Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Saturday, November 12, 2022

ऐतिहासिक चित्रपट: इतिहासाची हत्या!


 

ऐतिहासिक व्यक्ती अथवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काढलेले चित्रपट आपल्याकडे वारंवार वादाचे कारण घडत असताना आपण पाहतो. अलीकडे ही परंपरा पद्मावती चित्रपटापासून सुरु झाली. “हर हर महादेव” वरून रणकंदन सुरु असून “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाच्या निमित्तानेही वाद उठला आहे. भविष्यात असेच वाद वारंवार उसळत राहतील असे दिसते आहे. अशा चित्रपटांमुळे इतिहासाचे विकृतीकरण होते, समाजात दुही निर्माण होते, इतिहासातून चुकीचा संदेश जातो असे आरोप होतात. असे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जाणार नाहीत, सिनेमागृहाचे पडदे फाडू असे इशारे दिले जात असतानाच काही संघटना सरळ चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करतानाही आपण पाहिले आहे. काही निर्माते जाणीवपूर्वक असे वाद निर्माण होतील असे पाहतात कारण यामुळे तरी तसे ‘पडेल’ या सदरात जाऊ शकणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला भरण्यात यशस्वी होईल अशी आशा त्यांना असते. निर्माते-दिग्दर्शक मात्र “सिनेम्यटीक लिबर्टी” अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य  हा बचावाचा मुद्दा उपस्थित करतात आणि या वादांवर पडदा टाकायचा प्रयत्न करत असतात. “चित्रपटात इतिहास शोधायचा नसतो तर एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे पाहत कलात्मक गुण-दोषांची चर्चा करायची असते, ऐतिहासिक तथ्यांची नाही” असे म्हणणारेही “तटस्थ” सदरात मोडू पाहणारे लोक असतात. राजकीय व सामाजिक संघटनांचे नेतेही राजकीय व सामाजिक लाभावर नजर ठेवून अशा वादात उडी घेत असतात. एकंदरीत समाज ढवळून निघतो. समाजमाध्यमांवर तर अशा चर्चांना उधाण येते.

आपण आपल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीच्या एकंदरीत इतिहासाकडे पाहिले तर पूर्वी असे वाद फार क्वचित होत असे दिसते. म्हणजे तेही चित्रपट इतिहासाशी इमान ठेवून बनलेले असत असे नाही. याचा अर्थ तेंव्हाचे लोक जास्त समजूतदार होते असा घ्यायचा काय? तर तसेही नाही. पण त्या वेळेस निर्माते/दिग्दर्शक “वाद निर्माण करणे” या तत्वापासून फटकून राहत. असेल त्या बजेटमध्ये आपल्याला भावलेली ऐतिहासिक कथा सांगायची आहे एवढाच काय तो दृष्टीकोन असायचा. “मोगले आझम” हा काही इतिहासाशी प्रामाणिक चित्रपट नव्हे तर एका दंतकथेवर बेतलेला. पण त्याने कलात्मकतेची परिमाणे ओलांडली. आजही हा चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. या चित्रपटाबाबत ऐतिहासिकतेच्या अंगाने कसलाही वाद झाल्याचे कानावर नाही. याउलट “पद्मावत”” चे. हीसुद्धा इतिहासातील एक दंतकथा. पण तिने मात्र शुटिंग सुरु झाल्यापासून वादळ उठवले, ते हिंसकतेकडेही झुकले होते. आता हा चित्रपट अनेकांपैकी एक या सदराखाली गेला आहे.

अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वीर सेनानी नायक बनवत चित्रपट काढण्याची एक लाट आली आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या सहका-यांबद्दल लोकांच्या मनात एक पूज्य भाव आहे. किंबहुना शिवशाहीबद्दल लोकांच्या मनात एक उदात्त प्रतिमा आहे. त्यामुळे शिवशाहीवर चित्रपट निर्माण करायची लाट आली आहे असे म्हटले जात असले तरी असे सारेच चित्रपट यशस्वी झालेत असेही चित्र नाही. अनेक असे चित्रपट अत्यंत बटबटीत, कलाशून्य आणि ऐतिहासिक सत्यांची व तथ्यांची धूळधान उडवणारे आहेत.

इतिहासाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात हे मान्य केलेच पाहिजे. कलाकृती निर्माण करताना इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा कल्पनाशक्तीने व तर्कबुद्धीने भरून काढाव्या लागतात हेही खरे. त्यासाठी काही काल्पनिक पात्रेही निर्माण करावी लागतात. दंतकथा-मिथकांचाही खुबीने उपयोग करून घ्यावा लागतो. पण त्यात एक आंतरिक सुसंगती लागते. ती नसेल तर ऐतिहासिक चित्रपट फसणार हे उघड आहे. कारण चित्रपट म्हणजे डॉक्यूमेंटरीही नव्हे कि मनमानी करत इतिहासाचे विकृत चित्रणही नव्हे. सिनेम्यटीक लिबर्टी चित्रपटाचा विषय/आशय खुलवण्यासाठी, तिला एक कलात्मक उंचीवर पोहोचावण्यासाठी वापरावी अशी अपेक्षा असते. पण तसे होते असे नाही. किंबहुना त्यासाठी जो कलात्मक आणि इतिहासाबद्दलचा कोणता तरी पण प्रगल्भ दृष्टीकोन हवा तोच नसेल तर काय होते हे आपण आजकालच्या ऐतिहासिक चित्रपटातून पाहू शकतो. आपल्या निर्मात्यांचे व दिग्दर्शकांचे कल्पना दारिद्र्य हे पटकथा, संवाद, अभिनय ते कपडेपटापर्यंत सर्रास दिसून येते. लोकेशन्सचेही तेच. मग दिग्दर्शन काय योग्यतेचे असणार याची कल्पना आपण करू शकतो. मुळ लेखनातच एवढ्या ढोबळ चुका ठेवल्या जातात की हे लोक कोणा इतिहासाच्या त्या काळावरील अभ्यासू व्यक्तीचा किमान सल्ला तरी घेतात कि नाही हा प्रश्न पडावा. प्रत्येक काळातील समाजातील विविध घटकांतील लोकांची वेशभूषा साधारणपणे कोणत्या प्रकारची होती किंवा असू शकेल यावरही विचार केला जात नाही. तेच संवादाच्या भाषेचे. टपोरी भाषा वापरली तर “डायलॉग जबरी होतो.” अशा सडकछाप वृत्तीतून लेखक बाहेर आलेले नाहीत. ऐतिहासिक काळ असेल तर त्या काळाची छाया असलेली भाषा वापरायला हवी एवढे भानही संवाद लेखकांना नसते. उदयभानू या राजपूत पण मोगली सरदाराची वेशभूषा फसते आणि टीकेचे कारण होते ती त्यामुळेच. “वेडात दौडले वीर मराठे सात” च्या पोस्टरमधील एक पात्र त्याची वेशभूषा आणि स्त्रैण देहबोलीवरून आताच चर्चेत आले आहे. मराठे किंवा मावळे “असे” होते काय? हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामागे जात्युभिमान आहे हेही उघड आहे. पण या आरोपाला विरोध करणारे “हा जेंडर बायस” आहे असा प्रतिवाद करीत आहेत. पण नेमका इतिहास किंवा त्याशी निगडीत दंतकथा काय आहे आणि उपलब्ध पुराव्यांनुसार हे पात्र त्याशी सुसंगत आहे कि नाही या दृष्टीकोनातून मात्र चर्चाच नाही.

शिवाजी महाराजांवर अलीकडे चित्रपट बनवण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मार्फत हिंदुत्ववादाचे वहन करता येणे सोपे जाते असाही एक आरोप आहे आणि त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. कला जेंव्हा सत्ताशरण बनते अथवा एखाद्या विचारसरणीची प्रचारक होते तेंव्हा ती कला राहतच नाही. कलेचा तेथेच मृत्यू होतो. खरे तर मालिका-नाटक-चित्रपट म्हणजे इतिहास नसतो तर इतिहासातील काही घटनांचे अथवा व्यक्तींचे रंजनात्मक कलात्मक दर्शन असे त्याचे स्वरूप असते. पण तोच खरा इतिहास आहे अशी समजूत असलेल्या आपल्या देशात निर्माते-दिग्दर्शकांची जबाबदारी मोठी आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना इतिहासातील जीवनदर्शन घडवत त्यांचा दृष्टीकोन व्यापक करणे हा अदृश्य हेतू असला पाहिजे. पण आता तसे होताना दिसत नाही. त्याला हिंदू-मुस्लीम व जातीय परिमाणे हेतुत: चिकटवून इतिहासाचा विचका करण्याच्या उदात्त हेतूने ही मंडळी कार्यरत आहेत कि काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. कारण या चित्रपटांनी समाजात जातीय-धार्मिक विभाजनीच्या रेषा रुंद करण्यात हातभार लावला आहे हे तर स्पष्ट दिसते आहे. आणि हा काही केल्या कलेचा हेतू असू शकत नाही.

वाद निर्माण केल्याने चित्रपट चालेल या भ्रमातून आधी बाहेर यायला पाहिजे. तसे होत नाही हाही एक इतिहासच आहे. इतिहास हा एक नाजूक विषय आहे आणि त्याला तशाच कलात्मक कौशल्याने हाताळले पाहिजे. मुळात आपला  अकाडमिक इतिहासच अजून अपूर्ण आहे. इतिहासातील अनेक अनुत्तरीत प्रश्न संशोधकांची वाट पाहत आहेत. इतिहास संशोधन हा काही कलाकारांचा उद्देश नसतो पण आहे त्या इतिहासाशी तरी दुर्हेतुने अवास्तव छेडछाड वा विपर्यास न करता योग्य तेथे अवश्य सिनेम्यटीक लिबर्टी घेतली पाहिजे ती कलाकृतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी, डागाळण्यासाठी नव्हे याचे भान ठेवले पाहिजे.

-संजय सोनवणी

 

 

Thursday, December 5, 2019

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
०५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.

आम्हाला विजयाचीच चिकित्सा नीट करता येत नाही तर पराजयाची काय करणार? पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही तर तो विजयच होता. कारण पानिपत नंतर अहमदशाह अब्दालीने पुन्हा हिंदुस्तानावर आक्रमण करायची हिंमत केली नाही, असं काही विद्वान हिरीरीने सांगत असतात. पण ते वास्तव नाही हे समजायला पाहिजे.
अब्दालीने भारतावर एकंदरीत सात स्वाऱ्या केल्या. अब्दालीचं पहिलं आक्रमण १७४८ मधे झालं. पानिपतचं युद्ध त्याच्या पाचव्या आक्रमणाच्या वेळीस झालं. लागोपाठ त्याचं सहावं आक्रमण १७६२-६३ या काळात पंजाबवर झालं तर १७६४-१७६७ या काळात सरहिंदेलगतच्या सियालकोटवर सातवं आक्रमण झालं.
पंजाब आमच्या हिंदुस्तान या संज्ञेत कदाचित बसत नसेल. पण अब्दालीने मराठ्यांची दहशत घेतली आणि पुन्हा हिंदुस्तानाकडे वक्रदृष्टी करायची त्याने हिंमत केली नाही हे विधान केल्यावर जातीची माती खाऊन छाती फुगवायची सोय लागत असेलही. पण ते वास्तव नाही.

विनाशक युद्धाचं गौरवीकरण

आता पानिपतवर सिनेमा येऊ घातलाय. हा सिनेमा या विनाशक युद्धाचं गौरवीकरण करणारा आहेच. पण त्याहीपुढे जाऊन असं म्हणावं लागेल की युद्धाचा सेनापती भाऊसाहेब पेशवा आणि त्याची पत्नी पार्वतीबाई यांचं उदात्तीकरण करणारा असावा. शिवाय या युद्धातले अन्य मराठी सेनानी दुय्यम होते, असं दाखवणारा असावा, असंही सिनेमाच्या ट्रेलरवरुन लक्षात येतं.
ट्रेलरमधे दाखवलीय तशी पार्वतीबाई पानिपत युद्धात लढलेली दाखवली असेल, तर ते इतिहासाला धरून नाही. तरीही हा सिनेमातला मनोरंजनाचा भाग म्हणून सोडून दिलं तरी पानिपत युद्धातून पळ काढणाऱ्या महिलांत पार्वतीबाई सर्वात पुढे होती. तिची वाटेत भेट झाल्यावर मल्हारराव होळकरांनी तिला चंबळेपार सुरक्षित पोचवलं, हा इतिहास आहे.
रणमर्दानी म्हणून ट्रेलरमधे दर्शन देणाऱ्या पार्वतीबाईने पानिपतावर प्रत्यक्षात काय केलं, हा इतिहास उपलब्ध नाही. पानिपतच्या रणधुमाळीत पार्वतीबाईंचा रोल एवढाच होता की पती युद्धात पडला हे समजताच तिथून बाहेर पडणं. आणि तो तिने यशस्वीपणे पार पाडला.
बचेंगे तो और भी लडेंगे
पराजय झाला की त्याचं खापर कुणा ना कुणावर फोडणं हे ओघाने आलंच. असे बळीचे बकरे इतिहासात अनेक झालेत. दत्ताजी शिंदेंचा मृत्यू बुराडी घाटावर झाला. तो शुक्रतालावर अकारण अडकून पडला याबाबत त्याच्या पराक्रमाचे आणि `बचेंगे तो और भी लडेंगे` या वीरश्रीयुक्त विधानाचे कौतूक करत असतांनाही त्याला सरदेसाईंसारखे इतिहासकारही दोष देतात.
पण मुळात यमुनेवर नावांचा पूल बांधून शुजाउद्दौलावर स्वारी करुन पैका वसूल करुन आपल्या कर्जाचे निवारण करावे अशी पत्रे दत्ताजी शिंदेंना वारंवार लिहिणारा, कधी आपल्याही कथनात विसंगती करणारा नानासाहेब पेशवा कसा आपल्या इतिहासकारांच्या चिकित्सेत येत नाही? बरे हा पूल बांधायचा तर कोणाच्या मदतीने? तर ज्याला सारे इतिहासकार आणि त्यामुळे जनसामान्यही शिव्या घालतात त्या नजीबखानाच्या मदतीने.
एकीकडे नजीबाला जिवंत सोडला म्हणून मल्हाररावालाही दोष द्यायचा आणि आपणच दत्ताजीला त्याच खली नजीबाची मदत घेऊन नदी ओलांडायला पूल बाधून घ्यायचा सल्ला देणारा नानासाहेब पेशवा मात्र चिकित्सेच्या पार राहतो.

सेनापती तलवारबहाद्दर होता की पत्रबहाद्दर?

भाऊसाहेब पेशवेंना अब्दालीला हिंदुस्तानातून पार हाकलवून काढायचं होतं. असं म्हटलं जातं. पण युद्ध करायला निघणाऱ्या वीराच्या हालचाली वेगवान असतात. गेल्या चार वेळेस जसा अब्दाली परभारेच निघून गेला होता तसाच याही वेळेस जाईल या होऱ्याने भाऊने अत्यंत संथ वाटचाल केली. उत्तरेतल्या रजवाड्यांना आणि आपल्या कमावीसदारांना भरमसाठ पत्रं लिहिली. इतकी की हा सेनापती तलवारबहाद्दर होता की पत्रबहाद्दर असा प्रश्न पडावा.
नानासाहेब पेशव्यांनी पानिपतच्या स्वारीवर असणाऱ्या सदाशिवराव भाऊंना पत्र पाठवून चांगल्यापैकी दिसणाऱ्या कंचनी म्हणजे नर्तिका पाठवण्याची पत्रंही लिहिलेली आहेत. नानासाहेबांची विषयवासना भागवण्यासाठी अलौकिक जबाबदारी या सेनापतीवरच होती. बरं या सेनापतीला कोणताही तह अथवा लष्करी हालचाल करण्याचेही निर्णायक अधिकार नव्हते. भाऊ उत्तरेत गेल्यानंतरही त्याला ज्या हालचाली कराव्या लागल्या त्या परिस्थितीच्या रेट्याने. सेनापतीला विपरित स्थितीतही परिस्थिती निर्माण करण्याचं कौशल्य लागतं.
लढले पण शिस्त नव्हती
दखनेत निजामाशी पार न पाडला गेलेला तह करुन घेतला म्हणून कुणी सेनानी होत नाही. नुकतेच सेवेत सामील करून घेतलेल्या आणि ज्याला उत्तरेत लढण्याचा कसलाही अनुभव नाही अशा इब्राहिम खान गारद्यावर विसंबून राहणं, उत्तरेतले अनुभवी होळकर-शिंदेंना फाट्यावर मारणं, त्यांनी अब्दालीला परत पाठवण्यासाठी केलेल्या तहाला वाटाण्याच्या अक्षता लावणं हे काही सेनापतीपदाचं लक्षण नव्हतं.
किंबहुना पानिपत ही युद्धभूमी अपघाताने वाट्याला आणून घेऊन लाख-दीड लाख सैन्य आणि सेवेकऱ्यांचं जीवन धोक्यात घालणं हे तर सेनापतीपदाचं अवलक्षण होतं. पण तसं झालं. सर्वांची उपासमार एवढी झाली की त्यांनी शेवटी झाडांच्या सालीही खाल्ल्या असं म्हटलं जातं. पानिपतावरून पळ सुटला, असं वर्णन आहे. पण भाऊ पळूनच जायच्या आणि सुरक्षित ठिकाण गाठण्याच्या बेतात होता. म्हणूनच त्याने गारद्याचं ऐकून गोल केला आणि पहाटेच आक्रमणासाठी नाही तर पळ काढण्यासाठी वाटचाल सुरू केली.
युद्धाला तोंड फुटल्यानंतर व्यूहरचना बदलायला हवी तर तेही केलं नाही. हे खरंय की मराठे लढले. जीवावर उदार होऊन लढले. पण त्या लढ्यात शिस्त नव्हती. ती लावायला सक्षम सेनापतीही नव्हता. किंबहुना सेनापतीच गोंधळलेला होता. सेनापतीने भावनिक व्हायचं नसतं पण विश्वासरावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने ‘भाऊगर्दीत’ उडी घेऊन लढणाऱ्यांचं बळ घालवलं. अशाही स्थितीत मल्हाररावाने आपल्याच बाजुला असलेले जनकोजी शिंदे आणि स्वत:चा सरदार संताजी वाघला भाऊच्या मदतीला पाठवले.

युद्धकौशल्य न कळणारा सेनापती

पळ सुटला याला खरा जबाबदार कोण याचा उल्लेख होतो. पण त्या पापाचं खापर मात्र फोडलं जात नाही. कुंजपुऱ्याच्या युद्धात एक छोटा जय काय मिळाला, सेनापती आणि त्याचे स्वजातीय सरदार शेफारून गेले. हरवलेल्या सैन्यातील दीड-दोन हजार पठाण सैनिक सरदार विंचुरकरांनी चक्क आपल्या पदरी घेतले. ते वेगळे आहेत हे समजावं म्हणून एक भगवी पट्टी कपाळावर बांधायला सांगितलं. बस्स. जगात कोणत्याही सेनादलप्रमुखाने असं कृत्य केलेलं नाही. सेनापतीने करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे सेनापती महान होता, उदार-कनवाळू होता. सरदार विंचुरकरांना त्याने ती परवानगी देऊन टाकली.
परिणाम असा झाला की याच पठाण सैनिकांनी मराठ्यांची बाजू कमजोर पडतेय हे लक्षात येताच, कपाळावरील भगव्या पट्ट्या फेकल्या आणि ‘मरहट्टे हार गये’ असा ओरडा करत बुणग्यांकडे धाव घेतली, लुटालूट सुरू केली. घाबरून त्यांचा पळ माजला. गोलाच्या मागच्या बाजुला जे सैन्य होते जे युद्धात कामाला आलंच नाही, तेही मग पळत सुटले. पळातील पळ हा असा माजला. त्यानंतर पराजय निश्चितच होता.
मृत्यू झाला म्हणून उदात्तीकरण करणं चूक
भाऊसाहेब हा व्यक्ती म्हणून महान असेलही. पेशवा म्हणून नानासाहेबांचं मूल्यमापन काहीही असेल. पण राष्ट्रीय समस्येबाबत दोघंही गंभीर नव्हते हे केवळ त्यांचा या काळातला पत्रव्यवहार आणि कृती हे पाहिलं तरी लक्षात येतं. युद्धाच्या आदल्या रात्रीही भाऊ अब्दालीशी तहाचा प्रयत्न करत बसला. मग सर्वंकष युद्ध करण्याचा बेत होता हे विधान पूर्णतः असत्य ठरतं. युद्धातलं काहीएक न कळणाऱ्या माणसाला सेनापती बनवलं तर काय होतं याचं उदाहरण आपण आजच्या वर्तमानातही पाहतोय.
त्यामुळे देशावरचं संकट निवारण्यासाठी ही मोहीम होती हे विधान असत्य आहे. कारण अहदनामा १७५२ साली केल्यानंतर अब्दाली अनेकदा चालून आला तेव्हा मराठे तिकडे फिरकले नव्हते. कारण पेशव्यांची आज्ञाच नव्हती. अटकेपार झेंडे लावल्याबाबत तेव्हा सेनापती म्हणून रघुनाथराव पेशव्याचं कौतुक होत असेल तर पानिपत युद्धाच्या सेनापतीवरही तीच जबाबदारी विरोधार्थाने येते याचं भान मराठी जनतेला असलं पाहिजं.
युद्धात किंवा राजकीय झगड्यात कोणाचा मृत्यू झाला म्हणून त्याचं सर्व ठिकाणी उदात्तीकरण करता येत नाही. अफजलखानही मारलाच गेला होता. म्हणून ते त्याचं बलिदान होत नाही. खरं तर एवढ्या मोठ्या संहाराला जबाबदार झाल्याबद्दल एखाद्या सेनापतीला कसलाही दोष न देता अथवा चिकित्सा न करता केवळ त्याचं उदात्तीकरण केलं जात असेल तर आमच्या समाजाच्या बौद्धिक पातळीवरच संशय घ्यावा लागेल.
पानपताच्या भीषण प्रसंगी सर्व योद्ध्यांनी भाऊच्या आज्ञा पाळल्या. कारण तो युद्धाचा नियमच असतो. रियासतकार सरदेसाईही ही बाब मान्य करतात. यश लाभलं असतं तर तर भाऊचे गुणगाण गाण्यात कुणी थकलं नसतं. या युद्धात ज्या मराठी सैन्याला आघाडीवर ठेवलं होतं ते प्राणपणाने लढले. उपाशी पोटी लढले. त्यांच्या पराक्रमाला आदरांजली वाहत असता हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की या सैन्याला मरणाच्या खाईत ढकलणाऱ्या सेनापतीची आम्ही चिकित्सा कधी करणार?
आणि ते सोडाच. लढले कोण आणि कौतुक कुणाचं यावरही आम्ही विचार कधी करणार?

Thursday, May 5, 2016

सैराटलेले जातीय....

सैराटच्या निमित्ताने प्रदर्शनपुर्व जो काही गदारोळ झाला आणि नंतरही चालुच राहिला तो विस्मयकारक नव्हे तर चिंताजनक आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे जातीकारण, जातीद्वेष, व्य्क्तीपुजन ते व्यक्तीद्वेष हिरीरीने दाखवले जातील याची कोणी कल्पनाही केली नसेल. बरे एखाद्य ताकदीच्या, खरोखर समुळ हादरवणा-या कलात्मक चित्रपटाबद्दल असे झाले असते तर बाब वेगळी होती. पण हे घडले एका सामान्य चित्रपटामुळे हे मात्र विस्मयकारक व चिंताजनक आहे असे नमूद करणे भाग आहे.


काय आहे हा चित्रपट? खरे तर समीक्षा करण्यासाठी चित्रपटाने तुम्हाला भले-बुरे मुद्दे दिले पाहिजेत. त्यात एकसंघ आशय (भला वा बुरा) असला पाहिजे. आपल्याला नेमके काय सांगायचेय याचे भान कथाकार-पटकथाकार ते दिग्दर्शकालाही असले पाहिजे. आपल्या अभिनेत्यांच्या मार्फत दिग्दर्शक पटकथेला कलात्मक पद्धतीने पेश करत जात असतो. फ्यंड्रीमद्धे नागराज मंजुळे यांना ते चांगले जमले. गल्ला किती आणि किती नाही हा मुद्दा नाही. मुद्दा कलात्मकतेचा आणि मुल्यात्मकतेचा आहे.


सैराटची प्रदर्शनपुर्व हवा नकारात्मक झाली. हा चित्रपट मराठ्यांविरुद्ध आहे ही ती पहिली ओरड. अनेक विचारी पुरोगामी म्हणवणारे मराठेही "हे काय प्रेम करायचे वय असते का...आधी स्वत:ला जीवनात स्थिर-स्थावर करा" असे उपदेश देवू लागले तर नागराज मंजुळे, एक वडार समाजातून आलेला दिग्दर्शक मराठ्याच्या मुलीला खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पाडतो याचा अतीव राग येत काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून शेरेबाजी केली.  किंबहुना मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला. तोवर तर चित्रपट कोणी पाहिलाही नव्हता. प्रोमो आणि गाणी तेवढी माहित होती. नंतर चित्रपट रीलिज झाला. तुफान प्रतिसाद मिळाला कि बुकींग मिळणे अवघड व्हावे,. मराठी चित्रपटासाठी अशा वेळा दुर्मीळ, पण अभिमानास्पद.


मी चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट आवडला नाही. मी ते फेसबुकवरही लिहिले. त्यावरही वादळ झाले. मला पार जातीयवादी म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. असो. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण मला हा चित्रपट का आवडला नाही त्याची काही कारणे मात्र मी देतो.


१) या चित्रपटाचा मुख्य दोष ही त्याची अस्ताव्यस्त पटकथा आहे. त्यात कसलीही सुसुत्रता नाही. ८०% प्रसंग एकमेकांशी धागाच जोडत नाहीत. त्यामुळे सलग परिणामच येत नाही.


२) पात्रांचे व्यक्तीचित्रण करता आलेले नाही. खरे तर कोणतेही पात्र "व्यक्तिमत्व" म्हणून ठसत नाही. नायिका तेवढी बाजी मारते. पण बाजुची पात्रे ढिसाळ असली तर ठसठशीत पात्रेही कृत्रीम बाव्हले बनून जातात तसेच नायिकेचे झाले आहे.


३) हा चित्रपट जात वास्तवावर आहे हे कसे पसरले हे मला माहित नाही. नायिका पाटील आहे आणि नायक कोळी. म्हनून हा या दोन जातींतील किंवा उच्च जातीय विर्रुद्ध निम्नजातीय अस संघर्ष आहे काय? नाही. कारण तसा तो असता तर नायिका पटवण्यासाठी चिठ्ठीचपाटीपासून ते पार ती पोहोत असलेल्या विहिरीत बिनधास्त उडी ठोकणारा नायक, आपण जिच्यावर प्रेम करत आहोत ती वरच्या जातीची आहे असा विचार करत असल्याचे कोठेही दिसत नाही. त्याचे जीवलग मित्रही तसा विचार करत नाहीत. एवढेच काय कोलेजात तिचासाठी मारामारी होते, ती अवघ्या वर्गाच्या साक्षीने त्याच्याकडे एकटक पाहते तरीही वर्गात "जातीय" बोभाटा होत नाही. गांवात तर दुरच.


४) नायिका या चित्रपटात धाडसी आहे. पण अशा धाडसी नायिका चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. भावाचा वाढदिवस. ती नायकाला तेंव्हा किस देणार हे वचन देते. झींगाट गाणे होते. नंतर नायिका केळीच्या बनात एका कारमद्धे नायकाला दिलेले वचन पाळते. छतावरून हात धुवायला आलेल्या बापाच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येते. तो माणसे पाठवतो. हे रंगेहाथ पकदले जातात,. नायकाचा वाच ठेवणारा मित्र आणि नायक बेदम मार खातात. मामला नायकाच्या घरापर्यंत जातो. तेथेही नायक नायिकेच्या भावाचा मार खातो तसाच बापाचाही. येथेही नायकाने जातीमुळे मार खाल्ला असे नाही. कोणीही असता तरी मार खाल्लाच असता. कोणीही घराच्या आवारात पोरीशी चुम्माचाटी करतोय म्हटल्यावर मार दिलाच असता. हे वास्तव आहे. पण जातीमुळे नायकाने मार खाल्लाय काय? तर नाही.


५) शहरी पार्श्वभुमी न वापरता खेडेवजा शहराची पार्श्वभुमी असलेली ही एक सामान्य प्रेमकथा आहे. प्रेमाच्या त-हा वेगळ्या असल्या तरी त्या तद्दन फिल्मी आहेत. बरे, तसेही असायला हरकत नाही, पण प्रेम करावे तर आर्ची-परश्यासारखे असे वाटायला लावतील अशी भावनिक दृष्ये तरी आहेत काय? तर तेही नाही. प्रेक्षकाला उच्चजातीय मुलीबरोबर निम्न जातीय मुलगा प्रेम करतोय हे आधीच प्रदर्शनपुर्व ठसवले गेल्याने बाकी विचार करायच्या कोणी भानगडीतच पडत नाही. आणि मुळत त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेमही नीट ठसत नसल्याने उत्तरार्धातील संघर्ष टोकदार व परिणामकारक ठरत नाही. मुळात या चित्रओपटात नायक-नायिका प्रेमात पडतातच का? या प्रश्नाचे धड उत्तर नाही. तारुण्यावस्थेचा उंबरठा ओलांडणा-या मुला-मुलींचे प्रेम, जे बव्हंशी शारिरीक आकर्षणातून आलेले असते तसेच हे प्रेम आहे. त्यातही उत्कटता म्हणावी असे एकही दृष्य नाही. 


६) खरे तर आधी साहसी वाटणारा प्रेमवीर नायक नंतर दुय्यम्न बनतो. सगळे डेरिंग करते ती नायिका. अगदी पळून जायचे, पोलिस स्टेशनमद्धे बापाला आणि पोलिसांनाही आव्हान देण्याचे, प्रियकराला मारणा-या गुंडांवर पिस्तूल झाडण्याचे डेरिंग नायिकाच दाखवते. पण या प्रसंगांतही विश्वसनीयता नाही एवढे ते नाटकी आहेत. मुळात तिचा बाप जर एवढा समर्थ आहे, पाटील आणि राजकीय नेता आहे तर पोलिसांत "माझ्या मुलीवर बलात्कार केला---अपहरण केले" अशी तक्रार करत बसण्यात व इज्जतीच फालुदा करुन घेण्यात वेळ दवडण्याऐवजी त्याने, नंतरची मारहाण करत न बसता सरळ नायकाला "वर" पाठवले असते. चित्रपट संपेपर्यंत थांबायची गरज नव्हती. बरे या सर्व प्रसंगांतही नायक निम्न जातीचा आहे म्हणून हे सारे केले जातेय याचे सुचन तरी आहे काय? तर तेही नाही. म्हणजे असे दिसतेय कि चित्रपट पहातांना कोणत्या दृष्टीने पहायचा याची अप्रत्यक्ष जाहीरात तर केली गेली, लोक कोळी परश्या आणि पाटील अर्ची अशच पद्धतीने चित्रपट पाहतात....पण चित्रपट, जी एक कलाकृती असते, त्या कलाकृय्तीत या छुप्या पुर्वप्रसिद्धीत, प्रत्यक्षात काही आहे काय? नाही. म्हणजे एक तर दिग्दर्शक तरी घाबरलाय किंवा पटकथाकार तरी. सुचक पद्धतीनेही हे जातीय संदर्भ (जर चित्रपट जात वास्तवाबाबत असता तर) देता आले असते. पण मुळात हा चित्रपट जातीबाबत नाहीच आहे. पुर्वप्रसिद्धी आणि नंतच्या चर्चा मात्र जातीय आहेत.


७) प्रथमार्धापेक्षा उत्तरार्ध पुर्वार्धापेक्षा जरा बरा आहे. फिल्मीपणाने तोही भरला असला तरी विपरित स्थितीत पळून जाऊन लग्न करणा-याना जे काही अनुभव येतात ते येथे स्युडो-रिअलिस्टिक पद्धतीने येतात. पटकथा येथेही फसलेली आहे. खरे म्हणजे स्वप्नाळु जगाकडून भिषण वास्तवाकडे होणारा प्रवास व त्याशी सांध जुळवत जगण्याशी सांधलेली नाळ असा जो प्रवास आहे तो पटकथाच (व दिग्दर्शनही) फसल्यामुळे मुळात प्रत्ययकारी होतच नाही. नायक-नायिकेशी प्रेक्षक म्हणून रिलेट होताच येत नाही. चित्रपटातील अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनात काहे ना काही प्रमाणात होऊनच गेलेल्या असतात. तेवढ्या स्मरणरंजनापुरते काही प्रसंग कामी येत असले तरी चित्रपटात ते एकुणातील परिणाम साधत नाहीत. बरे त्यांना तुकड्यातुकड्याने सामोरे येणारे प्रत्ययकारी सत्य म्हनावे तर तेही नाही. उदा., चित्रपटात अचानक कोळी जातपंचायतीचा कसलाही संदर्भ नसणारे अचानक दृष्य येते ...तेही अनिर्णित...कसलेही वास्तव न मांडणारे, मागचा पुढचा संदर्भ न देणारे..आणि तेही अस्थानी. असायलाच हवे होते तर ते आधीच.


८) उत्तरार्धात बालीश बाबी अनेक आहेत. त्या ख-या जीवनातही घडू शकतात हेही आपण मान्य करू. झोपडपट्टीतुन चाळीकडे व चाळीकडून फ्ल्त्यटकडे होणारा प्रवास नायक नायिका करतात. त्यांना मुलही होते. मुल तिनेक वर्षाचे झाल्यावर नायिकेचा भाऊ व काही नातेवाईक तिला भेटायला येतात. येथुन पुढचा शेवटचा भाग जवळपास मूक अहे. एका सुरुवतेचा दुर्दैवी शेवट आहे.


पण खरेच "सुन्न" व्हायला होते का?


मला तरी झाले नाही. वृत्तपत्रातील ओनर किलिंगच्या बातम्या वाचून मी सुन्न झालेलो आहे. पण येथे दृश्य मनावर काहीच परिणाम करत नाही. चित्रपटात नायक-नायिकेला प्रत्यक्ष मारतांना दाखवलेले नाही. पण गळे चिरुन मारले गेल्यानंतर व त्याआधीचा जीवन-मरणाशीचा संघर्ष त्या खोलीत दिसत नाही. शिस्तीत निपचित गळे चिरलेली प्रेते आहेत. सारे बाकी जेथल्या तेथे आहे. जणू काही त्यांनी अत्यंत शांततेने मरंण स्विकारले आहे.


राहिले आकाशचे...त्यांच्या मुलाचे. हा शेवटचा प्रसंगच बालिश वाटतो कारण आकाशची शिक्षिका (वा बालवाडीतील म्यडम) य प्रसंगाआधीच त्याला घेऊन जातात तेंव्हा नायिका, बाळ व बाई संवाद साधतात. ती मुलाला परत सोडायला येते. घराचे दार बंद आहे. ती आकाशला बंद दारासमोर सोडुन देते. निघून जाते. असे होते का? जे पहायचेय ते इवला आकाश पाहतो. त्याची रक्ताळलेली पावले काळजावर ओरखडा उमतवत नाहीत कारंण मुळात सारेच कृत्रीम वाटते.


मला हा चित्रपट आवडला नाही. मी तसे लिहिले तर काही मंडळीने मलाच जातीयवादी ठरवले. मला समीक्षण करायचीही इच्छा नव्हती, कारण त्या योग्यतेचा हा चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही. जातवास्तव सोडून द्या...ते असतेच तर हैद्राबादमद्धेही नवपरिणत जोडप्याला जातीचे फटके बसलेच असते...ते नाहीत. त्यांना मारले ... का? केवळ दिग्दर्शकाला अथवा पटकथाकाराला चित्रपटाचा काहीतरी शोकांतिक शेवट असावा असे  वाटले म्हनून. त्यात दिग्दर्शकीय नैसर्गिकपणा कोठे आहे? तोच अपरिहार्य शेवट असावा असे निर्देशनही कोठे आहे?


पण जातीय चष्मे घालुन बव्हंशी हा चित्रपट पाहिला जातो आहे. आता तर नायिकेची जातही शोधली गेली आहे. नायकाची जातही लवकरच घोषित होईल असे दिसतेय. भविष्यकाळात अभिनेते, दिग्दर्शक ते पार चित्रपटाचे स्पोटबोय यांची जात कोनती याचे शोध लावले जातील...त्यावर हिरीरीने चर्चा होतील..


चांगले आहे.


पण आक्षेप हा राहतो कि कलाकृतीत जे नाहीच ते आहे असे समजून जातीय वाद करावेत काय? हा चित्रपट प्रत्यक्ष सोडा, अप्रत्यक्षही जातवास्तवाबाबत बोलतही नाही कि सुचितही करत नाही. मुलगी पाटील आहे आणि मुलगा कोळी अशा विरोधाभासी जातीय जीवनाचेही चित्रण या चित्रपटात नाही. मुलगी राजकारणी बापाची आहे आणि ती एका मुलाबरोबर पळून गेली म्हणून बापाचे राजकीय जीवन धोक्यात आले आहे असे संकेत मिळतात, पण मुलगी खालच्या जातीतील मुलाबरोबर पळून गेली म्हणून तसे झाले असेही सुचन नाही. समजा तो अंडरकरंट आहे व दिग्दर्शक ते स्पष्ट दाखवू इच्छित नाही, प्रेक्षकांच्याच विचारशक्तीवरच सोडतोय....तर मग यातून अनेक अन्वयार्थ काढता येतील...ते जातीयच असतील असे नाही. हा संघर्ष सरळ सरळ "अमीर-गरीब" स्टाईलचा वाटेल...किंवा बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्य मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने  (तापट मुलाच्या माध्यमातुन) घेतलेला सूड असेही वाटू शकेल...


पण जातीय खदखद प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही या चित्रपटात नाही. हा चित्रपट एका जातीच्या (म्हणजे मराठ्यांच्या) विरोधात व कोळी (किंवा निम्नजातीय) बाजुने आहे असेही नाही. असे एकही दृष्य नाही, संवाद नाही किंवा सुचनही नाही. आंबेडकरवादी सध्या नायकाच्या शोधात आहेत. कधी त्यांना कन्हैयात नायक दिसतो तर आता नागराजमद्ध्ये. या चित्रपटाने तर नायिकाही दिली आहे. उद्या कोणात नायक-नायिका दिसेल हे माहित नाही. हे नायकबदलुपण घातक आहे हे आंबेडकरवाद्यांना समजायला हवे. कारण या चित्रपटाचे कडवे समर्थक आंबेडकरवादी आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.


आपला समाज जातीयवादी आहे हे हे जातवादावर दुरान्वयानेही भाष्य न करणा-या चित्रपटाने सिद्ध करावे हे दुर्दैवी आहे. मराठा समाजही यात मागे राहिला नाही. त्यानेही आपल्या वर्चस्वतावादी विकृत दुगाण्या झाडल्याच...कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. आपल्या समाजात जात वास्तव आहे व जातीय अत्याचारही आहेत हे वास्तव मान्यच करायक्ला हवे. पण हे जातीय अत्याचार आता तथाकथित उच्चजातीयच करतात असे आता राहिलेले नाही. काही शारिरीक जातीय अत्याचार करतात तर काही मानसिक...एवढाच सध्या तरी फरक आहे,...उद्या उलटेही होऊ शकते.


सैराट एक फसलेली साधी शोकांतिक प्रेमकहानी आहे, तीही दिग्दर्शकीय फसलेली. ओनर किलिंगचा त्याला टच दिलाय पण तो कृत्रीम आहे. काहीतरी शेवट हवा म्हणून लांबलेल्या चित्रपटाला अचानक थांबवण्यापुरतीची ती क्लुप्ती आहे.


एवढेच!

Thursday, February 20, 2014

या एल्गाराचा दाहक स्फोट .....!

काल फ्यंड्री पाहिला. पाहिला म्हणजे खरे तर पडद्यात घुसून पात्रांपैकी एक पात्र होऊन अनुभवला. कारण मुळात हा चित्रपट नाही. कोणत्याही संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा हा विस्फोट आहे. हा चित्रपट नाही. हजारो मिती असलेला, वास्तव असुनही प्रतिकात्मक असलेला म्हणुन सर्वांचा अनुभवपट आहे.

वरकरणी दाहक असला आणि जातीव्यवस्थेचे भिषण वास्तव मांडणारा हा चित्रपट असला तरी तो त्याहीपार जातो. त्यामुळे तो वैश्विकही बनतो. मानवाची चिरंतन वेदना ज्या पद्धतीने साकार होते तिला तोड नाही.

आपल्या समाजातील "आजकाल कोठे राहिलीय जातपात?" असे मुखंडांसारखे विचारणा-यांनी आपल्या मनातील अदृष्य पण सतत वावरणा-या जातीयवादाला प्रथम प्रश्न करावा. वैदिक धर्माने हिंदूत घुसवलेली उच्च-नीच्च भावना कोणत्या थराला जावून पोचली आहे याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारावा आणि मग वैदिक संस्कृतीचे गोडवे गावेत. या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात. पण हा चित्रपट जातीयवादाबद्दल पात्रांच्या मुखातून क्वचितच बोलतो. तो दाखवतो. पण जातीयवादाच्या तीव्रतेपेक्षा या चित्रपतातील प्रतिकात्मकता अधिक महत्वाची आहे.

फ्यंड्री म्हनजे कैकाडी भाषेत डुक्कर. जवळपास ३०% चित्रपट हा गांवातील माजलेले डुक्कर जब्याचे कुटुंबिय कसे पकडतात हे विभिन्न दृष्टीकोनांतुन दाखवतो. हे डुक्कर एक प्रतीक बनते. म्हणजे देवाच्या पालखीला भर मिरवणुकीत मुसंडी मारून पाडनारे हे डुक्कर मुळात मानवी श्रद्धा या केवढ्या तकलादू आणि कामचलावू असतात हे दाखवते. डुक्कराचा मैत्रीनीला स्पर्श झाला म्हणून तिच्यावर गोमुत्रशिंपण ते आंघोळ घालायला लावणारी शालु डुक्कर पकडण्याचा धंदा असणा-या जब्याची होऊ शकत नाही हे एक सामाजिक वास्तव...पण देवाची पालखी मात्र डुक्कराने पाडूनही देव मात्र पवित्र...पालखी तशीच पुढे निघते हे एक वास्तव.

याच संपुर्ण प्रसंगात शालुचे लक्ष वेधण्यासाठी बेभान हलगी वाजवनारा...नाचनारा जब्या उर्फ जांबुवंत आणि बाप सांगतो म्हनून शेवटी मस्तकावर मिरवणुकीला उजेडासाठी ग्यसबत्त्या घेनारा अश्रुपुर्ण जब्या...मानहानी...सर्वत्र मानहानी...

आणि मानाच्या...आत्मसन्मानाच्या निरंतर शोधात असलेले हे कैकाडी कुटुंबिय...आणि त्यांचाच नव्या पिढीचा, सजग पण हतबल प्रतिनिधी हा जब्या.

जब्या प्रेमात पडलाय कोणाच्या? एका उच्चवर्णीय मुलीच्या कि प्रत्येक माणुस पडतो त्या सुखद...आल्हाददायक पण अप्राप्य अशा भवितव्याच्या? शालू या चित्रपटात जब्याशी एकदाही बोलत नाही. त्याने लिहिलेली असंख्य प्रेमपत्रे तिच्यापर्यंत कधीच पोचत नाहीत. किंबहुना तिच्याकडे पाहण्याचीही अनुमती त्याला नाही. शालुही एक प्रतीक बनून जाते ते त्यामुळेच!

प्रत्येक मानसाचा आपल्या भवितव्याशी असाच संघर्ष सुरू असतो. पण तरीही भवितव्य एवढे निर्दय असते कि ते कोणालाही संपुर्ण प्राप्तीचे सुख उपभोगू देत नाही.

गांवात इतिहासाचे भरपूर अवशेष आहेत. पडके वाडे...भुयारे..देवड्या...या इतिहासाची या, सर्वच गांवात दिसनारी बाब, म्हनजे या हगनदा-या आहेत. इतिहास हगनदारी आहे हे दाखवणा-या दिग्दर्शकाला सलामच केला पाहिजे. आणि याच हगनदारीत रानवट डुक्करही पकडायचे आहे. "तमस" या भिष्म साहनींच्या कादंबरीची सुरुवातच एक डुक्कर पकडण्याच्या अंगावर काटे फुलवणा-या प्रसंगाने सुरू होते. येथेही तसेच अंगावर काटे फुलवनारे...

आणि तमाशाई विद्यार्थी ते गांवातल्या प्रौढांचे विविध ढंगी...उपहासात्मक प्रतिक्रियांचे...

का पकडायचे आहे ते डुक्कर? देवाची पालखी पाडली म्हनून कि कोणाच्या हगत्या ढुंगनाला त्या डुक्कराने चावा घेतला म्हनून?  उत्तर अनिर्णित आहे पण डुक्कर पकडले गेलेच पाहिजे. आणि कचरू माने (जब्याचा बाप) ती कामगिरी घेतो कारण मुलीच्या लग्नाला हुंड्याचे पैसे कमी पडत आहेत...येथे मिळतील म्हनून. त्याची डुक्कर पकडने हा पेशापेक्षा जगण्याची अपरिहार्यता आहे. सारे कुटुंबिय त्याने या डुक्कर पकडण्याच्या मोहिमेत घेतले आहेत.

जब्याला ते अपरिहार्यपने मान्य करावे लागले तरी त्याचे मन त्यात नाही. त्याचे सारे लक्ष शालुकडे आहे. तिने तरी हे दृष्य पाहू नये यासाठीचा पराकोटीचा प्रयत्न आहे. डुक्कराच्या स्पर्शाबाबत तिची घृणा त्याला माहित आहे. त्याच वेळीस डुक्कर पकडण्याची गरजही त्याला माहित आहे. तथाकथित असभ्य व्यवसाय सोडून मेहताची कोक-कुल्फी सायकलवरून विकण्याचा अयशस्वी उद्योगही त्याने करून पाहिलेला आहे. या अपयशाचे कारण म्हणजे "काळ्या चिमणी"चा शोध!

त्याच्याच प्रौढ मित्राने सांगितलेला हा तोडगा. काळ्या चिमनीला मारून तिला जाळूण तिची राख शालुवर टाकती कि शालू त्याची होईल. येथे दिग्दर्शक एक नवी पुराकथा...मिथक तयार करतो. कोणाचे तरी बलिदान दिल्याखेरीज यश नाही हाच तो अर्थ! याला अर्थातच भारतीय अंधश्रद्धेचे पदर असले तरी मिथक तेच राहते.

काळी चिमणी आणि तिचा शोध चित्रपटाचा पुर्वार्ध व्यापतो. सोबत गांवजीवन आहेच.

डुक्कर पकडायचा प्रसंग! सारे कुटुंबिय सामील. हगनदारीत सदणा-या इतिहासातील जीवघेणी धामधूम. जब्याचे लक्ष शालुकडे. डुक्कर पकडण्यात त्याला रस नाही...कुटुंबाची अपरिहार्यता असली तरी.

आणि कच-या साकारणा-या किशोर कदमला सलाम. एकच प्रसंग. शाळेत राष्ट्रगीत सुरु होते...जब्या बाजुलाच...तो ताट्‍ह उभा राहतो...बापालाही नाईलाजाने उभे रहावे लागते...डुक्कर अगदी आटोक्यात...सहज पकडता येईल असे...आणि राष्ट्रगीत सुरु असल्याने हलताही येत नाही...ती तगमग...तो आविर्भाव...ती जीवघेणी तडफड किशोर कदमांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्त केली आहे केवळ तेवढ्याच साठी त्यांना ओस्कर मिळाले पाहिजे!

ते डुक्कर...म्हनजे सामाजिक व्यवस्थेची कीड मानली गेलेले द्रव्य, सर्व सामाजिक आघात उरावर घेत ते पकडतात.  शालुने जब्याला डुक्कर पकडतांना पाहिले आहे. तिच्या दृष्टीने तो मनोरंजनाचा खेळ आहे...कारण तिचे असे जब्यावर प्रेमच नाही...पण जब्याच्या (सोमनाथ अवघडे) दृष्टीने ती सर्वस्व आहे. एकमेव वांच्छित स्वप्न आहे.

आता ते स्वप्न साकार होणे असंभाव्य आहे याची विषण्ण करणारी जाणीव आणि स्वत:च्या बहिणीबाबत उद्गारले गेलेले असभ्य उद्गार...

याचा कडेलोट जब्या एक पत्थर फेकतो आणि तेथेच होतो आणि आपल्याला उत्तर मिळते.

व्यवस्था विरुद्ध एक माणूस याचा हा अंत नसुन आरंभ आहे. खरे तर हा चित्रपट जेथे संपतो तेथेच याची सुरुवात आहे. व्यवस्थेवर नव्हे तर आपल्या मनातील विषमतेच्या घाणीवर फेकलेला तो पत्थर आहे. तो पत्थर वैश्विक यासाठी आहे कि आपले समग्र वैश्विक मानवी जीवन हे उदार हृदयी गांधीवादाकडे जात नसून पराकोटीच्या विषमतावादी जागतिकीकरणाकडे जात आहे. सामान्य माणसांची जीवनविषयक स्वप्ने अपूर्णच राहण्याचा अभिशाप घेत उद्ध्वस्ततेकडे वाटचाल करत आहेत. आपण स्वत:च डुक्कर, म्हणजे डुक्करांच्या व्यवस्थेचे भाग आणि डुक्कर पकडत डुक्करांनाच (तथाकथित मानवांना) अभय देणारे आपण...माणसाच्या देवतांनाही धुत्कारनारी डुक्करे आणि त्या डुक्करांनाच घाबरणारी मानवी जमात...डुक्करांचा स्पर्श विटाळ माननारी मानवी ही जमात....तेही कोणत्या? रानवट आक्रमक डुक्करांना घाबरनारी ही मानवी जमात...

आपलीच नव्हे, वैश्विक समाजव्यवस्था अशा स्वार्थनिपूण डुक्करांनी भरलेली आहे. काळी चिमणी अस्तित्वात नाही. शालू मिळुच शकत नाही. सारे शेवटी स्वप्न! रानटी डुक्करांना पकडणारे पायतळी तुडवण्यासाठीच असतात. या डुक्करांच्या जगात!

पण तेही एल्गार करतात!

या एल्गाराचा दाहक स्फोट म्हणजे जब्याने हाणलेला पत्थर!

मी दिग्दर्शक नागराजजी मंजुळे यांना विनम्र मानाचा मुजरा घालतो. जब्या साकार करणारा सोमनाथ अवघडे हा जब-याच. या चित्रपटातील सर्वच स्त्रीया जगातील अद्वितीय सुंदर महिला तर आहेतच पण त्यांना त्यांच्या सहज अभिनयासाठी सलाम. किशोर कदमांना...जो बाप त्यांनी साकार केला...बाप माणुस...ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत...

मित्रांनो, या चित्रपटाचे एवढेच नाहीत...प्रत्येक नजरेतून उमगतील असे अगणित पैलू आहेत. मी फोटोग्राफी, पार्श्वसंगीत...याबद्दल लिहिले नाही...ते या अनुभवपटाचे सहज भाग म्हणून येतात...

सा-या टीमला विनम्र अभिवादन...मला माझे जग पुन्हा उलगडून दाखवल्याबद्दल!


Monday, December 9, 2013

अमानूष: एक थरार

माणुस वेडा असतो. तो कसलं तरी वेड घेतो आणि ते पुर्ण करायला धावतो. मी तर ठार वेडा. मी नुसती स्वप्न पहात नाही. स्वप्न पहातो आणि ती पुर्ण करण्याची शिकस्त करतो. "अमानुष: एक थरार" हा चित्रपट मी अशाच झपाटलेल्या वेडेपणातून पुर्ण केला. पैशांची कमतरता...नुकत्याच भयाण संकटातून बाहेर आलेलो...पुरता बदनाम झालेलो. पण खचणा-यांपैकी मी तरी नक्कीच नाही. आयुष्यच संकटांनी भरलेलं. थांबून कसं चालेल?

अमानुषची कथा मला सांगलीच्या जेलमद्धे सुचली. बाहेर आल्यावर मी पहिलं कोणतं काम केलं असेल तर ते म्हणजे पटकथा लिहिण्याचं. मूळ कथेला न्याय द्यायचा तर पैसा बराच लागणार होता आणि मी तर होतो कफल्लक. दुस-याकडे हात पसरण्याची स्थितीही नव्हती. मी शेवटी माझा फ्ल्यट गहान ठेवला...७ लाख रुपये उभे केले. या बजेतमद्धे चित्रपट करायचा तर मलाच ब-याच भुमिका निभवाव्या लागणार होत्या...आणि त्या मी निभावल्या. म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, संगीतकार ते गायक...तरीही ७ लाखात मी फक्त शुटिंग पुर्ण करु शकत होतो...पोस्ट प्रोडक्शनला जवळपास तेवढेच पैसे लागणार होते. पण म्हटलो...नंतरचं नंतर बघु...पण शुटिंगच्या दरम्यानच माझे निर्मिती व्यवस्थापक राज उमरकर यांना काय रस वाटला कोणास ठाउक...ते भागीदार बनायला स्वत:हून पुढे आले...काम झाले. हा चित्रपट मी जेथे पावनेदोन महिने जेलमद्धे राहिलो तेथे...सांगलीत प्रथम रिलीज केला. हा चित्रपट तसा वेगळा...जेमतेम दोन आठवडे त्याने तेथे दम धरला...पण म्हटले ना...मी ठार वेडा माणूस आहे...

पण या चित्रपटाने मला दोन पैसे मिळवून दिले हेही खरे. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!

असो.

हा चित्रपट फिरतो तो डा. विक्रम चौधरी या मृत्युवर संशोधन करणा-या शास्त्रज्ञाभोवती. तो अलीकडेच एका भिषण प्रसंगातून गेलेला. एका रिसोर्टमद्धे परिषदेसाठी जमलेल्या सर्वच शास्त्रज्ञांची निघृण हत्या होते. फिरायला गेला होता म्हणून हा एकमेव वाचलेला. त्याचे सावट (कि गतायुष्यातील काही घटनांचेही?) बाळगत हा राहतोय निर्जन भागातील एकाकी बंगल्यात...एकटाच...संशोधनात गढलेला. चिडचिडा बनलेला.

त्याच्या बंगल्याजवळ का न कळे कधी काळीच जाणारी वाहने बंद पडतात. लोक मदत मागायला शेवटी त्याच्याकडेच जातात. ते आत जसे जातात तसे बाहेरही पडतात. पण का नकळे ते गायब होतात.

पोलिस अजुनही रिसोर्टवरील घटनेचा तपास करताहेत. त्यात या अदृष्य होणा-या माणसांच्या घटना. दुवा एकच...डा. चौधरींचा बंगला...आणि त्या भिषण हत्याकांडातून वाचलेला एकमेव माणूस...डा. चौधरी. पण तो मोठा माणूस आणि त्याच्याविरुद्ध तर एकही पुरावा नाही....

त्यात डा. चौधरीला भेटायला येते त्याची जुनी प्रेयसी. माया. ती त्याला तेथे यायला नकोशी वाटतेय. तो तिला टाळायचा...लवकरात लवकर घालवायचा आटोकाट प्रयत्न करतोय. तिच्यावरील प्रेमही लपवता येत नाहीय आणि गतकाळाची भुतेही पाठ सोडत नाहीत...असह्य कोंडमा-यात सापडलेला माणूस...आणि बंगल्यावर झाकोळलेली गुढाची छाया...

मायाला हे काय माहित? ती स्वप्न पहात आलेली साधी तरुणी. तिचे अबोध प्रेम उचंबळतेय...ते विक्रमलाही समजतेय...पण साराच नाईलाज...

तिला अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या बंगल्यात थांबावेच लागते...आणि तिला भयानक अनुभवांतून जावेच लागते. अटळ नियतीच जशी.

खाली चित्रपटाची लिंक दिली आहे. यात अभिनय करणे हे आव्हान होते. सतत तणावाखाली असलेला, गतकालाची अनाम ओझी वागवनारा आणि तरीही ते दाखवायचा प्रयत्न न करनारा माणुस मला उभा करायचा होता. मला ते जमले कि नाही माहित नाही. प्रज्ञा जाधव ही नवखी नायिका...तिने मात्र समजून उत्तम अभिनय केला. या चित्रपटाचे शुटिंग अवघ्या सात दिवसात संपवले. रात्रंदिवस मला सर्वांनी अनमोल सहकार्य केले. छायाचित्रण करणारे गोपाळ तर भारीच! मी चित्रपटाची लय संथ ठेवली. मानवी संबंधातील गुढे, मृत्युचे तत्वज्ञान आणि त्याचे वास्तव संदर्भ यात टिपले...मराठीत असे चित्रपट दुर्मिळच! मी अशा एका वेगळ्या पण सर्वांशी सम्बंधित विषयावर चित्रपट काढु शकलो याचे मला अप्रूप आहेच.

बघा...आणि ठरवा...

http://www.youtube.com/watch?v=C5S9TkGhQ78


ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...