मनोगत
महाराष्ट्रात खोट्या इतिहासाच्या नांवाखाली जातीय विद्वेष भडकवण्याचे काम सध्या अत्यंत खालच्या पातळीवर जावून पोहोचले आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना त्यात आग्घाडीवर असुन सध्या सर्वच समाजजीवन त्यांनी अस्वस्थ करुन सोडले आहे. समाजात भय निर्माण करत उभी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक दिन जवळ आला रे आला कि पत्रकार परिषदा घेत "सहा जुनपुर्वी वाघ्याचे स्मारक हटवा अन्यथा ते आम्ही उध्वस्त करु..." असे इशारे ते देत आले होते. जुन २०११ साली जेंव्हा त्यांनी अशी पहिली धमकी दिली त्याचवेळीस मी वाघ्याच्या ख-या इतिहासाबद्द्ल एक लेख लिहुन दै. लोकमतला पाठवला होता. त्यांनी तो आवर्जुन प्रसिद्धही केला त्यामुळे वाघ्याचे वास्तव जनतेच्या लक्षात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर, झारगड मामा आणि श्री. वडकुतेंनी संभाजी ब्रिगेडला जाहीरपणे ठणकावले. परिणामस्वरुप शासनाने वाघ्याला पोलिस संरक्षण पुरवले. त्यानंतरही या संघटनेने वाघ्याबाबत अपप्रचार सुरु ठेवला. त्यात बामसेफी "मुलनिवासी नायक" हे वृत्तपत्रही सामील झाले. अनेक शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कसा नव्हताच असे सिद्ध करु पाहणा-या पुस्तिका काढण्यात आल्या. इंद्रजीत सावंत, सुधाकर लाड-विलास खरात, अड अनंत दारवटकर अशी अनेक मंडळी या धादांत खोटा इतिहास सांगण्यात आघाडीवर होती. त्यामुळेही समाजात गैरसमज वाढत चालले होते. कोठे हजारदा रेटुन सांगितले कि ते कि तेच खरे वाटु लागते.
यंदाही संभाजी ब्रिगेडने ३० एप्रिल २०१२ रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेवून असाच इशारा दिला होता. त्याबाबत मी तात्काळ माझ्या ब्लोगवर लेखही लिहिला होता. यानंतर काही दिवसांतच प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर यांना मुंबईत भेटले व तोच खोटा इतिहास रेटायला सुरुवात केली. जानकरांनीही आपली बाजु मांडली व वाघ्याच्या स्मारकाला ब्रिगेडने धक्का लावू नये असे स्पष्टपणे सांगितले व उभय पक्षाच्या इतिहास तज्ञांनी एकत्र बसुन तोडगा काढायचे ठरवले. वाघ्याला तोवर आम्ही हात लावणार नाही असेही आश्वासन गायकवाडांनी जानकरांना दिले.
परंतु दिल्या वचनाला जागेल ती ब्रिगेड कसली? आणि हाच संशय बळावल्याने महादेव जानकर व शेकडो कार्यकर्त्यांनी अलीबाग येथे जावून जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना वाघ्यासंदर्भात निवेदन दिले. सहा जुन रोजी शिवराज्याभिषेक दिनी पोलिसांनी भरपुर पोलीस बंदोबस्तही पुरवला. त्या दिवशी ब्रिगेडींनी कोणतेही आततायी कृत्य केले नाही.
परंतु अचानक जुलै महिन्याच्या अखेरीला मराठा रियासत, भय्या पाटील, मानव भोसले अशा फ़ेसबुकवरील अकाउंट्सवर महाराणी अहल्यादेवी, धनगर समाज, महादेव जानकर यांच्या विरुद्ध अत्यंत घाणेरड्या, संतापजनक असे लेखन येवू लागले. या विरोधात सर्वप्रथम बारामती येथे घनशाम हाके व सहका-यांनी तक्रार नोंदवली. पुण्यातही अशीच तक्रर सायबर सेलकडे नोंदवली गेली. यानंतर मग ठिकठिकाणी तक्रारी नोंदवल्या गेल्या. परंतु पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली. साधा एफ आय आर नोंदवुन घेतला गेला नाही.
आणि एक आगस्ट २०१२ रोजी दुपारी बातम्या येवू लागल्या. वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या ३-४०० कर्यकर्त्यांनी हटवला होता. तेथे बंदोबस्तासाठी होते फक्त दोन पोलिस. त्यांनाही मारहाण करण्यात आली होती. ७३ दरोडेखोर ब्रिगेडी अटक करण्यात आले होते. मला एबीपी माझा कडुन दुपारी दीडच्या दर्म्यान फोन आला. मी तत्क्षणी वाघ्याला उध्वस्त केल्याबाबत निषेध व्यक्त करुन उपोषण घोषित केले. या वृत्तामुळे सर्व महाराष्ट्र हादरुन गेला. सर्व बहुजन या दगलबाजीमुळे व विध्वंसक प्रवृत्तीमुळे संतापुन गेले. ठिकठिकाणी रास्ता रोको सुरु झाले. महदेव जानकर, रमेश शेंडगे, अण्णा डांगे, राजाराम पाटील, शुद्धोदन आहेर, प्रा. हरी नरके, रविकिरण साने, गोविंद कुलकर्णी, श्रावण देवरे असे सर्व समाजघटकांतील विचारवंत, नेते, पत्रकार यांनी शासनावर टीकेचा भडिमार सुरु केला. माझे उपोषण दुस-या दिवशीही कंटिन्यु झाले. दै. लोकमतने उपोषणाची बातमी दिली असल्याने महाराष्ट्रभरातुन समर्थनाची लाट उसळली.
दुपारी साडेअकराच्या आसपास वाघ्या पुन्हा बसवला गेल्याची बातमी आली. विजय गावडे यांनी खुद्द रायगडावर फोन लवुन खात्री करुन घेतली. मग मी प्रा. नरकेंच्या हस्ते पाणी पिवून उपोषण सोडले.छ. शिवाजी महाराजांच्या कोथरुड येथील पुतळ्याला विनम्र अभिवादन करुन मग आम्ही महाराणी अहल्याबाई होळकरांच्या सारसबागेशेजारील प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले. तोवर महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक उठला होता, तो शांत झाला. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. त्या निंदनीय आहेतच...कारण ही आपली बहुजनीय संस्कृती नाही. ब्रिगेडी संस्कृतीचे अनुकरण कोणीही बहुजनांनी कधीही करु नये. हे लोक भविष्यात विद्वेषाचे बीज पेरत जाणार आहेत. आपले उत्तर हे विधायक, सनदशीर आणि म. गांधींना स्मरुन अहिंसक असेच असले पाहिजे.
दि. ६ आगस्ट रोजी एक अभुतपुर्व घटना घडली तिची नोंद बहुजनीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल. सर्व महाराष्ट्रात समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मोर्चे काढले. जात, पक्ष, संघटनात्मक मतभेद विसरुन लाखो लोक एकत्र आले. सर्वांची एकच मागणी होती ती म्हणजे संभाजी ब्रिगेदवर बंदी घाला, मानव भोसले नामक प्राण्याला शोधा आणि अटक करा, वाघ्याला कायमस्वरुपी संरक्षण द्या. पुढे या पुस्तिकेत याबद्दल सविस्तर माहिती आहेच. थोडक्यात येथे सांगायचे म्हणजे असे ऐक्य महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. आता हेच ऐक्य समाजाच्या हितासाठी, प्रगतीसाठी आणि सामाजिक सौख्यासाठी टिकवायचे आव्हान आपल्यासमोर आहे आणि आपण त्यात यशस्वी होणारच याबाबत माझ्या मनात शंका नाही.
या पुस्तिकेचे मुख्य प्रयोजन म्हनजे वाघ्याबाबत ज्या धादांत खोट्या कहान्या रचुन अजुनही जो अपप्रचार केला जात आहे त्याला कोणीही बळी पडु नये म्हणुन वाघ्या संदर्भातील सर्व माहिती, जी मी वेळोवेळी लिहिलीच होती, ती एकत्र स्वरुपात उपलब्ध व्हावी म्हणुन. छ. शिवाजी महाराजांच्या सर्वच राण्या-महाराण्यांबद्दल आम्हा बहुजनांना नितांत आदर आहे. वाघ्याचे स्मारक कोणा एका राणीच्या स्मारकावर बांधुन ब्राह्मनांनी शिवरायांचा व शिवपत्नीचा अपमान केला आहे हे धादांत खोटे कसे आहे हे सर्वांना समजावून सांगायची गरज आहे. शिवस्मारक ब्राह्मनांनीच दारोदार भीक मागुन उभे केले. तुकोजीराजांनी शेवटी शिवस्मारकाचे कार्य थांबु नये म्हणुन पाच हजारांची मदत करुन, स्मारक पुर्ण झाल्यानंतर उरलेल्या पैशांतुन वाघ्याचे स्मारक उभारायला सांगितले होते व तसेच घडले हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
खरे सांगायचे तर मला महाराष्ट्रातील काही लोक, तेही छ. संभाजीराजांसारख्या निधड्या छातीच्या, धर्म-राष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणा-या, प्रजावत्सल थोर महापुरुषाच्या नांवाने स्थापन झालेल्या संघटनेकडुन असे गैरकृत्य खरोखर घ्डेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मला वाटायचे कि हे निव्वळ प्रसिद्धीसाठीची नाटके आहेत. कोणताही सामाजिक हिताचा इश्यु हाती घेता येत नसल्याने निर्माण झालेल्या बेचैनीतुन आपले निरर्थक संघटनात्मक अस्तित्व टिकवण्याची ही धडपड आहे. महादेव जानकरांना खुद्द प्रवीण गायकवाडांनीच वचन दिल्याने एक मराठा वचन पाळेल या भ्रमात आम्ही राहिलो. पण हा भ्रम १ आगस्ट रोजी दूर झाला. महाराष्ट्राचा पुरोगामीपनाचा बुरखा यांनी फाडुन टाकला. आपण किती प्रतिगामी आहोत याचे विषण्ण करणारे चित्र यांनी दाखवले. महाराष्ट्र यांना कधीही क्षमा करणार नाही. औरंगजेब आणि अफजलखानाने केलेली पापे यांनी नव्या आधुनिक महाराष्ट्राला जीवंत करुन दाखवली.
आपण महाराष्ट्र शासनाचे, विशेषत: केंद्र सरकारचे ऋणी अशासाठी रहायचे कि त्यांनी एक ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्यापासुन वाचवला. वाघ्या आपल्या जागी पुन्हा सन्मानाने विराजमान झाला. पुरातत्वखात्यापेक्षा आपण आणि आपले भाकड इतिहासकार बुद्धीमान आहोत य भ्रमात असलेल्यांना खरे तर पुरातत्वखात्यानेच चपराक दिलेली आहे. वाघ्याचे स्मारक १९३६ पर्यंत पुर्ण केले तेंव्हा इंग्रज पुरातत्वखात्याचे अर्थातच प्रमुख होते. त्यांनीही शिवस्मारकाला मदत केली व वाघ्याचे स्मारक त्यांच्यच देखरेखीखाली पुर्ण झाले हे कोणीही विसरु नका. तेथे अन्य कोणाचेही स्मारक असते तर इतिहासाची आपल्यापेक्षाही अधिक बुज राखणा-या इंग्रज सरकारने मुळात वाघ्याचे स्मारक हौच दिले नसते हेही विसरु नका.
पुढील प्रकरणांत वाघ्याचा जेवढा उपलब्ध इतिहास आहे तो देत आहे. वाघ्या इतिहासात होता हेच काय ते सत्य आहे, हे मुळीच विसरु नका.
मला येथे सर्वात आधी आभार मानायचेत ते सर्व समाज बांधवांचे. त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी पुर्णतया भारावून गेलो आहे. माझे तरुण मित्र रोहित पांढरे, सुदर्शन अक्किसागर, सचीन शेंडगे, संजय क्षीरसागर यांनी मला या पुस्तिकेसाठी अनेक मोलाचे संदर्भ अल्पावधीत मिळवून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर्वश्री महादेव जानकर, प्रकाश खाडे, विजय गावडे, घनशाम हाके, रमेश शेंडगे, रविकिरण साने, गोविंद कुलकर्णी, धनंजय झुरंगे, सागर भंडारे, सागर कुलकर्णी, डा. मधुसुदन चेरेकर, डा........नवले, आनंद कोकरे, राजाराम पाटील, लक्ष्मण हाके, गोपिचंद पडळकर, शुद्धोदन आहेर, मधुकर रामटेके, .........
मी सर्वांप्रती क्रुतज्ञ आहे.
आणि माझ्यासोबत नेहमीच थोरल्या भावाप्रमाणे असलेले, माझ्यासोबत उपोषणाला बसलेले परममित्र प्रा. हरी नरके आणि सौ. संगिता नरकेवहिनी यांचे आभार मानतो, त्यांना आवडनार नाही हे माहित असुनही. आणि माझी जीवनसंगिनी...मी अन्नत्याग करताच तिनेही अन्नाचा कणही घेतला नाही त्या पुष्पाराणीप्रतीही मी क्रुतज्ञ आहे.
सर्वैक्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवुयात. हाच आपला ध्यास.
-संजय सोनवणी