मला असा प्रश्न अनेकदा विचारला जातो कि पोटा-पाण्यासाठीच्या धडपडी सोडुन जेथे अंगावर चिखलच उडणार अशा क्षेत्रात कशाला पडताय? आपल्या कादंब-या लिहित लोकांचे मनोरंजन करत होता ते तरी बरे होते. हे विचारांचे काही खरे नाही. एक तर त्याची कोणालाही गरज नाही. त्यासाठी कोणाला वेळही नाही. हा...भजन-किर्तन करणार असाल तर गोष्ट वेगळी...बहुजनांकडे त्यासाठी वेळच वेळ आहे. इहलोकीची आणि परलोकीची चिंता काही क्षण तरी मिटते कि नाही? मग कशाला पाहिजेत या डोकेदुख्या आणि लष्कराच्या भाक-या भाजण्याचा उद्योग?
वरकरणी या युक्तिवादात काही वावगे वाटणार नाही. तसेही हजारो-लाखो वर्ष आम्ही विचारबुद्धी बासणात गुंडाळुन ठेवुन जगलोच आहोत कि! कोणी माड्या उभारल्या तर कोणी वैभवशाली सत्ता. कोणी "ठेविले अनंते तैसेची रहावे" म्हणत आजीवन गुलाम राहिले तर कोणी सरळ संन्यास घेत राना-वनात निघुनही गेले. वैचारिकतेच्या अभावात कोणाचे अडले? तुम्ही जागेत चाला कि झोपेत... असे काय आणि तसे काय....चालणे काय कोणाच्या नशीबीचे चुकले आहे थोडेच?
हरकत नाही. पण हा लष्करच्या भाक-या भाजण्यापुरता विषय मर्यादित नाही कि "ठेवीले अनंते" टाईप जगायचाही उद्योग नाही. साधी गोष्ट आहे, समजा ज्या घरात आपण रहातो त्या घरात समजा सर्वत्र विखारी पालींच्या झुंडी आहेत. सर्वत्र अविचारांचा कचरा पसरलेला आहे. जहरी सर्पांनी द्वेषाचे फुत्कार सोडण्याचा अहोरात्र चंग बांधला आहे. सर्वांनी सर्वांना खाण्याचा चंग बांधलेला आहे. एक तुमुळ जहरी युद्ध तुम्ही राहता त्या जागेत अविरत सुरु आहे. आता असे म्हणता येईल का कि या सर्व गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करत राहता येत नाही का?
येता येईल कि. दुर्लक्ष केले कि झाले. तसेही आपण करतोच कि! सापांच्या डसण्याचीही सवय होतेच कि...कधी कधी एवढी कि आपण डसले जात आहोत हेच मुळात समजुन येत नाही. त्यांचे जहर आपल्याला हळु हळु ठार मारतेय हेही समजुन येत नाही. आपण आपल्या आजारांची कारणे कोठेतरी अन्यत्र शोधुन मनाचे समाधान करुन घेतोच कि!
पण याला जगणे म्हणत नसतात. ज्या घरात आपण रहातो ते किमान स्वच्छ असावे असे आपल्याला वाटत नसते असे नाही. फक्त आपण ते स्वच्छ करु इच्छितो कि नाही एवढाच प्रश्न असतो. त्यात घाण म्हणजे काय घाण आहे आणि कशाला दूर रेटायला हवे हेच समजले नाही तर? अनेकांच्या बाबतीत असेही होते हे खरेच आहे. सरडे-पाली-सापांनाच आपली दैवते मानत तसेच जहरी फुत्कार सोडणारे महन्मंगल मानवतावादी किरणांना घरात प्रवेशण्यापासुन रोखु पाहणारे काय कमी "स्वच्छतावादी" असतात काय? म्हणजे एकार्थाने स्वच्छतेच्या कल्पनाही व्यक्तिपरत्वे बदलु शकतात. हेही घर स्वच्छ करु शकत नाहीत. उलट मुळच्या अस्वच्छतेला अधिक कोंदट, कुबट आणि म्हणुणच अधिकच घाणेरडे बनवत असतात.
आज आपले जग असेच बनले आहे. ज्याला आम्ही संस्कृती म्हनतो आणि जिचा अभिमान बाळगतो ती अशी घाणीची कचराकुंडी झालेली आहे. पाणीसुद्धा प्रदिर्घकाळ साठले कि तेही वास मारु लागते. आमची संस्कृती अशीच वास मारते आहे. आणि तरीही तिचा नको असा दुराभिमान आहे. आम्हाला सफाई नको आहे कारंण आम्ही या घाणीला सरावलेलो आहोत...एवढे कि ही सारी काही घाण आहे याची जाणीवच उरलेली नाही. ज्यांना होते ते या घाणीतीलच काही घाणीला आराध्य बनवत दुस-या घाणीवर तुटुन पडताहेत. कारण स्वच्छता म्हणजे नेमके काय हे घाणीत राहण्याच्या चिरकाळ सवयीमुळे विसरुन गेलेले आहेत.
स्वच्छतेचा अर्थ कळतच नाही असे लोक नसतातच असे नाही. पण मग या घाणीचा आवाका लक्षात येताच तेही हबकुन जातात. स्वाभाविक आहे, आत घाण...बाहेर घाण...आभाळ घाण...भुमी गलिच्छ...असे दिसले कि दुसरे काय होणार? एक घाण दुर करायला गेले रे गेले कि दुस-या घाणी अंगावर येणारच. ज्याला स्वच्छ करायचे आहे त्यालाच गलिच्छ करणारच.
हा लढा तसा सोपा नाही. जो घाणीत आहे त्याला घाणीची जाणीव करुन दिली तरच काही तरी शक्य आहे. घाणीत लोळण्याची सुक्कर-आनंदी सवय त्याशिवाय कशी बदलु शकु आपण?
होय...आज आम्ही अत्यंत घाणीने भरलेल्या जगात जगतो आहोत. आत घाण बाहेर घाण. त्यातुनच जन्माला येणरे विखार...राग-लोभ...काहीही निरामय नाही. पवित्र नाही. महन्मंगल नाही.
पोटपाणी तर आहेच. असतेच आणि राहणार आहे. पण मग या घाणीतल्या किड्यांप्रमाणे पोट भरत अंधाराला चघलत उजेदाची वांझ स्वप्ने पहायची कि एकदाचे हे सारे काही सर्वांनी मिळुन साफ करत उद्याचा सुर्य आपल्या ओंजळीत घ्यायची आस बाळगायची हा आपला प्रश्न आहे.
आणि माझ्यापुरता तरी तो सुटलेला आहे...