Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts
Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts

Friday, October 24, 2025

व्रात्य कोण होते?

 हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे अथवा प्रतिज्ञाचे पालन करण्यावर व आत्मसंयमावर विशेष भर असतो. वैदिक साहित्यात जे वैदिक धर्मनियमांचे पालन करत नाहीत आणि स्वत:चीच स्वतंत्र साधना पद्धती वापरतात आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच महाव्रतांचे पालन करतात ते व्रात्य असे नमूद केलेले आहे. जैन धर्मियांची ही मान्यता आहे. 

 

पण वैदिक साहित्यात अव्त्र्णारे व्रात्य नेमके कोण होते याबाबत विद्वानांत अनेक मत-मतांतरे आहेत. व्रात्य हा शब्द वैदिक साहित्यात इतक्या परस्परविरोधी अर्थाने वापरला गेला आहे कि गोंधळ होणे स्वाभाविक आहे. वर्णसंस्कारलोप झालेले वैदिक म्हणजे व्रात्य या अर्थापासून ते व्रत करणारे व्रती म्हणजे व्रात्य, समूहातून च्युत झालेले ते व्रात्य (पाणिनी अष्टाध्यायी ४/३/५४). लाट्यायन श्रौतसूत्रानुसार (८/५/२) व्रतीन म्हणजे लुटमार करून जगतात ते आयुधजीवी म्हणजे व्रात्य, तांड्य ब्राह्मणानुसार लाकडी तख्त असलेल्या गाडीतून, हाती बिनादोर किंवा बाण नसलेले धनुष्य घेऊन हवे तिथे फिरणारे आणि नृत्य, संगीत इ. विद्या मानवी समूहाला शिकवणारे ते व्रात्य अशा अनेक व्याख्या आपल्याला पहायला मिळतात. मनुस्मृतीत (१०, २१-२३) मध्ये ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य संस्कारलोप झाल्याने समाजच्युत झालेले ते व्रात्य असून त्यांची संतती हीन जातीय मानली आहे. सावित्रीपतितझाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे जातिभ्रष्ट झालेले असतात, ते व्रात्यहोत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे (२·३९). अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये केली जात असे. पण अगदी याउलट वर्णन अथर्ववेदात केले असल्याचे आपल्याला दिसून येते.

 

अथर्ववेदातील पंधरावे कांड हे व्रात्यकांडअसून, त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती, सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा. अथर्ववेदातील व्रात्य आत्मध्यानी योगी असून वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणारे आहेत. व्रात्यांना ‘महादेव’ असेही म्हटले गेले आहे. हे व्रात्य आर्यच असून वेगळ्या प्रकारचा यज्ञ करीत असत असे पंचविश ब्राह्मणानुसार दिसते. पण त्यांचे यज्ञ हे वरुणादी वैदिक देवांना उद्देशून नसून अन्य देवाला उद्देशून असत. शिवाय त्यांच्या यज्ञात सोमाचा समावेश नसे. पण त्याच वेळेस रुद्र ही त्यांची प्रमुख देवता होती व रुद्राला त्याचमुळे व्रातपती म्हटले गेले आहे असेही परस्परविरोधी विधान केले गेले आहे. रुद्र ही उशीरा का होईना वैदिक दैवतांमध्ये सामील केली गेलेली देवता होय.

ऋग्वेदात मात्र व्रात्य समाज कोठेही अवतरत नाही. त्यामुळे व्रात्य हे भात्र्तातील्च वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व्रतांचे पालन करणारा समण (जैन) समुदाय असला पाहिजे व वैदिक मंडळीने याच शब्दाचा नंतर वेगवेगळ्या अर्थाने हेटाळणीने वापर केला असावा हे विद्वानांचे मत ग्राह्य धरावे लागते. पुढे तर व्रातपती ही सद्न्या गणपतीला अर्पण करण्यात आली.

व्रात्य ही एक भटकी जमात होती हे लोक मुळात आर्यवंशाचेच होते परंतु आर्यांच्या समाजव्यवस्थेपासून फुटून निघालेले आणि त्यामुळे तिच्यापासून पूर्णतः  स्वतंत्र असे जीवन जगणारे होते, असे मत  आल्ब्रेख्त वेबर  ह्यांनी व्यक्त केले आहे. मॉरिस ब्लूमफील्ड  ह्यांच्या मते व्रात्य हे आर्यवंशीय परंतु अब्राह्मण जमातीतून आर्य ब्राह्मणांमध्ये आलेले लोक होत. पण हे आणणे “संस्कार” केल्याखेरीज होत नसे. तांड्य ब्राह्मणात (१७.२-४) केलेली व्रात्यस्तोम यज्ञाची रचना त्यासाठीच, म्हणजे धर्मांतर करण्यासाठी केली गेली. आरंभीच्या काळात वैदिक धर्मियांनी एतद्देशीय अनेकांना धर्मप्रचाराद्वारे आपल्या धर्मात घेऊन कोणता ना कोणता वर्ण बहाल केला. असे करतांना त्यांना काही विधीन्च्या निर्मितीची गरज होती.

सिंधूच्या खोऱ्यात राहणारे लोक व्रात्यच होते, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या एका मुद्रेत तीन मुखे कोरलेली असून त्यांतील एक पुरुषाचे, दुसरे स्त्रीचे आणि तिसरे त्यांच्या पुत्राचे आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले असून ही त्रिमूर्ती म्हणजे व्रात्यांचा देव असावा, असाही तर्क केला जातो.

वैदिक वाङ्मयात व्रात्यांची जी वर्णने आलेली दिसतात, त्यांनुसार व्रात्य हे उघड्या युद्धरथात बसून संचार करीत धनुष्य, भाले अशी आयुधे ते जवळ बाळगीत डोक्याला पागोट्यासारखे शिरस्त्राण, अंगावर तांबडे काठ असलेली वस्त्रे, पांघरायला दोन घड्या घातलेले मेंढ्याचे कातडे असा त्यांचा वेश असे. त्यांचे नेते करड्या रंगाची वस्त्रे परिधान करीत आणि गळ्यात चांदीचे अलंकार घालीत व्यापार वा शेती ह्यांपैकी ते काहीच करीत नव्हते. आर्य ब्राह्मणांची भाषाच ते असम्बब्धपणे बोलत असे वैदिक वाड्मय सांगते.

सामवेदाच्या तांड्य ब्राह्मणामध्ये व्रात्यांना शुद्ध करून आर्य ब्राह्मणांत समाविष्ट करण्यासाठी करावयाच्या व्रात्यस्तोमविधीचे वर्णन आहे (१७.१.४). येथे व्रात्यांचे चार प्रकार सांगितले आहेत : (१) आचारभ्रष्ट, (२) नीच कर्मे करणारे, (३) जातिबहिष्कृत आणि (४) जननेंद्रियाची शक्ती नष्ट झालेले. ह्या चार प्रकारच्या व्रात्यांसाठी चार व्रात्यस्तोमही सांगितलेले आहेत. ह्या सर्व व्रात्यस्तोमांचे विधान अग्निष्टोम यागाप्रमाणे आहे. काही ठिकाणी शूद्र पिता आणि क्षत्रिय माता ह्यांच्या संततीसही व्रात्य म्हणून संबोधिले जात असे, असे दिसते.

काहींच्या मते व्रात्य हा भारतातील एक आर्येतर समाज होता. त्याच्यात विद्वान, सदाचारी, सतत भ्रमण करीत राहणारे असे अर्हतआणि लोकांना पीडा देणारे, त्यांना लुटणारे यौधअसे दोन मुख्य वर्ग होते अशीही माहिती वैदिक साहित्यात मिळते.

वरील आणि इतर अशा अनेक परस्परविरोधी व्याख्या व विवरणे पाहून वैदिक समाजातील संस्कार लोप झालेले वैदिक ते व्रात्य आणि वैदिकेतर समाजातील व्रतांचे पालन करणारे ते व्रात्य असे किमान दोन व्रात्यांचे मुख्य प्रकार व त्यांचेही काही उपप्रकार असावेत असे दिसते. ऋग्वेदात व्रात्य शब्दाचा उल्लेख नाही. व्रत शब्द मात्र अनेकदा येतो. “अदब्धानी वरुणस्य व्रतानी” (ऋ. १.२४.१०) असे वरुणाला उद्देशून म्हटले आहे. येथे व्रतानी म्हणजे “अटल नियम” असलेला असा अर्थ आहे. व्रत करणारा जो त्याला व्रती म्हणायला हवे होते, व्रात्य हा शब्द अर्थवाही होत नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. शिवाय गौतम बुद्ध व महावीरांनाही वि. का. राजवाडे यांनी राधामाधवविलासचम्पू या ग्रंथाच्या प्रस्तावनेत “व्रात्य क्षत्रीय” असे म्हटले आहे. म्हणजेच वैदिक संस्कारलोप झालेले क्षत्रीय. मुळात जर हे दोघेही महामानव कधी वैदिक धर्माचेच नव्हते तर ते संस्कारलोप झाल्याने व्रात्य क्षत्रीय कसे बनतील? पण सर्वांचा उदय वैदिक परंपरेतच झाला हे दाखवण्याचा छंद वैदिकांनी अहर्निश जपल्याचे दिसते.  

अथर्ववेदामध्ये व्रात्य हा शब्द प्राधान्याने येतो व तोही गौरवाने. पण येथे लक्षात घ्यायची बाब म्हणजे अथर्ववेदाची रचना वैदिकांमधून फुटून निघालेल्या एका गटाने केली. हे लोक बहुदा व्रात्यांच्या तत्वद्न्यानाने प्रभावित असावेत. त्यामुळे वैदिक धर्मीय इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत तरी या वेदाचा समावेश वैदिक धर्मसाहित्यात करत नव्हते. मनुस्मृतीही तीनच वेदांना प्रमाण मानते व अथर्ववेदाचा उल्लेखही करत नाही. याचे प्रमुख कारण असे सांगितले जाते कि हा वेद प्रामुख्याने एतद्देशीय तंत्रांची व व्रात्यविचारांची नक्कल अथवा त्या विचारांचे वैदिकीकरण करण्यासाठी म्हणून लिहिला गेला होता. उपनिषदे ही समण तत्वज्ञानाने प्रभावित आहेत हे आता मान्य झाले आहे. व्रात्य आणि जैन समण एकच असे यावरून म्हणता येते. वैदिक धर्मियांनी अनेकदा या विशेषणाचा विपर्यास केला असल्याने एक गोंधळ निर्माण झाला आहे असे निश्चयाने म्हणता येते.

-संजय सोनवणी 

 

Sunday, January 21, 2024

रामायण आणि रामराज्य...



रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा भारतीय जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना भारतीयांचे नैतिक जीवन या महाकाव्यांमधील पात्रांच्या वर्तन व विचारांनी प्रभावित झालेले आहे असे आपल्याला दिसून येईल. अर्थात वाचक/श्रोत्यांनी या महाकाव्यांची मूळ आवृत्ती सहसा वाचलेली नसते. त्यांच्यावर प्रभाव असतो तो त्या त्या काळातील लोकप्रिय संस्करणाचा. सांगणा-याने पात्रांना आपपापल्या विचारानुरूप दिलेल्या रूपांचा. वाल्मिकी रामायणही मुळातून सहसा कोणी वाचलेले नसते. महाभारताचेही तसेच आहे. त्यामुळे रामायणातील राम-सीता तसेच रावण हे ऐकून माहित असले आणि त्यांच्या व्यक्तित्वाबाबत व त्यांनी नेमका काय नैतिक संदेश दिला याबाबत हिरीरीने चर्चा जरी होत असल्या तरी तत्कालीन समाजजीवन नेमके कसे होते व तत्कालीन समाज नेमके कोणते नैतिक आदर्शे मानत होता याबाबत मात्र सहसा चर्चा होत नाही. याचे कारण मुळातच रामायणात येणारे समाजचित्र अत्यंत अस्पष्ट असे आहे त्यामुळे त्यावरून निश्चित अंदाज बांधता येणे जवळपास अशक्य होऊन जाते. पण लोकस्मृतीतून चालत आलेल्या रामकथेचा मात्र विलक्षण पगडा समाजमनावर आहे असे आपल्या लक्षात येईल. तरीही संशोधकांनी रामकालीन समाजव्यवस्थेबाबत वाल्मिकी रामायणाच्या आधाराने आपापले विचार मांडले आहेत. वाल्मिकी रामायणाचे परिशीलन करतांना खालील बाबी लक्षात येतात.

महाभारताची जटिलता, व्यामिश्रता रामायणात नाही. राम हा दैवी अवतार तर रावण ही खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा यांच्यात झालेला संघर्ष याभोवती आजची मुख्य रामकथा फिरते. हीच कथा लोकप्रिय तर आहेच, पण विष्णूचा अवतार म्हणून रामाभोवती एक अद्भुत वलय निर्माण झालेले आहे. अद्भुताची, देवत्वाची रुची असणारे कोणत्याही समाजात कमी नसतात त्यामुळे रामकथा सुदूर कंबोडियापर्यंतही पोहोचू शकलेली आहे. किंबहुना राम हा भारताचा सांस्कृतिक राजदूत (किंवा देवदूत) बनून भारताबाहेर पसरला असेही आपल्याला म्हणता येईल. पण त्याच वेळेस रामायण ही भारतातील एका सांस्कृतिक संघर्षाची पायाभरणी करणारा ग्रंथ आहे असेही आपल्याला स्पष्ट दिसते.

वाल्मिकीला परंपरेने आदिकवी मानले आहे. पण रामकथा ही रामायण लिहिण्यापूर्वीच वीरगीत अथवा पोवाड्याच्या रूपाने भारतात लोकप्रिय होती. वाल्मिकीने रामायण लिहिण्यापूर्वीच पहिल्या शतकात विमल सुरी यांनी पउमचरिय (पद्मचरित) हे महाकाव्य प्राकृत भाषेत लिहिले होते पण त्याचा फारसा प्रभाव लोकांवर आज उरलेला नाही. प्राचीन पोवाडे तीन प्रकारचे होते असे मानले जाते. अयोध्या व राजपरिवारातील सावत्र आईमुळे निर्माण झालेला सत्ता संघर्ष व त्यातून रामाचा वनवास, सीताहरण व रामाचा सीताशोध, आणि रामाने रावणावर मिळवलेला विजय. या कथाबीजांना घेऊन रामायणाची संस्कृत भाषेत चवथ्या-पाचव्या शतकात रचना केली गेली. हे रामायणसुद्धा मुळात पाचच कांडांचे होते. पुढे अनेक शतकांनंतर मूळ संहितेला कोणा अनामिकाने लिहिलेले बालकांड आणि उत्तरकांड जोडण्यात आले. आधीच्या पाच कांडातही फेरफार करण्यात आले आणि रामायणाचे मूळ स्वरूप बदलले गेले. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्याने रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याबाबत केवळ तर्क करावा लागतो. रावणाचे मुळ चारित्र्य व त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला कष्टाने शोधावे लागते. रामाचा रावणावरील विजय हा गाभा एका संस्कृतीचा दुस-या संस्कृतीवर विजय अशा तत्वविचाराचे लेपण नंतरच्या कवींनी करत आजचे रामायण बनवले असल्याने रामायण हे एका गटाला प्रिय तर दुस-या गटाला तिरस्करणीय वाटणे स्वाभाविक आहे. किंबहुना आजचा सांस्कृतिक संघर्षाचे मूळ रामायणात आहे असे मानण्याची प्रवृत्ती अनेक संशोधकांची आहे. मुळात आज प्राकृतात लिहिले गेलेले प्राचीन पोवाडे उपलब्ध नाहीत. पण जनस्मृतीने मुळचे अवशेष जपून ठेवले असल्याने रामायण मुळातून वाचले नसले तरी रामाची कीर्ती उत्तरोत्तर वाढलेलीच आहे असे आपल्याला दिसून येईल

रामायणाची अनेक सांप्रदायिक व प्रादेशिक संस्करणे आहेत. त्यातील राम व रावण वेगळेच आहेत. जैन रामायणाची अनेक संस्करणे प्रसिद्ध असून यात राम जैनांतील विशेष शक्ती असलेला विद्याधर श्रेणीचा त्रिखंडावर राज्य करणारा प्रतापी राजा आहे. तो तापसी तर आहेच पण शाकाहारीसुद्धा आहे. या रामायणानुसार रावणाची हत्या रामाहातून नव्हे तर लक्ष्मणाहातून झाली. रामाला सहकार्य करणारे वानर प्राणी नव्हे तर सभ्य माणसेच होती तर वानरमुख हे त्यांचे ध्वजावरील चिन्ह होते. एकंदरीत रावणाचे एक वेगळेच सांप्रदायिक चित्रण जैन रामकथांत आलेले आहे.

याउलट दशरथ जातकात येणा-या बौद्ध रामकथेचे आहे. या कथेतील दशरथ हा अयोध्येचा नव्हे तर बनारसचा राजा होता. रामपंडित आणि लक्ष्मणपंडित यांना वनवासात पाठवले गेले ते हिमालयात. सीता ही रामाची बहीण आहे. या रामकथेत लंका नाही किंवा रावणही नाही. म्हणजेच सीताहरणही नाही.

एकाच भूमीत निर्माण झालेल्या या मुख्य तीन संस्करणात एवढे अंतर का असावे या प्रश्नावर विद्वानांनी बरीच चर्चा केलेली आहे. बहुतेकांनी रामकथेचा वापर आपापल्या धर्मप्रचारासाठी करायचा असल्याने मुळ कथेत सोयीस्कर बदल केले गेले असावेत असे एकंदरीत मत व्यक्त झालेले आहे. अर्थात या तीनही संस्करणामागे सांप्रदायिक भावना प्रेरित असल्या तरी या कथेमागे मुळचा असा कोणतातरी स्त्रोत असला पाहिजे हे निश्चित. तो प्राचीन काळापासून समाजात लोकप्रिय असणा-या वीरगीतांत आहे हे आपण पाहिलेच.

एवढेच नव्हे तर रामकथा मुळात भारतात घडली कि पूर्व इराणमध्ये, लंका म्हणजे आजची श्रीलंका कि रावणाची लंका छत्तीसगढ अथवा ओडीशात होती यावर रामायणाचाच आधार घेऊन विद्वानांत हिरिरीने चर्चा होत असते. रामकथा खरेच होऊन गेली असे मानणारे भाविक जसे आहेत तसेच ही कथा काल्पनिक आहे असे मानणारा वर्गही आहे. या कथेतून सांस्कृतिक इतिहास व संघर्ष शोधणारे विद्वानही कमी नाहीत. सध्याच्या रामायणातील राम-रावण संघर्ष हा आर्य आणि दक्षिणेतील अनार्यांमधील संघर्ष होय असे प्रतिपादित करणारा वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच रामाचे दक्षिणेत जाणे व रावणाशी युद्ध करणे म्हणजे आर्य संस्कृतीचे दक्षिणेतील द्रविड संकृतीवर झालेले आक्रमण असेही प्रतिपादित करणारे विद्वान आहेत. अनेक साहित्यिकसुद्धा अलीकडे रामायणातील पात्रांचे आपल्या आकलनानुसार नवे अन्वयार्थ लावत आहेत. रावण व मंदोदरीही राम-सीतेप्रमाणेच कादंबरीकारांचे आवडीचे मुख्य पात्र बनले असल्याचे आपल्या लक्षात येईल. रावणावर लिहिल्या गेलेल्या कादंब-या विक्रीचे उच्चांक मोडत आहेत. डॉ. वि. भि. कोलते यांनी तर पूर्वी महात्मा रावणहा ग्रंथ लिहून रावण हा रामापेक्षा कसा श्रेष्ठ होता हे वाल्मिकी रामायणाच्याच आधारे दाखवून दिले होते.

पण भाविकांच्या दृष्टीने पाहिले तर सृष्ट आणि दुष्ट शक्तीमधील संघर्ष म्हणजे रामायण. राम हा सृष्ट भावनांचे प्रतीक तर रावण हे दुष्ट भावनांचे प्रतीक. दस-याला रावण दहन केले जाते. सृष्टाचा दुष्टावरील विजयोत्सव साजरा केला जातो तो दुष्ट शक्तीचे रावण हे एक प्रतीक मानून. त्याच्याशी मुळ रावणाच्या चारित्र्याचा काही संबंध असेलच असे नाही. जनमानसासाठी हे ठीकही असेल कारण प्रकाश आणि अंधार, पवित्र आणि अपवित्र या द्वंद्वाने सर्वच मानवजातीला व्यापलेले असून मंगलाचाच विजय व्हावा अशी मानवी भावना असणे अस्वाभाविक मानता येणार नाही. किंबहुना रामकथा ही सृष्ट आणि दुष्ट यातील संघर्ष असल्याची भावना समाजात अधिक प्रबळ आहे. जनसामान्यांच्या कल्पनाविश्वाला ऐतिहासिक तथ्यांशी फारसे घेणे देणे नसते. त्याच्या भावानिकतेचे प्रक्षेपण तो काळ्या-पांढ-या छटात करतो आणि आपली जीवनाची आदर्शे ठरवतो.

सध्या उपलब्ध असलेले वाल्मिकी रामायण मात्र सांगितले गेलेय तेच वैदिक धर्माची महत्ता ठसवण्यासाठी. रामकथेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत वैदिक नितीतत्वे व धर्मतत्वे जनमाणसावर ठसवण्यासाठी रामकथा वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून, मूळ कथेत सोयीस्कर फेरबदल करून लिहिली गेली असे मानायला पुष्कळ वाव आहे. रामकाळात नसलेला आर्य आणि अनार्य असा स्पष्ट भेद वाल्मिकी रामायणात आहे. राम यज्ञांचे रक्षण करतो आणि यज्ञविरोधी राक्षसांना मारतो अथवा पराजित करतो यावर रामायणाचा जास्त भर आहे. वाल्मिकी रामायणात पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व दाखवण्यासाठी मूळ कथनात फेरफार करून अनेक क्लुप्त्या करण्यात आलेल्या असून स्त्रीमहत्तेचे अवमूल्यन केले आहे जो वैदिक संस्कृतीचा तात्विक गाभा आहे. असे असले तरी हा गोधळ लक्षात येतो कारण वैदिक महत्तेचे रोपण करतानाही अनवधानाने मुळचे भाग तसेच राहून गेलेले आहेत. त्यामुळे कवीला अगदी रावणाच्या चारित्र्याबद्दल नेमके काय म्हणायचे होते हे प्रश्न निर्माण होतात. एवढेच नव्हे तर वैदिक वर्णव्यवस्थेचे माहात्म्य या काव्यात ठायी ठायी दिसून येते. वैदिक संस्कृती विरुद्ध एतद्देशीय यक्ष-असुर-राक्षस संस्कृती एवढेच नव्हे तर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशी सांस्कृतिक-धार्मिक-वांशिक आणि प्रादेशिक संघर्षाची मुलभूमी म्हणजे आजचे रामायण असे म्हणावे लागेल एवढे टोक रामाच्या माध्यमातून साळसूदपणे गाठले गेलेले आहे. थोडक्यात वैदिक धर्मप्रचारासाठी लिहिले गेलेले हे काव्य आहे हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल. या रामायणाला भारतीय संस्कृतीचा आद्य काव्यमय उद्गार म्हणता येईल असे वास्तव त्यात दिसून येत नाही.

रामकथा वेदकाळात किंवा नंतर लिहिली गेली असे मानले जाते, पण वास्तव तेही नाही. मुळची रामकथा मुळात भारतात वैदिक आर्य प्रवेशण्यापुर्वीच घडून गेली होती हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण म्हणजे खुद्द राम किंवा त्याच्या परिवारातील एकही सदस्य ऋग्वेद ते ब्राह्मणांसारख्या वैदिक साहित्यात अवतरत नाही आणि याबद्दल विद्वानांनी आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. पण वैदिक वसिष्ठ, विश्वामित्र, अत्री, अगत्स्यसारखे वैदिक ऋषी व त्यांचे आश्रम मात्र रामायणात समकालीन असल्याप्रमाणे ठायीठायी दिसून येतात. खरे तर वेदांची रचनाही भारतात झालेली नाही. वेदांचा काळ हा इसपू १५०० असा साधारणपणे मानला जातो. हे वैदिक ऋषी रामायणात अवतरावेत पण राम मात्र वैदिक साहित्यात अवतरू नये याचा अर्थ एवढाच होतो कि वैदिक महत्ता ठसवण्यासाठी या पात्रांचे रामकथा नव्या स्वरूपात लिहिताना कल्पनेने पुनरावतरण केले गेले आहे.  विदेहाचा जनक तेवढा उपनिषदांत अवतरतो पण हा जनक म्हणजे सीतेचा पिता जनक नव्हे. तसा उल्लेखही मिळून येत नाही. रामाचाही उल्लेख प्राचीन उपनिषदांत मिळून येत नाही. याचाच अर्थ असा कि रामकथा ही मुळात वेगळ्या संस्कृतीत घडली, तीवर लोकभाषांत अनेक गीते-पवाडे लिहिले गेले. ती कथा लोकप्रिय झाल्यावर सर्वप्रथम जैन महाकाव्य निर्माण झाले. तिस-या-चवथ्या शतकात त्या कथेचा आधार घेत बौद्ध धर्मातही या कथेचा वेगळे रूप देत वापर करण्यात आला.  वैदिक धर्मियांनीही आपली धर्मतत्वे प्रचारित करण्यासाठी तिचा आधार घेत एक काव्य लिहिले गेले ते म्हणजे चवथ्या-पाचव्या शतकातील वाल्मिकी रामायण.

राम हा वेदपूर्व असावा हे सिद्ध होण्यासाठी अनेक प्रमाणे आहेत. भारतात नागरी संस्कृती स्थिरस्थावर झाली ती पाच हजार वर्षापूर्वी. नियोजनबद्ध नगरे हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. रामायणातील अयोध्याही नागरी जीवनाने समृद्ध असलेले नगर आहे. उलट वैदिक आर्यांना भारतात आल्यानंतरही नागरी जीवन पसंत तर  नव्हतेच, पण ते त्याचा तिरस्कार करीत. याचे उल्लेख सूत्र साहित्यात येतात. आपस्तंब धर्मसूत्र म्हणते, “नगरांत जाणे आपण टाळूयात...” (१.३२,२१). बौद्धायन धर्मसूत्र म्हणते, “नगरात राहणा-याला कधीही मोक्ष मिळू शकत नाही. (२:३,६,३३). गौतम धर्मसूत्र म्हणते, “नगरांत चुकुनही वेदपठण करू नये.” थोडक्यात वैदिक आर्यांचा नागरी जीवनाबद्दलचा दृष्टीकोन काय होता हे आपल्या लक्षात येईल. भारतात पुरातन काळापासून नागरी जीवन हे लोकांच्या अंगवळनी पडलेले होते. वैदिक आर्यांना मात्र ते जीवन पसंत नव्हते. अयोध्या मात्र संपन्न नगर तर होतेच पण लंकेसहित अन्य नगरांचेही विपुलतेने उल्लेख आलेले आहेत. इसपूच्या चवथ्या शतकात ग्रीक भारतात आले तेंव्हा त्यांनाही पश्चिमोत्तर भारतातच असंख्य नगरे दिसली असे डायोडोरससारख्या इतिहासकाराने नोंदवून ठेवलेले आहे. वैदिक आर्याना मात्र ग्राम्य जीवन पसंत होते. त्यांनी कोठेही सत्ता स्थापन केली असेही उल्लेख वैदिक साहित्यात मिळून येत नाहीत. तसेच रामायणात येणारी नगरांची वर्णने ही बव्हंशी ऐकीव असून अतिशयोक्त व पुनरावृत्ती करणारी आहेत. नागरजीवनाचा अनुभवच नसल्याने वाल्मिकीने नागरी जीवनाचे वर्णन टाळलेले आहे. इतकेच नव्हे तर रामायणात येणारा उत्तर व दक्षिण भारताचा भूगोलही ऐकीव आणि बराचसा चुकीचा आहे हे विद्वानांनी सिद्ध केलेले आहे. त्यामुळेच रावणाची लंका नेमकी कोठे होती याबाबत मतभेद आहेत. भारतात कृषी संस्कृती प्राचीन काळापासून रुजलेली असूनही वाल्मिकी रामायणात मात्र वैदिकांचे उपजीविकेचे साधन असणारे पशुधनच संपत्तीच्या रुपात अवतरते, कृषी नाही, हेही येथे उल्लेखनीय आहे. अर्थात हे मुळचे पशुपालक असणा-या वैदिकांसाठी स्वाभाविक म्हणता येईल.  रामकथेचा विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन विस्तार करताना भूगोलाचे अज्ञान काव्यमय प्रसंगांनी झाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असे स्पष्ट दिसते. थोडक्यात राम जेव्हा  झाला तेंव्हा वैदिक आर्य भारतात आलेलेच नव्हते कारण तसे असते व खुद्द राम वैदिक संस्कृतीचा प्रसारक असता तर वैदिक साहित्यात रामाचे नाव आदराने आले असते. पण तसे झालेले नाही. एवतेव मुळची रामकथा ही वेदपूर्व काळात घडली असे म्हणणे भाग आहे. रामायणात नागरी किंवा ग्रामीण कृषीजीवनाचे प्रातिनिधिक चित्रण मिळत नाही ते त्यामुळेच. नंतरच्या काळात (इसवी सनाच्या चवथ्या शतकात) रामायण विस्तृत स्वरुपात लिहित असताना वैदिक आर्यांना गतकाळाचे पुरेसे आकलन नसल्याने या त्रुटी रामायणात राहून गेल्या असाव्यात असे म्हणता येईल.

त्यामुळे रामाने केलेले यज्ञांचे रक्षण, राक्षसांचा विनाश, वैदिक ऋषींचे समकालीन अस्तित्व व जेथेही वैदिक तत्वांचे उदात्तीकरण दिसते तो भाग मूळ रामकथेतील नाही हे समजावून घेऊनच रामकथा वाचली पाहिजे. मग राम हा विष्णूचा अवतार, शंबूक, सीताचारित्र्यावरील संशय, सीतात्याग व तिच्या दोन अग्नीपरीक्षा, शूर्पनखेचे राम-लक्ष्मणाने केलेले विदृपीकरण व वालीची कपटाने केलेली हत्या या बाबी आपसूक रद्दबातल ठरून जातात. यामुळे रामकथेच्या प्रभावावर कसलाही फरक पडत तर नाहीच पण रामाचे चारित्र्य मुळाबरहुकुम उतरण्यास मदत होते. रामाला या वरील प्रक्षेप केलेल्या गोष्टीमुळेच तत्वचिंतक आणि अभ्यासक  दोष देत असतात. पण मुळात रामकथा प्रक्षिप्त आहे व ते प्रक्षेप दूर केले पाहिजेत, अकारण रामाच्या विचारविश्वावर व स्त्रीविरोधी वर्तनावर शंका घेण्याचे कारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे. रामावर चिरंजीवी प्रेम करणारे श्रद्धाळू अर्थात मूळ रामकथेशी प्रामाणिक राहून “राम-सीता” हे “शिव-शक्ती” प्रमाणेच समानतेच्या तत्वावरचे आदर्श दांपत्य असल्याचे मानतात व वाल्मिकीच्या प्रक्षेपाकडे दुर्लक्ष करतात हे आपल्या लक्षात येईल.

या पार्श्वभूमीवर मूळ रामकथा काय होती हे आपल्याला तपासून पहायचे आहे आणि मग रामराज्याची संकल्पना समजावून घ्यायची आहे. मूळ रामकथेत वनवासादरम्यान राम व रावण यांच्यात काही कारणांनी संघर्ष झाला, त्याची परिणती सीताहरणात झाली, रामाने मानवी सैन्य उभे करून त्याच्यावर स्वारी केली व पत्नीची वीरोचित सुटका केली एवढाच मुख्य गाभा मूळ रामकाव्याचा असला पाहिजे हे उघड आहे आणि तो उत्साहाने वीरकाव्याच्या रुपात गायला जात असला पाहिजे. हनुमान-वाली-सुग्रीव इ. हे वानर होते ही तर केवळ आर्यांना सुसंस्कृत दाखवण्याची वांशिक अहंकाराची क्लुप्ती आहे हेही उघड आहे. वीरकाव्य म्हणून रामकथा एवढी लोकप्रिय होती कि वाल्मिकी रामायणही तिची सर गाठू शकलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसारचा राम खरेच तसा असता तर एवढी अपार लोकप्रियता त्याला प्राप्त झाली नसती.

रामराज्य ही संकल्पना समजावून घेताना आपल्याला वाल्मिकी रामायणाचा फारसा आधार घेता येत नाही. जैन व बौद्ध रामायण तसेच प्रादेशिक संस्करणात आणि लोककाव्यात अवतरणा-या रामालाही विचारात घेणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते.

रामराज्य नेमके काय होते?

कल्याणकारी राज्य ही पाश्च्यात्य देशात संकल्पना अवतरली ती प्रबोधन काळात. शासनाची मुख्य कर्तव्ये काय कि ज्यायोगे प्रजेचे अधिकाधिक कल्याण होईल याभोवती ही संकल्पना फिरते. त्यामुळे अनेक नैतिक प्रश्नही निर्माण केले गेले असून “चांगले म्हणजे काय?” यापासून ते “चांगले कोणी ठरवायचे?”, “अधिकांचे अधिक सुख ही संकल्पना खरेच सुखमय ठरू शकते काय?” यासारखे गहन तात्विक प्रश्न निर्माण करून कल्याणकारी राज्याची दिशा नेमकी काय असावी यावर चिंतन केले गेले आहे. पण भारतात मात्र रामराज्य या संकल्पनेने गेली हजारो वर्ष राज्य केले आहे असे म्हणायला हरकत नाही.

रामायणात रामाच्या राज्याभिषेकानंतर भरताने वर्णन केल्यानुसार, रामराज्यात कधी दुष्काळ पडत नसे. लोक दीर्घायुषी असून बापाला कधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागत नसत. राज्यात कोणी विधवाही नव्हती. सारे लोक वैभवात राहत असून आनंदी व समाधानी होते. चोर-दरोडेखोरांचा कोणासही उपद्रव नसून आजारपण अथवा शरीरव्यंग कोणासही भोगावे लागत नसे. अग्नी, हिंस्त्र पशु, अथवा नैसर्गिक आपत्तीचा धोका नसे. वैवाहिक जीवन सुखी असून लोक शिक्षित होते. अशा रीतीने रामकालीन जग हे सुख-समाधानाचे होते असे रामायणात म्हटले असले तरी यात राज्यव्यवस्थेचा काही सहभाग होता असे मात्र दर्शवलेले आढळत नाही. एका विशिष्ट दृष्टीकोनातील आदर्श समाजव्यवस्थेचे हे वर्णन आहे. पण लोकांना समजलेले रामराज्य मात्र खुद्द रामाने निर्माण केलेली आदर्श व्यवस्था अशा स्वरूपाचे होते. या आदर्श समाजव्यवस्थेला आधुनिक परिप्रेक्षात पाहत तशी व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडण्याचे श्रेय नि:संशयपणे महात्मा गांधींना द्यावे लागते. “रामराज्य” हीच आदर्श संकल्पना मानून त्यानुसार स्वतंत्र भारत कशी वाटचाल करेल याचे विस्तृत दिशादर्शन त्यांनी करून ठेवले आहे.

रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे असामान्य नेतृत्व केले. त्यांच्या दृष्टीतील रामराज्य हे विशाल मानवतावादाचे समग्र रूप होते. रामाला त्यांनी एक आदर्श राजा या रुपात पाहिले. त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधायचा प्रयत्न केला नाही. १९ सप्टेंबर, १९२९च्या 'यंग इंडिया'मध्ये महात्मा गांधी लिहितात, 'मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो.' २ ऑगस्ट, १९३४च्या 'आनंद बाजार पत्रिका'मध्ये गांधीजी लिहितात, 'माझ्या स्वप्नातील रामायणात राजपुत्र आणि रंक या दोघांनाही समान अधिकारांची खात्री दिली जाते.' २ जानेवारी, १९३७च्या 'हरिजन'मध्ये ते म्हणतात, 'राजकीय स्वातंत्र्य मिळवणे याचा अर्थ आपण ब्रिटिशांचे हाऊस ऑफ कॉमन्स, रशियन राज्यव्यवस्था, इटलीतील फॅसिस्ट अथवा जर्मनीतील नाझी शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले, आपले वाटणारे राज्य हवे आणि त्यालाच मी रामराज्य म्हणतो. रामराज्य म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य.' गांधीजींच्या मते, रामराज्याची राजकीय व्याख्या, 'धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य' अशी करता येईल.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी, १ जून १९४७ रोजी गांधीजींनी 'हरिजन'मध्ये लिहिले होते, 'ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही.'

रामाबद्दलची आस्था महात्मा गांधींनी रामराज्याचे एक व्यापक स्वरूप मांडून व्यक्त केली. त्यांच्याच वरील विधानांवरून लक्षात येईल कि समता आणि न्याय हे रामराज्याचे महत्वाचे लक्षण होते आणि ते पुरातन भारतीय परंपरेला साजेसे होते. मूळ रामकथेतील राम गांधीजीना आकळला कसा होता हे येथे आपल्या लक्षात येईल. गांधीजींचे रामराज्य केवळ प्रादेशिक अथवा एखाद्या राष्ट्रापुरते सीमित नव्हते तर त्याला वैश्विकतेचे परिमाण होते. रामराज्य हे त्यांच्या मते पाश्चात्य राजकीय धारांचे अनुकरण नव्हे तर शुद्ध राष्ट्रीय विचारमंथनातून रामाच्या जीवनातून आकळलेले एक नवेच सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान होते जेथे मनुष्य कल्याण हाच शासनाचा प्रधान हेतू असणार होता. थोडक्यांचे हित व्हावे आणि बहुसंख्य लोक मात्र कोणत्याही सुखापासून वंचित रहावे अशी व्यवस्था म्हणजे रामराज्य नोहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. लोकांच्या नैतिक धारणा हा त्यांनी रामराज्याचा पाया मानला. शासनामुळे समाज नैतिक होतो तसेच नैतिक लोकांमुळे शासकांना नैतिक व्हावेच लागते असा हा परस्परावलंबित समाज म्हणजे रामराज्य ही त्यांची व्याख्या होती.

सध्या उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात आलेली वर्चस्वतावादी तत्वे मूळ रामकथेचा भाग नाहीत ही जाणीव त्यांना असंख्य भारतीयांप्रमाणे होती व त्या जाणीवेला चिंतनाचे अधिष्ठान देवून त्यांनी आधुनिक जगाला रामराज्य म्हणजे काय आणि ते कसे असले पाहिजे याचा मार्गदर्शक सिद्धांत दिला. आज जगाला अशा रामराज्याची आवश्यकता आहे हे कोणीही विचारी मनुष्य मान्य करील.

आज देशात अयोध्येला नव्या राममंदिराच्या रूपाने ते फक्त भावभक्तीचे आणि धार्मिक अहंकाराचे प्रतीक राहील कि खरेच रामराज्याच्या दिशेने पावले उचलण्याचे सुतोवाच होईल हे काळच ठरवेल. रामाचे उदात्त मानवहितैषु चारित्र्य सर्व भारतीय आदर्श मानतील कि भेदाभेदाच्या भिंती उभ्या करत हिंसेच्या तांडवात देशाला ढकलले जाईल हे सुजाण लोकांच्याच विचारक्षमतेवर अवलंबून राहील. राम आणि रामराज्य या संकल्पना जशा मुळच्या होत्या तशाच स्वीकारायच्या कि वर्चस्वतावादाने प्रदूषित झालेली संकल्पना स्वीकारून “रामराज्य” संकल्पनेचा बट्ट्याबोळ करायचा हे या देशातीलच नव्हे तर जागतिक नागरिकांनी ठरवायचे आहे.

-संजय सोनवणी

 

 

Friday, November 10, 2023

दिपावली अर्थात यक्षरात्रीचा सांस्कृतिक इतिहास!

 दिपावली अर्थात यक्षरात्रीचा सांस्कृतिक इतिहास!

संजय सोनवणी

 

दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा दीपोत्सव आहे. आज आठवण राहिली नसली तरी प्राचीन काळी याच उत्सवाला "यक्षरात्री" असे म्हणत. कुबेर हा यक्षांचा अधिपती असून शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर "यक्ष" संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. यक्ष हे वन, अरण्य, तलावाचे संरक्षक मानले जात असून त्यांची सर्वत्र पूजाही होत असे. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. सातवाहन ते अनेक राजांच्या शिलालेखांत यक्षांच्या नावाने तलाव तर होतेच पण जमिनीही यक्षांच्या नावाने ओळखल्या जात. महाभारतातील यक्षप्रश्न प्रकरण माहित नाही असे लोक क्वचितच असतील.

यक्ष या शब्दाचा अर्थच मुळात प्रकाशमान असा आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, व धसंपत्तीचे रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव प्राचीन काळी सुरु झाला.

असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या गहन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले.  यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ, जोतीबा इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर व पर्वतावर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.

उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.

एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात एक शापित यक्ष मेघामार्फत आपला निरोप कसा यक्षिणीला पाठवतो याचे हृदयंगम वर्णन आहे. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.

कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा अधिपती...धनसंपत्तीचा रक्षक...खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.

या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. तरीही बळीचे महात्म्य संपलेले नाही. असे असूनही बळीचे पुराणही नाही, नाटक-खंडकाव्येही नाहीत, बळी नेमका कधी व कोठे झाला याचीही स्मृती हरपली आहे. ज्या आहेत त्या लोककथा, लोकगीते व महाभारत-पुराणांतुन येणा-या भ्रष्ट वैदिकीकरण झालेल्या कथा. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवणा-या (अथवा गाडणा-या) वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. मात्र बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत.  किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

वामन हा विष्णुचा अवतार मानला जातो. किंबहुना सारेच अवतार या ना त्या कारणासाठी विष्णुने घेतले असे सर्व पुराणे उच्च रवात सांगत असली तरी ते वास्तव नाही. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. पण अवतार घ्यायचे कार्य विष्णुकडे नव्हे तर प्रजापती या देवतेकडे होते. पहिल्या मत्स्य, कुर्म व वराह या तीन अवतारांचे स्पष्ट सूचन शतपथ ब्राह्मण (२.९.१.१) तैत्तिरिय आरण्यक व तैत्तिरिय ब्राह्मणात आहे. हे तिन्ही अवतार प्रजापतीचे. पण ते नंतर विष्णुच्या नांवावर खपवण्यात आले.

 

 अवतार घेण्याचे कार्य पुढे उत्तरकालात (तिस-या-चवथ्या शतकानंतर, गुप्तकाळात) पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या  आगमिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत. देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपूर्व साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाभारतातील नारायणीय उपाख्यान पाहिले तर नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत.

वामन अवताराची कल्पना एकाएकी विकसीत झालेली नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. किंबहुना या कथेचा विकास तीन टप्प्यांत झालेला आहे. ते कसे हे पाहुयात.

ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. या तीन पावलांत तो विश्व आक्रमतो ही मुळची वैदिक निसर्ग-रुपकाची संकल्पना. येथे बळीचा काहीही संबंध नाही.

ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे. तिचाही बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण एक पुराकथा सांगते. ते असे कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५).

 
या कथेत समस्त असूर आहेत. विष्णु आहे व त्याची तीन पावलेही आहेत. नाहीय तो बळीराजा!

 
पुढे हीच कथा अजून विकसीत करत मुळच्या कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुराणपंथी कथा बनवण्यात आली. येथे वामनाच्या रुपातील विष्णू न येता विष्णुचा वामनावतार आला. बळीच्या कथा महाभारत व अनेक पुराणांत वेगवेगळ्या स्वरुपात येतात. बळीचे महाबलाढ्य असूर असणे व वामनाची तीन पावले हा भाग वगळला तर कोणत्याही कथेत एकवाक्यता नाही. बळीने स्वर्ग जिंकून देवांना हरवले. ते घाबरून रुपे बदलून परागंदा झाले. पौराणिक कथा बळीने यज्ञ केला व त्या प्रसंगीच वामनाने तीन पावले जमीन दान मागितली असे सांगतात. यातही गफलत अशी कि असूर हे यज्ञविरोधक व यज्ञविध्वंसक होते, यज्ञकर्ते वैदिक नव्हे. पण एनकेनप्रकारेन यज्ञमाहात्म्य वाढवण्यासाठी ही क्लुप्ती केली गेली आहे हे उघड आहे.

 
सर्व कथा पाहिल्या तर हे स्पष्ट आहे कि वामन अवतार कथा जुन्याच (बळीशी संबंध नसलेल्या) कथांत बळीची भर घालवून बनवल्या आहेत. वामन अवतारात कसलेही तथ्य नाही त्यामुळे वामनाने बळीचा खून केला किंवा पाताळात पाठवले यातही तथ्य नाही. बळी महान राजा होता याबाबत एकाही पुराणकथेतही दूमत नाही. पण वाईट हे होते त्यांच्या दृष्टीने कि तो देवांचा (म्हणजे वैदिकांचा) शत्रू होता.

 
बळीची घटना भृगूकच्छमध्ये घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात.

शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व तेथील लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचारही सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत, त्यांचे स्वत:चे पुरोहित आहेत. दक्षिण दिशा त्याज्ज्य नंतर झाली असली तरी या काळात वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतील अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. (Some Aspects of Ancient Indian Culture by D. R. Bhandarkar, पृष्ठ-३५)

इतिहासात बळी नांवाचा राजा तरी खरेच घडला होता काय हाही प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे. यच्चयावत देशात त्याच्याबद्दल आदरभाव असणे, त्याच्या नांवाचे राजकीय विभाग असने, त्याला अनेक राजवंशांनी पुर्वज मानने, त्याच्या वंशातील राजांचे उल्लेख मिळणे या बाबी तो खरेच होऊन गेला हे ठामपणे ठरवायला पुरेसे नसले तरी वामनावतारात जशी गफलत आहे तशी बळीच्या बाबतीत नाही. वैदिकांनाही बळीचे माहात्म्य खोडुन काढता आले नाही. त्यांना त्यांच्या विपर्यस्त कथांतही ते मान्य करावेच लागले.

वैदिक भारतात आले तेंव्हा  त्याचे वंशज राज्य करत होते असे वैदिक साहित्यावरुनच दिसते. म्हणजे वैदिक भारतात येण्यापुर्वीच बराच काळ आधी बळीराजा होऊन गेला होता. बळीराजा झाला तेंव्हा भारतात वैदिकांचा धर्मही नव्हता नि वैदिकही जर नव्हते तर बळीला पाताळात पाठवायला त्यांचा विष्णू कसा येईल हा विचार आपल्या विद्वानांनी केलेला दिसत नाही. अवतार संकल्पना हीच मुळात वैदिक धर्मातही उशीराची आहे. वेदातील विष्णू हा उपेंद्र व दुय्यम देवता आहे. त्याला महत्व प्राप्त झाले तेच मुळात गुप्तकाळात. असे जर स्पष्ट आहे तर मग विष्णूचा अवतार वामनाचा संबंध आम्ही कसा मान्य करतो?


अर्थात महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कोणी अपवाद वगळता पुजाही करत नाही.

अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती "वामनप्रतिपदा" झाली असती...बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही...थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. बलीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो...वामनाची नाही. किंबहुना दिपोत्सावातील हा अत्यंत महत्वाचा दिवस व नववर्षाचा प्रेआरंभ महात्मा बळीला वाहिलेला आहे.

अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.

खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.

हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.

वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल एतद्देशीय संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.

आता राहिले नरकासुराचे. नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. व-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत. त्याची कथा ही कालौघात अशी विकसित झालेली आहे.

भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने १६००० स्त्रीया (अथवा राजकन्यांना) पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने त्याला आता नाही पण कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांना आश्वासन दिले. नरकासुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला असेल याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही नरकासुराच्या बाबतीत काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?

या कथेनुसार कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. कृष्णाने पाठोपाठ गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षोहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.

याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक पण थोडी वेगळी कथा येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.

नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या स्त्रीया (किंवा राजकन्या) कोणाच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारण नरकासुराने (ही कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा मुद्दाम बनवण्यात आली हे उघड आहे.

ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. ते ऐतिहासिक मानता येत नाही.

कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही अनेक मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी त्याने तसे वरदानच मागितले होते अशा स्पष्टीकरण कथा बनवल्या गेल्यात हे उघड आहे.

प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.

म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.

म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट नव्हता. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ . त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.

दुसरे असे कि व्रतराजामद्ध्ये नरकचतुर्दशी या काम्य व्रताची माहिती येते. हाही अत्यंत उत्तरकालीन व्रते सांगणारा ग्रंथ असला तरी यात नरक चतुर्दशीला नरकासुराच्या नांवाने दिवे लावत, व्रतकर्त्याच्या कुलात जेही कोणी अग्नीत दग्घ होऊन मेले असतील वा जे अदघ्धच राहिले असतील या सर्वांना परगती मिळो अशी प्रार्थना चूड पेटवून करावी असे म्हटले आहे. या व्रताची सांगता शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देवून करावी असेही म्हटले आहे. या व्रतात नरकासुराची अन्य कोणतीही कथा सामाविष्ट नाही. पण नरकासुराला धार्मिक महत्वही होते म्हणजे तो दुष्ट होता हा भ्रम जाणीवपूर्वक निर्माण केला गेला होता हे स्पष्ट होते.

नरकासूराचा संबंध "नरक" या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात "नरक" या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्काचार्यानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये "क" म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू "काश" धातुपासून अर्धांग का घेतले तर.) नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक...म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले?

L Renou
यांनी "वैदिक निऋतीतून निर्रया - निर्रका- नारक- नरक असा प्रवास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. ("Language of the Nirukta" तळटीप -मंत्रीनी प्रसाद) पण ही व्युत्पत्ती निरर्थक अशीच आहे. निऋतीवरून नैऋत्य दिशेचे नांव आले असे म्हटले जाते पण नरकासुराच्या राज्याची दिशा ती नाही. तर या शब्दाची व्युत्पत्ती अनिश्चित असल्याचे "Pali-English Dictionary" (Thomas William Rhys Davids, William Stede) एवतेव नरक हा शब्द मुळचा वैदिक दिसत नाही तसेच त्याचा अर्थही आज घेतला जातो तसाच मुळचा असण्याची शक्यता नाही.

थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, अशी व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो...नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. 



थोडक्यात आपण देशभर साजरी करत असलेला दीपावली उत्सव हा मुळचा यक्षरात्री उत्सव आहे...कुबेर आणि त्याचे अनुयायी यक्षांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. कृषी संस्कृतीचा तोच खरा मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. यक्ष संस्कृतीचे मूळ स्वरूप समजावून घेऊन यक्ष संस्कृतीचेच आपण दीपोत्सवाच्या निमित्ताने आचरण करत असतो आणि बळी व नरकासुरासारख्या प्रजाहितदक्ष, संस्कृतीरक्षक सम्राटांचेही आपण कृतद्न्यतापूर्वक स्मरण करत असतो हे लक्षात घ्यायला हवे. दीपावली महोत्सवाचा हाच अन्वयार्थ आहे.

 

-संजय सोनवणी


 

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...