिलालेख दुस-या शतकातील असून त्यातील चवथ्या
ते सहाव्या ओळीतील हा उल्लेख महत्वाचा आहे.
"In the year one, it
has been proclaimed unto India, unto the whole realm of the governing class
including Koonadeano (Kaundinya< Kundina) and the city of Ozeno (Ozene,
Ujjain) and the city of Zageda (Saketa) and the city of Kozambo
(Kausambi) and the city of Palabotro (Pataliputra) and so long unto (i.e. as
far as) the city of Ziri-tambo (Sri-Champa)."
म्हणजे महावीर-बुद्ध काळ ते कनिश्क काळात
साकेत या नावानेच आजच्या अयोध्येला ओळखले जात होते. दुस-या शतकातील महाकवी अश्वघोष
हाही साकेत नगराचा रहिवासी होता. अयोध्या नाव तेव्हाही अस्तित्वात आलेले
दिसत नाही. साकेत राजकीय दृष्ट्याही महत्वाची नगरी होती. वाल्मिकी या काळात कधीही
झाला असता तर त्याने रामायण लिहित असताना साकेत या नावाचाच उपयोग केला असता,
अयोध्या नव्हे. दशरथ जातकात तर वाराणसी ही दशरथाची राजधानी दर्शवलेली आहे, साकेत
अथवा अयोध्या नाही. रामायणातील रामकथा जर त्या काळात लोकप्रिय असती तर
जातककथांत असा विरोधाभासी भाग आला नसता. त्या काळात राम या व्यक्तीभोवतीच्या
दंतकथा प्रसिद्ध असल्या तरी प्रत्येक भागात रामाची राजधानी वेगळी दाखवली जाणे हे
स्थानिकांच्या अहंकाराला सुखावणारे असणार. रामायणातून रामाची राजधानी अयोध्या एवढे
मात्र ठळक रीत्या ठसवले गेले. पण मुळात आज जी अयोध्या म्हटली जाते तिचे आधीचे नाव
साकेत होते आणि त्याही पूर्वी या नगरीला विनिता म्हणून ओळखले जात होते याचे स्मरण
नंतरच्या काळात विलुप्त झालेले दिसते.
अयोध्या हे
नाव आले कोठून?
अयोध्या हे
नाव सर्वात आधी येते ते अथर्ववेदात. अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या।
तस्यां हिरण्ययः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः।। हा अयोध्या शब्दाचा रूपकात्मक उल्लेख
अथर्ववेदात येतो. येथे पृथ्वीवरील मानवी नगर अभिप्रेत नाही. या नावाने नंतर गंगा
तीरावर याच नावाचे शहर वसवले गेले असले तरी ते बहुदा परकीय आक्रमणात नष्ट झाले
असावे अथवा लोकांनी राहणे सोडल्याने ओसाड पडले असावे व लोकस्मृतीतून गायब झाले
असावे. साकेतचे नाव पूर्वीपासून अयोध्या असल्याचे संकेत कोठेहे मिळून येत नाहीत.
हान्स बेकर यांच्या मते इसवी सनाच्या
चवथ्या शतकात स्कंदगुप्ताची कारकीर्द असताना साकेत या शहराला राजधानी बनवताना या
संदर्भाचा उपयोग केला असावा आणि साकेतचे नाव अयोध्या केले असावे. १४
देवालये
व चैत्य
याबाबत महत्वाचा
पुरावा म्हणजे अयोध्या कांडात (सर्ग ७१, श्लोक ४०, ४२-४३) देवालय आणि चैत्य यांचा
उल्लेख आहे. हिंदू धर्मात सार्वजनिक मंदिरे बांधण्याची प्रथा इसवी सन पूर्व दुस-या
शतकापर्यंत आली असली भव्य मंदिरे उभारण्याची सुरुवात झाली ती गुप्तकाळात. वैदिक
धर्मियांनी या काळात मुर्तीपुजाही सुरु केली होती व त्याचे निर्देशही उपरोल्लेखित
श्लोकात आला आहे. सन तिस-या शतकातील कौटील्याच्या अर्थशास्त्रात अनेक नगरमंदिरांची
वर्णने आहेत. (अर्थशास्त्र, २.४.१७-१८)
जैन व बौद्ध धर्माच्या प्राबल्यामुळे चैत्यांची संख्याही फार मोठी होती.
चैत्य आणि मंदिरांचे उल्लेखही वाल्मिकी रामायण ही गुप्त कालीन रचना असल्याचे
निर्देश देतात, कारण
तत्पूर्वी ते क्वचित-वास्तव होते, त्यांची विपुलता नव्हती.
रामायण
लेखनाच्या काळाबाबत अजून एक महत्वाचा पुरावा दिला जातो व तो म्हणजे म्हणजे
रामायणात असलेल्या लग्न-ग्रह-राशीचा. वाल्मिकीनुसार, श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथी आणि पुनर्वसु नक्षत्र
या दिवशी झाला जेव्हा पाच ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर होते. अशा प्रकारे सूर्य
मेष राशीमध्ये 10 अंशांवर, मंगळ राशीमध्ये 28 अंशांवर, गुरू कर्क राशीमध्ये 5 अंशांवर, शुक्र मीनमध्ये 27 अंशांवर
आणि शनि तूळ राशीमध्ये 20 अंशांवर
होता. (बाल कांड 18/श्लोक 8, 9). भारतियांनी राशी व ग्रह हे
ग्रीकांकडून घेतले हे आता सिद्ध झालेले आहे. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना
आहे. ग्रहाधारित पंचांग प्रथम "यवनजातक" या अनुवादित पुस्तकातून प्रथम
आपल्याकडे आले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. रामायणातीत तिथी ही
ग्रह-नक्षत्राधारित आहे. भारतियांना ग्रह-राशीच इसवी सनापुर्वी माहित नव्हत्या तर रामजन्म
"पाच ग्रह उच्चस्थानी असता..." झाला हा उल्लेखच खूप उत्तरकालीन आहे, ग्रीकांशी संपर्क
आल्यानंतरचा आहे हे स्पष्ट होते. यवनजातकाचा अनुमानित काळ डेव्हिड पिंग्री यांनी
इसवी सन १५० असा दिलेला आहे. काही विद्वानांनी या ग्रंथाला अजून उशीराची रचना
मानली आहे. १५ म्हणजेच ही ग्रह-राशीआधारित अचूक ग्रह-स्थाने
असलेली तिथी दुस-या शतकाआधीची कदापि असू शकत नाही, सबब रामायणाची रचनाही
तत्पूर्वीची असू शकत नाही. यवनजातकाचा प्रसार व्हायला किमान एक शतकाचा काळ लागलेला
असू शकतो हे जर गृहीत धरले तरी रामायणाची रचना तिस-या शतकानंतरची आहे हे स्पष्ट
होईल. बालकांड जरी प्रक्षिप्त मानले गेले असले तरी त्यातील कथाभाग वाल्मिकीवरूनच
घेत या कांडाची रचना केली गेलेली आहे असे अनेक विद्वान मानतात, कारण बालकांडातील
रामजन्म व त्याचे अयोध्येतील प्रशिक्षण हा आवश्यक गाभा असल्याखेरीज रामायणाला
पूर्णता येत नाही. वाल्मिकीने लिहिलेल्या बालकांडाच्या काही भागावर पुढे अजूनही
काही संप्रदायात्मक संस्कार करून घाईने काही कथा जोडून शतकभरात नव्याने रचले गेले
असावे.
संस्कृत भाषेचा प्रश्न
लिखित संस्कृतचा सर्वात
पहिला पुरावाही राजा रुद्रदामनच्या गिरिनार शिलालेखात आला आहे. हा लेख सन १६५चा
आहे असे मानले जाते. तत्पूर्वी संस्कृत म्हणता येईल असा एक पुरावा सनपूर्व दुस-या
ते सनपूर्व पहिल्या शतकातील हाथीबाडा घोसुंडी शिलालेखाचा आहे. घोसुंडी शिलालेख
भग्न झालेला असून अनेक शब्द नष्ट झालेले आहेत. त्यावरून काही प्राकृतमिश्रीत
संस्कृत शब्द वाचता आलेले आहेत. इसपू तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या चारशे
वर्षातील शिलालेखीय व नाणकिय पुराव्यांवरून प्राकृत भाषांतून संस्कृत भाषा क्रमश:
विकसित होत होती असे दिसते. १६ दुस-या शतकात मात्र प्राथमिक संस्कृत प्राकृताचे
संस्कार बाळगत विकसित झाली व तिचा साहित्यिक वापरही सुरु झाला. तत्पूर्वी संस्कृत
भाषा अस्तित्वात होती असे म्हणणे पुराव्यांच्या अभावात भाषातिहासावर अन्याय करणारे
आहे. ते कितीही अप्रिय वाटले तरी वास्तव नाही.
पंडित
हरगोविंददास टी. सेठ म्हणतात, "संस्कृत
भाषेची निर्मिती वैदिक भाषेतून झालेली नसून ती मध्यदेशातील प्राकृतांपासुन बनली.
वैदिक भाषेवरही याच भागातील प्राकृतांचा प्रभाव आहे. प्राकृतातील तद्भव शब्द
संस्कृतमधुन प्राकृतात आले नसुन प्राचीन प्राकृतातुनच क्रमश: बदलत आले आहेत आणि
संस्कृतमध्ये ते तसेच्या तसे घेतले गेले आहेत. या भागातील अनेक देश्य शब्द
संस्कृतात सामाविष्ट नाहीत ही बाबही संस्कृत भाषा प्राकृतनिर्मित आहे असे सिद्ध
करते." १७ आर्ष संस्कृतानंतर पाणिनीचे व्याकरण आले व अभिजात संस्कृतची
निर्मिती झाली.
विंटर्निट्झ
यांनीही या मताला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात की बुल्हेरच्या मते शिलालेखीय
पुराव्यांवरुन व्याकरणकारांनी संस्कृत भाषा ही उत्तर भारतातील प्राकृतात सुधारणा
करुन बनवली आणि मग ती सावकाश भारतभर पसरली असे मानायला जागा आहे.... महाकाव्य व
पुराणांची भाषा (आर्ष) जनभाषांवर किरकोळ संस्कार करुन बनलेली होती. खरे तर अभिजात
संस्कृत भाषेत महाकाव्येच लिहिली गेलेली नाहीत. त्यामुळे अनेक विद्वानांनी रामायण, महाभारत व पुराणे ही मुळात प्राकृतात लिहिली गेली असुन नंतर
त्यांचा सामान्य संस्कृतमध्ये अनुवाद केला असे मानले आहे. १८ रामायण-महाभारत
मुळात प्राकृतात लिहिले गेले आणि मग ते अर्धविकसित संस्कृतमध्ये अनुवादित केले
गेले हे म्हणणे मात्र अतिरंजित आहे. प्राकृतात उपलब्ध असलेल्या लोकप्रिय काव्य,
पुराणकथा, लोककथा, दंतकथा, वीरगीते, यांचा आधार घेत विकसित होऊ पाहणा-या
संस्कृतमध्ये वैदिक धर्माची तत्वे मिसळत ही महाकाव्ये निर्माण केली गेली असे
म्हणणे सत्याच्या जवळ जाणारे असेल. थोडक्यात भाषाशास्त्रीय दृष्ट्याही रामायण
लेखनाचा काळ हा तिसरे ते पाचवे शतक या काळाच्या दरम्यान येतो.
वरील
विवेचनावरून हे लक्षात येईल कि कसल्याही स्थितीत वाल्मिकी रामायणाचा काळ तिस-या
शतकाच्या पूर्वी जाऊ शकत नाही हे तर निश्चित आहे. रामायण हे तिसरे शतक ते पाचवे
शतक या दरम्यान लिहिले गेले असून ते कसल्याही स्थितीत सनपूर्व काळातील असू शकत
नाही. रामायण हे कितीही पुरातन मानले जात असले तरी त्या मानण्याला निव्वळ समजूत
याशिवाय आपण दुसरी सद्न्या देऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर आपण विमल सुरी लिखित माहाराष्ट्री
प्राकृतातील ‘पउमचरिय’ या महाकाव्याच्या लेखनकाळाचा विचार करून आदि-रामकाव्य कोणते
याचा धांडोळा घायचा आहे.
विमलसुरि-विरचित
‘पउमचरिय’
‘पउमचरिय’ हे माहाराष्ट्री प्राकृतातील काव्य आहे. हे काव्य लिहिले ते विमल सुरी यांनी. वाल्मिकीचा उद्देश्य वैदिक धर्माचा प्रसार हा आहे तसाच पउमचरियचा उद्देश जैन (समण) संस्कृती आणि तत्वद्न्यानाच्या प्रसार हा आहे. वाल्मिकी रामायण आणि पउमचरियच्या कथावस्तुत लक्षणीय फरक आहे. प्राकृत काव्यामध्ये लिहिलेल्या कृतीचा काळ देण्याची काही प्रमाणात का होईना प्रथा आहे व हे महाकाव्यही त्याला अपवाद नाही. या काव्याचे महाकवी विमल सुरी यांनी स्वत:च हे लेखन कधी केले याचा महावीर संवतकाळ दिला असल्याने या महाकाव्याची काळनिश्चिती होणे फारच सोपे आहे व त्यामुळे निश्चयाने आद्य राम महाकाव्य “पउमचरिय” हेच आहे, वाल्मिकीरचित रामायण नव्हे हे ठरवता येते. य काव्यावर जैन समण संस्कृतीचा प्रभाव असून यातील कथासूत्रे विमल सुरी यांनी स्वतंत्रपणे मौखिक परंपरेतून घेतलेली आहेत असे या काव्यातच नमूद करण्यात आले आहे.
राम आणि लक्ष्मण ह्यांची गणना जैन आपल्या
शलाकापुरुषांत (महापुरुषांत) करतात. त्यांच्या दृष्टीने राम अणि लक्ष्मण हे आठवे
बलदेव-वासुदेव होत. राजा श्रेणिक व गौतम गणधर यांच्या संवादाच्या पार्श्वभूमीवर
विमलसूरीने जैनमतानुसार आपली रामकथा मांडलेली आहे. विविध रामकथा अनेक विपरीत आणि असंभवनीय अशा गोष्टींनी
भरलेले आहे, अशी विमलसूरीची भूमिका आहे. उदा., रावण हा राक्षस असून तो मांस खात असे, इंद्राचा
पराभव करून रावणाने त्याला शृंखलाबद्ध अवस्थेत लंकेस आणिले इत्यादी. रावणास दशानन
म्हटले जाते, त्याचे कारण ह्या महाकाव्यात दिले आहे.
रावणाच्या आईने त्याच्या गळ्यात नवरत्नांचा सुंदर हार घातला होता. त्या हारातील
प्रत्येक रत्नात एक, अशी रावणमुखाची नऊ प्रतिबिंबे पडत असत. ही नऊ
प्रतिबिंबे आणि रावणाचे प्रत्यक्ष मुख मिळून तो दशानन झाला. भीमारण्यात जाऊन
त्याने अनेक विद्यांचा अभ्यास केला होता. तो जिनेंद्राचा भक्त होता अनेक जिन
मंदिरे त्याने उभारली होती. दंडकारण्यात राहत असताना लक्ष्मणाने रावणाची बहीण
चंद्रनखा हिच्या शंबूकनामक पुत्राला ठार केले होते. तिचे दुःख पाहून रावण आपल्या
पुष्पक विमानात बसून आला व सीतेला त्याने पळवून नेले. एका मुनीकडे रावणाने
परदारात्यागाचे व्रतही घेतले होते. सीतेला संतुष्ट करून तिच्या पूर्ण संमतीनेच
तिला प्राप्त करून घेण्याचा रावणाचा निश्चय होता. पुढे जे युद्ध झाले, त्यात रावण रामाकडून नव्हे, तर लक्ष्मणाकडून मारला गेला असे त्यात म्हटले
आहे. स्वतःविषयीचा संशय नष्ट करण्यासाठी सीतेने अग्निदिव्य केले; परंतु त्यातून यशस्वीपणे बाहेर आल्यानंतर तिने
जैन धर्माची दीक्षा घेतली. लवण व अंकुशानेही दीक्षा घेतली. रामाने तपाचरण करून
निर्वाणपद मिळविले. सातव्या शतकात
दिगंबर जैन आचार्य रविषेण ह्याने संस्कृतात लिहिलेल्या पद्मपुराणावर विमलसूरीचा प्रभाव आहे. ह्या महाकाव्याची हेर्मान याकोबीने संपादिलेली प्रत
१९१४ मध्ये प्रसिद्ध झाली असली तरी तिचा फारसा प्रसार न केला गेल्याने हे महाकाव्य
दुर्लक्षित राहिले असे म्हणावे लागेल.
प्राकृत
साहित्य हे संस्कृत साहित्यापेक्षा पुरातन असून त्याची विपुलताही लक्षणीय आहे.
पउमचरिय लिहिले गेले त्यावेळेस श्वेतांबर व दिगंबर हा भेद ठळक व काटेकोर झालेला
नव्हता कारण या काव्यात कोणताही पंथाभिनिवेश आढळून येत नाही. या काव्यातील जैन
माहाराष्ट्री प्राकृत पुरातन शैलीतील असून
ती व्याकरणीय दृष्ट्या पूर्ण विकसित झालेली नाही असे मत हरमान याकोबी यांनी व्यक्त
केले आहे. १९ प्रस्तूत काव्य
लिहिण्यासाठी आपण मौखिक परंपरेने चालत आलेल्या नामावलीसारख्या लोकसाहित्याचा आधार
घेतला आहे आणि गाथा छंदात हे काव्य रचले असे स्वत: कवीच म्हणतो. (पउमचरिय, अध्याय
पहिला.) याचा अर्थ त्यावेळेस अन्य कोणतेही लिखित काव्य अथवा महाकाव्य अस्तित्वात
नव्हते. म्हणजेच वाल्मिकी रामायणही तोवर लिहिले गेलेले नव्हते, पण लोककथांत
रामकथेची वेगवेगळी रूपे मात्र प्रचलित होती. किंबहुना रामकथांवर पउमचरियच्या आधी
कोणतेही (प्राकृत अथवा संस्कृत) महाकाव्य लिहिले गेले नव्हते.
हे काव्य कधी
लिहिले याबाबत कवी लिहितो,
“पचेव य
वाससया दुसमाए तीस वरिस संजुत्ता I
वीरे सिद्धिं
उवगवे, तओ निबद्ध इम चरियं II” (पउमचरिय)
म्हणजे
महावीरांच्या निर्वाणानंतर ५३० वर्षांनी हे काव्य लिहिले असे विमल सुरीने स्वत:
नोंदवून ठेवले आहे. महावीरांचे निर्वाण इसपू ५२६ मध्ये झाले असे मानले जाते. त्यात
वीर संवताचे ५३० वर्ष मिळवले तर साधारणपणे इसवी सन ४ हे वर्ष पउमचरियच्या लेखनाचे
आहे असे मानावे लागते. याकोबी यांच्या मते महावीरांचे निर्वाण इसपू ४६७ मधले आहे.
हा अंदाज मान्य केला तर पउमचरियचा लेखनकाळ इसवी सन ६४ असा येतो. लिउमान यांनी इसवी
सन ४ हे वर्ष मान्य केले आहे तर विंटरनित्झ हे सन ६४ हे वर्ष मान्य करतात. २०
पंडित हरगोविंद सेठ ही रचना इसवी सनाच्या पहिल्या
शतकातील आहे असे प्रतिपादन करतात. २१ पंडित
प्रेमी यांनीही विमल सुरी यांनी दिलेला वीर संवत ५३० म्हणजे इसवी सन ४ हा काळ
बरोबर असल्याचे सविस्तर विवेचन करून सांगितले आहे. २२
शिवाय
या काव्यात श्वेतांबर-दिगंबर हे पंथ निर्माण होऊन कट्टरतेने वेगळे होण्याच्या
काळाआधीच हे काव्य लिहिले गेले आहे कारण या काव्यात दोन्ही पंथांच्या मान्यताचा व
वैशिष्ट्यांचा समावेश आहे.२३ यावरूनही इसवी सनाचे पहिले शतक हा काळ
बरोबर आहे असे दिसते.
पउमचरियमध्ये दिली गेलेली इक्ष्वाकू वंशावळी वाल्मिकी रामायणापासून भिन्न
आहे. मात्र ती पुराणांतील वंशावळीशी जुळते. याचाच अर्थ असा होतो कि पउमचरीय लिहिले
गेले तेंव्हा विमल सुरी यांच्यासमोर वाल्मिकीरचित रामायण अस्तित्वात नव्हते तर
परंपरेने चालत आलेला इतिहास होता असेच दिसते.२४ पउमचरियमध्येही हनुमानाच्या जन्मासंदर्भात ग्रह-लग्न-राशीचा
एकदा उल्लेख आलेला आहे त्यामुळे हे काव्यही तिस-या शतकानंतरचे असले पाहिजे असेही
मत याकोबीसारख्या काही विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. याकोबी यांच्या मते “काही
ग्रह हे पउमचरियमध्ये ग्रीक नावांनी अवतरतात. ग्रीक ज्योतिषाशी भारतीयांचा परिचय
झाल्यानंतर, म्हणजे तिस-या शतकानंतर हे काव्य लिहिले गेले असले पाहिजे.” (Modern
Review, १९१४) पण हा युक्तिवाद टिकत नाही कारण पउमचरियमध्ये आलेली ग्रह-राशींची
माहितीच मुळात ऐकीव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या चुकीची आहे. उदा. प्रा. अभ्यंकर
हनुमंताच्या कुंडलीबाबत म्हणतात, “या काव्यग्रंथात येणारी ग्रहराशींची माहिती चुकीची आहे. ती खरी मानली
तर कवीचे ज्योतिषज्ञान आश्चर्यकारकरित्या कमी दर्जाचे आहे असे म्हणावे लागेल कारण
कवीने सूर्यापासून शुक्र आणि बुधातील अंतर अनुक्रमे ६० आणि १२० अंश दर्शवले आहे. २५
या म्हणण्याचा मतितार्थ असा कि दुस-या शतकातील यवनजातक ग्रंथ कवीसमोर नव्हता तर
केवळ ग्रह-राशींबद्दलची ऐकीव माहिती विमल सुरींजवळ होती व त्यांनी केवळ नवेपणाच्या
आकर्षणापोटी त्या ऐकीव माहितीचा उपयोग केला असावा किंवा अनेक विद्वान म्हणतात
त्याप्रमाणे हा एखाद्या नवशिक्याकडून झालेला प्रक्षेप असावा, त्यामुळे त्यात
अचूकता असणे शक्य नव्हते. पण माझ्या मते ही प्रत बनवणा-याकडून झालेली नसून ती मूळ
कवीचीच आहे. कारण चूक अनवधानाने झाली असती व कोणाच्याही लक्षात आली असती तर ही चूक
दुरुस्त केली गेली असती. पण तसे झालेले नाही, कारण यवनजातक तेव्हा उपलब्धच
नसल्याने चूक कि बरोबर हे ठरवण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता.
पण
हनुमंताच्या कुंडलीबाबत केली गेलेली ही विमल सुरींची चूक मात्र सातव्या शतकातील
रविसेनाच्या पद्मपुराणात दुरुस्त केली गेलेली आहे. याचा अर्थ एवढाच कि विमल
सुरीन्च्या काळात ग्रीक ग्रह-राशीचे ऐकीव ज्ञान रवीसेनाच्या काळापर्यंत ग्रंथरुपात
उपलब्ध झालेले होते. पद्मपुराण हे पउमचरियलाच आधार घेत संस्कृत भाषेत लिहिले
गेलेले आहे हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय रवीसेनाने यज्ञसंस्था आणि वैदिक
विश्वोत्पत्तीशास्त्रावर मात्र जोरदार हल्ले चढवलेले आहेत कारण त्याच्या काळात
वैदिक धर्माने जोर पकडलेला होता, त्यामुळे विधर्मी प्रचाराचा प्रतिवाद करणे त्याला
आवश्यक वाटले असले पाहिजे. विमल सुरीच्या काळात मात्र ही धार्मिक संघर्षाची स्थिती
नव्हती कारण तेव्हा वैदिक धर्म हा एकंदरीत दुय्यम स्थानावर होता असे समकालीन
प्राकृत साहित्यावरून दिसते. हालाच्या गाथासप्तशतीतही वैदिक ब्राह्मणांचा उल्लेख
नाही. या बाबतीत गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
“....गाथा सप्तशतीत
ब्राह्मणांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.....त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र या
वर्गाचा वा वर्णाचा गाथा सप्तशतीमध्ये मागमूसही आढळत नाही. समाजात व्यवसाय आहेत पण
त्याचे जातीत वर्गीकरण झालेले नाही.....आर्य संस्कृतीचा मुलाधार मानलेल्या
यज्ञसंस्थेची येथे हेटाळनी केलेली आहे....कदाचित सातवाहनांच्या राज्यात ब्राह्मण अत्यल्प
असावेत...” २६ माहाराष्ट्री प्राकृतात रचल्या गेलेल्या गाथा सप्तशतीची
रचना इसपू पहिले शतक ते सन पहिले शतक या दरम्यानची आहे. पउमचरिय हेही पहिल्या
शतकातील महाकाव्य असून तत्कालीन सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब या महाकाव्यात पडणे
स्वाभाविक आहे. शिवाय हालाच्या गाथा सप्तशतीप्रमाणे याही काव्यात गाथा वृत्ताचा
उपयोग केला गेला आहे हेही येथे लक्षणीय आहे. तत्कालीन समाजस्थितीचे दिग्दर्शन या
दोन्ही काव्यांवरून व्हायला हरकत नाही.
यवन, सुरंग हे ग्रीक शब्द पउमचरिय काव्यातही आलेले आहेत, त्या आधारावरही
कवीने दिलेले लेखन वर्ष चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण यवन (योन) हे
सम्राट अशोकाच्या (इसपू तिसरे शतक) शिलालेखात उल्लेखले गेले आहेत. अलेक्झांडरचे
आक्रमण चन्द्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीत (इसपू चवथे शतक) झालेले होते. त्यामुळे
यवन भारतीयांना माहीतच होते. हीच बाब दिनार या नाण्याची. दिनार नाण्याचे उल्लेख
मौर्यकालीन शिलालेखात, विशेषता: सांचीच्या एका शिलालेखात, आलेला आहे. त्यामुळे
पउमचरीय ही चवथ्या शतकाच्या उत्तरार्धातील रचना असावी असे जे मत डॉ. के. आर. चंद्रा
व्यक्त करतात ते मान्य करता येत नाही. २७
तसेच
यवन (योन) व सुरंग हे शब्द पहिल्या शतकातल्या पउमचरियमध्ये किंवा तीस-या
शतकानंतरच्या वाल्मिकी रामायणात आले म्हणून दचकून जाण्याचे कारण नाही.
वायव्य भारतात ग्रीकांचे उपनिवेश काही शतके तरी होते
तसेच अलेक्झांड्रीया नावाची अफगाणिस्तानप्रमाणे वायव्य भारतात नगरेही वसवलेली
होती. सम्राट चंद्रगुप्ताचा दरबारात मेगास्थेनीज हा ग्रीक वकील तर होताच पण खुद्द
चंद्रगुप्ताचा विवाह सेल्युकस निकेटर याच्या हेलन नावाच्या कन्येशी झाला होता.
थोडक्यात इसपु चवथ्या शतकातच उत्तर भारतीयांचा ग्रीक संस्कृतीशी घनिष्ठ नसला तरी
ब-यापैकी परिचय झालेला होता. एतद्देशीय सत्तांशी राजनैतिक संबंधही प्रस्थापित
झालेले होते. त्यामुळे यवनांचा उल्लेख या ग्रंथाचा काळ दुस-या शतकानंतरचा ठरवता
येणार नाही. दिनार या शब्दाबद्दलही असेच म्हणावे लागेल कारण कुशाणकाळातील “अंगविज्जा”
या ग्रंथात नुसती दिनारादी ग्रीक नाण्यांची माहिती येत नाही तर व ऐरोदिती
(एफ्रोडीटी) सारख्या ग्रीक देवतांचे मंदिरेही उत्तर भारतात निर्माण झाल्याची
माहिती आलेली आहे. मथुरा येथील उत्खननात कुशाणकालीन अनेक जैन प्रतिमा व शिलालेख
मिळालेले आहेत, पण वैदिक देवताचे अस्तित्व आढळून येत नाही. पहिल्या शतकात
थोड्याफार फरकाने हीच स्थिती असली पाहिजे. कुशाणकाळात वैदिक धर्माचे अस्तित्व असले
तरी प्रस्थ नव्हते याचे पुरावे आपल्याला राबटक शिलालेखात उमा, कुमार, विशाख
ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे,
काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत, पण एकाही वैदिक देवतेची प्रतिमा नाही. यावरून
वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता किंवा हा धर्मच तेव्हा दुय्यम होता असे
दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा
अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता व समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे
दिसते.
ही रचना
सातवाहनकाळात झाली असणार कारण ही तीच वेळ होती जेव्हा माहाराष्ट्री प्राकृत एक
प्रतिष्ठेची भाषा बनली होती आणि अन्य प्राकृतभाषी प्रतीभावंतही या भाषेत लेखन करू लागले
होते. याच काळातील ‘अंगविज्जा’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लिहिला गेला नसला तरी तो माहाराष्ट्री
प्राकृतात लिहिला गेला हे येथे नमूद करणे महत्वाचे आहे.
पहिल्या
शतकात यज्ञसंस्थेवर वैदिक धर्मश्रद्धांविरोधात हल्ले करण्याचे पउमचरीयमध्ये टाळले
गेलेले आहे याचे कारण त्या काळात वैदिक धर्माचे स्थान दुय्यम होते. जर वाल्मीकीचे
रामायण त्यावेळेस अस्तित्वात असते तर त्यात प्रामुख्याने आलेल्या यज्ञसंस्था व
वैदिक धर्माच्या मुल्यप्रसाराचा प्रतिवाद निश्चित केला गेला असता. परंतु
पउमचरियमध्ये हिंसक यज्ञाचा निषेध एकाच अपवादात्मक प्रसंगात दिसतो. त्यात यज्ञातील
प्राणीहिंसेचा निषेध एवढा भाग सोडला तर यज्ञकर्त्या ब्राह्मणांबाबत अभिनिवेशी व
शत्रुत्व भावना जाणवत नाही. गुप्तकाळात मात्र वैदिक धर्म राजाश्रयामुळे फोफाऊ
लागला आणि यज्ञांचे प्रमाण वाढत गेले. तत्पूर्वीचे यज्ञाबाबतचे दोन शिलालेख आहेत.
सातवाहनकालीन इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट शिलालेख प्राकृत भाषेत आहे तर धनदेवचा
अयोध्या शिलालेख अर्धविकसित संस्कृतमध्ये असून तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातील
आहे. वैदिक यज्ञांचे वर्णन करणारे शिलालेखही प्राकृत व प्राकृत प्रभावातील
संस्कृतात आहेत. याचा अर्थ तोवर वैदिक धर्म दखलपात्र तर नव्हताच पण संस्कृत भाषाही
पूर्ण विकसित झालेली नव्हती. त्यामुळे या काळापर्यंत संस्कृत भाषेत महाकाव्यसदृश्य
रचना झाली होती असे म्हणणे अतार्किक होऊन जाते.
पउमचरियचा
उद्देश जैन धर्माची, तत्वज्ञानाची महती अधोरेखित करणे हा आहे. वाल्मिकी रामायणाचा
हेतू वैदिक धर्माचे तत्वज्ञान व मुल्यांची महती गाण्याचा आहे. त्या अर्थाने दोन्ही
महाकाव्ये धार्मिक प्रेरणांनी लिहिली गेलेली आहेत. एका जैन धर्मियाने रामकथांचा
उपयोग प्रतिस्पर्धी जैन तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केला तसाच आपण वैदिक धर्मप्रसारासाठी
करावा असे वाटल्याने वाल्मिकीने रामायण लिहिले असावे अशी शंका यावी असे दोन्ही
महाकाव्ये वाचल्यानंतर वाटणे स्वाभाविक आहे.
पउमचरिय
११८ अध्यायांचे काव्य आहे. राम, लक्ष्मण व रावण यातील समतुल्य व्यक्तिरेखा असून ते
जैन तत्वज्ञानाच्या परंपरेशी निकटचे नाते दर्शवतात. विमल सुरीच्या काळात प्रचलित
असलेल्या विविध रामकथा व रामकाव्यांतील विसंगत्या दूर करण्याच्या हेतूने हे
रामकाव्य लिहिलेले आहे असे कवी श्रेणिक व गौतम गणधरामधील तिस-या अध्यायातील
संवादातून सुरुवातीलाच स्पष्ट करतो. तो येथे एका महाकाव्यातील विसंगती म्हणत नाही
तर प्रचलित विविध कथा-काव्यांना उद्देशून प्रतिकूल मत व्यक्त करतो हे अनेकवचनी
विधानातून येते हे येथे लक्षणीय आहे. विविध प्रकारच्या परस्परविरोधी आणि काही
अतार्किक कथा वा अविश्वसनीय व्यक्तीविशेष सांगितल्या जाणा-या कथांना सुसंगत व पटेल
असे वळण द्यावे असे एखाद्या प्रतिभावंताला वाटणे स्वाभाविक म्हणता येईल.
विमल
सुरीची रामकथा आणि वाल्मिकीची रामकथा यात काही अंश सारखा असला तरी विभेद मात्र
जास्त आहेत. दशरथाचा कैकयीशी झालेला विवाह आणि नंतर तिला दिलेले वरदान ही कथा
वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळी आहे. बिभिषणाने दशरथाच्या हत्येचा आखलेला कट आणि
दशरथाने आपल्या शय्येवर पुतळा ठेवून तो कट विफल केला, सीतेने रामाला का वरले आणि
त्या धनुष्याची कथाही अत्यंत वेगळी असून रोचक आहे. रामाचा आणि त्याच्या भावांच्या
जन्माचीही कोणतीही दैवी कथा विमल सुरीने जोडलेली नाही जशी वाल्मिकीने जोडली आहे.
विमल सुरीने रामाचा चेहरा कमलाप्रमाणे असल्याने त्याला “पद्म” हे नाव दिले गेले
असे सांगितले आहे. हनुमंताच्या जन्माची आणि कार्यकर्तुत्वाची कथाही वेगळी आहे.
विमल सुरीकडे रामकथेबद्दल अधिक प्रामाणिक स्त्रोत होते असे बहुतेक विद्वान मान्य
करतात.
रावणाला
नायकत्व बहाल करण्याचे आद्य श्रेयही विमल सुरीलाच द्यावे लागेल. विमल सुरीचा
दृष्टीकोन हा अधिक उदार व सहृदयी आहे. आर्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे या ध्येयाने
पछाडलेल्या वाल्मिकीने वानर, यक्ष व रावणादी राक्षसांकडे (म्हणजे अनार्यांना)
पूर्वग्रहदुषित दृष्टीने पाहणे स्वाभाविक आहे. पण समण या एतद्देशीय उदात्त
संस्कृतीतून आलेल्या विमल सुरीला या सर्वांकडे शत्रूभावाने पाहण्याचे कारण
नसल्याने त्याचे चित्रण जैन पुराकथांचे लेप सोडले तर अत्यंत वास्तवदर्शी आहे असे
म्हणावे लागेल. वाल्मिकीने समण संस्कृतीकडेही निंदाव्यंजक दृष्टीने पाहिले
असल्याचे आपल्याला वाल्मिकी रामायणावरून दिसेल. राम पुरातन व्यक्तिरेखा आहे हे
दर्शवण्यासाठी वाल्मिकीने वेदांत उल्लेखित ऋषींना रामाच्या समकालीन आणून ठेवले
आहे. देशात सर्वत्र वैदिक धर्म पसरला असल्याचे दाखवण्यासाठी त्याने या वैदिक
ऋषींचे आश्रम सर्वत्र विखुरलेले असल्याचेही दाखवले आहे. एका काव्याच्या
माध्यामातून धर्मप्रभुत्व निर्माण करणे हा उदेश असल्याने ते स्वाभाविकही म्हणता
येईल. विमल सुरीचाही प्राथमिक उद्देश जैन धर्माची महती राम-लक्ष्मण-रावण या
व्यक्तीरेखांच्या माध्यमातून दाखवायची आहे.
देवकुले
(मंदिर नव्हे) व चैत्यांच्या वर्णनांवरूनही पउमचरियची प्राचीनता सिद्ध होते.
पउमचरियमध्ये चैत्यांचे व देवकुलांचे (घरातील देव्हा-यांचे) विपुल उल्लेख आहेत.
यज्ञाचे वर्णन केवळ दोनेकदा आलेले आहे. हिंदू तेव्हा सहसा सार्वजनिक मंदिरे बांधत
नसत. ती सुरुवात झाली ती गुप्तकाळाच्या आसपास. वाल्मिकी रामायणात येणारे मंदिरांचे
उल्लेख ती रचना उत्तरकालीन असल्याचे दर्शवतात हे आपण पाहिलेलेच आहे. सातवाहन काळात
मात्र छोटी देवळे असल्याचे उल्लेखही आले आहेत. इसपु दुसरे शतक ते पहिले शतक या
काळातील लोकधर्मातील देवतांची काही प्रमाणात सार्वजनिक देवळे बनू लागली असली तरी
त्यांचे आकार छोटे असत. इसपू दुस-या शतकातील कुनिंद नाण्यावर एका अशाच छोट्या
शिवमंदिराची प्रतिमा अंकित केली गेलेली आहे. लोक सर्वसाधारणपणे घरातच किंवा
उघड्यावर वृक्षाखाली इष्ट देवतांची मूर्तीपूजा करत असत. वैदिक धर्मीयांची यज्ञगृहेही
घरगुती असत. गुप्तकाळात मात्र स्थिती
वेगळी होती. नगरात नगरदेवतेच्या मंदिरासहित दिक्पाल देवतांचीही मंदिरे असत. वैष्णव
मंदिरांचीही रेलचेल वाढू लागली होती. रामायणातील नगररचना व मंदिर-चैत्यांचे उल्लेख
वाल्मिकीच्या समकालीन वास्तवाची जाणीव करून देतात.
पउमचरियची
कथावस्तू पाहता हे काव्य कथासूत्राच्या धाग्यांची प्राचीन व स्वतंत्र परंपरा जपते.
उत्तरकालीन जैन साहित्यात मनुचे उल्लेख येत असले तरी जैन धर्मीयांची मुळची कुलकर
ही संज्ञा या काव्यात वापरली गेलेली आहे. जैनांच्या धर्मशास्त्रानुसार कुलकर म्हणजे ज्यांनी मानव जातीला
बुद्धीवैभवाने जगण्याचे नवे मार्ग शिकवले ते. कुलकर शब्दप्रयोगही पउमचरियची
प्राचीनता दर्शवतो.
काव्याची
प्राचीनता ठरवताना आपण साकेत कि अयोध्या या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे.
पउमचरियमध्ये साकेत, साकेतपुरी (साएय) हे प्राचीन नाव आणि विनितापुरी हे नगर स्थापनेवेळचे
अतिप्राचीन नाव वापरलेले आहे. उदा. पहा पउमचरिय, अध्याय ४, गाथा ५४ व अध्याय २४ गाथा ३४. म्हणजेच गुप्तकाळात अयोध्या हे नामकरण
होण्याच्या खूप आधीच हे काव्य लिहिले गेले हे स्पष्ट आहे.
वरील
विवेचानावरून दिसून येईल कि इसवी सनाच्या चार साली रचले गेलेले जैन माहाराष्ट्री
प्राकृतातील पउमचरिय हे रामावरील आद्य महाकाव्य असून त्या अर्थाने विमल सुरी
आदिकवी आहेत तर हे काव्य आजच्या मराठीच्या पूर्वज भाषेत म्हणजे माहाराष्ट्री
प्राकृत भाषेत लिहिले गेलेले आहे. वाल्मिकी रामायण हे इसवी सनाच्या तिस-या ते
पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले असून ते काव्यदृष्ट्या सरस असले तरी त्याला
आदिमहाकाव्याचे स्थान प्राप्त होऊ शकत नाही. असे असले तरी ही गफलत का झाली याची
कारणेही समजाऊन घेतली पाहिजेत.
जे
जे संस्कृतमध्ये आहे ते पुरातन मानण्याची वैदिक विचारवंतांची व अभ्यासकांची
सुरुवातीपासूनच पद्धत बनून गेली आहे. राम आणि वाल्मिकी समकालीन आहेत असा समज खुद्द
रामायणानेच करून दिल्यामुळे वाल्मिकीही
रामाइतकाच पुरातन असला पाहिजे अशी अतार्किक कल्पना करून घेतली गेली. रामायणात वैदिक
ऋषींचा वावर असल्याने राम, वाल्मिकी व हे काव्य वेदकालीन असल्याचे समज दृढ होत
गेले. पुढे संशोधकांनी आधीच्या मतांतील फोलपणा ओळखला असला तरी, रामायण त्रेतायुगात
लिहिले गेले नसले तरी तो काळ निश्चित बुद्धपूर्व आहे असे गृहीतक मांडायला सुरुवात
केली व याही मताला छेद देणारे पुरावे खुद्द रामायणातीलच असले तरी त्यांना प्रक्षेप
मानले जाऊ लागले. रामायणात रचनेचा काळच दिला गेला नसल्याने कालनिश्चिती करतांना
वास्तव तर्कांचा व पुराव्यांचा विचार न करता अक्षरश: काल्पनिक गृहीतकांवर अवलंबून
राहिले गेले. संस्कृत ही पुरातन भाषा हे एक मिथकीय गृहीतक निरलसपणे वापरले गेले व रामायणही
पुरातन गटात टाकले गेले. प्राकृत भाषा संस्कृतोद्भव आहेत हेही चुकीचे गृहीतक धरले
गेले. त्यामुळे वाल्मिकी रामायण प्राचीन आणि पउमचरिय अर्वाचीन अशी चुकीची गृहीतके
आधाराला घेतली गेली. त्यामुळे आद्य राम-महाकाव्य प्राकृतात कसे असेल? ते
संस्कृतातच असले पाहिजे असा अभिनिवेश विद्वानांच्या मनोव्यापारावरही प्रभाव टाकून
गेला. वास्तव मात्र वेगळे आहे याचा त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न केला नाही. मराठी
भाषकांनीही या वास्तवाकडे डोळेझाक केली. खरे तर
संस्कृत भाषा ही प्राकृतातून विकास होत होत इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत
प्राथमिक अवस्थेत लिखित स्वरूपात अवतरू लागली याचेच सज्जड पुरावे उपलब्ध आहेत पण
त्यांचा आधार न घेण्याची कृपणता दाखवली गेली. प्रत्यक्षात संस्कृत शिलालेख आणि
साहित्य हे दुस-या शतकानंतरच अवतरू लागते हेही लक्षात घेतले गेले नाही. इसवी
सनाच्या तिस-या शतकात पाणिनीने “अष्टाध्यायी” हे व्याकरण लिहिल्यानंतरच अभिजात
संस्कृतमधील साहित्य अवतरू लागले. रामायणाची भाषा ही या अशा संक्रमणकाळातील आहे
ज्यावर प्राकृत प्रभावातील अर्धविकसित संस्कृत आणि प्रगल्भ संस्कृत या दोहोंचे
संमिश्र प्रभाव आहेत. शिवाय वाल्मिकी रामायण हेच प्राचीन काव्य मानत त्यातील
अयोध्येच्या उल्लेखामुळे अयोध्या हेच प्राचीन नाव असून साकेत हे नंतरचे नाव आहे
असेही चुकीचे गृहीतक घेतले गेले त्यामुळे आपण विपर्यास करत आहोत हे कोणाही
विद्वानाने लक्षात घेतले नाही ही भारतीय साहित्याच्या इतिहासातील मोठीच चूक होय
असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
दोन्ही
काव्यग्रंथ आपापल्या धर्माच्या प्रसारासाठी लिहिले गेले असले तरी वाल्मिकी रामायणावर
(व महाभारतावरही) मात्र तसा दुरान्वयानेही कोणी आरोप करण्याचे धारिष्ट्य दाखवले
नाही, कारण पारंपारिक मान्यतांचा प्रभाव सहजी झुगारला जात नाही. पण रामायण हे
सर्वस्वी वैदिक धर्मतत्वांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी लिहिले
गेलेले आहे हे रामायणावरून सिद्ध होते. केवळ याच अभिनिवेशी प्रवृत्तीमुळे आद्य
काव्याचा दर्जा मिळण्यापासून पउमचरिय वंचित राहिले असे म्हणावे लागेल.
थोडक्यात या लेखाचा निष्कर्ष असा
सांगता येईल कि पउमचरिय हे रामावरील आद्य महाकाव्य आहे तर वाल्मिकी रामायण हे काही
शतकांनंतर लिहिले गेलेले महाकाव्य आहे. माराय्ठी भाषेला दिलेले जैन महाकवीचे हे
सर्वात मोठे योगदान आहे.
·
संदर्भ-
१. The Society of the Ramayana by Anand Guruge, Abhinav Publications, 1991, p. 7,8.
२. The History of Indian Literature, by A. Weber, Kegan Paul, Trench, Trubner & Co, 1904, p.192.
३. A History of Indian Literature, Volume 1 By Moriz Winternitz, University of Calcutta, 1927, p. 476, 517.
४. रामकथा और लोकसाहित्य, ले. जय नारायण कौशिक, हिंदी बुक सेंटर, नवी दिल्ली, १९९६, पान ८.
५. The Rāmāyaṇa of Vālmīki: An Epic of Ancient
India.,Goldman, Robert P (1984). Princeton University Press. pp 20-22) व J. L.
Brockington (1998). The Sanskrit Epics BRILL. pp. 379.
६. The Rāmāyaṇa of Vālmīki: An Epic of
Ancient India by Robert Goldman, Princeton University Press, 1984, pp
20-22 and J. L. Brockington (1998). The Sanskrit Epics, BRILL, pp. 379.
७. The Riddle of the Ramayana, C.V. Vaidya, Meharchand Lachhmandas, 1972, pp. 21-23.
८. तत्रैव पृष्ठ ५
९. The Society of the Ramayana by Anand Guruge, Abhinav Publications, 1991
१०. Buddhist India, by T. W. Rhys Davids, Motilal Banarasidass Publishers, 1997, p. 39.
११. On Yuan Chwang’s Travels in India, 629 – 645
AD, Vol. 1, by Thomas Watters, London Royal Asiatic Society, 1904, p. 354.
१२. सुत्तपिटक
का संयुत्त निकाय, पहला भाग, अनुवादक भिक्षु जगदीश काश्यप, महाबोधी सभा, सारनाथ,
१९५४, पृष्ठ १३.
१३. Ayodhya Revisited by Kishore Kunal, Ocean Books Pvt. Ltd, 2016, p. 7-9.
१४. Ayodhya, part 1, Hans Bakker, Pub. E. Forsten, 1986, page 12.
१५. The Date and Nature of Sphujidhvaja's Yavanajātaka Reconsidered in the Light of Some Newly Discovered Materials Bill M. Mak Kyoto University.
१६. प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, संजय सोनवणी,
प्रकाशक-चिनार पब्लिशर्स, २०२०.
१७.पाइअ सद्द महनणवो,(Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-Hindi Dictionary), पंडीत हरगोविंद सेठ, (पहिली आवृत्ती-१९२८) नवीन आवृत्त्यांचे प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, पुनर्मुद्रण १९८६, पृष्ठ ५७.
१८. A History Of Indian Literature, vol.1,
by Winternitz, M., 1927, Univercity of Calcutta, pp. 15, 44.
१९. “Some Ancient Jaina Works”, By
Hermann Jakobi in Modern Review, December 1914.
२०. A History
Of Indian Literature,vol.1, by Winternitz, M., पान ५१४ आणि Vol. २, पान ४७८, 1927, University of Calcutta.
२१. पाइअ
सद्द महनणवो,(Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-Hindi
Dictionary), पंडीत हरगोविंद सेठ, (पहिली आवृत्ती-१९२८) नवीन आवृत्त्यांचे
प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, पुनर्मुद्रण १९८६.
२२. जैन साहित्य और इतिहास, पंडीत नाथुराम प्रेमी, हिंदी ग्रंथ रत्नाकर,
मुंबई, १९५६. पान- ८७, ९१.
२३. Paumchariy,
edited by Shri S. C. Upadhyaya, R.P. Kothari & Co., 1934, p-21-22.
२४. A Critical Study of Paumchariyam by Dr. K.R.
Chandra, Research Institute of Prakrit Jainology & Ahimsa,
Vaishali, 1970, पृष्ठ १६.
२५. तत्रैव, पृष्ठ २८.
२६. हाल सातवाहनाची गाथासप्तशती,
संपादक- स. आ. जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२.
२७. A Critical
Study of Paumchariyam by Dr. K.R. Chandra, Research Institute of Prakrit
Jainology & Ahimsa, Vaishali, 1970, पृष्ठ
१६.