भाषा ही मानवी संस्कृतीच्या विकासाची आद्य
खूण आहे. भाषांच्या जन्माबाबत प्रत्येक भाषकाची स्वत:ची पुराणकथात्मक सिद्धांतने
अथवा (गैर) समज आहेत. तरीही मुळात मानवालाच भाषा अवगत आहेत का आणि त्या कशा
जन्माला आल्या याबाबत जागतिक भाषातज्ज्ञ आजही संभ्रमात आहेत. भाषा
ही संप्रेषणाचे एक मध्यम आहे. केवळ मानवालाच भाषेद्वारे विचारांचे, भावनांचे
संप्रेषण करता येते असा समज हीच एक अंधश्रद्धा आहे. प्राण्यांची भाषा आपल्याला समजत
नाही म्हणून त्यांना भाषाच अवगत नाहीत असे मानता येत नाही; हे मी माझ्या ‘भाषांचा
उगम’ या पुस्तकात सिद्ध करून दाखवले आहे.
भाषांचा उद्गम ईश्वरापासून आहे, अशी प्राचीन
काळी मान्यता होती. बहुतेक धर्मग्रंथांनी भाषेचे महत्त्व व त्या भाषेतून
धर्मग्रंथांत मांडलेले जीवनावश्यक तत्त्वज्ञान ओळखून त्यावेळच्या
ज्ञानाच्या मर्यादेमुळे भाषेच्या अद्भुत शक्तीला ‘ईश्वराची निर्मिती’ असा समज असल्यास नवल नाही.
असे असले तरी जगात मग एवढ्या संख्येने भाषा का, हाही प्रश्न निर्माण झाला आणि
माणसाने उत्तर शोधले तेही तत्कालीन धर्मकल्पनांतून. उदा. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अॅडम व इव्हने केले व नोहाच्या
नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर ‘टॉवर ऑफ बॅबेल’ येथे नौकेतून
उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती, असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे
लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही.
त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले, परिणामी त्यानंतरच माणसाने
पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मूळच्याच कोणा एका भाषेला जगभर
विविध रूपांत नेले असा हा बायबलचा दावा. ऋग्वेदाचा दावा आहे की, ’वाक्’ नामक देवता भाषेची (वाणीची) निर्माती आहे आणि तिच्या साहचर्याने ऋषींना
मंत्र स्फुरतात आणि ते ब्राह्मण (म्हणजे
मंत्रकर्ते) बनतात (ऋ. १०.१२५).
यामुळे वाक् या देवतेला अत्यंत गूढ, रहस्यमय व अद्भुत शक्ती मानले गेले. तिच्या अस्तित्वामुळे श्रवण, दृश्य, समज आणि भाषिक अभिव्यक्ती होत
त्यांचे सत्य स्वरूप समजते अशीही कल्पना वैदिकांनी केली होती. थोडक्यात भाषांची निर्मिती दैवी आहे हा समज
मध्ययुगापर्यंत प्रचलित होता.
भाषांविषयीची शास्त्रीय चर्चा सुरु झाली ती
प्रबोधन काळात. भाषांचा उदय कसा
झाला असावा व त्यांच्या आजपर्यंतच्या प्रगतीचे टप्पे कोणते असावेत याबाबत सतराव्या
शतकापासूनच तत्त्वज्ञांपासून तर भाषाकोविदांपर्यंतचे जाणकार चर्चा करु लागले होते.
त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढू लागल्यानंतर १८६६ मध्ये ‘लिंग्विस्टिक सोसायटी
ओफ पॅरिस’ने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. आजही हिंदीच्या रूपाने
भाषांचा विवाद टोकाला जातांना आपण पाहतो. हिंदी लादणे म्हणजे उत्तर भारतीय
संस्कृती दक्षिण भारतावर लादण्याचा प्रयत्न आहे; ही वस्तुस्थिती आहे, कारण हा
उपद्व्याप नवा नाही. त्याच वेळेस ‘संस्कृत भाषाच आधीची असून ती देववाणी असल्याने तिच्यापासून
सर्व भाषा निर्माण झाल्या’ असे अशास्त्रीय मतही हिरिरीने प्रचारित केले जाते, तेही आर्य अथवा वैदिक
वर्चस्ववादाच्या भावनेपोटीच. थोडक्यात भाषांचे कुतूहल मुळात वर्चस्ववादी भावनांतूनच
जन्माला आले आहे आणि त्यामुळेच भाषांचा प्रश्न सहजी सुटेल असे दिसत नाही.
भाषांबाबत
एवढ्या अंधश्रद्धा आहेत की, त्या अन्य कोणत्याही अंधश्रद्धेपेक्षाही भयंकर आहेत हे
सहसा आमच्या लक्षात येत नाही. आधुनिक भाषातज्ज्ञही या अंधश्रद्धा नुसत्या जोपासत
नाहीत तर त्यांना खतपाणी घालण्याकडेच अधिक लक्ष देतात. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने
त्रिभाषिक सूत्र लादून मुलांना पहिलीपासून तीन भाषा शिकवायचे धोरण आणले व त्यात
हिंदी भाषेचा समावेश केला होता. मुले लहान वयातच अधिक भाषा शिकू शकतात हे गृहीतकच
अद्याप सिद्ध
झालेले नाही. तरीही त्याआधारे त्रिभाषा सूत्राचे समर्थन करण्यात
विशिष्ट वर्ग दंग झाला आहे. पण हे ‘क्रिटिकल पिरियड हायपोथेसिस’ हे केवळ भाषाच
नव्हे तर अन्य क्षेत्रातही लागू पडते आणि भाषा हे त्यातील केवळ एक साधन आहे हे
सोयीस्कररीत्या विसरले जाते. मुले अनेक भाषा शिकू शकतात तर मग हिंदी, इंग्रजीच का?
तेलुगु, तमिळ, चीनी, पोर्तुगीज भाषा का नको? तीनच भाषा का? मग पाच किंवा दहा भाषा का नको हा
प्रश्न कोणी धडपणे विचारला नाही आणि त्याचे उत्तरही असू शकत नाही.
बालवयात अनेक भाषा शिकण्याचे समर्थन करणारे
हेच लोक याच सिद्धांताला खोडून काढणाऱ्या आणि जगाने पारखून घेतलेल्या सिद्धांताकडे
मात्र दुर्लक्ष करतात. हा सिद्धांत सांगतो की, मुलांच्या आकलन, अभिव्यक्ती आणि
तुलनात्मक विचारबुद्धीच्या विकासासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिकविणे हे अत्यंत आवश्यक
आहे. मुले मातृभाषा लहानपणापासून ऐकतात आणि बोलतात, त्यामुळे
ती त्यांच्या मेंदूसाठी सर्वात परिचित आणि नैसर्गिक माध्यम असते. मातृभाषेत शिक्षण
घेतल्याने मुलांना संकल्पना समजणे, विचार करणे आणि
व्यक्त करणे सोपे जाते. उदा., UNESCO,
2003; Cummins, 2000 मधील संशोधन दर्शवते की मातृभाषेत शिक्षण घेतल्याने मुलांचा
संज्ञानात्मक विकास (Cognitive Development) जलद आणि प्रभावी होतो; कारण त्यांना नवीन संकल्पना शिकण्यासाठी
(अन्य भाषेतून शिक्षण घेतांना होतो तसा) भाषेच्या अडथळ्याचा सामना करावा लागत
नाही. शिवाय जेव्हा मुले मातृभाषेत शिकतात,
तेव्हा
त्यांना विषय समजण्यासाठी कमी वेळ लागतो आणि ते अधिक आत्मविश्वासाने शिकतात.
यामुळे त्यांचे शैक्षणिक यश सुधारते. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासात (Heugh, 2006) असे दिसून आले की, मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या
मुलांनी गणित आणि विज्ञान विषयांत परदेशी भाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षा अधिक
चांगली कामगिरी केली.
हे येथेच मर्यादित राहत नाही. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांना
त्यांच्या संस्कृतीशी आणि भाषिक वारशाशी जोडलेले राहता येते. यामुळे त्यांचा
आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळख कायम
ठेवण्यास मदत होते. तसेच स्थानिक भाषा आणि संस्कृतींचे जतन होते जे जागतिकीकरणाच्या
युगात विशेष महत्त्वाचे आहे.
कोणत्याही विद्यार्थ्याच्या मातृभाषेतून बोलणे,
वाचणे, लिहिणे अशा क्षमतांचा पाया पक्का असेल तर त्याची दुसरी भाषा शिकण्याची
क्षमता सहजतेने वाढते. मातृभाषेचा असा मजबूत पाया तयार झाल्यास मुले दुसऱ्या भाषा
(जसे इंग्रजी, हिंदी) अधिक सहजतेने
आणि प्रभावीपणे शिकू शकतात. याला ‘भाषिक परस्परावलंबन’ असे म्हणतात (Cummins, 1979). मातृभाषेवरील चांगले प्रभुत्व दुसऱ्या
भाषेवरही प्रभुत्व मिळवण्यास साहाय्यक ठरू शकते. आता या सिद्ध झालेल्या तत्त्वाचा
- सिद्धांताचा अवलंब करण्याऐवजी केवळ भाषिक व सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करण्याच्या
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला कसे स्वीकारता येईल? म्हणजेच पहिलीपासून तीन
भाषा शिकणे सक्तीचे करणे, हा निर्णय अशास्त्रीय आहे. अशाप्रकारे पहिलीपासून तीन
भाषा शिकवणे हे मुलांचे बौद्धिक अध:पतन घडवण्यास कारण ठरणार आहे.
मुळात कोणतीही भाषा ही त्या त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या
सामूहिक मानसशास्त्राची उपज असते. त्यामुळे भाषेचेही एक पर्यावरण आपसूक तयार होते.
भाषा देव बनवत नसतात तर आपला भूगोल बनवत असतो. जेथील प्रदेशाची भूशास्त्रीय
वैशिष्ट्ये वेगळी तेथील भाषा वेगळी. म्हणूनच जगात आजमितीला ६८०९ भाषा आहेत. दुसऱ्या प्रदेशातील भाषिक पर्यावरणच वेगळे असल्याने त्या
भाषा येथील भाषिक पर्यावरणात उपऱ्या ठरतात. त्या भाषेतील शब्द स्वीकारले तरी त्यात
स्वानुकुल उच्चार व व्याकरणीय बदल करून घेतले जातात, कारण प्रत्येक भाषेची भाषिक
प्रवृत्ती वेगळी असते.
जगातील एखादी भाषा श्रेष्ठ आहे
असे म्हणता येईल अशीही स्थिती नाही. सर्वच भाषा बरोबरीच्या आहेत. इंग्रजी
ज्ञानभाषा झाली, कारण तिने जगभरचे वाङ्मय आपल्या भाषेत आणले. त्याला त्यांचे
अर्ध्या जगावरील राज्यही कारणीभूत होते. पण असे असले तरी, खुद्द इंग्रजीतही अनेक
भाषाभेद झाले. आफ्रिकन, अमेरिकन, इंडियन, लॅटिन अमेरिकन, व्हल्गर असे इंग्रजीचेच
अनेक उपप्रकार पडले, ते त्या त्या भागातील भूशास्त्रीय वेगळेपणात इंग्रजी भाषा
लोकांनी आपल्या सामूहिक मानसशास्त्राने घडवली. हे सामूहिक मानसशास्त्र कोणाचीही
पाठ सोडत नाही. भाषिक पर्यावरण आणि भाषिक मानसशास्त्र हे निसर्गत: आपल्याशी जोडले
गेलेले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातही समान भूशास्त्रीय स्थितीत जेथे किरकोळ बदल
आहेत तेथे तेथे प्रदेशनिहाय बोलीभाषा निर्माण झालेल्या आहेत. पण एकूणातील मराठीची
प्रवृत्ती एकच आहे.
अन्य भाषांतील ज्ञान स्वभाषेत
आणायला आम्हाला कोणी रोखले आहे? पण भाषिक गुलामीची सवय लागलेले वा ती लादू पाहणारे
हा विचार करीत नाहीत, हेही दुर्दैवी आहे. मराठीलाच ज्ञानभाषा करण्यासाठी सरकारने
असे काही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. पण वर्चस्ववादी समुदायांना भाषिक
अंधश्रद्धा निर्माण करणे सोयीचे जात असते. पूर्वीचे आणि सध्याचे हिंदुत्ववादी
(वैदिकवादी) सरकार आधी संस्कृतलाच राष्ट्रभाषा करायला पुढे सरसावले होते. कारण ती
म्हणे सर्वात प्राचीन भाषा आणि तिच्यातूनच अन्य भाषा जन्माला आल्या. हा भाषिक
दहशतवाद भारतीयांचा आत्मसन्मान हिरावून घेण्यास कारण झाला आहे.
खरे तर संस्कृत ही नैसर्गिक भाषा
नाही. प्राचीन तर नाहीच नाही. त्यामुळेच या भाषेला कोणतेही प्रादेशिक संदर्भ नाहीत
जसे अन्य नैसर्गिक भाषांना आहेत. जसे गुजराती, तेलुगु किंवा मराठी अशा भाषांना त्या
त्या भाषेच्या भूगोलातून नाव आलेले आहे तसे संस्कृत (आणि हिंदी) भाषेचे नाही. संस्कृत
आणि हिंदी या भाषांना ना प्रदेशनामाचा संदर्भ आहे, ना कोणत्या समूहनामाचा. या भाषा
अन्य भाषांतून उसनवारी करून निर्माण केल्या गेलेल्या कृत्रिम आणि अगदी अर्वाचीन
भाषा आहेत. हिंदी भाषा अठराव्या शतकात मुख्यत: खडी बोली, ब्रज, भोजपुरी वगैरे
भाषांतील शब्द आणि संस्कृतचे व्याकरण घेऊन सिद्ध झाली. भाजप सरकारला संस्कृत आणि
हिंदीचे एवढे आकर्षण का? की त्यांना मुळात कृत्रिमतेचा सोस आहे म्हणून असे
अशास्त्रीय निर्णय लादण्याचे प्रयत्न होतात?
मुळात शिक्षण या संकल्पनेचा उपयोग सांस्कृतिक वर्चस्वाच्या
कारणांसाठी केला जातो आणि त्यासाठी भाषा हे तर फारच सोयीचे साधन ठरते. जगभर असेच
होत आलेले आहे. आर्यभाषा गट सिद्धांतही एकोणविसाव्या शतकात आणला गेला तो युरोपियन
लोकांचे भाषिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, हे आज सारे जाणतात. त्याचाच आधार घेत
येथील स्वत:ला ‘आर्य’ समजणाऱ्या वैदिक लोकांनी संस्कृत हीच सर्व भाषांची जननी
असे मानायला सुरुवात केली. पण हे होत असतांना अवघे जग याच अंधश्रद्धेने लडबडलेले
होते, हा तर अगदी अलीकडचा इतिहास आहे.
खरे तर संवादाची
उपजत नैसर्गिक निकड, हेच तत्त्व मानवी भाषिक क्षमतेला विकसित करणारे कारण झाले. त्याला
जोड मिळाली ती एका नैसर्गिक वैशिष्ट्याची आणि ते म्हणजे
त्याला विविध व गुंतागुंतीचे आवाज काढता येतील असे स्वरयंत्र लाभलेले आहे. त्यामुळेच तो विविध ध्वनींना क्रम देत प्राथमिक
शब्द बनवू शकला. जसे त्याचे विश्व विस्तारत गेले तसे त्याचे बदलत्या स्थितीमुळे
भाषाविश्वही समृद्ध होत गेले. जेथे जीवन कमी गुंतागुंतीचे होते तेथील भाषांचा
विकास हा त्यांच्या गरजेपुरताच मर्यादित राहिला.
या निकडीची तीव्रता
जेवढी अधिक तेवढीच भाषेची विकसनशीलताही अधिक. याचाच अर्थ असा की, भाषा या
मानवजातीच्या निर्मितीकाळापासून जन्माला आलेल्या आहेत. इंडो-युरोपियन भाषागट
सिद्धांत सांगतो त्याप्रमाणे तो फक्त पाच-सहा हजार वर्ष जुना नाही. तसे मानणे हीच
फार मोठी भाषिक अंधश्रद्धा आहे. खरे तर साधारणपणे एकाच कोणत्यातरी आदिम काळात
वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दाला त्या प्रादेशिक
मानसिकतेच्या लोकांनी सामूहिक अर्थ दिला, जतन केला तेथेच भाषेचा जन्म झाला. भाषा ही सामूहिक
मानसाची निर्मिती आहे. त्यामुळेच एका भागात राहणाऱ्या लोकांना तेथील भाषा समजते,
संवाद करता येतो. अन्य भाषा प्रयत्नाने शिकाव्या लागतात कारण त्या
आपल्या भाषिक पर्यावरणाला साजेशा नसतात. पण स्वभाषेचे ज्ञान मात्र समान पर्यावरणामुळे
सहज प्राप्त होते, त्या सहज शिकल्या जातात आणि शब्द-व्याकरणही समृद्ध होत जाते.
प्रमुख जनसमूहांपासून अलग राहणाऱ्या लोकांची भाषा मात्र तेवढी विकसित होत नाही
कारण त्यांचे जीवनही तेवढे गुंतागुंतीचे नसते. कोणातरी एखाद्या मानवी गटाने
श्रेष्ठ भाषा निर्माण केली आणि ती इतरांवर लादली, ही मते आता कालबाह्य झाली आहेत.
या मतांमागे केवळ वर्चस्वतावादी भावना होत्या. भाषा या जागतिक सामूहिक मानसिकतेतून
व आपापल्या प्रादेशिक भूशास्त्रीय प्रभावातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेतून निर्माण
झाल्या आहेत. म्हणून जगात भाषांचे प्रमाणही मोठे आहे.
कोणत्याही भाषेचा
अभिमान असणे आणि भाषाश्रेष्ठत्वाचा अहंकार बाळगणे यात फार मोठा फरक आहे. भाषा हे
मानवी संस्कृतीचे संचित असल्याने त्याबद्दल अभिमान बाळगणे स्वाभाविक आहे. पण
भाषेचा अहंकार बाळगत अमुक एकच भाषा श्रेष्ठ मानणे आणि ती इतरांवर लादणे हे अमानवीय
आहे. भाषा हे संवादाचे, अभिव्यक्तीचे
मोलाचे साधन आहे आणि भाषेमुळेच आपण ‘माणूस’ ठरतो हे विसरता कामा नये. त्यामुळे
मातृभाषा हेच शिक्षणाचे मध्यम असले पाहिजे. परभाषा नंतर स्वत:च्या आवडीने शिकता
येऊ शकतात. उलट स्वत:ची भाषा पक्की असेल तर नवी भाषा शिकणे सोपे जाते.
म्हणूनच हिंदी,
संस्कृतच काय पण इंग्रजी भाषाही सहावीपासून शिकवली गेली पाहिजे. द्विभाषा किंवा
त्रिभाषा सूत्र आणण्यापेक्षा एक भाषा सूत्र आणि तेही ‘मातृभाषा सूत्र’ आणले गेले
पाहिजे. हीच आपली मागणी असली पाहिजे. भावी पिढ्या सशक्त बुद्धीच्या व्हायच्या
असतील तर भाषांबाबतच्या अंधश्रद्धेतून प्रथम बाहेर पडले पाहिजे.
-संजय सोनवणी