वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे.. |
सोमवार, १६ जुलै २०१२
आम्ही जे सांगतो आहोत ते सत्यच आहे, असा समज कुणाचाही असू शकतो आणि ब्लॉगजगतात या समजाचे विविध आविष्कार दिसतात. त्यापैकी जे आग्रही दावे केवळ स्वत:बद्दल किंवा आप्तस्वकीयांबद्दल असतात, ते निरुपद्रवी मानून वाचक पुढे जातो.
पण समाजाबद्दल किंवा भारतीय- महाराष्ट्रीय समाजरचनेत आजही ठसठसणाऱ्या ‘जाती’ या विषयाबद्दल असे ‘आपलंच खरं’ मानणारे आग्रही दावे कुणी ब्लॉगवर करत असेल, तर त्यामागचा हेतू केवळ सत्यकथनाचा आहे की उपद्रवी विधाने करण्याचा, असा प्रश्न वाचकाला पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या वाचकाला, ‘अब्राह्मणी’ ही संकल्पना व्यापक अर्थाची आहे हे पटत असेल, तरीही त्याला अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर ‘अब्राह्मणी’ या संकल्पनेचं जे स्तोम माजलेलं दिसतं, ते पटणार नाही. ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ हेच सत्य असल्याचा आग्रह अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरच्या अनेक (बहुतेक) नोंदींचा पाया आहे. ‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी. ही खात्री पटलेल्या वाचकांचे मग दोन तट पडतात : पहिला, ‘होय- तिरस्कारणीयच’ असा पवित्रा घेतो. दुसरा- आपल्यावरच तिरस्काराचा हल्ला झाला आहे असं समजून प्रतिहल्ल्याची तयारी करू पाहतो. स्वत: ब्लॉगलेखक वा लेखिकेला हा तिरस्कार हवाच असतो का, पसरवायचाच असतो का, याबद्दल संबंधित लेखकांनी जरूर बोलावं, पण अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरल्या प्रतिक्रिया पाहिल्या असता- ‘तिरस्काराच्या भावनेची चाहूल ब्लॉगलिखाणातूनच लागल्यामुळे पडलेले दोन तट’ आणि त्यानुसार प्रतिक्रियांचेही दोन प्रकार- हे उघडपणे दिसेल.
तिरस्कारजनक किंवा तिरस्कारजन्य प्रतिक्रिया संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर कमी दिसतात, याचं कारण त्यांच्या ब्लॉगवरलं लिखाण. ते सहसा केवळ तिरस्कारवादी किंवा तुच्छतावादी नसतं. आपण सगळेचजण आपला इतिहास समजून घेऊ.. ‘हे म्हणजे इतिहास’ एवढंच जे तथाकथित मुख्य धारेतल्या शैक्षणिक संधींनी आपणा सर्वाच्या माथी मारलंय त्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण कसे होतो हे पाहू, असा त्यांच्या ब्लॉगचा हेतू असावा असं नोंदींमधल्या विविध संदर्भामुळे लक्षात येत राहतं. म्हणजे या ब्लॉगची बैठक ही अभ्यासकाची आहे. शोधकाची आहे. त्यांच्या ब्लॉगचा हेतू केवळ इतकाच नाही. सोनवणी हे प्रकाशन-क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या स्वलिखित पुस्तकांची संख्याही भरपूर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. छापील माध्यम हाती असताना ब्लॉगसारखं संवादमाध्यम वापरून, चर्चा घडवून आणण्याकडे या ब्लॉगचा कल दिसतो. सभासदसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे चर्चा होतेसुद्धा. अगदी ‘शेतमालाचे निर्जलीकरण’ या विषयावरसुद्धा दिल्लीच्या प्रताप नलावडे यांनी ‘तापमान १४० हे चूक- फारतर १२० तापमान हवे’ अशी- म्हणजे ‘दाद- वाहवा’च्या पलीकडची प्रतिक्रिया दिली होती. या ब्लॉगला दाद मिळते, पण ती अभावितपणे. संजय सोनवणी हे मनस्वी लेखक आहेत आणि ते एकटे आहेत की एखादी टीम संजय सोनवणींचा ब्लॉग लिहिते असा प्रश्न पडतो, असा अभिप्राय संभाजी घोरपडे यांनी ११ जुलै रोजी दिला होता. ‘मनस्वी’ हा शब्द फार गुळगुळीत झालेला वाटेल, पण सोनवणींच्या ब्लॉगवरले लिखाण कसं असतं आणि ते तसंच का असते, हे समजून घेण्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. सोनवणी यांच्या लिखाणात अभ्यास, संकल्पना आणि व्याख्या यांची समज, पुरोगामित्वाच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि बुद्धिनिष्ठच राहण्याचा प्रयत्न हे सारे दिसत असले तरीही मध्येच साप, वांझ, षंढ.. असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात. हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे. लिखाणात एकतर मनस्वीपणा असू शकतो किंवा अभ्यासूपणा तरी. या दोन्ही तलवारी संजय सोनवणी यांच्या ब्लॉगमध्ये एकाच म्यानात दिसतात. बऱ्याचदा अभ्यासू लिखाण इतकं असतं की, या नोंदी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनं एखाद्या शिक्षकाकडून घेतलेल्या नोट्स- आहेत, असा भास व्हावा. पाणिनी आणि त्याचा काळ याबद्दलचं सोनवणी यांच्या ब्लॉगवरचं लिखाण हे असंच नोट्सवजा आहे. ब्लॉगनोंदीच्या साधारण कल्पनीय आकाराच्या मानानं ते बरंच लांबलचकही आहे. पण सोनवणी यांना अखेर एक निष्कर्ष मांडायचा आहे किंवा असलेल्या निष्कर्षांची बाजू घ्यायची आहे. ती बाजूच खरी, असा त्यांचा आग्रह नाही. उलट, ही माझी बाजू आहे आणि त्यावर तुम्ही चर्चा करू शकता, असं आवाहन त्यातून वाचकाला मिळू शकतं आणि अनेक वाचक ते घेतात, असं प्रतिक्रियांची संख्या आणि सूर यांवरून दिसून येतं. संजय सोनवणी यांचा ब्लॉग हा ‘यशस्वी’ ब्लॉगपैकी एक आहे. सोनवणी यांचे लेख अन्यत्र (दैनिकं, दिवाळी अंक) छापून येत असले, तरी ते इथे तसेच्या तसे डकवण्याचा उद्योग कमी आहे. आठवडय़ातून जवळपास तीन नोंदी, एवढय़ा संख्येनं वाचनसंधी देणारा हा ब्लॉग आहे. इथे विषयांचं वैविध्य असलं तरी ‘खऱ्या’ पुरोगामित्वाच्या शोधात सोनवणी आहेत आणि त्यांचा ब्लॉगयज्ञही त्यासाठीच आहे, अशी वाचकाची धारणा झाल्यास हा ब्लॉग वाचनीय ठरू शकतो. आजच्या पुरोगाम्यांचा धिक्कार करण्याची जी कारणं सोनवणी यांच्याकडे आहेत, ती एरवी पुरोगाम्यांना हास्यास्पद अथवा दुष्ट ठरवणाऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत. अगदी ताज्या, अलीकडच्या तीन नोंदींमध्ये परमेश्वर, धर्म आणि आनंद-दु:ख यांच्यावरचे विचार सोनवणी यांनी मांडले आहेत. हे विचार फक्त त्यांचे अर्थातच नाहीत. ते संस्कृतीचं आणि विचारधनाचं सार आहे.. त्यातून सोनवणी यांनी अमुकच का वेचलं, याचं स्पष्टीकरण त्यांच्या लिखाणातून मिळतं, हा त्या लिखाणाचा गुणच आहे. मात्र, शैलीदृष्टय़ा या तीन नोंदींकडे पुन्हा एकवार कुतूहलानंच पाहावंसं वाटेल. फेसबुकवरचा चटपटीतपणा, ट्विटरवरली शब्दमर्यादा या सर्वाची उगाच आठवण समजा या तीन नोंदी वाचताना झाली, तर याच नोंदींबद्दल अशी काळजीही वाटू लागेल की, ‘हे आता कुणीतरी मेलवर ‘फॉरवर्ड’ वगैरे करणार की काय?’ ‘कल्ट’ ठरण्याचा- पंथाभिमानाचा धोका संजय सोनवणी यांच्या ब्लॉगला आहे आणि तो लेखकामुळे नसून उत्साहीपणे किंवा आपले आग्रही दावे या ब्लॉगवर लादून इथल्या नोंदी वाचणाऱ्या वाचकांमुळे आहे.. हा धोका या नोंदीपासून सुरू झाला आहे, हे आत्ताच या ब्लॉगची दखल घेण्याचं एक निमित्त. स्वत: भरपूर ब्लॉगिंग करणाऱ्या सागर भंडारे यांनी या ब्लॉगची शिफारस केली होती.
अभिनवगुप्त
(Introduction of my blog in Daily Loksatta. Visit http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238099:2012-07-15-17-03-00&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408#addcomment
|
No comments:
Post a Comment