Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Tuesday, September 23, 2025

ग्रेट मराठा महादजी शिंदे

 




     महादजी घायाळ अवस्थेत पानिपतच्या रणांगणातून राणेखान भिस्त्याच्या सहकार्याने बाहेर पडला खरा, पण त्याला बरे व्हायला काही काळ गेला. तो दख्खनेत यायला १७६२ साल उजाडले. तोवर राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले होते. शिंदेशाहीचा कब्जा एका तोतयाने घेतला होता. तोतयाचा नाश केल्यानंतर आता राणोजी शिंदेचा एकच पुत्र महादजी हयात राहिला होता. तो महाराष्ट्रात परत आला तेव्हा माधवराव पेशवा (नानासाहेब पेशव्याचा मृत्यू २३ जून १७६१ ला झाला होता.) मिरजेवर चाल करून गेला होता. आल्या आल्या महादजीही त्या मोहिमेत सामील झाला.
     त्या वेळेस माधवरावाचे वय लहान असल्याने मुलकी कारभार राघोबादादाच्या हाती होता, पण त्यात तो समाधानी नव्हता. त्याला पेशवेपद हवे होते. त्यामुळे लवकरच कौटुंबिक कलह सुरु झाला. त्यामुळे जनकोजी नंतर शिंदेशाहीचा वारस कोण होणार, सरदारकीची वस्त्रे कोणाला द्यायची हा वाद अनिर्णीत ठेवण्यात आला होता. महादजी परत आल्यामुळे तोच शिंदेशाहीचा वारस होणार हे निश्चित होते, पण राघोबादादाने महादजीला वारस म्हणून मान्यता देण्यासाठी त्याच्याकडून मोठी रक्कम मागितली. महादजीला ती रक्कम देता येणे शक्य नव्हते कारण तो स्वत:च एका विपत्तीतून बाहेर पडला होता आणि शिंदेशाहीच्या खजिन्यावर त्याचा अजून अधिकार बसला नव्हता.
     आधी तुकोजी शिंदेचा मुलगा केदारजी शिंदे यास सरदारकीचे वस्त्रे द्यायचे घाटत होते, तसा निर्णयही २५ नोव्हेंबर १७६३ रोजी घेतला गेला होता पण केदारजीने त्यास नकार दिला व तो अधिकार महादजीचाच आहे असे पेशवे दरबारास सांगून टाकले. मग राघोबादादाने अटक गाजवणाऱ्या साबाजी शिंदेचा नातू आणि राघोबादादाचा समर्थक मानाजी शिंदे यास शिंदेशाहीच्या आसनावर १० जुलै १७६४ रोजी बसवले.
     तरीही महादजीने आशा सोडली नव्हती व आपला दावा पुढे नेण्याचे काम चालूच ठेवले होते. पण राघोबादादा पेशगीच्या रक्कमेवर अडून बसला होता. तो मानाजीला, म्हणजे आपल्या समर्थकाला हटवू इच्छित नव्हता आणि महादजी एवढी रक्कम देऊ शकत नाही हे त्यालाही माहित होते.
     पण त्याच काळात महादजी अनौरस आहे अशा काही वावड्या उडवण्यात आल्या. जयाप्पा शिंदेची पत्नी सखुबाई हिने १५ मार्च १७६४ रोजी राघोबादादाला एका पत्रात महादजी हा दासीपुत्र आहे असे लिहिले. (पेशवे दफ्तर, खंड २९) त्याही राघोबादादाच्या पथ्यावर पडल्या. त्यामुळे त्याने मनाजीला सरदारकीची वस्त्रे दिली. महादजी त्यामुळे विषन्न व संतप्त होणे स्वाभाविक होते. ही नेमणूक झाली त्याच दिवशी नाराज झालेल्या महादजीने पुणे सोडले आणि थेट उज्जैनला जायला निघाला.
     हे समजताच राघोबादादाने महादजीला कैद करण्याचा हुकुम देऊन महादजीच्या पाठलागावर सेना पाठवली. माधवराव पेशवा त्यावेळेस कर्नाटक मोहिमेत अडकला होता. त्यामुळे त्या वेळेस त्याला ही घटना माहितही नव्हती. पण महादजी पाठलाग करणाऱ्या सेनेच्या हातावर तुरी देऊन माळव्यात पोहोचला.
     माळव्यात गेल्यानंतर महादजीने आपली शक्ती माळवा आणि राजस्थानात वाढवायला सुरुवात केली. जवळ धन नसतानाही त्याने आपल्या संसाधनांचा योग्य वापर करत विश्वासु लोकांची फौज उभारली. कोणत्याही पेशव्याचा पक्ष घ्यायचा नाही हेही त्याने ठरावून टाकले होते त्यामुळे १७६६ मध्ये जेव्हा गोह्दचा जाट आणि राघोबादादात वाद निर्माण झाला तेव्हां त्याने मध्यस्थी करून, जाटाला खंडणीसाठी राजी करून राघोबादादाचा गोह्द किल्ल्याला पडलेला वेढा उठवायला लावले. अन्यथा हा संघर्ष उग्र रूप धारण करण्याची शक्यता होती. राघोबादादाला ही मदत करून त्याने मराठ्यांचा आत्मसन्मान वाढवला.
     या घटनेमुळे माधवराव पेशवा प्रभावित झाला. त्याने आपला पाठींबा महादजीच्या पारड्यात टाकला. अहिल्याबाई व तुकोजी होळकर, नाना फडवणीस, आणि हरिपंत फडके यांचाही महादजीला पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे राघोबादादाचा विरोध असूनही शिंदेशाहीची जहागीर महादजीला समारंभपूर्वक मिळाली. ही घटना १८ जानेवारी १७६८ रोजी झाली आणि शिंदेशाहीच्या दैदिप्यमान युगाला सुरुवात झाली. पुढे अलिजाबहादूर, वकील--मुतालिक अशा पातशाहीतील सर्वोच्च पदव्या व अधिकार मिळाले असूनही त्याला पाटीलबाबा हे संबोधन अधिक प्रिय होते.
     पानिपत युद्धानंतर तब्बल सात वर्षांनी ही घटना घडली. एवढा काळ त्य्याला संघर्ष करण्यात व स्वत:चे क्षमता सिद्ध करून पद मिळवण्यास लागली.
     पण या पदच्युतीमुळे मानाजी शिंदे अस्वस्थ झाला. नंतरचा नारायणराव पेशव्याचा काळ येईपर्यंत त्याने पेशवाईशी संघर्ष करण्यात घालवला. १७८० मध्ये त्याने कोल्हापूर गादीशी हातमिळवणी केली. मानाजीही पराक्रमी होता. पेशवाईतील साडेतीन शहाणे जसे प्रसिद्ध आहेत तसेच साडेतीन फाकडेही प्रसिद्ध आहेत. इष्टुर फाकडा (कॅप्टन जेम्स स्टुअर्ट) हा अर्धा तर कन्हेरराव एकबोटे, मानाजी शिंदे व कोन्हेरराव पटवर्धन हे पूर्ण फाकडे आणि फाकडे म्हणजे अतिशय पराक्रमी पुरुष.
     उत्तरेतील मराठ्यांची पत सावरली जात असतानाच मल्हाररावाचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला होता. नंतर उत्तरेत पूर्ण लक्ष घालू शकेल असे कोणी उरले नव्हते. माधवराव पेशव्यांने दक्षिणेत काढलेल्या निजाम व हैदरच्या विरोधात काढलेल्या मोहिमात तुकोजी होळकर व्यस्त होता. अशा स्थितीत उत्तरेतील अनुभवी सरदार आता एकच होता व तो म्हणजे महादजी शिंदे हे ताडून माधवरावाने रामचंद्र कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवालेच्या सोबत महादजीला एप्रिल १७६९ मध्ये दिल्लीकडे पाठवले. येथूनच दिल्लीच्या सत्तेवर पुन्हा अंकुश टाकण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
     त्यावेळेस दिल्लीचा पातशहा शाह आलम अलाहाबाद येथे इंग्रजांच्या ताब्यात होता. सरळ दिल्लीवर चालून जायचे पेशव्याचे निर्देश होते पण नवलमल जाटाने वाटेतच मराठी फौजेला अडवले. मराठ्यांनी जाटाला बेदम मार देऊन शरण आणले. त्याला खंडणी कबूल करावी लागली. पण त्यात वेळ गेला होता आणि १७७० चा एप्रिल आला होता. म्हणजे तब्बल एक वर्ष वाया गेले.
     पण परत वेगाने वाटचाल करत त्यांनी आग्रा आणि मथुरेवर कब्जा मिळवला आणि एप्रिल महिन्यातच यमुना नदी ओलांडली आणि अहमदखान बंगशच्या प्रदेशात पाय ठेवला. नजीब त्यावेळेस बंगशाशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असला तरी मागील कटू अनुभव लक्षात घेऊन त्याने ते कृत्य टाळले. त्यात ३१ ऑक्टोबर १७७० साली नजीबखानाचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा झाबेताखान रोहिल्यांचा प्रमुख बनला. झाबेताखानने संधीचा फायदा घेऊन पातशहाकडून मीरबक्षी पद प्राप्त केले. हे पद मिळताच त्याची शक्ती वाढली आणि त्याने दोआबात मराठयांवर हल्ला चढवला.
     महादजीने तोवर बंगशच्या ताब्यात असलेले इटावा, फारुकाबाद आपल्या कब्जात घेतले होते. झाबेताखानही युद्धात पराजित झाला होता. शेवटी बंगशने गुढगे टेकले आणि माझा सारा प्रदेश घ्या आणि मला बदल्यात मला जीवदान द्या अशी भीक मागितली. अशा रीतीने पानिपत युद्धापुर्बी मराठ्यांच्या ताब्यात असलेला दोआब मराठ्यांच्या पुन्हा ताब्यात आला, हे महादजीचे पदार्पणातीलच मोठे यश होते.
     जाट आणि रोहिले हे मराठ्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळे होते जे महादजीने दूरदृष्टीने बाजूला सारले आणि बंगशला आपल्यासोबत ठेवले व दोआबात तळ ठोकला. ही वार्ता अलाहाबाद येथे असलेल्या बादशहाला मिळताच इंग्रजांच्या नजरेखाली राहणे योग्य नाही व आपण दिल्लीस जावे असे वाटू लागले. बादशहाची आई झीनत महालही मराठ्यांची मदत घेण्यास उत्सुक होती. त्यामुळे बादशाहा शाह आलमने शिराजोद्दुला या आपल्या वजीरास व मिर्झा नजाफखान यास महादजीशी बोलणी करण्यास पाठवले. पण महादाजीने घातलेल्या अटी बादशहाला मान्य करणे जड जाऊ लागले. शेवटी महादजीने धमकीचा वापर केला. त्याने धमकी दिली की बादशहाने मराठ्यांच्या अटी मान्य नाही केल्या तर मराठे दिल्लीच्या पातशाहीवर अन्य कोणाला तरी नेमतील आणि गाजीउद्दिनला वजीर बनवतील. हा निर्वाणीचा इशारा होता.
     तरीही बादशहाने महादजीच्या अटी विनाशर्त मान्य केल्या नाही त्यामुळे महादजीने आपल्या सहकारी सरदार व सैन्यासह दिल्लीकडे वाटचाल सुरु केली. दिल्ली त्यावेळेस झाबेताखानाच्या ताब्यात होती. फेब्रुवारी १७७१ ला महादजीने दिल्लीला वेढा घातला. महिन्याभरात झालेल्या युद्धानंतर दिल्ली महादजीच्या ताब्यात आली आणि महादजीने एक जगावेगळी चाल केली. त्याने पातशहा पदावर आताचा पातशहा शाह आलमच्या मुलाला- जवान बख्तला तख्तावर बसवले व त्याला शाही नजराणा दिला.
     यामुळे शाह आलमची झोप उडाली. महादजी आपल्या धमक्या खऱ्या करतो हे त्याच्या लक्षात आले. जवान बख्त जरी त्याचा मुलगा असला तरी सत्तेची लालसा कशी सुटेल? त्यामुळे त्याने घाईने महादजीने घातलेल्या सर्व अटी मान्य करून टाकल्या. फेब्रुवारी १७७१ मध्ये करारनाम्यावर सह्याही झाल्या. नोव्हेंबरमध्ये त्याची व महादजीची भेट अनुप शहरात झाली. महादजी त्याला घेऊन दिल्ली येथे आला. यामुळे इंग्रज धास्तावले. काहीही झाले तरी मराठे उत्तरेत राहू नयेत, त्यांना दक्षिणेतच अडकवून ठेवायचे धोरण त्यांनी आखले व त्याचे अंमलबजावणी सुरु केली पण ते एवढे सोपे नव्हते.
     आता दिल्लीचा पातशहा तसा नामधारी असला तरी शाही फर्मानाला अजून तेवढेच महत्व होते. त्यामुळेच इंग्रजही त्याला आपल्या बाजूला ठेवायचा प्रयत्न करत होते. पण महादजीने इंग्रजांच्या तावडीतून केवळ स्वबळावर पातशहाला आसनस्थ तर केलेच पण तो ठरवेल तेव्हा हवा त्याला पातशाहा करू शकतो हा इशाराही दिला. यामुळे मराठ्यांना पूर्वी गमावलेल्या प्रदेशाचे अधिकार तर मिळालेच पण देशभरात मराठे शक्तीशाली झाले, पानिपतापूर्वीची प्रतिष्ठा पुन्हा मिळवली हे महादजीचे मोठे कर्तुत्व होय.
     आता दिल्लीत एकच काटा शिल्लक राहिला होता व तो म्हणजे नजीबाचा मुलगा झाबेताखान. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी महादजी पातशहालाच सोबत घेत दोआबात उतरला. रोहिलखंडातील त्याचा प्रदेश ताब्यात घेतला. घाबरलेला झाबेताखान पळत सुटला आणि तो शुक्रतालाजवळ आला. येथेच दत्ताजी शिंदेची हत्या झालेली होती. मराठे तेथेही चालून येत आहेत हे पाहून तो पुन्हा पळत सुटला. पण त्याला पळत असतानाच पत्थरगड येथे गाठण्यात आले. त्याच्या परिवारालाही कैद करण्यात आले. पण झाबेताखान मात्र अंधाराचा फायदा घेऊन निसटला आणि जंगलात पळून गेला.
     यामुळे संतप्त झालेल्या महादजीने नजिबाबादवर चाल केली आणि नजीबखानावरचा सूड पुरेपूर उगवला. त्याने नजीबाने पानिपत युद्धात मराठ्यांची जी लुट केली होती ती पुन्हा प्राप्त तर केलीच पण नजीबाची कबरही उध्वस्त करून टाकली. त्याचे महाल धुळीला मिळवले. झाबेताखान हाती लागला नाही पण झाबेताखानचे सामर्थ्य धुळीला मिळवण्यात तो यशस्वी झाला. यानंतर महादजी पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळाला.
     मराठे अशा रीतीने दिल्लीचे स्वामी बनले. घरातील सत्तास्पर्धेच्या वातावरणामुळे आणि ढासळत असलेल्या तब्बेतीमुळे मनोधैर्य गमावून बसलेल्या माधवराव पेशव्यास या बातमीने मोठा दिलासा दिला खरा पण त्याचा १८ नोव्हेंबर १७७२ रोजी मृत्यू झाला आणि या धोरणी पेशव्याच्या अकाली मृत्यूमुळे मराठेशाहीचा सूर्य तळपू लागला असतानाच त्याला सत्तासंघर्षाचे ग्रहण लागले.
     माधवरावाच्या मृत्युनंतर आपणच पेशवे बनू अशी राघोबादादाची उमेद होती, पण वयाने जेमतेम अठरा वर्षाच्या नारायणरावास पेशवेपदावर आरूढ करण्यात आले. त्याचा विवाह गंगाबाई साठेबरोबर झालेला होता.
     माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने राघोबादादाची सत्तालालसा वाढली व त्याने पोरसवदा नारायणराव पेशव्यांच्या विरोधात बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. याचा काहीसा संदेह जरी पेशव्यांकडील मंडळींना असला, तरी गारदी खुद्द पेशव्याविरोधात काही आगळीक करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही. कारण इब्राहिम गारदीने पानिपतावर पेशव्यांकडून लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता. अखेर अब्दालीने त्याला जिवंत पकडले तरी हालहाल करत मारले. त्यानंतर त्या निष्ठेचे कौतुक म्हणुन शनिवारवाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशवयांनी गारद्यांकडेच दिली होती. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाईने गारद्यांना राघोबादादाने पाठवलेल्या चिठ्ठ्तील मजकुर "नारायणरावांस धरावे" ऐवजी "नारायणरावांस मारावे" असा केला. मराठीतील 'चा मा करणे' ही म्हण याच प्रसंगावरून पडली.
     गारद्यांनी त्या चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची २० ऑगस्ट १७७३ रोजी क्रूर हत्या केली. त्याची पत्नी गंगाबाई त्यावेळेस गरोदर होती.
     नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाला पेशवेपद मिळाले पण ते औट घटकेचेच ठरले. निजामाच्या मोहिमेवर तो गेला असता बारभाई स्थापन होऊन गुप्तपणे ती राघोबादादाच्या विरोधात काम करू लागली. तेवढ्यात गंगाबाइला मुलगा झाल्याची वार्ता आली. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या बारभाईने (हे सखारामसखारामबापू बोकील, नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे अशा महत्वाच्या केंद्रीय लोकांचे मंडळ होते) राघोबादादाविरुद्ध फौजा पाठवल्या. अवघ्या चाळीस दिवसांचे वय असलेल्या माधवराव (दुसरा) यास पेशवा घोषित केले गेले. एक बालक सवाई माधवराव या नावाने पेशवाईपदी बसवण्यात आले.
     न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून नारायणरावाच्या खुनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला. त्यावेळेस मराठी फौजा राघोबादादाचा पाठलाग करत होत्या. मराठी फौजांना तोंड देण्याचे धैर्य त्याच्याकडे नसल्याने तो थेट बुर्हाणपूरला पोचला. कारण पुण्यातील वार्तांनी अस्वस्थ होऊन महादजी पुण्याकडे निघाला होता व त्यावेळेस बुर्हाणपूरला त्याचा तळ पडला होता. तुकोजी होळकरही महादजीला येऊन मिळाला होता.  पुण्यातील घडामोडी महादजीला कळत होत्या पण पेशवे घराण्यातील सत्तास्पर्धेच्या युद्धात पडण्याची त्याची इच्छा नव्हती. परंतु मराठेशाहीचे अहित होईल अशी कोणतीही कृती त्याला मान्य नव्हती. त्यासाठीच तो पुण्याला निघाला होता, पण राघोबादादा अनपेक्षितपणे त्याला येऊन भेटला व महादाजीला आपली बाजू घायची गळ घातली.
     महादजी व तुकोजीने त्याला शहाणपणाचे बोल ऐकवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. इंग्रजांची मदत घेणे हा तर आत्मघातकी मार्ग असेल हे सांगून त्याचे मन वळवायचा प्रयत्न केला. पण सत्तालालसेची नशा चढलेल्या राघोबाने त्या दोघांचे म्हणणे ऐकले नाही व तेथून तो १० डिसेंबर निघून गेला ते थेट सुरतला. इंग्रजांकडे त्याने पेशवेपदावर आरूढ करण्यासाठी मदत मागितली. ६ मार्च १७७५ रोजी त्याने सुरत येथे इंग्रजांशी तह केला. या तहामुळे पेशवाई बुडण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
     येथेच इंग्रजांचा मराठी सत्तेत हस्तक्षेप सुरु झाला व पुढील सारे अनर्थ ओढवले. राघोबादादाची  सत्तालालसा पुढे अखेर इंग्रजांहाती मराठ्यांचीच सत्ता बुडवण्यात झाली.
     इंग्रजांची पुण्यावर स्वारी व हार
     मराठ्यांना उत्तरेत येऊ न देता दक्षिणेत अडकवून ठेवण्याचे इंग्रजांचे धोरण होतेच. सुरतच्या तहाने त्यांना अमुल्य संधी मिळाली. इंग्रजांचे आता मराठ्यांशी युद्ध होणार हेही निश्चित झाले. पण त्यांनी जरी १७७५ मध्ये आधी चाल करायचा प्रयत्न केला असला तरी तो हरीपंत फडकेने कडवा प्रतिकार केल्याने अयशस्वी झाला. पुण्यापर्यंत पोचणे वाटते तेवढे सोपे नाही हे इंग्रजांच्या लक्षात आले. इंग्रजांनी मराठ्यांशी पुरंदर येथे तह करून युद्ध न करण्याचे ठरवले. यामुळे राघोबादादा निराश झाला असला तरी तो अजूनही इंग्रजांना चिकटून राहिला होता. आज ना उद्या इंग्रज आपल्याला मदत करतील आणि पेशवेपदावर बसवतील अशी आशा त्याला अद्याप होती.
     याच काळात (१७७६) महाराष्ट्रात सदाशिवराव भाउच्या तोतयाचे बंड घडले. यामुळे पेशवाईला मोठा हादरा बसला. सुखलाल नावाचा कनौजी ब्राह्मण आपणच भाऊ आहोत असा दावा करत आला. त्याच्या दाव्यामुळे पेशवे दरबारात फुट पडली. राघोबादादालाही हेच हवे होते. इंग्रजही या स्थितीचा कसा फायदा करून घेता येईल या विचारात व्यग्र होते. मराठ्यांनी तोतयाला आधी कैद केले गेले व त्याला रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पण बोलण्यात चतुर असलेल्या तोतयाने तेथुन आपली सुटका तर करून घेतलीच पण मोठे सैन्यही गोळा केले. महादजीने तोतयाच्या प्रकरणात निर्णायक भूमिका वठवली.
     तोतयाने पुण्याच्या दिशेने सैन्य घेऊन निघाला आहे हे समजताच महादजी त्याच्या दिशेने रवाना झाला. त्याला हरवले आणि त्याला कैद करून पुण्यात आणले. पेशवे दरबाराने त्याला देहदंडाची शिक्षा दिली. मेखसुत त्याचे डोके चेचण्यात आले. अशा रीतीने तोतयाचा अंत झाला.
     असे असले तरी दरबारी मंडळीमध्ये तोतया हा खरा भाऊ असावा असे वाटणारा मोठा गट होता. याचे कात्रण म्हणजे भौचे पानिपत युद्धात नेमके काय झाले हे ठामपणे सांगू शकणारा एकही पुरावा अद्याप सामोरा आलेला नाही. तोतया प्रकरण म्हणजे तत्कालीन राजकारण कोणत्या दिशेने जात होते हे समजण्याचा एक मार्ग आहे. असे असले तरी नाना फडणीसचे राजकारण तोतयाच्या (तो खरा भाऊ असो अथवा नसो) अंतामुळे साधले जाणार होते. महादजीने तोतयाला नेस्तनाबूत केले याचे कारण म्हणजे हा तोतयाच आहे अशी त्याची खात्री पटलेली होती. पानिपत युद्ध प्रसंगी तो स्वत:ही रणांगणावर उपस्थित होता. तोतयाच्या अंतामुळे नानाने सुटकेचा श्वास सोडला आणि महादजीच्या प्रतिष्ठेत अजूनच भर पडली.
     कोल्हापूर गादी आणि साताऱ्याच्या गाडीतील संघर्षही संपलेला नव्हता. आधी शाहुच्या आणि नंतर पेशव्यांच्या प्रांतावर अधून मधून स्वाऱ्या होत होत्या. प्रसंगी करवीर गादी हैदर अलीचीही मदत घेत असे. १७७६ मध्ये राघोबादादाने नवीन चाल खेळली. त्याने चिथावणी दिल्याने हैदर अलीची मदत घेत पेशव्यांच्या मुलुखावर हल्ले सुरु केले.
     पेशवे दरबाराने महादजीला या संकटाच्या निवारणासाठी पाठवले. महादजीने थेट करवीर (कोल्हापूर) गाठले आणि शहराला वेढा घातला आणि शहरावर तोफांचा मारा सुरु केला. त्यामुळे करवीर संस्थान हादरले व महादजीला शरण आले आणि तहाची बोलणी सुरु केली. एप्रिल १७७८ मध्ये पंधरा लाख रुपयांची खंडणी घेऊन महादजीने करवीरकरांशी तह केला. त्यानुसार पुन्हा कोल्हापूर गादी सातारच्या गादीच्या प्रदेशात कोणतीही गडबड माजवणार नव्हते. हैदर अलीचे संकट यामुळे परस्पर निवारण झाले. महादजीने केलेली ही एकहाती कामगिरी होती.
     या घडामोडी होत असताना इंग्रज स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी कटकारस्थाने करायला सुरुवात केली. त्यांनी मोरोबा फडणीसला हाताशी धरतात नाना फडणीसला पदावरून हटवत राघोबादादाला पेशवे पदावर आणत नानाची जागा मोरोबाला द्यायचे ठरले होते. या कटात अनेक सरदारही सामील होते. हा कट अवघ्या तीन महिन्यासाठी यशस्वी झाला. त्यावेळी करवीर मोहिमेवर असलेल्या महादजीचे सरदार पद काढून घेण्याचेही घाटत होते. नाना फडणीस पुरंदरहून महादजीला सहकार्याची पत्रे पाठवत होता. आधी तुकोजी होळकरही द्विधा मन:स्थितीत असला तरी त्यानेही महादजीची बाजू घेण्याचे ठरवले.
     त्यात मोरोबाचे एक गुप्त पत्र महादजीच्या हाती लागले.
     मोरोबाने चिंतो विठ्ठल या कारभाऱ्याला मुंबईला पाठवून राघोबादादाला तत्काळ घेऊन पुण्यास यावे असे त्या पत्रात लिहिलेले होते. इकडे मोरोबा महादजीलाही आपल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न करतात होता. पण आता शिंदे-होळकर पुन्हा एकत्र आलेले होते. ब्रिटीशांसोबत राघोबादादा पुण्याला आला तर पेशवाई पूर्णपणे ब्रिटीशांच्या घशात जाईल ही दोघांना शंकाच नव्हे तर खात्री होती. मोरोबा जरी एकाकी पडत चालला असला तरी त्याची भिस्त इंग्रजांवर होती. तो पुण्याहून पळून गेला, पण त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना पकडून अहमदनगरच्या तुरुंगात टाकण्यात आले.
     मोरोबाचा कट अशा रीतीने उध्वस्त करण्यात आला असला तरी मुख्य शत्रू राघोबादादा अजून इंग्रजांच्या सोबत होता. मोरोबाचा कट अयशस्वी होताच इंग्रजांनी आक्रमक धोरण स्वीकारले. गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सने मुंबईच्या गव्हर्नरला याबाबतील सर्वाधिकार दिले. महादजीलाही फोडायचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. पण महादजी आणि तुकोजीला इंग्रजांचा धोका समजत असल्याने त्यांनी पुणे दरबाराशी आपली निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे इंग्रजांचा हा डावही अयशस्वी झाला. शेवटी ही जोडीच त्यांचे दात घशात घालणार होती.
     नोव्हेंबर १७७८ मध्ये इगरटनच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजा राघोबादादाला सोबत घेऊन पुण्याच्या दिशेने निघाल्या.
     पनवेलमार्गे खंडाळा घाट गाठायला त्यांना एक महिना लागला. इंग्रज सेना पुण्याच्या दिशेने येत आहे हे समजताच पुण्यातील लोक घाबरून गेले. शहर सोडू लागले. महादजी आणि तुकोजी होळकर काही सरदारांना सोबत घेत तातडीने खंडाळा घाटाच्या दिशेने निघाले. त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. गनिमी काव्यात दोघे वीर तरबेज होते. तुकोजीने खंडाळा घाटापर्यंत झेप घेऊन इंग्रजांची रसद तोडायला सुरुवात केली. अधून,अधून छापे घालून इंग्रजांना जेरीस आणायला सुरुवात केली त्यामुळे इंग्रजाना घाट चढणेही मुश्कील झाले. तोवर महादजीने दग्दभू धोरण अमलात अनुत वडगावपर्यंत इंग्रज सैन्याला दाणा-पाणी मिळणार नाही याची व्यवस्था करायला सुरुवात केली.
     इंग्रज सैन्य कसाबसा घाट चढून आले व तोफा-बंदुका सज्ज केल्या, पण मराठे कोठे दिसतही नव्हते. ते कोठून तरी अचानक येत आणि इंग्रजांची लांडगेतोड करून इंग्रज सज्ज व्हायच्या आत निघून जात. इगरटन आणि त्याचे उपासमारीने आणि तहानेने गांजलेले बरेच सैन्य युद्धामुळे मरू लागले. उर;ए त्यांची अक्षरश: ससेहोलपट झाली. महादजीच्या सैन्याने आता इंग्रज सैन्याला पुढे जाणेही मुश्कील केले. इष्टुर फाकडा या नावाने गाजलेला कॅप्टन स्तुअर्ट या युद्धात मारला गेला. आता पुणे जिवंत गाठता येत नाही याची खात्री पटलेला कर्नल इगरटन शरण आला.
     आठ जानेवारी १७७९ पर्यंत इंग्रज सैन्य जेमतेम वडगावपर्यंत पोचु शकले. महाद्जीने त्यांना दुसऱ्या दिवशी तळेगावपर्यंत पोचू दिले आणि तुकोजी व महाद्जीच्या सैन्याच्या दुहेरी कैचीत ते सापडले. आता त्यांना मुंबईच्या दिशेने पळून जाणेही अशक्य झाले. त्यात उपासमारीने इंग्रज सैन्य गळाठले होते. इंग्रजांची आतापर्यंतची वाटचाल अत्यंत महागात पडली होती, इगरटनला आता गुढगे टेकणे भाग पडले.
     पण राघोबादादाला आपल्या स्वाधीन करत नाहीत तोवर तह अशक्य आहे असे महादजीने त्यांना कळवून टाकले. तहाच्या बोलाचाली सुरु झाल्या. महादजीची राघोबादादाबाबतची अट मान्य झाली. इंग्रजांनी ताब्यात घेतलेले साष्टी आणि इतर प्रदेश मराठ्यांना परत देण्याचेही ठरले. अटीचे पालन करेपर्यंत दोन इंग्रज अधिकारी मराठ्यांच्या कैदेत राहतील ही अटही मान्य झाली. परत जाऊ देण्याच्या अटीवर महादजीला ४१००० रुपये रोख आणि भडोच शहरही देण्यात आले.
     राघोबादादाला त्याच्या सहकार्यासोबत महादजीसमोर उपस्थित करण्यात आले. राघोबादादाला झांसी येथे रहायला पाठवून त्याला खर्चासाठी बारा लाख रुपये द्यायचे ठरवले ते पेशवेपदावर पुन्हा हक्क न सांगण्याचा शर्तीवर. या शर्ती आम्ही पाळून घेऊ अशी हमी महादजी व तुकोजीने दिली. लगोलग राघोबादादाला झांसीच्या दिशेने बंदोबस्तात रवाना केले गेले. अशा रीतीने मराठेसाहीवरील संकट तात्पुरते का होईना टळले.
     या तहात मानहानी झालेल्या इगरटनने सरळ इंग्लंडची वाट धरली.
     या तहामुळे महादजीची कीर्ती अजूनच वाढली तशीच तुकोजी होळकरची प्रतिष्ठाही वाढली. पुढे राघोबाला पुण्यात आणण्याच्या कारस्थानात सामील असलेल्या सखारामबापु बोकील यालाही महादजीने कैद केले व सिंहगडावर तुरुंगात ठेवले.
     राघोबादादाचे पुन्हा पलायन  
     राघोबादादा सतत पळ काढण्यात आता वस्ताद झाला होता. पेशवेपद प्राप्त करण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याला झपाटलेले होते. मराठी जनमाणसात तो नारायणरावाच्या खुनामुळे आधीच बदनाम झालेला असला तरी त्याला त्याची पर्वा आहे असे दिसत नव्हते, त्याला झांसीकडे पाठवण्यात आले असले तरी त्याच्या आकांक्षा संपलेल्या नव्हत्या. पळून जायची प्रत्येक संधी कशी मिळवता येईल यावरच त्याचा विचार चालू होता. त्याला ती संधी मिळाली ती नर्मदेच्या काठी आला असता. त्याला बंदोबस्तात घेऊन चाललेल्या हरी बाबाजीला त्याने गोड बोलून जवळ बोलावले आणि बेसावध हरीवर अचानक हल्ला चढवला. त्याला गंभीर जखमी करून तो गुजरातला पळाला. पेशवे घराण्याच्या माणसाशी कसे युद्ध करायचे या विचाराने बाकी सैनिकही हतबल होऊन हे पलायन पाहत बसले,
     गुजरातमध्ये इंग्रजांनी साहजिकच त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. गुजरातमध्ये असताना त्याने फतेहसिंग गायकवाड यांच्याबरोबरही मैत्री साधली आणि पुण्यावर पुन्हा चाल करून जायचे ठरू लागले. वडगावचा मानहानी करणारा तह त्याला अमान्य होता. अर्थात इंग्रजांनी तो केला होता तो अत्यंत नाईलाजापोटी.
     इकडे महादजीच्या ताब्यातून राघोबादादा पळून गेला यामुळे नाना फडणीस महादजीवर नाराज झाला, त्याला वाटले की बहुदा महादजीला राघोबाबद्दल सहानुभूती आहे. महादजीने गुजरात स्वारी करून राघोबादादाला पुन्हा ताब्यात घ्यायचे असेल तर आपल्याला आर्थिक आणि सैनिकी सहाय्य लागेल असे सांगीतले. नानासमोर इलाज नव्हता कारण महादजीशी वैर घेतले आणि त्याने राघोबादादाचा पक्ष घेतला तर काय अशीही सुप्त भीती त्याला होतीच. त्यामुळे त्याने महादजीला बुर्हाणपूर, अशीरगड आणि इतर दोन प्रांत देऊन तोड ठरवली आणि महादजीचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला,
     हे झाल्यावर महादजीने तुकोजीला सोबत घेतले व इंग्रज अधिकारी गोडार्डवर चाल करून निघाला. त्या काळात तुकोजी हा मुत्सद्दी म्हणून नसला तरी रणझुंजार योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. त्यांनी फेब्रुवारी १७८० मध्ये नर्मदा नदी ओलांडून बडोद्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. वाटेत वडगावच्या तहात कैद करून ठेवलेले स्टेवार्ट व फार्मर हे दोन इंग्रज कैदीही सोडून दिले. तहाचा भंग झाला असल्याने आता त्यांना कैदेत ठेवूनही काही उपयोग नव्हता. त्यांना ठार मारावे तर इंग्रज-मराठयांमधील वैर वाढण्याचा धोकाही होताच. शिवाय महादजी योद्धा असण्यासोबतच एक कवी हृदयाचा भाविक माणूसही होता याचे साक्ष त्याने लिहीलेली काव्ये आहेत.
     गुजरातमध्ये इंग्रज व मराठी सैन्यात अनेक चकमकी झाल्या असल्या तरी त्यात उल्लेखनीय यश लाभले नाही. उलट जनरल गोडार्डने वसई जिंकून घेतले.
     १७८१ मध्ये गोडार्डने मोठ्या सेनेसह बोरघाट ओलांडला आणि पुण्याच्या दिशेने निघाला. पण तो पुण्याला पोहोचू शकण्याच्या आधीच तुकोजी होळकर आणि हरीपंत फडकेच्या आघाडीने गोडार्डचा पराभव केला.
     महादजी असेपर्यंत आपण मराठ्यांच्या शक्तीला नामोहरम करू शकत नाही हे गोडार्डच्या लक्षात आले. आधी त्याला दक्षिणेतच अडकवून ठेवावे असे इंग्रजांना वाटत होते व त्यांनी त्यासाठी अनेक योजनाही आखलेल्या होत्या. पण आता महादजी उत्तरेतच बरा असे त्यांना वाटू लागले. धोरण बदलले. महादजीचे उत्तरेत जे प्रांत होते त्यावरच हल्ले सुरु करण्याची योजना इंग्रजांनी आखली. त्यासाठी त्यांनी निजाम व मुधोजी भोसलेलाही शांत केले.
     महादजी आणि तुकोजी माळव्यात आले ते १७८० मध्ये. नानाच्या सल्ल्याविरुद्ध महादजीने माळव्यात आपला तळ टाकायचा निर्णय घेतला. कारण इंग्रजांनी उत्तरेत किंवा दक्षिणेत उपद्रव सुरु केला तर दोन्ही दिशांनी वेगाने लष्करी हालचाली करण्यासाठी मध्यवर्ती प्रदेश म्हणून माळवा (उज्जैन) उपयुक्त राहील.
     इंग्रज कारस्थानी नीतीत पुढचे होते. त्यांनी गोह्दच्या राणाला महादजीच्या प्रदेशावर स्वारी करण्यास सांगितले. त्याच्या मदतीला ब्रिटीश सेनाही दिली. उत्तरेतील उपद्रव सुरु झाला. राणा व इंग्रजांनी मिळून अचानक ग्वाल्हेरवर स्वारी केली आणि ते शहर जिंकून घेतले. महादजीला प्रतिकार करण्याचीही संधी मिळाली नाही एवढा हा हल्ला अचानक होता.
     ग्वाल्हेर जिंकल्याने मनोबल वाढलेला राणा आणि इंग्रज आता महादजीच्या आतल्या प्रांतात घुसू लागले. आता महाद्जीही प्रतिकार करू लागला. पण इंग्रज व राणाच्या सैन्याला अनेक ठिकाणी यश मिळू लागले. गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या. माळवा इंग्रजांच्या अखत्यारीत आला तर त्यांची भारतावरील सत्ता मजबूत करण्यासाठी मोठी मदत होणार होती. त्यामुळे त्याने अजून इंग्रजी सैनिकांच्या तुकड्या माळव्याच्या दिशेने रवाना केल्या.
     इंग्रजांच्या हेतूची पूर्ण कल्पना आलेल्या महादजीने सर्व शक्ती एकवटून १ जुलै १७८१ रोजी इंग्रजांचा सपाटून पराभव केला आणि वॉरन हेस्टिंग्सला आपल्या अधिकाऱ्याना तह करून सुटका करून घेण्यास सांगावे लागले.
     सालभाईचा तह
     हा तह महादजीच्या कारकिर्दीतील एक कळस मानला जातो. आपला पराभव निश्चित आहे अशी भावना इंग्रजांच्या मनात रोवली जात होती, दक्षिणेतही मराठ्यांनी कर्नल गोडार्डचा त्याच काळात सपाटून पराभव केला होता तर हैदर अली इंग्रजांना भारी पडत चालला होता. आता आपली आहे ती तरी इज्जत वाचावी यासाठी इंग्रजांना पेशवे, महादजी आणि हैदर अलीशी संयुक्त तह करणे भाग होते. पण नाना यासाठी तयार नव्हता. तो स्वत: महादजी आणि हैदर अलीशी आधी बोलण्यास उत्सुक होता. इकडे १३ ऑक्टोबर १७८१ ला माळव्यात्वील इंग्रज सेना आणि महादजी यांच्यात तात्पुरती युद्धबंदी झालेली होती.
     असा पेशवे दरबाराशी थेट तह होऊ शकत नाही आणि महादजी हाच आता निर्णय घेणारा आहे हे लक्षात आलेल्या वॉरन हेस्टिंग्सने आता सरळ महादजीशी बोलणी सुरु केली. आम्हाला पेशवे दरबाराशी तह करून द्यावा आणि तुम्ही सरळ दिल्लीच्या बादशाहाच्या खजिन्यावर मालकी गाजवा, इंग्रज मध्ये पडणार नाहीत असे वॉरन हेस्टिंग्सने महादजीला कळवले.
     एकीकडे इंग्रजांनी घातलेला हा राजकीय पेच होता. महादजीलाही पेशवाई आणि आपल्या स्थितीची परखड जाणीव होती. इंग्रज-मराठयांमधील सततची युद्धे मराठ्यांच्या तिजोरीवर ताण टाकत होती. त्याने ग्वाल्हेरचा किल्लाही इंग्रजांच्या तावडीतून सोडवलेलाच होता. गेली सात वर्ष सुरु असलेली इंग्रजांशीची युद्धे कोठेतरी थांबवण्याची त्याची इच्छा होती. त्याने याबाबत सातत्याने नानाशीही पत्रव्यवहार केला. शेवटी बऱ्याच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर तह झाला त्यालाच सालभाईचा तह म्हटले जाते. हा तह महादजी शिंदे आणि इंग्रजांत १७ मे १७८२ रोजी झाला.
     या तहानुसार-
१.    इंग्रजांनी मराठ्यांचे घेतलेले सर्व प्रांत परत द्यावेत,
२.    भडोच-साष्टी आणि जवळची बेटे इंग्रजांच्याच ताब्यात राहतील,
३.    फतेहसिंग आणि सयाजीराव गायकवाड यांनी दिलेले प्रदेश इंग्रज त्यांना परत करतील,
४.    राघोबादादाचा निवास कोठे असेल हे तह झाल्यापासून चार महिन्यात ठरवण्यात येईल. त्याला इंग्रजांनी पुन्हा आश्रय देता कामा नये.
५.    इंग्रजांच्या मित्र पक्षांना पेशवे हानी पोचवणार नाहीत तसेच इंग्रजही पेशव्यांच्या हितसंबंधी राज्यांस कसलीही हानी पोचवणार नाहीत.
६.    या तहाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महादजी शिंदेवर असून जोही या तहाची कलमे पळणार नाही त्याला (पेशवे आणि इंग्रज) अद्दल घडवण्याचा अधिकार त्याला असेल.
     अशी या तहाची  महत्वाची कलमे होती. या तहात हैदर अलीचा समावेश नसल्याने नाना फडणीस फारसा संतुष्ट नव्हता. हैदर अलीही नाराज झाला. पण यानंतर लवकरच हैदरचा मृत्यू झाला. त्यानंतरच पेशव्याने या तहावर स्वाक्षरी केली.
     महादजीने स्वत:चे स्थान भक्कम करण्यासाठी आणि बादशहावर मराठ्यांचे (शिंदेंचे) वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा करार केला असा आरोप वासुदेवशास्त्री खरेंसारखे अनेक इतिहासकार करत असतात. पण राजकारणातील प्रत्येक कराराबाबत आक्षेप घेता येऊ शकतात. तत्कालीन राजकारण, राष्ट्रीय जाणीवांचा त्यावर प्रभाव पडतो. भारत हा एक देश आहे, एक राजकीय राष्ट्र आहे ही भावनाच तेव्हा जन्माला आलेली नसल्याने प्रत्येक राजवट आपापले हितसंबंध जपण्याचे काम करत असताना महादजीकडून आधुनिक राष्ट्रभावनेची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. शिवाय वरील कराराबाबतच्या चर्चांत नानाचा सातत्याने समावेश असल्याने महादजीने स्वत:चे स्वार्थ साधले हा आरोपही टिकू शकत नाही.
     इंग्रजांशी सतत लढत बसने पेशवाईला आणि आपल्यालाही परवडणार नाही, ही वारंवार होणारी हानी टाळण्यासाठी आणि मराठ्यांचे मुख्य ध्येय म्हणजे दिल्ली, ते गाठण्यासाठी महादजीने या करारात स्वारस्य घेतले असे मात्र म्हणता येते. इंग्रजांशी सर्वकष युद्ध करून त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे ही भावना जन्माला आली ती यशवंतराव होळकराच्या मनात. तोवर इंग्रज हे इतरांसारखेच शत्रू आहेत अशी सार्वत्रिक मान्यता होती. आणि काळाच्या सीमा ओलांडणे अनेकांना शक्य होतेच असे नाही कारण तत्कालीन राजकारणातील वातावरणच तसे होते.
     अर्थात सालभाईचा तह/करार नेमका कोणाच्या फायद्याचा ठरला यावर बरीच चर्चा झालेली आहे आणि वर्तमानातही ती होत असते. प्रथमदर्शनी या तहामुळे मराठ्यांचा तात्कालिक लाभ झाला आणि पानिपतच्या अपयशाला धुवून टाकले असे जरी दिसत असले तरी दीर्घकाळात इंग्रजांनाच याचा जास्त लाभ झाल्याचे दिसून येते. अर्थात इंग्रजांनीच पुढे या तहाला हळूहळू वाटाण्याच्या अक्षता लावल्या यावरून दिसून येते. वॉरन हेस्टिंग्स या तत्कालीन गव्हर्नर जनरलला मात्र महादजीच्या उभरत्या शक्तीची कल्पना आलेली होती आणि त्याला शह देण्यासाठी हा सर्व घाट घातला गेला असे म्हणता येते.
     दक्षिणेच्या राजकारणाकडून महादजीला उत्तरेच्या राजकारणात लक्ष घालण्याची संधी मिळाली आणि महादजीने या संधीचे सोने केले. इंग्रजांची नेमकी शक्ती त्यांचे कवायती सैन्य आहे हे ओळखून त्याने इंग्रजांच्या धर्तीवर कवायती सैन्य उभारायला सुरुवात केली. तेव्हा इंग्रजांची सत्ता कलकत्त्यापासून अलाहाबादपर्यंत पसरली होती. गुजरातमध्ये आणि दक्षिणेतही त्यांनी पाय रोवले होते. हा शत्रू महागात पडणार आहे याची खूणगाठ महादजीने मनाशी बांधलेली होती. बादशाहीवर ज्याचा अंकुश त्याची देशावर सत्ता हे तत्कालीन समीकरण होते त्यामुळे इंग्रजही बादशाहीवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात सातत्याने होते. तेथेच शह देणे महादजीला आवश्यक वाटले त्यामुळे सालभाईच्या तहानंतर महादजीने आपले लक्ष दिल्लीकडे वळवले.
     नजाफ खान तेव्हा बादशाहाचा मीरबक्षी होता. महादजीने १७७२ मध्ये शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवले तेव्हापासून तो बादशहासोबतच होता. इंग्रजांच्या चालींशी तो जवळून परिचित होता. त्यामुळे महादजी जरी दिल्लीत नसला तरी त्याने बादशहाला इंग्रजांच्या आमिषांना बळी पडू दिलेले नव्हते. पण दुर्दैवाने नजाफ खानाचा २६ एप्रिल १७८२ ला मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे दिल्ली दरबारात पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणे आवश्यक झाले होते कारण बादशाहाच्या दरबारात आता दोन गट पडू लागले होते. एकाच्या मते पातशहाने महादजीच्याच संरक्षणात राहावे तर दुसऱ्या गटाचे मत होते आता त्याने इंग्रजांचे संरक्षण घ्यावे. इंग्रजांनी या संधीचा फायदा उठवण्याच्या आत दिल्ली गाठणे आवश्यक होते,
     पण दुर्दैवाने इंग्रजांशी माळव्यात दीर्घ काळ मोठे युद्ध करावे लागल्याने महादजीची आर्थिक स्थिती कमजोर झालेली होती. दिल्लीवर नियंत्रण आणायचे तर तेथे ससैन्य पोहोचण्यासाठी त्याला पैशांची निकड होती. त्यामुळे महादजीने पुणे दरबाराकडे पंचवीस लक्ष रुपयांचे कर्ज मागितले. नानाने ते कर्ज देणे टाळण्यासाठी महादजीलाच आधीच्या खर्चाचे हिशोब द्यायला सांगितले. खरे तर पेशव्यांचा खजिनाही त्यावेळी रिता झाला असल्याने नाना वेळकाढूपणा करत होता. पण असे उत्तर आत्यामुळे महादजीने पुणे दरबाराचा नाद सोडला व पुढे पुणे दरबाराकडे दुर्लक्ष करून स्वत:च दिल्लीवर स्वामित्व गाजवावे असा विचार केला. आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या माळवा, बुंदेलखंडातील त्रस्त करणाऱ्या जहागीरदारांना आधी धडा शिकवून त्यांच्याकडूनची येणे बाकीही वसूल करायला त्याने सुरुवात केली. या निमित्ताने आपले वर्चस्व मध्य भारतात निर्माण करता येईल व दिल्लीवर प्रभावी अंकुश ठेवता येईल असा त्याचा उद्देश होता.
     चंदेरीच्या राजाचा पराभव करून त्याने गोहदकडे मोर्चा वळवला. आधी ग्वाल्हेरचा किल्ला गोह्दच्या राणा छत्रजीतकडून जिंकून घेतला. आता महादजी गोह्दवर चालून येणार या भीतीने राणा छत्रजीतने इंग्रजांची मदत मागितली पण इंग्रजांना आता महादजीला दुखवायचे नव्हते. ते दूरच राहिले. महादजीने गोह्दच्या किल्ल्याला वेढा घातला. अन्नपाणी तोडून टाकले. गोह्दचा किल्ला जिंकला गेला. राणा पळून गेला पण त्याला जिवंत पकडण्यात आले. त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात तुरुंगात टाकले गेले. इंग्रजांनी त्याच्या सुटकेसाठी महादजीकडे विनवण्या केल्या पण त्यांचा काही उपयोग झाला नाही.
     दरम्यान महादजीला दिल्ली दरबारातून भेटायला मुत्सद्दी येत होते. त्याने लवकर दिल्लीला यावे अशी बादशहाची विनवणी होती. नजाफ खान मेल्याने दिल्लीत अशांतता पसरली होती. दिल्लीत दोन गट पडलेलेच होते, त्यांच्यात चकमकीही होऊ लागल्या होत्या. दिल्लीच्या किल्ल्यात या बंडाळीमुळे अन्न पोचेनासे झाले असल्याने बादशहालाही फाके पडू लागले होते. महादजीला पुण्याहून वेळेत मदत आली नसल्याने महादजी इच्छा असूनही दिल्लीला पोहोचू शकत नव्हता. या स्थितीचा फायदा घ्यायला इंग्रज पुढे सरसावले होते. पण महादजीने पूर्वी आपल्याला तख्तावर बसवायला मदत केली याचे स्मरण असल्याने शाह आलम महादजीवरच भरोसा ठेऊन होता. मराठ्यांच्याच विश्वासातला अफ्रासियाब खानाला बादशहाने नजाफ खानाच्या जागेवर नेमले. पण तो पूर्वाश्रमीचा हिंदू असल्याने बाकी सरदार त्याच्या आज्ञा पाळेनासे झाले. त्यामुळे मिर्झा शफीची नियुक्ती त्याच्या जागेवर केली गेली अशी दिल्ली दरबाराची आणि बादशहाची दयनीय अवस्था झाली होती.
     आणि मिर्झा शफी महादजीच्या मनात आपल्याबाबत विश्वास निर्माण होईल असा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात मिर्झा शफीचा खून त्याचा विरोधक हमदानी याने केला. त्यामुळे अफ्रासियाब खानाला पुन्हा मीर बक्षी बनवण्यात आले. पण स्थिती सुधारण्याऐवजी बिघडत गेली. अशा रीतीने दिल्ली अंतर्गत कटकारस्थानांत व्यस्त होती आणि महादजी अजूनही माळव्यात अडकून पडला होता.
     वॉरन हेस्टिंग्सने याच काळात काही चाली करुन महादजीला शह देण्याचा प्रयत्न केला, त्याने पातशहा शाह आलमच्या जवान बख्त या मुलाला (ज्याला महादजीने काही वेळासाठी तख्तावर बसवले होते) लखनौ येथे बोलावून घेतले. यामागीत राजकीय इंगिते महादजीच्या लक्षात आली. त्याने या कृत्यासाठी इंग्रजांचा वकील पाठवून निषेधही केला. इंग्रज महादजीच्या दहशतीखाली असल्याने त्यांनी जवान बख्तला महादजीकडे पाठवून दिले खरे पण महादजीचा इंग्रजांबाबतचा सर्व विश्वास उडाला.
     याच काळात महादजीने आपले लष्कर सुसज्ज बनवण्यासाठी चार्ल्स डी-बोईन या फ्रेंच सेनानीला नियुक्त करून दोन डिव्हिजन कवायती सैन्य खडे करण्याची आज्ञा दिलेली होती. इंग्रजांना शह द्यायचा तर त्यांचीच युद्धनीती वापरली पाहिजे हे त्याने हेरले होते.
     महादजीवर खुनाचा आळ
     १७८४ मध्ये महादजी दिल्लीच्या रोखाने निघाला. त्याने जातांना हमदानीच्या कब्जात असलेला धोलपुर किल्ला व आसपासचा प्रदेशही जिंकून घेतला. मीर बक्षी अफ्रासियाब खानाशीही महादजीची वाटेत भेट झाली. दिल्लीच्या कारभाराबाबत चर्चा झाली.
     नंतर अफ्रासियाब खान हमदानीला धडा शिकवण्यासाठी पुढे निघाला. पण हमदानी युद्धाच्या मन:स्थितीत नव्हता. त्याच्या आणि महाद्जीच्या गोटात असलेला मिर्झा शफीचा भाऊ झैन-अल-अबिदिनच्या मनात काही वेगळेच शिजत होते. अबिदिनने ह्मदानीला चिथावले. त्यानुसार हमदानी अफ्रासियाबखानाला भेटायला म्हणून केवळ एका अंगरक्षकासोबत आला.  अंगरक्षकाने संधी साधून अफ्रासियाब खानावर प्राणघातक वार केले. त्यात अफ्रासियाब खानाचा मृत्यू झाला.
     या खुनाचा आळ महाद्जीवर यावा म्हणजे पातशहा त्याचे संरक्षण घेण्यास नकार देईल आणि हमदानीचा एक शत्रूही नष्ट होईल असा डाव या कटामागे होता. याचा फायदा इंग्रजांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण महादजीने अत्यंत कौशल्याने ही स्थिती संभाळली. त्याने बादशाह शाह आलमची आधी सुरक्षा वाढवली कारण त्याच्यावरही ही खुनाची वेळ येऊ शकते हे त्याने ओळखले. हमदानीशी त्याने युद्धही सुरु केले. बादशहाचे सैन्यही महादजीची बाजू घेऊन लढू लागले. तीन दिवसांच्या भयंकर युद्धानंतर हमदानी दाती तृण धरून शरण आला.
     त्याला व त्याच्या सर्व अधिकार्यांना कैद करण्यात आले. त्याची सारी युद्ध सामग्री आणि जहागीरी जप्त करण्यात आल्या. त्याचे कुटुंब उज्जैन येथेच राहील, ते शहर त्यांना सोडून जाता येणार नाही अशीही अट घालण्यात आली. अफ्रासियाब खानाच्या खुन्यांनाही पकडण्यात आले.
     अशा रीतीने महादजी एका कटातून निष्कलंक बाहेर तयर आलाच पण खऱ्या गुन्हेगारांनाही योग्य ती शिक्षा मिळाली.
     बादशहा शाह आलमशी भेट
     अफ्रासियाब खानाच्या हत्येमुळे बादशहा शाह आलम आता एकाकी पडला होता. कोणावर विश्वास ठेवावा हेच त्याला समजत नव्हते. तो दिल्लीत राहणे गैर समजून आग्र्याला निघून गेला होता. महादजीने फतेहपुर सिक्री येथे बादशहाला बोलावून घेतले.
     १४ नोव्हेंबर १७८४ रोजी दोघांची भेट झाली. या भेटीत बादशहाने आपल्यासमोरील अडचणींचा पाढाच वाचला. महादजी त्याला म्हणाला की पदांवाचून येथे काही होत नाही. त्यामुळे हा सारा संघर्ष पदांसाठीच आहे. त्यामुळे आता तुम्हाला ही व्यवस्था बदलावी लागेल. त्यावर बादशहा म्हणाला की तुम्हाला आम्ही लिहिणार मग तुम्ही पेशव्यांना लिहिणार यात वेळ जाईल. त्यापेक्षा मी काहीतरी नवी व्यवस्था करतो. पेशव्यांचा योग्य सन्मान होईल हेही पाहतो.
     महादजीला अलिजाबहादूर व वकील--मुतालिक पद बहाल
     बादशहाच्या मनात बादशाहीची व्यवस्था महादजीच्या हातात देणे होते. एकाही मुस्लीम अधिकारी त्याच्या विश्वासात येत नव्हता. त्याने महादजीला सांगितले की मीरबक्षी आणि वकील--मुतालिक ही पदे महादजीने घ्यावीत. महादजी म्हणाला की वकील--मुतालिक हे पद पेशव्याला द्यावे. पण त्यावेळेस अफ्रासियाब खानाच्या खुनामुळे दिल्लीतील स्थिती स्फोटक बनलेली होती. महादजी पुण्याला पत्र लिहिणार मग तेथून अनुमती येणार यात वेळ जाणार होता. त्यामुळे ३० नोव्हेंबर १७८४ रोजी बादशहाने भव्य दरबार भरवला. त्यात त्याने पेशव्यांना नायब--मुतालिक आणि बक्षी-उल-मौलिक  या पदव्या घोषित केल्या आणि नायबगिरी स्वत: महादजी पाहील असेही घोषित करण्यात आले.
     नंतर तेथून दरबार हेलना नामक गावी हलवला गेला. तेथे चार डिसेंबर १७८४ रोजी दरबारात महादजीची सन्मानपूर्वक शाही रितीरिवाजानुसार अलिजाबहादूर आणि वकील--मुतालिक पदावर नियुक्ती करण्यात आली. यामुळे शाही कारभार सर्वस्वी महादजीच्या हातात आला. ही महादजीच्या कार्यकर्तुत्वाची सर्वोच्च झेप होती. असे असले तरी महादजीला पाटीलबाबा म्हटले जाणेच अधिक प्रिय राहिले.  
     अशा रीतीने दिल्लीच्या कारभाराची व पातशहाच्या संरक्षणाची जबाबदारी महादजीने शिरावर घेतली पण पुढचा प्रवास सोपा नव्हता. बंडखोर मुघल सरदारांना वठणीवर आणणे, जहागिरी घेऊनही त्या प्रमाणात बादशाहीची सेवा न करणाऱ्या सेनानीन्ना अद्दल घडवणे ही मोठी कठीण कामगिरी त्याला करावी लागली. बादशाहीचा जो प्रदेश होता तेथील महसूलाची व्यवस्थाही त्याला नेटाने लावावी लागली. वाटेतील अनेक काटे दूर करावे लागले. बादशहाने त्याला संपूर्ण सहकार्य केले. पण संकटे येणारच होती.
     पातशाहीचे नियंत्रण असलेले अनेक किल्ले हातातून गेलेले होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी महादजीने मोहीम सुरू केली ती १७८५ मध्ये. डीग, आग्रा, अलीगढ येथील किल्ल्याला वेढा घालायला तो वृंदावन येथे आला. त्या काळात इंग्रज आपल्या चाली रचण्यात मग्न होते. या काळात पातशहा शाह आलमने काही पत्रे इंग्रजांना लिहिली, ती विश्वासघात करणारी होती. यामुळे महादजी अस्वस्थ झाला. अलिगढ किल्लाही ताब्यात येत नव्हता. शेवटी महादजीने पातशहालाच अलिगढ येथे बोलावून घेतले व दोन महिने आपल्या छावणीत ठेवले. तोवर अलिगढ किल्लाही महादजीने जिंकून घेतला.
     पण या युद्धांमुळे महादजीला आपल्या सैन्याचेच पगार भागवता येत नव्हते तर तो शाही खर्चाची मागणी कशी पूर्ण करणार? त्याने शेवटी नाना फडणीसला पत्र लिहिले व आर्थिक मदत मागितली. पण नानाने यावेळेसही कसलीही मदत केली नाही. त्यामुळे मोहिमा करूनच पैसे उभे करायचा निर्णय महादजीने घेतला. तो राघोगढ येथे चालून गेला व किल्ला जिंकला. पण या मोहिमेत बलवंतसिंग महादजीच्या कैदेत पडला असला तरी आर्थिक लाभ काहीच झाला नाही.
     इंग्रजांकडे एक चतुर्थांश प्रदेशाची मागणी!
     आजवर कोणी पातशहाने अथवा अन्य सत्तांनी इंग्रजांकडे चौथाई प्रदेश मागण्याची हिम्मत दाखवली नव्हती. पण इंग्रजांच्या खेळामुळे तसाही महादजी त्यांच्यावर नाराज होताच. आर्थिक अडचणी तर आ वासून त्याच्या समोर उभ्या होत्या. त्यामुळे शाह आलमशी चर्चा करून, त्याच्या मनात नसतानाही इंग्रजांनी बंगाल, सुरत व त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील एक चतुर्थांश भाग पातशहाला द्यावा या फर्मानावर स्वाक्षरी केली. महादजीनेही या फर्मानावर सही केली आणि ते फर्मान इंग्रजांना कलकत्ता येथे रवाना करण्यात आले.
     या फर्मानामुळे इंग्रज समूळ हादरले. जॉन मॅकफर्सन या तेव्हाच्या गव्हर्नर जनरलने तर या फर्मानावर खूप थयथयाट केला. हा सालभाईच्या तहातील अटींचा भंग आहे त्यामुळे हा आदेश मागे घेतला जावा असे त्याने महादजीला कळवले. देशभर या फर्मानाने राजकीय अस्वस्थता वाढवली. उद्या आपलाही एक चतुर्थांश प्रदेश बादशहाने मागितला तर काय, हा प्रश्न उपस्थित झाला आणि रजवाडे घाबरले. १२ मे १७८५ रोजी इंग्रजांनी मुद्दाम महादजीची ही मागणी कलकत्ता गॅझेट या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. यामुळे भारतातील अन्य रजवाडे आपापले प्रतिनिधी इंग्रजांकडे जाऊन महादजीविरुद्ध आपण मदत करू असे सांगू लागले.
     महादजीला यातून जे साध्य करायचे होते ते साध्य झाले. कारण इंग्रजांनी जरी आदळआपट केली असली तरी युद्धाची धमकी दिलेली नव्हती. सालभाईच्या तहान्वये डेव्हिड अंडरसन हा महादजीच्या दरबारी असलेला वकीलही इंग्रजांच्या वतीने मध्यस्थी करू लागला होता. महादजीचाही इरादा युद्धाचा नव्हता, तर त्याला इंग्रजांना नमवायचे होते. त्यामुळे त्याने एक चतुर्थांश प्रदेशाची मागणी सोडून दिली. तोवर इंग्रजही नरमले होते. पण त्यामुळे त्यांना पुणे दरबारातही आपला वकील असावा असे वाटू लागले. पण इंग्रजी वकीलाशी महादजीच्या सल्ल्यानेच विचार-विनिमय होईल अशी अट घातली गेल्याने महादजीचे महत्व आपोआप वाढले खरे पण मॅलेट नावाचा वकील नेमला गेला आणि त्याने जरी महादजीला आधी सन्मानपूर्वक भेटूनच पुण्याला प्रस्थान ठेवले असले तरी तो महादजीला पुढे घातक ठरला.
     त्यात महादजीने त्याच्यावर ७५ लक्ष रुपयांचे कर्ज झाले असल्याने व पुणे दरबार कसलीही आर्थिक मदत करत नसल्याने पैसे उभे करण्यासाठी आता राजपुताना मोहिम् सुरु केली. पण जयपूरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात त्याला व पातशहा शाह आलमला भयंकर संकटात पडावे लागले.
          गुलाम कादिरचा दिल्लीवर कब्जा
     नजीबखानाचा मुलगा झाबेताखान आता वारला असला तरी त्याचा मुलगा गुलाम कादिर महादजीच्या वाटेतील एक अडसर होता. १७८७ साली महादजी शिंदेला राजपुतान्यात जयपूर राज्यातील लालसोट येथे राजपुतांशी लढत असताना अनेक महिने वेतन न मिळाल्याने ८ हजार मुघल सैनिकांच्या विद्रोहाचा सामना करावा लागला. ज्याने जयाप्पा शिंदेचा खून केला होता तो जोधपुरचा विजय सिंगही महादजीविरुद्ध खडा ठाकला. विद्रोही मुघल सैनिक दौलतराम हाल्दियाच्या चिथावणीमुळे सरळ शत्रूपक्षाला जाऊन मिळाले. महादजीची बाजू कमजोर पडली. त्यामुळे जवळपास पुढचे एक वर्ष महादजीची अवस्था बिकट झाली. त्याने तातडीने दिल्लीचे रक्षण करत असलेल्या अम्बुजी इंगळेला त्याने आपल्या मदतीसाठी बोलावून घेतले.
     याच दरम्यान संधीच्या शोधातच असलेल्या गुलाम कादिरने दोआब मराठयांपासून मुक्त करून घेतला आणि दिल्लीकडे धाव घेतली. पाच सप्टेंबर १७८७ रोजी त्याने लाल किल्ल्यात प्रवेश करून असहाय पातशहासमोर उपस्थित झाला आणि त्याला धमकावत महादजी शिंदेचा अधिकार असलेली सर्व पदे हिसकावून घेतली. दिल्ली व आसपासच्या प्रदेशावर आता गुलाम कादिरची सत्ता आली. पातशहा भयभीत झाला होता. असहाय होता. स्वत: लालसोटला अडकून पडलेल्या महादजीने त्याला निरोप पाठवला की मराठा सरदार अम्बुजी इंगळेच्या मदतीने दूरच्या एखाद्या मराठ्यांच्या छावणीत आश्रय घ्यावा, पण पातशहा क्रूरकर्मा गुलाम कादिरला एवढा घाबरला होता की त्याची किल्ल्याबाहेर पडण्याची हिम्मत झाली नाही.
     १७८८ पर्यंत महादजीच्या दिल्लीच्या बाजूला असलेल्या सैन्याने गुलाम कादिरचा  पाठलाग करायला सुरुवात केली.  २२ एप्रिलला गुलाम कादिरशी मराठ्यांचे जोरदार युद्ध झाले. त्यात गुलाम कादिर हरला आणि आपल्या रोहिलखंडाकडे पळून गेला. त्याला वाटेत इस्माईल बेग हा मुघल सरदार भेटला. त्याचीही सेना गुलाम कादिरला सामील झाल्याने मनोबल उंचावलेला गुलाम कादिर मराठ्यांना न जुमानता पुन्हा दिल्ली शहरात घुसला.
     लाल किल्ल्याला ताब्यात घेऊन त्याने पातशहाला एका मशिदीत बंद करुन टाकले व लुटालूट करायला सुरुवात केली. शाही जनान्याची बेइज्जती केली गेली. बलात्कार केले गेले. मग त्याने पातशहाला पदच्युत करून पूर्वीचा पातशहा अहमदशहाच्या नातवाला तख्तावर बसवले. या घटनांमुळे पातशहाचा महादजीवरील विश्वास उडणे स्वाभाविक होते व तसे झालेही. जयपूरवर स्वारी करण्याचे कारणच काय होते हा प्रश्न त्याला पडला यावरूनच पातशहा केवढा अल्पविचारी होता हे लक्षात येईल.
     आणि १० ऑगष्ट १७८८ रोजी क्रूर गुलाम कादिरने आपल्या खंजिराने पातशहाचे डोळे फोडून त्याला आंधळा केले. लपवलेल्या खजिन्याचा ठावठिकाणा सांगावा यासाठी पातशहाचा छळ केला गेला. मलिका जमानीने खजिन्याचा ठावठिकाणा सांगितला नाही म्हणून तिला नग्न करून फिरवले गेले. महालांत सर्वत्र खोदाखोद केली गेली. शहरातील धनाढ्यही या लुटमारीपासून वाचले नाही. याच काळात गुलाम कादिरचे इस्माईल बेगशी मतभेद झाले ते धनाच्या वाटपावरून. तोही शाही जनान्याच्या बेइज्जतीवरून कादिरवर नाराज होता त्यामुळे तो गुलाम कादिरचा पक्ष सोडून महादजीच्या पक्षाला मिळाला.
     महादजीला हे अत्याचार समजल्यावर स्वत: रसदीच्या व पैशांच्या अडचणी सामना करत असूनही राणेखान व जिवबादादाच्या नेतृत्वाखाली बलशाली सेना दिल्लीच्या दिशेने पाठवली. शिंदेच्या फौजांनी जुनी दिल्ली ताब्यात घेतली व मुख्य शहरावर कब्जा मिळवला. इस्माईल बेगने महादजीच्या सैन्याला मदत केली व लाल किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. गुलाम कादिर आता घाबरला. लुटलेले धन यमुनापार करायला सुरुवात केली. १० ऑक्टोबरला तोफेचा गोळा पडल्याने किल्ल्यातील दारूच्या कोठाराचा स्फोट झाला. त्यामुळे कादिरने लगेच किल्ला सोडला व पलायन केले.
     दुसऱ्या दिवशी रानेखान आणि राणाजी शिंदे किल्ल्यात प्रवेशले. भुकेल्यांना अन्न दिले, अंध पातशहाला पुन्हा तख्तावर बसवले. सर्व व्यवस्था लावायला सुरुवात केली. गुलाम कादिरच्याही मागे सेना पाठवून दिली. कादिर बरेच दिवसा लपत छपत पळत होता पण महादजीने  त्याला तब्बल दोन महिन्यानंतर का होईना पण तपास काढत काढत त्याला शोधलेच आणि त्याचे आधी डोळे काढून नंतर त्याला ४ मार्च १७८९ रोजी  देहदंड दिला.
     शेवटी महादजीची दिल्लीवरील सत्ता व देशातील प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित झाली. पण एका भयंकर संकटांतून त्याला जावे लागले.
     लालसोटच्या दीर्घकाळ चाललेल्या मोहिमेत त्यालाही हानी सोसावी लागली. अमानुष छळ झाल्याने व अंध झाल्याने व त्याचा जनाना अपमानित झाल्याने पातशहाचे मनोबलही खालावलेले होते. गुलाम कादिरच्या हत्येमुळे पातशहाचा महादजीवरील ढासळलेला विश्वास पुन्हा पूर्ववत झाला होता.
     तरीही जोधपुरच्या विजय सिंगने महादजीला दिल्लीतून हटवायचा प्रयत्न सुरु केला. अब्दालीचा मुलगा तिमूरशहा याचीही त्यांने मदत मागितली. सारे राजपूत महादजीविरुद्ध एकत्र होऊ लागले. तिमूरशहाने त्यांच्या मदतीसाठी ४५,००० हजारांचे सैन्य पाठवले. महादजीचा पराभव हेच त्यांचे एकमात्र लक्ष्य होते.
     महादजीला याची जाणीव होती, त्याचे सर्व घडामोडीवर लक्ष होते. त्याने शिखांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध वापरले. तिमूरचे सैन्य सिंधू नदीपर्यंत पोचले खरे पण शिखांनी अफगाण्यांचा कडवा प्रतिकार केल्याने त्यांना परत फिरावे लागले. अशा रीतीने महादजीच्या दूरदृष्टीमुळे राजपुतांच्या संकटाचे निवारण झाले.
     राजपुतांनी मग महादजीविरुद्ध पुणे दरबारात कागाळ्या करायला सुरुवात केली. अशा रीतीने महादजीविरुद्ध वातावरण बनू लागले पण महादजीने आपले धैर्य सोडले नाही. महादजीने पुणे दरबारालाही आर्थिक मदत करत नाही तर धनी कशास म्हणविता?” या आशयाचे खरमरीत पत्र लिहिले. पुढे आपल्याला पेशव्यांच्या मदतीखेरीज स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे हे त्याच्या मनाने घेतले. महादजी उत्तरेत आपलीच स्वत:ची सत्ता तर निर्माण करणार नाही ना या प्रश्नांने नानाला भेडसावून सोडले होते.
     महादजीने अन्यत्र प्रयत्न करून पुन्हा नवे वीस लाख रुपयांचे कर्ज उभे केले. महादजीने अहिल्याबाई होळकरांनाही मदतीचे आवाहन केले. त्यांनी २५ लाख रुपयांची मदत पाठवली. आता राजपुतांना धडा शिकवल्याखेरीज आपले स्थान पुन्हा निर्माण होणार नाही याची महादजीला जाणीव होती. पण असे करताना राजपुतान्यात होळकरांचेही हितसंबंध आहेत हे त्याच्या लक्षात आले नाही.
     विजय सिंग अजून महादजीला दिल्लीच्या राजकारणातून हटवायच्या प्रयत्नात होताच. एकंदरीत महादजीच्या भोवती अनेक संकटांच्या वावटळी फिरत असल्या तरी तो खंबीरपणे त्यास तोंड देत होता.
     अशात महादजी आणि तुकोजीतही मतभेद सुरु झाले कारण महादजीने होळकरांच्या राजपुतान्यातील हितसंबंधांना धक्का लावला होता. पैशांची अडचण तुकोजीलाही होती कारण तो स्वतंत्र सुभेदार होता आणि त्यालाही त्याचे सैन्य पोसावे लागे. अहिल्याबाइंनी मोहिमेचा खर्च मोहिमेतुंच भागवावा असा त्यांना दंडक घालून दिलेला असल्याने आणि सर्व मोहिमा नुकासानीच्याच ठरत असल्याने  तुकोजीही सतत पैशांच्या अडचणीतच असायचा.
     मुळात या काळातील कोणतीही मोहीम ना शिंदेना धन देऊ शकली होती ना होळकराला. शिवाय सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात असा महादजीचा आग्रह असे. तुकोजी उघड बोलत नसला तरी महादजीला आता पूर्वीप्रमाणे मदत करायची त्याची इच्छा उरलेली नव्हती.
     या बेबनावाची कुणकुण लागताच पेशव्याने तुकोजीला महादजीची भेट घेण्यास सुचवले. अहिल्याबाइंनीही तुकोजीला तेच सुचवले. तुकोजी तेव्हा कोटा प्रांतात होता. त्याचे पागनीस प्रलंबित वेतनासाठी हटून बसले होते. अशा त्रासिक अवस्थेतही तुकोजीच्या मनातही आपण प्रवासात दिरंगाई केली याबद्दल अपराधभावना निर्माण झाली होतीच. शिंदे-होळकरांनी सोबतीने एक युग निर्माण केलेले होते. मग त्यानेच अहिल्याबाईंना विनंती केली की त्यांनीच महादजी शिंदेला लवकर भेट घ्यावी व कामकाज करावेअसे लिहावे.
     त्याप्रमाणे ३१ जुलै १७८९ रोजी दोघांची भेट झाली. या भेटीत तुकोजीने महादजीकडे मागणी केली की दोघांनी जिंकलेल्या प्रदेशातील अर्धा प्रदेश महादजीने तुकोजीला द्यावा व लुटीतील अर्धा हिस्साही द्यावा. महादजीने या मागण्या मान्य केल्या पण जो खर्च झाला त्यातील अर्धा भाग तुकोजीने उचलावा अशी मसलत केली, तुकोजीची ही मागणी अहिल्याबाईंनाही रुचली नाही कारण महादजीच्या सर्वच मोहिमात तुकोजी उपस्थित नव्हता. पण नाना फडनिसाने चिथावणी दिल्यामुळे तुकोजी आपल्या मागण्यांवर अडून राहिला.
     महादजीसमोरही पर्याय उरला नाही कारण तो तुकोजीचे महत्व समजून होता. त्याने तुकोजीला काही धन आणि थोडेफार प्रदेश देण्याचे मान्य केले पण तुकोजीने त्यातील काहीच घेतले नाही. यामुळे महादजीच्या सर्व योजना उध्वस्त झाल्या. शेवटी तोही कर्जात बुडालेला होता आणि पुणे दरबार कसलीही मदत करत नव्हता. ती वेळच मुळात सर्वांवरच आर्थिक संकटाची होती आणि त्यामुळे साहजिकच एकमेकांत मतभेद, गैरसमज वाढणे स्वाभाविक होते. त्यात नानाने उत्तरेत असलेल्या मराठ्यांना सुखाने जगू द्यायचे नाही याचा चंग बांधलेला होता. महादजीला मदत नाही करता आली हे समजा ठीक, पण तो त्याच्याच सहकाऱ्यांना महादजीच्या विरुद्ध करून त्याला अजूनच अडचणीत आणू लागला. पण तरीही तुकोजीने हिम्मतबहादर गोसाव्याचे गुंतागुंतीचे प्रकरण सोडवायला महादजीला मदत केली.
     त्यामुळे जुलै १७८९ मध्ये महादजी आजारी पडला. इतका की तो जोधपुर आणि जयपूरच्या वकिलांनाही भेट नाकारू लागला. महादजी जगतो की मरतो अशी त्या आजारात त्याची अवस्था झाली होती. पण तब्बेतीत जसा उतार पडला महादजीने लगेच १७९० पासून राजपुतांच्या विरुद्ध मोहिमा काढायला सुरुवात केली.
     एव्हाना तुकोजी व अलीबहादर नानाच्या कान भरण्यामुळे आपल्या विरोधात गेले आहेत हे महादजीच्या लक्षात आले होते.
     लालसोटला पुष्कळ हानी सोसावी लागलेल्या महादजीला राजपुतांवर पुन्हा नियंत्रण आणणे आवश्यक होते. जोधपुरच्या विजय सिंगने महादजी आणि तुकोजीत मतभेद आहेत हे पाहून तुकोजीला आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तुकोजीने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. उलट जयपूरच्या प्रदेशात त्याच्या फौजा धुमाकूळ घालू लागल्या. बऱ्याच घडामोडीनंतर पाटण येथे राजपुतांचा शिंदे-होळकरांनी निर्णायक पराभव केला. १२ हजार राजपूत पकडण्यात आले. तीन हजार राजपूत ठार झाले. मोठी युद्धसामग्री मराठ्यांच्या हाती लागली. विजय सिंगने आता महादजीशी तहाची बोलणी सुरु करायचा प्रयत्न केला पण महादजीने तो फेटाळून लावला.
     शिंदे-होळकराचे सैन्य पुढे सरकत राहिले. तुकोजीचा मुलगा काशीरावही या युद्धांत सामील होता. राठोडांचा प्रदेश मराठी सैन्याने उध्वस्त केला. या विजयाच्या वार्ता ऐकून पातशहा शाह आलम खुश झाला. त्याने महादजीला ७ ऑगस्ट १७९० रोजी गुलाम कादिरने काढून घेतलेली वकील--मुतालिकची वस्त्रे पुन्हा बहाल केली. शिवाय मथुरा-वृंदावन हे तीर्थक्षेत्रही मराठ्यांना देण्यात आले.
     विजय सिंग अजून सलता काटा असल्याने पाटणच्या विजयाने संतुष्ट नसलेल्या महादजी व तुकोजीच्या संयुक्त सेनेने पुढची वाटचाल सुरूच ठेवली. १० सप्टेबर १७९० रोजी राजपूत व मराठे माल्कोट किल्ल्याजवळ एकमेकांना भिडले. या युद्धात राजपुतांचे सारे सैन्य मारले गेले. पण तुकोजी, अलीबहादर आणि महादजीत मतभेद आहेत असे पाहून राजपुतांनी तहाच्या अटी बदलल्या आणि त्यांच्या सह्या असल्याखेरीज तह कसा होऊ शकेल अशी विचारणा केली. ते शक्य दिसत नसल्यामुळे नंतर महादजीने त्यांच्या भेटी नाकारल्या आणि आपला तळ हलवला.यामुळे विजय सिंगला पुन्हा युद्धासाठी जमवाजमव करायची संधी मिळाली. पण तोवर महादजीचे पेंढारी जोधपुर प्रांतात घुसून लुटालूट करू लागल्याने विजय सिंगचे मनोधैर्य गळाले. त्याने महादजीकडे त्याने पुन्हा तहाचा नवा प्रस्ताव पाठवला.
     महादजीला त्यांचे प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते, कारण पुन्हा युद्ध करायचे तर विजय सिंगच्या आता वाढलेल्या सैन्याला तोंड द्यावे लागले असते. त्यात वेळ गेला असता आणि अधिक खर्च करावा लागला असता, त्यामुळे दूरदर्शिता दाखवून त्याने तहाच्या अटी ठरवायला सुरुवात केली, दोन्ही पक्षाचे वकील वारंवार भेटू लागले. शेवटी तहनामा तयार झाला. सांबर येथे हा तह करण्यात आला.
     या तहानुसार विजयसिंगने महादजीला युद्धखर्च म्हणून साठ लाख रुपये देण्याचे मान्य केले तसेच सैन्याचे वेतन द्यायला १५ लाख रुपये देण्याचेही मान्य केले. नुकसान भरपाई म्हणून पुढची चार वर्ष सालाना २० लक्ष रुपये देण्याचेही विजय सिंगने मान्य केले. याशिवाय अजमेरचा किल्ला, त्याच्या आसपासचा प्रदेश आणि सांबर सहित २९ नगरे महादजीला देण्यात आले. इतर अटीही विजय सिंगने मान्य केल्या. महादजीच्या दृष्टीने हा मोठा क्षण होता. अशा रीतीने राजपुतान्यातील प्रलंबित कामे त्याने केली. १७९१ सालापर्यंत उत्तरेतील शत्रू नामोहरम केले.
     ६ जानेवारी १७९२ ला चितोडवरून पुण्याकडे यायला निघाला. जून १७९२ रोजी स्वागतासाठी आलेल्या सवाई माधवराव पेशव्याशी गणेशखिंड येथे त्याची पहिली भेट झाली. इंग्रजान्शे संयुक्त मोहीम करण्याच्या इराद्याने पातशहाची अनुमती घेऊन महादजी पुण्याला आला होता.  येथे आता नानाचे विशेष चालत नाही आणि मराठा सरदार मनमानी करीत आहेत हे त्याच्या लक्षात आले.
     त्याला आता पेशव्यांचे प्रशासनही सांभाळायची आकांक्षा होती. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.  इंग्रजांविरुद्ध संयुक्त मोहिम काढण्याची महादजीची कल्पना आल्या आल्याच बारगळली. पण उत्तरेत गेली बारा वर्ष त्याने १२ कोट खर्च केले होते ते मात्र परत मिळवणे ही महादजीची इच्छा होती. शिवाय तुकोजी आणि अलीबहादरला उत्तरेतून दख्खनेत बोलावून घ्यावे हीसुद्धा त्याची इच्छा होती.
     पण नाना मात्र घाबरला होता. उत्तरेतील महादजीचे स्थान पाहता तो तिकडे स्वत:ची सत्ता निर्माण करेन अशी त्याची भीती तर होतीच त्यात महादजी एवढे मोठे सैन्य घेऊन पुण्याला आला आहे म्हणजे पेशवाईलाही तो धोका निर्माण करू शकतो असे त्याला वाटले. त्याने अन्य सरदारांना आपापले सैन्य घेऊन पुण्यात यायला सांगितले. पण महादजीला हे कळूनही तो अविचल राहिला. महादजीच्या पुण्याला येण्यामागची नेमकी कारणे काय या प्रश्नामुळे इंग्रजही अस्वस्थ झाले होते असे जदुनाथ सरकारसारखे इतिहासकार म्हणतात.
     थोडक्यात महादजीचे पुण्याला येणे हे एक राजकीय तर्क-वितर्कांचे राजकीय वादळ निर्माण करणारे ठरले. पण महादजी मात्र शांतपणे पुणे दरबाराला नियमित भेटी देत राहिला. सवाई माधवरावासाठी भव्य मेजवानीचेही आयोजन केले. पण नाना आणि महादजीमध्ये जी दरी निर्माण झाली होती ती भरून निघाली नाही. पण महादजीने कुशलतेने घेतलेल्या निर्णयांमुळे त्याची लोकप्रियता महाराष्ट्रातही वाढली.

     लाखेरीचे युद्ध
     उत्तरेत महादजी आणि तुकोजीत झालेले मतभेद अजून पूर्णपणे संपलेले नव्हते. तुकोजीने आपल्या सुचना ऐकल्या नाहीत यामुळे महादजी रागावलेला होता. तर तुकोजी त्यांनी जिंकलेल्या प्रदेशांत आपला न्याय्य वाटा मिळाला नाही म्हणून नाराज होता. शिवाय तुकोजी जन्मजात योद्धा असला तरी राजकारणातील डावपेच त्याला समजत नसत. तो एक शिपाईगडी होता. त्याच्या सध्या स्वभावाचा नाना फडवणीस असो कि राजपूत, नेहमी गैरफायदा घेत राहिले. महादजीची दूरदृष्टी त्यामुळे तुकोजीला समजली नाही. असे असले तरी अनेक युद्धांत तुकोजीने महादजीला साथ दिलेली होती. दोघांच्याही काही चुका होत्या पण त्या दुरुस्त करायला मध्यस्थी करण्यासाठी तेवढ्याच सामर्थ्याचा अन्य माणूस कोणी नव्हता.
     त्यात महादजीने पुण्याकडे येतांना अहिल्याबाईच्या प्रदेशातून जाताना तेथे द्यावा लागणारा पथकर भरला नाही त्यामुळे अहिल्याबाई फार नाराज झाल्या होत्या. महादजीला पाण्यात पाहणारा नाना हे मतभेद दूर करण्याची तर शक्यताच नव्हती. त्यामुळे मनाने दोघे कधीच एकत्र येऊ शकले नाही, उलट गैरसमज वाढतच राहिले आणि त्यातूनच लाखेरीचे युद्ध उद्भवले.
     उत्तरेत तुकोजीच्या पेंढार्यांनी महाद्जीच्या गोटात शिरून लुटालूट केली. याची परिणती डी बोईन हा फ्रेंच सेनानी आणि महादजीचे अन्य सरदार बनास नदीकाठी असलेल्या तुकोजीच्या तळावर चालून जाण्यात झाली. असे काही होईल याची तुकोजीने कल्पनाच केली नव्हती कारण पेंढारी हे मुक्त सैनिक असतात आणि लुटालूट करणे हाच त्यांचा व्यवसाय. त्यासाठीच ते कोणाच्या ना कोणाच्या सेनेत सामील होत पण त्यांना वेतन दिले जात नसे. पेंढारी हे त्यांच्या मर्जीचे मालक असायचे.
     त्यामुळे झाला प्रकार माहित नसलेला तुकोजी अचानक झालेल्या हल्ल्याने प्रतिकार न करता तेथून लाखेरीला निघून गेला. झाला प्रकार समजल्यावर मात्र तुकोजी संतापला. महादजीच्या सैन्याने आपल्यावर आक्रमण करावे हेच धक्कादायक होते. अर्थात महादजी पुण्यात असल्याने त्यालाही ही बतमी मिळेपर्यंत उशीर झाला होता. महादजीच्या फौजा पाठलाग करत लाखेरीपर्यंत येऊन पोचल्या होत्या. त्यावेळेस तुकोजी राजपुतान्यात् घुसून शिंदेंचे प्रदेश कब्जात घेण्याचा विचार करू लागला होता.
     हे वृत्त महादजीला समजले तेव्हा त्याने नाना फडणीसाला तुकोजीला समजून सांगायची विनंती केली. पण धूर्त आणि पाताळयंत्री नानाने त्यात खोडा घातला आणि तुकोजीला महादजीच्या विनाशासाठी चिथावले.
     आता दोन्ही पक्ष एकमेकांचा नाश करण्यासाठी खडे ठाकल्याने कोणाच्या मध्यस्थीची शक्यता उरलेली नव्हती. १ जून १७९३ रोजी लाखेरी येथे उभयपक्षात युद्ध सुरु झाले. डी-बोईन आपला सुसज्ज तोफखाना घेऊन आला होता. या धमासान युद्धात तुकोजीचा पूर्ण पराभव झाला. पण या युद्धामुळे मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणाला मोठा हादरा बसला. होळकरांचा पराभव झाकल्याने तुकोजीची बाजू घेणाऱ्या नानाने आपले रंग बदलले आणि तुकोजीचा त्याग करून तो महादजीच्या गोटात आला. त्याने महादजीच्या जुन्या मागण्या मान्य करून त्याला पाच कोटी रुपये उत्तरेतील मोहिमांसाठी दिले. पण नानाच या युद्धाला खतपाणी घालणारा होता हे महादजी कधीच विसरला नाही.
     महादजी शिंदेचा मृत्यू
     मे १७९३ नंतर मात्र महादजीची तब्बेत पुन्हा ढासळू लागली. वैद्यांनी केलेले उपचार व्यर्थ जाऊ लागले. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी सवाई माधवराव पेशवा तब्बेतीची चौकशी करायला स्वत: आला पण महादजी त्यावेळी बोलूही शकत नव्हता. पेशवा जाताच त्याने अखेरचा श्वास घेतला आणि एक पर्व संपले.
     दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या एका महान मराठ्याच्या मृत्यूमुळे एका युगाचा अस्त झाला. त्याच्या मृत्यूपश्चात वानवडी येथे भव्य छत्री बांधून एक प्रेरणादायी स्थान बनवण्यात आले.
     कवी हृदयाचा महादजी
      महादजीचे जीवन अविरत युद्धे आणि राजकीय मुत्सद्देगिरीत गेले असले तरी त्याचे हृदय भावनांनी आणि भक्तिभावाने ओसंडणाऱ्या प्रतिभाशाली कवीचे होते. ग्वाल्हेरच्या मोहिमेवर जाण्याआधी महादजीने मन्सूर शहा या अवलियाचे दर्शन घेतले होते. ग्वाल्हेर जिंकणे व पुढे जे अतुलनीय यश मिळाले ते मन्सूर शहामुळे अशी त्याची श्रद्धा होती.
     महादजीला संत-साधूंच्या सत्संगाचे अपार वेद होते. थोर विठ्ठलभक्त मल्लाप्पा वासकर हे त्यांना एकदा पंढरपूर येथे भेटले. तेथून पुढे त्यांना काव्यरचना करायची स्फूर्ती झाली. महादजी नेहमी भक्तीभावाने जीवन-यापन करत असे. मन्सूर शहाचा शिष्य बाबा हबीबशहा हा ग्वाल्हेरला त्यांच्या निमंत्रणावरून आला होता. अखेरपर्यंत तो तेथेच राहिला व त्यांचा अंत झाल्यावर त्याच्या नावाने उरूसही भरवायला सुरुवात केली.
     महाद्जीने माधव विलासनामक एक काव्यग्रंथ तर लिहिला आहेच पण त्याच्या स्फुट रचनाही अनेक आहेत. हिंदी व मराठीत त्यांच्या जवळपास २६५ रचना आहेत. त्याच्या बहुतेक रचना कृष्णभक्तीला वाहिलेल्या आहेत. युद्धे करणारा माणूस सतत भक्तीरसाने काव्यरचनाही करत राहिला हे एक विशेष आहे.   
·             
 

ग्रेट मराठा महादजी शिंदे

       महादजी घायाळ अवस्थेत पानिपतच्या रणांगणातून राणेखान भिस्त्याच्या सहकार्याने बाहेर पडला खरा , पण त्याला बरे व्हायला काही काळ गेला ...