"परिवर्तनाचा वाटसरु" या नियतकालिकातील "गोपुविरचित "सत्यशोधक": ऐसा जोती होणे नाही!" ही विजय कुंजीर लिखित प्रदिर्घ मुखपृष्ठ कथा वाचली. हा "लेख" नसून एक पुर्वग्रहदुषित मनाने लिहिलेली "दीर्घकथा"च आहे हेही लक्षात आले. असे असले तरी या कथेतून चुकीचा संदेश जात असल्याने तिचे परिक्षण करणेही तेवढेच गरजेचे आहे. कुंजीरांचे एकुणातच संपुर्ण "सत्यशोधक" हे नाटक (छापिल आणि रंगसंहिता) आणि या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे व त्यांची सावित्रीबाईंची प्रमुख भुमिका साकारणारी कन्या पर्ण पेठे यांच्यावर मुख्य आक्षेप असून अन्य कलावंत (जवळपास ५०) सफाई कर्मचारी असून त्यांना मुख्य भुमिका का दिल्या नाहीत यावरही आक्षेप आहे. खरे तर अतुल पेठे यांनी स्वत: दिग्दर्शन न करता ते एखाद्या बहुजनीय दिग्दर्शकाला का दिले नाही असाही आरोप त्यांना करता आला असता, तो बहुदा त्यांच्याकडुन सुटलेला दिसतो.
सत्यशोधक हे नाटक मी पाहिले आहे. कुंजीर दावे करतात त्याप्रमाणे हे नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांची महत्ता त्यांच्या तोंडुन वदवण्यासाठीचा खटाटोप म्हणजे हे नाटक आहे हे धादांत असत्य आहे. पण हे नातक म्हणजे ब्राह्मणी कावा आहे, हे नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांचे असून व पर्यायाने ब्राह्मणी वर्चस्ववाद निर्माण करण्याची ही चाल आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला झाल्यानंतर मराठा जातीवादाचा निषेध करण्यासाठी हे नाटक आले असाही कुंजीरांचा तर्क आहे. गोपुंच्या फुलेंना फुलेवाड्यासमोरील चार पेठा दिसल्या परंतु मिशनरी शाळेत त्यांच्यावर झालेले ख्रिस्ती संस्कार कसे दिसले नाहीत? फुले अकराव्या वर्षी स्वत:ला हिंदु कसे म्हणवुन घेवू शकतात असे प्रश्नही कुंजीर उपस्थित करतात व "हिंदु" हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक आहे असेही सुचवतात. कथा प्रदिर्घ असली तरी कुंजीर याच्या एकुणातील मतांचा सारांश त्यांच्याच शब्दांत द्यायचा तर "कोणत्याही अन्वयार्थांनी, चिकित्सेने नाटक न पाहता, नाटक म्हणुन नाटक पाहिले तर काय दिसते, तर फुल्यांनी लोकहितवादी ते टिळकांपर्यंतच्या सर्व पुणेरी बामणांची केलेली प्रशंसा." सत्यशोधक नाटक फुले हे ब्राह्मणांना किती जवळचे होते...नव्हे ते बामनांमुळेच घडले असे ठसवण्यासाठी आहे असाही कुंजीरांचा तर्क आहे. अशा प्रकारे कुंजीरांनी मार्क्सवाद ते गो.पु. देशपांडेंच्या जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटीतील अध्ययन-अध्यापनाला वेठीला धरत हे नाटक म्हणजे खरे फुले मांडणारे नाही तर ते फुलेंचे बामणीकरण करण्याचे षड्यंत्र आहे असा कुंजीरांचा तर्क दिसतो. फुले-सावित्रीबाईच्या तोंडी दिलेल्या बामणी भाषेबाबतही कुंजीर यांना आक्षेप असून त्याबाबतही प्रदिर्घ खल त्यांनी केला आहे. गोपुंचे नाटक म्हणजे ब्राह्मणांध वासनेचा नग्न आविष्कार आहे असा शेराही ते मारायला विसरत नाहीत. असो. कुंजीरांनी अजुनही बरेच तारे तोडलेले आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे नाटक कशाशी खातात हे कुंजीरांना माहित आहे काय? हा प्रश्न मी विचारतो कारण माझी स्वत:ची मराठी ७ व इंग्रजी दोन नाटके प्रसिद्ध आहेत. मी स्वत: तीन चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे मला या विषयाचे बेसिक तरी ज्ञान आहे. एकोणिसाव्या शतकातील बोली काय अथवा लिखित काय, भाषा आजच्या एकातरी प्रेक्षकाला समजली असती काय? खुद्द शेक्सपियरची मुळ नाटके आताच्या भाषेत सादर केली जातात. लिखित संहिता आणि रंगसंहिता यात नेहमीच फरक असतो. "सत्यशोधक" हे नाटक आहे, फुलेंचे चरित्र नव्हे याचे भान कुंजीरांना दिसत नाही. नाट्य सादरीकरणावर अपरिहार्यपणे येणारी वेळेची व रंगमंचीय अवकाशाची मर्यादाही कुंजीरांना समजत नाही. हे नाटक एका बामणाने लिहिले व बामणाने दिग्दर्शित केले...त्यांची कन्या सावित्रीबाईंच्या भुमिकेत असावी याचाच जर पोटशुळ उठला तर नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा असा विषांध होणारच. एक नाटक म्हणुन सर्वांगाने ते उत्कृष्ठ आहे याबाबत सर्वच रंगकर्मी सहमत आहेत...पण त्याबाबत एक अवाक्षरही कुंजीरांनी काढु नये याचे नवल वाटते.
प्रत्येक नाटककार आपला नायक व नायिका आणि कथावस्तु निवडतो तेंव्हा तो त्याच्या व्यक्तिगत प्रतिभेचा व तिच्या आविष्काराचा प्रश्न असतो. दिग्दर्शकही रंग-संहिता बनवतो तेंव्हा तोही मुळ संहितेत सादरीकरणाच्या दृष्टीने त्यात बदल करत असतो. एक सलग आशय पोहोचवण्याचे कार्य अभिनेत्यांमार्फत तो करत असतो. नाटक म्हनजे रुक्ष परिसंवाद नव्हे. शेवटी ती कला आहे. आजवर म. गांधींवरील वगळता सर्वच चरित्र चित्रपट साफ कोसळले कारण दोन-तिन तासाच्या चित्रपटांत सारे काही आलेच पाहिजे हा बाष्कळ खटाटोप. कुंजीरांनी या नाटकातील एकही प्रसंग खोटा आहे असे पुराव्यासह विधान केलेले नाही, मात्र त्या प्रसंगांतुन अकारण बामण माहात्म्य फुलेंच्या तोंडुन वदवले आहे हा त्यांचा खरा आक्षेप दिसतो. फुलेंचे पात्र अत्यंत पांचट..पोकळ आहे असे त्यांचे निरिक्षण आहे. असे असेल तर कुंजीरांनी स्वत:च नाटक लिहावे व त्यांना हवेत तसे फुले सादर करावेत. व्यक्तिगत मत म्हणजे सत्य नसते हे या "सत्यशोधका"ला समजलेले दिसत नाही.
एकीकडे गोपुंनी या नाटकात बामणांवर यथेच्छ टीका केली आहे असेही ते म्हणतात, पण त्यांना ती गोपुंची बचावात्मक चाल वाटते हा तर एक मोठा विनोदच आहे. म्हणजे टीका केली तर तो लेखकाचा नाईलाज...पण एकुणात बामणमाहात्म्य म्हणजे "सत्यशोधक" नाटक. हिंदु हे धर्मासाठी सरसकट नांव अस्तित्वात आले त्याला आता हजार बाराशे वर्ष होवून गेलीत हे कुंजीरांना माहित नसावे. वयाच्या अकराव्या वर्षी फुले लग्नाच्या वरातीतुन बाहेर काढल्यावर "ते हिंदु आपणही हिंदु..." असे विधान फुले करतीलच कसे हा कुंजीरांचा प्रश्नच मुळात अज्ञानमुलक आहे. हिंदु हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक नाही. फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला...सत्यशोधक धर्म नाही हेही कुंजीर विसरलेले दिसतात. महात्मा फुलेंची बंडखोरीची झेप कुंजीरांच्या आवाक्यात आलेली दिसत नाही.
महात्मा फुलेंनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडुन हल्ले चढवले. परंतु ब्राह्मणांचा द्वेष केल्याचे उदाहरण वा तसे विद्वेषमुलक लेखन तरी कुंजीरांनी उद्गृत करायला हवे होते, पण ते तसे त्यांनी केलेले नाही कारण त्यांना "कुंजीरांचे फुले" रंगवायचे आहेत. आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हनवुन भांडारकरांची स्वाक्षरी घेनारे, छ. शिवाजी महाराजांवरील पवाड्यात सुधारणा सुचवल्या म्हणुन त्यांचे आभार मानणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे होते हा जावईशोध लावत त्यांचा उग्र अवतार या नाटकात दिसत नाही...म्हणजे बामनांना पुरेशा शिव्या दिल्या नाहीत याबाबत कुंजीरांना संताप आलेला दिसतो.
म. फुले हे शेवटी हाडामांसाचे माणुस होते. त्यांनाही व्यथा-वेदना होत्या. नाटकात प्रसंग कसे लिहावे लागतात व कसे सादर करावे लागतात हे कुंजीरांना माहितच नसल्याने सावित्रीबाईंवर सनातन्यांनी शेणगोळे फेकल्यानंतर फुलेंचे बामण मित्र त्यांच्या घरात येवून निषेध करतो असे सांगतात...कुंजीरांच्या मते हा प्रसंग अन्यत्र घडवायला हवा होता...त्याला जाहीर निषेधसभेचे रुप द्यायला हवे होते असे सुचवत आपले नाट्यविषयकचे अज्ञान दर्शवतात.
एवढेच नव्हे दक्षीणा प्राइझ कमिटीने मराठी भाषेला पारितोषिक द्यायला हवे असे फुले सुचवतात, याबाबत तर कुंजीरांनी अकारण गदारोळ केला आहे. म्हणजे फुलेंनी असे सुचवलेच नव्हते असे कुंजीरांना म्हणायचे आहे काय... तर तसेही नाही. पुढे फुलेंच्या तोंडी कालीदास ते शुद्रक या नाटककारांची नांवे यतात...म्हणजे फुले मिशन शाळेत न शिकता महामहोपध्यायांच्या अबक पाठशालेत शिकले कि काय असा प्रेक्षकांचा समज होवू शकतो...असे एक वावदुक विधानही ते करतात. याचा अर्थ कुंजीरांचा फुलेंच्या ज्ञानावरच आक्षेप आहे. फुलेंना हे कवी माहितच नव्हते व एका इंग्रजी लेखकाने सांगेपर्यंत संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती हे फुलेंना माहित असण्याचे कारणच नाही असा कुंजीरांचा तर्क खरे तर फुलेंचा अवमान करणारा आहे. अजुन म्हणजे फुलेंच्या तोंडी फक्त संस्कृत नाटककारच का? फारसी हीही एके काळी राजभाषा होती...मग त्या भाषेतील एखाद्या लेखकाचा उल्लेख का नको...असे लिहितांना कुंजीरांनी कोणते फारसी महान लेखक तोवर झाले होते व लोकप्रिय होते हे सांगण्याचेही कष्ट घेतले असते तर बरे झाले असते.
हीच बाब बळी-वामनाची. म. फुलेंनी बळीची संकल्पना आपल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात बंड करतांना वापरली. भारताचा इतिहास हा वर्ण-जाती संघर्षाचा इतिहास आहे असे फुले नाटकात म्हणतात. "भारताला इतिहासच नाही" अशी हेगेलची साक्ष काढत कुंजीर म्हणतात कि एकोणिसाव्या शतकातील फुल्यांच्या तोंडी दिलेले संवाद विसाव्या शतकातील सिद्धांतांनी जर माखलेले असतील तर ते खरे फुले नाहीत. येथे कुंजीरांचा भयंकर गोंधळ उडालेला आहे. कुंजीरांना एवढे तरी समजायला हवे कि वर्तमानात नाटक आणत असता...लेखक वर्तमानात जगत असतां चरित्र नायकाचे काही विचार आधुनिकतेशी नाळ जोडनारे वाटले तर त्याचे प्रतिबिंब लेखनात उमटत असते. असे छ. शिवाजी महाराज ते अन्यही ऐतिहासिक पुरुषांवरील कलाकृतींमद्धे आपण पाहतो. आपण नाटकाचे समिक्षण करत आहोत कि नाटकात ऐतिहसिक चरित्रांत असते तशी वस्तुनिष्ठता शोधत आहोत याचे भान कुंजीरांनी बामण्द्वेषाच्या विखारात गमावले आहे. त्यांनी बामणी साहित्य व नाटकांवर ज्या भाषेत टीका केली आहे ती कोणत्याही विचारवंताला शोभणारी नाही.
प्रस्तूत लेख (त्याचे पुस्तकही होणार आहे ही माहिती शेवटी टिपेत दिली आहेच.) म्हणजे जड भाषेत लिहिलेला उथळ लेख होय. मार्क्स, हेगेल, फृइडची नांवे टाकली म्हणजे विद्वान होता येत नसते. त्यापेक्षा "या नाटकात असत्य घटनांची रेलचेल आहे" असे विधान पुराव्यांनिशी पटवले असते तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. पण तसे केले तर उघडे नाही पडणार?