Thursday, April 25, 2024

अकेमेनिड साम्राज्याने भारताला काय दिले?



अकेमेनिड साम्राज्याच्या जवळपास दोनशे वर्षाच्या राजवटीच्या काळात पर्शियन समाजसंस्कृतीचा पश्चिमोत्तर भारतावर आणि भारताचा पर्शियन साम्राज्यावर सांस्कृतिक प्रभाव पडणे स्वाभाविक होते. सत्ताधारी आपले सर्वच स्थानिक शासित जनतेवर लादु शकत नाहीत. ते शक्यही नसते. ज्यांच्यावर राज्य करायचे आहे त्यांच्या आशा-आकांक्षा आणि सांस्कृतिक प्रेरणांना चिरडणे कोणत्याही शासकाला परवडनारे नसते हा जागतिक इतिहास आहे. उलट सांस्कृतिक देवाण-घेवाण करत एक सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच शासकांचा प्रयत्न असतो हे आपल्याला इतिहासावरून लक्षात येईल. अर्थात जो शासक हे समजावून घेण्यात अयशस्वी ठरतो त्याची सत्ता अप्रिय होत जाते हाही इतिहास आहे.

अकेमेदिड साम्राज्याची राजधानी झाग्रोस पर्वतराजीत असलेल्या पर्सेपोलिस येथे होती. येथील अपादान प्रसादात अकेमेनिड साम्राज्यात येणा-या विविध भागांतील नजराणा देणा-या व्यक्तींची चित्रे कोरलेली आहेत. त्यात सिंध भागातील भारतीयांचेही चित्रण आहे. या चित्रणावरून तत्कालीन भारतीय कशी वेशभूषा करायचे व कशा प्रकारची शिरोभूषणे घालायचे याचे दिग्दर्शन होते. याच काळात पर्शियन भाषेत भारताचे पूर्वापार प्रसिद्ध हिंदवे हे नाव हिंदुश असे झाले आणि हेच नाव ग्रीक इतिहासकारांनी इंदोई म्हणून स्वीकारले. आजचे इंडिया हे देशनाम आणि हिंदू हे धर्मनाम यातूनच विकसित झालेले आहे. पर्शियन सत्ता फार मोठी असल्याने पर्शियन नावांचा प्रचार जगभर झाला. मगी हे पारशी धर्मातील पुरोहिताचे संबोधनसुद्धा जागतिक पातळीवर पसरले. मगी या शब्दावरूनच जादूसाठी लोकप्रिय असणारा “Magic” हा शब्द विकसित झाला. हे मगी पुरोहित भारतात आले होते व कृष्णाच्या नातू सांबाला झालेला कृष्ठरोग त्यांनी बारा केला होता व सूर्यपूजा त्यांनीच भारतात आणली अशी महाभारतात येणारी पुराणकथा या सांस्कृतिक आदान-प्रदानाचे एक उदाहरण होय.  

भारतीयांमुळे अकेमेनिड सैन्यात भारतीय हत्तीदलाचा समावेश तर झालाच पण भारतीय पद्धतीच्या धनुर्विद्येचा परिचयही पाश्चात्य जगाला झाला. युरोपमधील प्लेटीला शहराजवळ इसपू ४७९ मध्ये झालेल्या युद्धात भारतीय सैनिक सुती वस्त्रे घालून, धनुष्य व लोखंडी पाती लावलेले बाण घेऊन मोठ्या प्रमाणात त्या युद्धात सामील झाले होते असे ग्रीक इतिहासकार हिरोडोटस याने नोंदवून ठेवले आहे. जंगली गाढवे आणि घोड्यांनी ओढले जाणारे रथही भारतीय सैनिक वापरत असत असे त्याने म्हटले आहे. गांधारी सेना मात्र भाले घेऊन युद्धात येत असेही त्याने नोंदवलेले आहे. तत्कालीन जगातील वेगवेगळ्या सैन्यपद्धती आपल्याला त्यामुळे उमगून येतात. अथेन्सला उध्वस्त करणा-या सैन्यात भारतीय सैन्याचाही मोठा वाटा होता. नक्ष-ए-रुस्तुम येथील दारियस (पहिला), क्झेर्क्सेस, (पहिला), पर्सेपोलिस येथील दारियस (दुसरा) याच्या कबरीच्या घुमटावर भारतीय सैनिकांचे चित्रण केलेले आहे.

तक्षशिला येथे भिर टेकाडावर केलेल्या उत्खननात अकेमेनिड काळातील बांधकामांचे अवशेष मिळाले आहेत. तक्षशिला हे तत्कालीन मोठे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आलेले होते. तक्षशिला येथून जाणा-या व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या देऊन हे विद्यापीठ चालवले होते. धम्मपद या ग्रंथावरून दिसते कि गौतम बुद्धाचा अनुयायी कोसलचा राजा पसेनदी, अंगुलीमाल आणि राजगृहचा दरबारी वैद्य जीवक यांनी तक्षशिला येथेच प्रशिक्षण घेतले होते. चंद्रगुप्त मौर्य आपल्या तारुण्यावस्थेत असताना तक्षशिला येथे शिक्षण घ्यायला आला होता. अलेक्झांडरचे आक्रमण होईपर्यंत आणि ग्रीकांशी सामना करेपर्यंत तोही याच भागात होता असे ग्रीक सुत्रांवरून कळून येते.

अकेमेनिड काळात ज्योतिषशास्त्रात पर्शियन लोकांनी मोठी प्रगती केली होती. भारतीयांनी भाकीत वर्तवण्याचे शास्त्र पर्शियन लोकांकडून आणि नंतर ग्रीकांकडून घेतले असे डेव्हिड पिंग्री हे विद्वान लेखक म्हणतात. मौर्यांची राजधानी पाटलिपुत्र येथील राजवाड्याच्या बांधकाम शैलीवर, विशेषता: स्तंभ रचनेवर, पर्शियन शैलीचा प्रभाव पडला. मौर्यकाळातील सिंहमुद्रा निर्माण करताना तर निश्चितपणे पर्शियन शैली वापरण्यात आलेली आहे.  किंबहुना शिलालेख आणि पाषाण कोरून/खोडून गुंफा बनवण्याची पद्धतही पर्शियनांकडून आली. दारियस (पहिला) याचा बेहीस्तून शिलालेख कायमस्वरूपी आज्ञा खोदुन ठेवण्यासाठी एक आदर्श बनला. मौर्य सम्राट अशोकाने देश-विदेशात असंख्य शिलालेख, स्तंभलेख कोरण्याची सुरुवात केली ती पर्शियनांच्या अनुकरणाने असे मानले जाते.

लेणी खोदण्याची कला आपल्याकडे पर्शियन लोकांमुळेच आली. अनातोलिया येथील लिसियन पवया गुंफा आणि बराबर येथील आज अज्ञानाने लोमश ऋषी गुंफा म्हणून ओळखल्या जाणा-या लेण्यांमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे. अकेमेनिड काळात ही कला व्यापा-यांसोबत भारतात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो.  सारनाथ येथील अशोकाने इसपू  तिस-या शतकात निर्माण केलेला अशोकस्तंभ आणि अकेमेनिड राजधानी पर्सेपोलिस येथील स्तंभरचनेत व कलेत काही तपशील वगळता खूप साम्य आहे. ही सांस्कृतिक देवाण-घेवाणीची उदाहरणे मानली जातात.

भारतीय खरोष्ठी लिपीवर अर्माईक वर्णमालेचा प्रभाव आहे. सम्राट अशोकाच्या खरोष्ठी लिपीतील शिलालेखांत या लिपीचा प्रभाव जाणवण्याइतपत स्पष्ट आहे. अर्माईक भाषेतही अशोकाचे शिलालेख असून त्या भाषेवर जुन्या पर्शियन भाषेतून घेतलेले अनेक शब्द अवतरतात. उदा. लिपी हा शब्दच मुळात जुन्या पर्शियन भाषेतील “दिपि” या शब्दातून आलेला आहे. म्हणजेच अकेमेनिडसाम्राज्याने टाकलेला भाषिक प्रभाव नंतरही टिकून राहिला. किंबहुना लिहिण्याविषयकचे अनेक शब्द पर्शियन भाषेतून आलेले आहेत. खरोश्ती लिपी तर अर्माईक लिपीतूनच विकसित झाली असे दावे अनेक भाषाशास्त्रद्न्य करतात. शिलालेख कोरण्याची पद्धतही भारतीयांनी पर्शियन लोकांकडून अकेमेनिड काळातच घेतली असे म्हणायला हरकत नाही.

मौर्य काळातील मथुरेत व सारनाथ येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये परदेशी वेषभूशेतील मृण्मयी प्रतिमा आढळून आलेल्या आहेत. त्यात पर्शियन वेषभूषेच्याही अनेक प्रतिमा आहेत. पर्शियन लोकांनी फक्त पंजाबपर्यंतच्या भागात आपला सांस्कृतिक प्रभाव टाकला नाही तर हा प्रभाव सुदूर पूर्वेपर्यंत पडला होता असे या प्रतिमा आणि बांधकाम शैलीवरून दिसते.

पर्शियन भाषेचा सर्वात मोठा प्रभाव ऋग्वेदावर आहे, पण ऋग्वेदाची निर्मितीच मुळात दक्षिण अफगाणिस्तानमध्ये झालेली असल्याने ते स्वाभाविकही आहे. पण वैदिक मांडली भारतात आल्यापासूनच पर्शियन भाषेतील काही शब्द स्थानिक प्राकृत भाषांत रुळू लागलेले होते, पण त्याची गती अकेमेनिड साम्राज्याच्या काळात वाढली. अकेमेनिड साम्राज्याचा धर्म पारशी, झरतुष्ट्राने स्थापन केलेला. हा धर्म तसा वैदिक धर्माच्या अगदी निकट जाणारा. पण या दोन धर्मात पुरातन वैर असल्याने वैदिक धर्मियांना भारतात आश्रय घ्यावा लागला व त्यांनी आपली पर्शियन नाळ तोडण्याचा अर्थात आटोकाट प्रयत्न सुरु केला. नंतरच्या वैदिक साहित्यात पश्चिमोत्तर भारतील लोकांना त्याज्ज्य व निंदनीय आचरणाचे मानले गेले. हाही अकेमेनिड साम्राज्याने पश्चिमोत्तर भारतावर केलेल्या शासनाचा एक परिपाक होता.

यानंतर या भागावर आले ग्रीकांचे राज्य. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेउयात.

-संजय सोनवणी

७७२१८७०७६४

 


Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...