मी या सर्व घटनांकडे तटस्थपणे पहात असता एक लक्षात येते कि हे जेही काही चालले आहे ते एक विरेचन आहे. कोणाच्या विकृती उफाळुन वर येत आहेत तर काही अत्यंत हिंस्त्र होत जंगलचा कायदा सर्वोपरी मानत एकमेकांवर तुटुन पडत आहेत. विवेक सुटला आहे. किंबहुना विवेकाचाच कडेलोट झाला आहे. हा महाराष्ट्र असा नव्हता. असा असुही नये. ज्यांना राज्य घदवता येत नाही ते राष्ट्र काय घडवणार? ज्यांची भाषा गलिच्छ आहे त्यांनी आता माय मराठी हा शब्दही वापरु नये. प्रा. नरके माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अहोरात्र काम करतात आणि काही लोक याच मायमराठीवर गलिच्छ बलात्कार करतात. या महाराष्ट्राची हीच लायकी आहे कि काय? प्रा. नरके साहेबांना माझी विनंती आहे कि अभिजात मराठीची हीसुद्धा अभिनव रुपे आपल्या संशोधनात आवर्जुन नमुद करावीत.
काही लोक शिवाजी आपल्याच बापाची मालमत्ता आहे या भ्रमात आहेत. जणु काही शिवाजी महाराजांचा अपमान काय आणि काय नाही हे ठरवायचा ठेका यांनीच घेतलेला आहे. महाराजांच्या जीवनात काय होते आणि काय नव्हते जणु याची स्वप्ने यांना पडत आहेत आणि ते म्हणतील तोच महाराजांचा इतिहास आहे. मी स्पष्टपणे सांगतो शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान जेवढा ब्रिगेडने केला असेल तसा करायचे धैर्य अगदी औरंगजेबानेही दाखवले नसेल. जय जिजाउ म्हणण्याचा तर यांने कधीच अधिकार गमावला आहे....ब्राह्मण स्त्रीयांबद्दल हीणकस भाषा वापरुन. मराठा रियासत या अकाउंटवर धनगर तरुणीबाबत थर्ड ग्रेड भाषा वापरुन. हा काही शिवरायांचा महाराष्ट्र धर्म नव्हता. ही काही केल्या जिजाउंची प्रवृत्ती नव्हती. शिवाजी आणि जिजाऊ फक्त आमच्याच असा आव आणत जे कारस्थान चाललेले आहे तर मग जेंव्हा मधुकर रामटेके "तुमचा शिवाजी" असा शब्द वापरत असतील तर त्याचा दोष या ब्रिगेडी कृतघ्नांकडे जातो. शिवाजी महाराजांना हायज्यक करण्याचे पाप तुम्ही जातीयवादी होत करत असाल तर मग आम्ही पामरांनी "आमचा शिवराय" कसे म्हणायचे? दादोजी प्रकरणी जेवढे पुरावे मी दिले तेवढे तुमच्या स्वयंघोषित इतिहासकारांकडे नव्हते, अगदी मेहंदळेंसारख्या इतिहासकाराबरोबर म.टा.त प्रतिवाद केला तेंव्हा तुम्ही कोठे गेला होता? गोतियेने शिवमंदिर बांधले, मी एक नाही तीन लेख लिहुन याला विरोध केला...पण तुमचेच नेते उद्घाटनाला गेले...तेंव्हा तुमचा शिवबा तुम्हीच कोठे छपवून ठेवला होता? तुमचा शिवबा मला समजत नाही. मला माझा शिवबा समजतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा शिवबा उभारत रहा आणि शिवरायांची अशीच अवहेलना करत रहा. तुम्हाला जसे शिवबा हवे आहेत तसे ते नाहीत...नव्हते...त्यांचा सर्वव्यापी दृष्टीकोण तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे. तुमच्या मर्यादित कुवतीत ते अफाट व्यक्तित्व बसवू नका.
नाहीतर तुमचा शिवाजी आणि आमचा शिवाजी हा वाद तसाही निर्माण झालाच आहे, जो भयावह आहे आणि ती तुमचीच उपज आहे. याची जबाबदारी तुमची आहे.
माझ्यावर वाट्टेल ते आरोप करण्याची मुभा तुम्ही घेतलेलीच आहे. घ्या. पण तुम्ही मानवतेला एक काळीमा आहात याचेही भान ठेवा. शिवाजी महाराजांना जातीत वाटण्याचे पाप तुम्ही केले आहे आणि इतिहास तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही हेही लक्षात ठेवा.
हे विरेचन असेल, असावे. इतिहासात कधी असे अत्यंत टोकाचे घृणास्पद विवाद निर्मण होतात. ज्यांना ओका-या काढायच्यात ते काढतात...थोडासा अप्रसंग निर्माण होतो आणि समाजच आत्मपरिक्षण करत मग नव्या जोमाने ऐक्याचे स्वप्न पहातो. हे असेच विरेचन असावे ही आशा आहे...यातुन अभद्र नव्हे तर काहीतरी चांगलेच पुढे यावे हीही आशा आहे.
पण ही आशाच ठेवायची कि एकमेकांना ठेचायचे हेही ठरवावे लागेल.
मी तरी आशावादी आहे.