Friday, July 13, 2012

धर्माबद्दल...




१. धर्म हे भयभीत मानवी मनाला मानसिक आधार देणारे एक आच्छादन आहे. मुळात भयच मानसिक व काल्पनिक असल्याने आच्छादनही काल्पनिक असते..एवतेव ते असत्यमय असते.

२. भय हे निरंतर आहे. भय आतही असते आणि बाहेरही. कोणी भयाला आतुन आधार देतो तर कोणी बाहेरुन. कोणी वरुन तर कोणी खालुन. आधाराची गरज तरीही संपत नाही, कारण भय हे पुन्हा पुन्हा कोणत्या ना कोणत्या नव्या रुपाने सामोरे येतच असते.

३. भय जसे गुंतागुंतीचे होत जाते तसतसा धर्मही गुंतागुंतीचा होत जातो. कारण नेमके काय केले वा कसे वागले तर भय संपेल हेच मानवी मनाला समजत नाही.

४. धर्म ही मानवी समाजाला एकत्रतेचे आश्वासन देत सुरक्षेचा आभास देणारी लवचीक व्यवस्था होय. तिचा कोणी निर्माता नसतो तर समाज हाच आपल्या मानसिक गरजेतुन धर्मव्यवस्थेची निर्मिती करत असतो.

५. म्हणुन धर्म स्वयंभू नसतो.

६. सुखाच्या आणि दु:खाच्या व्याख्या या व्यक्तिपरत्वे बदलत असतात. विश्व आनंदमय आहे असे विधान एखाद्याला लागु पडेल तर विश्व हे दु:खमय आहे असे विधान दुस-याला त्याच्या अनुभवपरत्वे व अनुभवपरत्वे लागु पडले तरी ते सर्वव्यापी विधान असेल असे म्हणता येत नाही.

७. व्यक्तिगत अनुभव व तत्वज्ञान म्हणजे धर्म नव्हे तर ते मानवी धर्माचे विकसनात्मक आधार देणारे तत्व होय.

८. धर्म म्हणजे एकंदरीत मानवी समुदायाने स्वत:च्या ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक भुकेला भागवण्यासाठी शोधलेला मार्ग होय. म्हणुन धर्म कालसापेक्ष परिवर्तनाला मोकळा असतो. मानवी जीवनाचे बाह्य व अंतर्गत रुप सामावून घेत दशदिशांगत असूनही विकसनतेचा एकनियम एकदिशेतेने नेणारी व्यवस्था म्हणजे धर्म होय.

९. धर्म म्हणजे भययुक्त बंधकता नसून अशी उन्मुक्तताही नव्हे कि जी पुन्हा मानवी जगताला भयभीततेत लोटेल. भयमुक्त उन्मुक्तता हेच मानवी धर्माचे एकमेव ध्येय होय.

१०. धर्म माणुस घडवत नसून माणुस धर्म घडवतो. मानवी धर्म हा त्या त्या कालातील माणसाच्या एकुनातील आचरनविषयक विचारांचा समुच्चय असतो.

११. इंश्वराने कोणताही धर्म घडवलेला नाही. एकही धर्म ईश्वर-निर्मित नाही कारण ईश्वराचा असा कोणताही धर्म नाही जो मानवी जीवन घडवू शकेल. कारण मुळात ईश्वर हीच मानवी संकल्पना आहे. कृत्रीम संकल्पना जेही काही घडवेल तेही कृत्रीम असनारच!

१२. मानवी समुदायाला एक श्रद्धा-एक ध्येय आणि एक आदर्श देवू इच्छिते ती संकल्पना म्हणजे धर्म नव्हे. उलट असे करु पाहणे म्हणजेच मानवी समाजाला एखाद्या संकल्पनेच्या गुलामीत लोटणे होय.

१३. सत्याची अशी कोणतीही चिरकालीक व्याख्या नाही म्हणुन सत्य म्हणजे धर्म नव्हे.

१४. व्यक्तिगत धर्म आणि सामाजिक धर्म यांत कधी सुसंगतता असू शकत नाही म्हणुन व्यक्तिसापेक्ष धर्म आणि समाजसापेक्ष धर्म हे अनेकदा परस्परविरोधी असतात आणि मग नेमका कोनाचा धर्म खरा हे ठरवायचे नेमके नैतीक साधन कोणते?

१५. नैतिकतेचे नेमके आधारस्तंभ तरी काय?

१६. मग धर्म म्हनजे तरी नेमके काय?

१७. म्हणुन पुन्हा सांगतो कि धर्म म्हणजे एकंदरीत मानवी समुदायाने स्वत:च्या ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक भुकेला भागवण्यासाठी शोधलेला मार्ग होय. म्हणुन धर्म कालसापेक्ष परिवर्तनाला मोकळा असतो. मानवी जीवनाचे बाह्य व अंतर्गत रुप सामावून घेत दशदिशांगत असूनही विकसनतेचा एकनियम एकदिशेतेने नेणारी व्यवस्था म्हणजे धर्म होय.

१८. जो बदलतो तो धर्म. धर्म प्रवाहासारखा असतो. श्रद्धा बदलत जातात. दैवते बदलत जातात. मानवी आशा-आकांक्षा बदलत जातात. नायक-खलनायकांच्या व्याख्या बदलत जातात. जुनी दैवते पुन्हा डोक्यावर नेली जातात...वा पायतळी तुडवली जातात. दैवतांची नांवे बदलतात...पण मुळे रुपे बदलत नाहीत कारण दैवते म्हणजे मानवी मनाची आविष्करणेच! माणुस कधी स्वत:लाच डोक्यावर घेतो आणि तसाच कधी स्वत:लाच पायतळी तुडवतो...तसेच हे!

१९. धर्म म्हणजे जीवन धारा. माणसाला मानवी कवेत घेवू शकेल एवढीच रुंद...माणुसच मानसाचा गळा घोटनार नाही एवढे स्वातंत्र्य मिळु न देण्याइतपतच निरुंद...आणि जमल्यास आभाळ-चांदणे आपल्याच भग्न छाताडावर मिरवत मानव्याचा उद्घोष करत अवनतीच्या द-यांत मुक्तपणे कोसळायलाही तयार...अशी धारा म्हणजे धर्म.

२०. पण आमचा धर्म भयमुक्तीसाठी आहे म्हणुन आम्ही कधीही भयमुक्त होवु शकत नाही.

२१. आमचा धर्म जीवन्मुक्तीसाठी आहे म्हणुन आम्ही कधीच मुक्त होवू शकत नाही.

२२. आम्ही कशाचसाठी म्हणुन नसत जेंव्हा सर्वासाठी असतो तेंव्हाच आम्ही धर्मात असतो...


२३. यालाच धर्म म्हनतात.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...