"मी भुतकालातील सर्व महनियांबद्दल आदर बाळगतो, पण कोणाही एकाचा असा प्रभाव माझ्यावर नाही. मी सर्वांतील चांगले पहात माझे म्हणून जे आहे तेच विकसित करण्यासाठी मी अखंड प्रयत्नरत असतो. मला यशाची अपेक्षा नाही म्हणुन अपयशाचीही पर्वा नाही. माझा कोणी गुरु नाही कि माझा कोणी शिष्य नाही. कोणी मला प्रिय नाही कि कोणी माझा शत्रू नाही.
"कोणाचाही जयजयकार करणा-या झुंडीत मी सामील होवू शकत नाही कि कोणी सरसकट ज्याचा तिरस्कार करतो त्याचा तिरस्कारही मी करत नाही. मनुष्य हा मुळात अध:पतनशील प्राणी असून जेही त्या अध:पतनातुन उत्थान करण्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करत असतात त्या सा-यांबाबत मला अतीव प्रेमादर आहे.
"छोट्या माणसांच्या सह-अस्तित्वाखेरीज मोठी माणसे कदापि घडू शकत नाहीत यावर माझा विश्वास आहे. मी छोट्या माणसांना सलाम करतो कारण मोठी म्हणवली गेलेली सर्वच माणसे ही या सर्वच छोट्या माणसांच्या जीवनस्वप्नांचा एकत्रीत प्रकट उद्गार असतो असे मी मानतो. मोठी माणसे जग घडवत नाहीत तर शेवटी छोटीच माणसेच जग घडवत असतात. छोट्या माणसांच्या अस्तित्वाखेरीज मोठ्यांचे मोठेपण अस्तित्वात येवूच शकत नाही.
"मी अनिवार जिज्ञासेने अविरत झपाटलेलो असतो. मला अनंत प्रश्न पडत असतात आणि मी प्रश्नांशी अडखळुन थांबत नाही तर माझ्या परीने प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मला जाणीव आहे कि मला सापडलेली उत्तरे अंतिम नाहीत कारण आजवर कोणालाही अंतिम असे उत्तर सापडलेले नाही.
"मला अज्ञाताचा आणि चिरंतनाचा सोस आहे म्हणून मी वास्तवातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करत नाही किंवा ते दुर्लक्षणीय आहेत वा निरर्थक आहेत असेही मानत नाही. अज्ञाताचा मार्ग हा वास्तवातुनच जात असतो असे मी मानतो आणि वास्तव स्वच्छ केल्याखेरीज अज्ञाताचा मार्गही सोपा होत नाही हेही जाणतो.
"इतरांबद्दलची द्वेषभावना हीच सर्व सामाजिक समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे जीवनस्पर्धा निकोप न होता स्पर्धेचा अर्थच निरर्थक बनतो आणि कोणाच्याही प्रगतीची वा यशाची संभावनाच नष्ट होत जाते असे मी मानतो.
"स्वत:ला अथवा स्वत:च्या समाजाला मोठा मानल्याने कोणीही मोठा ठरत नसतो तर मोठेपण हे इतरांच्या मान्यतांवरच अंतत: अवलंबुन असते. मोठ्या माणसाचे पहिले लक्षण हे कि तो स्वत:ला कधीही मोठा मानत नाही."
(माझ्या "तत्वचर्चा" या संवादात्मक पुस्तकातून.)