Saturday, August 4, 2012

असला शिवरायांचा अपमान....कोणी केला नसेल!


आज दै. पुण्यनगरीने वाघ्या पुतळ्याला हटवण्याबाबत संभाजी ब्रिगेडची भुमिका आपल्या अग्रलेखातुन उचलुन धरली आहे तर ब्रिगेडच्या एका पदाधिका-याने आपल्या ब्लोगवर ( http://bhaiyapatil.blogspot.in/) "किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ??" या शिर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरं आधी तिरक्या अक्षरांत त्यांचा जसाचा तसा मुद्दा आणि खाली माझे उत्तर देत आहे. यामुळे तरी किमान जनतेत अकारण जो भ्रम पसरवला जात आहे तो दुर व्हायला मदर होईल.


"१.शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला वाघ्या कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता.त्याचा कोणताच उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनात नाही.असे शिल्प बसवण्यामागे व होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराज यांची बदनामी एवढाच कट होता."

---हे महोदय येथे हे विसरतात कि मग सईबाई, सोयराबाई वा पुतळाबाईच्या स्मारकाचा/समाधीचाही उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनांत नाही. But this is a solid proof of existance of Vaghya in Shivaji Maharaj' life...http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html

२. शिवकालीन समकालीन साधने, बखरी,मोघल,इंग्रज,प्रोतुगीज, इत्यादी दस्तावेजामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही..

---या साधनांत वर उत्तर दिल्याप्रमाणेच वाघ्याच्या स्मारकाच्या जागी कोणीही शिवघराण्यातील व्यक्तीचे स्मारक/समाधी असल्याचे उल्लेख नाहीत.

३. हि दंतकथा ,पहिल्यांदा ची.ग.गोगटे यांच्या १९०५ साली प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले"या पुस्तकात आहे.

------आपण चिं. ग. गोगटेंना ही दंतकथा लिहित असतांना स्वप्न पदले होते असे म्हणत आहात काय? रायगड व परिसरात ही दंतकथा त्याहीपुर्वी अस्तित्वात होतीच. गोगटेंनी ती ऐकली व आपल्या पुस्तकात नमूद केली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. दंतकथा आपोआप बनत नसतात. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार भेट दिली ही झाली दंतकथा...पण तलवार अस्तित्वात होती हे कसे नाकारता? शिवाय गोटियेने बांधलेल्या शिवमंदिरात हीच भवानी तलवारीची दंतकथा शिल्परुपात साकारलेली आहे. ती तुम्हाला चालते. वाघ्या मात्र निव्वळ दंतकथा हे तुम्हाला ठरवायचा अधिकार कोणी दिला? भवानी देवीने तलवार दिली ही दंतकथा पण तलवार होती हे वास्तव..तसेच वाघ्याने चितेत उडी घेतली ही दंतकथा...पण वाघ्या अस्तित्वात होता हे वास्तव हे समजावून घ्यावे लागते.

४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही.

---------याच पुस्तकात सईबाई, सोयराबाई वा पुतळाबाईंच्या स्मारक/समाधीचाही उल्लेख येत नाही...त्याचे काय करायचे?

५.शिवसमाधीचा जीर्णोद्धार १९२६ते १९२७ या कालावधी मध्ये पूर्ण झाल्यानंतर ..त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्या समाधीवर बसविण्यात आला.

-----बरोबर आहे. याचाच अर्थ असा कि रायगड स्मारक समितीच्या लोकांनी तुकोजीराजांची इच्छा पुर्ण केली. शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतरच उर्वरित पैशांत वाघ्याचे स्मारक उभारावे अशी त्यांची इच्छा होती. शिल्पकार करमरकर यांना वाघ्याचा पुतळा बनवायला वेळ लागला याचे कारण म्हणजे वाघ्या हा मुळचा मुघोळ ब्रीडचा हाउंड होता. प्रजातीचे साम्य असल्याने करमरकरांनी तसाच दिसणा-या कुत्र्याला  एका गृहस्थांकडे हुडकले व अनेक रेखाटने करुन शेवटी जीवंत वाटेल असा वाघ्या साकारला. वाघ्याला बसवण्यात एवढा वेळ का गेला याचे उत्तर यात आहे.  "वाघ्याला उध्वस्त करणे ही शिल्पकाराची हत्या आहे" अशी प्रतिक्रिया मुंबईतील अनेक शिल्पकारांनी दिली.

६. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते .ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावर एका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली...

----------अशी खुळचट विधाने करणे अयोग्य आहे. खुद्द शिवाजी महाराजांनाच ब्राह्मण-ब्रह्मणेतर वादात गोवण्याचा हा प्रयत्न आहे. काल्पनिक कुत्रा उभा करायला त्या काळात वेळ आणि पैसा वाया घालवायला व शिवाजी महाराजांबद्दल अनास्था व्यक्त करण्याची कोणालाही काहीएक गरज पडलेली नव्हती. जर शाहु महाराजांनाच ब्राह्मनांनी शिवस्मारक उभारायला विरोध असता तर तसा त्यांनी नक्कीच तो नोंदवला असता
, नव्हे ते काम बंद पाडुन स्वत: स्मारकाचे काम पुर्ण केले असते. ते तसे झालेले नाही. याचाच अर्थ असा कि शाहू महाराजांचा ब्राह्मणांनी पुढाकार घेउन, प्रसंगी भीक मागुन, शिवस्मारक उभारायला विरोध नव्हता.

शिवाय वाघ्याच्या स्मारकाजागी पुतळाबाईंची...(तुमचेच इतिहासकार कधी तेथे महाराणी सईबाईंची तर कधी सोयराबाईंची समाधी होती असेही सांगत असतात...नेमके एक तरी नांव घ्या कि...इतिहास अंदाजावर चालवायला कोणा एकाची मालमत्ता नाही याचे भान ठेवावे.) समाधी होती (सतीचे वृंदावन असते...समाधी नव्हे हेही यांना माहित नाही हा भाग अलाहिदा) याबाबत एक अत्री पुरावा यांनी आजतागायत दिला आहे काय?

मी मागेच याच ब्लोगवर लिहिले होते कि या स्मारकाचे तिरका छेद पद्धतीने स्मारकाखालील अवशेष बाहेर काढुन खाली नेमके काय आहे हे शोधुन मग निर्णय घेवूयात. पण त्याबाबत यांचा प्रतिसाद शुण्य होता.

७."वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले.
त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला ..

----------या गृहस्थांनी मुलात राजसंन्यास वाचलेलेच नाही. यावरही मी लिहिलेले आहे. ते  माझ्या ब्लोगवर
उपलब्ध आहे. http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_03.html

राहिले संभाजी महाराजांचे, खुद्द केळुस्कर गुरुजींनी लिहिलेल्या आद्य शिवचरित्रातही संभाजी महाराजांबद्दल तेच आक्षेप नोंदवले गेलेले आहेत जे कमल गोखलेंचे साधार चरित्र येईपर्यंत सर्वच कलाकृतींत आलेले आहेत. तत्पुर्वीच्या लेखकांचा द्रुष्टीकोन हा संभाजीराजांना बदनाम करण्याचा होता असे म्हनायचे तर मग केळुस्कर गुरुजींना तोच न्याय लावणार का? गडकरी इतिहासकार नव्हते. ते नाटककार होते. वाघ्याच्या पुतळ्याखालील मजकुरात कोणाचीही कसलीही बदनामी नसून इमानी प्राण्याची स्तुती केलेली आहे.

८. रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे ..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले ..

------ही वरील भाकडकथा नक्कीच तुकोजीराजेंची बदनामी करनारी आहे. ही कथा ज्यानेही कोणी लिहिली ती कोणत्या अंमलाखाली ती त्यांची त्यांना ठावूक...पण मग दोष द्यायचा तो ही भाकडकथा निर्माण करना-याला.

तुकोजीराजांनी ५००० हजार रुपयांची आर्थिक मदत शिवस्मारक व वाघ्याच्या स्मारकासाठी दिली हे वास्तव कसे नाकारता येते? मदत केलीच नाही असे म्हणायचे आहे काय?

९. शिवरायांच्या समाधी शेजारी शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या महाराणी पुतळाबाई यांची समाधी होती त्यावर काल्पनिक नाटकातील कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे त्यामुळे महाराणी पुतळाबाई यांचा अवमान होत आहे तसेच शिवरायांचाही अवमान होत आहे ..त्यामुळे समस्त शिवप्रेमीचां राग अनावर होत आहे ..

------------पुन्हा सतीची स्मारकशिळा वा वृंदावन असते. समाधी नाही. राणी पुतळाबाई निपुत्रिक असल्याने व शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर काही काळाने सती गेल्या. सती गेलेल्या पुतळाबाईंचे स्मारक कोणाच्याही स्मरणातून जाणे असंभाव्य आहे. सतीस्थान हे अंधश्रद्धाळु लोकांना जास्त प्रिय असते हे वेगळे सांगायची गरज नाही. तेथे नुसते स्मारक नव्हे लोकांनी मंदिर उभारले असते. त्यामुळे १८१८ ला ब्रिटिशांनी रायगड तोफांचा भडिमार करून उद्ध्वस्त केला असला तरी जनमानसातुन सतीचे स्मारक गेले नसते. बरे पुतळाबाईंचा अवमान करायला त्या काही सोयराबाईंसारख्या ख्यातसिद्ध व्यक्ति नव्हत्या. सतीस्मारकाचा अवमान ब्राह्मण सोडा एकही बहुजन करु धजला नसता. त्यामुळे महाराणी (येथे सांगणे भाग आहे कि महाराणीचा सन्मान आधी सईबाई आणि नंतर फक्त सोयराबाईंना मिळाला. अन्य शिवपत्नींना फक्त राण्यांचा दर्जा होता.)

१०. स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती,शूरवीर मावळे,स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआऊसाहेब या पैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्या कुत्र्याची समाधी कशी काय ??

- जिजाऊसाहेबांची समाधी पाचाड येथे आहे कारण त्यांचे निधन व त्यांच्यावरील अंत्यसंस्कार तेथेच झाले. आपणच धन्य म्हनायचे कि शहाजीराजांचीही समाधी रायगडावर का नाही असा हे प्रश्न विचारत नाहीत.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिक वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो...

-----सरकार शिवप्रेमीच आहे जसे आम्हीही आहोत. तुमचेच शिवप्रेम तपासुन पहायला हवे.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे  —

---------बहुजन समाजात फुट पाडण्याची काम तुम्हीच केले आहे. पश्चाताप करा...बहुजन उदार आहेत. नक्कीच माफ करतील. ब्राह्मणी गुलामगिरीत ब्रिगेड आहे, बहुजन नाहीत. तेंव्हा उगाच कोणाला मुक्त करण्याची भाषा करु नका. आधी आपण मुक्त व्हा. प्रतीकात्मक आंदोलने तोडफोड करत नसतात हे तुम्हाला कोणी शिकवलेले दिसत नाही.

असो. ही झाली वर त्यांचे स्पष्टीकरण आणि त्यावरची माझी थोडक्यात प्रतिक्रिया. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नांवाखाली धादांत असत्ये कशी रेटुन सांगितली जातात याचा अंदाज वाचकांना यावा अशी अपेक्षा आहे.

आता वाचकांने कृपया १८८३ साली प्रसिद्ध झालेल्या कोलाबा ग्यझेटीयरला http://raigad.nic.in/DG/1883/appendix_r.html#1 या लिंकवर भेट द्या. यात रायगडाची व त्यावरील बांधकामांची इंग्रजांना उपलब्ध असलेली सर्व माहिती बारकाईने दिली आहे. अगदी सोयराबाईंचा मृत्यु हा आत्महत्येने कसा झाला ते शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्युबाबतही माहिती आहे.

यात कोठेही शिवाजी महाराजांच्या एकाही पत्नीच्या समाधीबाबत उल्लेख नाही. त्यांचाच नाही तर मग बिचा-या एका इमानी कुत्र्याचा कसा असनार? केवळ कोणत्याही ऐतिहासिक लिखित पुराव्याअभावी वाघ्याचे अस्तित्व नाकारायचे तर मग अन्य कोनाच्याही स्मारकाचे कोणते लिखित वा भौतिक पुरावे आहेत?

हे उत्तर देण्याची जबाबदारी कसलेही पुरावे न देता तोडफोड करणा-यांची आहे. उगा शिवप्रेमाचे गळे काढुन कोणी शिवप्रेमी होत नसते.

दुसरे, तसे अवांतर वाटेल, पण महत्वाचे असे, भारतीय घटनेनुसार १९४७ पुर्वीच्या प्रत्येक स्मारकाला घटनात्मक संरक्षण आहे. घटनाकार बाबासाहेबांबद्दल हे लोक खुप जवळीक दाखवायचा प्रयत्न करतात. वाघ्याचे स्मारक हे मुळात १९४७ पुर्वीचे असल्याने त्याला धक्का पोहोचवणे म्हनजेच या सार्वभौम राष्ट्राच्या बाबासाहेबांनी नेतृत्व करत लिहुन घेतलेल्या घटनेचा अवमान...एवतेव बाबासाहेबांचाच अपमान आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. हे काय...सोयीने सर्वांनाच वापरतात आणि भावनिक गळे काढत आपला डाव साधुन घेतात. त्याला कोणी बळी पडु नये.

यांचा तसा आग्रहच असेल तर खालील दोन गोष्टी कराव्यात...

१. वाघ्याच्या स्मारकाखाली छेद-उत्खनन करावे व तेथे मिळणा-या अवशेषांची डीएनए टेस्त करुन घ्यावी व निकाल लावावा. मग जोही काही पुरातत्वीय नि:ष्कर्ष निघेल तो सारे मान्य करतील.

२. ब्राह्मणांनी शिवस्मारक ते वाघ्याचे स्मारक बनवले हाच जर आक्षेप असेल तर शिवस्मारकाची ब्राह्मणांनी बांधलेली मेघडंबरीही हटवावी व त्यांना हवे तसे स्मारक बनवावे. खरी सुरुवात येथुनच होवु शकते.

म्हणजे ब्राह्मणांनी विकृतपणे बांधलेल्या वाघ्याला विरोध आणि मग त्याच, यांच्या मते विकृत असलेल्या, ब्राह्मणांनी पुढाकार घेवून बांधलेल्या शिवस्मारकाला मात्र वेगळा न्याय कसा लावता येईल?

काहीएक संयुक्तिक कारण नसतांना बालिशपणे फालतु उथळ मुद्दे उपस्थित करायचे, सा-या समाजाला वेठीला धरत विद्वेश पसरवायचा आणि वर "आम्ही शिवप्रेमी" असे उद्धटपणे म्हणायचे, असला शिवरायांचा अपमान आजतागायत कोणत्याही धडावर ज्याचे डोके आहे अशा लोकांनी केला नसेल.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...