Saturday, November 13, 2021
शिवण कलेने केलेली क्रांती!
Saturday, October 2, 2021
देशाला वैभवाच्या शिखरावर नेणारा प्राचीन वस्त्रोद्योग!
आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.
जातककथा, ब्राह्मणे, जैन
साहित्यात विविध प्रकारच्या वस्त्रांच्या व विणकर व्यवसायाबाबतच्या नोंदी मिळतात.
ढाक्क्याची मलमल, बनारसी
वस्त्रे (भारतात बनारसी साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध.) पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या
व सुती व रेशमी तलम वस्त्रे, याचे
जगावर अद्भुत गारुड पसरले होते. इतके कि भारतीय मलमली वस्त्रंसाठी रोमचे नागरिक
एवढा पैसा (सोन्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली आणि
त्यामुळे रोमचा बादशहा अस्वस्थ झाला. ही हकीकत इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी
(थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवली आहे.
असे असले तरी या व्यावसायिकांनी जिद्द सोडली
नाही. तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच
हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे.
बु-हाणपुरही या काळात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.
-संजय सोनवणी
Friday, September 17, 2021
धनगरांचा गौरवशाली इतिहास

(१८. ९. २०१५)
भारी बातमी
Wednesday, July 25, 2018
कुंभार समाजाचा इतिहास : मृत्तिका-शिल्पे ते शब्दशिल्पे

पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या कालात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच कालात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे. भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपासुन सुरुवात होत चाकाचा आणि आव्यांचा कसा कल्पकतेने आणि विज्ञानदृष्टीने केला गेला याचा सलग आलेख आपल्याला मिळतो. किंबहुना एके काळी या उद्योगाने भारताच्या आर्थिक समृद्धीत प्रचंड भर घातली होती हे आपल्याला जातककथ ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रातुन समजते. म्हणजे जेंव्हा सिंधु संस्कृतीही निर्माण झाली नव्हती आणि वेदही लिहिले गेले नव्हते तेंव्हापासुन अश्म संस्कृतीसोबतच ही मृत्तिका संस्कृती अस्तित्वात होती. मानवी जीवन सुखमय करण्यात या संस्कृतीने मोठा वाटा उचलला. आता नवनवीन शोधांनी पर्याय दिले असले तरी हा उद्योग अत्यंत महत्वाचा आहे. या व्यवसायाशी निगडित असलेल्या समाजाला आज आपण कुंभार म्हणतो. हे निर्माणकर्ते. देशाच्या आर्थिक उत्थानात मोठा वाटा उचलणारे. विविध प्रकारच्या कलात्मक कुंभांतून त्या त्य्या कालच्या सौंदर्य दृष्टीचे लोक. मातीपासुन तिला तयार करत, कौशल्याने घडवत आव्यांत विशिष्टच प्रकारची धग देत हव्या त्या रंगाची मृद्भांडी बनवणारे हे आद्य वैज्ञानिक लोक. आज कुंभार समाज आपले मानवी सम्स्कृतीच्या उत्थानातील स्थान विसरला असला तरी पुरातत्व खाते विसरलेले नाही. याच समाजात संत गोरोबा कुंभार झाले. ऐहिक संस्कृतीबरोबरच आध्यात्मिक संस्कृतीचाही त्यांनी जागर केला. कुंभार कामातील विविध अवस्था त्यांनी रुपकांच्या रुपाने पुढे आणल्या. ते त्या दृष्टीने महाकवी होते असेच म्हणावे लागेल.
कुंभारकामाचा शोध अपघाताने लागलेला नाही. वस्तु ठेवण्यासाठी वेली, बांबुच्या कामट्या यांचा उपयोग करुन बुरुडकाम जरी समांतर अस्तित्वात असले तरी द्रव पदार्थांचे काय करायचे हा प्रश्न होताच. आद्य मानवाने चिखल बनवुन हाताने त्यांना विविध आकार देऊन वाळवत काही प्रमाणात प्रश्न सोडवला असला तरी त्या तेवढ्या उपयुक्त नव्हत्या. त्या वस्तु भाजल्याने अधिक टनक व टिकाऊ होतात हे लक्षात आले असले तरी सर्व प्रकारची माती त्यासाठी उपयुक्त नसते तर त्यावर प्रक्रिया करणे आवस्घ्यक असते असे काही बुद्धीवंतांच्या लक्षात आले. यातुनच माती बनवण्याचे प्रक्रिया-विज्ञान विकसित केले गेले. उघड्या जागेत त्यांना हवे तसे भाजता येत नाही, हवी तेवढी उष्णता निर्माण करता येत नाही हे लक्षात आल्यावर आव्यांचा अत्यंत महत्वपुर्ण शोध लावण्यात आला. खरे तर या शोधाला थर्मोडायनामिक्समधील (उष्मागतीशास्त्र) पहिला शोध म्हणता येईल. याच शोधातुन पुढे धातु गाळणा-या भट्ट्यांचा शोध लागला हे लक्षात घेतले गेले पाहिजे. चाकाचा शोध लागला असला तरी त्याचाच उपयोग वेगाने हव्या त्या आकाराच्या वस्तु बनवता येतात हाही त्याच संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा.
कुंभार कामाचे महत्व आता आपल्या लक्षत येईल,. सिंधु संस्कृतीत असंख्य कलात्मक मृद्भांडी सापडलेली आहेत. महाराष्ट्रातही दहा हजार वर्षांपुर्वीचे कुंभार कामाचे अवशेष खापरांच्या रुपात पाचाड येथील गुहांत मध्याष्मयुगातील (इसपू ९०००) दगडी हत्यारे जशी मिळालीत तशीच खापरेही मिळालेली आहेत. हा आजवर हाती आलेल सर्वात जुना पुरावा. पुढे जसजशी उत्खनने होत जातील तसतसे त्याहुनही जुने पुरावे हाती येण्याची शक्यता आहेच!
म्हणजे हा महाराष्ट्र कुंभारकामात आजपासुन किमान अकरा हजार वर्षांपुर्वीपासून कुंभारकामात प्रवीण होऊ लागला होता. माणूस जसा स्थिर झाला तशी या व्यवसायाची व्याप्ती अजुन वाढत गेली व या कामात कुशल असनारे लोक या व्यवसायात शिरले. भारतात सर्वत्र या अशा पुरातन कुंभारांच्या कलेचे नमुने मिळालेले आहेत व माणसाच्या इतिहास शोधण्यातही या समाजाने हातभार लावला आहे.
सिंधु काळात या व्यवसायाची भरभराट मोठी होती. या काळात कुंभांवर नुसते नक्षीकाम नव्हे तर लोककथाही चितारुन चिरंतन केल्या गेल्या. एका हुशार कावळ्याने पाणी तळाला गेलेल्या माठात खडे टाकुन पाण्याचा स्तर कसा उंचावला आणि मग आपली तहान भागवली ही आजही लोकप्रिय असलेली कथा सिंधु संस्कृतीतील गुजरातमधील एका पुरातन स्थळावरील माठावरच चितारलेली आपल्याला पहायला मिळते. अर्थात ही कथाही तत्कालीन कुंभारांनीच निर्माण केली असनार व आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले असणार हे उघड आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन शिव-शक्तीप्रधान धर्मकल्पना, पिंपळाचे असलेले महत्व इत्यादि बाबी कुंभारांनी मृद्भांड्यांवर चित्रित केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तत्काली न धर्मसंकल्पनांचाही परिचय होतो. त्या अर्थाने कुंभार हे इतिहासाचे वाहक असल्याचे आपल्या लक्षात येईल
महाराष्ट्रात जोर्वे, इनामगांव अशा ठिकाणांवर प्राचीन आव्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. विशेष म्हणजे सनपुर्व दोन हजारमधील आव्यांची रचना आणि आजही प्रचलित असलेल्या पारंपारिक आव्यांच्या रचनेत फरक मिलत नाही. त्याचाच अर्थ असा की उष्मागतीकी शास्त्रात तेंव्हाच जी उंची गाठली गेली होती ती नंतरही परंपरेने आजच्या कुंभारांनी जपली. जरी त्यांनी त्याचे शास्त्रीय नियम लिहुन ठेवले नसले तरी ते ज्ञात असल्याखेरीज हे होणे शक्य नाही हे पुरातत्वविदांनी मान्य केले आहे.
श्रेणी अथवा निगम संस्थेचा जन्म सिंधु काळातच झाला. श्रेणी संस्था म्हणजे समान व्यावसायिकांच्या आजच्या कमर्शियल चेंबर्ससारख्या संस्था. कुंभारांच्या श्रेण्या त्या काळापासुन अस्तित्वात असल्याचे संकेत आपल्याला तेथे मिळालेल्या मुद्रांवर कुंभांशी जवळीक साधणा-या चित्रांवरुन मिळतात. कुंभारांच्याही अशा देशभर श्रेण्या होत्या. श्रेण्यांना ठेवी घेण्याचे व कर्ज देण्याचे जसे अधिकार होते तसेच चलनी नाणी पाडण्याचेही अधिकार असत. भारतात दहाव्या शतकापर्यंत प्रत्येक व्यवसायाच्या अशा स्वतंत्र श्रेण्या असत. प्रसंगी राजाला कर्जही देण्याचे काम या श्रेण्या करत इतका धनाचा पूर त्यांच्याकडे वाहत असे. गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घ्यायला सुरुवात केल्याने आणि नंतर सरंजामदारशाही युगाचा उदय झाल्याने श्रेंण्या कमजोर झाल्या. त्या श्रेण्यांचेच पुढे जात पंचायतींत रुपांतर झाले. कुंभार जातीचा उदय या कुंभार श्रेण्यांतुनच झाला.
कुंभार समाजाला पुर्वी प्राकृतात कुलाल असे नांव होते. ते तिस-या शतकानंतर संस्कृतच्या परिचयाने कुंभार असे झाले. कुंभार त्या काळातही रांजण, सुरया, गाडगी-मडकी, खापराचे तवे, मद्यपात्रे, मद्यकुंभ, मृण्मय मुर्ती, खेलणी ते फुलदान्या निर्मितीचे काम करत असत. धातुच्या वस्तु पुर्वी तशा दुर्मीळ व म्हणून महाग असल्याने मृत्तिकापात्रे हीच सामान्यांची मोलाची सोय होती. त्यामुळे या व्यवसायाला बरकत होती.
बौद्ध जातककथांतही आपल्याला या व्यावसायिक श्रेण्यांचे असंख्य संदर्भ मिळतात. या श्रेण्यांना राजदरबारी मोठा मान असे. श्रेणीच्या अनुमतीखेरीज कोणताही राजा कर किंवा व्यापार नि कोणत्याही प्रकारचे नियंत्रण लादु शकत नसत. एका अर्थाने ही व्यवसायांना स्वातंत्र्य देणारी व्यवस्था होती. नवीन करागिर घडवण्यासाठी या श्रेणी प्रशिक्षण देण्याचेही काम तर करतच पण मालाचा दर्जा ते किंमती ठरवण्याचेही काम करत. श्रेण्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चाले. श्रेणी प्रमुखास ज्येट्ठी अशी संज्ञा होती व तो निवडून आलेला असे. प्रत्येक श्रेणीचे नियम असत व ते पाळणे श्रेणी सदस्यांना बंधनकारक असे.
त्या काळात साखर, मध आणि विविध प्रकारचे तेल रांजन भरुन भरुन शेकडो गाड्यांतुन दुर दुरच्या बाजार पेठांत नेले जात. अशा शेकडो गाड्यांच्या एकेक तांड्यांचे वर्णनही आपल्याला जातककथांत मिळते. कुंभार त्या काळी किती श्रीमंत असावेत हे सद्दलीपुत या एका कुंभाराच्या वर्णनावरुन लक्षात येते. या सद्दलीपुताचे पाचशे आवे (भट्ट्या) होते आणि तो विविध प्रकारची मृद्भांडी गंगेच्या काठच्या बंदरांवरुन ठिकठिकाणी नेत व्यापार करीत असे. कुंभारांनी व त्यांच्या श्रेण्यांनी मंदिरे, जलाशय ते विहारांना आर्थिक देणग्या दिल्याचे तर अनेक शिलालेख भारतभर उपलब्ध आहेत. सातवाहन कालातील शिलालेख त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. हालाच्या गाथा सप्तशतीतही कुलालांचे (म्हणजे कुंभारांचे) अत्यंत आस्थामय चित्रण काही गाथांतून आलेले आहे.
सन १२६७ ते सन १३१७ हा संत गोरोबांचा काळ मानला जातो. ते महाराष्ट्रातील पुरातत्वीय वैभवाने नटलेले तेर या उस्मानाबाद जवळील गांवचे. या काळापर्यंत श्रेणी संस्था लयाला गेली होती. सतत पडनारे दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेमुळे सर्वच समाजांवर आर्थिक आरिष्ट कोसळलेले होते. जाती व्यवस्थेने कठोर रुप धारण केले होते. असे असले तरी कुंभार कामाचा व्यवसाय तग धरुनच होता याचे कारण म्हणजे मानवी जीवनातील त्याची अपरिहार्यता. धार्मिक कामाला लागणा-या पणत्यांपासुन, देवमुर्तींपासुन ते पाणी साठवण्यासाठी लागणारे माठ ते रांजन कुंभारच पुरवत होते. असे असले तरी श्रेणी काळात उत्पादित मालाच्या किंमती ठरवायचे अधिकार जवळपास नष्ट झाले होते. थोडक्यात उत्पन्नावर मर्यादा आलेल्या होत्याच. शिवाय करांतही वाढ झालेली होती. यादव साम्राज्याचीही पडझड सुरु झाली होती. एका अर्थाने हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय उलथापालथीचा काळ मानला जातो. याच काळात श्री विठ्ठलाच्या भोवती संतांची मांदियाळी तयार झाली व वारीचे परंपरा सुरु झाली हा योगायोग नाही. निर्गुण मातीला आकार देवुन सगुण करत मानवसेवा करणा-या कुंभारांच्या नसानसांत ते अध्यात्म होतेच. ते अध्यात्म अत्यंत उत्कटतेने गोरोबा काकांच्या अभंगांत उतरलेले दिसते.
कुंभार हा मानवी संस्कृतीला आकार देणारा पुरातन घटक. एक महत्वाचा लाभदायक व्यवसाय. पण परिस्थितीची चक्रे फिरतात. चांगल्यामागून वाईट काळ येतो. कुंभारांची नुसती कला नव्हे तर प्रक्रिया-ज्ञान व विज्ञान हजारो वर्ष अबाधित राहिले असले तरी अन्य व्यावसायिक जातींप्रमाणे याही जातीवर अवनती आली. किंबहुना त्या काळाची सुरुवात झाली तेंव्हाच नामदेव, चोखोबा, विसोबा खेचर, नरहरी सोनार, सावता माळी ते गोरोबा हे निर्मानकर्ते व सेवा आदात्या समाजांतून मोठ्या प्रमाणात संत झाले हेही एक वास्तव आहे. परिस्थितीने त्यांना श्री विठ्ठलालाच साकडे घालायला लावले असले तरी मानवजाती आणि त्यासाठी कराव्या लागणा-या श्रमांना त्यांनी सोडले नाही. किंबहुना हा भक्तीवाद पलायनवादी नव्हता. गोरोबांच्य संदर्भातील ज्या काही कथा अहेत त्या त्यांच्या कामावरील निष्ठा व प्रेम दाखवतात. चमत्कारांची पुटे दूर केली की वास्तव दिसू लागते.
आदिम काळापासुन मातीतुन शिल्पे घडवणारा समाज समस्त मानवजातीला उपयुक्त व देशाची अर्थ व कला संस्कृती घडवत राहिला. या समाजातून अनेक तत्वज्ञ व महापुरुष घडले असल्याची शक्यता आहे. संत गोरोबांच्याच जीवन चरित्राबाबत फारशी विश्वसनीय अशी माहिती मिलत नाही तर तत्पुर्वीच्या श्रेष्ठांची कशी माहिती मिळणार. पण सर्व समाजाच्या हिताचे काम करुनही कुंभारांचे सामाजिक व आर्त्घिक स्थान घटवले गेले हे एक वास्तव जसे आहे तसेच संत गोरोबांचे स्मरण केवळ कुंभार समाजानेच करावे असा काहीतरे असामाजिक दंडक पडला आहे कि काय असे वाटावे हीही एक वस्तुस्थिती आहे. पण कुंभार नसते तर मानवजातीचाही इतिहास अज्ञात राहिला असता हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि याच मृत्तिका शिल्पे घडवना-या समाजानेच भाव-भक्तीचे शब्दशिल्पे घडवनारा गोरोबा काकांसारखा महान संत दिला याचे स्मरणही ठेवले पाहिजे!
-संजय सोनवणी
Sunday, September 13, 2015
गांधीहत्येचा घटनाक्रम असा आहे....
१५ जानेवारी १९४८...गोडसे, आपटे, बडगे, करकरे आणि मदनलाल यांनी हिंदू महासभेच्या मुंबई कार्यालयात बैठक घेतली. नंतर दिक्षितजी महाराजांकडे त्यांनी ठेवलेली स्फोटके/शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. करकरे, आणि मदनलाल यांना दिल्लीला जाण्याचे सांगण्यात आले. गोडसे मात्र पुण्याला आला.
१७ जानेवारी १९४८....गोडसे, आपटे, बडगे आणि शंकर हे सावरकरांना त्यांच्या घरी भेटले. नंतर त्याच दिवशी गोडसे आणि आपटे दुपारी दोनच्या विमानाने दिल्लीला निघाले व साडेसात वाजता पोहोचले.
१९ जानेवारी १९४८...हिंदू महासभा भवनात गोडसे व आपटे बडगेला भेटले.
२० जानेवारी १९४८...सायंकाळच्या प्रार्थना सभेत गोडसेसहित सर्व आरोपींच्या समक्ष मदनलालने स्फोट केला. लगोलग सारे कानपुरला रेल्वेने पळाले.
२२ जानेवारीला सारे मुंबईला पंजाब मेलने निघाले. दुसर्या दिवशी ते मुंबईला पोहोचले. तेथे प्रथम ते आर्य पथिक आश्रमात राहिले, नंतर एका होटेलात.
२७ जानेवारीला बोगस नांवांनी त्यांनी एयर इंडियाचे बुकिंग केले. त्याच दिवशी दिल्लीला पोचल्यावर ते ग्वाल्हेरला गेले, डा. परचुरेला भेटले. तेथेच दंडवते याने त्यांना रिव्हाल्वर दिले.
२९ जानेवारीला वेगवान हालचाली झाल्या. दिल्लीत परत आल्यावर. गोडसेने रेल्वे स्टेशनवरील विश्रामगृहात एन. विनायक राव या नांवाने खोली बुक केली. आपटे, गोडसे आणि करकरेने त्या सायंकाळच्या बिर्ला भवनमधेल सायंप्रार्थनेला हजेरी लावली.
३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी गोडसेने ३ गोळ्या झाडून सायंप्रार्थनेच्या वेळीसच बिर्ला भवनात गांधीजींची हत्या केली.
१५ ते ३० जानेवारीचा एकंदरीत घटनाक्रम न्या. कपूर यांनी दिल्याप्रमाणे आहे. संपुर्ण अहवाल वाचायचे कष्ट घेतले तर अनेक धक्कादायक बाबी दिसतील. सावरकर या खुनाचे मुख्य सुत्रधार होते तर बाकी प्यादी हेही सरळ दिसते. कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. सावरकर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना गोवता येईल असा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळाला नाही आणि भारतीय दंडविधानाप्रमाणे असा पुरावा नसेल तर दोषी ठरवता येत नाही. मानवत खूनखटल्यातही केवळ प्रत्यक्ष सहभाग व अन्य प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने सुत्रधार मुक्त सुटले होते.
कपूर आयोगाचा अहवाल खालील लिंकवर संपुर्ण उपलब्ध आहे. अवश्य वाचा.
http://www.sacw.net/article2611.html
आता...या लोकांच्या बैठका मुख्यत्वेकरून हिंदू महासभेच्या मुंबई व दिल्ली कार्यालयात झाल्या. हिंदू महासभेचे सर्वेसर्वा कोण होते हे सारे जाणतात.
सावरकरांना १७ जानेवारीला प्रत्यक्ष हत्याकांडात सामील झालेले भेटले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे लोक मुंबईलाच आले व किमान चार दिवस तेथे राहिले. ते पुन्हा सावरकरांनाच भेटायला आले होते असे म्हणायला पुरेपूर वाव आहे. अन्यथा पळून जायला त्यांना अनेक जागा होत्या. त्यांना सक्षम शस्त्र हवे होते. ते त्यांना मुंबईतून गेल्यानंतर ग्वाल्हेरला मिळाले. ही व्यवस्था क्रांतीकारकांना शस्त्रे पुरवण्याचा आधीपासून उद्योग करणा-या सावरकरांशिवाय कोण करणार?
हे प्रश्न आहेत व यांची दखलपात्र उत्तरे सावरकरवादी देऊ शकत नाही हे उघड आहे.
Thursday, November 28, 2013
वडार समाजाचा इतिहास
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नांवे मिळालेली दिसतात. उदा. महाराश्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लु वा ओड्डर असे म्हटले जाते तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणुन ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते.
मूळ व मूळस्थान:
आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मुलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे. १८७१ सालच्या जनगणणेच्या अहवालात "देशाच्या विविध भागात सापडणारे वड्डा(र) हे मुळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत." असे नमूद करुन व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. "वड्डा" या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो "ओड्र देशाचा. म्हणजे ओडिसाचा" असे १९०९ मद्धे थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातुनच ओडिया, ओड्ड, वोडे, वडार, वड्डर, ओटन, वोड्डे ई. हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले. ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमद्धे विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे. (१९२७) हे झाले इंग्रजकाळातील वडार समाजाबाबतचे संशोधन.
आपण अजून मागे गेल्यास "ओड" "आंध्र" ही नांवे औंड्र या पुरातन मानववंशापासुन आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासुन ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐतरेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने "शूद्र व्हाल व दक्षीणेत राज्ये वसवाल" असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पूत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नांवावरुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते.
थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मुळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नांवाची खुण वडार समाजाने जतन करुन ठेवली आहे.
महाभारत व ऐतरेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हनणे वावगे होत नाही. औंड्र/पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते त्यामुळेच कि काय आंढ्र-ओडिसामद्धे आजही विपूल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात.
मुळ व्यवसाय:
वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली, त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदीमानवाने पाषाणांपासुन विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकु-हाड, तासण्या, पाटे-वरवंटे ई. बनु लागले तर गारगोट्यांपासुन बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानवोपयोगी वस्तु बनवण्याचे लघुत्तम कारखानेच सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यारनिर्मिती केंद्रे उत्खननांत सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो कि पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तु बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल.
पुढे शेतीचा शोध लागला. माणुस स्थिर झाला. घरे बांधु लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घरबांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या वीटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला वीटांत बांधलेली दिसतात तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षीणेत वेगळी स्थिती होती. दक्खनचे पठार व सह्याद्री बेसाल्ट जातीच्या पाषाणाच्या विपूलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाणकार्यात तरबेज लोक दक्षीणेतच अधिक प्रमाणात विकसीत होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वसत्या दक्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात.
जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. याचा शोध इसपू १००० च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळुन आले आहे. पाटा-वरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करु लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्राविण्य मिळवून एक पोटजात बनली.
वडार समाज हा मुळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे-नगर-किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना-खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध-शैव-जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही. त्यावेळीस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिक्ल्पवैभव निर्माण केले गेले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्याने.
सातवाहन काळात वडारांना सेल वढकी अथवा वढकी असे म्हटले जात असे.अनेक शिलालेखांत ही नांवे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरु झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता.
कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले कि दुस-या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होत होता. भटकेपण या समाजाला चिकटले ते या समाजाची अपरिहार्यता म्हणुन. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्राविण्य मिळवणा-यांच्या पोटजाती बनु लागल्या. मण्ण अथवा माती वडार हे मृत्तिकाकार्यात कुशल. गाडीवडार हे दगडाची खाण करुन दगड वाहण्यात तसेच विहिरी-तळी खोदणारे, पाथरवट हे लेणी-मंदिरे ई. कामांत कुशल. कल्ल वडार हे जाती, पाटे, वरवंटे यात कुशल.
मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडुन चिरे घडवणे ते दगडी वस्तु बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच कि काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य न बनता तरच नवल. या समाजात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रीया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत.
या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहीरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे...किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तुंच्या अवशेषांतुन. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करवून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडा-यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नांवे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाजसंस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही.
पुराकथा:
भारतातील प्रत्येक समाजाचा स्वत:चा असा पुरा-इतिहास आहे व तो त्यांनी पुराकथांतून जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही.
वडार समाजातही अनेक पुराकथा आहेत.येथे आपण काही मोजक्या पुराकथांचा मागोवा घेऊ.
१. शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेंव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूंतून कुदळ-फावड्यासहित एक माणुस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूंतून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहिर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहिर खोदली. विहिरीतील पाणी पिउन शिव-पार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिव-पार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले. पण जोडपे खूष झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला कि "तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल..."
आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळीस आपली निर्मिती शिव-पार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे.
२. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगिरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पार पाताळापर्यंत जाउन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते...पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली त्यामुळे ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवल कृद्ध नजरेने जाळुन टाकले. व "तुमचे वंशज खोदकामच करत राहतील..." असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगिरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोहोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुक्खी झाला व मुनीची करुणा भाकली. मुनी म्हनाला, "जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जीवंत होतील." भगिरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जीवंत झाले. हेच आपले पुर्वज होत असे ही पुराकथा सूचित करते.
३. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्त्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रीयांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले. पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आदवे यणा-या वडारांनअ ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरतांना तिने सिद्धराजाला शाप दिला कि, "तुझ्या तलावात कधीही पाणी साठनार नाही." आणि वडारांना ती म्हणाली कि, "यापुढे वडारांत सुंदर स्त्रीया निपजनार नाहीत."
वडार स्त्रीया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे उन्हातान्हात करत आल्या असल्याने तसेही सुखवस्तू नागरस्त्रीयांत असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथांत-पुराकथांत शोधत असते आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराकथांची निर्मिती केली आहे हे आपल्या लक्षात येईल.
अवनतीचा कालखंड
मध्ययुगात, विशेषत: बाराव्या शतकानंतर, वेठबिगारीची प्रथा सुरु झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्मानकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरु होती. यामुळे वडा-यांपासून ते चांभार, लोहार, मातंग ई. निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यांत कमी पडायचे तर नाही पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकत आणि दुस-या सहस्त्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुस-या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडने ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथांत पाहु शकतो. याची परिणती कौशल्ये विकसीत करणे सोडा, आहे ती कौशल्येही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही.
पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आफत ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रंत आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्ये मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचना शास्त्र आल्याने वडा-यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणने एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे...फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, तळी-विहीरी खोदने एवढेच सामान्य दर्जाचे काम वडा-यांना उरले. पिढ्या-दर-पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एके काळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले-वास्तू-मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या.
याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती. बकालपणा. यातुनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करना-या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कला-कौशल्यांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा अंत घदवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते.
आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञाने आल्याने कोणाच्या खिजगणतीतही नाही. आपल्या आस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे. त्याला सुयश लाभो या शुभेच्छा!
Tuesday, September 25, 2012
ऐरणीच्या देवा तुला...
आपल्या पुरातन पुर्वजांनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनोपयोगी जे शोध लावले ते पाहून आपण अचंबित होतो. लोहाचा शोध हा एक असाच अत्यंत महत्वाचा टप्पा. लोहयुगाचे सुरुवात ही मानवी विकासाच्या टप्प्यातील एक क्रांतीकारी घटना मानली जाते. सनपूर्व तीन हजार वर्षांपुर्वी मानवाला लोहाचा शोध लागला असे पुरातत्वविद मानतात. लोहयुग सुरु होण्याच्याही खूप आधी मध्यपुर्वेत अशनींत मिळणारे शुद्ध लोह-निकेलचे गोळे वापरात आनले जात असत. भूपृष्ठावर मिळणा-या लोह खनिजात अशुद्ध धातू व अधातु जवळपास ३० ते ३५% असतात. शिवाय धातुकाचे ओक्सीडीकरण झालेले असते. लोह वितळवण्यासाठी आवश्यक असलेले उच्च तापमान निर्माण कृत्रीमरित्या निर्माण करणे व शुद्ध लोह वेगळे करणे ही क्रिया सुरुवातीला अशक्य अशीच होती. त्यामुळे लोह वितळवून धातूरस साच्यात घालुन वेगवेगळ्य वस्तु निर्माण करत येत नसत. त्यामुळे सुरुवातीला लोखंडाचे गोळे तापवून, नरम करुन त्याला ठोकून निरनिराळ्या वस्तू बनवल्या जावू लागल्या. कालांतराने मानवाने भट्ट्यांत तांत्रिक सुधारणा केली व लोहाचा रस निर्माण करण्यासाठी आवश्यक तापमान निर्माण व्हायला सुरुवात झाली.
भारतात लोहयुग कधी अवतरले याबाबत विद्वानांत अनेक मतभेद आहेत. ऋग्वेदात लोहाचा उल्लेख येत नाही. वैदिक मंडळीनी लोहशास्त्र आदिवासी मुंड लोकांकडुन घेतले असे मत अ.ज. करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. संस्कृतात मुंड शब्दाचा अर्थ "लोह" असाच आहे. मुंडायसम, मुंडलोहम अशी नांवे वेदांत वारंवार येतात. त्यामुळे भारतातील लोहाच्या शोधाचे श्रेय मुंड या आदिवासी जमातीला दिले जाते व ते संयुक्तिकही आहे. मुंड आदिवासींच्या वसाहती आजही ज्या भागांत आहेत तेथे लोहखनिजाच्या विपूल खानी आहेत. त्यामुळे लोहाशी त्यांचा प्रथम परिचय झाला असणे स्वाभाविक आहे. सनपूर्व अठराव्या शतकापर्यंत लोह उद्योग भारतभर पसरला होता असे विविध ठिकाणी झालेल्या उत्खननांतुन सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात तीन हजार वर्षांपुर्वीच्या महापाषाणयुगातील लोखंडाचे घोड्याचे नाल व खिळे तसेच घोड्याच्या मुखावर बसवण्यासाठी बनवलेला तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेल्या व लोखंडी खिळ्यांनी ठोकलेला अलंकार मिळाला आहे.
पुढे मात्र लोहक्षेत्रात भारतियांनी खुपच मोठी क्रांती घडवली. शुद्ध लोह मऊ असल्याने हत्यारांसाठी त्याचा उपयोग होत नसे. पण धातुरसात कर्ब मिसळला तर कठीण असे पोलाद तयार होते असे लक्षात आले. बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव बनवणे ही फारच मोठी तंत्रकौशल्याची बाब होती. त्यामुळे बैलगाड्यांचे आयुष्य तर वाढलेच मालवाहतुकही सुलभ होत गेली. सिंधु संस्कृतीत लोहाच्या धावा बैलगाड्यांना असत. अशा धावांच्या चाको-याही सापडलेल्या आहेत. पाण्याच्या मोटी, नांदरांचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, खुरपी, घमेली, विळ्या, खिडक्यांचे गज, बांगड्या, प्याले ते थाळ्याही लोहापासून बनू लागल्या. मानवी जीवनात ही एक मोठी क्रांती होती. मानवी जीवन सुलभ, सुसह्य करण्यात या असंख्य लोहवस्तुंनी हातभार लावला.
युद्धतंत्रातही या शोधाने मोठी क्रांती झाली. सनपुर्व १००० पासून पोलादी तलवारी, बाणांची टोके, चिलखते पोलादापासून बनू लागली. सैन्याची संहार व बचाव क्षमता वाढली. दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवणे हा एक देशव्यापी अवाढव्य उद्योग बनला. लोह वितळवणे ते त्यापासून विविध वस्तु बनवणे हे एक तंत्र कौशल्याचे तसेच कष्टाचे काम. शिवाय धातुज्ञानाची आवश्यकता. सातयाने उष्नतेच्या धगीत रहावे लागण्याची आवश्यकता. यामुळे इसपू १००० पासुनच हा उद्योग परंपरागत बनत गेला. भारतात निर्माण झालेल्या प्राचीन जातींपैकी ही एक जात. अर्थात या जातीत विविध वंशगटांतील लोक आले. व्यवसाय वैविध्यही त्यामुळेच आले.
भारतातील लोहारांनी धातुशास्त्रात जी प्रगती केली तिला तोड नाही. भारताच्त बनणा-या पोलादी तलवारी जगात उच्च दर्जाच्या मानल्या जात. निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असे. भारतीय तलवारींत न्यनो तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे दावे आता होत आहेत. टिपू सुलतानाची तलवार न्यनो तंत्रज्ञानानेच बनवली गेली होती. या सर्व प्रक्रिया लिखित स्वरुपात लिहिल्या न गेल्याने आधुनिक लोहविज्ञानाची मोठीच हानी झाली आहे असे आपल्याला म्हनता येते. परंतु आपापले शोध, तंत्रे पिढ्यानुपिढ्या आपल्याच वंशात जपण्याची आपली पद्धत. त्यामुळे असे होणेही स्वाभाविक होते.
भारतीयांनी अझुन एक क्रांती केली ती म्हनजे लोहभुकटी विज्ञानात घेतलेली झेप. अठराव्या शतकापर्यंत जे तंत्रज्ञान युरोपातही शोधले गेले नव्हते ते तंत्रज्ञान भारतीय लोहारांना चांगलेच माहित होते. याचा आजेही जिताजागता असलेला पुरावा म्हणजे महरौली येथील २३ फुट उंचीचा व सुमारे सहा टन वजनाचा कधीही न गंजनारा लोहस्तंभ. हा स्तंभ सन चवथ्या शतकात निर्माण केला गेला. हा स्तंभ उघड्यावर असूनही का गंजत नाही ही बाब नेहमीच आश्चर्याची मानली गेली आहे. परंतु आधुनिक पावडर मेटालर्जी तज्ञांनी हा स्तंभ लोहभुकटी विज्ञानाने बनला आहे असे सिद्ध केले आहे.
लोखंडाची अत्यंत बारीक भुकटी करुन, त्यात निकेल, तांबे अशा धातुंची पुड काही प्रमाणात मिसळुन मिश्रधातु बनवणे ही पहिली पायरी. पुढची पायरी म्हनजे हे भुकटी मिश्रण साच्यात दाबुन सरासरी वितळबिंदुच्या खालचे म्हणजे ९०० डिग्री तापमान बाहेरुन देणे. या तापमानाला धातुभुकटीचे कण परस्परसंबब्ध होवून अखंड वस्तू मिळते. या तंत्रज्ञानाला आज सिंटरिंग तंत्रज्ञान म्हनतात. याच पद्धतीने क्रमाक्रमाने हा लोहस्तंभ बनवला गेला आहे. यात असलेल्या अगंज धातुकांच्या भुकटीच्या मिश्रनानेच या स्तंभावर आजतागायत गंज चढलेला नाही. पण हे तंत्रज्ञान पुढे फारसे वापरात आलेले दिसत नाही. अपवाद असतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. परंतु आजही पाश्चात्य जग धातुभुकटी विज्ञानाच्या शोधाचे श्रेय भारताला देते हा आपल्या लोहविद्येचा मोठा सन्मानच होय.
पुर्वीचे लोहार किती मोठे साचे बनवू शकत असतील? याचे एक उदाहरण आजही जीवित आहे.
रांचीच्या पश्चिमेला दोनेकशे किलोमीटर अंतरावर टांगीनाथ नांवाचे एक प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. येथे एक प्रचंड त्रिशुळ असून त्याचे मधले टोक तुटुन पदलेले आहे. या तुकड्याचेच वजन तीन टन आहे. संपुर्ण त्रिशुळाचे वजन वीस टन असावे असा तज्ञांचा कयास आहे. हा त्रिशूल अखंड साच्यातुन बनवला गेला आहे. अवघ्या जगात असे लोहकामाचे उदाहरण नाही. हा त्रिशुळ किमान दीड हजार वर्ष एवढा जुना आहे. वीस टनी त्रिशूळ बनवायला केवढा मोठा साचा तयार करावा लागला असेल व त्यासाठी नेमके कसे तंत्रज्ञान विकसीत केले गेले असेल याची आज आपण फक्त कल्पनाच करु शकतो.
थोडक्यात भारतातील लोहारांनी धातु विज्ञानात अद्भुत प्रगती साधली होती. बिल ड्युरांटने "द स्टोरी ओफ सिविलायजेशन" या ग्रंथात भारतीयांनी कास्ट आयर्न बाबत भारतीयांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले असून पाश्चात्य जग भारतीयांपेक्षा किती मागासलेले होते याचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे.
भारतात एखादा व्यवसाय वंशपरंपरागत बनला कि त्याची जात बनते हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. लोहार हीही एक जात बनणे स्वाभाविकच होते. भारतात सुरुवातीला ज्या अल्पशा जाती बनल्या त्या आद्य जातींपैकी लोहार ही जात होय. प्रदेशनिहाय भाषाभेदांमुळे व व्यवसाय वैशिष्ट्यांमुळे लोहार समाजात विविध पोटभेद पडत गेले. रिश्ले हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो कि भारतातील लोहार हे वेगवेगळ्या वंशगटांतुन आलेले आहेत. त्यामुळेच कि काय देवदेवता, विवाह चालीरिती, धर्मश्रद्धा यांत फरक आढळतो. प्रदेशनिहाय नांवेही वेगळी आहेत. उदा. कन्नड लोहारांना कम्मार म्हणतात, कोकणी लोहारांना धावड तर बिहारमद्धे बढई म्हणतात.
राजस्थानातुन महाराष्ट्रात आलेल्या गाडी लोहारांची कथाही अद्भुत आहे. गाडीलोहार म्हनजे फिरस्ते लोहार. हत्यारे बनवून बैलगाडीतुन हिंडुन ती विकणारे वा स्थानिक गरजांप्रमाने ती बनवून देणारी ही एक पोटजात. हे मुळचे राजस्थानी. सन १५६८ मद्ध्ये अकबराने चितोड काबीज केले. गाडी लोहारांना या घटनेचे प्रचंड दु:ख झाले व त्यांनी राजस्थान सोडुन जायचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी पाच प्रतिज्ञा केल्या त्या अशा...१. कुठेही स्थाईक वस्ती करायची नाही, २) छपराखाली रहायचे नाही, ३) विहिरीतुन दोराने पाणी काढायचे नाही, 4) दिवा लावायचा नाही आणि ५) खाटेवर झोपायचे नाही. नंतर चारशे वर्षांनी स्वातंत्र्यानंतरच या स्वाभिमानी गाडी लोहारांचा राजस्थान प्रवेश समारंभपुर्वक झाला...पंतप्रधान पं नेहरु या समारंभाला आवर्जुन उपस्थित होते.
महाराष्ट्रात आजमितीला जवळपास २० लाख लोहार समाजाचे लोक राहतात. हा समाज खेडोपाडी विखुरलेला असून जवळपास पाच पोटजातींत हा समाज विखुरलेला आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व शुण्य असून औद्योगिकरणानंतर तर हा व्यवसायही जवळपास संपला आहे. मोठमोठे उद्योग अगदी टिकाव-घमेलीही बनवू लागल्याने यांची गरजच संपवली गेली. खरे तर शासनाने या परंपरागत उद्योगाला संजीवनी देत औद्योगिकिकरणात सामाविष्ट करून घेत त्यांच्या पारंपारिक कौशल्यांचा उपयोग करुन घ्यायला हवा होता. अजुनही वेळ गेलेली नाही असे लोहार समाजाचे नेते श्री दिलीप थोरात मानतात. पोटजातींतील विभेद संपवण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमानावर होत आहेत. हे खरे असले तरी शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण व आर्थिक दारिद्र्य हा या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. पदवीधरांची अजुनही या समाजात मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. भारतात लोहयुग अवतरवत जनजीवन सक्षम आणि समृद्ध करनारा हा समाज आज अस्तित्वहीण झालेला आहे. या समाजाचे आर्थिक उत्थान करता येणे सरकारला अशक्य नाही. त्यासाठी लोहार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला आधुनिक बनवण्यासाठी तांत्रिक व अर्थसहाय्य उपलब्ध करून देत विक्री यंत्रणा निर्माण करुन दिली तर आजही हा उद्योग काही प्रमानात का होईना उभारी धरु शकतो व आजही खेडोपाडी जे लोहारकामावरच कसाबसा तग धरुन आहेत त्यांना उत्पन्नाचे साधन मिळु शकते. अनेक लोहवस्तु आजही कारखान्यांत बनत नाहीत पण त्यांची गरज असते. अशा वस्तु-उत्पादनापुरता तरी या समाजाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होवू शकतो. एके काळी मुंबईतील लोहार चाळ ही दैनंदिन उपयोगाच्या कलात्मक लोहवस्तुंसाठी प्रसिद्ध होती. आता तिचे नांव तेच राहिले पण उत्पादने भलतीच विकली जातात. पण यातुन घेता येईल तो धडा हा कि लोहवस्तुंची अनेक विक्रीकेंद्रे काढता येणे सहज शक्य आहे. हस्तोद्योग, खादी-ग्रामोद्योग केंद्रांप्रमानेच लोहवस्तु केंद्रेही बनवता येणे अशक्य नाही. पण त्यासाठी हवी शासनाची संवेदनशीलता. सर्व समाजघटकांचे खरे कल्याण घडवण्याची तळमळ!
एखादा समाज अत्यल्पसंख्य आहे, राजकीय प्रतिनिधित्व नाही म्हणुन त्या समाजाला पुर्ण दुर्लक्षीत ठेवायचे असले निंद्य कृत्य शासनाकडुन व सर्वच समाजांकडुन होवू नये हीच अपेक्षा.
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
Saturday, September 15, 2012
वंजारी समाजाचा इतिहास
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.
पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.
हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.
मालवाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशुंच्या पैदाशीतही अग्रेसर राहिला.
कोकणातुन व गुजरातेतील क्च्छमधुन मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशालिस्ट वर्गही यातुनच निर्माण झाला. मीठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडुन ते उचलायचे आणि देशभर विकायचे. त्या काळात मीठाची किंमत मोठी होती. लवण (मीठ) वाहतुक करणारे ते "लमान" (लभान) हा पोटभेद त्यातुनच निर्माण झाला.
आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक वंजारी समाज लढवैय्याही बनलेला होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी-लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.
वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी/लमानांचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी/लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी/चारण/लमानांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.
थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी/लमाण समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणा-यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल! हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.
अनेक वंशातुन निर्माण झालेला समाज
संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा, यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्र्रात काही जिल्हयात आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्टया निराळी आहे. याचे कारण म्हनजे या समाजाचे गेल्या दोनेकशे वर्षांत झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नांवे वेगळी झाली हे वरील यादीवरुन लक्षात येईल. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत चारण, मथुरिया, लमाण आणि घाडी, यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार चाहमान, जाडोत, किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.
थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणुन बंजारा-वंजारी-चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे.
वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.
आजचे वास्तव
आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असम्ख्य वंजारी उसतोदणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती.
महाराष्ट्रात याच समाजातुन उदयाला आलेले महत्वाचे राजकीय नेतृत्व म्हनजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाचे ते एकमेव आशास्थान असले तरी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात त्यांना शह देण्याची अन्य जातींतील नेतृत्वांची प्रवृत्ती एकार्थाने विघातक अशीच आहे. सध्या बहुजन समाजाचे ऐक्य करण्याचे प्रयत्न चालु आहेत त्यात महादेव जानकर, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे पुढाकार घेत आहेत. भविष्यात काय होइल हे सांगता येत नसले तरी आज वंजारी समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे.
नोट- वाचकमित्रांनी माह्या लेखावर विरोध दर्शवण्यापुर्वी खालील मजकुर वाचावा.
-सरकारी कागदोपत्री बंजारा आणि वंजारी समाज एकत्रच मानले जात होते आणि त्यांचा समावेश भटक्या जातसमुहात केला गेला होता. १९३१ च्या जनगणनेनुसारही दोघांना एकाच जातसमुहात घेतले गेले होते. बंजारा नेता वसंतराव नाईक यांनीही आपला मतदारसंघ मजबुत व्हावा यासाठी या जातीसमुहाची एकत्रीतपणेच आयडेंटिटी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. १९८० नंतर मात्र चित्र पालटले. आपली स्वतंत्र राजकीय/आर्थिक/सामाजिक ओळख निर्माण व्हावी यासाठी अनेक जातींत असेच बदल घडू लागले. मंडल आयोगाने बंजारा व वंजारी यांना एकत्र व एकच गृहित धरत त्यांना भटक्या जमातीत घेतले होते. पण याला बंजारा आणि वंजारा या दोघांनी आक्षेप घेतला. हा वाद उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही जमाती एकच असल्याचे सांगितले. नव्वदच्या दशकात वंजारी तरुणांनी "माधव" समीकरणात मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. या समीकरणामुळे मंडलोत्तर काळात स्व. गोपिनाथ मुंडे हे भाजपचे मुख्य नेते म्हणून उदयाला आले. मुंडेंमुळे राज्य सरकारला बंजारा-वंजारी प्रश्न सोडवण्यासाठी एकसदस्सीय आयोग बसवणे भाग पडले.े आयोगाने दोन जमाती एक नसल्याचा निर्वाळा दिला. यामुळे वंजारी जमातीला आरक्षणाचे अधिक फायदे मिळू लागले. (संदर्भ- Caste Associations in the Post-Mandal Era: Notes from Maharashtra by Rajeshwari Deshpande
Department of Politics & Public Administration, University of Pune )
Tuesday, September 11, 2012
धनगरांच्या पुनरुत्थानासाठी...
धनगर ही तशी जात नसून जमात आहे हे त्यांच्या पुरातन इतिहासापासुन दिसुन येते. म्हणजे जेंव्हा वर्णव्यवस्था वा जातीसंस्थासुद्धा अस्तित्वात आली नव्हती तेंव्हापासुन धनगर समाजाचे अस्तित्व महाराष्ट्रात राहिले आहे. या समाजाची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. खंडोबा, बिरोबा या त्यांच्या मुख्य देवता. पानकळा संपला कि मेंढरांचे कळप घेवून बाहेर पडायचे आणि पानकळ्याच्या आरंभी परत यायचे. थोडक्यात हा समाज अजुनही मोठ्या प्रमाणावर निमभटका राहिलेला आहे. यामुळे या समाजात शिक्षणाचे प्रमाण खुपच कमी आहे. अर्थतच त्यामुळे आर्थिक दारिद्र्यही मोठ्या प्रमानावर आहे. एके काळी संपन्न असलेला, "धनाचे आगर" म्हणुन धनगर म्हटला जाणारा हाच तो समाज यावर सहजी विश्वास बसणे अशक्य वाटावे एवढी आर्थिक अवनती या समाजाची आज महाराष्ट्रात झाली आहे.
मेंढपाळी व्यवसायावर कोसळलेली संकटे
मेंढपाळांना हवी असतात चरावू कुरणे. परंतु जसे भारतात औद्योगिकी करण होवू लागले व औद्योगिक वसाहतींसाठी शासनाने ज्या जागा ताब्यात घेतल्या त्या जागा म्हणजे चराऊ कुरणेच होती. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धरणे बांधली गेली. त्यात जशा शेतजमीनी बुडल्या तशीच हजारो हेक्टर चरावु कुरणेही. सेझमुळे या आपत्तीत भरच पडली. शेतक-यांना वा विस्थापितांना सरकारने उशीरा का होईना भरपाया तरी दिल्या व पर्यायी जागाही दिल्या. पुनर्वसनेही झाली. विस्थापितांच्या प्रश्नांसाठी आंदोलनेही झाली व आजही होतच आहेत. पण मेंढपाळांना सरकारने कसलीही आर्थिक मदत तर केली नाहीच पण पर्यायी व्यवस्थाही केली नाही. ते तर सोडाच, वनखात्याच्या जाचक नियमांनी पुर्वांपार ज्या क्षेत्रांत मेंढरांना चरायची सोय होती तीही आक्रसली. धनगर समाज हा मुळात मूक समाज. त्यांनीही आपल्या प्रश्नांना कधी वाचा फोडली नाही. तो कधी रस्त्यावर आला नाही. कधी आवाज उठवला नाही. त्यांच्या बाजुने कोणी अन्य पक्षनेत्यांनीही विधानसभेत वा संसदेत साधा आवाज उठवला नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील मेंढपाळी उद्योगाच्या गळ्याला आपण नख लावतो आहेत याचे भान कोणालाही राहिले नाही.
शेतक-यांच्या प्रश्नांवर आजवर असंख्य आंदोलने झालीत. महाराष्ट्रात शरद जोशींची शेतकरी संघटना असो कि उत्तरेतील महेंद्र टिकैतांची...त्यांनी शेतकरी प्रश्नांवर वारंवार रान उठवले आहे. अनेक पुस्तके, अगणित लेख लिहिले गेले आहेत...पण मेंढपाळांच्या एकुण अवस्थेबाबत, त्यांच्या व्यावसायिक समस्यांबाबत अभ्यासक/विचारवंतही कधी अभ्यास करते वा लिहिते झाले नाहीत. एकुणात मेंढपाळांच्या प्रश्नावर कोणीही तोंड उघडलेले दिसत नाही...आंदोलने तर खुप दुरची गोष्ट झाली.
आज महाराष्ट्रात धनगर समाज हा वाड्या-वस्त्यांवर विखरुन राहिला आहे. या समाजाची एकुण लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. म्हणजे एकुण लोकसंख्येच्या एकुण जवळपास सोळा-सतरा टक्के एवढा हा समाज असुनही एवढा दुर्लक्षित रहावा ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने खरे तर लांच्छनास्पद बाब आहे. पण लक्षात कोण घेतो? खुद्ध धनगर समाजाचे सध्या फक्त सहा आमदार आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासुन आजतागायत फक्त तीन जणांना मंत्रीपदे मिळाली आहेत. आजतागायत या समाजातुन एकही खासदार झालेला नाही. याचे कारण म्हणजे कोणत्याही पक्षाने उमेदवारी देतांना धनगर समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचारच केलेला दिसत नाही.
यामुळेच कि काय श्री. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करुन धनगर व बहुजन समाजाला एकत्र करत राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अद्याप या पक्षाला खुप मोठी मजल मारायची आहे. तोवर काय होणार हा प्रश्न आहेच. पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने धनगर समाजावरील अन्याय कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.
मेंढपाळी व्यवसायाचे महत्व
मेंढ्यांपासुन मांस, कातडी, दुध व लोकर मिळते. आज हा जगभर अत्यंत महत्वाचा उद्योग मानला जातो. चीन, आस्ट्रेलिया व अमेरिकेत या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अनुदानेही दिली जातात. चरावू कुरणांना पुर्ण संरक्षण आहे. चीन देश या उद्योगात प्रथम क्रमांकावर असुन या देशात चवदा कोटी मेंढ्या आहेत. भारत हा दुस-या क्रमांकावर असून भारतातील मेंढ्यांची संख्या आजमितीला आठ कोटींच्या आसपास आहे. अमेरिका आज आपली बोकड/मेंढी मांसाची ५०% गरज आयातीतुन पुर्ण करतो.
महाराष्ट्रात आजमितीला चाळीस लाखांपेक्षा अधिक मेंढरे आहेत. अत्यल्प अपवाद वगळले तर या मेंढरांचे सर्वस्वी मालक धनगरच आहेत. नाबार्डच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजुनही पन्नास लाख मेंढरांची गरज आहे...ती लोकर व मांसाची गरज पुरवण्यासाठी. पण मुळात चरावु रानेच नष्ट होत चालल्याने वाढ तर सोडा यात घटच होत जाणार आहे हे उघड दिसते. यामुळे भारत मांसाचा निर्यातदार नव्हे तर आयातदार होत जाईल हा धोका कोणी लक्षात घेत नाही हे दुर्दैवच आहे.
मेंढपाळांवर कोसळत असनारे दुसरे संकट म्हणजे शेतकरी आणि मेंढपाळामद्धे अकारण उठणारे संघर्ष. एखादे मेंढरु चुकुन शेतात घुसले कि धनगरांना अक्षरशा चोपुन काढले जाते. धनगरांना मिळनारे एक अत्यल्प उत्पन्न साधन म्हणजे रिकाम्या शेतात मेंढरे बसवून सेंद्रिय खत पुरवणे. पण आजकाल रासायनिक कीटनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अनेकदा मेंढरांना वीषबाधा होते. अनेक मेंढरे दगावतात. वीमा नसल्याने भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यात दुष्टाव्याने वीष घालुन मेंढरे मारली जाण्याच्याही घटना मोठ्या प्रमानावर होवू लागल्या आहेत. नुकतीच बुलढाना जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील खडकी शिवारात लोणच्यात वीष घालुन शेकडो मेम्ढरांना वीषबाधा करण्यात आली...त्यात छप्पन्न मेंढरांचा जीव गेला. या दुष्टाव्याबाबत आजतागायत कसलाही गुन्हा नोंदवून घेतला गेलेला नाही. कुरणे कमी होत असल्याने व त्यात आता नवीन भुमीग्रहण कायदा केंद्र सरकार आणत असल्यामुळे असे प्रकार वाढत जाणार व अकारण तेढीही. एक नवा सामाजिक संघर्ष उभा राहण्याचा धोका या निमित्ताने होवू शकतो. त्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत चरावु कुरणांची पुरेशी उपलब्धता कशी होइल यावर वनखात्याशी चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे.
पण असे करत असतांनाच मेंढपाळ समाजालाही आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. हजारो वर्ष चालत आलेली भटकी मेंढपाळी आधुनिक युगात उपयोगाची नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे बंदिस्त मेंढीपालन. आंध्र-कर्नाटकात असे अपुरे असले तरी अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र धनगर समाज आधुनिकीकरणापासून दुरच राहिला आहे. किंबहुना त्यांचे नीट प्रबोधन झालेलेच नाही. किंबहुना ते केले पाहिजे याचे भान धनगर समाज नेत्यांना राहिलेले नाही. प्रत्येक मेंढपाळ जर बंदिस्त मेंढीपालन करु लागला तर आज नवी आर्थिक क्रांती घडु शकते. म्हणजे आज जो एक मेंढपाळ दिड-दोनशे मेंढ्यांचे कळप पाळतो तोच पाचशे-हजार मेंढरांचे संवर्धन करु शकतो आणि मनुष्यबळ कमी लागत असल्याने मुलांना शिक्षणाकडे वळता येईल. आज लहान मुला-मुलींनाही पालकांबरोबर मदतीसाठी भटकावे लागते. त्यामुळे त्यांचे शिक्षण होण्याची शक्यता शुण्य. बंदिस्त मेंढीपालनामुळे ही वेळ येणार नाही व समाजात सुशिक्षितांचे प्रमाण वाढायला मदत होइल. बंदिस्त मेंढीपालन खर्चिक नाही. त्यासाठी नज़बार्डच्या अनेक स्वस्त दरातील कर्जयोजना आहेत. अनुदानेही आहेत. दुर्दैवाने त्यांचा फायदा घेण्यात हा समाज पुर्ण मागे राहिलेला आहे. चारा-पाण्याचा बंदोबस्त गवळी बंधव करतात तसाच करता येवू शकतो हेही लक्षात घ्यायची गरज आहे. यामुळे धनगर समाज स्वत: भांडवलदार तर बनु शकतोच, पण विक्रय व्यवस्थाही दलालांमार्फत न करता स्वतंत्रपणे उभारु शकतो. थोडक्यात त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमानावर वाढवू शकतो. यासाठी महादेव जानकर, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगेंसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर या अर्थक्रांतीची सुरुवात तरी होवू शकते. कारण मांस-लोकरीची गरज वाढतच जाणार आहे व जोवर मनुष्यप्राणि भुतलावर आहे तोवर हा उद्योग सुरुच राहनार आहे...पण आज धनगरांनी पुढाकार घेतला नाही तर हा उद्योग अन्य भांडवलदारांच्या हाती जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
सामाजिक समस्या
धनगर समाज आज्मितीला बावीस पोटजातींत वाटला गेलेला आहे. या पोटजातींत अजुनही नीट स्मन्वयही नाही. आजची तरुण शिक्षित पिढी "धनगर सारा एक" असा नारा देत असली व त्या दिशेने प्रयत्न होत असले तरी ते पुरेशे नाहीत. प्रत्येक पोटजातीची स्वतंत्र संघटना आहे. वधुवर मेळाव्यांपलिकडे त्यांची मजल जात नाही. इतिहासाचे नीट आकलन नसल्याने कोणी धनगरांचे मुळ राजपुतांत शोधतो तर कोणी क्षत्रियत्वात. या भ्रमांतुन बाहेर येवून आपले पुरातन मुळ पाहण्याची अद्याप सुरुवात नाही. पोटजातींतही कोण उच्च-कोण खालचे असे विवाद आहेतच. ऐतिहासिक दृष्ट्या खरे तर हे उतरंडीचे धोरण अत्यंत आक्षेपार्ह आहे. कदाचित त्यामुळेच हा समाज आपले सामाजिक अस्तित्व हरपत चालला आहे असे दिसते. उदा. धनगर समाज हा निमभटका समाज आहे. धनगर समाजाला प्रदेशनिहाय भाषाभेदामुळे विविध नांवे आहेत. उदा. उत्तरेत धनगर समाज धनगड, पाल, गडरिया आदि नांवांनी ओळखला जातो तर दक्षीणे कुरुब, दनगार, इ. नांवांनी ओळखला जातो. व्यवसाय मात्र एकच. तरीही त्यांना त्या-त्या राज्य सरकारांनी वेगवेगळ्या गटअंत आरक्षण दिले आहे. मानव वंशशास्त्र द्रुष्टीने हा सर्वच समाज अनुसुचित जमातींत येतो हे सर्वमान्य असतांनाही महाराष्ट्र शासनाने धनगरांची भटक्या जमातीत केलेली आहे. हा समाज पुर्णवेळ भटका नाही हे सामाजिक सत्य डावलले आहे. धनगर समाज आपली मागणी मांडत असला तरी त्यासाठी नेमलेला आगरवाल आयोग अद्याप कोणत्याही निष्कर्षाला पोहोचलेला नाही. याबाबत आजतागायत महाराष्ट्र सरकारने धनगरांची घोर फसवणुकच केलेली आहे. पण पुरेसा रेटा नसल्याने काही होईल अशी आशा बाळगता येत नाही. रेनके आयोगाला जे सरकार गुंडाळुन ठेवते ते सरकार समजा अजुन चार-पाच वर्षांनी आगरवाल आयोगचा अहवाल आला तरी काहीएक कार्यवाही करेल या भ्रमात राहने गैर आहे. असो.
एक गौरवशाली इतिहास असलेला, महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असलेल्या या समाजाची दैना सर्वच समाजांनी समजावून घ्यावी व या मुक समाजाला बोलते होण्यासाठी प्रेरणा द्यावी ही अपेक्षा.
(समाप्त)
संजय सोनवणी
९८६०९९१२०५
जनकोजी शिंदे
दत्ताजी शिंदेचा बुराडी घाटावर मृत्यू झाला याच्या पेशवे दरबारीही तीव्र प्रतिक्रिया उमटली . तरीही १४ मार्चपर्यंत अब्दालीला रोखण्या...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...