Saturday, July 28, 2012

महाराणी अहल्याबाई व धनगरांची बदनामी...



फ़ेसबुकवरील "मानव भोसले" आणि "मराठा रियासत" या अकाउंटसवर मानव भोसलेने महाराणी अहल्याबाई होळकर , धनगर समाज आणि महादेव जानकर यांची अश्लाघ्य, अश्लील अशा भाषेत बदनामी केली आहे. या विकृतांविरुद्ध सुजाण समाज जी कारवाई करायची ती करेलच. ती केली जायलाच हवी, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

रायगडावरील वाघ्या प्रकरणात सलग दोन वर्ष नाकावर आदळलेले, मस्ती आणि गुर्मीची सवय असलेले, आम्ही सांगतो तोच इतिहास अशा भ्रमात राहणारे या पराभवाने आपले मन:स्वास्थ्य बिघडवून बसलेले आहेत. वाघ्याच्या घटनेतुन योग्य बोध न घेता, आत्मचिंतन करत न्याय्य वाटेने न चालता या ब्रिगेडी मंडळीने पुन्हा आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवण्याचा व समाजात संतापाचा उद्रेक उठवण्याच चंग बांधला आहे, हे उघड दिसते. या मंडळीला धनगरच नव्हे तर अप्रत्यक्षरित्या सुजाण मराठा बांधवांनाही बदनाम करायचे आहे. महाराणी अहल्याबाईंची महत्ता जगभर मान्य केली गेली आहे. त्यांच्याएवढ्या महन्मंगल, शूर, दानशूर आणि त्याच वेळीस प्रजाहितदक्ष अशी उत्कृष्ठ महिला प्रशासक जगात झाली नाही असा होळ्करांचा शतृ असलेल्या सर जोन माल्कमचाही निर्वाळा आहे. अशा पूज्य महाराणीवर जे अश्लाघ्य भाषेत राळ उठवू शकतात त्यांची जागा कोठे आहे हे मी सांगण्याची गरज नाही.

एकीकडे सर्व समाजात ऐक्य प्रस्थापित व्हावे असे प्रयत्न सुजाण लोक करत असतांना, त्यात थोडेफार का होईना यश मिळत आहे याची चाहुल लागत असतांना त्यात अदथळा आणत समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा चंग या मंडळीने बांधलेला आहे. धनगर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा व सोशीक समाजघटक आहे. मराठा वर्चस्ववादाने विकृत झालेले मराठा पोरे आणि मुली याबद्दल अत्यंत घाणेरडे लिहित धनगर हेच "कुत्रे" आहेत असे "मराठा रियासत" या अकांउंटवर मानव भोसले लिहितो. त्याला धडाधड लाइक्स पडतात ही अजुन एक विकृती. यांचे बोलवते धनी त्यांच्या पाठीशी असल्याखेरीज अशी हिम्मत यांची होणार नाही हेही तेवढेच खरे. पण यामुळे एकामागुन एक समाज ते तोडत चालले आहेत, दुखवत चालले आहेत आणि या पापाची फळे कोण भोगणार?

फ़ेसबुकवर ख-या-खोट्या नांवाने कोनालाही बदनाम केले जाते. पण याचा अर्थ पोलीस त्यांना शोधु शकणार नाही असा त्यांचा भ्रम असतो. आम्ही महापुरुषांच्या बदनामेविरुद्ध कायम स्वरुपी  एक विधेयक पारित करुन घेण्याच्या प्रयत्नांत आहोत. ते पारित होईल तेंव्हा होईल, पण समाजात जोवर असे विकृत आहेत तोवर ख-या अर्थाने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. ब्रिगेडने आपली उरली सुरली लाज वेशीवर टांगण्याचा चंग बांधुन छ. संभाजी महाराजांनाही बदनाम केले आहेच. वाघ्याला हटवता येणे यांना कालत्रयी शक्य नाही या नैराश्यातुन अशा विकृत्या उसळुन येणार असतील तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

माझी सर्व सुजाण बांधवांना नम्र विनंती कि कोणत्याही समाजातील महापुरुष असोत, त्यांची बदनामी करु पाहणा-यांना धडा शिकवा. त्यांचा जमेल त्या मार्गाने निषेध करा. नाहीतर आपला समाज सर्वैक्याची स्वप्ने कधीच साकार करु शकनार नाही.

हा साराच प्रकार उद्विग्न, खिन्न आणि हताश करणारा आहे. मी या मनोविकृतांचा निषेध करतो.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...