Saturday, May 1, 2021

शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !

 शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !

- प्रभाकर ढगेघनदाट अशा निबिड अरण्यात हरवलेल्या वाटसरूला इच्छित स्थळी जाण्यासाठी जी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तोच कष्टप्रद अनुभव अपरिचित इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या इतिहास अभ्यासकालाही पावलोपावली येत असतो. घडून गेलेल्या कुठल्याही काळाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, धार्मिक, आर्थिक या सर्वांगीण बाजूंचा तपशिलात घेतलेला शोधच असतो. म्हणूनच बहुधा इतिहासकार ई. एच. कार यांनी, 'भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय', अशी व्याख्या केली आहे. बर्कहार्ड यांनी हेच वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या मते, 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'
व्याख्या म्हणून हे सर्व ठीक असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र भलतेच विपरीत असते हा अनुभव इतिहास लेखनाबाबत सगळीकडे सारखाच आहे. इतिहास जेव्हा पूर्वग्रहदूषित, एकांगी, विशिष्ट हेतूने, जात, वर्ण, वंश, धर्म वर्चस्वाच्या अभिनिवेशातून जाणीवपूर्वक लिहिला जातो, तेव्हा तो निखळ सत्यावर अन्याय करणाराच ठरतो. जागतिक आणि भारतीय पातळीवर अशा सदोष इतिहासाची भीषण कृष्णविवरे ठायी ठायी आढळून येतात. अशा हरवून गेलेल्या वा मुद्दाम गाडलेल्या इतिहासाच्या खोल अंधाऱ्या गुहेत शिरून खऱ्या वस्तुस्थितीचे विखुरलेले कवडसे गोळा करणारे जे काही मोजके इतिहास संशोधक महाराष्ट्रात आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांचा समावेश होतो.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक हाती येईपर्यंत मला ललितादित्य नावाचा कोणी सम्राट काश्मीरमध्ये होऊन गेला, याची गंधवार्ता देखील नव्हती.
काश्मीर म्हणजे इतिहास नसलेले, विशिष्ट धर्मियांच्या मूलतत्त्ववादी वेडाने झाकोळून गेलेले, देशाची डोकेदुखी बनलेले, भारत- पाकिस्तानातील अपयशी व खूनशी राज्यकर्त्यांनी वेठीस धरलेले, असे एक उपद्रवी राज्य असल्याचा माझाही इतरांप्रमाणे बराच काळ समज होता. २०१२ साली हौशी पर्यटकासारखा मीही काश्मीरचा बर्फ, सफरचंदाच्या बागा, टुलीपचा बगीचा, केशराची शेती, शिकाऱ्यातील सहली, हे काश्मिरी सौंदर्य पहायला गेलो होतो. मिळालाच एखादा पाकिस्तानी दहशतवादी तर त्याची मुलाखत घेण्याचीही तयारी होती. पण बिनडोक प्रसार माध्यमातून कळलेला काश्मीर आणि प्रत्यक्षातील काश्मीर यात प्रचंड तफावत असल्याचे धक्के बसत गेले. पदव्युत्तर पदवी मिळवूनही टॕक्सी चालक म्हणून काम करावे लागत असलेल्या युसूफसारख्या अनेक युवकांशी, आजमसारख्या शिकारा चालकाशी, रोहित पंडितसारख्या शिक्षकांशी, फौजीभाई नरेश यादवशी, सफाई कामगार सुनील परमारशी आणि नावाप्रमाणेच काश्मिरी कली असलेल्या अनेक महाविद्यालयीन अनारकलींशी झालेल्या चर्चेतून खरा काश्मीर कळला तेव्हा माझी मला भारतीय असल्याची प्रथमच लाज वाटली होती. मध्यपूर्व आशिया आणि चीनला बौध्द धम्म निर्यात करणारा, शैव, सुफी आणि जैन संस्कृतीला सारख्याच मायेने सांभाळणारा, कलासंपन्न, सांस्कृतिक वैविध्याचे आगर असलेला काश्मीर असा शापित भूमी का बनला, याची उत्तरे मात्र त्यावेळी मिळाली नाही.
सम्राट अशोकानंतर भारतात त्याच तोलामोलाचे साम्राज्य निर्माण करणारा, आक्रमक अरबांना पराजित करून तोखारीस्तान जिंकून घेणारा, बलाढ्य तिबेटचा वारंवार पराभव करणारा, आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग ताब्यात घेणारा, चिनी सम्राटांना शह देणारा, सम्राट यशोवर्मनला पराभूत करून बंगाल - ओडिशापर्यंत राज्यविस्तार करणारा आठव्या शतकातील सम्राट ललितादित्य भारतीय इतिहासकारांनी का दुर्लक्षित ठेवला असेल, एका शूर सम्राटाला हा करंटा देश का विसरला असेल, हे प्रश्न आपला पिच्छा करू लागतात, तेव्हा संजय सोनवणी यांचे संशोधन मार्गदर्शक ठरू लागते.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक जसजसे वाचत जातो तसतसे आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अडाणीपणाचे धक्के आपल्यालाच बसू लागतात. दिग्विजयी मोहिमेत पश्चिमोत्तर भारत पादाक्रांत करत मध्य व पूर्व भारतासह हिमालय ओलांडून चीन, अफगाणिस्तान, इराण आणि रशियाच्या सीमेपर्यंत काश्मीरचा विस्तार करणारा हा पराक्रमी सम्राट भारतीय इतिहासाने सहजपणे विसरावा, ही केवढी मोठी घोडचूक? भारताचे खरेखुरे स्वर्ग असणारे काश्मीर आजही उभ्या आडव्या भारताला नीटपणे समजून घेता येत नाही, या मूर्खपणाची मूळे याच ऐतिहासिक चुकांमध्ये दडलेली असावी, हा साक्षात्कारही 'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' वाचताना होत राहतो.
'राजतरंगिणी', 'नीलमतपुराण', 'गौडवहो', 'प्रभावकचरित्र', 'प्रबंधकोश', ' बाप्पापट्टी सुचरिते', या भारतीय ग्रंथांच्या तसेच चिनी, तिबेटी व अरबी इतिहास साधनांच्या आधारे इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी सर्वधर्मसमभावी सम्राट ललितादित्य मुक्तापीड याचे उभे केलेले देदिप्यमान चरित्र म्हणजे अथांग समुद्रात बुडी घेऊन वेचलेल्या माणिक मोत्यांची डोळे दिपवून टाकणारी रास आहे.
सम्राट केवळ भौगोलिक प्रदेश जिंकत नाही. तो त्याच तोलामोलाची भव्य दिव्य निर्मितीही करत असतो. ललितादित्याने काश्मीरमध्ये उभे केलेले परिहासपूर हे नगर, भव्य राजप्रासाद, गोवर्धन, मार्तंड, परिहासाकेशव ही महाकाय मंदिरे, चैत्यगृह, स्तूप, विशालकाय बुध्द मूर्ती हे सारे त्याच्या संवेदनाक्षम सृजनशीलतेची साक्ष देणारी ऐतिहासिक प्रतिके होत.
काश्मीर साम्राज्याचा आणखी विस्तार करण्यासाठी नगरजन व आप्तांवर राज्यकारभार सोपवून पराक्रमी ललितादित्य शेवटच्या मोहिमेवर निघतो तेव्हा त्याचा हा प्रवास दिगंताकडे जाणाराच ठरतो. आपल्या साम्राज्याचा जेवढा विस्तार करता येईल तेवढा करण्यासाठी हा सम्राट पश्चिमेकडे अज्ञात देश-प्रदेश जिंकत पुढे पुढे जात राहतो आणि तिकडेच नाहीसा होतो, हा त्याचा अभूतपूर्व शेवट आणखी धक्का देऊन जातो. काश्मीरात दीर्घकाळ पराक्रम गाजवलेल्या कर्कोटक घराण्याचाच जिथे इतिहासाला विसर पडला आहे तिथे या भारतीय अलेक्झांडरचा अखेरचा प्रवास कुठे थांबला, याची नोंद कुठे सापडायची?
इतिहासात राहून गेलेल्या मोकळ्या जागा भरण्याचे नवे प्रमाणशास्त्र मांडणारे इतिहासकार संजय सोनवणी हेच कदाचित त्याचे उत्तर देऊ शकतील.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा या विषयाचे महत्त्व पाहता त्याचे प्रकाशन वा चर्चासत्र गोव्यात व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा मित्रवर्य संजय सोनवणी यांनी लगेचच या पुस्तकाच्या काही प्रती पाठवून दिल्या. माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्यासह अनेक दिग्गजांनी या पुस्तक प्रकाशनाला/ चर्चासत्राला यायचे कबूल केले. त्यानंतर तारीख नक्की करत असतानाच करोना टाळेबंदी लागली अन् हा कार्यक्रम आजपर्यंत राहून गेला.
तो योग कधी येतो, बघू या !
- प्रभाकर ढगे

शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !

  शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश ! - प्रभाकर ढगे घनदाट अशा निबिड अरण्यात हरवलेल्या वाटसरूला इच्छित स्थळी जाण्यासाठी जी अथक प्रयत्नांची परा...