Tuesday, July 3, 2012

हवे सकारात्मक विचारांचे वंगन!



कोणताही समाज म्हणजे एखाद्या अवाढव्य मशीनप्रमाणे असतो. असंख्य पार्टस योग्य ठिकाणी जोडुनच जसे मशिन बनते त्याचप्रमाणे असंख्य सेवा/व्यवसाय करणारे समाज मिळुन एकुणातील समाज बनत असतो. त्यांचे परस्परांशी साहचर्य व सामंजस्य जोवर असते तोवर हे समाजरुपी मशिन व्यवस्थित चालु असते व प्रगतीच्या वाटा तुडविल्या जात असतात. प्रत्येक घटकाचे आपापल्या जागी समाजरचनेत अत्यंत महत्वाचे स्थान असते. मशिनमधील एक साधा स्क्रु जरी बाद झाला तरी मशिन बंद पडते हे आपल्याला माहित आहे. सारे पार्टस कुर्कुर न करता प्रदिर्घ काळ तेंव्हाच कार्यक्षम राहु शकतात जेंव्हा त्यांना वंगनाचा वेळेवेळी पुरवठा केला जातो. समाजही सकारात्मक, सामंजस्यपुर्वक विचारांच्याच वंगनाने परस्परांशी निबद्ध रहात दीर्घकाळ प्रगती साधु शकतो.

भारतात जवळपास प्रत्येक व्यवसाय/सेवांच्या जाती पडलेल्या आहेत. आज बहुसंख्य लोक जातीनिहाय व्यवसायांतुन बाहेर पडले असले तरी जातींची बंधकता आपल्याच वैशिष्ट्यपुर्ण समाजव्यवस्थेमुळे तोडता येत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे प्रत्येक जात ही जातीअभिमानाने भारलेली असते. अन्य कोणत्याही जातींपेक्षा  आपलीच जात श्रेष्ठ असे प्रत्येक जातीचा मनुष्य प्राय: मानतो. वरकरणी पाहता हे चुकीचे वाटते. परंतु समाजव्यवस्थेचा इतिहास पाहिला तर एक बाब लक्षात येईल व ती म्हणजे प्रत्येक जातीचे समाजेतिहास/संस्कृती/अर्थव्यवस्था/राजव्यवस्था घडवण्यात प्राचीन काळापासुनचे महत्वाचे योगदान आहे. आज आहेत त्यातील समजा एखादी जात नसती तरी समाजाचे अडलेच असते असे आपण पाहु शकतो. सबल जातींनी दुर्बल जातींवर अन्याय केला हे वास्तव आहे. पण आजच्या दुर्बल वाटणा-या जातीही कोणत्याना कोणत्या काळात सबल होत्याच. त्या जेंव्हा सबल होत्या तेंव्हा त्यांनीही अन्यांवर अन्याय केलाच नसेल असे नाही. आज ज्या जाती दुर्बल आहेत त्या भविष्यात सबल होणारच नाहीत असेही नाही. कालचक्र फिरत असते. परंतु ज्या कालात आपण आज आलो आहोत त्या काळाचा परिप्रेक्ष हेच सांगतो कि सर्वांनी सबल व्हावे आणि कोणावरही अन्याय होनार नाही, होवू दिला जाणार नाही अशी समाजव्यवस्था साकार करावी.

आरक्षनामुळे जातीयतेला नवी परिमाने मिळालेली आहेत हेही नाकारता येत नाही. आरक्षनामुळे जातीव्यवस्था अजुन घट्ट होईल अशी एक भिती अनेक समाज शास्त्रज्ञांना वाटते. किंबहुना एका सामाजिक कलहाचे ते महत्वाचे कारण बनले आहे. येथे मला दोन मते व्यक्त करावीशी वाततात. पहिले म्हणजे मुलात आरक्षनच नसते तर जातीभेद नष्ट झाला असता काय? याचे उत्तर स्पष्टपने असे आहे कि "नाही". नष्ट झाला नसता. याचे कारण जातीयतेची मुळे मनात घट्ट रुजलेली आहेत. समजा आरक्षण नसते तर आज ज्या सबल जाती आहेत त्यांनी उर्वरीत समाजघटकांचे शोषण पुर्ववत चालु ठेवले असते. येथे मी फक्त धर्मव्यवस्थेबाबत बोलत नसुन बदललेल्या अर्थव्यवस्थेबाबतही बोलत आहे.

औद्योगिकरणाने अनेक जातींचे व्यवसाय नष्ट केले वा अति-मर्यादित केले. विज्ञानयुगाने धर्मांची मर्यादा अधोरेखित केली त्यामुळे धर्म हेच ज्यांच्या उपजिविकेचे साधन त्यांनाही इतर क्षेत्रांत उड्या घ्याव्या लागल्या....मग इतरांची काय कथा? अशा स्थितीत, जे आधीच दुर्बल आहेत व ज्यांना आपल्या परंपरागत व्यवसायात टिकणे अशक्य आहे त्यांना नवीन अर्थव्यवस्थेत सामावून घेणे ही संपुर्ण समाजाचीच नैतीक जबाबदारी होती. अर्थात आरक्षण हे मुळात गरीबी हटावचा कार्यक्रम नसुन प्रत्येक समाजघटकाला राज्य व्यवस्थेय पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे हाच मुख्य हेतु असून अन्य हेतु दुय्यम आहेत, हेही येथे लक्षात घ्यावे लागते. जे कधीच राज्यकर्ते नव्हते त्यांनाही लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रवेश मिळायचा असेल तर आरक्षण अपरिहार्य असेच होते.

एका अर्थाने आरक्षण हे समाजव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालु ठेवता यावा यासाठीचे वंगन होते व आहे...अन्यथा शोषित जाती-जमाती कधी ना कधी हाती शस्त्रे घेवुनच उभी ठाकली असती याबद्दल शंका नाही.

थोडक्यात आरक्षण नाही म्हणुन जातीयता संपली असती या मतात तथ्य नाही. आणि आरक्षण आहे म्हणुन जातीय अहंकार मोडीत निघतील असेही नाही.

याचे कारण म्हणजे ज्यांना आरक्षणच नाही अशा जातीही आपापसात हीणकस पातळीवर येवून संघर्ष करतात ते कसे? ज्यांना आरक्षण आहे त्याही जाती-जमाती आपापसात संघर्ष करतात ते कसे? आणि तरीही त्यातल्या त्यात सौम्य प्रकृतीच्या जातींना एकत्र करण्याचे अपेशी प्रयत्न होत असतात, तेही का?

ओबीसी एकत्र यायला हवेत...येत नाहीत. एस-सी/एन.टी एकत्र यायला हवेत...येत नाहीत. ब्राह्मण-मराठे अनारक्षित म्हणुन एकत्र यायला हवेत...येत नाहीत. प्रत्येक जात ही एक स्वतंत्र बेट बनुन बसली आहे.

आणि यातच हे समाजरुपी यंत्र ठप्प झाले आहे. कोण श्रेष्ठ? कोण सर्वात अन्यायी? या विवादात आजच्या जागतीक अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात आपण मागे पडत चाललो आहोत. एकमेकांचे पाय खेचत धडे शिकवण्याच्या नादात बेभान झालो आहोत. धर्माने जर मानवी समुदायाचे वाटोळेच केले आहे हा जर सर्वमान्य सिद्धांत आहे तर एक धर्म सोडा---दुस-यात जा वा नवीन धर्म स्थापन करा...याचा एकच अर्थ होतो तो हा कि धर्माचा आमचा सोस संपलेला नाही. एक धर्मनियंता हटवायचा आणि दुसरा आणायचा एवढाच काय हा उपद्व्याप आहे.  "मीच माझा देव...मीच माझा भक्त...मी माझा कृतार्थ...सहज असे" असे नामदेवांनी तेराव्या शतकात सांगितले ही एक क्रांतिकारी घटना होती. मनुष्यत्व हे आपल्या आपच महनीय तत्व आहे व स्व-पूजा (म्हणजे आत्मभान) एवढेच काय ते जगायला पुरेसे आहे. कशाला हवा धर्म आणि संप्रदाय? पण तो जोवर हवाच आहे तोवर "जाती नाहीत असा धर्म" मुळात भारतीय मानसिकताच जातीयतेच्या दंभात डुबलेली असतांना अस्तित्वात येणे शक्य नाही. खुद्द गौतम बुद्धही "खतीय" (क्षत्रीय) श्रेष्ठ मानत कारण तेही खतीय होते. पैगंबर अरब ज्या कुरेशी जमातीत जन्माला आले तिला सर्वश्रेष्ठ मानतात. येशु ख्रिस्ताची नाळ राजा डेव्हीडशी जुळवली जाते. थोडक्यात उच्चवर्णीय/जमातीय असणे वा तिच्याशी नाळ भिडवणे हा उपद्व्याप जगातील सर्वच राजवंश ते धर्मियांनी केला आहे वा त्यांनी नसेल केला तर त्यांच्या अनुयायांनी केला आहे असेच आपण पाहु शकतो.

या जाती/वंश श्रेष्ठत्वाच्या चढाओढीतुन जगभरचे महनिय सुटले नसतील तर जेथे जातीव्यवस्था हाच ज्या समाजाचा प्राण आहे तो तरी कसा सुटनार?

आंतरजातीय विवाह केले म्हणजे जातीयवाद संपेल असा दावा अनेक विद्वानांनी आजवर केला आहे. वस्तुस्थिती अशी आहे कि जातीयवाद संपत नाही. आजही मुलाला बापाचीच जात शालेय दाखल्यावर थोपुन घ्यावी लागते. आता आईचीही जात मुलाला घेता यावी असा न्यायालयीन निर्णय आहे. कदाचित या निर्णयाचे कायद्यातही रुपांतर होईल. पण म्हणजे, जात कोणाचीही घेता येवो...जात राहणारच आहे.

आता जर जात राहनारच असेल तर आपण काय करु शकतो? समाजाचे अवाढव्य यंत्र कुरकुर न करता कसे अव्याहत सुरळीतपणे चालु ठेवू शकतो?

-आपल्याला सौहार्दाचे व सामंजस्याचे वंगन लागणार आहे.
-प्रत्येक जातीचे समाजरचनेत महत्वाचे योगदान आहे हे समजावून घ्यावे लागनार आहे.
कोणत्याही जातीचा दुर्बल असो, त्याला आरक्षण असो अथवा नसो, त्याला देवू शकतात त्यांनी यथाशक्ति हात द्यायला पाहिजे.
-धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो...जर त्यांचा एकुणातील मतितार्थ सहजीवन आणि मानवता हाच असेल तर तोच पाळला गेला पाहिजे.
-अन्यायकर्ते आणि अन्यायग्रस्त यांतील सीमारेखा पुसण्याचा एकमेव मार्ग असतो आणि तो म्हणजे उभयपक्षी विवेक निर्माण करणे. स्वार्थाच्या उभयपक्षी पायावर अन्यायग्रस्तही अन्यायकर्ते होतात असाही इतिहास आहे. स्वार्थरहित सामंजस्याचा इतिहास लिहायचा कि द्वेषमुलक संघर्षाचा याचा निर्णय आपल्याला आताच घ्यायला हवा.
-नकारात्मक विचार हे कोणत्याही समाजाला अधोगतीलाच नेत असतात. नकारात्मकतेतुन मानवी प्रज्ञा विकसीत होणे तर दूर...ती इतरांनाच नव्हे तर स्वत:लाही अधोगतीलाच नेत असते.
-सकारात्मक...रचनात्मक विचार आणि कृती ही ख-या अर्थाने समाजाची चिरंतन प्रेरणा असते.  गतकालातील अन्यायांबद्दल उरबडवेपना करणारे, कितीही लक्षवेधी ठरत असले तरी ते समाजरचनेचे खुनीच असतात.
-जगात अन्याय झाला नाही असा एकही जीव नाही. ज्याने अन्याय केलाच नाही असाही एकही जीव नाही. किमान "मी तरी अन्याय करणार नाही" एवढे ठरवता आले तरी पुरेसे आहे.
-विकासाचा मार्ग...मग मानसिक असो कि आर्थिक...जरा दुरचा असतो. एका रात्रीत यश कोणालाच मिळत नाही. अपयशांच्या चिंध्या शिवत यशाचे भरजरी वस्त्र बनवावे लागते. आहे त्याच जे चिवडत खुनशी होत चिरफाड करतात त्यांना कधीही यश मिळु शकत नाही.

बरेच लिहिता येईल. पण किमान आज आपण सर्व समाज घटकांत सौहार्दाचे वंगन लावत किमान कुरबुरींना कमी करुयात...तसा प्रामाणिक प्रयत्न करुयात...एवढेच!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...