धर्म-जात-प्रांत-वंश या आधारावर संघटना बांधणे सोपे जाते हे मी आधीच्या अनेक लेखांत म्हटलेच आहे. अन्य जातीय, धर्मीय, प्रांतीय वा वंशांचा द्वेष हा मुलभुत पाया असल्याखेरीज संघटन करणे सहसा सोपे जात नाही आणि ज्यांना दीर्घकालीक धोरणच नसते वा पुरेसा वैचारिक/सैद्धांतिक आधारच नसतो त्यांना द्वेषमुलक चळवळी उभ्या कराव्या लागतात. पण यातुन साध्य काय होते? नेमके काय घडते?
१. हिटलरी पद्धतीने एकचालुकानुवर्ती संघटन निर्माण होत चळवळीचा प्रवास बहुदिश न होता एक-दिश होवुन जातो.
२. स्वजातीय/धर्मीय/प्रांतीय/वंशीय पुरातन असलेले-नसलेले महात्मे शोधुन काढले जातात, त्यांच्या दैवत्वीकरणाची प्रक्रिया सुरु होते आणि चिकित्सा नाकारली जाते. चिकित्सा करणारे या चळवळींचे शत्रु ठरवले जातात. प्रसंगी हिंसक होत वैचारिकतेला दडपले जाते.
३. इतिहासाला सोयिस्करपणे बदलले जाते. विरुद्ध पक्षीयांच्या दैवतांना हीनवत, चारित्र्याची मोडतोड करत स्व-जाती/धर्म/प्रंत/वंश अभिमान वाढवण्यासाठी अपार बौद्धिके घेतली जातात. "आपल्यावर अन्यांनी केवढा भीषण अत्त्याचार केला आहे" याचे कधी अतिरंजित तर कधी खोटे चित्रण केले जाते.
४. हे सारे करीत असतांना, चळवळीतील फौज वाढवली जाते परंतु या फौजेचा स्वता:चे डोके वापरण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. त्यांचे brain washing एवढे केले जाते कि ते सारासार विवेकी विचार करणेच विसरलेले असतात. थोडक्यात बौद्धिक क्लोन बनवले जातात.
५. शत्रु पक्षावर लिखित तर कधी हिंसक हल्ले करणे आणि दहशत माजवणे हेच एकमेव कार्य बनुन जाते. शत्रु पक्षीय संघटनाही प्रत्त्युत्तर म्हणुन हेच कार्य करत जातात आणि त्यातच अराजकाची बीजे पेरली गेलेली असतात हे कधीच या चळवळींच्या लक्षात येत नाही.
६. या चळवळी स्वर्थासाठी अन्य संघटनांशी प्रत्यक्ष वा वैचारिक युती करत असतात, जेथे समान स्वार्थाचे काही धागे गुंफले गेलेले असतात. उदा. बौद्ध, जैन व शिख धर्म हे हिंदु धर्माचेच भाग आहेत असे आर.एस.एस. वाले सांगत एक क्रुत्रीम नाळ बांधायचा प्रयत्न करतात...दुसरे तर दलित आणि मराठे हे नागवंशीयच असल्याने एकच आहेत असा प्रचार करु लागतात. ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमान यांचे धागे विक्रुत पद्धतीने उसवत तर्कविसंगत तत्वप्रणाल्या निर्माण केल्या जातात ज्या एकुणातीलच सर्व समाजाला घातक ठरत जातात. ऐक्य करणे हे स्वागतार्ह आहे...पण त्यासाठी चुकीचे तत्वद्न्यान वापरणे हे विसंगत आहे. कारण ज्या कारणासाठी ऐक्य हवे त्यामागे जेंव्हा स्वार्थपिडित भावना असते तेंव्हा असे तत्वद्न्यान बाष्कळ बनुन जाते. "समान शत्रु शोधा आणि एकत्र या, त्यासाठी इतिहासाचा बळी द्या" असा हा धंदा यातुन सुरु होतो. हिटलरने आर्य सिद्धांत जमेस घेत ज्युंची सर्रास कत्तल केली. भारतात गुजरात मद्धे मुस्लिमांची कत्तल केली गेली. दलितांच्या असंख्यवेळा कत्तली होत आल्या आहेत. उद्या कधी भारतात ब्राह्मणांची कत्तल केली गेली तर आश्चर्य वाटणार नाही कारण अनेक ब्राह्मणद्वेषी संघटनांचा पवित्रा तोच आहे. द्वेषाचा विखार वीषवल्लीप्रमाणे वाढत जात असतो आणि त्याचे कधी विस्फोटात रुपांतर होईल हे कोणीही सांगु शकत नाही. ही द्वेषमुलक परंपरा बदलत मानव्यवादी भुमिकांत चळवळ जात नाही तोवर चळवळीच विनाशाप्रत पोहोचनार हे उघड आहे. हा द्वेष वरकरणी समाजात पसरवला गेला तरी अंतर्गत स्वहिते पाहनारे मात्र आतुन हातमिळवणी करुनच असतात असाही जगाचा इतिहास आहे. फसवणुक होते ती प्रामाणिक कार्यकर्त्यांची आणि समाजाची.
कोणत्याही समाजात जाग्रुत लोकांची, लेखक-पत्रकार-विचारवंतांची गरज असते. प्रसंगी अप्रिय होत सत्य सांगण्याचा प्रयत्न होण्याची गरज असते. पण असे लोक या सर्वच प्रकारच्या संघटनांना अडचणीचे ठरत असल्याने त्यांचे काटे काढले जातात हाही इतिहास आहे. किती विचारवंतांना तुरुंगात सडावे लागले आहे वा प्रसंगी त्यांना ठारही मारले गेले आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतो म्हणुन सोक्क्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागतो. कम्युनिस्ट रशियाने किती जणांना ठार मारले, हद्दपार केले वा सैबेरियात शिक्षा ठोठावत पशुवत जीवन जगायला भाग पाडले हे सर्वांना माहितच आहे. तालीबानी राजवटीत तर कहर झाला आहे. डा. आनंद यादवांना आपली कादंबरी मागे घ्यावे लावणारे, साहित्य सम्मेलनाचा राजिनामा द्यायला भाग पाडणारे तालीबानी आपल्या महाराष्ट्रात नाहीत कि काय? डा. कुमार केतकरांवर न्रुशंस हल्ला करणारे याच भुमीत नाहीत कि काय? वैचारिक स्वातंत्र्याची मुभा जेथे नाकारली जाते...तेथे लोकशाही नव्हे तर एक छुपी हुकुमशाही वावरत असते. किंबहुना जगाचा इतिहास हा अशा क्रुरातिक्रुर हुकुमशाही घटनांनी भरला आहे. आजही स्वत:ला आधुनिक समजणारा मानव त्यातुन बोध घेवु शकलेला नाही हे जगाचेच दुर्दैव आहे.
खरे तर संघटना द्वेषविरहित प्रागतिक कार्य करु शकतात-रचनात्मक होवू शकतात. हा असा मार्ग थोडा प्रदिर्घ असेलही पण त्यातुन मानवी समुदायाचे प्रदिर्घकालीन हित होवु शकते. येथे मला महाभारत समाप्तिसमयी व्यासांनी केलेली आर्त विनंती आठवते ती: "उर्द्व बाहू विरोम्येश:: न:कशित श्रुणोति माम..." उर्ध्व बाहु उभारुन मी आक्रंदन करत आहे कि ज्यायोगे अर्थ, काम, मोक्ष साधला जाईल असा धर्म का आचरत नाही?" येथे धर्म हा शब्द
religion या अर्थाने वापरलेला नसुन मानवी स्वभावधर्म या अर्थाने वापरलेला आहे. (आता व्यासांचे नाव घेतले तर बहुजनवादी म्हनणा-यांना राग येईल. ते व्यासपीठ हा शब्द न वापरता विचारपीठ हा शब्द वापरतात. व्यास हे कधीच ब्राह्मण नव्हते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. महत्तेला स्वीकारण्याची लाज वाटु नये. द्वेषाने आंधळे झालेले आपल्याच लोकांना कसे पायतळी तुडवतात त्याचे हे एक उदाहरण.)
संघटना आवश्यक असतात त्या त्या-त्या जाती-समुदायावरील, समाजगटावरील, मानवी समुदायावरील होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. अन्याय न्यायात बदलवुन घेण्यासाठी. चळवळीचा अर्थ असतो तो मानवी समाजाला आहे त्या स्थानापासुन पुढे नेण्यासाठी, वैचारिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि राजकीय प्रगल्भता विकसीत करण्यासाठी... दुस-यावर अन्याय होणार नाही पण आम्हालाही न्याय मिळावा यासाठी. स्वातंत्र्यासाठी. समतेसाठी. आपल्यावर अन्याय झाला म्हणुन दुस-यावर अन्याय करावा हे काही महावीराने वा गौतम बुद्धाने वा शिवाजी महाराजांनी सांगितलेले नाही. संघटना आवश्यक असतात त्या आपापल्या समाजघट्कांना आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक द्रुष्ट्या उंचावत त्यांना प्रगल्भ करण्यासाठी. त्यांचे वैचारिक, सामाजिक, आर्थिक दारिद्र्य घालवण्यासाठी...ख-या अर्थाने आपापल्या संघटीत म्हनवणा-या समाजाचे नैतीक उत्थान व्हावे यासाठी. संघटनांचे हेच खरे नैतीक कर्तव्य असते. अशाच रितीने देशाचा आणि म्हणुनच जगाचाही खरा अभ्युदय होवू शकतो. नाहीतर २१व्या शतकातही आपण आदिमानवाचा हिंसक टोळीवाद जपणारे आहोत हे सिद्ध करत आम्ही कसलीही मानसिक प्रगती केलेली नाही हे वारंवार सिद्ध करत जातो...जात आहोत...आणि असेच सारेच रसातळाला जावून पोहोचणार आहोत...मग वाचवायला ना क्रुष्ण येणार ना बुद्ध...ना शिवाजी महाराज ना सावरकर...ना गांधी. मानवी जगताच्या पापाचे घडे या असल्या द्वेषमुलक विचारांमुळे, वर्चस्ववादी भावनांमुळे आणि त्यांना समर्थन देना-या संघटनांमुळे भरतच चालले आहेत. वर्तमान जग या मानसिकतांना थारा देण्याच्या अवस्थेत नाही...ते या नव्या जगाला परवडणारही नाही...या चलवळी म्रुत्युपंथाला लागणार हे नक्कीच...
पण जर याच चळवळी सकारात्मक झाल्या तर? आपले भवितव्य उज्ज्वल असेल...यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.
आता तरी जागे होणार आहात काय?