१. सभोवतालच्या विचारव्युहांनी जेंव्हा आपले स्वत:चे विचार प्रभावित होवू लागतात तेंव्हाच आपण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवून बसलो असतो.
२. मनुष्य स्वत:च्या विचारांसह पुढे जाणार कि अन्यांच्या वैचारिक वादळांबरोबर इतस्तत: भरकटत जाणार हे त्याच्या नैसर्गिक नैतीक धारणांवर अवलंबुन असते.
३. व्यक्तिगत धारणा म्हणजे समाज-धारणा नव्हेत तसेच समाजाच्या धारणा म्हणजेच व्यक्तिच्या धारणा नव्हेत.
४. व्यक्तीचे स्वातंत्र्य हे समाज स्वातंत्र्याएवढेच मुल्यवान असल्याने झूंडीच्या विचारसंकल्पना लादणारे गट हे नेहमीच समाज व व्यक्तीस्वातंत्र्याचे शत्रु असतात.
५. सामाजिक विचारस्वातंत्र्य हे नेहमीच सर्व व्यक्तिंच्या व्यक्तिगत विचारस्वातंत्र्याचा एकुणातील समुच्चय असतो...तर झुंडीचे स्वातंत्र्य हे परतंत्र प्रवृत्तीच्या पराभुत व्यक्तिंच्या नैराश्याचा एकुणातील आशय असते.
६. वैचारिक प्रभाव आपसुक निसर्गत: पडणे आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे यात म्हणुनच मुलत: फरक असतो.
७. निसर्गत: स्वतंत्र वृत्तीचा मनुष्य आपल्या स्वभावधर्माला अनुकुल अशाच विचारांना स्वीकारत जातो वा नवीन विचारांना विकसीत करत जातो, पण परतंत्र वृत्ती नेहमीच गतानुगतीक होत नेहमीच पुरातनाचा आधार घेत हिंसक मृत-वैचारिक झुंडी बनवण्यात अग्रेसर असतात. अशाच झुंडींनी आजवर मानवी आत्म-विकासाचा स्वतंत्र मार्ग डागाळुन व अवरुद्ध करुन ठेवला आहे.
८. विश्वात काहीही पवित्र नाही कि काहीही अपवित्र नाही, पण अमुकच पवित्र वा अमुकच अपवित्र असे द्वंद्व निर्माण केले जाते तेंव्हा मानवी स्वातंत्र्य संकोचु लागते.
९. वैचारिक पारतंत्र्य हवेसे वाटणे वा लादुन घेणे ही मानसिक विकृती आहे...मानवी स्वातंत्र्याच्या मुलभुत नैसर्गिक संकल्पनेशी विरोधाभासी आहे म्हणुनच ती त्याज्ज्य आहे.
१०. परतंत्र वृत्तीचे लोकच परतंत्र झुंडी निर्माण करत असतात. स्वतंत्र मनोवृत्तीचे लोक कधीही झुंड बनवत नसतात.
११. स्वातंत्र्य-पारतंत्र्य हे बाह्य नसते...ते राजकीय, आर्थिक नसते...तर स्वयंप्रेरणाधिष्ठ असते. ते आंतरिक असते. एक वेळ आर्थिक/राजकीय गुलाम जे स्वातंत्र्य भोगु शकतो ते कदाचित मालकांनाही भोगायला मिळत नाही, ते यामुळेच!
१२. जर कोणी पारतंत्र्यात असेल तर तो परतंत्र लोकांमुळेच...स्वतंत्र मनुष्य कधी कोणाला परतंत्रात नेत नाही किंवा जात नाही. आणि असे स्वतंत्र लोक हेच वैश्विक स्वातंत्र्याचे खरे अधिष्ठाते असतात.