Sunday, September 28, 2025

बायजाबाई शिंदे




दौलतराव शिंदे ह्याची पत्नी बायजाबाई यांची बरीचशी महिती प्रसंगोपात्त दिलेली आहेच. दौलतरावाच्या मृत्युनंतर या महाराणीला कोणत्या प्रसंगांतून जावे लागले याची थोडक्यात माहिती या प्रकरणात देत आहे. शिंदेशाहीतील ही एक अत्यंत थोर नावाजलेली महिला होती. दौलतरावाची इच्छा तिनेच राज्य सांभाळावे अशी होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आह्यर्स्त याचीही इच्छा बायजाबाईने शिंदेने संस्थानाचा कारभार पहावा अशीच होती व तसे त्याने शिंदे दरबाराला लिहिलेही. पण वैदिक धर्मशास्त्राचे खूळ घेउन बसलेल्या तिच्या दरबारी लोकांनी तिने दत्तक घेतलाच पाहिजे असा हेका धरणे सुरु केले.

     त्यामुळे शेवटी बायजाबाईने फारसे आढेवेढे न घेता कण्हेरखेड येथील चांगजी शिंदे शाखेतील पाटलोजीचा मुकुटराव हा १०-१२ वर्षाचा मुलगा सर्वसंमतीने दत्तकविधानासाठी निवडला व त्याला जनकोजी (दुसरा) हे नाव देऊन त्याला दत्तक घेण्यात आले. बायजाबाईने त्यास नात-जावईही करून घेतले. शिंदे घराण्याचा नवा वारस अशा रीतीने गादीवर आला.  

     जनकोजी वयाने अजून लहान असल्याने बायजाबाई आपला बंधू हिंदुराव घाटगे याच्या मदतीने दौलतीचा कारभार पाहू लागली. तिने जुन्या-जाणत्या सेवकांचा व अधिकार्यांचा उचित सन्मान तर ठेवलाच पण प्रजाहिताचेही अनेक निर्णय घेतले. आपल्या पित्याची म्हणजे सर्जेराव घाटगे याची हत्या झाल्याचे तिला दु:ख असले तरी तिने त्याबाबत कसलाही त्रागा केला नव्हता. तिला आपल्या बापाची योग्यता काय आहे हे मनोमन माहित होतेच.

     इंग्रजांनी बायजाबाईची स्वायत्तता मान्य केले असली तरी त्यांच्या मनात नेहमीच एक धूर्त राजकारण खेळत असायचे. सुर्जी-अंजनगावला केलेल्या तहातील कलमे त्यांनी एकामागून एक रद्द करण्याचा घाट घातला. दक्षिणेतील शिंदेच्या ताब्यात असलेली इनामे गावे  सोडून देण्याचा प्रस्ताव इंग्रजांनी सादर केला व बायजाबाईवर त्यावर सही करण्यासाठी दडपण आणले जाऊ लागले. बायजाबाईने या प्रस्तावास खंबीरपणे विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनी अजूनच दडपण वाढवले. संघर्षाची स्थिती निर्माण झाली. अखेरीस अनेक वाटाघाटी करून काही गावे सोडून देऊन बायजाबाईने सर्वनाशे समुत्पन्ने या न्यायाने बरीच गावे वाचवली.

     बायजाबाईने राज्यातील चोर-दरोडेखोरांचा उपद्रवही बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात यश मिळवले त्यामुळे ती प्रजेताही लोकप्रिय झाली. मध्य भारतातील तो काळ अत्यंत अंदाधुंदीचा होता आणि अशा संक्रमणाच्या काळात राज्य चालवणे सोपे नसताना बायजाबाईने आपल्या सैन्याचे नव्याने व्यवस्थापन करत अत्यंत कुशलतेने आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली.

     बायजाबाईला उत्तम अश्वारोहण येत असे. शस्त्र चालवण्यातही ती कुशल होती. ती सुंदर तर इतकी होती कि तिला दक्षिणेची सौंदर्यलतिका असे सार्थ बिरूद दिले गेले होते. बोलण्यातही ती चतुर होती. देशात चाललेले राजकारण तिला चांगले समजत असे. त्याचा  उपयोग इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा करताना तिला होत असे. ती कडक अवश्य होती पण क्रूरबुद्धीचे नव्हती असे इंग्रजांनीही तत्कालीन गॅझेटमध्ये लिहिलेले आहे.   

     १८३३ पर्यंत तिने प्रत्यक्ष कारभार पाहिला पण जनकोजीने केलेल्या बंडामुळे तो आता जनकोजीच्या हाती गेला आणि येथेच बायजाबाईवर दुर्दैवे ओढवायला सुरुवात झाली.  या बंडाची कहाणी अशी. अजाणता जनकोजी बायजाबीशी कधीच चांगले वागत नसे. तिच्याशी उद्धट वर्तन करत असे. बायजाबाईने त्याला राज्यकारभाराचे शिक्षण न दिल्याने आणि तिची सत्ता सोडण्याची इच्छा नसल्याने जनकोजी वाह्यात झाला व मनमानी करू लागला असे काही इतिहासकार म्हणतात पण पारसनीस यांच्या मते त्यात तथ्य नाही. जनकोजी मुळात अत्यंत नीच दर्जाच्या लोकांच्या संगतीत गेल्याने व कुसल्ले मिळाल्याने तो बायजाबाईशी चुकीचे वर्तन करू लागला असा त्यांचा अभिप्राय आहे. हे योग्यही आहे कारण दौलतरावानेच दत्तक घेण्याऐवजी बायजाबाईनेच दौलतीचा कारभार पहावा अशी इच्छा व्यक्त केली होती तरीही बायजाबीने दरबाराच्या सल्ल्यानेच दत्तक घेतला होता व ज्या दिवशी जन्कोजीला दत्तक घेतले त्याच दिवशी तिला हे माहित असणार की आपली सत्ता कमी काळ चालेल.

     १८३० साली जनकोजीला विवाहात दिलेली बायजाबाईची नात मरण पावली त्यामुळे जनकोजीने दुसरा विवाह केला. बायजाबाईशी त्याचे उडणारे खटके इंग्रज सरकारपर्यंत पोचले व त्यांनी अल्पज्ञानी जनकोजीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण जनकोजी त्यांच्याशीही असभ्यपणे बोलला. बायजाबाईच्या ताब्यात राहूनच काम करा असा इशाराही इंग्रजांनी त्याला दिला होता. पण जनकोजीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे बायजाबाईला खूप मन:स्ताप झाला.

     सन १८२७ ते १८३२ पर्यंत बायजाबाईने अत्यंत धोरणी पद्धतीने राज्याचा विकास केला. व्यापार-उदीम वाढवला. इंग्रजांशीही अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. राज्यातील ठग आणि पेंढारी यांचाही बंदोबस्त केली. महसुली व्यवस्था सुरळीत केली.

     पण काही दुष्ट लोकांच्या मदतीने तिला कळू न देता जनकोजीने सैन्यातच फुट पाडली आणि १० जुलै १८३३ रोजी बंड केले. बायजाबाईने ते थोपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याच रात्री जनकोजीला सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला आणि महालात घुसून दोन सैनिकांनी बायजाबाईस कैद करण्याचा प्रयत्न केला. पण बायजाबाईने या अभेद्य वेढ्यातून सुटून जाण्याचे कौशल्य दाखवले व इंग्रज रेसिडेंटच्या निवासस्थान गाठले.  एक तंबू टाकून त्यात राहण्याची तिच्यावर वेळ आली.  

     पण कसेही करून बायजाबाईला पकडायचा निश्चय केलेल्या जनकोजीने १३ जुलै रोजी रेसिडेंटच्या निवासस्थानावरच हल्ला करून बायजाबाईस पकडायचे ठरवले. पण रेसिडेंट कॅव्हिंडोश याने बायजाबाईला ग्वाल्हेर सोडायचा सल्ला दिला. जणू इंग्रजांनीही तिची साथ सोडली होती याचेच हे निदर्शक होते. किंबहुना चाणाक्ष बायजाबाईपेक्षा पोरगेलासा जनकोजी आपल्याला जास्त उपयुक्त ठरेल असा इंग्रजांचा होरा असावा. बायजाबाई नाईलाजाने ग्वाल्हेरहून निघाली आणि मजल-दरमजल करत आग्रा येथे पोहोचली. हा प्रवास खूप कष्ट आँई त्रासाचा तर होताच पण धोक्यांनी भरलेला होता.

     बायजाबाई गेल्यानंतर इंग्रजांनी जनकोजीला राज्याधिकार दिले ब अलीजाबहादर ही महादजी शिंदेने अतुल पराक्रम गाजवत प्राप्त केलेली पदवीही वापरण्यास मुभा दिली. पण जनकोजीने राज्यकारभार हाती घेताच राज्यात बेबंदशाहीची परिस्थिती निर्माण झाली. लष्करी लोकांचेच तर हे राज्य नव्हे ना असे वाटावे अशी स्थिती आली. जनकोजीने बायजाबाईच्या काळात नेमलेल्या विश्वासू लोकांना पदमुक्त केले आणि चुकीचे लोक कारभारासाठी निवडले याचा हा परिपाक होता.

     बायजाबाई आग्र्यास पोचल्यानंतर तिने इंग्रजांशी आपले राज्य परत मिळावे यासाठी अर्ज-विनंत्यांचा सपाटा लावला पण इंग्रजांनी तिकडे साफ दुर्लक्ष केले. उलट त्यांना काशीस किंवा दक्षिणेत जावे असा हुकुम काढून एक महिन्याची मुदत दिली. हा हुकुम पाळणे मनी स्वतंत्र बुद्धीच्या बायजाबाईस शक्य नव्हते. मग इंग्रजांनी कॅप्टन रॉसच्या सैन्याला तिला अलाहाबाद येथे आणण्यास फर्मावले. रॉसने आदेश पाळला व बायजाबाईची ही अप्रत्यक्ष कैद सुरु झाली. या काळात तिच्या अनंत हालअपेष्टा झाल्या.

     नंतर १८४० साली इंग्रजांनी तिला नाशिक येथे निवासास पाठवून तिची सालाना चार लाख रुपये पेन्शन चालू केली.

     ७ फेब्रुवारी १८४३ रोजी जनकोजीचा मृत्यू झाला. त्यासही औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी जनकोजीच्या अल्पवयीन पत्नी ताराबाई हिच्या मांडीवर शिंदे घराण्यातील एक मुलगा निवडून त्याचे नाव जयाजीराव ठेवत त्याला दत्तक घ्यायला अनुमती दिली. पण याचाही काळ अशांतीचा होता. इंग्रजांशी त्याने वैर घेतले. ते इतके टोकाला गेले की इंग्रज सैन्य ग्वाल्हेरकडे चालून यायला लागले. शिंदे आणि इंग्रजात महाराजपूर येथे युद्ध झाले त्यात जयाजीरावच्या सैन्याचा पराभव झाला.

     या युद्धामुळे त्याला ग्वाल्हेर संस्थानचा काही प्रांत इंग्रजांना द्यावा लागला. १८५३ पर्यंत मंत्रीमंडळच राज्याचा कारभार पाहत होते, पण आता जयाजी वयात आल्याने त्याच्या हाती ग्वाल्हेर संस्थानाची मुखत्यारी आली.

     बायजाबाई तोवर नाशिक येथेच होती. तिने या काळात विशेष राजकीय हालचाली केल्या नसल्या तरी या काळात काही घाट व मंदिरांची निर्मिती केली. जयाजी शिंदेशाहीच्या गादीवर आरूढ होताच तिने ग्वाल्हेर गाठले. जयाजीने तिला मात्र अत्यंत सन्मानपूर्वक वागवले.

     १८५७ साली झालेल्या बंडात ग्वाल्हेर संस्थानाने सामील होण्यास नकार दिला. बायजाबाईस हे कोणी नेता नसलेले बंड यशस्वी होईल यावर विश्वास नव्हता. पण सैन्यात मात्र बंडाची लागण झालेली होती त्यामुळे बहुतेक सैन्य जयाजीला सोडून गेले. इंग्रजांना त्याचा या बंडात सहभाग असावा असा संशय होता पण तो निर्मुल होता. तात्या टोपेने ग्वाल्हेर ताब्यात घेताच जयाजी आणि बायजाबाईने इंग्रजांचे संरक्षण मागितले. त्यांनी ग्वाल्हेर सोडले. ग्वाल्हेर सरासरी १० दिवस  बंडवाल्यांच्या अखत्यारीत राहिले पण त्यांनाही ग्वाल्हेर खाली करावे लागले.

     हा बायजाबाईचा वृद्धापकाळ होता. तिने दौलतरावाच्या उत्कर्षात अनमोल सहाय्य केले होते. तिला जीवनात एखाद्या शोकांतिकेत शोभतील अशा घटनाही पहाव्या आणि भोगाव्या लागल्या. तरीही तिने स्वत: १८२७ ते १८३३ पर्यंत अत्यंत कुशलतेने राज्य चालवले. हयातीतच ती एक दंतकथा बनून गेली. तिच्या कार्यकाळाचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी करून ठेवले आहे. शिंदे घराण्यातील स्व-कर्तुत्वावर गाजलेली ही पहिली महिला.

     तिचा मृत्यू २७ जून १८६३ रोजी ग्वाल्हेर येथे झाला.

·             

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...