एका विलक्षण प्रभावशाली अभिनय युगाचा अस्त झाला. राजेश खन्ना माझा लाडका अभिनेता. अमिताभ युग अवतरले व राजेश खन्ना मागे पडला पण मला अमिताभ मला कधीच भावला नाही. राजेश युगातील उत्कृश्ठ कथा...तसेच जबरदस्त संगीत व त्यातील वैविध्ये...अमिताभ युगाबरोबरच अस्तंगत पावली. राजेश खन्नामद्धे कोणी आपला आदर्श, भाऊ, मुलगा तर कोणी प्रियकर-पती पाहिला. त्याचे चित्रपट म्हणजे अभिनयाची, जबरदस्त श्रवणीय गीतांची व वैविध्यपुर्ण कथांची रेलचेल असायचे. आराधना, बावर्ची, आनंद, अवतार, सौतन, कटी पतंग, नमक हराम, अजनबी, थोडीसी बेवफाई अशा काही चित्रपटांकडे नजर टाकली तरी वैविध्यपुर्ण कथांत वैविध्यपुर्ण असे जे नायक राजेश खन्नाने जीवंत केले ते पाहुन नवल वाटते. असे नशीब अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेच नाही. त्यामुळे माझ्यावर राजेश खन्नाचा जेवढा प्रभाव आजतागायत राहिला तेवढा अन्य कोणत्याही अभिनेत्याचा नाही.
कधी नव्हे तो आज बाहेर पाऊस पडतो आहे. माझ्या डोळ्यांतुनही अश्रु झरत आहेत.
राजेशने साकारलेले प्रसंग आणि त्याची आनंददायी ती अत्यंत हळवी गीते चहुकडुन उमदळुन येत आहेत.
अधिक लिहु शकत नाही.
राजेश खन्नांना विनम्र श्रद्धांजली.