Showing posts with label शेतीविषयक. Show all posts
Showing posts with label शेतीविषयक. Show all posts

Thursday, May 29, 2025

कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...

 




मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील यावर संक्षिप्त चर्चा केली होती. भारतात व जगात उद्योग-सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत घुसणार नाही आणि सर्व शेतीचे नियंत्रण आपल्या हाती घेणार नाही हा आशावाद जागतीकीकारणाचा वेग वाढतच असलेल्या काळात टिकण्यासारखा नाही. आता राजकीय सत्तासुद्धा भांडवलदारांच्या कब्जात गेलेलं आपण पाहतो आहोत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगभर सध्या टयारिफच्या माध्यमांतून आयात-निर्यात धोरणांत बदल घडवून आणत काय धुमाकूळ घालत जागतीक अर्थव्यवस्थेची दिशाच बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे हे आपण पाहातोच. या आयात-निर्यातीत शेतमालाचाही समावेश असल्याने जगाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे याचा अंदाज येतो. सध्याचे जग मुठभर भांडवलदारांचे असून एकूण ८०% संपत्तीचा वाटा केवळ २०% भांडवलदारांकडे असून हळूहळू केवळ पाच टक्के लोकांच्या हातात ९०% संपत्तीची मालकी जाणे सहज शक्य आहे. उरलेले ९५% लोक हे मध्यमवर्गीय, गरीब ते अतिगरीब या गटात जाणार हेही तेवढेच निश्चित आहे.

अशा स्थितीत शेतीची मालकीही त्यांच्याच ताब्यात जाणे अपरिहार्य आहे. पण त्यासाठी प्रत्येक देशाला शेतीविषयक कायद्यांत व्यापक बदल घडवून आणावे लागतील. जनमताचा विरोध या नव्या व्यवस्थेत कितपत टिकेल याची शंकाच आहे कारण जनमत बदलवण्याची साधनेही या भांडवलदारांच्याच हातात आहेत. न परवडणारी शेती करत बसण्याऐवजी ती भांडवलदारांना विकून टाकावी, येणा-या पैशांची पुन्हा त्यांच्याकडेच गुंतवणूक करत भरघोस उत्पन्न मिळवण्याची आणि पुन्हा शेतीतच किंवा त्याआधारीत प्रक्रिया उद्योगातच आणि पुरवठा साखळीत कायम स्वरूपी नोकऱ्या मिळवून कसे सुखी समाधानी जगता येईल याची स्वप्ने दाखवत जनमत बदलवण्याची आणि भाडोत्री विचारवंतांमार्फत त्याला नैतिक बळ देण्याची हमखास यशस्वी होणारी युक्ती ते सहज वापरू शकतील आणि तेच सरकारवर कायदे बदलण्यासाठी दबाव आणू शकतील.

याशिवायही अनेक नव्या युक्त्या शोधल्या जातील.भारतात कमाल जमीन धारणा कायदा आणि जीवनावश्यक वस्तू कायदा हे कायदे कोणा एका व्यक्तीकडे ठराविक प्रमाणाच्या बाहेर अतिरिक्त जमीन जाऊ नये आणि शेतमालाच्या अतिरिक्त साठवणुकीमुळे खाद्यान्नाचा तुटवडा पडू नये या उद्देशाने तयार केले गेले. जेव्हा हे कायदे बनले तेव्हा जमीनदार, रजवाडे, यांच्याकडे प्रमाणाबाहेर शेतजमिनी होत्या व त्या कुळांकडून कसून घेतल्या जायच्या. यात कुळांचे भयानक शोषण होत होते. त्यामुळे कुळकायदा तर आणला गेलाच पण एका शेतमालकाकडे अधिकाधिक किती जिरायती आणि बागायती क्षेत्र असावे यावर राज्यनिहाय मर्यादा घातल्या गेल्या.

कारखाने कितीही जमीन घेऊ शकत असले तरी ते त्या जमिनीचा वापर बिगरशेती कारणासाठीच करतील हेही बंधन घातले गेले. त्यामुळे फक्त शेती करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र जमिनी घेऊ शकत नाही पण ते करार शेती करू शकतात. यात शेतीची मालकी बदलत नाही. अनेक शेतकरी कॉर्पोरेट्ससोबत करारशेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) करू शकतात. यामुळे त्यांना स्थिर उत्पन्न मिळू शकते, पण कॉर्पोरेट्सच्या अटींमुळे त्यांचे स्वातंत्र्य कमी होऊन नफ्याचे आहे तेही प्रमाण टिकत नाही त्यामुळे ही पद्धत फारच मर्यादित प्रमाणात वापरली जाते.

पण कॉर्पोरेट शेतीला अनुमती मिळाली तर कॉर्पोरेट्स बियाणे, खते आणि बाजारपेठ नियंत्रित करतील, ज्यामुळे उरल्यासुरल्या शेतकऱ्यांची स्वायत्तता कमी होईल. शिवाय खालील धोके आहेतच.

१. अन्नसुरक्षा आणि किंमती: कॉर्पोरेट क्षेत्र प्रामुख्याने नफ्यावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना अन्न मिळवणे कठीण होऊ शकते. कॉर्पोरेट्स काही विशिष्ट, उच्च नफा देणाऱ्या पिकांवर (जसे बायोटेक पिके) लक्ष केंद्रित करू शकतात, ज्यामुळे पारंपरिक पिकांची विविधता कमी होऊ शकते. याचा परिणाम अन्नसुरक्षेवर आणि पर्यावरणावर होईल.

२. पर्यावरणीय परिणाम: कॉर्पोरेट शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, कीटकनाशके आणि फक्त विशिष्ट आणि जनुकीय बदल घडवलेल्या मर्यादित पिकांचा वापर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होईल आणि जैवविविधता नष्ट होईल. आधुनिक पद्धती वापरल्याने आज होतो तसा पाण्याचा अतिवापर होणार नाही पण प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.

३. ग्रामीण अर्थव्यवस्था: भारतासारख्या देशात, जिथे ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे ते अक्षरश: बेरोजगार होतील कारण कॉर्पोरेटस शेतीत मोठ्या प्रमाणात एआय आणि रोबोटिक्स वापरतील. शेतकऱ्यांना जमिनीचे मोबदले मोठ्या प्रमाणात मिळतील खरे, पण त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत त्यांचे अज्ञान असल्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी होऊ शकते, ज्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी आणि स्थलांतर वाढेल. याशिवाय स्थानिक बाजारपेठांवर कॉर्पोरेट्सचे नियंत्रण वाढल्याने छोटे व्यापारी आणि मध्यस्थांचे नुकसान कारण नवीन सक्षम पुरवठासाखळी निर्माण करण्याचे सामर्थ्य या कॉर्पोरेटसमध्ये असेल.

४. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम: शेती हा भारतातील अनेक समुदायांचा सांस्कृतिक आणि सामाजिक आधार आहे. कॉर्पोरेटीकरणामुळे पारंपरिक शेती पद्धती, अन्नवैविध्य आणि स्थानिक ज्ञान नष्ट होऊ शकते. सामाजिक असमानता वाढेल, कारण कॉर्पोरेट्सना फायदा होईल, तर शेतकरी वर्ग रसातळाला जाईल.

५. मूलभूत शेतकऱ्यांचे काय होईल?: कॉर्पोरेट शेतीत यांत्रिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढेल, ज्यामुळे शेतीतील मजुरांची गरज कमी होईल. यामुळे छोटे शेतकरी आणि शेतमजूर बेरोजगार होतील. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढेल, ज्यामुळे शहरी झोपडपट्ट्या आणि सामाजिक समस्या वाढतील. जे शेतजमिनी विकणार नाहीत अशा शेतकर्यांना बियाणे, खते आणि इतर संसाधनांसाठी शेतकरी कॉर्पोरेट्सवर अवलंबून राहतील, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढेल. शिवाय कॉर्पोरेट्स अशा स्वतंत्र शेतकऱ्यांना कमी किंमतीत पिके विकण्यास भाग पाडू शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होईल.

खरे तर कॉर्पोरेट शेती आली तर शेतमालाचे उत्पादन वाढेल, पिके अधिक शास्त्रशुद्ध होतील, ग्राहकांना अधिक दर्जेदार खाद्यान्न उपलब्ध होईल व शेतीला एक शास्त्रीय शिस्त लागेल हे खरे असले तरी खाद्यवैविध्य लोप तर पावेलच पण जैववैविध्य धोक्यात येईल. प्रक्रिया केलेले खाद्यांन्न ग्राहकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जाईल व त्याचे सवय लावावी लागेल. ग्रामीण बेरोजगारीत प्रचंड वाढ झाल्याने या वर्गाला कोणत्या क्षेत्रात सामावून घ्यावे हा गंभीर प्रश्न सरकार व समाजासमोर उभा राहील. सामाजिक असंतोष वाढेल हे वेगळेच. पण हे भविष्य आहे हेही तेवढेच खरे. शेतकरीच एकत्र येऊन शेती-कॉर्पोरेट स्थापन करतील तर या संभाव्य धोक्यांपासून सुटका करून घेता येणे मात्र शक्य आहे.

-संजय सोनवणी 


Thursday, April 3, 2025

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!


 


२०५० पर्यंतवाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते विचारमंथन नाही तर प्रत्यक्ष प्रयोगही केले जात आहे. अमेरिका आज जगातील एक पुढारलेला देश मानला जातो. तेथील शेतीच्या समस्याही उग्र झालेल्या आहेत. अमेरिकन शेतकऱ्यांनी अन्न उत्पादनाची प्रभावी पातळी गाठावी यासाठी आणि आजच्या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी त्यांने पावले उचलायला आधीच सुरुवात केली आहे. आधीच तेथे शेतीवर आणि त्यावलंबित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या केवळ १०.४% एवढी आहे. त्यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी सन २०५० पर्यंतची उद्दिष्टे ठरवण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानासह बहुआयामी पद्धतीने शेती व्यवसाय  चालवण्यासाठी अभिनव मार्ग शोधले जात आहेत. अन्न आणि शेतीच्या आलेखाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून अनेक भाकीते वर्तवण्यात आली असून पुढील २५ वर्षांत शेतीवरील जीवन कसे दिसेल यावर त्यांनी मते नोंदवली आहेत.

 अन्नाची मागणी वाढते आहे!

अन्नाच्या मागणीमागे दोन मोठे घटक असतात. त्यात एकूण लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न. यात अमेरिकेत वाढच होतांना दिसते. तज्ञांच्या मते २०१६ मध्ये ७.४ अब्ज असलेली जगाची लोकसंख्या २०५० मध्ये ९.१ अब्जपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसारमोठ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावर शेतकऱ्यांना २०१७ च्या पातळीच्या तुलनेत ७० टक्के अन्न उत्पादन वाढवावे लागेल. जागतिक उत्पन्न पातळीतही विकसनशील देशांमध्ये वाढ होत असून तेथील अन्नाची एकूण  मागणीही वाढत जाईल. या देशांना अधिक प्रथिनयुक्त आहार कसा पुरवता येईल हेसुद्धा आव्हान असेल. .

 आरोग्याबाबत अधिक जागरूक लोकसंख्या असलेल्या अत्यंत विकसित देशांमध्ये एक वेगळा ट्रेंड उदयास येत आहे. मक्यासारख्या स्टार्च-आधारित पिकांवर लक्ष केंद्रित केल्याने सोयाबीन आणि इतर शेंगदाण्यांसारख्या वनस्पती-आधारित पिकांकडे दुर्लक्ष होते आहे पण ते चित्र बदलावे लागेल असे असे सिन्जेंटा व्हेंचर्स येथील कॉर्पोरेट व्हेंचर कॅपिटलचे प्रमुख डेरेक नॉर्मन म्हणतात. ते किमान साधन-स्त्रोतांमध्ये अधिक पिके उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इतर कंपन्यांना मदत करतात.

 शेती एकत्रीकरणाला गती

२०१२ च्या कृषी जनगणनेने शेतकऱ्यांच्या साधारण वयोमानात मोठा बदल उघड केला आहे ज्याचा भविष्यावर मोठा परिणाम होइल असे तज्ञ म्हणतात. पहिल्यांदाच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांची संख्या ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरूण शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. हा फरक लक्षणीय आहे४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रत्येक शेतकऱ्यांमागे २.१ वयस्कर शेतकऱ्यांचा समावेश आहे. थोडक्यात तरुण शेतकरी कमी होत आहेत. खरे तर जेव्हा वयस्कर शेतकरी व्यवसाय सोडतात तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी किमान तेवढेच तरुण सामील होत गेले पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे अमेरिकेतील शेतीचे एकत्रीकरण लक्षणीय आणि जलद होईलअसे कृषीतद्न्य विडमार म्हणतात. आपल्याकडे कमाल जमीन धारणा काय्द्यापुले शेतीच्या एकतरीकरनास अडथळे आहेत हे तर सर्वज्ञात आहे. अमेरिकेतील स्थिती मात्र वेगळी आहे. अमेरिकेतील एकत्रीकरण प्रक्रियेमुळे शेतीची गतिशीलता मोठ्याअधिक व्यवस्थापकीय गुंतागुंतीमध्ये बदलेल. थोड्क्यात कॉर्पोरेट शेतीचा वेग वाढेल आणि शेतीचे सध्याचे एकल शेती हे स्वरूप आमुलाग्र बदलून जाईल. मी भारतीय शेतकऱ्यासाठी  “एक गाव:एक कंपनी: एक व्यवस्थापन” हे पुस्तक लिहून भारतीय शेतकरीही कॉर्पोरेट होऊन किफायतशीर शेती कशी करू शकतील यावर विस्तृत लिहिले आहे. पण आपण मुळात स्थितीस्थापक असल्याने एकल शेती व तीही तुकड्यांची त्यामुळे ती नफ्यात न येता एकूण अन्नधान्याच्या उत्पादनातही अनेक कारणांनी मागे पडत आहे.

अमेरीकन तज्ञाच्या मतानुसार शेती एकत्रीकरणामुळे बाह्य कामगारांची अधिक आवश्यकता निर्माण होईल किंवा रोबोटिक्ससारखे उच्च-तंत्रज्ञान मदतीला येइल अशी अपेक्षा आहे. "जर तुमच्याकडे रोबोट असेलतर ते कामगार समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते," असे कृषीतद्न्य विडमार म्हणतात. दुग्ध उत्पादक कामगारांना पर्याय म्हणून रोबोटिक मिल्कर्स वापरतात. आता शेती-उपकरणे उत्पादक मानवी चालकांशिवाय शेतातील काम हाताळण्यासाठी रोबोटिक ट्रॅक्टर आणि स्प्रेअरच्या प्रोटोटाइपची चाचणी घेत आहेत.

 रोबोटिक यंत्रसामग्री ए.आय.ने सुसज्ज असल्याने ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय कामे नियंत्रित करता येतात. ड्रोन तंत्रज्ञान शेतीच्या वापरात भरभराटीसाठी सज्ज आहेच. बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच ग्लोबल रिसर्चच्या अहवालानुसारपुढील १० वर्षांतकृषी ड्रोन उद्योग अमेरिकेत १००,००० नोकऱ्या आणि ८२ अब्ज डॉलर्सची आर्थिक उलाढाल निर्माण करेल. २०५० पर्यंत शेतीमध्ये ड्रोनचा संभाव्य वापर प्रचंड असेल.   

२०५० पर्यंत  जनुक संपादित बियाण्यांपासून जवळपास सर्वच पिके घेतली जातील आणि त्यामुळे पिकांची विस्तृत विविधता आणि उत्पादकता वाढेल असा अंदाज आहे. भविष्यातजनुक संपादनामुळे शेतकऱ्यांना आपापल्या गरजांनुसार विशिष्ट पिकांच्या उत्पादक जाती निवडता येतील. जनुक संपादनामुळे व्यापक उत्पादनात अडथळा आणणारे नैसर्गिक गुणधर्म काढून टाकून पिकांची अधिक विविधता निर्माण होईल. 

भविष्यात पाण्याची उपलब्धतापर्यावरणीय परिणाम आणि मातीचे आरोग्य हे शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे करतील परंतु नवीन तंत्रज्ञान त्यांना या समस्यांना अधिक कार्यक्षमतेने तोंड देण्यास मदत करेल असेही कृषीतज्ञांचे मत आहे. उदाहरणार्थसिंजेंटासोबत सहयोग करणाऱ्या इस्रायली कंपनी फायटेकने एक देखरेख प्रणाली विकसित केली आहे ज्यामध्ये सतत वनस्पती-वाढ सेन्सर्समाती-ओलावा सेन्सर्स आणि एक सूक्ष्म हवामान परीक्षण युनिट आहे. त्यामुळे व्यक्तिगत रोपांचीही स्वतंत्र देखभाल करणे व तत्काळ इलाज करणे सोपे जाईल.

थोडक्यात भविष्यातील विविध आव्हानांचा आत्ताच विचार करून त्यावर उपाय शोधायचे कार्य सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या व पिकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक अचूकपणे वापरण्यावर भर कसा दिला जाईल आणि भविष्यातील अन्न-धान्य, फळे, भाजीपाला यांची आरोग्यदायी गरज कशी पूर्ण केली जाईल यावर प्रगत देशांचाही भर आहे. मातीचे आरोग्य वाढवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील यावरही या संशोधनात भर तर आहेच पण सिंचन व्यवस्था सूक्ष्म स्तरापर्यंत नेत पाण्याचा अकारण गैरवापर कसा थांबवायचा यावरही भर आहे.

या पार्श्वभूमीवर आपण कोठे आहोत? आजच कुपोषितांची संख्या चिंताजनक पातळीवर पोचलेली आहे. शेतीचे वेगात तुकडीकरण होत आहे. भारतीय शेतीला अनुकूल नवे तंत्रज्ञान शोधण्यात आमच्या तंत्रज्ञांना वेळ नाही किंवा त्यांच्याकडेच भांडवल नाही. शेतीतही नवे भांडवल येण्याची प्रक्रिया जवळपास थंडावलेली आहे. शेती आजच परवडणारी राहिलेली नाही. शेतकर्यांच्या आत्महत्यांचा विस्फोट झाला आहे. २०५० साली आमची शेती कोठे असेल याची कल्पनाच करवत नाही असे विदारक चित्र आजच आहे.

-संजय सोनवणी 

Saturday, July 6, 2024

प्रक्रियाउद्योगांच्या अभावात शेतक-यांची दैना!

  


भारतात शेतक-यांची दुरवस्था हा जुना चिघळत गेलेला फार जुना प्रश्न आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही जशी समस्या आहे तशीच एखादे उत्पादन कमी झाल्याने महागाई वाढली तर एकंदरीत समाजाचा होणारा रोष पाहून आयात-निर्यातीसंदर्भात जी धोरणे सातत्याने बदलली जातात त्यामुळे शेतक-यांचे हित होण्याऐवाजे अहितच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल महात्मा फुले यांनी शेतक-यांचा असूद हा ग्रंथ एकोणीसाव्या शतकात लिहून शेतक-यांची परवडीवर प्रखर भाष्य केले होते. महात्मा गांधी यांनीही चंपारण्यातील शेतक-यांचे आंदोलन उभारून सत्याग्रहाची रुजुवात केली होती. स्वातंत्र्यानंतर शेतीउत्पादनात प्रचंड मोठी भर पडले असली तरी त्या प्रमाणात शेतक-यांचे हित मात्र होऊ शकलेले नाही हे एक कटू वास्तव आहे. सरकारी धोरणे याला जशी जबाबदार आहेत तशीच शेतीउत्पादन आधारित प्रक्रिया उद्योगांचा अभाव हेही या दुरवस्थेमागे फार मोठे कारण आहे हे मात्र आमच्या लोकांनी लक्षात घेतलेले नाही हेही एक दुसरे कटू वास्तव आहे.

फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. एकीकडे ही अभिमानाची बाब असली तरी यात असमाधानकारक बाब अशी कि जगात सर्वात जास्त फळे व भाज्या “वाया” जाण्यातही आपल्या देशाचा पहिला क्रमाक लागतो. आपल्या देशात जवळपास ७० हजार कोटी रुपये मूल्याच्या फळांची आणि भाज्यांची नासाडी होते. कारण आहे ते हे कि आपल्या देशात पुरेशी शीतगृहेच नाहीत. शिवाय रेफ्रिजरेटेड कंटेनर वाहतूक पुरेशी उपलब्ध नाही हेही कारण त्यात आहेच. केवळ वाहतुकीच्या दरम्यान अथवा साठवणूक न करता आल्याने नाशवंत कृषीउत्पादन वाया जाते तेच सरकारी आकडेवारी नुसार प्रतिवर्षी १३३०० कोटी रुपये मूल्याचे आहे. यात भर पडते ती एखाद्या शेतमालाचे भावच पडल्याने फेकून द्यावा लागणारा माल. याचे मुली तर मोजता येण्याच्या पलीकडचे आहे. यामुळे राष्ट्रीय संपत्तीची हानी तर होतेच पण नागवला जातो तो शेतकरी. आपला शेतकरी नेहमीच दारिद्र्यरेषेच्या थोडा वर-खाली राहतो याचे नेमके हेच कारण आहे.

यात भर पडली आहे ती म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणा-या उद्योगांची कमतरता. भारतात फक्त ३% शेतमालावर आज प्रक्रिया केली जाते. बाहेरच्या देशातले आकडे आपले डोळे विस्फारतील असे आहेत. चीनमध्ये एकूण कृषी उत्पादना पैकी २७%, अमेरिकेत ६५% तर फिलिपाइन्ससारख्या देशात एकूण कृषीउत्पादनापैकी ७८% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते.   कृषीमालावर प्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. कृषीमालाचे एकंदरीत आयुष्य वाढते हा झाला एक भाग, पण फळे-भाज्यांचे एकुणातील पोषणमूल्यही वाढून लोकांना आरोग्यदायी खायला मिळते हा दुसरा लाभ. प्रक्रियाकृत शेतमालाला जागातीक बाजारपेठेत मागणी असल्याने निर्यात करता येणेही सुलभ होते तसेच शेतमालावर प्रक्रिया केली कि बाजारातील रोज प्रतीक्षणी चढ-उतार होत असलेल्या भावांचीही चिंता राहत नाही. यात शेतक-यांचा व पर्यायाने देशाचाहे फायदा होतो आणि माल सडणे किंवा फेकून द्यावा लागणे या आपत्ती कोसळत नाहीत. पण दुर्दैवाने भारतीय शेतक-यांचे आणि उद्योजकांचे या प्रक्रिया उद्योगाकडे फारसे लक्ष गेलेले नाही. जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे व्यक्तिगत व्यापारी अथवा उद्योजक किती माल साठवू शकतो यावर मर्यादा असल्याने या उद्योगात पडायला उद्योजक नाखूष असतात असे एक निरीक्षण सांगते. पण याचा फटका अंतत: शेतका-यांनाच बसतो हे उघड आहे.

शेतमालावर प्रक्रिया करण्याचे अनेक मार्ग आहेत.  कॅनिंग, डीप फ्रीजिंग, निर्जलीकरण, लोणची, इत्यादी अनेक मार्ग मालाच्या स्वरूपानुसार वापरता येणे शक्य असते. निर्जलीकरण हा त्यातल्या त्यात भारतीय शेतक-यांसाठी सोपा व अगदी लहान ते अवाढव्य प्रमाणात वापरता येण्यासारखा मार्ग आहे. माशांपासून अनेक प्रकारच्या फळे व भाज्या सुकवणे ही प्रक्रिया पद्धत भारतात सिंधू कालापासून वापरात आहे. पण उघड्यावर व उन्हाच्या बेभरवशी उपलब्धतेवर ही प्रक्रिया अवलंबून असते.  सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवकाळी पावुस इ. कारणांनी केवढे फटके बसतात हे आपण दरवर्षी बघत असतो त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही. शिवाय उघड्यावर ही वाळवणूक केली जात असल्याने त्यात हायजिनिकपणा राहत नाही. आधुनिक निर्जलीकरण हे कृत्रिम तापमानात बंदिस्त पद्धतीने केले जाते. ज्या भाज्या उन्हात वाळवता येणे अशक्य अशा उत्पादनालाही ही आधुनिक पद्धती साथ देते. त्यामुळे आकार ते स्वच्छता यात हे पदार्थ आघाडीवर असतात. अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया करण्यात जात असल्याने शेतमालाची नासाडी होणे शून्यावर येणे हा एक मोठाच फायदा आहे.

निर्जलीकरण म्हणजे नेमके काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊ.

१. भाजीपाला/फळे नाशवंत असतात कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोम्यटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे.
२. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.
३. पुर्व-प्रक्रिया ते packaging हा झाला महत्वाचा टप्पा. यात भाज्यांच्या मगदुराप्रमाणे (त्यातील जलांश व एकूनातील घनता...) यानुसार प्रक्रियापद्धत पुर्वनियोजित करणे. ती राबवने आणि त्याचे अंतिम परोक्षण करून packaging करने.

ही झाली थोडक्यातील प्रक्रिया. डीप फ्रीजिंग, कॅनिंग अशा प्रक्रियांसाठी मोठे भाद्व्ल व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, तसे निर्जलीकरण प्रक्रियेचे नाही. शेतकरी स्वत:ही थोडे ज्ञान घेऊन ही प्रक्रिया करू शकतात. मोठा फायदा हा कि यामुळे शेतमाल वाया जाण्याचे प्रकार ठामू तर शकतातच पण आर्थिक उत्पन्नातही भर पडते. आज शेतकरी हलाखीत असेल तर तो केवळ ताज्या उत्पादनाच्या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने. प्रक्रियेच्या अभावात नाशवंत माल फार दिवस घरात/शिवारात ठेवता येत नाही त्यामुळे मिळेल त्या भावात माल विकणे आणि जर गाडीभाडेही निघणार नाही एवढा भाव पडला अथवा पाडला गेला तर तो शेतमाल फेकून देणे एवढेच शेतक-याच्या हातात राहते. तो पुरेपूर गाळात रुतून जाणे अपरिहार्य असते. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, शेती सोडून देण्याची मनस्थिती निर्माण झालेली आहे कारण शेती नफ्यात येणे सोडा, त्यात घातलेल्या श्रमांचाही मोबदला मिळू शकत नाही. आणि याचे कारण आहे शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाचा अभाव. निर्जलीकर्ण करून मात्र शेतमालाचे आयुष्य आणि किंमत वाढवता येणे सहज शक्य आहे. यातच शेतक-यांचे हित आहे.

 

-संजय सोनवणी 

Friday, August 19, 2022

शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी...


 


शेतीचे भविष्य आजच्या वर्तमानतील परिप्रेक्षात पाहिले तर ते अंध:कारमय वाटावे अशी स्थिती आहे. जागतिक विकसनशील देश, विकसित देश आणि महासत्ता बनू पाहणारा आपला देश यांची तुलना केली तरी आपल्या शेतीची वाटचाल आत्मनाशाच्याच दिशेने सुरु आहे से स्प्ष्ट दिसते. याचे कारण म्हणजे आजही सुमारे ५५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याने व शेती मुळात किफायतशीर उद्योग राहिला नसल्याने शेतक-यांचे अर्थजीवन दिवसेंदिवस ढासळतच चालले असल्याचे आपण पाहतो. सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू हे आश्वासन कोठल्याकोठे विरून गेले आहे.  मुळात उत्पन्न दुप्पट करणे कसे शक्य करता येईल याबाबत कसलेही ठोस धोरण नाही. अलीकडेच जे कृषीकायदे आणले गेले होते ते शेतक-यांच्या लाभाचे व हिताचे नसल्याने व्यापक आंदोलन झाले व ते कायदे मागे घेण्याची नामुष्की सरकारवर कोसळली. देशातील शेतमालाचे भाव सामान्यांच्या आवाक्यात रहावे म्हणून शेतमालाच्या आयात-निर्यातीवर वेळोवेळी बंधने घातल्याने अथवा आयात-निर्यात कर कमी-जास्त केल्याने शेतकरी भरडला जातो. त्यात पिढ्यानुपिढ्या शेतजमीनीचे तुकडीकरणच होत राहिल्याने उत्पादकता तर घटतेच आहे पण ती कसणे आता अशक्य होत जाणार आहे हेही उघड आहे. भुमीहीन शेतमजुरांची अवस्थाही बिकट होत जाणार आहे. मुळात शेतमजुरी हा अर्धवेळ रोजगार आहे. शेतीचे भवितव्य असे चिंताजनक होत चालले आहे. अशा स्थितीत शेतीवर अवलंबून लोकसंख्या ५५ टक्क्यांवरून ३० टक्क्यापर्यंत कशी आणायची हा यक्षप्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे.

 

जागतिकीकरणाचे लाभ बिगरशेती उद्योगाला मिळाले खरे पण शेतीक्षेत्र सर्वार्थाने त्यापासून वंचित राहिले. देशी-विदेशी भांडवल शेती वा शेतीआधारीत उद्योगांत मोठ्या प्रमाणावर येईल यात अनेक सरकारी कायदेच अडथळा असल्याने तसेही झाले नाही. शेती ही समस्या नसून सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीच मोठी समस्या बनून बसला आहे कि काय असे वाटावे अशी एकुणातील स्थिती आहे.

 

म्हणजे शेतीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर त्यावरही कमाल शेतजमीन मर्यादा कायद्यामुळे ते होऊ शकत नाही. बिगर शेतक-याला शेतजमीन शेतीसाठी विकत घेता येत नसल्याने बाहेरचे भांडवल येण्याचीही शक्यता नाही. आणि शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने तो स्वत: नवे भांडवल शेतीत आणू शकण्याची शक्यता नाही हा एक तिढा आहेच. शेतमालाच्या बाजारपेठेवर सरकारी नियंत्रणे असल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचे त्याला कसलेही लाभ नाहीत. आपलेच सरकार आपल्या व्यवसाय स्वातंत्र्यावर बंधने घालते आणि ते आम्ही सहन करतो हा अजब प्रकार देशात घडत आला आहे. त्यात साठवणीसाठी पुरेशी शितगृहे व गोदामे नसल्याने वाया जाणा-या शेतमालामुळे होणारे नुकसान वेगळेच. उदा. २० ते ३०% फळ-फळावळ व भाजीपाला केवळ साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे वाया जातो.



याशिवाय महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करून, त्यांचे आयुष्यमान व दर्जा वाढवून विकण्यासाठी प्रक्रिया उद्योगच नाहीत. भारतात आजमितीला केवळ ३% शेतमालावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे कारखाने आहेत. खरे तर ग्रामीण भागात असे लघु ते मध्यम उद्योग वाढले तर शेतमालाची मूल्यवर्धाक्ता होऊन शेतक-यांचा लाभ वाढू शकतो. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित्यी होऊन ग्रामीण तरुणांचे केवळ शेतीवरील अवलंबित्व दूर होऊ शकते. स्थानिक रोजगार उपलब्ध झाल्याने शहरांकडील विस्थापन थांबून विकेंद्रित विकास साधता येऊ शकतो. वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण कमी होउ शकते. याचा राष्टीय सकल उत्पन्न व उत्पादन वाढण्यात हातभार लागून शेतक-यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते. शेतीवरील भार कमी होऊ शकतो. शेतीच शेतीला तारू शकते.

 

शेतीने अनेक दिग्गज नेते दिले. पण अभावानेच त्यांनी आपली नाळ शेतीशी कायम ठेवली. भारतात दरवर्षी एवढ्या इंजिनियर्सचे पीक येते पण त्यांनी शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी तंत्रे शोधण्याचे मु्ळीच काम केले नाही. अगदी निर्जलीकरणासारख्या जगभर वापरल्या जाणा-या प्रक्रियापद्धतींची साधी तोंडओळखही करून दिली गेली नाही. आपण शिक्षणपद्धतीतून समाजाला पुढे नेण्यासाठी कल्पक विद्यार्थी घडवण्यात सपशेल अपेशी ठरलो आहोत याचा दुसरा काय पुरावा असू शकतो?

शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या ५५% वरून किमान ३०%वर आणणे ही आपल्या अर्थव्यवस्थेची पहिली जबाबदारी आहे. समजा शेतीआधारीत उद्योग वाढवता येत नसतील तर एकच पर्याय आहे व तो म्हणजे मोठ्या प्रमाणात बिगरशेती उद्योगक्षेत्र वाढवत तेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार पाहिजे तर तेवढ्याच लोकांना कौशल्य प्रशिक्षण लागेल. उद्योगक्षेत्र वाढवायचे तर त्यासाठी नवे लघु, मध्यम ते मोठे उद्योजक आहेत त्याच समाजातून पुढे यायला हवेत. त्यासाठी तंत्रज्ञान व भांडवलाची आवश्यकता असेल. नव-उद्योजकांना कर्ज खडे करणे मुश्किल तेथे बाकी भांडवल कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आमच्याकडे मुळात योजनाच नसल्याने आमचा भर विदेशी गुंतवणुकीवरच आहे. पण उद्योगसुलभतेत आमचा क्रमांक ब-यापैकी खाली असल्याने तेही अल्प प्रमाणातच येते आहे. भविष्यात जास्त आले तरी एवढ्या मोठ्या संख्येने ते रोजगार उत्पन्न करू शकणार नाही हे उघड आहे. भारतीयालाच नवा उद्योग सुरु करायचा असेल तर एवढ्या सरकारी कागदोपत्री परवानग्या लागतात की जवळपास एक वर्षाचा वेळ आणि अकारण पैसा त्यातच वाया जातो. शेतीत आहेच तसाच उद्योग जगतातील सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही तोवर शेती व औद्योगिक प्रगतीची शक्यता नाही. जी होईल ती अगदी दहा टक्क्यावर जरी गेली तरी शेतीवरील बोजा हटण्याची त्यामुळे शक्यता नाही.

 

याचाच अर्थ असा की शेतीवरील बोजा सध्या तरी हटवता येईल अशी कोणतीही योजना दृष्टीपथात नाही. किंबहुना अन्य क्षेत्रातील रोजगारच गेल्या दोन वर्षांपासून कमी होत चालल्याने बोजा वाढण्याचीच शक्यता आहे. या स्थितीत सुधारणा करायची तर शेतीपुरक, म्हणजे अगदी निर्जलीकरणापासून ते पशुपालनापर्यंत, लघुत्तम पातळीवर का होईना, पण आधुनिक तंत्रज्ञान सुलभतेने वापरत उद्योग स्वत:च कसे वाढवता येतील हे पहायला पाहिजे. आपले नैसर्गिक साधनसामुग्रीचे स्त्रोत औद्योगिक प्रक्रियेत कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषीसेवा क्षेत्रात अजुनही अनेक क्षेत्रे अस्पर्श आहेत. ती शोधत त्यात व्यवसायांच्या संधी निर्माण करायला हव्यात. यासाठी योजनाबद्ध धोरणांची व व्यवसाय-पूरक धोरणांची गरज आहे.


शेतीचे भवितव्य हे एका अर्थाने देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे. शेतीवरील बोजा हटवायला आम्हालाच पुढे यावे लागेल. नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत उद्योग-व्यवसायाची मानसिकता बनवावी लागेल. त्यासाठी व्यापक सामाजिक प्रयत्नांची गरज आहे. सरकार तसे धोरण बनवणार नसेल तर ते बदनवायला भाग पाडावे लागेल. मुठभरांचाच भांडवलवाद जाऊन बहुसंख्यांकांचा भांडवलवाद समोर आणावा लागेल. सरकार-अवलंबी भूमिकेतून स्वावलंबी भूमिकेत शिरत आपले उत्थान घडवावे लागेल. सरकारचे भूमिका आणि धोरण यात महत्वाची जबाबदारी पार पाडू शकते पण तसे करायची सरकारची स्वत:हून तयारी कधीच नसते. केवळ आश्वासने, गोंडस घोषणा, वेगवेगळ्या आयोगांच्या नेमणूका, कर्जमाफ्या वा वीजबिलमाफ्या आणि निवडणुकांत वाटले जाणारे धन यावरच वंचित लोक संतुष्ट होऊ पाहतात. यातून शेतीवरचा बोजा कमी होण्याची शक्यता नाही. ही आत्मघातकी अल्पसंतुष्टता आम्हाला त्यागावी लागेल. शेती हा नाईलाजाने केला गेलेला उद्योग राहिला तर शेतीचेच भविष्य अंधारात जाईल हेही लक्षात घ्यावे लागेल.

-संजय सोनवणी

Tuesday, November 24, 2020

शेती वाचेल तर देश वाचेल

शेती हा पुरातन उद्योग आहे. मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इ.स. पुर्व किमान १०,००० वर्ष एवढा जातो. तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधु संस्कृतीत शेती ही अत्यंत भरभराटीला आली होती. नद्यांचे प्रवाह बांध घालुन अडवणे, पाटांद्वारे पाणी शेतीला पुरवणे या कला सिंधु मानवाने साधल्या होत्या. त्यामुळेच वैभवशाली अशी ही संस्क्रूती नगररचना, उद्यमी आणि व्यापारातही प्रगत झाली. या संस्कृतीचा व्यापार पार अरब-मेसोपोटेमिया, सुमेरादि देशांपर्यंत पोचला होता. त्याला कारण होते शेतीचे भरभक्कम बळ आणि त्यामुळे आलेली समृद्धी आणि त्यातुनच आलेली साहसी वृत्ती. आजही भारतात ५५% जनसंख्या रोजीरोटीसाठी शेतीवरच अवलंबून आहे. औद्योगिकरणाने अधिकाधिक जनसंख्या सामावून घ्यावी अशी अपेक्षा कोणत्याही विकसनशील अर्थव्यवस्थेकडून असते. पण तसे झाले नाही. आज भारतात दारिद्र्य आहे व असंख्य बेरोजगार तरुण "नोकरीसाठी दाही दिशा" हिंडत असले किंवा आरक्षणाच्या रांगेत असले तरी औद्योगिकरणाचा आणि सरकारी उद्योगांचा वेगही जवळपास थांबलाच असल्याने त्यांना सामावून घेता येणे शक्य नाही. शिवाय शेतीही अनेक कारणांनी तोट्यात जात असल्याने शेती करणे हा आतबट्ट्याचा, किंबहुना आत्महत्याच करायला भाग पाडणारा व्यवसाय बनला आहे. 

२०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सरकारने म्हटले होते. पण ते कसे करणार यासाठी मात्र ठोस उपाययोजना सरकारकडे असल्याचे दिसत नाही. "देशाला अन्नसुरक्षा तर शेतक-याला उत्पन्न सुरक्षा" अशी घोषणाही अरुण जेटली यांनी केली होती. अर्थसुरक्षा हा समाजाचा मुख्य आधार आहे हे तर खरेच आहे. परंतू घोषणांवर कोणाचेही उत्पन्न वाढत नसते याचे भान आपल्या अर्थव्यवस्थेने गमावले आहे. शेती नफ्यात आणने हे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच वेळीस शेतीवर अवलंबून असलेली अवाढव्य जनसंख्या अन्य औद्योगिक क्षेत्राकडे वळवण्याचीही गरज आहे. या दोहोंत समतोल साधला गेल्याखेरीज ना शेतीचा प्रश्न सुटणार ना आचके देत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेची समस्या संपणार. 

शेतीच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण आधी पाहू. शेतीची घटत चाललेली उत्पादकता ही एक मोठी समस्या बनलेली आहे. उदाहणार्थ चीनशीच तुलना केली तर कडधान्यांचे आपले उत्पादन चीनपेक्षा प्रति हेक्टर ३९% नी कमी आहे. भाताच्या बाबतीत हेच प्रमाण ४६% नी कमी आहे. आपण अधिक उत्पादन देऊ शकणा-या बियाण्यांच्या विकासात मागे पडलो हे एक कारण या कमी उत्पादकतेमागे आहे पण त्याही पेक्षा मोठे कारण आहे ते बदलत चाललेल्या पर्यावरणाचे. अवकाळी पाऊस, गारपीट, सुका वा ओला दुष्काळ आपल्या शेतीच्या पाचवीला पुजले आहेत. या बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करुन भारतातील एकंदरीत पीकपद्धतीतच बदल घडवून आणावा यासाठी अनेक शिफारशी होत असतात. पण सरकारी अनास्था विकराळ आहे. ती कशी हे आपण खालील उदाहरणावरून पाहू शकतो.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००८ सालीच हवामान बदलाविरुद्ध राष्ट्रीय योजना (National Action Plan on Climate Change ) घोषित केली होती. त्यामध्ये हवामान बदलाने होणारे दुष्परिणाम रोखणं आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी भविष्यातील योजना ठरवणं हा प्रमुख उद्देश होता. राष्ट्राचा विकासदर अबाधित ठेवायचा असेल आणि नागरिकांच्या एकूणातील राहणीमानात भरच घालायची असेल तर बदलतं हवामान हा त्यातील प्रमुख अडथळा आहे हे त्यांनी ओळखलं होतं असं म्हणायला वाव आहे. ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक नैसर्गिक साधनं (सौर आणि वायु ऊर्जा) वाढवण्यावर या योजनेत भरही दिला गेला होता. हवामान बदलामुळे भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष वाढणार असल्याने पाण्याचं संतुलित संवर्धन करणं आणि त्यासाठी पर्याय शोधणं यावर अधिक भर दिला होता. हरित भारत आणि हिमालयातील पर्यावरणशुद्धी अशाही घोषणा ही योजना आखताना दिल्या गेल्या होत्या.

महाराष्ट्र सरकारनेही केंद्राच्या सूचनेप्रमाणे वातावरणीय बदलावर काम करण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली होती. २००८ साली. महाराष्ट्र सरकारने कथित तत्परता दाखवत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुनिता नारायण, रघुनाथ माशेलकर, अनिक काकोडकर इत्यादी दिग्गजांचा समावेश असलेली जंगी १९ सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने महाराष्ट्रातील हवामान बदलांचा अंदाज घेत राज्य सरकारला उपाययोजना सुचवणं अपेक्षित होतं. पण या समितीने कमाल अशी केली की हे काम दिल्लीच्या द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्युटकडे (टेरी) हे काम रुपये ९८ लाखांच्या फीवर सोपवलं. हे झालं लगोलग, म्हणजे २००९ मध्ये. खरं म्हणजे या समितीची वर्षातून किमान दोन वेळा वातावरण बदलावर चर्चा करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी बैठक घेणं अभिप्रेत होतं. प्रत्यक्षात सुरुवातीच्या ३३ महिन्यांत, म्हणजे जवळपास ३ वर्षांत, या समितीची एकच बैठक झाली. म्हणजे सरकार आणि या समितीचे विद्वान सदस्य याबाबतीत किती गंभीर होते हे दिसून येतं.

बरं टेरीने तरी काय केलं? महाराष्ट्र शासनाने जबाबदारी सोपवून आता दशकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, पण आजतागायत टेरीने कसलाही अहवाल अथवा सूचना सादर केलेल्या नाहीत. पीकपद्धतीत बदल कसा घडवून आणावा यासाठी कसलेही प्रयत्नही झालेले नाहीत. शेतक-यांनीही याबाबत अनास्था दाखवलेली आहे.

आज आपले कृषी संशोधन बेतास बात असून आजही आपण मोन्सेटोकडेच किंवा देशी-विदेशी बियाणे कंपन्यांकडे डोळे लावून बसलेलो आहोत. स्वत:ची निर्माण क्षमता पूर्ण गमावलेली आहे.  जलसंधारणाबाबत आपण उदासीन आहोतच. ज्या अवैज्ञानिक पद्धतीने जलयुक्त शिवार कल्पना राबवली गेली त्यातून जलपर्यावरणाचे हित होण्यापेक्षा दिर्घकालीन नुकसानच होईल असे एकंदरीत दिसते. 

पुढची महत्वाची समस्या म्हणजे शेतीत कोणतेही नवे भांडवल येत नाहीय. त्यामुळे शेतीचे अत्याधुनिकीकरण करणेही असंभाव्य बनलेले आहे. शेतक-यांवर शेतमाल विक्रीबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बंधने असल्याने त्यांचे तर अतोनात नुकसान होतच होते पण आता सरकारने कायदे बदलुनही शेतमाल बाजारपेठा वाढवण्याची व्यवस्थाच केली नसल्याने त्यांना शेवटी बाजार सामित्यांचाच आधार वाटत आहे हे चित्र काय दर्शवते? उद्यमी प्रेरणा या समाजवादाने मारून टाकल्याने नवे शेतमाल व्यावसायिक निर्माण होण्याची शक्यता नाही. शेवटी घाऊक खरेदीसाठी या समित्याच मक्तेदारी जपत राहणार असल्याने किंवा नवे पण मोजके भांडवलदार घाऊक खरेदीदार यातून निर्माण होणार असल्याने शेतक-यांचे कसलेही हित यात नाही. भांडवलदारांचा पाया विस्तृत करणे अभिप्रेत होते हे या नव्या कायद्याने होणार नाही हे उघड आहे. 

कंत्राटी शेती अथवा भाडेपट्ट्यावर शेतजमीनी घेऊन भांडवल ओतत शेतीउत्पादन करू पाहणारे या अडथळ्य़ांमुळे शेतीपासून दूर राहतात असे नीती आयोगच सांगतो. मग शेतीत नवे भांडवल येत तिच्यात कसे प्राण फुंकले जाणार? समाजवादी तत्वांवर आधारीत बंधने किंवा तथाकथित स्वातंत्र्य अंतत: विघातकच ठरतात हा अनुभव असुनही बाजार समित्या आणि जीवनावश्यक वस्तू कायदे हटवले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. आयात-निर्यातीवरही कधीही बंधने घातली जातात, कधीही उठवली जातात ती याच समाजवादी तत्वांमुळे. पण यात अंतत: शेतक-याचे अहित. बाजारभाव बाजाराच्या पद्धतीने ठरू लागले, कोठे विकायचे हे बंधन राहिले नाही आणि बाजारपेठा व्यापक झाल्या तर शेतकरी सुज्ञ आणि बाजार केंद्री निर्णय घेत स्वत:हुनच पीक पद्धती बदलेल हे सरकारच्या गांवीही नाही. 

कमाल जमीनधारणा कायद्यामुळे व्यक्तिगत शेतीक्षेत्राचा विस्तार होण्याऐवजी दिवसेंदिवस तुकडीकरण वाढत चालले आहे. उत्पादकता कमी होत जाण्यामागे हेही महत्वाचे कारण तर आहेच पण यामुळेच शेती करण्यासाठी नवे भांडवलदारही प्रवेशू शकत नाहीत. त्यावरही बंधने आहेत. खरे तर हे संपत्तीच्या अधिकाराच्या घटनात्मक तत्वाविरोधात आहे. पण शेड्य्ल ९ मुळे त्यालाही न्यायालयांत आव्हान देता येत नाही एवढी समाजवादी धोरणांने शेती व शेतक-याची नाकेबंदी करून ठेवली आहे. शेती हा अंगभूत तोट्याचा विषय नसून केवळ शासनप्रणित धोरणांमुळे शेती तोट्यात जात आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

आणि नेमके यामुळेच जागतिकीकरणाचे कसलेही लाभ शेतक-यांपर्यंत पोहोचलेले नाहीत.  किंबहुना उद्योग क्षेत्राला जागतिकीकरणानंतर जे स्वातंत्र्य दिले गेले ते शेती क्षेत्राला दिले गेले नाही. ५५% लोकसंख्या अवलंबुन असलेले क्षेत्र बंदीवासातच राहिले. केवळ १४% रोजगार देणारे उद्योगक्षेत्र मात्र जागतिकीकरणाचे लाभ उचलत राहिले. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण झोणे अनिवार्यच होते. त्यामुळे लोकांत असंतोष उसळणेही स्वाभाविकच होते आणि तो तसा उसळतोही आहे. जर शेतीला चांगले दिवस खरेच आणायचे असतील, शेतक-याचे भविष्य ख-या अर्थाने सुधरवायचे असेल तर तत्काळ काही उपाययोजना केल्या पाहिजेत. सर्वप्रथम जीवनावश्यक वस्तु कायदा, कमाल जमीनधारणा कायदा आणि  जमीन अधिग्रहण कायदा यांना तत्काळ मुठमाती देत शेतमालाचा बाजार ख-या अर्थाने नियंत्रणमुक्त केला पाहिजे. बाजारभाव बाजाराच्याच नियमाने ठरले पाहिजेत. त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. भाजीपाला किंवा अन्नधान्य महाग होऊ नये म्हणून सरकारने अयशस्वी काळजी करण्यापेक्षा नागरिकांचीच क्रयशक्ती वाढेल अशी अर्थरचना करणे गरजेचे नाही काय? अन्नसुरक्षेसाठी शेतक-यांच्या अर्थसुरक्षेला गळफास लावण्याचा अधिकार सरकारला का असावा? आपल्याला हे प्रश्न उपस्थित करणे भाग आहे. शेतीच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. ५५% लोकसंख्येचे हित त्यात सामावलेले आहे.

शेतीचे भविष्य वरील परिप्रेक्षात पाहिले तर ते निश्चितच अंध:कारमय आहे. जागतिक विकसनशील देश, विकसित देश आणि महासत्ता बनू पाहणारा आपला देश यांची तुलना केली तरी आपल्या शेतीची वाटचाल आत्मनाशाच्याच दिशेने सुरु आहे असे स्प्ष्ट दिसते. ५५% लोक शेतीवर अवलंबून असल्याने व त्यांचे अर्थजीवन दिवसेंदिवस ढासळतच चालले असल्याने त्यांना आता शेती नफेदायक ठरेल असे वाटत नाही. पिढ्यानुपिढ्या शेतजमीनीचे तुकडीकरणच होत राहिल्याने उत्पादकता तर घटतेच आहे पण ती कसणे अशक्य होत जानार आहे हेही उघड आहे. भुमीहीन शेतमजुरांची अवस्थाही बिकट होत जाणार आहे. मुळात शेतमजुरी हा अर्धवेळ रोजगार आहे. शेतीचे भवितव्य असे चिंताजनक होत चालले आहे.

बरे आधुनिक पद्धतीने शेती करावी तर सरकारी कायदे हेच मुख्य अडथळे आहेत. म्हणजे शेती ही समस्या नसून सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीच मोठी समस्या बनून बसला आहे. म्हणजे शेतीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर त्यावरही कमाल शेतजमीन मर्यादा कायद्यामुळे ते होऊ शकत नाही. बिगर शेतक-याला शेतजमीन शेतीसाठी विकत घेता येत नसल्याने बाहेरचे भांडवल येण्याचीही शक्यता नाही. आणि शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने तो स्वत: नवे भांडवल शेतीत आणू शकण्याची शक्यता नाही हा एक तिढा आहेच. शेतमालाच्या बाजारपेठेवर सरकारी नियंत्रणे असल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचे त्याला कसलेही लाभ नाहीत. आपलेच सरकार आपल्या व्यवसाय स्वातंत्र्यावर बंधने घालते आणि ते आम्ही शन करतो हा अजब प्रकार देशात घडत आला आहे. त्यात पुरेशी शितगृहे व गोदामे नसल्याने वाया जाणा-या शेतमालामुळे होणारे नुकसान वेगळेच. उदा. २० ते ३०% फळ-फळावळ व भाजीपाला केवळ साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे वाया जातो.

याशिवाय महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करून, त्यांचे आयुष्यमान व दर्जा वाढवून विकण्यासाठी प्रक्रिया उद्योगच नाहीत. भारतात आजमितीला केवळ २% शेतमालावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे कारखाने आहेत. हे प्रमाण न वाढल्याने ना रोजगार निर्मिती होत ना वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण कमी होत. हे नुकसान केवळ शेतक-याचेच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेचेही आहे हे कोण लक्षात घेणार?

शेतीने अनेक दिग्गज नेते दिले. पण अभावानेच त्यांनी आपली नाळ शेतीशी कायम ठेवली. भारतात दरवर्षी एवढ्या इंजिनियर्सचे पीक येते पण त्यांनी शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी तंत्रे शोधण्याचे मु्ळीच काम केले नाही. अगदी निर्जलीकरणासारख्या जगभर वापरल्या जाणा-या प्रक्रियापद्धतींची साधी तोंडओळखही करून दिली गेली नाही. आपण शिक्षणपद्धतीतून समाजाला पुढे नेण्यासाठी कल्पक विद्यार्थी घडवण्यात सपशेल अपेशी ठरलो आहोत याचा दुसरा काय पुरावा असू शकतो?

शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या ५५% वरून किमान ३०%वर आणणे ही आपल्या अर्थव्यवस्थेची पहिली जबाबदारी आहे. हे करायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगक्षेत्र वाढत तेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार पाहिजे तर तेवढ्याच लोकांना कौशल्य प्रशिक्षण लागेल. आता उद्योगक्षेत्र वाढवायचे तर त्यासाठी नवे लघु, मध्यम ते मोठे उद्योजक आहेत त्याच समाजातून पुढे यायला हवेत. त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असेल. नव-उद्योजकांना कर्ज खडे करणे मुश्किल तेथे बाकी भांडवल कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आमच्याकडे मुळात योजनाच नसल्याने आमचा भर विदेशी गुंतवणुकीवरच आहे. पण उद्योगसुलभतेत आमचा क्रमांक ब-यापैकी खाली असल्याने तेही अल्प प्रमाणातच येते आहे. भविष्यात जास्त आले तरी एवढ्या मोठ्या संख्येने ते रोजगार उत्पन्न करू शकणार नाही हे उघड आहे. भारतीयालाच नवा उद्योग सुरु करायचा असेल तर एवढ्या सरकारी कागदोपत्री परवानग्या लागतात की जवळपास एक वर्षाचा वेळ आणि अकारण पैसा त्यातच वाया जातो. समाजवादी व्यवस्थेचे हे अंगभूत वैशिष्ट्य आहे की ते आपल्याच नागरिकांवर विश्वास ठेवत नाही आणि यातुनच मल्ल्यासारखे व्यवस्थेचा साळसुदपणे गैरफायदा घेणारे निर्माण होतात. शेतीत आहेच तसाच उद्योग जगतातील सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही तोवर शेती व औद्योगिक प्रगतीची शक्यता नाही. जी होईल ती अगदी दहा टक्क्यावर जरी गेली तरी शेतीवरील बोजा हटण्याची त्यामुळे शक्यता नाही. यामध्ये भविष्यातील असंतोषाची बीजे आहेत हे आताच ध्यानात घ्यावे लागेल.

याचाच अर्थ असा की शेतीवरील बोजा सध्या तरी हटवता येईल अशी कोणतीही योजना दृष्टीपथात नाही. किंबहुना अन्य क्षेत्रातील रोजगारच गेल्या सहा वर्षांपासून कमी होत चालल्याने बोजा वाढण्याचीच शक्यता आहे. या बेरोजगारीच्या विस्फोटाने आधीच अनेक सामाजिक समस्यांना जन्म दिला आहे. त्यात पुढे भरच पडेल की काय अशी साधार शंका आहेच. त्यामुळे सरकारवर एकीकडे समाजवादी अनावश्यक कायद्यांच्या कचाट्यातून सोडवणूक करण्यासाठी दबाव कायम ठेवत असतांनाच आपल्याला लघुत्तम उद्योगांची वाढ करता येईल काय हे पहायला हवे. शेतीपुरक, म्हणजे अगदी निर्जलीकरणापासून ते पशुपालनापर्यंत, लघुत्तम पातळीवर का होईना, पण आधुनिक तंत्रज्ञान सुलभतेने वापरत उद्योग स्वत:च कसे वाढवता येतील हे पहायला पाहिजे. आपले नैसर्गिक साधनसामुग्रीचे स्त्रोत औद्योगिक प्रक्रियेत कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा क्षेत्रात अजुनही अनेक क्षेत्रे अस्पर्श आहेत. ती शोधत त्यात व्यवसायांच्या संधी निर्माण करायला हव्यात. आपली शिक्षणपद्धती असे तरुण घडवायला अनुकूल नाही. किंबहुना इतिहास-भुगोलात मारत नेत त्याला प्रत्यक्ष जीवनाचे धडे ते देत नाही. आपण यावर या लेखमालिकेत सुरुवातीलाच बरीच चर्चा केली आहे. पण व्यवस्था ते शिक्षण देत नाही म्हणून आपण झापडबंद होत अंधारातच चाचपडत राहण्यात काय हशील? आम्हाला स्वयंशिक्षणाची सवय लावावी लागेल. त्याखेरीज आम्ही शेतीची व म्हणूनच अर्थव्यवस्थेची आव्हाने पेलू शकणार नाही.

शेतीचे भवितव्य हे एका अर्थाने देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे. शेतीवरील बोजा हटवायला आम्हालाच पुढे यावे लागेल. सरकार कायदे बदलणार नसेल तर ते बदलायला भाग पाडावे लागेल. आपल्या लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढवावा लागेल. स्वतंत्रतावादी आर्थिक धोरणे का असावीत हे समजावून घ्यावे लागेल. समाजवाद ऐकायला गोंडस वाटतो पण तो मुठभरांचाच भांडवलवाद जपण्यासाठी व नागरिकांना कंगाल ठेवण्यासाठी असतो हे भारतात गेल्या सत्तर वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शेतकरी, शेतमजूर, भटके-विमिक्त, मेंढपाळ-गोपाळ अजुनही अपवाद वगळता आपले आर्थिक उत्थान घडवू शकलेले नाहीत. किंबहुना त्यांचे शोषणच होत आले आहे. केवळ आश्वासने, वेगवेगळ्या आयोगांच्या नेमणूका आणि निवडणुकांत वाटले जाणारे धन यावरच आम्ही संतुष्ट आहोत. ही आत्मघातकी अल्पसंतुष्टता आम्हाला त्यागावी लागेल. जगात शेती कोठे चालली आहे, तिच्या भविष्यातील दिशा काय असणार आहे यावरही आपण विचार केला पाहिजे. आम्हाला जगाशी स्पर्धा करायची असेल तर प्रथम आमच्या डोळ्यावर पडलेली झापडे आम्हाला हटवावी लागतील.

शेती जागतिक संस्कृतींचा आणि अर्थव्यवस्थान्चा मूलाधार राहिली आहे. आजही भारत सर्व संकटांत तरत असेल तर केवळ शेतीमुळे. आणि तरीही शेतकरीच शोषित रहावा हे नव-उद्योग संस्कृतीचे स्वार्थी अप्पलपोट्टे हुकुमशाहीवादी क्रूर धोरण आहे. शेतीचे पुरातन आणि भविष्यातिलही  महत्व समजून न घेतल्याचे ते लक्षण आहे. शेतकरी नेतेही अप्पलपोट्टे आणि स्वार्थाने मूर्खांच्या हातातील बाव्हले बनलेले गुलाम आहेत हे लपून राहिलेले नाही. स्वतंत्रतावादी तत्वाना मूठमाती देण्याचे धोरण या देशाचे हित करू शकत नाही. “शेती वाचेल तर देश वाचेल” एवढेच काय ते आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे.

-संजय सोनवणी

(सुभाष कच्छवे संपादित भूमिका या दिवाळी विशेषांकात प्रासिद्ध झालेला लेख.)


Wednesday, October 31, 2018

आवश्यक वस्तु कायदा रद्द करा!


Image result for amar habib


आवश्यक वस्तु कायदा (१९५५) घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये घातला गेला. या परिशिष्टाचे वैशिष्ट्य असे की १९७३ पुर्वीच्या या परिशिष्टातील कोणत्याही कायद्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. थोडक्यात न्यायबंदी केली जाते. भारतीय नागरिकांना अशी न्यायबंदी लादून एकार्थाने परतंत्रच केले गेलेले आहे.

या आवश्यक वस्तु कायद्यान्वये शेतमाल, पेट्रोल, खते, औषधे वगैरे अनेक वस्तु सरकारद्वारे साठा, वितरण ते किंमती नियंत्रित केल्या जातात. यातील शेतमाल वगळला जावा अशी शिफारस नीती आयोगाने २०१७ मध्ये केली होती पण त्यावर काही झाले नाही. आणि पेट्रोल जीवनावश्यक वस्तुंमध्ये असुनही त्याच्या किंमती कितीही भडकल्या तरी नियंत्रित केल्या जात नाहीत.

जीवनावश्यक वस्तु कायदा हा इंग्रजांनी १९३९ च्या Defence of India Rules वर आधारीत आहे. युद्धकाळात साठेबाजी करुन अन्नधान्याची टंचाई निर्माण करत पुरवठ्याला बाधा येवू नये म्हणून केला. १९५५ ला भारत सरकारने हा कायदा कायम केला. साठेबाजी होऊन कृत्रीमरित्या किंमती भडकु नयेत म्हणून हे नियंत्रण आणले गेले. आणीबाणीच्या काळात या कायद्याचा कठोर उपयोग केला गेला कारण दुष्काळाची स्थिती होती. ग्राहकांना कांदा-बटाट्यासारख्या शेतमालाच्या अवास्तव किंमती मोजाव्या लागु नये असा हेतु असला तरी शेतक-याला मिळणारी किंमत व बाजारपेठेतील किंमत यात कधीही तारतम्य राहिले नाही. परिणामी हा कायदा ना शेतक-यांच्या कामी आला ना ग्राहकांच्या. अलीकडेच आपण तुरीबाबत काय झाले हे पाहिले आहे. दिल्लीतील सरकार कांदा भडकल्यानेच गडगडले होते हे एक उदाहरण. किंबहुना शेतक-यांच्या दुर्दशेला हा कायदा कारण बनला आहे. आपल्याच उत्पादनाची किंमत ठरवण्याचा शेतक-याचा अधिकार या परिशिष्टाने हिरावुन घेतला आहे. शेतक-याच्या स्वातंत्र्यावर घातला गेलेला हा घाला आहे. त्याचे अर्थजीवन यामुळे उध्वस्त झाले आहे.

अन्य कोनत्याही वस्तुंच्या किंमती कमी वा अधिक (म्हणजे शक्यतो अधिकच) झाल्या तरी बेपर्वा असलेले ग्राहम शेतमालाच्या किंमतीबद्दल फार म्हणजे फार जागृत असतात. पेट्रोलही जीवनावश्यक वस्तुत येते पण त्याचे भाव त्याच न्यायाने कमी का केले जात नाहीत हे विचारायला विसरत पंपावर रांगा लावायला ते सज्ज असतात. हा भारतीय नागरिकांचा दांभिकपणा आहे एवढेच.

शेतमाल या कायद्यातुन वगळला गेला तर बाजारात अधिक स्पर्धात्मकता येईल, हाताळणी खर्च कमी होईल, शेतमालावर आधारीत प्रक्रिया उद्योग वाढतील, मागणी-पुरवठा या तत्वावर किंमती ठरतील, शेतमाल कधी, कोठे, कसा विकावा, आयात काय करावे व निर्यात काय करावे याचे स्वातंत्र्य शेतमाल बाजारपेठेला मिळेल व आडत्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि शेतक-याला योग्य किंमती मिळण्याचा मार्ग सुकर होईल. त्याच वेळीस हमीभावाच्या चक्रातुन सरकारचीही सुटका होईल आणि शेतकरी आपल्या पीकांत खुल्या बाजारपेठेला साजेशा पीकवैविध्याची कास धरतील. आणि यातुन शेतमाल महाग होणार नाही तर बाजारपेठेतच स्पर्धात्मकता येत आडत्यांची मक्तेदारी दुर होत त्या किंमती बाजारपेठ नियंत्रित करेल व याचा लाभ उत्पादकाला म्हणजेच शेतक-याला होईल. 

सध्या शेतमालाचा साठा किती करायचा यावर बंधने असल्याने रिटेल चेन्स प्रभावी ठरत नाहीत. शिवाय या यादीत कधी काय घालायचे आणि कधी काय वगळायचे याचे निर्णय भ्रष्ट बाबु घेत असल्याने या क्षेत्रात बाह्य गुंतवणुकही मर्यादित होते. आणि या प्रकरनात जे खरे साठेबाज असतात ते मात्र कधीच उजेडात येत नाहीत.

या कायद्याने उपभोक्त्यांचीही लुट चालवली तर आहेच पण सर्वात मोठा फटका शेतक-यांच्या आर्थिक जीवनावर पडला आहे.

या कायद्यातुन किमान शेतमाल पुर्णतया वगळने अत्यावश्यक झाले आहे ते यामुळेच. शेतक-यांचे व्यवसाय स्वातंत्र्य धोक्यात आणुन घटनात्मक व्यवसाय स्वातंत्र्याचा गळा या कायद्याने घोटला आहे.

शेतक-याला आणि शेतमालाचा व्यवसाय करु इच्छिणा-यांना स्वातंत्र्य द्या ही पारतंत्र्यात असलेले शेतकरी मागणी करत आहेत!

अमर हबीबांचे किसानपुत्र आंदोलन यातुनच उभे राहिले आहे.  हा कायदा रद्द व्हावा अशी त्यांची व त्यांच्या माझ्यासारख्या असंख्य सोबत्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य होणे काळाची गरज आहे.

Sunday, June 3, 2018

रब्बीने तारले व सरकारने मारले!


Image result for farmers throwing onion


आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव भडकत असतांनाच रुपया मात्र कोसळत आहे. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार रुपयाचे १६% ने अवमुल्यन झाले आहे. करंसी मार्केटमधील तज्ञांच्या मतानुसार हे अवमुल्यन लवकरच २०% ची पातळी गाठेल. म्हणजे एकीकडे तेल संकट तर दुसरीकडे रुपयाचे अवमुल्यन या दुहेरी पेचात मोदी सर्कार आता सापडले आहे. गेल्या चार वर्षात आधी तेलाचे भाव कोसळत पार २८ डॉलर प्रतिपिंपामागे खाली उतरुनही मोदी सरकारने ग्राहकांना त्याचा लाभ दिला नाही. पर्यायाने सरकारी उत्पन्न बेरोकटोक चालू राहिल्याने वित्तीय तुटीत जेवढी भर पडली असती ती पडली नाही. एका अर्थाने आर्थिक आघाड्यांवर अपयश येत असतांनाही तेलाने या सरकारला तारले असे म्हणता येते. यंदा रब्बी हंगामात विक्रमी पीक आले आहे. त्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनात होत असलेल्या वाढीमुळे जीडीपी ७.७% पर्यंत जाईल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिला आहे. यामुळे गेल्या चार वर्षात ढासललेली अर्थव्यवस्था मुळपदावर आल्यासारखे जरी वाटले तरी प्रर्त्यक्षात ते चित्र नाही कारण मुडीजने मात्र जीडीपीतील वाढ मात्र ही वाढ ७.३% एवढीच होणार असल्याचा अंदाज वर्तवत आपले पतमानांकन कमी केलेले आहे.

जीडीपी मोजण्याचे निकष बदलले असल्याने कागदोपत्री जरी आकडे काहीही सांगत असले तरी जुन्या पद्धतीने आपला पुर्वी जाहीर होणारा विकास दर या नव्या पद्धतीच्या मोजमापापेक्षा किमान दीड टक्का एवढा कमीच असतो. किंबहुना जीडीपी मोजण्याचे निकष सारे काही आलबेल आहे हे दर्शवण्यासाठीच केला जातो. म्हणजेच हा आकड्यांचा खेळ ठरतो. यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्याने रब्बी हंगामातही विक्रमी पीक आले. त्याची नोंद या वरकरणी वाढलेल्या अंदाजित जीडीपी दराने घेतली असली तरी प्रत्यक्षत शेतक-यांना त्याचा लाभ मिळेल काय हा प्रश्न आहे. किंबहुना कांदा उत्पादक शेतक-यांपुढे आता जी दर कोसळल्याची समस्या उभी ठाकली आहे त्यामुळे उत्पादन अधिक येवुनही शेतक-यांना आणि म्हणजेच ओपर्यायाने अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होण्याची शक्यता नाही.

याचे कारण असे आहे की उत्पादन निर्यात योजना विभागाने ताज्या कांद्यांच्या केवळ २% निर्यातीवर अनुद्फ़ान जाहीर केले आहे तर निर्जलीकरण केलेल्या कांद्याची मात्र ३ टक्क्यावरुन पाच टक्क्यापर्यंत वाढवली. हाही एक तुघलकी निर्णय असल्याने कांदा निर्यातदारांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. या योजनेत ताजा कांदा किमान ७% निर्यातयोग्य असावा या मागणीला हरताळ फासण्यात आला.  मुळात निर्जलीकृत कांदा प्रक्रिया उद्योगच मुळात देशात अल्प असल्याने त्यांना लाभ देऊन अन्य कांदा उत्पादकांना त्यापासून वंचित ठेवणे हे योग्य धोरण म्हणता येणार नाही. तसेच अन्य अन्न-धान्य पीकांचे होणार आणि शेतक-यांना उत्पादन घेऊनही आर्थिक विवंचनेत रहावे लागणार हे उघड आहे. आहे त्या हमीभावातही सरकार अतिरिक्त उत्पादन खरेदी करत नाही हे वास्तव तुरीच्या बाबतीत शेतक-यांनी भोगलेच आहे. आता शेतकरी मोठ्या प्रमानावर संपावर जात आहेत याचे कारण या सरकारच्या आर्थिक धोरणात आहे. शेवटी आर्थिक वाढ ही लोकांच्या जीवनमानात होण-या प्रत्यक्ष फरकातून दिसून येते, मग आकडेवा-या काहीही सांगोत. कांद्याच्याच तीस रुपये किलोपर्यंत गेलेल्या किंमती मार्चनंतर आता दहा रुपयांच्या खाली आल्या आहेत. याच्व्हा दुसरा अर्थ असा की उत्पादन वाढुनही एकुण उत्पन्नात कसलाही फरक पडलेला नाही. याला अर्थव्यवस्थेतील सुधारणा म्हणता येणार नाही.

यंदा सरासरीएवढा पाऊस होईल असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. याचा अर्थ यंदाही विक्रमी उत्पादन होईल अशी आशा आहे. सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी पाळण्याची शक्यता नाही. शेतक-यांना आयात-निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेतही स्वातंत्र्य देण्याची शक्यता नाही. बरे, जो हमीभाव जाहीर केला जातो त्यचे निकष कितीही अवैज्ञानिक असले तरी तेही किमान शेतक-यांच्या हातात पडत नाही. त्यामुळे या सरकारला शेतीप्रश्न आणि शेतीची अर्थव्यवस्था याचे कितपत भान आहे हा प्रश्नच आहे. या देशाचे कृषीमंत्री कोण हे सर्वसामान्यांना माहितही नसते. पण आता शेतकरी संपाला "राजकीय" स्टंट" म्हणत नको त्यामुळे आपले कृषीमंत्र्यांनी आपले अस्तित्व वादग्रस्त विधानातून दाखवून दिले आहे. या सरकारचे बहुतेक मंत्री लोकांना माहित होतात ते सकारात्मक कृतीशिल निर्णयांमुळे व तेवढ्याच ठोस अंमलबजावणीमुळे नाही तर अशा वादग्रस्त विधानांमुळे ही या सरकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल. कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी शेतक-यांच्या संपाबाबत असे अवमानकारक विधान करून आपल्या सरकारची शेतक-यांच्या प्रती असलेली असंवेदनशिलताच प्रकट केली आहे असे म्हणायला हरकत नाही. मुळात शेतकरी असंघटित आहे. आपल रोष नेमका कसा व्यक्त करावा हे त्यांना समजत नाही. त्यांच्यातुनच येणा-य नेत्यांनीही त्यंचा मतांपुरता फायदा घेतल्याचे आजवरचे चित्र आहे. मोदी सरकारही शेतक-यांबद्दल बोलत असले तरी प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विघातक आहे. त्यामुळे शेतकरी रोषाला "स्टंट" अशी संभावना करुन आपण अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या घटकाला अपमानित करतो आहोत याचे भान अर्थातच या सरकारला नाही.

असे असले तरी जीडीपीची वाढ अशा उत्पादनवाढीमुळे दर्शवता येते. तेलाने आता मारायला सुरुवात केली असली तरी मान्सुनने तारले आहे असे चित्र दिसते आहे. समस्या ही आहे की मुलात उत्पादकांच्या आर्थिक स्थितीत यामुळे काहीएक फरक पडणार नसेल तर ती आकडेवारी केवळ शेतीबाह्य असलेल्या भक्त संप्रदायाला मोहित करू शकेल. शेवटी नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याखेरीज अर्थव्यवस्था खरे बळ पकडत नाही. आज भारतात काम मागणारे सव्वा तीन कोटी बेरोजगार आहेत. रोजगार निर्मितीचा दर कधी नव्हे एवढा खालावला आहे. थोडक्यात हे तरुण आज अर्थव्यवस्थेवर ओझे बनून बसले आहेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ गेल्या चार वर्षांत मंदावू तर लागलाच आहे पण वस्तु-उत्पादन ते खाणक्षेत्रात सातत्याने अस्थिरता राहिली आहे. वित्तीय संस्था अनुत्पादक कर्जांच्या ओझ्याखाली चिरडल्या गेल्या आहेत. आर्थिक चलन-वलन ढासळले की कर्जफेडीवर मर्यादा येतात. उद्योग-व्यवसाय भरभराटीला येतील अशी धोरणे व आर्थिक वातावरण असेल तर अशी संकटे येण्याचे कारण नाही. वित्तीय संस्थाच जेंव्हा अडचणीत येतात तेंव्हा अर्थव्यवस्था कोनत्या पायरीवर उभी आहे याची सहज कल्पना येते. त्यात शेतीवर कोसळवले जाणारे सरकारनिर्मित संकट. म्हनजे मान्सुनने तारले आणि सरकारने मारले अशी अवस्था विक्रमी पीक घेऊनही शेतक-यांवर येईल. आवश्यकता नसतांना आयात करण्याचे निर्णय घेणारे सरकार आवश्यकता असतांना निर्यात मात्र करु देत नाही हे आपण तुर आणि आता कांद्याच्या बाबतीत पहातो आहे. आणि सरकारच्या दृष्टीने म्हणावे तर आता तेलाने मारले पण मान्सुनने तारले अशी अवस्था आहे. पण हे शेवटी कागदोपत्री आहे. प्रत्यक्ष अर्थस्थिती नवे नवे तळ गाठत आहे. चुकीच्या अर्थधोरणाने ही परिस्थिती ओढवावी हे अजुन दुर्दैवी आहे. 

(आज दिव्य मराठीत प्रकाशित झालेला लेख)

Saturday, September 9, 2017

जागतीक शेतीचे भविष्य आणि आपण!


Inline image 1




आपण भारतीय शेतीसमोरील समस्या थोडक्यात पाहिल्या. भारतीय शेतीच्या समस्या या बाजारपेठ निर्मित नसून बव्हंशी सरकारी धोरणांमुळे निर्माण झाल्या आहेत असेही आपण पाहिले. जागतिक शेतीकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर तिच्यापुढे मात्र वेगळ्याच समस्या आहेत. आपल्या शेतीलाही त्या समस्या लागू पडत असल्या तरी त्याकडे आपले लक्ष जायला कोणाला वेळच मिळत नाही हेही एक वास्तव आहे. या समस्यांवर मात करत भविष्यातील आव्हानांना कसे तोंड द्यायचे यावर जागतिक शेती व अर्थतज्ञ आतापासून दिर्घकालीन योजना आखण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा आढावा आपण येथे घेण्याचा प्रयत्न करुयात.

यंदाच भविष्यातील शेती व  आव्हाने यावर युनोच्या फुड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या अहवालात सुरुवातीलाच इशारा देण्यात आला आहे की "मनुष्यजातीची पोट भरण्याची क्षमता धोक्यात येत असून त्यामागे नैसर्गिक साधनसामग्रीवरील वाढत चाललेला भार, वाढती विषमता आणि बदलते पर्यावरण ही कारणे आहेत. जगातील भुकबळींची व कुपोषणाची समस्या ब-याच अंशी कमी करण्यात यश लाभले असले तरी आता अधिक अन्नोत्पादन आणि आर्थिक विकासाचा दर टिकवणे हे पर्यावरणाचा नाश करुनच साध्य होईल!" 

एकीकडॆ पर्यावरणाचा शेतीच्या विस्तारामुळे होत असलेला नाश आणि त्याच वेळीस हवामान बदलामुळे उभे ठाकलेले प्राकृतिक संकट या पेचातून कसा मार्ग काढायचा याबद्दल जागतिक चिंता आहे. उदाहरणार्थ शेतजमीनींच्या विस्तारामुळे जगातील अर्धेअधिक अरण्यांचे छत्र आज नष्ट झालेले आहे. भुजल पातळीत लक्षणीय घट झाली असून जैववैविध्यही संपुष्टात येत आहे. जमीनींचा दर्जा खालावत चालला आहे. कारखाने व वाहनांमुळेच पर्यावरण प्रदुषित होत नसून शेतीचा होत असलेला विस्तारही त्याला कारण आहे. बरे, शेतीचा विस्तार केल्याखेरीज जगातील एकंदरीत अन्नाची गरज भागवली जाणार नाही व कुपोषण थांबणार नाही. अन्नाची गरज वाढतच जाणार याचे कारण म्हणजे अनियंत्रितपणे वाढत चाललेली जनसंख्या. २०५० सालापर्यंत जगाची लोकसंख्या दहा अब्जापर्यंत पोहोचलेली असेल. त्यात वाढत्या आयुर्मानामुळे वाढणारा बोजा वेगळाच. यामुळे नैसर्गिक संसाधनांवरचा बोजा पेलण्यापलीकडे वाढेल अशी भिती तज्ञांनाही वाटत असल्यास नवल नाही.

आज शेतीची उत्पादकता वाढण्याऐवजी स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे. अगदी जेनेटिकली मोडिफाईड बियाण्यांच्या वापरानेही उत्पादकतेत क्रांतीकारी बदल होनार नाही. हा अहवालच सांगतोय की भात व अन्य अन्नधान्याच्या उत्पादकतेत १९९० नंतरची दरवर्षीची वाढ एक टक्क्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे सर्व जागतिक सरकारांनी कितीही प्रयत्न केला तरी कुपोषणाची समस्या संपण्याची शक्यता नाही हे उघड आहे. त्यामुळे शेतीपद्धतीच क्रांतीकारी बदल करावा लागेल व नैसर्गिक संसाधनांवर ताण न वाढवता उत्पादन वाढवावे लागेल असे तज्ञ म्हणतात. यासाठी एकंदरीत अर्थव्यवस्थेला ग्रामकेंद्रीत बनावे लागेल व गरीबांचे उत्पन्न कसे वाढेल हे प्रत्येक देशातील अर्थव्यवस्थेला बघावे लागेल. त्यामुळे बहुमजली शेती ही संकल्पना रुजत फोफावण्याची शक्यता आहे कारण त्याशिवाय पुढील आव्हाने पेलता येणार नाहीत.

या पार्श्वभुमीवर भारतीय शेतीचे चित्र काय आहे? आपली शेती २०५० साली कोठे असेल? आपली लोकसंख्या तोवर अडिच अब्जाचा आकडा ओलांडून बसली असेल. आपल्या शेतीचे आजच एवढे तुकडे पडले आहेत की भविष्यात चार-सहा गुंठ्यापर्यंत हे क्षेत्र प्रतिशेतकरी घटेल. त्यातील उत्पन्नावर तो जगणे अशक्य आहे. जरी समजा इतर क्षेत्रातील रोजगार वाढल्यामुळे शेतीवरील भार कमी झाला तरी त्याच वेळीस लोकसंख्याही वाढत असल्याने हे चित्र बदलण्याची सुतराम शक्यता नाही. बरे, सरकारी अनास्था एवढी आहे की एकीकडे कुपोषणाच्या बाबतीत आपला क्रमांक फार वरचा लागत आहे आणि दुसरीकडे साठवणूक क्षमता आणि प्रक्रिया उद्योगांच्या अभावात लक्षावधी टन अन्नधान्य, फळफळावळ आणि भाजीपाला वाया जात आहेत. शेतीतील व्यवस्थापन आजही मध्ययुगीनच असून कार्पोरेट पद्धतीचे व्यवस्थापन आपल्याला सुचलेले नाही. आणि सुचले तरी कमाल जमीनधारणा कायद्यामुळे त्यात अडचणी आहेत. तरीही शेतकरी एकत्र येत कंपन्या स्थापन करत कॉर्पोरेट शेती करू शकतात पण आज तरी या बाबतीत शेतक-यांचाच प्रतिसाद उत्साहवर्धक नाही हे मी माझ्या "कॉर्पोरेट व्हिलेज : एक गांव-एक कंपनी-एक व्यवस्थापन" या पुस्तकाच्या निमित्ताने अनुभवले आहे. या बाबतीत आपल्याला आजच जागरण करत त्या दिशेने पावले टाकावी लागतील हे निश्चित आहे.

आधुनिक यंत्रांचा, संगणकांचा वापर आपल्याला वाढवावा लागेल. पाश्चात्य जगात हरघडी बदलते जागतीक बाजारभाव शेतक-याला हातातील मोबाईलवर उपलब्ध असतात. शेती ते थेट ग्राहक ही मार्केटिंगची संकल्पना आपल्याकडे आजकाल लोकप्रिय होत असली तरी त्यात खरोखर शेतकरी किती असतात हा संशोधनाचा विषय आहे. शेतमालाचे जगातील सोडा, पण आपल्याच देशातील विविध कृषीउत्पन्न बाजार समित्यांतील आजचे भाव काय आहेत हे समजणारी कार्यक्षम यंत्रणा आपल्याकडे अजुनही नाही. शेतमालाचे ब्रांडिग हवे पण ते केले जात नाही. त्यामुळे शेतकरी दुरच राहतो व मध्यस्थांचे फावते. सरकार काय करेल यावर अवलंबून न बसता आपल्याच शेतक-यांनी आता आपल्या उत्पन्नाचे मार्ग वाढवले पाहिजेत. शेतमाल प्रक्रिया उद्योगांत शिस्तबद्ध वाढ घदवणे, पुरेशी गोदामे व शितगृहे वाढवणे ही कामे आपल्या अर्थव्यवस्थेला तातडीने हातात घ्यावी लागतील.

पीकपद्धतीत बाजारकेंद्री बदल करणे हे आपल्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. हमीभावाच्या नादात तोच सोया व तोच कापूस करत बसत आपण आपले दिर्घकालीन नुकसान करून घेत आहोत हे समजायला हवे व पीकपद्धतीत समतोल वैविध्य आणले पाहिजे. आजच्या जगात जो बाजारकेंद्री आहे तोच टिकेल. शेतक-यांचे उत्पन्न वाढलेच पाहिजे. शेतमाल परवडतो की ना परवडतो हे ग्राहकावर सोपवून द्यावे. ग्राहकांची क्रयशक्ती वाढवायचे काम स्वत: ग्राहकाचे आहे, शेतक-याच्या हिताचा बळी देऊन ते काम सरकारने करू नये हा साधा अर्थशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे महाग-स्वस्त या वल्गना करण्याचा अधिकार कोणालाही नाही. बाजाराच्या नियमाने शेतीही चालली पाहिजे. त्याशिवाय अर्थव्यवस्थेला उभारी मिळनार नाही. शेती एवढी गरीब आहे की कुपोषणाला बळी पडणा-यांत आपल्या देशात शेतकरीच, विशेषत: शेतकरी स्त्रीयाच असाव्यात ही बाब धक्कादायकच नव्हे तर लाजेने मान खाली घालायला लावणारी आहे. 

शेतकरी सक्षम, शेती-सुविद्य केल्याखेरीज व अर्थव्यवस्था ही शेतील प्राधान्य देणारी असले पाहिजे. अन्यथा २०५० पर्यंत आपली अवस्था "भुकबळींनी ग्रस्त देश" अशी होईल. हा भविष्याचा इशारा आहे. आपल्याला आताच काळजी घेतली पाहिजे. सरकारने सर्वप्रथम शेतकरी व शेतीला गळफास घालणारे कायदे रद्द करत या एकविसाव्या शतकातील शेतकी क्रांतीची सुरुवात केली पाहिजे. अन्यथा आपले भविष्य काय असेल हे सुर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे!

-संजय सोनवणी
(Published in dainik Sanchar, Indradhanu supplement)

Saturday, September 2, 2017

शेतीवरचा बोजा कसा हटवायचा?


Inline image 1


शेतीचे भविष्य आजच्या वर्तमानतील परिप्रेक्षात पाहिले तर ते निश्चितच अंध:कारमय आहे. जागतिक विकसनशील देश, विकसित देश आणि महासत्ता बनू पाहणारा आपला देश यांची तुलना केली तरी आपल्या शेतीची वाटचाल आत्मनाशाच्याच दिशेने सुरु आहे से स्प्ष्ट दिसते. ५५% लोक शेतीवर अवलंबून असल्याने व त्यांचे अर्थजीवन दिवसेंदिवस ढासळतच चालले असल्याने त्यांना आता शेती नफेदायक ठरेल असे वाटत नाही. पिढ्यानुपिढ्या शेतजमीनीचे तुकडीकरणच होत राहिल्याने उत्पादकता तर घटतेच आहे पण ती कसणे अशक्य होत जानार आहे हेही उघड आहे. भुमीहीन शेतमजुरांची अवस्थाही बिकट होत जाणार आहे. मुळात शेतमजुरी हा अर्धवेळ रोजगार आहे. शेतीचे भवितव्य असे चिंताजनक होत चालले आहे.

बरे आधुनिक पद्धतीने शेती करावी तर सरकारी कायदे हेच मुख्य अडथळे आहेत. म्हणजे शेती ही समस्या नसून सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीच मोठी समस्या बनून बसला आहे. म्हणजे शेतीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर त्यावरही कमाल शेतजमीन मर्यादा कायद्यामुळे ते होऊ शकत नाही. बिगर शेतक-याला शेतजमीन शेतीसाठी विकत घेता येत नसल्याने बाहेरचे भांडवल येण्याचीही शक्यता नाही. आणि शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने तो स्वत: नवे भांडवल शेतीत आणू शकण्याची शक्यता नाही हा एक तिढा आहेच. शेतमालाच्या बाजारपेठेवर सरकारी नियंत्रणे असल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचे त्याला कसलेही लाभ नाहीत. आपलेच सरकार आपल्या व्यवसाय स्वातंत्र्यावर बंधने घालते आणि ते आम्ही शन करतो हा अजब प्रकार देशात घडत आला आहे. त्यात पुरेशी शितगृहे व गोदामे नसल्याने वाया जाणा-या शेतमालामुळे होणारे नुकसान वेगळेच. उदा. २० ते ३०% फळ-फळावळ व भाजीपाला केवळ साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे वाया जातो.

याशिवाय महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करून, त्यांचे आयुष्यमान व दर्जा वाढवून विकण्यासाठी प्रक्रिया उद्योगच नाहीत. भारतात आजमितीला केवळ २% शेतमालावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे कारखाने आहेत. हे प्रमाण न वाढल्याने ना रोजगार निर्मिती होत ना वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण कमी होत. हे नुकसान केवळ शेतक-याचेच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेचेही आहे हे कोण लक्षात घेणार?

शेतीने अनेक दिग्गज नेते दिले. पण अभावानेच त्यांनी आपली नाळ शेतीशी कायम ठेवली. भारतात दरवर्षी एवढ्या इंजिनियर्सचे पीक येते पण त्यांनी शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी तंत्रे शोधण्याचे मु्ळीच काम केले नाही. अगदी निर्जलीकरणासारख्या जगभर वापरल्या जाणा-या प्रक्रियापद्धतींची साधी तोंडओळखही करून दिली गेली नाही. आपण शिक्षणपद्धतीतून समाजाला पुढे नेण्यासाठी कल्पक विद्यार्थी घडवण्यात सपशेल अपेशी ठरलो आहोत याचा दुसरा काय पुरावा असू शकतो?

शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या ५५% वरून किमान ३०%वर आणणे ही आपल्या अर्थव्यवस्थेची पहिली जबाबदारी आहे. हे करायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगक्षेत्र वाढत तेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार पाहिजे तर तेवढ्याच लोकांना कौशल्य प्रशिक्षण लागेल. आता उद्योगक्षेत्र वाढवायचे तर त्यासाठी नवे लघु, मध्यम ते मोठे उद्योजक आहेत त्याच समाजातून पुढे यायला हवेत. त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असेल. नव-उद्योजकांना कर्ज खडे करणे मुश्किल तेथे बाकी भांडवल कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आमच्याकडे मुळात योजनाच नसल्याने आमचा भर विदेशी गुंतवणुकीवरच आहे. पण उद्योगसुलभतेत आमचा क्रमांक ब-यापैकी खाली असल्याने तेही अल्प प्रमाणातच येते आहे. भविष्यात जास्त आले तरी एवढ्या मोठ्या संख्येने ते रोजगार उत्पन्न करू शकणार नाही हे उघड आहे. भारतीयालाच नवा उद्योग सुरु करायचा असेल तर एवढ्या सरकारी कागदोपत्री परवानग्या लागतात की जवळपास एक वर्षाचा वेळ आणि अकारण पैसा त्यातच वाया जातो. समाजवादी व्यवस्थेचे हे अंगभूत वैशिष्ट्य आहे की ते आपल्याच नागरिकांवर विश्वास ठेवत नाही आणि यातुनच मल्ल्यासारखे व्यवस्थेचा साळसुदपणे गैरफायदा घेणारे निर्माण होतात. शेतीत आहेच तसाच उद्योग जगतातील सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही तोवर शेती व औद्योगिक प्रगतीची शक्यता नाही. जी होईल ती अगदी दहा टक्क्यावर जरी गेली तरी शेतीवरील बोजा हटण्याची त्यामुळे शक्यता नाही. यामध्ये भविष्यातील असंतोषाची बीजे आहेत हे आताच ध्यानात घ्यावे लागेल.

याचाच अर्थ असा की शेतीवरील बोजा सध्या तरी हटवता येईल अशी कोणतीही योजना दृष्टीपथात नाही. किंबहुना अन्य क्षेत्रातील रोजगारच गेल्या दोन वर्षांपासून कमी होत चालल्याने बोजा वाढण्याचीच शक्यता आहे. या बेरोजगारीच्या विस्फोटाने आधीच अनेक सामाजिक समस्यांना जन्म दिला आहे. त्यात पुढे भरच पडेल की काय अशी साधार शंका आहेच. त्यामुळे सरकारवर एकीकडे समाजवादी अनावश्यक कायद्यांच्या कचाट्यातून सोडवणूक करण्यासाठी दबाव कायम ठेवत असतांनाच आपल्याला लघुत्तम उद्योगांची वाढ करता येईल काय हे पहायला हवे. शेतीपुरक, म्हणजे अगदी निर्जलीकरणापासून ते पशुपालनापर्यंत, लघुत्तम पातळीवर का होईना, पण आधुनिक तंत्रज्ञान सुलभतेने वापरत उद्योग स्वत:च कसे वाढवता येतील हे पहायला पाहिजे. आपले नैसर्गिक साधनसामुग्रीचे स्त्रोत औद्योगिक प्रक्रियेत कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा क्षेत्रात अजुनही अनेक क्षेत्रे अस्पर्श आहेत. ती शोधत त्यात व्यवसायांच्या संधी निर्माण करायला हव्यात. आपली शिक्षणपद्धती असे तरुण घडवायला अनुकूल नाही. किंबहुना इतिहास-भुगोलात मारत नेत त्याला प्रत्यक्ष जीवनाचे धडे ते देत नाही. आपण यावर या लेखमालिकेत सुरुवातीलाच बरीच चर्चा केली आहे. पण व्यवस्था ते शिक्षण देत नाही म्हणून आपण झापडबंद होत अंधारातच चाचपडत राहण्यात काय हशील? आम्हाला स्वयंशिक्षणाची सवय लावावी लागेल. त्याखेरीज आम्ही शेतीची व म्हणूनच अर्थव्यवस्थेची आव्हाने पेलू शकणार नाही.

शेतीचे भवितव्य हे एका अर्थाने देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे. शेतीवरील बोजा हटवायला आम्हालाच पुढे यावे लागेल. सरकार कायदे बदलणार नसेल तर ते बदलायला भाग पाडावे लागेल. आपल्या लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढवावा लागेल. स्वतंत्रतावादी आर्थिक धोरणे का असावीत हे समजावून घ्यावे लागेल. समाजवाद ऐकायला गोंडस वाटतो पण तो मुठभरांचाच भांडवलवाद जपण्यासाठी व नागरिकांना कंगाल ठेवण्यासाठी असतो हे भारतात गेल्या सत्तर वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शेतकरी, शेतमजूर, भटके-विमिक्त, मेंढपाळ-गोपाळ अजुनही अपवाद वगळता आपले आर्थिक उत्थान घडवू शकलेले नाहीत. किंबहुना त्यांचे शोषणच होत आले आहे. केवळ आश्वासने, वेगवेगळ्या आयोगांच्या नेमणूका आणि निवडणुकांत वाटले जाणारे धन यावरच आम्ही संतुष्ट आहोत. ही आत्मघातकी अल्पसंतुष्टता आम्हाला त्यागावी लागेल. जगात शेती कोठे चालली आहे, तिच्या भविष्यातील दिशा काय असणार आहेत यावरही आपण विचार करू. आम्हाला जगाशी स्पर्धा करायची असेल तर प्रथम आमच्या डोळ्यावर पडलेली झापडे आम्हाला हटवावी लागतील.

सिंधू लिपीचे कोडे!

  (महाराष्ट्र टाईम्स, संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.) सिंधू लिपी आजही कोडे बनून बसलेली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकत...