Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Thursday, September 3, 2026

शारीरिक मर्यादांवर मात करत लावले गेलेले शोध!





मानवी बुद्धिमत्ता आणि शोधवृत्तीला कोणतीही शारीरिक मर्यादा नसते, हे इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. जेव्हा शरीराचे अवयव साथ सोडतात, दृष्टी अंधारते किंवा वयोमानामुळे शरीर थकते, तेव्हाही मानवी मेंदू आणि जिद्द नव्या शोधांना जन्म देऊ. आपले अजरामर कुतूहल शारीरिक मर्यादांना तोडून पुढे धावते हा माणसाचा अचाट नैसर्गिक गुणधर्म आहे. अंध संगीतकार आणि गायक तर आपल्याला अनेक माहित आहेत पण मानवी जीवनालाच एक नवे परिमाण देणारे, जग बदलवण्यासाठी, माणसाला सहाय्यभूत होण्यासाठी अनेक महत्वाचे शोध लावणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. अगदी मानवी मनावर गारुड करणारे महाकवीही आहेत ज्यांनी मानवी कल्याणासाठी आपल्या शारीरिक व्यंगावर आणि वयोवृद्धत्वावर मात करून मानवजातीसाठी संस्मरणीय कार्य केले. महत्त्वाचे वैज्ञानिक व तांत्रिक शोध लावले. आज आपण वय वाहे, अंधत्व आले, अपंगत्व आले म्हणून नशीबाला दोष देत आयुष्य कंठत राहतो. नव्याच्या कोणत्याही प्रेरणा आपल्याला शिवतसुद्धा नाहीत. आता वय झाले म्हणून नातेवाईक किंवा मित्र यांच्याशी whatsapp वर गप्पा छाटत बसणारे किंवा लेकी-सुनांच्या आयुष्यात कारण नसताना ढवळाढवळ करत वेळ घालवणारे तर असंख्य आहेत. आपण वय हा सर्जनशीलतेत मोठा अडथळा मानतो आणि आयुष्याची महत्वाची वर्ष अक्षरश: वाया घालवतो. हे समजाऊन घेण्यासाठी अंध, अपंग किंवा वयोव्रुद्ध लोकांनीही इतिहासात काय साध्य केले आणि जग बदलवले हे आपण पाहूयात. .

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात इराटोस्थेनीज नावाचा ग्रीक संस्कृतीत मोडत असलेल्या सिरीया येथील  सिरीन येथे जन्माला आला होता. आधी हा डोळस होता. पृथ्वीचा अचूक परीघ मोजणे तोवर कोणाला शक्य झालेले नव्हते. तो आपण मोजावा आणि ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्याची कल्पना जगाला द्यावी हे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने गणिताचा वापर जसा केला तसाच निरीक्षणांचाही. काठीच्या वापर करून सावलीचा कोण अनेक स्थळांवर करत तो आपले गणित सिद्ध करत होता. पण डोळ्याचा अतिवापर झाल्याने त्याला अंधत्व आले. तरीही त्याने आपला ध्यास सडला नाही. अंधत्व येउनही त्याने गणिते मांडत शेवटी पृथ्वीचा परीघ मोजला.  आज आधुनिक विज्ञानाने उपग्रहान्च्या सहाय्याने मोजलेला परीघ आणि त्याने २३०० वर्षांपूर्वी मोजलेल्या परिघात केवळ १ टक्का अंतर आहे. पुढे तो अंध असूनही त्याचा बुद्धिमत्तेमुळे त्याला अलेक्झांद्रिया (इजिप्त) मधील विश्वप्रसिद्ध ग्रंथालयाचा ग्रंथपाल नेमले गेले होते. पण आपण स्वत: वाचू शकत नाही या जाणीवेने तो एवढा निराश झाला की त्यातच त्याचा मृत्यू झाला. ज्ञानाची आस काय असते हे यातून समजून यावे.

सतराव्या शतकातील गॅलिलिओ गॅलिली यांचीही कथा अशीच.  दुर्बिणीतून सूर्याचे सतत निरीक्षण केल्याने त्यांना उत्रातीच्या वयाच्या काळात अंधत्व आले. पण तोवर त्यांनी जगाला अवकाश शास्त्राचे दार उघडून दिले होते. अंधत्व आल्यानंतरही त्यांची तीक्ष्ण बुद्धी हाताषेत बुडण्याऐवजी अधिक तीक्ष्ण होत गेली. त्याच वेळेस चर्चच्या पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला आव्हान दिल्यामुळे त्यांना कैदेत टाकले गेले. हताशेने ग्रासून जाण्याऐवजी त्यांनी लंबकाच्या गतीचे सूत्र शोधून काढले. त्याचा उपयोग अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे बनू शकली.

ग्रीसमधील जन्मांध कवी होमर. अंध असला तरी ग्रीकांचा प्राचीन इतिहास त्याच्या मनावर गारुड करत होता. त्याने अंधपणाला अडथळा मानले नाही तर मानवी कल्पकतेचा पाया रचणारी 'इलियड' 'ओडिसी' ही महाकाव्ये रचली. आज सुद्धा ही महाकाव्ये जगभरच्या वाचकांना आणि साहीत्यीकांना भुरळ घालत असतात. त्यातून मीही सुटलेलो नाही. ओडिसी आणि इलियाड महाकाव्यातील कथांना वर्तमानातील मानवी रूप देणारी “ओडिसी” ही कादंबरी मी लिहिली जी मराठी वाचकांनी डोक्यावर घेतली. अलीकडेच ख्रीस्तोफर नोलनसारख्या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाने होमरचाच आधार घेत “ओडिसी” हा चित्रपट बनवला. मग अंध होमरची प्रतिभा किती उच्च दर्जाची असेल याची आपण कल्पना करू शकतो.

लुईस ब्रेल हे एक असेच प्रेरक उदाहरण. बालपणी एका अपघातात त्यांची दृष्टी गेली. पण म्हणून तो खचून गेला नाही. ते १८२४ साल होते. तेव्हा अंधत्व येणे म्हणजे जीवन संपले असे मानले जाण्याचा काल. आपल्याकडेही स्थिती वेगळी नव्हती. अंध-अपंगांना भीक मागायला भाग पाडले जाते, घरातून बाहेर काढले जाते. पण वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने अंधांसाठी 'ब्रेल लिपी'चा शोध लावला. त्याने दृष्टी गमावल्याची खंत बाळगत न बसता  उंचावलेल्या ६ ठिपक्यांचा  वापर करून ब्रेल लिपी शोधली. या एका शोधाने जगभरातील करोडो अंध व्यक्तींसाठी शिक्षण आणि विज्ञानाचे दरवाजे उघडले.

लुई पाश्चर या महान शास्त्राद्न्याचेही हे प्रेरक उदाहरण आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी (१८६८) त्यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने त्यांचा डावा हात व पाय पूर्णपणे निकामी झाला होता. या अपंगत्वावरही मात करत त्यांनी प्रयोगशाळेतील संशोधन सुरूच ठेवले. याच अवस्थेत त्यांनी 'रेबीजची लस' आणि दुधातील जिवाणू मारणारे 'पाश्चरायझेशन' तंत्रज्ञान शोधून काढले आणि कोट्यवधी जीवांचे प्राण वाचवले.

थॉमस एडिसनने तर कर्णबधिरत्वावर मात करत फोनोग्राफ व विजेचा दिवा शोधला आणि आधुनिक जगाला प्रकाशाचा मार्ग दिला. त्याला बालपणापासून एका कानाने पूर्णपणे आणि दुसऱ्या कानाने अत्यंत कमी ऐकू येत होते. त्याचाच संधीत बदल करून त्यांना बाहेरील गोंधळापासून दूर राहत प्रयोगांवर लक्ष केंद्रित करता आले. त्यांनी त्यांनी ध्वनी मुद्रित करणारे यंत्र आणि विजेच्या दिव्याचा शोध लावला.

स्टीफन हॉकिंग यांना तर कोण विसरेल? पूर्ण अपंगत्वात त्यांनी 'हॉकिंग रेडिएशन'चा शोध तर लावलाच पण व्श्वनिर्मितीचा पर्यायी सिद्धांतही मांडला. एएलएस या दुर्मिळ आजारामुळे वयाच्या २१ व्या वर्षीच हॉकिंग यांचे संपूर्ण शरीर अर्धांगवायूने ग्रस्त झाले. ते बोलूही शकत नव्हते. तरीही कॉम्प्युटर सिंथेसायझरच्या मदतीने त्यांनी 'ब्लॅक होल' मधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा शोध लावून आधुनिक भौतिकशास्त्र बदलून टाकले. आधुनिक काळातील हा सर्वात प्रतिभाशाली शास्त्रद्न्य होता.

वयाच्या ९० व्या वर्षी लिथियम बॅटरीचा शोध लावणारा आणि वयाच्या ९७ व्या वर्षी नोबेल मिळवणारा जॉन गुडइनफ याची गाथा तर प्रेरकच आहे.  आल्याकडे लोक रिटायर होतात त्या काळात, म्हणजे वयाच्या ५८ व्या वर्षी, त्यांनी आजच्या मोबाईल, लॅपटॉप आणि ई-वाहनांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीचा शोध लावला. वयाच्या ९० व्या वर्षांपर्यंत त्यांनी संशोधन सुरू ठेवले आणि २०१९ मध्ये वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

वैज्ञानिक शोधांसाठी किंवा क्रांतीकारी साहित्य लिहिण्यासाठी शारीरिक अवयवांपेक्षा मानसिक जिद्द, निरीक्षणशक्ती आणि कल्पकता अधिक महत्त्वाची असते. या वैज्ञानिकांनी केवळ शोध लावले नाहीत, तर शारीरिक मर्यादा ही विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या मार्गात कधीही अडथळा ठरू शकत नाही हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.

 

-संजय सोनवणी

 

Thursday, August 20, 2026

शोध चष्म्याचा!

 

कोणाला चष्मा लागला तर एके काळी त्याला चष्मीस, ढापण्या, ढप्पण अशा शेलक्या विशेषणांनी हिणवले जायचे. चष्मा लावणाऱ्या विद्यार्थ्यास बुद्धीमान समजायचीही रीत एके काळी होती. मुळात चष्मा लागला आहे हे अनेकांना समजतही नसे कारण तसे डोळे तपासण्याच्या सोयी सर्वदूर पसरलेल्याही नव्हत्या. मुळात चष्मा भारतात पसरला तो इंग्रजांमुळे. आता तर बहुतेकांत कोणत्या न कोणत्या स्वरूपाच्या असलेल्या दृष्टीदोषामुळे लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत चष्मा लागणे ही एक सर्वसाधारण बाब बनली आहे आणि आता त्याला कोणी हिणवतही नाही. चष्मे हे स्वच्छ पाहण्याचे साधन न उरता आता फ्याशनचेही साधन बनले आहे. दृष्टीदोष नसलेलेही शून्य नंबरचा चष्मा किंवा उन्हाच्या तीव्र प्रकाशापासून डोळ्यांना सुरक्षित ठेवणारे रंगीबेरंगी काचेचे आणि वेगवेगळ्या डिझाइंसचे गोगल वापरणे, ही तर आता साधारण बाब बनलेली आहे. आता काचेच्या चष्म्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या प्लास्टिक आणि फायबर लेन्सचे चष्मे वापरले जातात. कॉन्टयक्ट लेन्सेसचाही वापर वाढला आहे. पण याचे उरुवात झाली काचेच्या शोधातून आणि त्यातूनच सूक्ष्म जीवाणू पाहू शकणारे दर्शक ते दूर आकाशातील तारका–ग्रह पाहण्याची मानवी जगाला सोय लागली. सूक्ष्म ते प्रदीर्घ विश्वाचे निरीक्षण करण्यातून आजच्या खगोल आणि सूक्ष्मजीवशास्त्राचीही प्रगती झाली. पुढे मानवाने अधिक प्रगत साधने शोधली असली तरी या प्रगतीकडे आणणारा काचेच्या शोधाचा प्रवास कसा झाला हे पाहणेही रंजक ठरेल.

 

मानवाला दृष्टी सुधारण्यासाठी काचेच्या भिंगाचा वापर करता येतो, याचे ज्ञान अचानक आले नाही. प्राचीन काळात काचेचा किंवा स्फटिकाचा वापर करून अक्षरे मोठी करून पाहण्याचे प्रयोग सुरू होते. असे म्हटले जाते की, प्रसिद्ध रोमन सम्राट नेरो हा मल्लांची कुस्ती किंवा रथ शर्यती पाहण्यासाठी 'मरकत' या हिरव्या रत्नाचा वापर करत असे. नवव्या शतकात 'इब्न फ्रिनास' या अरबी शास्त्रज्ञाने काचेच्या गोल गोट्यांचा वाचनासाठी वापर केला, ज्यांना पुढे 'रीडिंग स्टोन्स') म्हटले गेले. हे गोल दगड किंवा काच पुस्तकाच्या पानावर ठेवून अक्षरे मोठी करून वाचली जात असत. पण  हे दगड हाताने धरावे लागत असल्याने लिहिणे किंवा अन्य काही कामे करणे कठीण जात असे.

काचेचा शोध मानवाला तसा प्राचीन काळीच आणि अपघाताने लागला. आपल्या सिंधू संस्कृतीच्या पतनकाळात अगदी स्वतंत्रपणे काचेचा शोध लागला. पण या काचा पारदर्शी नसत कारण कच्च्या मालात अनेक धातून एकत्र येत असल्याने काळ्या, लाल, तपकिरी ते अनेक रंगमिश्रीत काचा बंत. त्यांचा उपयोग सरुवातीला अलंकार बनवण्यासाठी झाला. इजिप्त, चीन, मध्य आशियातही वेगवेगळ्या वेळी काच बनवायचा शोध लागला अथवा त्यांनी अन्य संस्कृतीकडून ही कला उधार घेतली.   पुढे दागिन्यांसोबतच काचेची सुरयासारखी भांडी, तबके ते झुंबर बनवेपर्यंत माणसाने मजल गाठली. पण या काचा पारदर्शी नसल्याने त्यांचा अधू दृष्टीच्या लोकांना किंवा फार लांबचे दिसू शकत नसलेल्या लोकांना काही उपयोग नव्हता. त्यामुळे मानवी आयुष्यातील कार्यक्षम वर्षे कमी होऊन जायची. म्हणजे दृष्टी अधू झाली तर शिवणकाम. दागिने बनवायचे काम अशी कामे करता येणे अशक्य व्हायचे त्यामुळे कुशल लोकही बेरोजगार बनून जात. अभ्यासकांचे तर फारच हाल होत. एकतर त्यांना दुसर्या कोनाकादेऊन ग्रंथ वाचून घ्यावे लागत किंवा डोळेफोड करत अक्षरे जुळवत वाचावे लागत. तरीही काही बुद्धीमान लोकांनी क्लुप्त्या शोधून काढल्या. पण त्याला कारण घडला अलेक्झांड्रिया येथे लागलेला शोध. सोडियम कार्बोनेट आणि मॅंगनीज डायऑक्साइडचा वापर करून काचेतील रंग काढून टाकण्याचे तंत्रज्ञान तेथील लोकांनी शोधले. त्यातून पहिली पारदर्शक काच बनली. असे असले तरी ही काच शतप्रतिशत पारदर्शक नसून किंचित धूसर असे. पुढे १५ व्या शतकात इटलीतील व्हेनिस येथील काचकारांनी अतिशय शुद्ध, स्फटिकासारखी पारदर्शक काच बनवण्याचा शोध लावला, ज्याला 'क्रिस्टॅलो' म्हटले गेले. या काचेमुळेच पुढे चष्मा, दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शकाचा मार्ग मोकळा झाला.

पहिल्या चष्म्याचा शोध कोणी लावला? याचे उत्तर आजही अज्ञात असले तरी चष्म्याचा जन्म सुमारे १२८६ च्या सुमारास इटलीतील पिसा किंवा व्हेनिस या शहरात झाला, यावर इतिहासकारांचे एकमत आहे.भारताताही समांतर रीत्या चष्मासदृश्य उपकरण शोधण्याचा प्रयत्न झाला असेल पण त्याचा वापर झाल्याचे किंवा अशी चष्म्यासारखी वस्तू बनवण्याचे मात्र पुरावे मिळून येत नाहीत.

सुरुवातीचे चष्मे आजच्यासारखे कानाला अडकवणारे नव्हते. दोन भिंगे धातूच्या, लाकडाच्या किंवा प्राण्यांच्या हाडांच्या चौकटीत बसवून त्यांना मध्यभागी एकत्र जोडले जात असे. हा चष्मा नाकावर घट्ट दाबून पकडून ठेऊन मगच पाहता येई. सुरुवातीला हा चष्मा केवळ जवळचे दिसू न शकणाऱ्या वृद्धांसाठीच उपयुक्त होता. असे असले तरी या शोधाने माणसाचा कार्यकाळ वाढवण्याचे मोलाचे कार्य केले. एवढेच नाही तर चष्मा केवळ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याने विज्ञानाचे दरवाजे उघडले. चष्म्याच्या भिंगांच्या तंत्रज्ञानातून आणि काच घासण्याच्या कलेतूनच पुढे सोळाव्या आणि सतराव्या शतकात गॅलिलिओची दुर्बीण आणि अँटोनी व्हान ल्युव्हेनहॉकचा सूक्ष्मदर्शक जन्मला! चष्म्याच्या भिंगांमुळेच मानवाला ब्रह्मांडातील दूरचे तारे-ग्रह दिसले आणि त्याच भिंगांमुळे मानवाला डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव पाहायला मिळाले. ही मानवी जीवनातली विलक्षण झेप होती.

सुरुवातीला चष्म्याला दांडी नसल्याने त्याचा वापरावर खूप मर्यादा येई. सुरुवातीचे चष्मे नाकावरून सतत घसरत असत. यावर उपाय म्हणून १७२७ मध्ये लंडनच्या 'एडवर्ड स्कारलेट' या चष्मा निर्मात्याने चष्म्यालाच कानाला अडकवणारे दांडे जोडले. या शोधामुळे चष्मा डोळ्यांवर स्थिर राहू लागला आणि वाचन तसेच अन्य काम विनाकटकटीचे झाले आणि आज आपण वापरतो ते आधुनिक रूप चष्माला मिळाले.

पुढे जाऊन १७८४ मध्ये अमेरिकेचे महान विचारवंत आणि वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिन यांनी 'बायफोकल लेन्स'चा शोध लावला. त्यामुळे एकाच चष्म्यातून जवळचे आणि लांबचे दोन्ही स्पष्ट पाहणे शक्य झाले.

विसाव्या शतकात जड काचेच्या ऐवजी हलक्या प्लॅस्टिक आणि फायबरच्या लेन्स विकसित केल्या गेल्या.पुढे डोळ्यांवर थेट बसवणारे कॉन्टॅक्ट लेन्स, लेसर सर्जरी आणि आजचे डिजिटल युगातील स्मार्ट ग्लासेस इथपर्यंत चष्म्याचा प्रवास झाला आहे. चष्म्याने आणि त्य्तूनच लागलेल्या शोधांनी मानावे ज्ञानाच्या सीमा विस्तारण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.

चष्म्याचा उपयोग आज इतका सामान्य झाला आहे की चाश्म्याकडे आपण गरजेची ते फ्याशनची वस्तू म्हणून पाहतो. पण गेल्या सुमारे तीन हजार वर्षापुन ते आजवरची प्रगती व्हायला मानवाचे अचाट कष्ट, कल्पकता आणि शोधवृत्ती कारणीभूत झाली. कल्पकता आणि सातत्यपूर्ण कष्ट अचाट शोध लावून मानवाला पुढे न्यायला मोलाचे मदत करत सतात हेच काय ते सत्य.

-संजय सोनवणी




Thursday, August 6, 2026

मानवाची अंतराळात भरारी


 


मानवाने जेव्हा पहिल्यांदा उघड्या डोळ्यांनी रात्रीच्या गडद आकाशाकडे पाहिले असेल, तेव्हा त्याच्या मनात कौतुक, आश्चर्य आणि असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. ते चमकणारे तारे आणि नक्षत्रे काय आहेत? त्यांचे स्वरूप काय आहे? त्यांचेही स्थान बदलताना का दिसते? आकाशाच्या पलीकडे काय असेल? या प्रश्नांमधूनच आद्य खगोलशास्त्राची बीजे रोवली गेली. अर्थात हे शास्त्र आरंभीच्या काळात शुभ दिवस/मुहूर्त काढण्यासाठी आणि भविष्यकथनासाठी वापरले जाई. ग्रह-नक्षत्र-सूर्य यांना दैवतस्वरूप देत त्यांच्या भोवती शुभाशुभ कल्पनाही गुंफल्या गेल्या. मानवी इतिहासात काही लाख वर्ष तरी पृथ्वी सपाट आहे आणि आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत या संकल्पनेने राज्य केले. ग्रह-तारे हे ईश्वरी आदेशाने कार्यरत आहेत किंवा ते स्वत: देवतास्वरूप आहेत याही संकल्पनेने अधिराज्य गाजवले. प्राचीन पुराकथांमध्ये देव अंतरिक्षात स्वर्गीय रथावर स्वार होऊन संचार करतात  अशा कल्पना आढळतात. मानवाच्या अंतराळप्रवासाच्या सर्वात मोठ्या स्वप्नाचा जन्म आपण या आद्य काळात झाला असेल याचं अंदाज बांधू शकतो. उदाहणार्थ जगातील सर्वात जुने महाकाव्य मानल्या जाणाऱ्या 'एपिक ऑफ गिल्गमेश' मध्ये देवांनी आकाशातून पृथ्वीवर अवतरल्याच्या आणि मानवाला आकाशात घेऊन गेल्याच्या कथा आढळतात. या काळातील सुमेरियन दंतकथांमधील 'एताना' हा राजा एका विशाल गरुडाच्या पाठीवर बसून स्वर्गाच्या म्हणजे आकाशाच्या दिशेने उड्डाण करतो आणि तो जसा वर जातो, तशी पृथ्वी लहान होत जाऊन एका लहान बिंदूसारखी दिसते. हे वर्णन आजच्या अंतराळवीरांच्या अनुभवाशी अवाक करणारे साम्य दाखवते. भारीय पुराणांतील देवताही आकाशगामी रथांतून यात्रा करतात अशी असंख्य वर्णने आहेत. सूर्यही सात घोड्यांच्या रथातून आपला मार्ग क्रमितो असे म्हटले जाते. अर्जुन इंद्राच्या आकाशगामी रथात बसून आकाशाची सफर करत असताना एका ताऱ्याजवळून जातो असे वर्णन महाभारतात येते.

अर्थात या मानवी कल्पनांना सत्यात येण्यासाठी प्रदीर्घ काळ लागला याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वी आणि अवकाशाच्या संदर्भातील तोकडे असणारे भौतिक ज्ञान. पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू नसून ती सूर्याभोवती फिरते हे कळायला जागतिक मानवाला कोपर्निकसच्या उदयाची वाट पहावी लागली. पृथ्वी सपाट नसून गोल आहे हे पूर्वीच ग्रीक खगोलवेत्ते आणि भारतात आर्यभटाने सिद्ध केले असले तरी  विद्वानांना त्याचा सैद्धांतिक विकास करता आला नाही. पृथ्वी गोल आहे आणि ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्व हे प्रत्यक्षात कल्पनातीत विस्तीर्ण आहे हे ज्ञान जसे जसे होऊ लागले तसा माणसाचा आपण विश्वाचे केंद्रबिंदू आहोत आणि ईश्वराची एकमात्र संतान आहोत ही लाखो वर्ष जपलेली संकल्पना ढासळून पडायला सुरुवात झाली. अर्थात हे समजू लागायला कारण ठरले ते गॅलिलिओने दुर्बीनीचा उपयोग करून केलेले अवकाशातील ग्रह-तार्यांचे निरीक्षण आणि पुढे त्याला साथ मिळाली ती केप्लरच्या भौतिकशास्त्रीय नियमांची. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात शास्त्रीय सूत्रे शोधली. पृथ्वेभोवातीचे अनेक स्तरीय आणि जसे उंच जाऊ तसे विरळ होत जाणारे वातावरण आणि त्याच्या बाहेर असलेली अनेक प्रारणांनी भरलेली अंधकारमय निर्वात पोकळी हे जसे शास्त्रद्न्यांच्या लक्षात आले तशी नवीन संकल्पना मानवी मनात निर्माण होऊ लागली आणि ती म्हणजे अंतराळ प्रवासाची.

या कल्पनांचा साहित्यात प्रभावी उपयोग सर्वात आधी केला तो एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्युल्स व्हर्न  आणि एच. जी. वेल्स या कल्पक लेखकांनी. त्यांनी  आपल्या साहित्यातून या कल्पनाविलासाला आधुनिक रूप दिले. 'पृथ्वीवरून चंद्रावर जाणे', मंगळावर माणूस असणे, धुमकेतूच्या पाठीवरून अंतराळ प्रवास करणे अशा रंजक पण शास्त्रीय ज्ञानाचा पाया असलेल्या संकल्पना त्यांनी कल्पनेच्या पातळीवर मांडल्या.  या कल्पनेला विज्ञानाची भक्कम साथ मिळाली ती गॅलिलिओच्या दुर्बिणीमुळे, केप्लरच्या नियमांची आणि सर आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची. या शोधांमुळे मानवाला अंतराळात जाण्याचे गणित स्पष्ट झाले आणि अंतराळप्रवास खरेच शक्य आहे याचं त्याला विश्वास वाटू लागला.

पण यात खडतर आव्हानेही खूप होती. अगदी अशक्यप्राय वाटतील अशी. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि वातावरण भेदाने हे सर्वात मोठे आव्हान होते. युद्धांतील गरजांमुळे रॉकेटचा शोध लागला असा तरी त्यांची मर्यादाही होती. पृथ्वीचे वातावरण ओलांडून निर्वात अवकाशात प्रवेश करणेही सोपे नव्हते. पण विज्ञान आणि कल्पना जेव्हा एकत्र येतात तेव्हा असाध्यही साध्य होऊ शकते हे आपण या प्रवासावरून पाहू शकतो. शास्त्रद्न्यानी पृथ्वीचे प्रचंड गुरुत्वाकर्षण भेदण्यासाठी ताशी सुमारे ४०,००० किमीचा वेग गाठणारे 'मल्टी-स्टेज रॉकेट्स' विकसित केले. अवकाशात हवा आणि वायुमंडलीय दाब नसतो त्यावर उपाय म्हणून विशेष 'प्रेशराइज्ड कॅप्सूल' आणि ऑक्सिजन व शारीरिक दाब नियंत्रित ठेवणारे 'स्पेससूट' तयार केले गेले. सूर्याचा तीव्र प्रकाश (१५०° से. पेक्षा जास्त) आणि अंतराळातील गोठवणारी थंडी, शिवाय घातक वैश्विक किरणांपासून वाचण्यासाठी यानाला 'थर्मल शिल्डिंग' बसवण्यात आले. अवकाशातून पुन्हा पृथ्वीवर येताना हवेच्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या ३०००° से. उष्णतेपासून यानाला वाचवण्यासाठी 'हीट शिल्ड' चे तंत्रज्ञान शोधण्यात आले. अर्थात हे एका रात्रीत झाले नाही. अनेक अपयशे झेलत जिद्दीने हा प्रवास चालूच राहिला.

दुसऱ्या महायुद्धानंतर तंत्रज्ञानाने मोठी कूस बदलली. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत रशियाने  जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह 'स्पुटनिक-१' अंतराळात सोडला आणि खऱ्या अर्थाने अंतराळ युग सुरु झाले. यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत युनियनचे युरी गागारिन हे अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले. अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना ते उद्गारले"पृथ्वी निळी आणि अत्यंत सुंदर दिसते आहे!"  या घटनेनंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात 'स्पेस रेस' सुरू झाली.

स्पर्धेचा भाग म्हणून मग अमेरिकेने चंद्रावर मानव पाठवण्याचे धाडसी उद्दिष्ट ठेवले आणि शेवटी २० जुलै १९६९ रोजी 'अपोलो ११' मोहिमेअंतर्गत निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवले. "मानवाचे हे एक लहान पाऊल, संपूर्ण मानवजातीसाठी एक खूप मोठी झेप आहे!" त्यांचे हे उद्गार अजरामर झाले.

चंद्रावर उतरल्यानंतर मानवाची पावले थांबली नाहीत. अंतराळात दीर्घकाळ राहून संशोधन करण्यासाठी 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'  उभारण्यात आले. या संपूर्ण प्रवासात भारताचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. १९८४ मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. पुढे जाऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०१४ मध्ये 'मंगलयान' द्वारे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचून, तर २०२३ मध्ये 'चंद्रयान-३' च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनून इतिहास रचला.

आज अंतराळप्रवासाचे स्वरूप बदलत आहे. 'स्पेसएक्स' आणि 'ब्लू ओरिजिन' यांसारख्या खासगी कंपन्यांमुळे 'स्पेस टुरिझम' प्रत्यक्षात येत आहे. भविष्यात मानव खरेच अवकाशात स्पेस स्टेशन्सवर अथवा अन्य ग्रहांवर वसती करण्याची शक्यता खरेच वास्तवात येणार यात शंका नाही.

-संजय सोनवणी 





मराठी माध्यमांना नवा चेहरा देणारे वृत्तपत्र महर्षी- बाबा शिंगोटे!




वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा बादशहा अशी आपली ओळख निर्माण केल्यानंतर स्वत: वृत्तपत्र सुरु करून त्यातही उंच भरारी घेत मराठी वृतपत्र सृष्टीवर आपला अमिट ठसा उमवणारे बाबा उर्फ मुरलीधर अनंत शिंगोटे यांचे नाव आज महाराष्ट्राच्या वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या मानाचे आहे. या कामगिरीची तुलना अनेकदा जगप्रसिद्ध रूपर्ट मर्डोक यांच्याशी केली जाते. पण ही तुलना अनाठायी आहे. मर्डोक यांनी जगभर वृत्तपत्रांचे जाळे उभारले, हे खरे आहे. पण बाबा त्यांच्यापेक्षा काकणभर सरस होते. रूपर्ट मर्डोक यांना त्यांच्या वडिलांची समृद्ध पार्श्वभूमी होती. ते पूर्वीपासून माध्यम समूहात कार्यरत होते. शिवाय रुपर्ट मर्डोक हे उच्च शिक्षित होते. पण बाबांना तशी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणही अवघे चौथीपर्यंत झालेले. पत्रकारितेचे कसलेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते.  तरीही वृत्तपत्र वितरण व्यवसायाच्या माध्यमातून त्यांने वाचकांना नेमके काय हवे आहे हे ओळखले आणि मग त्यांनी हाकत मराठीच नव्हे तर विविध भाषिक वृत्तपत्रांचे जाळे उभारले. वृत्तपत्र क्षेत्रात तसे यश मिळवणे फार कठीण असते. लोकांना कोणतातरी एक विशिष्ट पेपर वाचायचे सवय लागून गेलेली असते आणि ती सहजासहजी बदलाने अत्यंत कठीण असते. पण बाबांनी वाचकांची निकड ओळखली असल्याने त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात नुसते पाउल टाकले नाही तर ते पराकोटीचे यशस्वी करून दाखवले.

यामागे त्यांना केवेल वाचकांची नाडी कळाली होती हेच कारण नाहे तर त्यासाठी संपादक, पत्रकार आणि स्तंभ लेखक नेमके कोण असावेत हे जाणून घेण्याची उपजत कलाही अवलंबून होती. त्यामुळे त्यांची निवडही अचूक झाली. बरे, ते नुसते स्वभावानेच साधे होते असे नाही तर त्यांची राहणी आणि आपल्या कामावरची  अढळ निष्ठाही निर्विवाद असल्याने त्यांनी पुण्यनगरीसाठी उच्च आणि लोकांच्या हृदयाला भिडणारे लेखन करणारे आणि वार्तांकन करणार्या पत्रकारांची फौजच उभी केली. त्यामुळे त्यांनी  सुरु केलेल्या पुण्यनगरी या अनेक आवृत्त्या असलेल्या आणि अनेक भाषात प्रसिद्ध होणार्या वृतपत्राने वाचकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. बाबानावाने प्रसिद्ध असलेला वृत्तपत्र क्षेत्रातील दादामाणूस असेच मुरलीधार शिंगोटे यांचे वर्णन करावे लागेल असा दबदबा त्यांनी आपल्या हयातीतच निर्माण केला.

त्यांची पार्श्वभूमी अत्यंत सामान्य होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ रोजी बाबा शिंगोटे यांचा जन्म झाला. त्यांनी शाळेत प्रवेश केला खरा पण औपचारिक  शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांचा त्यांच्या उपजत आणि बाह्य जगातील मिळणार्या शिक्षणावर विश्वास होता. मग त्यांनी इयत्ता चौथीमधूनच शिक्षण सोडून दिले आणि नशिब काढण्यासाठी मुंबई गाठली.

सुरुवातीला मुंबईत त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात तेवढे यश मिळत नाहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाच्या कामाला सुरुवात केली. ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकत असत.  यात त्यांना जो अनुभव आला त्याचा व्यावहारिक लाभ घेण्यासाठी त्यांनी वृतपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यातूनच पुढे जात त्यांनी नुसता विक्रेता नाही तर वृत्तपत्र-मासिके यांच्या वितरणाचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी राज्यभर वितरणाचे भक्कम जाळे निर्माण केले आणि या क्षेत्रातही दबदबा बसवला.

नवा काळया मुंबईतील वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असलेल्या वृत्तपत्राची त्यांच्याकडे एजन्सी होती. प्रत्यक्षात पत्रकारीतेचे कसलेही औपचारिक प्रशिक्षण त्यांना मिळालेले नव्हते. मुळात शिक्षणही अत्यल्प म्हणता येईल असेच! त्यात व्यापार-व्यवसायाची कसलीही पूर्वपिठीकाही त्यांना नव्हती. पण त्यांच्यात एक अद्भुत व्यावसायिक आणि समाज-निरीक्षक दडलेला होता. तो डोळसपणे आजची वृत्तपत्रे लोकांना काय देतात आणि लोकांना नेमके काय हवे यातील तफावती ते टिपत राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने त्यांच्या मनोभूमिकेवर व्यापक परिणाम केला. आंदोलनांचे वृत्तांकन करण्यातल्या त्यावेळच्या वृत्तपत्रातील दोषही त्यांच्या लक्षात आले. अशी निरीक्षणे सुरु असतानाच पुढे कालनिर्णयया नव्याने सुरु झालेल्या कॅलेंडरची वितरणाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली कारण वितरण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला दबदबा. तो एवढा विलक्षण होता कि वृत्तपत्रे आणि मासिकांचे वितरण करण्यात राजा बनलेला माणूस पुस्तकांचे वितरण कशाला करेल अशी शंका वाटावी असा तो काळ. या काळात म्हणजे १९९५-९६ साली, मी माझ्या पुष्प प्रकाशन लि. या संस्थेच्या नव्यानेच सुरु केलेल्या अभिनव पॉकेट बुक्स (परवडणारी स्वस्त पुस्तके) योजनेतील पुस्तकांचे वितरण करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे साशंक मनाने घेऊन गेलो आणि या दूरदृष्टीच्या पण अत्यंत साध्या माणसाने तेही वितरण स्वीकारले. त्यामुळे एरवी मराठी प्रकाशन क्षेत्रात अशक्य वाटेल असा चमत्कार झाला. त्यांनी आपल्या सुस्थापित वितरण यंत्रणेमार्फत मराठी पॉकेट बुक्सचे वितरणच अशा ताकदीने केले गेले कि कथा-कादंब-यांच्या मोठमोठ्या आवृत्या झपाट्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत वितरीत तर झाल्याच पण अफाट लोकप्रिय झाल्या. ते तेंव्हा वितरणाचे बादशहा होते हे वास्तव आजही सारे मान्य करतात.

वितरणाचा व्यवसाय करत असताना लोकांच्या  वृत्तपत्रांकडून काय अपेक्षा असतात याचा अंदाज त्यांना आला. त्यातूनच त्यांनी स्वत: वृत्तपत्र प्रकाशनाच्या, एरवी प्रचंड स्पर्धा असलेल्या क्षेत्रात कोणत्याही राजकीय अथवा भांडवलदारांच्या पाठींब्याशिवाय उतरण्याचा निर्णय घेतला. लोकाना काय हवे आहे याचा अनुभवातून केलेला अभ्यास आणि वितरणक्षेत्रातील त्यांचे अफाट कौशल्य या भांडवलावर त्यांनी १९९९ मध्ये पुण्यनगरीया दैनिकाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत त्याचे वितरण जसे सुरु झाले तसेच महत्वाच्या शहरातून आवृत्त्याही प्रसिद्ध होऊ लागल्या आणि अल्पावधीत वाचकांचा मनाचा ताबा घेतला. हे येथेच थांबले नाही तर लागोपाठ आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता आदी दैनिकेही सुरु केली. 

सामान्य वाचक हा त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्याला समजेल अशी भाषा आणि त्याला नेमके वृत्तपत्रापासून काय हवे आहे याची सखोल जाणीव यातून पुण्यनगरीचा विस्तार वाढत गेला. अल्पावधीत महाराष्ट्रात पुण्यनगरीने वृत्तपत्र क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. पत्रकारिता कशी असावी याचे धडे प्रस्थापित वृत्तपत्रांनाही गिरवावे लागले. सामान्यातील सामान्य माणसाला समजेल अशी भाषा हे पुण्यनगरीचे मुलभूत वैशिष्ट्य बनले. वृत्तपत्रविषयक प्रस्थापित संकल्पनाना छेद देत सामान्य नागरिकांच्या विचारविश्वात कशी भर पडेल हे पाहत त्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत राहिल्याने ते खरे जनतेचा आवाज बनले. मुळात हे वृत्तपत्र सुरु करणारे बाबा शिंगोटे स्वत: ग्रामीण भागातून आलेले होते. संघर्षातून मोठे झाले होते. पत्रकारितेतील किचकट संकल्पना, त्यावरील निरस चर्चा त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या नव्हत्या तर मराठी माणसाला त्याच्या भाषेत त्याला सत्यदर्शन व्हावे हा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता. आणि त्यामुळेच ते एका वितरकापासून ते एका प्रभावशाली वृत्तपत्र समुहाचे संस्थापक बनले.

बाबा हे लोकांच्या दृष्टीने एक रहस्यच राहिले. यश हे कधीच त्यांच्या डोक्यात गेले नाही. ते सामान्य कामगारांच्या खांद्याला खांदा लावून स्वत: वृत्तपत्राच्या प्रेसमध्ये काम करत. रात्री उशिरा एकदाची एडिशन छापून झाली कि ते तेथेच जुन्या वृत्तपत्रांचा बिछाणा करून तेथेच झोपी जात. प्रसिद्ध पत्रकार आणि पुण्यानागारीच्या संपादिका राहून चुकलेल्या राही भिडे यांनी एक आठवण सांगितली होती. त्या पुणे आवृत्तीच्या संपादिका म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या होत्या. एकदा उल्हासदादा पवार त्यांना भेटायला आले. त्यांना दारात पेपर टाकून एक व्यक्ती झोपलेली दिसली. त्यांनी कुतुहलाने राही भिडेंकडे चौकशी केली. गम्मत म्हणजे भिडेंनाही ही व्यक्ती कोण हे तोवर माहित नव्हते. नंतर चौकशी केल्यावर त्यांना समजले कि ते पुण्यनगरीचे मालक बाबा शिंगोटे आहेत. त्या थक्क झाल्या. साधेपणा हा मुरलीधर शिंगोटेंच्या जगण्याचा पाया होता. एखाद्या वृतसमूहाचा मालक म्हटला की त्याच्यामागे एक विशिष्ट वलय असते. शिंगोटेंच्या मागे ते वलय होते पण ते वलय साधेपणाचे होते. आपल्या कंपनीतल्या सर्व कामगारांना समानतेने वागवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते कोणालाही अंतर देत नसत. आपण मालक आहोत याचा त्यांना अहंकार नव्हता. अधिकारांचे वाटप झाले कि त्यांचा हस्तक्षेप संपे. मालक म्हणून मिरवणे त्यांना पसंत नव्हते. आलिशान हॉटेलात मुक्काम ठोकण्याऐवजी कार्यालयात त्यांच्या केबिनमध्ये मुक्काम ठोकने हे त्यांचे साधेपणाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या बोलण्यात पोपटपंची झळकत नसे तर त्यात अनुभवातून आलेली विद्वत्ता होती.  एवढे यश मिळवूनही त्यांच्या वागण्यात कसलाही गर्व झळकत नव्हता. आपल्या वर्तमानपत्रांबद्दल आणि तिथल्या बातमीबद्दल ते आग्रही होते. वाचक हा त्यांचा प्राण होता. समाजात वाहत असलेल्या प्रत्येक विचारप्रवाहाला व होत असलेल्या घडामोडींना आपल्या वृत्तपत्रात स्थान असावे याबाबत ते नेहमीच आग्रही राहिले. मुळात त्यांनी कोणत्याही एखाद्याच विचारप्रवाहाची संगत करून इतर वृत्तपत्रीय प्रवाह शत्रू मानण्याचा विचारही केला नाही त्यामुळे पुण्यनगरी सर्वांचे व्यासपीठ बनले.

महाराष्ट्री माध्यमांना नवा चेहरा दिला हे त्यांचे मराठी वृत्तपत्र क्षेत्र आणि मराठी वाचकवर्गावरील मोठे ऋण आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. विनम्र श्रद्धांजली.

-संजय सोनवणी 


Thursday, July 9, 2026

शोध पाणबुडीचा!




आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पक्षांना पाहून माणसाला विमानाची कल्पना सुचली, तशीच अथांग सागराच्या पोटात लीलया विहरणार्या माशांना पाहून त्याला पाण्याच्या खाली जाण्याची ओढ लागली. माशाप्रमाणे पाण्याच्या खाली जाऊन प्रवास करता यावा, शत्रूच्या नकळत समुद्राच्या तळाशी दबा धरून बसता यावे आणि हवे तेव्हा पुन्हा पाण्याच्या वर येता यावे, या मानवी कल्पकतेतूनच जन्म झाला एका अद्भुत साधनाचा —'पाणबुडी'चा!

अलेक्झांडर द ग्रेटच्या काचेच्या पेटीपासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या अत्याधुनिक, महिनोनमहिने पाण्याखाली राहणाऱ्या आण्विक पाणबुड्यांपर्यंत कसा पोहोचला याचा इतिहास प्रचंड रंजक आणि थक्क करून सोडणारा आहे.

इसवी सन पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेटने समुद्राच्या खाली काय आहे हे पाहण्यासाठी एका काचेच्या पेटीसारखी रचना केली होती याचे दाखले इतीहासात मिळतात. अर्थात ती आजच्या अर्थाने पाणबुडी नव्हती, तर पाण्याखाली काही काळ राहता यावे यासाठी केलेली एक तात्पुरती सोय होती.

त्यानंतर अनेक शतके माणसाच्या मनात या कल्पनेने घर केले होते. सुरुवातीच्या काळातील विचारवंतांनी आणि चित्रकार-शास्त्रज्ञांनी काढलेली रेखाटने पाहिली  तर त्यात विज्ञानापेक्षा निसर्गाची हुबेहूब नक्कल  जास्त दिसते. माणसाने देवमासा, कासव किंवा इतर माशांच्या शरीररचनेचा अभ्यास करून तशीच रेखाटने कागदावर उतरवली. निसर्गाने माशांना पाण्याखाली पोहण्यासाठी जी रचना दिली आहे तीच माणसाला आदर्श वाटत होती.

जगप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक लिओनार्डो दा विंची याने १५ व्या शतकातच एका पाणबुडीचे रेखाटन तयार केले होते. परंतु त्याने ते जाणीवपूर्वक जगापासून लपवून ठेवले. "माणूस या यंत्राचा वापर समुद्राच्या तळाशी जाऊन जहाजे बुडवण्यासाठी आणि क्रूर युद्धासाठी करेल," अशी भीती त्याला वाटत होती. भविष्यात अर्थात ही भीती खरी झाली हे वेगळे.

खऱ्या अर्थाने पाणबुडीची पहिली अधिकृत वैज्ञानिक संकल्पना १५७८ मध्ये विल्यम बर्न या इंग्रज गणितज्ञाने कागदावर मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली कॉर्नेलियस व्हॅन ड्रेबेल या डच इंजिनिअरने. १६२० मध्ये त्याने लाकूड आणि चामड्याचा वापर करून एक नाव तयार केली आणि ती थेम्स नदीत पाण्याखाली चालवून दाखवली.

सुरुवातीच्या रेखाटनांमध्ये सर्वात मोठी समस्या होती ती नाव पाण्याखाली तर जाईल, पण तिला पुढे ढकलणार कोण? तेव्हा याचे उत्तर केवळ माणसाचे हात हेच होते. त्यामुळे जुन्या रेखाटनांमध्ये पाणबुडीच्या दोन्ही बाजूंना मोठी वल्हे किंवा हाताने फिरवायचे पंखे दाखवले गेले आहेत.

हाताने वल्हे मारून पाण्यात प्रवास करणे किती जीवघेणे असू शकते, याचा प्रत्यय अठराव्या शतकात आला. १७७५ मध्ये अमेरिकन क्रांतीच्या दरम्यान डेव्हिड बुशनेल याने 'टर्टल' नावाची पाणबुडी बनवली. दिसायला ही पाणबुडी एखाद्या मोठ्या उभ्या पिपासारखी होती. एकाच सैनिकाने आत बसून हाताने पॅडल मारत आणि पंखा फिरवत ती चालवायची होती. शत्रूच्या जहाजाला पाण्याखालून सुरुंग लावणे हा याचा उद्देश होता. विचार करा, त्या अंधाऱ्या, अरुंद पिपात बसून, एकाच वेळी ऑक्सिजनची कमतरता सोसत, हाताने ताकद लावत शत्रूवर हल्ला करणे म्हणजे आत्मघाती मोहीमच होती! ही मोहीम यशस्वी झाली नसली तरी युद्धाच्या उद्देशाने बनवलेली ती पहिली पाणबुडी ठरली.

त्यानंतर अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात १८६३ मध्ये ‘एच. एल. ह्न्ली’ या पूर्णपणे लोखंडाच्या पाणबुडीने शत्रूचे जहाज बुडवून इतिहास रचला. परंतु या पाणबुडीला गती देण्यासाठी आत चक्क आठ सैनिक हाताने एक मोठा कँक फिरवत होते. आतील हवेची कोंडी आणि तांत्रिक बिघाडामुळे या मोहिमेदरम्यान 'हन्ली' सर्व सैनिकांसह समुद्राच्या तळाशी बुडाली.

तोपर्यंत शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते की, केवळ मानवी ताकदीवर प्रचालन आणि खोल पाण्यातील प्रचंड दाब सहन करणेही अशक्य आहे. जसजशी भौतिकशास्त्राची प्रगती झाली तसतशी रेखाटनांमध्ये 'चौकोनी' ऐवजी 'दंडगोलाकार' आणि 'गोलाकार'  आकारांना प्राधान्य दिले गेले. अशाच आकारामुळे पाण्याचा दाब सर्व बाजूंनी समान विभागला जाईल अशी ही योजना होती. तसेच, माशांच्या शरीरातील हवेच्या पिशवीसारखीच यंत्रणा रेखाटनात आली, ज्याला आज आपण 'बॅलास्ट टँक्स' म्हणतो. यात पाणी भरले की पाणबुडी जड होऊन खाली जाते आणि कॉम्प्रेस्ड हवेने पाणी बाहेर काढले की हलकी होऊन वर येते.

याच काळात, फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न याने १८७० मध्ये  “ट्वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी”  ही काल्पनिका लिहिली. या कादंबरीतील कॅप्टन नेमो आणि त्याची 'नाँटिलस' नावाची अत्याधुनिक पण काल्पनिक पाणबुडीचे वर्णन वाचून जग थक्क झाले. विज्ञानाने ज्या गोष्टीचा विचारही केला नव्हता ती एका लेखकाने आधीच कागदावर जिवंत केली होती. या कादंबरीने तत्कालीन शास्त्रज्ञांना प्रचंड प्रेरणा दिली.

लवकरच, १९०० च्या सुमारास जॉन फिलिप हॉलंड या शास्त्रज्ञाने पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक बॅटरी यांचे मिश्रण करून पहिली यशस्वी आधुनिक पाणबुडी विकसित केली. जेव्हा पाणबुडी पाण्याच्या वर असे, तेव्हा ते इंजिनवर चालत असे आणि सोबत बॅटरी चार्ज करत असे. पाण्याच्या खाली गेल्यावर पेट्रोल इंजिन बंद करून ती बॅटरीच्या ऊर्जेवर शांतपणे प्रवास करत असे. हा शोध पाणबुडीच्या इतिहासातील 'टर्निंग पॉईंट' ठरला.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने 'यू-बोट्स' नावाच्या पाणबुड्यांचा ताफा निर्माण करून अटलांटिक महासागरात थैमान घातले. समुद्राच्या संथ पाण्याखाली लपून राहून अचानक टॉरपेडो डागणारी ही पाणबुडी शत्रूसाठी अदृश्य मृत्यू ठरली होती.

पारंपरिक पाणबुड्यांमध्ये एक मोठी मर्यादा होती. इंजिन चालवण्यासाठी आणि आतील माणसांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असायची. त्यामुळे या पाणबुड्यांना काही काळातच पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागायचे. या समस्येवर कायमचा तोडगा निघाला १९५४ मध्ये, जेव्हा अमेरिकेने जगातील पहिली अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी बनवली आणि तिला नाव दिले ज्युल्स व्हर्नच्या कादंबरीवरून—'युएसएस नाँटिलस'. अणुऊर्जेमुळे पाणबुडीला इंधनाची आणि ऑक्सिजनची चिंता उरली नाही.

अणूभट्टीमधून मिळणाऱ्या अफाट उष्णतेच्या जोरावर समुद्राच्या पाण्याचेच पिण्यायोग्य पाण्यात आणि श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनमध्ये रूपांतर करणे शक्य झाले. आजच्या आधुनिक आण्विक पाणबुड्या या पाण्याच्या खाली सलग ३ ते ४ महिने सहज राहू शकतात. त्यांना वर येण्याची गरज फक्त आतील सैनिकांचे अन्न संपते तेव्हाच असते! आण्विक पाणबुडी म्हणजे समुद्राच्या तळाशी वसलेले एक आधुनिक स्वयंपूर्ण शहरच असते.

कागदावर माशांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या रेखाटनांपासून सुरू झालेला हा प्रवास, आज एका महाकाय, अदृश्य आणि विनाशकारी महाशक्तीत रूपांतरित झाला आहे. भारताकडेही आज 'आयएनएस अरिहंत' सारख्या अत्याधुनिक आण्विक पाणबुड्या आहेत, ज्या देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करतात. केवळ युद्धासाठीच नव्हे, तर सागरी जीवसृष्टीचा आणि सागरतळाचा अभ्यास करण्यासाठी माणसाने बनवलेली ही कृत्रिम मासोळी आजही मानवी बुद्धिमत्तेची आणि जिद्दीची साक्ष देत समुद्राच्या गर्भात संचार करत आहे.

-संजय सोनवणी 

शारीरिक मर्यादांवर मात करत लावले गेलेले शोध!

मानवी बुद्धिमत्ता आणि शोधवृत्तीला कोणतीही शारीरिक मर्यादा नसते , हे इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. जेव्हा शरीराचे अवयव साथ सोडतात , दृष्...