Monday, September 15, 2025

जयाप्पा शिंदे



 

     राणोजी शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र जयाप्पा शिंदे यांचा जन्म सन १७२० मध्ये झाला. (काहींच्या मते १७२३) त्यांचे जन्मनाव जयाजी असले तरी ते इतिहासात जयाप्पा म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्यांना दादासाहेब असेही म्हणत असत.
     ३ जुलै १७४५ रोजी, म्हणजे वयाचे अवघे बावीस अथवा पंचवीस वर्षांचे वय असताना त्यांच्या हातात शिंदे घराण्याची सूत्रे आली. पित्याच्या मृत्युनंतर त्यांनी आपली राजधानी ग्वाल्हेर येथे हलवली. भूराजकीय कारणे बहुदा या राजधानी हलवण्यामागे असू शकतील. नादिरशहाच्या आक्रमणाने पातशाही दुर्बल झालेली होती. पातशाहीचे अनेक सुभे त्यांच्या हातातून सुटत चालले होते. ही मराठ्यांसाठी उत्तरेत बस्तान बसवायची ही एक अनमोल संधी होती. गुजरात प्रांतावरही मराठ्यांची सत्ता कायम व्हायला यामुळे मदतच झाली. बुंदेलखंड हे आपले लगतचे उद्दिष्ट मानून जयाप्पाने त्यावर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. राजस्थानमध्ये वर्चस्व मिळवायचे होळकर पर्यंत करत होते व त्यांना यश मिळत होते. महत्वाकांक्षी जयाप्पाची नजर तिकडेही वळणे स्वाभाविक होते कारण राजपूत राजे आता जवळपास स्वतंत्र झाले असले तरी ते पातशाहीशी निष्ठा ठेऊन होते. पातशाहीशी जेव्हाही युद्ध व्हायचे तेंव्हा राजपूत त्याचेच साथ देत असत.
     मराठ्यांना सतत युद्धात गुंतून राहावे लागायचे कारण पातशहाने काही प्रांतांतून वसुलीचे अधिकार दिले तरी हे अधिकार लढाया करूनच मिळवावे लागत. युद्धासाठी होणारा खर्च अधिक आणि त्यामानाने उत्पन्न कमी अशी बहुतेक सरदारांची अवस्था होती त्यामुळे अधिकाधिक प्रांतांवर स्वाऱ्या करणे हे मराठा सरदारांचे एक कामच बनून गेले होते. जयाप्पा या तत्वाला अपवाद नव्हता. बलाढ्य सेना पोसायची तर तेवढे उत्पन्न आवश्यकच असायचे. मल्हारराव होळकर याने त्यावर तोड काढली होती ती पेंढारी सैनिक ठेवायची. पेंढारी पगारी नसत तर जीही लुट मिळेल त्यातून त्यांना हिस्सा मिळे. उत्तरेत आपापली सत्ता वाढवण्यासाठी शिंदे व होळकर यांच्यात अजूनही स्नेहाचे नाते असले तरी राजकीय स्पर्धा होतीच.
     दिल्लीत आपल्या मर्जीचा पातशहा बसवल्याखेरीज मराठ्यांचे कार्य सुकर होणार नाही हे जयाप्पा आणि मल्हाररावने हेरले. त्यानुसार दोघांनी १७४७ मध्ये मोगल पातशहा मोहम्मद शहा मृत्यू पावताच तातडीने हालचाली करून आपले लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्दीपण पणाला लावत शहा आलमला नुसते तख्तावर बसवले नाही तर त्याला आपल्या संरक्षणात ठेवले. दिल्लीच्या तख्तावरची पकड यामुळे घट्ट झाली.
     राजपुतान्यात अनेक संस्थाने होती. त्यांच्यात गादीबाबत अनेकदा कलह होत. शिंदे आणि होळकर यांचा बराचसा वेळ त्यात जात असे. शिवाय राजपुतान्याबाबत नानासाहेब पेशव्याचे धोरण स्पष्ट नसल्याने शिंदे होळकर या सरदारांना परस्परविरोधी आज्ञा पाठवल्या जात. त्यामुळे एकमेकांत गैरसमज होत असले तरी दोघांनी मात्र समजुतीने हे गैरसमज टोकाला जाऊ दिले नाही.     
     १७४९ मध्ये शाहू महाराजांचे निधन झाले. ताराबाईने त्यामुळे डोके वर काढले व गादीच्या हक्काचा प्रश्न उपस्थित केला. शाहू महाराज निपुत्रिक असल्याने कोल्हापूर व सातारा या दोन्ही गाद्या आपल्या ताब्यात येतील असा ताराबाईचा अंदाज होता. पण पेशव्याने चलाखी करून ताराबाईचा नातू रामराजा यास छत्रपती पद देण्यात आले. पेशवे सर्वोपरी तर छत्रपती नामधारी झाले ते येथुनच.
     जयाप्पा तरुण होते. तारुण्याला शोभेल अशी रग आणि युद्धात कळीकाळ वाटेल अशी पराक्रमी प्रवृत्तीही होती. राजपुतान्यातही त्यांना कधी मैत्री तर कधी दुश्मनीचा सामना करावा लागला कारण तत्कालीन वेगाने बदलते राजकारण. पुढे त्यांचा धाकटा बंधू दत्ताजी शिंदेही त्यांच्यासोबत युद्धांत भाग घेऊ लागल्याने त्याची शक्ती वाढली. साबाजी शिंदे हा एक वीर शिंदे पराक्रमाच्या जोरावर पुढे येऊ लागला त्यामुळे शिंदेंचे बळ वाढलेले होते.
 
अहदनामा: सर्वोच्च कामगिरी
 
     त्यात पुन्हा अब्दालीचे संकट कोसळले. त्याची तिसरी स्वारी १७५१ मध्ये झाली. त्यावेळेस मोगल बादशहा अहमदशहा विरुद्ध वजीर सफदरजंग यांच्यामध्ये संघर्ष सुरु होता व त्याचाच फायदा घेऊन अब्दालीने ही स्वारी केली होती. अब्दाली चालून आला तेव्हा सफदरजंग, रोहिले व पठाणांशी लढण्यात मग्न होता व त्याला शिंदे-होळकरांचे सहाय्य लाभले होते. या लढाईत दत्ताजी, साबाजी शिंदे तसेच तुकोजी तसेच खंडेराव होळकरही जयाप्पा आणि मल्हाररावासोबत सामिल झाले होते. बंगश व रोहिल्यांचा पराभव केल्यानंतर तेवढ्यात अब्दाली पंजाबला पोचला आहे हे समजताच घाबरलेल्या बादशहाने सफदरजंगाला बोलावणे पाठवले.
     अब्दालीचे हे वारंवार होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि एतद्देशीय शत्रूशी युद्ध करण्याएवढी शक्ती आता पातशाहीत राहिली नाही हे ओळखलेल्या सफदरजंगने अब्दालीविरुद्ध लढण्यासाठी व पातशाहीच्या रक्षणासाठी पातशहाच्या वतीने जयाप्पा शिंदे व मल्हाररावाशी करार केला. या कराराला अहदनामा असे म्हणतात.
     शिंदे व होळकर अब्दालीचा पाडाव करण्यासाठी दिल्लीकडे निघाले खरे पण पातशहाने दोघे दिल्लीला पोचण्याआधीच अब्दालीशी तह करून त्याला पंजाब देऊन टाकला होता. दिल्लीतील अंतर्गत परिस्थिती विस्फोटक बनली होती. पण अहदनाम्यामुळे पेशवे दरबार व संपूर्ण भारतात मराठ्यांची शक्ती काय आहे हे दिसून आले. या अहदनामा करारावर मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांनी पेशव्यांच्या वतीने सह्या केल्या होत्या. यामुळे शिंदे व होळकर यांची राष्ट्रीय प्रतिष्ठा शिखराला पोचली. मराठे देशाचे भाग्यविधाते असू शकतात ते केवळ शिंदे-होळकर या पराक्रमी सेनानीमुळे हा विश्वास जागला. मराठेशाहीशी प्रतिष्ठा वाढली. पेशवे दरबाराला यामुळे असूया वाटणे स्वाभाविक असले तरी त्यांनी या कराराला संमती दिली.
 
कुंभेरी वेढ्याचा प्रसंग
 
     १४ मार्च १७५१ ते एप्रिल १७५२ या काळात खंडेराव होळकर सफदरजंगाला सहाय्य करण्यासाठी बंगश व रोहिल्यंविरुद्धच्या मोहिमेत सामील झाला होता.फतेहगढ आणि फारुकाबादच्या युद्धांत  बंगश व रोहिल्यांचा पराभव करण्यात आला. त्याच्या बहुतेक मोहिमा, तुकोजीराजांप्रमानेचमल्हाररावांसोबत झाल्याने मल्हाररावांच्या विजयांत त्यांचा सहभाग होतापरंतू त्यांचे स्वतंत्र वृत्तांत उपलब्ध नाहीतपण महत्वाचा वृत्तांत गोसरदेसाई देतातते आपल्या New History of the Marathas: The Expansion of Maratha Power, 1707-1772 या ग्रंथात खंडेरावास दिलेल्या स्वतंत्र व महत्वाच्या मोहिमेची माहिती देतात.
     सुरजमल जाटाने दिल्लीवर स्वारी करुन १० मे १७५३ रोजी दिल्ली ताब्यात घेतली. सफदरजंगाला वजीरीवरुन हटवत इंतिजामला वजीरी दिली. मीरबक्षीही बदलला. यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण पुर्ण ढवळून निघाले. तोवर अहदनाम्याबाबत माहिती द्यायला व त्यांची अधिकृत मान्यता मिळवायला मल्हारराव व जयाप्पा शिंदे पुण्याकडे गेलेले होते. दिल्लीच्या रक्षणासाठी २१ नोव्हेंबर १७५३ खंडेराव दिल्लीत ४००० सैन्यासह आला.
     खंडेरावाने जाटावर चालून जावे अशा विनवण्या पातशहाने सुरु केल्या. खंडेरावाने त्या बदल्यात आग्रा सुभा मागितला. पातशहा आग्रा सुभा गमवायला तयार नव्हता पण त्याने खंडेरावाची मनधरणी गाजीउद्दिनमार्फत सुरु ठेवली.  भेटवस्तू व मानाची वस्त्रेही (खिल्लत)  दिली पण ती न घेताच खंडेराव आपल्या छावणीत गाजीउद्दिनसह परतला.
 
     पण मल्हाररावाकडून पुण्याहून सुचना आल्याने खंडेरावांनी जाटांची मोहिम हाती घेतली. भरतपुरच्या परिसरात हल्ले सुरु केले. पलवालजवळची जाट खेडी उध्वस्त करुन टाकली. फेब्रुवारी १७५४ पर्यंत खंडेराव भरतपुरचा आसपासचा परिसर लुटत होता. सुरजमल जाट कुंभेरीच्या अभेद्य किल्ल्यात लपून बसला होता. खंडेरावाला तहाचे निमंत्रण देऊनही खंडेराव गप्प बसेना तेंव्हा त्याने मल्हाररावाकडे आपला वकील रुपराम चौधरी  पाठवला व चाळीस लाखाची खंडणी द्यायला तयार झाला. पण हे राघोबादादाला मान्य नसल्याने मल्हारराव, राघोबादादा व जयाप्पा पुण्याहून निघून जाट मुलखात आले. खंडेराव तेथे होताच. येथेच सर्वांच्या सैन्याने मिळून कुंभेरीचा वेढा आवळायला सुरुवात झाली..
 
     याच युद्धात आघाडीवर लढत असतांना तोफेचा गोळा लागुन खंडेरावांचा मृत्यू झाला.
 
     खंडेरावाने जाटाच्या प्रदेशाची धुळधान केल्याने जाटाचा त्याच्यावर राग असणे स्वाभाविक आहे. जाट सैन्याने आघाडीवर असलेल्या खंडेरावाला मुद्दाम नेम धरुन टिपायचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. हा मृत्यू अपघात नव्हता असे मानायला जागा आहे. एक भविष्यातील उमदा योद्धा व मुत्सद्दी आपण गमावला. यामुळेच मल्हाररावांचा प्रचंड क्रोध झाला. "सुरजमल्लाचा शिरच्छेद करुन कुंभेरीची माती यमुनेत टाकीन!" अशी घोर प्रतिज्ञा मल्हाररावांनी संतापाच्या भरात केली होती.
 
     तत्पूर्वी मल्हारराव, राघोबादादा व जयाप्पा खंडेरावच्या मदतीसाठी कुंभेर किल्ल्याकडे येत असता जाटचा मुख्य कारभारी रूपराम कटारे चौधरी पुन्हा त्यांना येऊन भेटलाम होता. राघोबादादालाने  त्याच्याकडे वेढा उठवण्यासाठी राघोबाने पुन्हा एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. या रकमेवर तडजोड करणे सूरजमलसाठी अशक्य होते. सारी फौज कुम्भेरला पोचली व वेढ्याचा फास आवळला. या वेढ्या दरम्यान खंडेरावच्या मृत्यूची घटना घडली होती. राघोबादादाची ही मागणी पाहून, त्याने राघोबाला पाच गोळ्या आणि काही बारूद पाठवले, ज्यातून त्यांची लढण्याची तयारी दिसून आली आणि त्यांना कळवले की ते चाळीस लाख देतील, ज्यावर त्यांना समाधान मानावे लागेल, अन्यथा युद्धाची तयारी करावी लागेल.


     इमाद-उल-मुल्कच्या प्रेरणेने मराठे मुळात मुघल बादशहाच्या वतीने सूरजमलविरुद्ध मोहीम हाती घेत होते. तथापि, तरीही बादशहा आणि त्याच्या वजीराला मराठ्यांना यश मिळावे अशी इच्छा दिसत नव्हती. आणि राघोबादादा एक कोटीच युद्धखर्च म्हणून मिळावेत यावर ठाम होता कारण त्याला त्याचे महत्व सिद्ध करायचे होते. मल्हारराव तर या तहाच्या विरोधात गेला होता. सुरजमलचा विनाश हे त्यांचे एकमात्र ध्येय बनले होते. सुरजमल किल्ल्यात दडून बसला असल्याने आणि कुम्भेर किल्ला अभेद्य असल्याने हा वेढा किती काळ सुरु ठेवावा लागेल याबाबत जयाप्पा साशंक होता कारण रोजचा खर्च वाढतच चालला होता. त्यात पातशहाच चालुन येणार ही खबर असल्याने सारीच स्थिती अनिश्चित बनली होती.


     सूरजमलने या स्थितीचा सर्वोत्तम वापर करण्याचा निर्णय घेतला आणि रूपरामचा मुलगा तेजराम याला रात्री एक पत्र आणि स्वतःची पगडी देऊन जयाप्पाच्या छावणीत पाठवले. सुरजमलने पाठवलेल्या संदेशात म्हटले होते की, "आजच्या परिस्थितीत तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, मी धाकटा आहे. कृपया तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाने मला वाचवा."


     सुरजमलची ही चाल यशस्वी झाली कारण राघोबा आणि जयाप्पासमोरही त्यावेळेस अन्य पर्याय नव्हते. मल्हाररावाची कितीही इच्छा असली तरी हा वेढा दीर्घ काळ चालू ठेवणे त्यांना शक्य नव्हते कारण खुद्द पातशहाच आपली आधीची मानहानी विसरून जाटाला सहाय्य करण्यासाठी येत होता. सर्व विचार करून व यामुळे मल्हारराव नाराज होतील हे माहित् असूनही त्याने ही जबाबदारी स्वीकारली. राघोबादादाशी आधी चर्चा करून त्याने मल्हाररावास कळू न देता स्वतःची पगडी, बेल-भंडारा आणि आश्वासन देणारे पत्र सुरजमलला पाठवले.


     नंतर ही बातमी ऐकून मल्हारराव खूप अस्वस्थ झाला जयाप्पाबद्दल साशंक झाला. त्यामुळे राघोबादादा आणि सखाराम बापू एकत्र आले आणि त्यांनी मल्हाररावाशी चर्चा केली. “शिंदे आणि होळकर हे एका धडाचे दोन हात आहेत आणि त्या दोघांना कोणीच वेगळे करू शकत नाही, त्यामुळे वाद घालू नये अशी दोघांची समजूत काढली. त्यात सुरजमलने खंडेरावची छत्री आपण सन्मानाने उभारू असे मल्हाररावाला कळवले. प्राप्त स्थितीत तह करणेच श्रेष्ठ हे शोकसंतप्त मल्हाररावाने लक्षात घेतले आणि आपली संमती दिली त्यामुळे तहाची सूत्रे जयाप्पाच्या हाती गेली आणि चाळीस लाख घेउन हा तह मान्य झाला.


     जयाप्पाने हा तह करण्याचा निर्णय व्यक्तीगत मतभेदांमुळे घेतला नसून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीतून कुंभेरला अडकून पडलेल्या एवढ्या सैन्याचा वेळ जाऊ नये म्हणून. या तहाच्या वाटाघाटी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांपर्यंत चालल्या. मल्हाररावानेही हा प्रश्न प्रतिष्ठेचा अथवा सूडाचा केला नाही. हा तह जयाप्पामुळे केवळ चाळीस लाखात झाला. पण यामुळे मल्हाररावाचा क्रोध कमी होणार नव्हता. याचा बदला त्यांनी सिकंदराबादला (१७५४) मुघल सम्राट अहमद शाह बहादूरच्या शाही  मुघल सैन्याचा पराभव करून घेतला. यात आपला पातशाही जनाना तेथेच सोडून पळून गेला. खरे शत्रू कोण हे शिंदे-होळकर या उभयताना माहित होते. मतभेद झाले तरी त्यांना त्यांनी वैमनस्यात बदलू दिले नाही हे नंतरच्या घटनांवरूनही सिद्ध होते.
 
जयाप्पाचा अकाली आणि दुर्दैवी अंत
 
     उत्तरेत अशीच प्रतिष्ठा प्राप्त करत असताना १७५५ मध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडली की तिने शिंदे घराण्याला जबरदस्त धक्का दिला. नानासाहेब पेशव्याने जयाप्पाला एक आज्ञा पाठवली की जोधपूर संस्थानात वारसाहक्काबद्दल विजय सिंग आणि राम सिंग यांच्यात विवाद सुरु असून राम सिंगास गादीवर आणण्यास सहाय्य करावे. या वादात जयपूर संस्थानचा राजा माधो सिंगही पडला. तो मल्हाररावाचा राजकीय मित्र असल्याने जयाप्पाचा असा समज झाला की मल्हाररावच त्याला भडकावत आहेत व राठोडांना मदत करत आहेत. प्रत्यक्षात मल्हारराव तेव्हा दोआबात रोहील्ल्यांशी संघर्ष करण्यात व्यस्त होता. त्याला या विवादाची कल्पनाही नव्हती.


     पण जयाप्पाने बाळाजी यशवंत याला लिहिले आहे की त्याला त्याच्या मित्राशी कोणताही संबंध ठेवायचा नाही."


     विजय सिंगचा जोधपूरच्या शंभर मैल दक्षिणेस जालौरजवळ एक मजबूत किल्ला होता. त्याने आपली सर्व प्राचीन संपत्ती व युद्ध सामग्री संरक्षणासाठी तिथे साठवून ठेवली होती. राम सिंगने अचानक त्या जागेवर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले. लगेच त्याने त्याचे सहाय्यक जगन्नाथ पुरोहित आणि शिंदे सरदार संताजी वाबळे यांना पाठवले आणि जोधपूरलाच वेढा घातला. विजय सिंगच्या सैन्याला दुष्काळाचा सामना करावा लागला आणि त्यांना अन्न आणि पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध होऊ शकली नाही. यावरून शिंदेंना वाटले की राठोडांनी आता गुडघे टेकले आहेत. नागौरचा वेढा सुरूच होता, कोणताही उपाय दिसत नव्हता.


     त्यात उन्हाळा सुरू होणार होता. १७५५ च्या उन्हाळ्याच्या कडक महिन्यात, जयाप्पाने तौसर तलावावर तळ ठोकला आणि किल्ल्याला वेढा घातला. जयाप्पा आता जिद्दी झाला होता खरा पण त्या मोठ्या सैन्यासह वाळवंटात युद्ध करणे खूप कठीण झाले. त्याला पाणी आणि अन्नाचा पुरवठा करता आला नाही. महिने महिने जाऊ लागले. इतर मोठ्या राजकीय हालचालीही वाट पाहत होत्या. जयाप्पा त्यामुळे बेचैन झाला कारण त्यांचा पूर्वापार मित्र सफदरजंग मरण पावला आणि हिंदू धार्मिक स्थळे आपल्या ताब्यात घेण्याची ती संधी वाया गेली.


     जयाप्पा एक हाडाचा सैनिक होता पण  आवश्यकतेनुसार एक पाऊल मागे हटण्याची आणि कुशलतेने आपले उद्दिष्ट साध्य करण्याचे कौशल्य त्याच्यात कमी पडत होते. पण वेढ्यामुळे विजय सिंगही अस्वस्थ असल्याने त्याला विजय भारतीच्या नेतृत्वाखालील त्याच्या दूतांमार्फत वाटाघाटी सुरू करण्यास भाग पडले.


     परंतु विजय सिंग अत्यंत कपटी होता. एकीकडे, त्याने जयाप्पाला भेटण्यासाठी आणि तहासाठी आपला दूत विजय भारती गोसावी याला पाठवले तर दुसरीकडे त्याने माधो सिंग, जाट इत्यादींसोबत गुप्त योजना आखल्या आणि उत्तरेकडून मराठ्यांना पूर्णपणे उखडून टाकण्याची तयारी सुरू केली.


     जरी या कटांना प्रत्यक्षात यश आले नाही तरी, जयाप्पा शिंदेविरुद्ध उत्तरेकडे काही प्रमाणात द्वेष पसरला. जयाप्पाने वेढा उठवण्यासाठी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली जी विजय सिंहाच्या क्षमतेपेक्षा जास्त होती. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले.


     हा एक वाळवंटी प्रदेश असल्याने जयाप्पाला किल्ल्याला सुरुंग लावणेही अशक्य झाले. परिस्थिती टोकाला पोहोचली. ही बातमी पेशव्यांकडे पोहोचवली गेली. पेशवे आणि इतरांनी जयाप्पांना विविध प्रकारे सांगितले की त्यांनी काही युक्तीने प्रकरण संपवावे आणि योग्य नियोजन करून ते नंतर त्यांचे इच्छित परिणाम साध्य करू शकतील. पेशव्यांनी जयाप्पाला एक पत्र पाठवून सांगितले की, "तुम्हाला तिथे साध्य करण्यासाठी आता दुसरे कोणतेही उद्दिष्ट शिल्लक नाही. मल्हारबाला विश्वासात घ्या, तह करा आणि वेढा उठवा."


     पण जिद्दीला पेटलेल्या जयाप्पाने या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. कराराच्या वाटाघाटी इतक्या शिगेला पोहोचल्या होत्या की, इतक्या दीर्घ वेढ्यातून किल्ला न जिंकताच मागे हटणे जयाप्पाला मंजूर झाले नाही.


     जून १७५५ च्या उन्हाळ्याच्या हंगामात बाह्य उष्णतेमुळे दोन्ही पक्षांमधील लोक आधीच हैराण झालेले होते. त्यामुळे परस्पर राग टोकाला गेला. राजपूतांना टोकापर्यंत ढकलण्यात आले होते त्याचा संताप त्यांच्या मनात होता.


      विजय भारती गोसावी हा एक कुशल, बोलका आणि षड्यंत्रकारी मुत्सद्दी होता जो जयाप्पाला असंख्य खोटे बोलून चालढकल करत होता. जयाप्पाची छावणी नागौरच्या बाहेर तौसर तलावाच्या काठावर होती. करारासाठी वाटाघाटी अनेक महिने सतत चालू असल्याने या वाटाघाटींसाठी, दोन्ही छावण्यांमध्ये दूत आणि मध्यस्थांचा समावेश असलेली सतत ये-जा सुरू होती आणि ती बराच काळ चालली. गोसावीसोबत मध्यस्थ म्हणून इतर अनेक लोक आणि काही नोकर असायचे. या भेटींमध्ये काही गैरप्रकार असल्याचा संशय घेण्याचे कोणतेही कारण नव्हते. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी जयाप्पाला संपवण्याचा राजपूतांनी कट रचला.


     आषाढ महिन्याच्या मावळत्या पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी, २५ जुलै १७५५ रोजी, शुक्रवारी सकाळी, विजय भारती गोसावी जयाप्पाला भेटण्यासाठी मराठा छावणीत आला. त्याच्यासोबत राजसिंग चौहान, जगनेश्वर आणि इतर अनेक जण होते, तर जयाप्पासोबत उदयपूरच्या राणाचे दूत रावत जैतसिंग सिसोदिया होते, जे पूर्वी मराठा छावणीत होते. गोसाव्यांच्या वेशात विजयसिंगचे काही प्रतिनिधी जयाप्पाला भेटायला गेले. जयाप्पाचा तंबू त्याच्या छावणीच्या मध्यभागी होता आणि त्याच्याभोवती काही मोकळी जागा होती.


     या दुर्दैवी दिवशी जयाप्पा नुकताच स्नानगृहातून बाहेर आला होता आणि उघड्यावर त्यांच्याशी बोलण्यासाठी एका आसनावर बसला होता आणि त्याचे भिजलेले केस वाळवत होता. चर्चा बराच वेळ चालली आणि संतप्त वादात रूपांतरित झाली. चर्चा शिगेला पोहोचली असतानाच, गोसावी आणि चौहान यांच्यासोबत काही मारेकरी होते त्यांनी संधी साधली आणि जयाप्पाचा विश्वासघात केला.


     जोधपूरच्या दूताने अचानक जयाप्पावर खंजीर चालवला. त्यामुळे तो प्राणघातक जखमी झाला. जयाप्पाच्या जवळच्या सहकाऱ्यांनी गोसावी, जगनेश्वर आणि चौहान यांना तिथेच ठार मारले. त्यांच्यासोबत उदयपूरचे दूत रावत जैतसिंग यालाही मारण्यात आले. मराठ्यांनी संपूर्ण छावणीत जे जे राजपूत आढळले त्यांची निर्दयीपणे कत्तल केली. रूपनगरचे सरदार सिंग देखील छावणीत होते, ज्यांना मोठ्या कष्टाने वाचवण्यात आले. जनकोजीच्या स्वतःच्या पत्रात असा उल्लेख होता की, "या दिवशी विजय सिंगने तीर्थरूप (वडिलांचा) विश्वासघात केला, मारेकऱ्यांना दख्खनी कपडे घालून पाठवून त्याच दिवशी स्वर्गवास केला. एक मोठा विश्वासघात झाला. आता नागौर काबीज करणे अत्यंत आवश्यक आहे. विजय सिंगचा पूर्णपणे पराभव करूनच आपली प्रतिष्ठा वाचेल. काळजी करू नका."


     जयाप्पाच्या अशा विश्वासघातकी हत्येमुळे मराठा सैन्यात शोककळा पसरली. मराठेशाहीला हा मोठा धक्का तर होताच पण शिंदेशाहीला लागलेले हे एक प्रकारे ग्रहण होते. जयाप्पानंतर वारस म्हणून त्याचा पुत्र जनकोजीची नियुक्ती करण्यात आली असली तरी जनकोजी अद्याप एक शिकाऊ उमेदवार असल्याने शिंदेशाहीचा प्रत्यक्ष कारभार जयाप्पाचा धाकटा भाऊ दत्ताजीकडे सोपवण्यात आला. जयाप्पाच्या मृत्यूचा शोक करत बसण्यापेक्षा त्याने तातडीने आधी विजय सिंगाचा बिमोड करण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला.
 
·           

बचेंगे तो और भी लढेंगे ...दत्ताजी शिंदे

       जयाप्पाची हत्या झाल्यानंतर संतप्त दत्ताजीने विजय सिंगविरुद्ध व्यापक आघाडी उघडली . विजय सिंग ( यालाच बिजो सिंग असेही म्हटले जाते...