पुणे विद्यापीठातील खेर वाड्मय ग्रुहातील नाट्यग्रुहात "सत्यशोधक" हे गो. पु. देशपांडे लिखित नाटक पहायला जातांना मी खरे तर साशंक होतो. या नाटकाचे दिग्दर्शक जरी अतुल पेठेंसारखे प्रतिभाशाली रंगकर्मी असले तरी निर्मिती होती पुणे महानगरपालिका युनियनची आणि यातील जवळपास ९५% कलाकार होते सफाई कामगार. हे नाटक अत्यंत प्रायोगिक आणि प्राथमिक-प्रचारकी थाटाचे असनार अशी जणु काही माझी खात्रीच होती. परंतु प्रथमच मी पुरता गंडलो. जसा प्रयोग सुरु झाला...माझे पुर्वग्रह कोसळुन पडले. पहिल्या क्षणापासुन मी नाटकात रममाण झालो...अनेकदा रडलोही...
"सत्यशोधक" हे रुढार्थाने नाटक नाही. तो आहे सत्यशोधकी नाट्यमय जलसा. या जलशात महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाईंचे जीवनचरित्र पोवाडे, अखंड, निवेदने आणि प्रत्ययकारी प्रसंगांतुन सादर होते. ज्यांना महात्मा फुले संपुर्ण माहित आहेत आणि ज्यांना अगदी जुजबी माहित आहेत त्या सर्वांना सर्वस्वी भारावुन टाकणारा हा प्रयोग!
ज्या काळात जातीयता, अंधश्रद्धा, स्त्रीयांवरील (मग त्या ब्राह्मण का असेनात) आणि शुद्राती-शुद्रांवरील अत्याचार कळसाला पोहोचले होते त्या काळात समाज सुधारणा, शिक्षणाची महत्ता, स्त्री शिक्षणाचा महनीय उद्गार आणि प्रत्यक्ष कार्य, मराठी भाषेची महत्ता, ब्राह्मण विधवा गर्भवतींसाठी आश्रम चालवण्याचे अपरंपार साहस...एवढेच नव्हे तर अशाच एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेण्याचे साहस आणि मानवतेबद्दलची अपरंपार करुणा, सनातन्यांचा (मग त्यात न्या. रानडे आले तसेच विष्णुशास्त्री चिपळुनकरही आले) दांभिकतावाद या सर्वांचे प्रत्यकारी दर्शन या प्रयोगातुन होते. महात्मा फुल्यांच्या हत्त्येचा प्रयत्न आणि हत्यारेच त्यांचे विद्यार्थी बनत सत्यशोधकीय चळवळीचे खंदे पाईक होतात हा प्रसंग तर हेलावुन टाकणारा.
महात्मा फुलेंचे विचार या प्रयोगातुन मांडतांना ते कोठेही प्रचारकी होणार नाही, प्रसंगांतुनच ते कसे ठळक होतील याची विलक्षण काळजी पेठे यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रयोगाची नाट्यात्मक उंची कल्पनातीत वाढते. मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनी. तिला तिचा बाप शाळेत घालायला घेवुन येतो तेच एका गोणीत घालुन...का तर कोणी पाहिले तर दगडं पडतील...हीच मुक्ताबाई पुढे भारतातील पहिली स्त्रीवादी, महार-मांगांची वेदना मांडणारी भाष्यकार बनली...वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी... श्रेया मोरे या अवघ्या तीन-साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरडीने ही भुमिका असल्या झोकात वठवली आहे कि तिच्या अभिनयावर टाळ्यांचा वारंवार कडकडाट होत होता. या नाटकातील प्रत्येक प्रसंगाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे...
ओंकार गोवर्धन यांनी महात्मा फुलेंची भुमिका अत्यंत तडफेने आणि समरस होवुन केली आहे. अत्यंत स्पष्ट उच्चार, ह्रुदयाला थेट हात घालणारी संवादफेक आणि मुखाभिनय उत्क्रुष्ट, पण मी अधिक प्रभावित झालो ते सावित्रीबाईंच्या भुमिकेतील पर्ण पेठेंचे. (या अतुल पेठेंच्या कन्या आहेत हे मला नंतर कळाले.) देहबोली, मुखबोली, सनातन्यांचा हल्ला होत असुनही ठेवलेला निर्धार, महात्मा फुलेंना अनिवार निराशेतही प्रेरणा देणारी युगमाता, विधवांचे केशवपन व्हायचे त्याला विरोध करण्यासाठी न्हाव्यांचा घडवुन आनलेला एकमवद्वितीय बहिष्कार...या अभिनेत्रीला उज्ज्वल भवितव्य आहे.
शाहीर सदाशिव भिसे, रमेश पारसे, दत्ता शिंदे डा. दिपक मांडे, प्राजक्ता पाटील, सावित्री भिसे चेतन पारसे.......सर्व कलाकारांची नांवे घेतांना मी थकेल पण त्यांच्या अभिनयाची तारीफ करतांना थकणार नाही. प्रोफेशनल कलाकारांनीही तोडात बोट घालावे असा उत्क्रुष्ठ अभिनय आणि सामुहिक म्हणुन दिसणारी एकाकारता याचा वेगळाच अनुभव हा प्रयोग देतो हेच काय ते खरे.
नाण्याची दुसरी बाजु
प्रयोग उंचीचा झाला तरी सर्वच प्रेक्षक त्या उंचीचे नसतात. फुले दांपत्यावरील नाटक आहे, त्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यातील फरक सुस्पष्ट केलेला आहे, म. फुलेंनी प्रसंगी पुरोगामी ब्राह्मणांची मदत घेतली आहे आणि केलेलीही आहे हे दाखवणे स्पष्टपणे नाकारणारे काही बहुजनीय नवसनातनी प्रेक्षकही या प्रयोगाला होतेच! एकतर हे नाटक लिहिले ते गो. पु. देशपांडे नामक ब्राह्मणाने. दिग्दर्शन केले ते अतुल पेठे नामक ब्राह्मणानेच...म्हणुन या नाटकावर ब्राह्मणवादी तत्वांचा प्रभाव पडला असा निष्कर्ष या नवसनातन्यांनी काढला. त्यावर एवढा उत्क्रुष्ठ नाट्यानुभव घेतल्यानंतरही असे टुक्कार आक्षेप घेतले. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य एकच असा हट्ट धरायचा प्रयत्नही केला. (म्हणजे यांना महात्मा फुलेच मान्य नाहीत असाच एक अर्थ!)
खरे तर मुळात महात्मा फुलेंवर या तोडीचे नाटक लिहिणे आणि हवे तसे सादर करणे (मग भले महात्मा फुलेंचे विचार ते मांडोत वा हवे त्या पद्धतीने मोडतोड करत मांडोत...) कोणी अडवले आहे वा होते? महात्मा फुले ते बाबासाहेब यांचे विचार मोडतोड करत मांडणे हा या चलवळे म्हनवणा-या चळवळघातक्यांचा उद्योग गेली अनेक वर्ष चालु आहे. त्यामुळेच या महामानवांची आणि सावित्रीबाईंचे खरी कामगिरी आजही लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही.
खरे तर महात्मा गांधींवर, ज्या इंग्रजांशी आजन्म लढले ते महात्मा गांधी यांच्या जीवनावर अविस्मरणीय चित्रपट बनवनारे रिचर्ड अन्टनबरो आणि महात्मा गांधींची भुमिका साकारनारे बेन्ज किंग्जले यासारखे दिग्गज इंग्रज अभिनेते असावेत हा जसा काव्यगत न्याय आहे आणि महानतेला महान म्हणना-या संस्क्रुतींचे एक आदर्श प्रतिनिधित्व करनारी घटना आहे, तिचे स्वागत न करता, आपली अर्धवट अक्कल पाजळणा-या या बहुजनवादी म्हणवणा-या संस्क्रुतीचा मी निषेधच करेन!
एका जातीचे लोक जोवर दुस-या जातींच्या महनीयांना स्वीकारत नाहीत...त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे पवाडे मुक्तकंठाने गात नाहीत, अन्य समाजांशी एकरुप होत नवी संस्क्रुती घडवण्याचा प्रयत्न करत नाहीत तोवर गतकाळातील महामानवांची स्वप्ने पुर्ण करत आपण एक अविक्रुत संस्क्रुती कशी निर्माण करणार?
"सत्यशोधक" हे ख-या अर्थाने निरोगी मन:स्वास्थ्य असलेल्या मराठी समाजाचे एक अप्रतीम प्रतीक आहे. सफाई कामगारांनी यात ९५% भुमिका वठवाव्यात याचा एकच अर्थ मी समजतो...या अत्यंत दुर्लक्षीत घटकाने शहराची...आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी सफाई करण्याचा जसा अविरत संघर्ष मांड्ला आहे तसाच तो आपल्या मनावर बसलेल्या घाणीचीही सफाई करायचा चंग बांधला आहे. मी त्यांना नुसत्या शुभेछ्छा देत नाही तर मी त्या सर्वांचाच ऋणी आहे...आणि आम्हालाही अजुन आणि अजुन काम करण्याची प्रेरणा देणारी ही घटना आहे. पण ज्यांनी आपल्या मनावर घानीचे पुटांमागुन पुटे चढवण्याचाच चंग बांधला आहे अशा मनोरुग्नांची मी फक्त कीव करु शकतो.
प्रा. हरी नरके यांनी हा नाट्यप्रयोग पुणे विद्यापीठात घडवुन आणला. खरे तर पुणे विद्यापीठात नाट्यप्रयोग होण्याची ही पहिलीच घटना. क्रुतीशील विचारवंत काय करु शकतो याचे हे एक उदाहरण...एवढेच नव्हे तर हा प्रयोग पाहुन पेठेंना पुढच्या चार प्रयोगांची निमंत्रणे मिळाली. कोणी म्हणेल...पेठेंना यातुन केवढा अर्थलाभ झाला असेल...माफ करा...पुणे विद्यापीठातील एवढ्या मोठ्या संचातील प्रयोग हा फक्त दहा हजार रुपये मानधनावर झाला...मी अतुल पेठेंना त्यांच्या निरपेक्ष कलासेवेबद्दल धन्यवाद देतो...त्यात काम करणा-या कलावंतांकडुन अपार कष्ट घेत एवढा अविस्मरणीय नाट्यानुभव निर्माण केला या स्रुजनाबद्दल पुन्हा त्यांचे कौतुक करतो...
आणि प्रत्येकाने हा प्रयोग पहावा...अशी मनापासुन विनंती करतो. कोणास अभिनंदन करायचे असेल तर त्यासाठी अतुल पेठे यांचा भ्रमणध्वनी क्र. ९४२२३१९७१७ हा आहे.