Monday, June 8, 2015

"समरसता" श्री. पतंगे...एक समीक्षा (भाग २)

"सम" शब्दाबाबत विवाद नाही. त्यामुळे समतेच्या सिद्धांताशीही विवाद असण्याचे कारण नाही. समता आणि समरसता या वेगळ्या संकल्पना आहेत. स्वातंत्र्य आणि बंधुतेशिवाय समतेचे तत्व अस्तित्वात येत नाही कारण समतेला पृथक असे अस्तित्व सामाजिक परिप्रेक्षात नाही. समान अधिकार, हक्क, जबाबदा-या या समतेत जशा येतात तसेच जे विकलांग आहेत, शोषित आहेत त्यांना आधार देत सम पातळीवर आणनेही समतेच्या सिद्धांतात निहित आहे. नुसते "सम" समजणे, मानने त्यासाठी पुरेसे नाही तर समानतेला आणण्याचे अविरत प्रयत्न समतेच्या सिद्धांतात अभिप्रेत आहे. "ज्याला सारे आत्ममय झाले तो साम्यबुद्धीने सर्वांशी वागतो." हे बृहदारण्यकोपनिषदातील वचन श्री. पतंगे समरसतेच्या तत्वज्ञानाला बळ देण्यासाठी घेतात. समरसता हा अध्यात्मतील भाव असू शकतो. सर्वांकडे सम दटुष्टीने पाहणे आणि सर्वांना समान करण्यासाठी आणि समान मानण्यासाठी यत्न करणे यात फरक आहे. समरसता ही संकल्पना हिंदुंचे संगठन करण्यासाठी उपयुक्त नाही त्यी यामुळेच.

परंतू स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व पाश्चात्य विचारांत न घेता ही तिन्ही तत्वे आपल्या परंपरेतच आहेत असे श्री. पतंगे विवेकानंदांचा हवाला देत सांगतात. "आपल्या पुर्वजांनी धार्मिक विचारांवरील बंधने काढून टाकली होती. त्याबाबतीत पुर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण  सामाजिक जीवन मात्र त्यांनी नाना प्रकारच्या कठोर नियमांनी करकचून बांधून् टाकले." असे विवेकानंद म्हणतात. (पृष्ठ १०२) हे विधान अर्धसत्य आहे. "आपले पुर्वज" म्हणजे नेमके कोण? त्यांनी कधी कोणती बंधने घात्तली आणि कोणती काढून घेतली? मला वाटते भारतीय सामाजिक/धार्मिक आणि राजकीय इतिहासाचे पुरेसे परिशिलन नसल्याने हे विधान आले आहे. पाश्चात्य संकल्पना ज्याला "स्वातंत्र्य" म्हणते ते स्वातंत्र्य भारतात कधीही अस्तित्वात नव्हते. धार्मिक अथवा राजकीय (स्वकीयांची सत्ता असली तरी) स्वातंत्र्य अस्तित्वात नव्हते. धार्मिक बंधनांपेक्षा राजकीय बंधने अधिक होती हे राजकीय इतिहासावरुनही दिसते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही याबाबत बरीच माहिती मिळेल. व्यक्तीचे राजकीय, आर्थिक, भावनिक स्वातंत्र्य ही कल्पना भारतात कधीही अस्तित्वात नव्हती हे सत्य मान्य करायला काय अडचण आहे? सर्वकाही आमच्याकडे पुरातन काळापासून होतेच हा अट्टाहास सामाजिक ऐक्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे.

समतेचे म्हणावे तर आध्यात्मिक पातळीवर समता/समरसता अनेकांनी सांगितली आहे. शैव (नाथपंथीय/लिंगायत आणि अन्य शैव सिद्धांत) सिद्धांत समतेबाबत बोलतच अले आहेत.आदी शंकराचार्यांना खरा अद्वैतवाद समजला तो शिवाच्याच रुपातुन अशी दंतकथाही आहे. पण हा अद्भूत असा अद्वैततावादही अध्यात्माच्याच पातळीवर घसरला, व्यावहारिक पातळीवर उरला नाही हे आपल्या सर्वच धर्मेतिहासांतून लक्षात येईल. किंबहुना समतेचा ध्यास घेत स्थापन झालेले नवे धर्मही नंतर विषमतेच्याच गाळात अडकले ते परस्परांतील वाईटच घेण्याच्या वृत्तीमुळे हेही स्पष्ट दिसते. त्यामुळे सन २०० नंतरचा भारतीय समतेचा विचार केवळ आणि केवळ आध्यात्मिक स्वरुपाचा होता. समता उरली नाही कारण काही स्वनिर्मित तर काही परनिर्मित (वैदिक/शैवादि अवैदिक) पारतंत्र्यातच गेले. राजकीय पातळीवर समतेचा तर प्रश्नच नव्हता. चंद्रगुप्त मौर्य सम्राट असुनही त्याला चाणक्य "वृषल"च म्हणत राहिला. नंद न्हावी म्हणून त्याचीही हेटाळणीच आहे. विष्णुपुराणासारखी पुराणे सातवाहनांसारख्या मातब्बर घराण्याला शूद्र म्हणून विशेष जागा देत नाहीत. राजालाच समता नसेल तर जनसामान्यांना कशी असणार? मुळात भारतीय धर्मैतिहास आणि राजकीय इतिहास वैदिक दृष्टीकोनातून लिहिला गेला असल्याने तो भेदभावाने भरलेला आहे. तोच भारताचा खरा इतिहास आहे असे मानत त्यातून समतेची मुल्ये शोधायचा आणी भारतात समतेचे तत्वज्ञान होतेच कि हे दाखवण्याचा प्रयत्न्ब करत त्यात अध्यात्मवाद होता...व्यवहारवाद नव्हे हे मात्र सांगण्याचे टाळले जाते.

त्यामुळेच बंधुभावाचा पुरातन विचारही बाद होतो. विवेकानंद म्हणतात "आपला समाज अतिभयंकर, अतिसैतानी बनला." हेही मत अतिरंजित असले तरी त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल?

आता पुरातन काळात समता-स्वातंत्र्य व समता आधुनिक परिप्रेक्षातली नसेल तर ती होतीच असा अट्टाग्रहही काय कामाचा? दुस-यांचे चांगले ते घ्यावे असे श्री. पतंगेच एका ठिकाणी म्हणत असता, हा दुस-यांचे चांगले नाकारण्याचा प्रयत्न नाही काय? या पाश्चात्य तत्वांना नाकारण्यासाठीच "समरसता" सिद्धांत जन्माला आला नाही काय?

आज सकाळी सकाळीच मला एका संघ स्वयंसेवकाचा फोन आला होता. "समता कि समरसता" हा पुण्यनगरीत प्रकाशित झालेला माझा लेख वाचून त्याने फोन केला होता. अर्थात त्याला माझा लेख आवडला नव्हता. असे लेखन करु नये असे सुचवत त्याने सांगितले कि जिलेबी जशी एकजीव असते तशीच समरसता असते. हे उदाहरण बालिश वाटले तरी समाजाची जिलेबी करता येत नाही....समाज एकरस...एकजीव करता येत नाही. संघाचे स्वयंसेवकही असे एकरस-समरस बनू शकत नाहीत. कारण मुळात ते मानवी प्रेरणांच्या विरोधात आहे.

हिंदुंचे संघटन का करावे यावर पतंगेंनी भाष्य केलेले नाही. हिंदू धर्मातील जातीअहंकार व जातीपाती, वैदिकांचे वर्णीय अहंकार संघाला मान्य नाहीत एवढेतरी पुस्तकांवरुन दिसते. आपण ते विचार प्रामाणिक आहेत असे समजू. हे अहंकार व भेद तोडण्यासाठी समरसता हवी असे जे म्हणणे आहे ती समरसता म्हणजेच प्रत्यक्षात समता होय असेही आपण थोडा वेळ गृहित धरू. परंतू प्रत्यक्षातील व्यवहारवाद काय आहे हेही मग पहायला हवे. वर्ण-जाती तोडुन हिंदू हीच एकमात्र ओळख समजा सर्वांनी ठेवायची तर वर्णांचे आणि जातींचे तत्वज्ञान संघाकडे कोठे आहे? जोवर वर्ण आणि जाती का नकोत, त्या कशा फिजूल आहेत हे सर्वप्रथम स्पष्ट करावे लागेल. ते स्पष्ट केले कि कृती आली. हिंदू धर्माचे शंकराचार्य वैदिकच का? या प्रश्नाचीही सोडवणूक करावी लागेल. (शंकराचार्यांचा वारस कोण असेल यात संघ आणि काशी विद्वत्परिषद सक्रीय सहभागी असते.)  थोडक्यात एकरुप हिंदू ही ओळख मिटवायची तर वैदिक शंकराचार्य (धर्मगुरू) ही प्रथाच सर्वप्रथम नष्ट करावी लागेल. मी २००६ साली किस्त्रीममद्ध्ये याबाबत सविस्तर लेख लिहिला होता. मा. गो. वैद्यांनी माझा चांगलाच समाचार घेत मला व्ह्यटिकनचा हस्तकही ठरवले होते हा इतिहास फार जुना नाही. धर्मकार्यातील कोणाही लायक व्यक्तीसाठी हे पदच मुळात खुले होत नाही तोवर वर्ण-जाती अभिमान घालवायच्या बाता निरर्थक आहेत. अन्य मंदिरांबाबतही (जसा पंढरपुरबाबत झाला) तशाच निर्णयाची गरज आहे. पण १९८३ साली स्थापन झालेला समरसता विचार मंच याबाबत आपले विचारही मांडत नाही. कृती तर खुपच दुरची झाली. वर्णाभिमानी धर्मसत्तेवर कायम ठेवून लोकांनी मात्र समरस व्हावे ही अपेक्षा विघातक आहे, हिंदुंना मुळीच उपकारक नाही याचे भान संघाने ठेवले पाहिजे.

(क्रमश:)
मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...