Sunday, May 6, 2012

भविष्याचे तत्वद्न्यान






भविष्याचे कुतुहल कोणात नसते? अगदी अंधश्रद्धानिर्मुलनवालेही आपापले भविष्य रोज पेपरांत वाचत असावेत असा माझा कयास आहे. मीही वाचत असतो. आपापले भवितव्य जाणुन घ्यावे हा माणसाला पुरातन काळापासुन जडलेला छंद आहे. जगातील कोणताही समाज या जिद्न्यासेतुन मुक्त नाही. वैद्न्यानिकही यापासुन मुक्त नाहीत. विश्वाचे भविष्य व त्याचा शेवट कसा असू शकेल यावर अनेक सिद्धांत मांडले जातातच कि! जगबुडी येणार ते बिग क्रंच होवून विश्व नाश पावणार अशा अनेक व्युत्पत्त्या विश्वाच्या भवितव्याबाबत दिल्या जातातच. भुतकाळ आहे तर भविष्य असनारच यावर अविश्वास ठेवणारा कोणीही मानवप्राणी माझ्या पाहण्यात वा ऐकिवात नाही. काल...आज व उद्या ही निसर्गाची मांडनी नित्य अनुभवास येत असतेच. "काल" हा स्मृतिगम्य असतो तर आज हा अनुभवगम्य असतो तर नंतर वा उद्या हा काल्पनिक असला तरी काळ या अद्न्यात पटलावर भविष्यही कोठेतरी असनारच हा विश्वास वाटणे तसे तर्कशुद्ध व स्वाभाविक आहे. आणि ते भवितव्य निश्चितच असते त्यामुळे ते आजच वर्तमानात जाणुन घेता आले तर किती बहार येईल असा तर्क मानवी बुद्धीचा असतो. आणि त्यासाठी भविष्यकथनाच्या सोयी पुरातन काळापासुन मानवाने लावल्या आहेत व त्याच्या एवढ्या शाखा आहेत कि आधुनिक विद्न्यानही गोंधळुन जावे.



असो.



व्यक्तीचे भविष्य असते हे ग्रुहित आपण मान्य करुयात...कारण ते पुर्वनियोजित असो अथवा नसो...भवितव्य हे वर्तमानात येतेच हा आपला नित्य अनुभव झाला. काळ हा भुतकाळाकडुन भविष्याकडे वाहतो कि भविष्यतुन येत भुतकाळात विलीन होतो हा तत्वद्न्यानाच्या क्षेत्रातील नेहमी चर्चिला गेलेला विषय आहे. मीही माझ्या "शुन्य महाभारत" या कादंबरीत आणि "नीतिशास्त्र" या ग्रंथात यावर पुष्कळ चर्चा केलेली आहे. "काळ" ही राशी वैद्न्यानिक व तत्वचिंतकांना नेहमीच कोड्यात टाकत आलेली आहे. असे असले तरी काळ या राशी अस्तित्वात आहे पण तिचा नेमका संबंध कोणत्या विश्वतत्वाशी जोडावा हा संभ्रम आजही मिटलेला नाही. आईन्स्टाईन काळ-अवकाश ऐक्य कल्पत या विषयाचा निर्वाह लावू पहातात, परंतु अवकाश आणि काळ यांचे गुणधर्म सर्वस्वी भिन्न असल्याने अवकाश व काळ या राशी एकरुप मानण्यात अडचण येते. ही अडचण म्हणजे "एक बिंदु ते दुस-या बिंदुतील अंतर क्रमण्यासाठी लागणारे संदर्भ-अवकाश म्हणजे काळ." ही व्याख्या कामी येत नाही. प्रकाशाला जो वेळ लागतो तो प्रकाशवेगाची जी स्थिरांक म्हणुन योजना केलेली आहे तो प्रकाशवेग अनेक संदर्भव्युहांतुन प्रवास करत असतांना वेगवेगळा असतो. जर मुळात प्रकाशवेगच स्थिर नसेल तर तो स्थिरांक म्हणुन ग्रुहित धरणे व म्हणजेच E=MC2 हा सिद्धांत मान्य करणे ही एक मोठीच चुक होवून बसते. येथे काळ आणि अवकाश यांच्यातील तादात्म्य गृहित धरल्याने या सिद्धांतात मोठाच दोष निर्माण होतो. तसेच प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे मुलकणच (वा अन्य फोर्सेस) अस्तित्वात नाहीत असाही आविर्भाव या सिद्धांतातुन निर्माण होतो.



पण ते खरे नाही. "अंतर" हे अवकाशामुळे निर्माण होते. उदा. पृथ्वी ते सुर्य यात जे अवकाश आहे त्यामुळे हे अंतर मोजता येते. प्रकाशवेगाची संदर्भ चौकट वापरली तर पृथ्वी ते सुर्य हे अंतर सात मिनिटांत ओलांडता येईल. पण समजा ताशी साठ हजार कि.मी. या वेगाने एखादे अवकाशअयान निघाले तर? तर काळाच्या व्याख्या बदलतात. भविष्यही बदलते. म्हणजे काळ ही राशी वेगाच्या संदर्भ चौकटीशी अपरिहार्यपने बांधली गेली आहे असेच आपल्याला दिसते.



आईन्स्टाईन यांनी याचमुळे कि काय प्रकाशवेगाने एखादी व्यक्ती गेली तर त्याचे घड्याळ कसे वर्तन करेल याबाबत व्यापक सापेक्षतावाद सिद्धांतात चर्चा केलेली आहे. पण ती खरी नाही. घड्याळ मंद पडु शकत नाही. कारण मुळात प्रकाशवेगाची सीमांत रेखा हीच काल्पनिक आहे. एकार्थाने ती कविकल्पना आहे. भौतिक सत्य नाही. प्रकाशवेग हा अनेक भौतिक संदर्भ चौकटींत बदलता असतो हेच काय ते वास्तव आहे.



पण अवकाश म्हणजे नेमके काय? दोन बिंदुंमधील पोकळी म्हणजे अवकाश ही व्याख्या साधारणतया केली जाते. पण बिंदुअंतर्गतच्या अवकाशाचे काय करायचे? उदा. लघुत्तम घटक अणु हा बिंदु मानला तर अणुचा गाभा म्हणजे न्युक्लीयस हा समजा फुटबालच्या आकाराचा आहे असे कल्पिले तर मग जे इलेक्ट्रोन्स अणुगर्भाभोवती फिरतात ते दोन हजार किमी एवढ्या दूर अंतरावर असतात. म्हनजे अणुच्या आतही निखळ अवकाशच असते.



मग काळ आणि अवकाश यांचा नेमका संबंध काय हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर विचार करणे आवश्यक आहे. आईन्स्टाईन यांचे अवकाश-काल वक्र हा सिद्धांत येथे कामी येत नाही. गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी ही अवकाश-काल वक्राची कल्पना केलेली आहे व ती निखळ अशी गणिती कल्पनाच आहे. पण येथे एकच बाब लक्षात घ्यावी लागते ती ही कि अवकाश गुणविरहीत नाही एवढे तरी आईन्स्टाईन यांनी मान्य केलेले आहे. अवकाश जर गुणविरहीत असेल तर त्याचा वक्र कसा बनेल? पण त्रुटी ही आहे कि आईन्स्टाईन यांनी फक्त अवकाशच नव्हे तर अवकाश-काल असा वक्र गृहित धरला आहे आणि त्यांच्या सिद्धांतातील हे फार मोठे न्युन आहे. अवकाश हे गुणरहित नाही हे ठीक आहे व योग्य आहे. परंतु अवकाश-काल ही एकच एकत्रीत राशी गृहित धरली तर मात्र समस्या निर्माण होते व ती म्हणजे जर अवकाशाला "गुण" आहेत तसेच "काळ" या राशीलाही स्वतंत्र गुण आहेत...वा अवकाश व काळाचे गुणधर्म समान आहेत.



मुळात भवितव्य हे अवकाशाच्याच संदर्भ चौकटीत घडत असते. काळ ही राशी पुढुन मागे येते कि मागुन पुढे जाते हा वाद सध्या बाजुला ठेवला तरी तिचाही संदर्भ भवितव्याशी असतोच. म्हणजे अवकाशाच्या अस्तित्वाखेरीज मुळात भविष्य या संद्न्येला अर्थ रहात नाही. कारण कथित भुतकाळ काय...वर्तमान काय व भवितव्य काय...हे अवकाशाच्याच मर्यादेत असते. काळ पुढुन मागे येवो अथवा मागुन पुढे येवो...भवितव्य वर्तमानात येणे हे मात्र अनिवार्यच असते.



आता प्रश्न असा आहे कि भविष्य हे खरेच पुर्वनिर्धारित असते काय? या सृष्टीचा कोणी नियंता आहे काय कि ज्याने काय कसे घडायचे याचे पुर्वनिर्धारण करुन ठेवले आहे? वा असे आहे काय कि मुळात विश्व हेच कालनिबद्ध नसुन काळ ही राशीच मुळात अतार्किक आहे? म्हणजे भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ या राशीच अस्तित्वात नसुन मनुष्यप्राणी केवळ त्या सोयीसाठी वापरत आहे असे असू शकेल? काल, आज व उद्या ही त्रिगुणात्मक ढोबळ कालव्युह आपल्याला परिचित असतो. आपापल्या संदर्भ चौकटीत ते स्वाभाविकही आहे, परंतु याच संदर्भ चौकटीची व्यक्तीगत परिमानेही चकित करतील एवढी भिन्न टोकाची असतात. भौतिक घतनांबाबत ब-यापैकी भवितव्य वर्तवता येत हे आपल्याला माहितच आहे. उदा. ह्यलेचा धुमकेतु किती वर्षानंतर अवतरनार हे सांगता येते. पण अमुक एक उल्का प्रुथ्वीवर नक्की कोसळेल कि नाही हे मात्र सांगता येत नाही. आजवर याबाबतचे सर्वच अंदाज सफ चुकलेले आहेत. पावसाची अनुमानेही अशीच असंख्यवेळा खोटी ठरतात. म्हणजेच स्थुलतेकडुन आपण जसजसे सुक्ष्मात येवू लागतो तसतशी भविष्याबाबतची अनुमाने चुकत जातात.



असे घडते कारण सुक्ष्माकडे येत असतांना संदर्भचौकटींत वारेमाप वाढ होत जाते. कोणती संदर्भ चौकट मुलभुत पाया मानायची ही समस्या निर्माण होते. उदाहरण घ्यायचे तर आपण जी जन्मकुंडली मांडतो (पद्धत कोणतीही असो) त्यात ग्रह, राशी व नक्षत्रांचाच प्रामुख्याने विचार केलेला असतो. ग्रह-नक्षत्रांचा मानवी जीवनावर अथवा वर्तनावर परिणाम होत असेल काय? ढोबळमानाने त्याचे उत्तर होय असेच द्यावे लागते. मानवी मेंदु हाच मुळात जैव-विद्युती-तरंगांचा निर्माता असून या अगणित तरंगांचा समुच्चय म्हनजेच मन होय. आता ही तरंग निर्मिती स्वयंभू अशी नसुन तिच्यावर बाह्य तरंगांचा (विद्युत, गुरुत्व, भू-चुंबकीय, सौर-चुंबकीय, प्रकाश ई.) परिहार्य असा परिणाम होत असतो. हे तरंग ग्रहित करने व त्यानुसार त्या तरंगांचे स्व-साक्षेपीय उत्सर्जन होणे ही एक भौतिकी प्रक्रिया आहे जी अव्याहत चालु असते. या सर्व तरंगांचा परिणाम साधारण नसुन व्यक्तिसापेक्ष परिणाम वेगवेगळे असतात, याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मेंदुतील जैव-रासायनिक व खनिज घटकांचे वितरण वेगळे असते. त्यामुळे व्यक्तिगत प्रतिसादही साहजिकपणेच वेगवेगळे असतात. आता असे समजा कि एका विवक्षीत क्षणी व्यक्ति एखाद्या एकाकी स्तंभावर उभी आहे व तिला त्या ठिकाणावरुन अन्यत्र नेवु शकणारे हजारो दोरखंड शेकडो दिशांनी पसरलेले आहेत. अशा स्थितीत कोणत्या दोरखंडावरुन जायचे हा निर्णय व्यक्तीलाच करायचा आहे. त्याचा हा निर्णय हा कधीही ख-या अर्थाने व्यक्तिगत नसून त्याच्यावर प्रभाव टाकणा-या बाह्य व अंतर्गत प्रतिसादाचा एकुणातील परिणाम असतो व तो त्या क्षणीचा निर्नय हाच त्याचे भवितव्यही ठरवत असतो असे म्हटले तरी त्यास वावगे म्हणता येत नाही.



आधीच म्हटल्याप्रमाने स्थुलाचे भवितव्य वर्तवने सोपे असते कारण स्थुलाच्या सापेक्षतेतील संदर्भ चौकटी अत्यल्प असतात. सुक्ष्माकडे आपण जसे जातो तसतसे संदर्भ चौकटींचे प्रमाण वाढत जाते व नेमक्या कोणत्या चौकटीला प्रधान्य द्यावे हे समजणे अशक्यप्राय होवून जाते. आपण कुंडलीबद्दल बोलत होतो. आपली कुंडली हीच मुळात पुरेपुर शस्त्रीय पायावर नसते त्यामुळे तिचे वाचन हा अत्यंत ढोबळ दिशा देणारा असतो.



उदा. १. राहु-केतु हे ग्रह नाहीत. चंद्र तर उपग्रह आहे. पण कुंडलीत ते प्राधान्याने येतात. खरे तर त्यांचे भौतिक अस्तित्वच नसल्याने त्यांचा मानवी मनावर प्रभाव पडण्याची शक्यता शुण्य आहे.

२. सुर्य हा ग्रह नसुन तारा आहे, परंतु कुंडलीत मात्र त्याला ग्रहाप्रमाणेच वागवले असून तदनुरुप फले सांगितलेली असतात.

३. ग्रह, राशी व नक्षत्रे यांचे एकुणतील अंतर व त्यांचा मानवी जीवनावर पडनारा नेमका प्रभाव मोजण्याचे कोणतेही शास्त्र नाही. तसा अभ्यास नाही. वा तशी प्रायोगिक निरिक्षने करत हे शास्त्र निर्माण केले गेलेले नाही. सांगितलेली फले ही अक्षरश: अंदाजितच असतात. काही अंदाज खरे तर बहुतेक खोटेच ठरतात ते यामुळेच.

४. व्यक्ति जेथे निवास करत आहे तेथील सापेक्ष भु-गुरुत्व व भु-चुंबकत्वाचा या शास्त्रात मुळीच विचार केला गेलेला नाही.


थोडक्यात ज्याही कधीकाळी हे शास्त्र (?) निर्माण झाले त्या कालात जी अवकाशशास्त्रची अल्प-स्वल्प माहिती होती त्यावरच या शास्त्राची आजही मदार आहे. त्यात कोणीही नवीन संशोधन केलेले नाही. उलट जेवढे पुरातन ग्रंथ (उदा. नाडीग्रंथ) तेवढे ते अचुक असा अशास्त्रीय समज लोकांत व हे शास्त्र सांगणा-या तथाकथित लोकांत आहे. त्यामुळे या शास्त्राला ख-या शास्त्राचे स्वरुप कधीच आले नाही वा येण्याची शक्यताही नाही.


मग भवितव्याचे काय करायचे? ते असते कि नसते? नसेल तर विश्व हे अत्यंत विस्कळीतपणे चाललेले असून त्याला कसलीही निश्चिओत दिशा नाही असे म्हनावे लागते. "परमेश्वर जुगार खेळत असला पाहिजे" हे आईन्स्स्टाइन यांचेच म्हणणे खरे धरावे लागेल. आणि जर निश्चित असे भवितव्य असेल तर मग ते नेमके काय हे कळायचा एक वैश्विक घटक म्हणुन आपला नैसर्गिक अधिकार असला पाहिजे. कोणत्या भविष्याला चांगले व कोणत्याला वाईट म्हणायचे हे पुन्हा सापेक्ष परिणाम आहेत असे गृहित धरले तरी ते जर निश्चित असे असेल तर ते समजायला काही शास्त्र असु शकणार नाही काय?


माझ्या मते असू शकते. अवकाश अनंत नसून ते वस्तुमानच्या प्रमानातच, म्हणजे जर सीमित आहे तर काल हाही अनंत नसून तोही सीमित आहे व तोही वस्तुमानसापेक्षच आहे. काळ व अवकाश या दोन्ही स्वतंत्र राशी असून परस्पर निबद्ध आहेत. व्यक्ति हेही एक वस्तुमानच असल्याने त्याच्यातच तिन्ही काळ एकत्रीतपणे सामाविष्ट आहेत. त्यामुळे भुतकाळ व वर्तमानकाळ हे जर वास्तव आहे तर भविष्य हेही अर्थातच एक वास्तव आहे व ते कसे असनार याचा नेमकेपणा सर्व संदर्भ-चौकटींच्या परिप्रेक्षात ठरवता येवू शकतो...अर्थात त्यांचे नीट आकलन व शास्त्रीय पायावरच विश्लेषन असेल तरच!

1 comment:

  1. great sir...an excellent article..universe is filled with particles and waves...and exact source of both is not still discovered and accepted...but how can i believe statement"ग्रह-नक्षत्रांचा मानवी जीवनावर अथवा वर्तनावर परिणाम होत असेल काय? ढोबळमानाने त्याचे उत्तरहोय असेच द्यावे लागते..?? Yamule jyotishinchi chati tath hoil...plz yacha yogya refference dyava...thanx..:-)

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...