Sunday, June 2, 2013

मराठी भाषा अभिजातच!

पुस्तकविश्वच्या  या दुव्यावर आगष्ट २०११ मद्धे झालेली ही चर्चा. चर्चाकर्त्यांचा एकूणातील रोख हा मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळु नये असाच दिसला असला तरी त्या चर्चेतून अनेक महत्वाचे मुद्दे सामोरे आले. गेल्या दोन वर्षात मराठीच्या अभिजाततेबद्दल असंख्य पुरावे सामोरे आले आहेत. तरीही ही चर्चा मुळातुनच वाचली पाहिजे. 


मराठी भाषा अभिजातच!

मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी उशिरा का होईना सुरू झाली आहे, ही अत्यंत योग्य बाब आहे. खरे तर मी याबद्दल फेसबुकवर एक वर्षापुर्वी लिहिले होते. पण कालच दै. सकालमद्धे डा. प्रमोद तलगेरी यांचा "मर्हाटीचा बोलु विवेकी वाहील..." हा लेख वाचण्यात आला त्यानिमित्ताने जे विचारतरंग उठले ते मी येथे थोडक्यात मांडत आहे.
१. अभिजात भाषा ही फक्त भाषा किती पुरातन आहे यावर ठरत नसून ती ज्ञानभाषा आहे काय, त्यात मुलभुत विज्ञानाची...ज्याची जगभर चर्चा होईल अशी निर्मिती होत आहे काय यावर अवलंबुन आहे.
----माझे म्हणने...मराठी भाषा ही तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, विश्वविज्ञानशास्त्र ते कोणतेही आधुनिक विज्ञान मांडण्यास समर्थ आहे. लो. टिळकांचे गीतारहस्य मराठी भाषा ही अन्य भाषांपेक्षा केवढी सम्रुद्ध आणि प्रगल्भ आहे हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सिद्ध करते. आधुनिक विड्न्यानाच्या परिप्रेक्षात जयंत नारळीकर आणि अन्य अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे कि मराठी प्रअतिशब्दांत कोठेही कमी पडत नाही. मी "नीतिशास्त्र" आणि विश्वनिर्मितीचा स्वतंत्र सिद्धांत "अवकाशताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" प्रथम मराठीतच लिहिले आणि मला तेथे कोठेही मराठी भाषेची कमतरता जाणवली नाही...किंबहुना मी अधिक सहजतेने लिहू शकलो. असेच कार्य अनेक लेखक संशोधक करत असतात परंतु दुर्दैवाने त्याकडे आपलेच लक्ष नसते. त्यावर हवी तशी चर्चा होत नाही, भली ती विरोधातेल का असेना...हे मात्र खरे.
२. मराठी भाषेचा इतिहास हा किमान २००० वर्ष जुना आहे. हाल सातवाहनाचे महाराष्ट्री प्राक्रुत हे मराठी भाषेचे मुळ मानले तर ही भाषा कालौघात सातत्याने विकसीत राहिलेली दिसते. नामदेवांची साधी सरळ मराठी, ज्ञानेश्वरांची तत्वज्ञानाने मंडित मराठी ते तुकाराम महाराज, रामदास, मोरोपंत, पु.ल., अत्रे ते सुर्वे-ढसाळांची मराठी पाहिली तर मराठी ही अत्यंत प्रवाही आणि सामाजिक जाणीवांना सार्ववत्रिक कक्षेत घेण्याची क्षमता असणारी भाषा आहे हे स्पष्ट होते. दुर्दैव एवढेच कि आता...आता कोठे मराठी साहित्य परकीय भाषांत अनुवादित होवू लागले आहे. ही प्रक्रिया अधिक वेगवान होणे अभिप्रेत आहे. मराठी भषा ही अन्य बाषिकांचे साहित्य मराठित आनण्यात जेवढी तत्पर आहे तेवढी आपले साहित्य परभाषांत नेण्यासाठी नाही. लेखकालाच प्रयत्न करावे लागतात हे दुर्दैव नव्हे काय?
३. मराठी भाषा संस्क्रुतोद्भव आहे असे मानण्याची प्रथा आहे, पण ते वास्तव नाही. मराठीतील किमान शेकडा ७०% शब्द हे संस्क्रुताशी मेळ खात नाहीत. व्याकरणाची तर बाबच वेगळी. मराठीला ग्राम्य म्हटले तरी बोलीभाषा, व त्या भाषांतील शब्दांचे प्रचंड योगदान आहे आणि अजुनही असंख्य शब्द मुख्य प्रवाहात रुढ झालेले नाहीत. ते झाले तर मराठी अधिक सम्म्रुद्ध होण्यास मदत होईल.
४. मराठी ज्ञानव्यवहाराची भाषा आहे काय, या प्रश्नाचे उत्तर ती अभिजात भाषा आहे कि नाही हे ठरवण्यास मदत करेल. माझे मत असे आहे कि होय...मराठी ही ज्ञानव्यवहाराची उपयुक्त भाषा आहेच पण तिचा वापर आपण परप्रुष्ट असल्याने कितपत करतो हाच खरा प्रश्न आहे. खरे तर मराठी भाषेत जेवढे ज्ञानकोश (अनेक कालबाह्य झाले असले तरी) आहेत तेवढे अन्य अभिजात म्हनवणा-या अन्य भाषांत नाहीत हे एक वास्तव आहे.
५. ग्रीक, ल्यटीन, संस्क्रुत, तमीळ ई. भाषा आज अभिजात मानल्या जातात. खरे तर यातील अनेक भाषा आज कोणाचीही बोलीभाषा नाही. सांस्क्रुतीक, सामाजिक व्यवहार ज्या भाषांमधुन होत जात क्रमशा: ती ज्ञानभाषा बनत तिचा अभ्यास करणे अन्य भाषिकांना अपरिहार्य व्हावे अशी स्थिती मराठीची आहे काय? सांस्क्रुतिक परिप्रेक्षात तसे झालेले आहेच. वैज्ञानिक परिप्रेक्षात असे व्हावे असे मराठीचे तेवढे भरीव योगदान नाही हेही खरेच आहे. याचे कारण आपल्याच मानसिकतेत तपासायला हवे. उदा. डाक्टरेटसाठी भौतिकशास्त्राचा संशोधनात्मक प्रबंध मराठीत लिहिता येणे सहज शक्य असतांना आणि तेवढी भाषा-शब्द-सम्म्रुद्धी असतांना होत नसेल तर दोष आपलाच आहे.
६. अन्य भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला त्या भाषिकांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी आपली भाषा खरोखर ज्ञानभाषा आहे हे सिद्ध केले काय, हा खरा प्रश्न आहे. पुरातनता आणि सांस्क्रुतिक महत्ता हाच निकष तेथे राबवला गेलेला दिसतो. पाली, अर्धमागधी, प्राक्रुत, अपभ्रंश, पैशाची आदि भाषांबाबत कोणता निकष लावला गेला आहे हे पाहणे महत्वाचे आहेच.
७. मराठी भाषा ही अभिजात असून त्यात साहित्य, काव्य, तत्वज्ञान, विज्ञान मांडु शकण्याची सर्व क्षमता आहे. ही भाषा पुरातन (किमान २००० वर्ष) असून या भाषेने एक स्वतंत्र संस्क्रुती घडवली आहे. ही भाषा अत्यंत प्रवाही असुन कालौघातील बदल पचवत आपले स्थान अबाधित राखले आहे. तिला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला तर या भाषेचा जागतीक स्तरावर अभ्यास सुरु होईल आणि या भाषेत अधिकाधिक मुलभुत साहित्याचा लेखन-विकास होईल.
थोडक्यात, मराठी भाषिक म्हणुन आपल्यातच त्रुटी असल्या तरी आपली भाषा ही एक विश्वभाषा होण्याच्या योग्यतेची आहे याचा सार्थ अभिमान बाळगत आपल्याच भाषेत आपण सर्वार्थाने अभिव्यक्त होत राहिलो आणि आपल्याच भाषेच्या सर्व रुपांना कोणताही अभिनिवेश न बाळगता स्वीकारत राहिलो तर म्रराठी ही जागतिक पातळीवरची, नुसती कागदोपत्री नव्हे, तर ख-या अर्थाने विश्वभाषा बनेल असे मला वाटते.

शंका

अभिजात भाषा म्हणजे ज्ञानभाषा असे आपण कसे म्हणू शकतो? मूलभूत विज्ञानाबद्दल तर अनेक भाषांमध्ये लिहिले जाते. त्या सगळ्या अभिजात भाषा आहेत असे म्हणता येईल का? अभिजात भाषा ही बोलीभाषा असायलाच हवी हा आग्रह कळला नाही.
गीतारहस्य हे मराठी भाषा समृद्ध आहे हे कदाचित सिद्ध करेल, पण इतर भाषांपेक्षा असे या ग्रंथावरून कसे स्पष्ट होईल? मी बंगालीमध्ये अनेक विज्ञानविषयक पुस्तके पाहिली आहेत. ज्ञानव्यवहारांसाठी अनेकदा संस्कृतोद्भव शब्द वापरले जातात. असे शब्द इतरही भारतीय भाषांत वापरले जातात बहुधा. मग मराठीत असे कोणते वेगळेपण आहे की फक्त मराठीलाच अभिजातता दिली जावी?
माझा भाषेबद्दलचा फारसा अभ्यास नाही. महाराष्ट्रीला मराठी धरता येईल? भाषेचे मूळ व आजची भाषा एकच? महाराष्ट्री व मराठी मध्ये व्याकरण, शब्दसंग्रह यांत फरक नाही? अशाच तर्‍हेने हिन्दीचे मूळ शौरसेनी, बंगालीचे मागधी असे म्हणता येईल. या सगळ्यांना अभिजात भाषा म्हणावे का?
तुम्हाला येथे विश्वभाषा हा शब्द नक्की कोणत्या अर्थाने म्हणायचा आहे?
आणि या लेखाचे पुविवरील प्रयोजन कळले नाही.

मिहिर

शंकेचे थोडेसे निरसन करण्याचा प्रयत्न

मिहीर,
या लेखाचे पुविवरील प्रयोजन कळले नाही.
तुझ्या मनात या शंका येणे साहजिक आहे पण याबद्दल मी थोडा प्रयत्न करतो

भाषा आणि साहित्य हे अगदी घनिष्ठ नाते आहे. भाषेची समृद्धी ही अभिजाततेकडे वाटचाल करतेच करते पण साहित्याचा दर्जाही वाढवते. त्यामुळेच या विषयावर चर्चा होणे आवश्यक ठरते आणि पुस्तकविश्वच्या या व्यासपीठावर योग्य देखील ठरते.
माझा भाषेबद्दलचा फारसा अभ्यास नाही. महाराष्ट्रीला मराठी धरता येईल? भाषेचे मूळ व आजची भाषा एकच? महाराष्ट्री व मराठी मध्ये व्याकरण, शब्दसंग्रह यांत फरक नाही? अशाच तर्‍हेने हिन्दीचे मूळ शौरसेनी, बंगालीचे मागधी असे म्हणता येईल. या सगळ्यांना अभिजात भाषा म्हणावे का?
याबद्दल मात्र मी असे तुला सुचवेन की या धाग्यावर चर्चा जसजशी पुढे सरकत जाईल तसतशी तुला अभिजात भाषे बद्दल जास्त माहिती मिळेल. सध्या तरी आपण सगळे सुपात आहोत की तुपात? याचा धांडोळा घेतो आहोत Wink (खरे तर प्रयत्न करतो आहोत)
तुला पडणारे प्रश्न पुढील चर्चांच्या अनुषंगाने अवश्य उपस्थित कर. येथील चर्चेत भाग घेणार्‍या सर्वच सदस्यांकडून आणि माझ्यामते लेखक संजय सोनवणी स्वतः देखील या बाबतीत अधिक प्रकाश टाकतील.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अभिजात भाषा

अभिजात भाषा म्हणजे नुसती बोलीभाषा नव्हे, तर ज्या भाषेला स्वतःची लिपी आहे तिला अभिजात भाषा म्हणणे योग्य असे मला वाटते. मराठीला स्वतःची लिपी नाही हे तर स्पष्टच आहे. संस्कृतोद्भव देवनागरीतूनच ती उत्क्रांत झाली आहे.
हाल सातवाहनाचे महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचे मूळ मानले तरी प्राकृत ही मूळात संकृतापासून उत्क्रांत झालेली आहे. आपण जर प्राकृतात लिहिलेले लेख बघितले तर ती संस्कृतोद्भव आहे हे सहजच कळून येते.
आजची मराठी भाषा ही वेगवेगळ्या भाषांना आपल्यात सामावून घेत निर्माण झालेली आहे असे मला वाटते. वर संजय सरांनी म्हटल्याप्रमाणे मराठीतील शेकडा ७०% शब्द हे संस्कृताशी मेळ खात नाहीत हे तितकेसे पटत नाही कारण मराठीवर असलेला संस्कृतचा प्रभाव ठायी ठायी जाणवतोच. शिवाय मराठीत मूळ फारसी, अरबीतून आलेले शब्दही बरेच प्रचलित आहेत त्यांचे प्रमाण दुर्लक्षनीय तर निश्चितच नाही. काही शब्द द्राविडी भाषांमधूनही आलेले आहेत.
एकंदरीत मराठी भाषा खूप लवचिक आहे, विविध भाषाप्रवाहांना सामावून घेत घेत तिची वाटचाल अजूनही सुरुच आहे. ज्ञानेश्वरांची मराठी वेगळी, पेशवेकालीन बखरींची वेगळी, सध्याची प्रमाण मराठी वेगळी व भविष्यात पण मराठी थोडी अजून वेगळी होईलच.
अर्थात मराठीचा आपल्याला कितीही अभिमान वाटत असला तरी ती अभिजात भाषा म्हणणे थोडे धाडसाचेच ठरेल.

माझे थोडेसे मत

संजय सर सर्वप्रथम भाषेच्या अभिजाततेचा मुद्दा येथे उपस्थित केल्याबद्दल आपले मनापासून आभार.
आता विषयाकडे वळतो.

वल्ली मित्रा,
भाषेच्या लिपीबद्दलचा जो इतिहास तू निदर्शनास आणून दिला आहेस ते सत्यच आहे. पण माझ्यामते कोणत्याही भाषेची अभिजातता ही लिपीतील आणि शब्दांवर कालानुसार होणार्‍या संस्कारांवर अवलंबून नसून त्यातील गाभ्यात असते. हा गाभा किंवा भाषेचा आत्मा म्हणजे काय याचा शोध घेणे म्हणजेच भाषेच्या अभिजाततेचा शोध घेणे होऊ शकते. कोणत्याही भाषेला समृद्धतेचे वलय केव्हा लाभते? जेव्हा त्या भाषेत कोणत्याही विषयावर, कोणत्याही भावनांवर सुसंवाद साधता येतो. सध्या ज्या वेगात संगणक तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान प्रगत होते आहे ते पाहता मराठीतील शब्द तोकडे पडू लागले आहेत हे खरे आहे. पण तरीही स्वतःचा एक अर्थ निर्माण करणारी भाषा म्हणून त्यात अभिजातता आहेच.
काळानुसार भाषेत बदल होणे हा कोणत्याही संस्कृतीचा वा भाषेचा अविभाज्य भाग आहे. काळाच्या प्रवाहात भाषा जशीच्या तशी टिकवणे हे खूप अवघड आव्हान ठरते. अशा वेळी काळानुसार समाजप्रवाहात होणार्‍या बदलांना भाषेने सामावून घेतले नाही तर अशी भाषा केवळ इतिहास होते. त्यामुळेच भाषेला स्वत:चे अस्तित्त्व टिकवायचे असेल तर लवचिकता ठेवावीच लागते. भाषेचा मूळ गाभा - त्याचा आत्मा - हरवला जावू नये एवढी काळजी घेतली म्हणजे झाले. मराठीत विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मग ते कोणत्याही काळातील असो. आजच्या मराठीत ते उपलब्ध आहे, याचा अर्थ साहित्यातली अभिजातता भाषा बदलत गेली तरी पुढच्या पिढ्यांकडे वेळोवेळी पोहोचवली गेली आहे आणि हाच उपक्रम अजूनही चालू आहे.
यावर एक हिंदी भाषेतील उदाहरण द्यायचा मोह मला आवरत नाहिये. (मुद्दाम मराठी उदाहरण देत नाहीये)
इंग्रजीतील Divorce या प्रक्रियेला मराठीत आपण 'घटस्फोट' ही संकल्पना वापरतो
या प्रक्रियेला हिंदीत काय प्रतिशब्द आहे?
बहुसंख्य लोक 'तलाक' हे उत्तर देऊन मोकळे होतात. पण 'तलाक' हा मुळात उर्दू शब्द आहे. तो हिंदीत सहजपणे वापरण्याचे कारण म्हणजे तो शब्द वापरायला सोपा आहे.
Divorce साठी हिंदीत प्रतिशब्द 'विवाह-विच्छेद' हा आहे. अलगाव हा शब्द पण वापरतात पण तो तितकासा प्रभावी नाहिये.

सांगायचा मुददा हा होता की भाषेत लवचिकता आणि प्रवाहीपणा असला तर भाषेचा जो आत्मा आहे तो जिवंत राहतो. आणि मला वाटते की ज्या भाषेचा आत्मा जिवंत आहे ती भाषा अभिजात आहे. तेव्हा मराठीला मी अर्थातच अभिजात भाषा मानतो.
यावर अजून विचार वाचायला आवडतील व त्या अनुषंगाने आपण चर्चाही करुयात.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

जिवंत आत्मा

>>मला वाटते की ज्या भाषेचा आत्मा जिवंत आहे ती भाषा अभिजात आहे.
याचा अर्थ असा झाला की ज्या भाषा आज वापरात आहेत आणि प्रवाही आहेत त्या अभिजात झाल्या. या न्यायाने भारतातील आणि जगातील अनेक भाषा अभिजात गणल्या जातील. मराठीलाच अभिजात का म्हणावे?

मिहिर

या भिन्न गोष्टी आहेत

मिहिर मित्रा या दोन भिन्न गोष्टी आहेत.
भाषेचा आत्मा जिवंत असणे आणि भाषा वापरात असणे हे वेगळे.
वापरात असलेल्या आणि प्रवाही असलेल्या भाषेला अभिजात म्हणणे धाडसाचे ठरेल.

भारतात कित्येक बोली भाषा आहेत अथवा होत्या. पण त्या काळाच्या उदरात अदृष्य झाल्या.
अगदी अलिकडेच काही वर्षांपूर्वी अंदमान निकोबार बेटांवर त्सुनामीचा हल्ला झाला आणि कित्येक बेटे जलमय झाली. अशाच एका बेटावरील वाचलेल्या एकमेव वृद्ध माणसाचे अलिकडेच निधन झाले. तो रहात असलेल्या बेटावर बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेचा अखेरचा प्रतिनिधी होता. त्याच्या मृत्यूमुळे भाषा संपली.

भाषेतील आत्मा म्हणजे काय हे ठरवणे देखील अवघड काम आहे.
सातत्याने निर्माण होणार्‍या साहित्याचा दर्जा, त्यांतील कालातीत ठरणारे विचार, त्यातून होणारे मार्गदर्शन या व अशा कित्येक बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक ठरते.
याअनुषंगाने पुढील चर्चांमधून जाणकारांकडून माहिती मिळाली तर अजून चर्चेला मजा येईल.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझे मत

एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणताना ती अनेक कसोट्यांवर घासून बघावी लागेल
१. भाषा जिवंत आहे की मृतः या भाषेत बदल होत आहेत का? नवे शब्द येत आहेत का? नवे शब्द स्वीकारले - वापरले जात आहेत का वगैरे गोष्टींबरोबरच नवे ललित साहित्य, अ-ललित साहित्य या भाषेत तयार होते आहे का? जर या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असेल तर ती केवळ पुरातन भाषा म्हणून स्वीकारावी लागेल अभिजात नव्हे. माझ्यामते संस्कृत ही पुरातन (परंतू अतिशय महत्त्वाची)भाषा आहे. सुदैवाने माझी मातृभाषा मराठी 'जिवंत' असल्याचे लक्षण पार करते

२. भाषेला स्वतःची लिपी आहे का?: याचे उत्तर मराठी पुरते देणे जरासे कठीण आहे. कारण १९५० आधी मराठी या भाषेला जरी 'शासनसंमत' लिपी नसली तरी बराचसा कारभार 'मोडी' लिपी मधून चाले. पुढे शासनसंमतीने मराठीने 'काहि बदल केलेली' देवनागरी लिपी स्वीकारली. (जसे क्ष, ज्ञ वगैरेचा अंतर्भाव). त्यामुळे मराठीला स्वतःची अशी 'फार/संपूर्ण वेगळी' लिपी सध्या नाही.
३. भाषा स्वतंत्र आहे का?: याबाबत अनेक प्रवाह आहेत. भाषा संस्कृतोद्भव आहे असे अनेकांचे मत असले तरी ती तमिळ मधून जन्माला आली आहे असे श्री. खैरे आपल्या 'मराठी भाषेचे मुळ' या पुस्तकात सोदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याच वेळी मराठीतून अनेक बोली जन्माला आल्या असल्या तरी दुसरी भाषा तयार झाल्याचे ऐकीवात नाही (कोंकणी भाषा मराठी, कन्नड, अपभ्रंश असलेले डच/स्पॅनिश शब्द यांची मिळून बनल्यासारखी वाटते. केवळ मराठी नव्हे). तेव्हा या कसोटीवर काहि शब्द केवळ संस्कृतोद्भव नसले तरी ते मुळचे तमिळ, कन्नड, उर्दु, फारसी, इंग्रजी आहेत. त्यामुळे या कसोटीवरही मराठी भाषा उतरत नाहि असे वाटते.
इतरही अनेक निकष आहेत.. विस्तारभयाने व वेळेअभावी इथेच थांबतो.
सारांशः मराठी ही जगातील मह्त्त्वाच्या भाषांपैकी एक आहे. तिचा विस्तार अनेक देशांत आहे. ही भाषा जिवंत आहे, त्यात नवीनतम गोष्टी येण्याची क्षमता आहे. मात्र तरीहि तिला 'अभिजात' भाषा म्हणता येईल याबद्दल मी साशंक आहे.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

थांबू नकोस ऋ

इतरही अनेक निकष आहेत.. विस्तारभयाने व वेळेअभावी इथेच थांबतो.
यासाठीच हा धागा आहे. सविस्तर लिहिलेस तर छान चर्चा घडेल. प्लीज लिही.
२. भाषेला स्वतःची लिपी आहे का?
याबद्दल एक शंका आहे. भाषेला स्वतःची लिपी नसली तर ती भाषा अभिजात होऊ शकत नाही का?
अभिजातता म्हणजे भाषेतील समृद्धी प्रकट होणे असे मला वाटते. या समृद्धीचे मुख्य मूल्यमापन होते ते त्या भाषेतील साहित्यनिर्मितीतून आणि त्यातील वैविध्यतेतून. आणि या निकषावर मराठी भाषा नक्कीच समृद्ध ठरते. इतर भाषांच्या तुलनेत मराठीत जास्त संख्येने साहित्य उपलब्ध आहे हा घटक अभिजाततेसाठी मी मानत नाही. कारण संख्येपेक्षा साहित्याचा दर्जा हा अभिजाततेसाठी एक परिमाण ठरु शकतो.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

भाषेला स्वतःची लिपी नसली तर

भाषेला स्वतःची लिपी नसली तर ती भाषा अभिजात होऊ शकत नाही का?
वेळेअभावी थोडक्यात सांगतो:
एखादी भाषा ही आधी बोलीभाषा असते. जेव्हा तिचा प्रसार होतो तेव्हा इतरांना शिकवण्यासाठी त्याचे व्याकरण नियम तयार केले जातात. आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हळूहळू एक संकेतिक लिपी तयार होते. 'बाहेरून' आलेली लिपी त्या भाषेतील सार्‍या ध्वनींला न्याय देऊच शकेल असे नाहि. उदा. देवनागरी लिपी सारे इंग्रजी उच्चार लिहु शकत नाहि (उदा. the हा दि/द यांच्या मधला आहे), मल्याळी भाषेत 'अतिर्‍हस्व' स्वर आहे व तो मल्याळी लिपीत लिहिता येतो, देवनागरीत नव्हे; तमिळ मधे एकाहुन अधिक प्रकारचे 'ळ' आहेत. थोडक्यात लिपी ही भाषेची 'ओरीजिनॅलिटी' व स्वातंत्र्य दाखवण्यासाठी महत्त्वाची असते. जर भाषा ही 'अभिजात' असेल तर तिला इतर निकषांसोबतच स्वतःचे शब्द, स्वतःचे ध्वनी व ते एकमेकांपर्यंत लिखित रुपात पाठवण्यासाठी ते ध्वनी दर्शवण्यासाठी विषिष्ट खुणा असणे- म्हणजेच लिपी - असावी असे माझे तरी मत आहे.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

तसे असेल तर मोडी चे संवर्धन आवश्यक ठरते

ऋ,
तू लिहिले आहेस ते पटते आहे पण अजून काही प्रश्न मनात उभे राहताहेत.

असे असेल तर मोडी लिपीचे संवर्धन आवश्यक ठरते. पण मोडी लिपी ही आज तरी कालबाह्य झाली आहे आणि केवळ अभ्यासक्रमात वा पुस्तके वाचून शिकण्याची एक लिपी उरली आहे. महाराष्ट्रात इतके लोक इतक्या शतकांतून होऊन गेले, त्यापैकी मोडीच्या संवर्धनासाठी कोणीच प्रयत्न केले नसतील हे असंभव वाटते. देवनागरी लिपी स्वीकारल्यामुळे भाषेला बंधने येणे हे ही अवघड वाटते.
उदाहरणार्थ हिंदी भाषेत 'ळ' आणि 'ण' ही दोन अक्षरे नाहीत म्हणून हिंदीचे काही अडते असे मला नाही वाटत. 'ळ' ऐवजी 'ल' आणि 'ण' ऐवजी 'न' वापरल्यामुळे शब्दांतून ध्वनित होणारा अर्थ जास्त महत्त्वाचा आहे. आणि अपेक्षित असलेला अर्थ ध्वनित होऊ शकत असेल तर मग भाषा अभिजात या परिमाणात बसण्यात पात्र नाही का ठरत?
तांत्रिक बाबींपेक्षा जे अपेक्षित आहे ते उपलब्ध भाषेच्या साहाय्याने साध्य होत असेल तर ती भाषा माझ्यामते अभिजात मानता येऊ शकेल. भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य आणि भाषा यांवर अनेक वेळा मते व्यक्त केली आहेत. त्यांनीही अभिजात साहित्य मराठीत निर्माण होत नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याबद्दल जाणकारांकडून माहिती करुन घ्यायला अधिक आवडेल.

अभिजात भाषेला स्वतःची लिपी असावी या तुझ्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण ही लिपी दुसर्‍या भाषेचे संस्कार घेऊन जन्माला आली तरी मराठी भाषेची स्वतःचीच लिपी होते असे मला वाटते. कारण व्याकरणातील नियम, स्वर, व्यंजने, छंद इत्यादी तांत्रिक बाबी या मराठी भाषेत नुसत्या उपलब्ध नसून अतिशय समृद्ध आहेत आणि त्यांच्या साहाय्याने सर्व प्रकारचे भाव उत्तमरित्या प्रगटतात.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

साशंक

उदाहरणार्थ हिंदी भाषेत 'ळ' आणि 'ण' ही दोन अक्षरे नाहीत म्हणून हिंदीचे काही अडते असे मला नाही वाटत.
अडत नाहि कारण हिंदी भाषेत ण/ळ असणारे शब्द नाहित. शिवाय हिंदी हि अभिजात भाषा कशी काय होते (अर्थात तसे तु म्हटलेले नाहि)? ती तर तुलनेने मराठीपेक्षाही नवी आहे बहुदा
'ळ' ऐवजी 'ल' आणि 'ण' ऐवजी 'न' वापरल्यामुळे शब्दांतून ध्वनित होणारा अर्थ जास्त महत्त्वाचा आहे.
विषेशनामे सोडल्यास कोणत्या हिंदी शब्दात ही तडजोड दिसते?
पण ही लिपी दुसर्‍या भाषेचे संस्कार घेऊन जन्माला आली तरी मराठी भाषेची स्वतःचीच लिपी होते असे मला वाटते. कारण व्याकरणातील नियम, स्वर, व्यंजने, छंद इत्यादी तांत्रिक बाबी या मराठी भाषेत नुसत्या उपलब्ध नसून अतिशय समृद्ध आहेत आणि त्यांच्या साहाय्याने सर्व प्रकारचे भाव उत्तमरित्या प्रगटतात.
लिपी आणि व्याकरण याचा संबध कळला नाही. माझ्यामते लिपीचा संबंध फारतर शुद्धलेखनाशी येऊ शकेल. शिवाय व्याकरणाचे नियम तयार असणे आणि लिपी असणे याही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. वरच्या वाक्यात भाषेत वापरले जाणारे ध्वनी, अक्षरखुणा (लिपी), व्याकरण व भाषासौंदर्य (छंद वगैरे) या चारही गोष्टी (गोंधळ व्हावा इतक्या)एकत्र केल्या आहेत . प्रत्यक्षात या चारही पूर्णपणे भिन्न आहेत.
जरा अधिक टंकून माझी भुमिका अधिक स्पष्ट करतो:)

बोलीभाषा: जी एकाने बोलल्यास दुसर्‍याला समजते अशी एका समुहात बोलली जाणारी भाषा. यात समान ध्वनी, समान व्याकरणाचा वापर असतो. मात्र व्याकरणाचे नियम शब्दबद्ध केलेले नसतात, स्वतंत्र लिपी नसते, भाषेवर विविध प्रयोग होत नाहित, नवनिर्माण-लेखन-वाड्मय नसते / फार कमी असते, प्रमाणीकरण नसते वगैरे वगैरे
स्वायत्त भाषा: यात समान ध्वनी, समान व्याकरणाचा वापर तर असतोच शिवाय व्याकरणाचे नियम शब्दबद्ध केलेले असतात, भाषेवर विविध प्रयोग होत असतात, भाषा प्रगत होत असते, विपुल नवनिर्माण-लेखन-वाड्मय असते / प्रमाणीकरण असते. मात्र प्रत्येक स्वतंत्र भाषेला स्वतंत्र लिपी किंवा स्वयंभु अस्तित्त्व असेलच असे नाही.
बोली: स्वायत्त भाषेत काहि अंतरांवर बदल होतात, काहि व्याकरणात, काहि लहेज्यात, काहि ध्वनी रुपांत वगैरे. मात्र मुळ गाभा स्वायत्त भाषेचाच असततो. ही झाली बोली. पुढे बोलीची बोली भाषा होऊ शकते व ती प्रगत होऊन स्वायत्त भाषाही बनु शकते.
अभिजात भाषा: ही भाषा स्वायत्त भाषा तर असतेच शिवाय, ही अनेक वर्षांपासून त्यात विविध सृजनात्मक बदल होत असतात व काळाच्या कसोटीवर ती टिकलेली असते. इतकेच नव्हे तर याच्या काही बोली बोलणारे समुह त्या-त्या बोलीला बोलीभाषेत व कालांतरने स्वायत्त भाषेत रुपांतरीत करतात. अर्थातच अश्या भाषेत विपूल वाड्मय, पुरातन इतिहास ते अद्ययावत माहिती सारे काहि उपलब्ध असते.
आता कळावे की मराठी ही स्वायत्त भाषा आहे मात्र ती अजुनही अभिजात आहे का या बाबतीत मी का साशंक आहे ते
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

माझ्याकडून अधिक स्पष्टता

ऋ,
अरे मला वाटते मी माझा मुद्दा नीटसा मांडू शकलो नाही.
या सर्व भिन्न गोष्टी आहेत यात वादच नाहीये. पण मला या सर्व भिन्न गोष्टी असूनही भाषा अभिजात ठरण्यामागे यांची भूमिका आहे की नाही? याकडे लक्ष वेधायचे होते
भाषा अभिजात ठरण्यासाठी छंद, व्याकरण, स्वर, व्यंजने यांचे योगदान असतेच ना? हे सर्व समृद्ध असले तरच भाषा प्रभावीपणे वापरली जाते आणि भाषा प्रभावीपणे वापरली गेली की तिला काळानुसार अभिजातता ही प्राप्त होऊ शकते.
वर तू अभिजात भाषेच्या व्याखेत जसे म्हटलेस की "अनेक वर्षांपासून त्यात विविध सृजनात्मक बदल होत असतात व काळाच्या कसोटीवर ती टिकलेली असते." हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी वांड्मयाचा अथवा साहित्याचा इतिहास पाहिला तर वेळोवेळी सृजनात्मक बदल झालेली उदाहरणे समोर आहेत. श्रीमुकुंदराज यांचा सार्थ विवेकसिंधु हा आद्य ग्रंथ , ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही उदाहरणे आजच्या काळात पाहिली तर मराठी भाषा ही फक्त प्रवाही म्हणून नव्हे तर सृजनात्मकदृष्ट्या बदलली आहे हे लक्षात येते. अगदी १९२० - १९५० या काळातील मराठी लेखनाची पद्धतही आज कालबाह्य झाली आहे. कित्येक शब्दांवर संस्कार झाले आहेत. मण्डळ, भाण्डार हे शब्द आज मंडळ, भांडार असे वापरले जातात. अर्थात ही अल्पशीच उदाहरणे आहेत. पण भाषेतील सृजनात्मक बदलांकडे निर्देश करण्यासाठी पुरेशी असावीत.
खगोलशास्त्र या विषयाकडे इस्लामी राजवटींच्या काळात थोडेसे दुर्लक्षच झाले होते. तत्कालीन प्राधान्य देण्याच्या गोष्टी कदाचित वेगळ्या असू शकतील. पण बाळशास्त्री जांभेकरांनी आणि तत्कालिन विद्वानांनी अवकाशातील कित्येक इंग्रजी तार्‍यांना मराठीत आणले, जसे बेटेलग्यूजला काक्षी, नरतुरंग, पतंग हे तारकासमूह, आणि असे कित्येक आहेत.
अलिकडेच पहायचे झाले तर जयंत नारळीकरांसारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या शास्त्रज्ञाने मराठी साहित्यात विज्ञान कादंबरी हा प्रकार किती ठळक केला आहे हे सांगायची गरजच पडणार नाही एवढे महान कार्य केलेले आहे. यानिमित्ताने इंग्रजीतून उपलब्ध असलेले विज्ञान मराठी भाषिकांना सोप्या शब्दांत समजून येते आहे. आणि मला वाटते की भाषेतील हेच ते स्रुजनात्मक बदल आहेत. अशीच उदाहरणे काव्य प्रकारात गझल हा प्रकार मराठीत आणणारे कविवर्य सुरेश भट, हायकू हा जपानी काव्यप्रकार आणणार्‍या शिरीष पै, अशी कित्येक उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात आहेत.

तू दिलेल्या अभिजात भाषेच्या व्याख्येत मराठी भाषा सहज बसते असे मला तरी वाटते.
अर्थात अभिजाततेचे हिर्‍याचे कोंदण येण्यासाठी मात्र मराठीला अजून बरीच वाटचाल करायची आहे असे मला वाटते.

सुंदर विचार मांडतो आहेस ऋ. बाकीच्या वाचकांनाही विनंती आहे की त्यांनी या सकारात्मक चर्चेत मोलाची भर टाकावी.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

असहमत

तु दिलेली ज्ञानेश्वर काय किंवा इस्लामी राजवट काय सारे फारच अलिकडील आहे. जर मराठीला अभिजात म्हटले तर कन्नड, तेलुगु, हिंदी सार्‍यांनाच म्हणावे लागेल Smile
अगदी १९२० - १९५० या काळातील मराठी लेखनाची पद्धतही आज कालबाह्य झाली आहे.
अशीच उदाहरणे काव्य प्रकारात गझल हा प्रकार मराठीत आणणारे कविवर्य सुरेश भट, हायकू हा जपानी काव्यप्रकार आणणार्‍या शिरीष पै, अशी कित्येक उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात आहेत.
तेच तर म्हणतोय. मराठीची अजून स्वतःचीच घडण पूर्ण झालेली नाही. अनेक वर्षांच्या घुसळणीतून ती आता कुठे (साधारण गेल्या काहि शतकांत) स्वायत्त व्हायला लागली आहे. आता कुठे मरठीला स्वतःचे रुपडे मिळत आहे. तिला अभिजात रूप यायला अजुन बरीच वाट पाहायला हवी Smile
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

मी पण असहमत ...

Smile
उदाहरणे अगदी अलिकडच्या काळातील आहेत रे ऋ.
पण केवळ जास्त पुरातन नाही म्हणून मराठी भाषा अभिजात नाही असे म्हणता नाही येणार.
अलिकडच्या काळात साहित्यात प्रचंड भर पडली आहे आणि सातत्याने ती भर पडतेच आहे. पण साहित्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भर पडणे हे समृद्धतेचेच लक्षण आहे त्यामुळे एवढी समृद्ध अशी आपली माय मराठी भाषा अभिजातच आहे असे माझे मत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर जुन्या पद्धतीच्या छापखान्यात एका सुंदर पुस्तकाच्या १ हजार प्रती छापून पुस्तक तयार होण्यासाठी समजा ३० दिवस लागतात असे गृहीत धरु. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ १ आठवड्याच्या काळात २५ हजार प्रती तयार होतात. पण म्हणून त्या पुस्तकाचा दर्जा कमी जास्त होत नाही त्याप्रमाणेच आजची मराठी ही अल्प काळात प्रगती करुन समृद्ध झाली तर तिचा दर्जा केवळ लवकर समृद्ध झाली म्हणून नाकारता कसा येईल?
भाषा अभिजात होण्यासाठी किती शतके लागली यापेक्षा ती अभिजात झाली की नाही हे पहाणे जास्त महत्त्वाचे यामुळेच ठरते. Smile

मोठी वाटचाल करायची आहे असे तू म्हणतोस ते मला १००% मान्य आहे. पण ती वाटचाल अभिजाततेकडे करायची नसून मुळात सुंदर असलेल्या अभिजात मराठी भाषेला सौंदर्याचे कोंदण चढवायचे आहे.... थोडक्यात साज-शृंगार करायचा फक्त बाकी आहे. आणि आपली मराठी भाषा ही खूप छान पद्धतीने प्रवाहीपणा टिकवून आहे त्यामुळे अभिजात परिपूर्णता मराठी भाषेला नक्की मिळेल याची खात्री वाटते Smile
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कन्नड

>>तर कन्नड, तेलुगु, हिंदी सार्‍यांनाच म्हणावे लागेल.
इथे म्हणल्याप्रमाणे कन्नड आणि तेलुगु या भारताच्या अधिकृत अभिजात भाषा आहेत.

मिहिर

छान मुद्दा आहे हा

अधिकृत अभिजात भाषा कोण ठरवते हा एक मुद्दा आहे
अधिकृत अभिजात भाषेचे निकष कोणते? कोण ठरवते? आणि जे हा दर्जा ठरवतात ती संस्था वा त्यातील व्यक्ती यांना त्या भाषेचे कितपत ज्ञान असते? हे देखील कळीचे मुद्दे ठरतात.
भाषेचे अभिजातत्त्व माझ्यामते फक्त तेच लोक ठरवू शकतात की ज्यांना त्या भाषेचे सखोल ज्ञान आहे आणि जे ती भाषा सातत्याने वापरतात.
मिहीर तू विकीवर दिलेल्या दुव्याव्यतिरिक्त विकीवरचा क्लासिकल लॅंग्वेजेस हा दुवा पाहिला. त्यातील क्लासिकल भाषेचा निकष केवळ प्राचीनता आणि तत्कालीन काळातील त्यांचे असलेले महत्त्व आहेत असे एकंदरीत दिसते.
पण हाही एक महत्त्वाचा मुद्दा चर्चा करण्याजोगा आहेच यात शंका नाही Smile
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

फक्त चर्चेसाठी म्हणुन काही

फक्त चर्चेसाठी म्हणुन काही मुद्दे:
१. संस्क्रुत भाषासुद्धा निर्मितीपासुन काही सहस्त्रके लिपिबद्ध नव्हती.
२. देवनागरी ही ब्राह्मी लिपीतुन विकसीत झाली व उत्तरेत प्रदेशिक बदल स्वीकारत वापरात राहीली.
३. सिंधु संस्क्रुतीतील लिपीचे अद्याप वाचन झालेले नाही त्यामुळे ती नेमकी कोणती भाषा होती (संस्क्रुत/प्राक्रुत कि द्रवीडी) हा वाद अद्याप आहे.
४. तमिळ भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला आहे, पण या भाषेतही असंख्य संस्क्रुत शब्द आहेत.
५. तमिळ भाषेतील आद्य संगम साहित्य हे २-३ -या शतकातील आहे. या भाषेचे व्याकरण लिहिल्याचा मान अगस्ती कडे जातो.
६. मराठी भाषा माहाराष्ट्री प्राक्रुतातुन विकसीत होत आजची मराठी बनलेली आहे. गाथा सतसही (आज मुळ प्रत उपलब्ध नाही) हा द्न्यात पहिला ग्रंथ मानता येईल. कर्पुरमंजरी हाही ग्रंथ या द्रुष्टीने महत्वाचा आहे. चक्रधरांनी स्वतंत्र तत्वद्न्यान मराठीत मांडले. तत्पुर्वीचे ग्रंथ साहित्य उपलब्ध नाही, सातवाहन काळानंतरचे शिलालेख/ताम्रपट आणि धार्मिक साहित्य पुन्हा संस्क्रुतमद्धे लिहिण्याची पद्धत आली. पण मराठी कोणत्या ना कोनत्या रुपात बोलीभाषा होती.
७. मुकुंदराजांना आद्य कवि म्हणतात. विवेकसिंधु हा त्यांचा ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो.. द्न्यानेश्वरांची द्न्यानेश्वरी संस्क्रुत मुळ गीतेवर आधारीत होती, परंतु त्यांचाच अम्रुतानुभव मात्र स्वतंत्र ग्रंथ आहे.
८. जगातील (दुर्गम भागांतील आदिवासी भाषा सोडता) तशी एकही भाषा स्वतंत्र नाही. उदा. ल्याटीनवर ग्रीकचा तर जवळपास सर्वच युरोपियन भाषांवर ल्याटीनचा प्रभाव आहे. सोबत अरेबिक, सुमेरियन, संस्क्रुत, द्राविडियन ई. भाषांतुन युरोपियन भाषांनी देवानघेवान केलेली आहेच. संपुर्ण स्वतंत्र भाषा असे कोणत्याही भाषेला म्हणता येत नाही..
९. तरीही प्रत्येक भाषा आपापल्या भौगोलिक परिप्रेक्षात स्वतंत्र वाटचाल करतात असे दिसुन येते. त्यामागे भाषा-मानसशास्त्रीय कारणे असतात. दर बारा कोसांवर भाषा बदलते हे वास्तव (आता जुने झाले असले तरी) आहेच.
१०. असे असले तर मग अभिजातता म्हणजे काय हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. एखादी कलाक्रुती अभिजात आहे कि नाही हे ठरवण्यासाठी आपण कोनते निकष वापरतो? वैश्विकता, सर्व भाव-भावना-संवेदना अभिव्यक्त होण्याची क्षमता, मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत, ताणे-बाणे इइइइ. भाषेबाबत हेच निकष अधिक व्यापक बनतात. माझ्या मते जी भाषा पुरातन आहे, द्न्यनभाषा होती वा आजही आहे, विशिष्ट मानवेतिहास समजावून घेण्यासाठी ज्या भाषेचा अभ्यास (अन्य भाषिकांना) आवश्यक आहे, ज्यातील साहित्य चिरंतन मुल्ये जोपासते, (प्रेरक आहे), ज्या भाषेत अतंर्गत संवाद अन्य भाषेची मदत न घेता सुलभ होतो, ज्यात द्न्यान-विद्न्यानाच्या शाखा सहजतेने अभिव्यक्त होवू शकतात, ज्यात अशा विषयांवर स्वतंत्र ग्रंथ रचना होते वा होण्याची सर्वस्वी संभावना/क्षमता आहे अशा भाषांना अभिजात भाषा म्हणावे.

यात अजुनही भर पडु शकते. या द्रुष्टीने मराठी भाषेकडे पहावे. केवळ लिपी/पुरातनता एवढेच पुरेसे नाही याबाबत मी सहमत आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण प्रदिर्घ काळ (ब्रिटिशकाळापर्यंत) लिहिले गेलेले नव्हते. पण अतिपुरातन संस्क्रुत भाषेचे (इसपु. ३००० वर्ष हा तिचा किमान निर्मिती काळ मानला तर) पाणीनीय व्याकरण इसपु २-३ -या शतकात लिहिले गेले हेही वास्तव आहेच.
दुसरे असे कि तमिळ भाषेने अभिजाततेचा दर्जा भाषिक अभिमानाच्या बळावर प्रयत्नपुर्वक मिळवला. तो मिळाल्यानंतरच काही मराठी भाषिकांना जाग आली. त्यावर लिहिले जावू लागले. तेलतुंबडे यांचा मी उल्लेख केलेला लेख हा अत्यंत अलीकडचा. पण या दिशेने प्रयत्न होत नाहीत आणि या चर्चेवरुन लक्षात येणारी बाब म्हणजे मराठी अभिजात नाही असा कल आहे. पण ती का अभिजात नाही यावर तरी विचारमठन व्हावे ही अपेक्षा.

१. संस्क्रुत भाषासुद्धा

१. संस्क्रुत भाषासुद्धा निर्मितीपासुन काही सहस्त्रके लिपिबद्ध नव्हती.
मी संस्कृतला 'पुरातन' भाषा समजतो. अभिजात नाहि. (कारण ही भाषा आता व्यावहारीक दृष्ट्या मृत आहे)
४. तमिळ भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला आहे, पण या भाषेतही असंख्य संस्क्रुत शब्द आहेत.
यात अनेक मतप्रवाह आहेत. उदा दाखल पुन्हा श्री खैरे यांचा सिद्धांत सांगतो. त्यांच्यामते संस्कृत ही प्रशासकीय भाषा होती. अनेक भाषेच्या पंडीतांनी एकमेकांत संवाद साधणे सोयीचे व्हावे म्हणून 'तयार केलेली' अशी ती भाषा होती. त्यामुळेच त्याचे व्याकरणाचे नियम वगैरे ठाम / अपरिवर्तनीय आहेत. त्या भाषेत शतनानुशतके बदल न होण्याचे कारण म्हणजे ती लोकांत प्रचलीत भाषा नसून केवळ एक फॉर्मल संभाषणचे कॉमन माध्यम (प्रोटोकॉल) आहे. (जसे IEEE प्रोटोकॉल Wink )
अर्थात हा एक मतप्रवाह आहे आणि तो दुर्लक्ष करण्यासारखा वाटत नाही. आता असे असले तर तमिळमधे संस्कृत शब्द नसून संस्कृतमधे त्यावेळचे तमिळ शब्द आहेत असेही असु शकते.

६. मराठी भाषा माहाराष्ट्री प्राक्रुतातुन विकसीत होत आजची मराठी बनलेली आहे.
प्राकृत या भाषेतून मराठीच नाहि तर कानडी, गुजराती वगैरे अनेक भाषा तयार झाल्या. 'गाथा सतसही' वगैरे ग्रंथ प्राकृतात होते असे वाचल्याचे आठवते (संदर्भ जवळ नाही) तेव्हा ते जितके मराठीत होते तितकेच प्राकृतापासून विकसीत झालेल्या इतर भाषांतही होते.
बाकी ज्ञानेश्वर वगैरे काहि-शे वर्षे जुने दाखले भाषेला अभिजात म्हणण्यासाठी अपुरे ठरावेत.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

थोड्या शंका थोडे विचार

संजय सर,
तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. या अनुषंगाने तुमचे स्वतःचे विचार माहिती करुन घेण्यास मला जास्त उत्सुकता आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने काही शंका आणि थोडेसे मत लगेच मनात निर्माण झाले, ते खाली देण्याचा प्रयत्न करतो.
४. तमिळ भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला आहे, पण या भाषेतही असंख्य संस्क्रुत शब्द आहेत.
याबद्दल एक शंका आहे. संस्कृतचा उगम हा खचितच दक्षिणेत झालेला नाहीये. सिंधु नदीच्या आसपास जो वैदिक संस्कृतीचा उगम झाला (हा ही एक वादाचाच मुद्दा आहे) पण असे समजूयात की उत्तरेत संस्कृतचा जन्म झाला. आर्यांनी जसजसे दक्षिणेत पाय पसरवायला सुरुवात केली तसतशी स्थानिक भाषाही बदलत गेली. सध्याच्या तमिळ भाषेचे अस्तित्त्व जे अभिजात म्हणून गणले जाते त्याव्र संस्कृत भाषेचे मोठ्या प्रमाणावर संस्कार झालेले आहेत. अर्थात दुसर्‍या भाषेतून शब्द घेतले म्हणून त्या भाषेचे अभिजाततेचे महत्त्व कमी नाही होत. ते अद्वितीयच असू शकेल.
पण येथे माझ्या मनात शंका ही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर संस्कॄत शब्दांचे आक्रमण तमिळ भाषेत कसे काय झाले? यावर तुम्ही प्रकाश टाकू शकलात तर आभारी राहीन.

मुद्दा क्र. ८ मधील हे वाक्य पूर्णपणे पटले "संपुर्ण स्वतंत्र भाषा असे कोणत्याही भाषेला म्हणता येत नाही.. "
कारण प्रवाहीपणा हा प्रत्येक भाषेचा गुण आहे. काळानुसार त्यावर संस्कार होतातच आणि होतच राहणार. भाषेतील आत्मा हा अभिजाततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या मूलभूत घटकांपैकी एक ठरतो असे मला तरी वाटते.

मुद्दा क्र.१०. असे असले तर मग अभिजातता म्हणजे काय हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. एखादी कलाक्रुती अभिजात आहे कि नाही हे ठरवण्यासाठी आपण कोनते निकष वापरतो? वैश्विकता, सर्व भाव-भावना-संवेदना अभिव्यक्त होण्याची क्षमता, मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत, ताणे-बाणे इइइइ. भाषेबाबत हेच निकष अधिक व्यापक बनतात. माझ्या मते जी भाषा पुरातन आहे, द्न्यनभाषा होती वा आजही आहे, विशिष्ट मानवेतिहास समजावून घेण्यासाठी ज्या भाषेचा अभ्यास (अन्य भाषिकांना) आवश्यक आहे, ज्यातील साहित्य चिरंतन मुल्ये जोपासते, (प्रेरक आहे), ज्या भाषेत अतंर्गत संवाद अन्य भाषेची मदत न घेता सुलभ होतो, ज्यात द्न्यान-विद्न्यानाच्या शाखा सहजतेने अभिव्यक्त होवू शकतात, ज्यात अशा विषयांवर स्वतंत्र ग्रंथ रचना होते वा होण्याची सर्वस्वी संभावना/क्षमता आहे अशा भाषांना अभिजात भाषा म्हणावे.
हा नक्की पटला आहे. पण तुम्हीच म्हणालात त्याप्रमाणे यात अजुनही भर पडु शकते Smile
तमिळ भाषेने अभिजाततेचा दर्जा भाषिक अभिमानाच्या बळावर प्रयत्नपुर्वक मिळवला.
हे मात्र खरे आहे. भाषा टिकवण्याची, समृद्ध करण्याची जबाबदारी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांचीच ठरते. कित्येक मराठी भाषिक लोक कोणत्या कारणाने माहिती नाही, पण मराठी बोलायलाच टाळतात. मी स्वतः इकडे बंगळूरात अनेक मराठी भाषिकांना भेटलो आहे, कित्येकांशी फोनवर बोललो आहे. मी मराठी भाषिक आणि ते स्वतः मराठी भाषिक असूनही हिंदी किंवा इंग्रजीतून हे मित्र माझ्याशी बोललेले आहेत. काही नात्यातील लहान मुलांना जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांना मराठी फक्त बोलता येते, लिपीची सुद्धा ओळख नाहीये. भाषिक स्वाभिमान हा आपण स्वतःच जपला पाहिजे तरच भाषा टिकेल. भाषा टिकली तरच ती भाषा अभिजात म्हणून स्वतःचे अस्तित्त्व टिकवून राहू शकते. आता इथे वर शब्द वापरात आला म्हणून लिहितोय, "टिकली" हा शब्द अनेक अर्थांनी वापरता येतो. १. स्त्रियांनी कपाळावर लावण्याची टिकली
२. दिवाळीत मुले फोडतात ती टिकली
३. कोणतीही गोष्ट जतन केली तर त्यासाठी वापरली जाणारी टिकली Smile

नेमक्या क्षणी नेमक्या अर्थाने एकच शब्द वापरणे हे भाषेचे सौंदर्यच आहे आणि बौद्धिकदृष्ट्या एक आव्हानही आहे. अशा निकषांच्या कसोटीवर मराठी भाषा केव्हढी प्रभावी आहे हे ही सांगायची गरजच नाही. अभिजाततेसाठी हा ही एक मापदंड असू शकतो.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

उत्तम चर्चा

अतिशय उत्तम चर्चा चालू आहे. भाषांसंदर्भात बरीच नवनवीन माहिती मिळत आहे. तूर्तास बोलण्यासारखे काहीच नसल्याने चर्चेत भाग घेत नाहीये. Smile

अत्यंत महत्वाचे मुद्दे चर्चेत

अत्यंत महत्वाचे मुद्दे चर्चेत आले आहेत. मी त्यांवर वेगवेगळे न लिहिता माझे समग्र आकलनात्मक विचार मांडतो.
१. संस्क्रुत ही भाषा क्रुत्रीम असुन प्राक्रुत भाषांना ग्रांथिक रुप देण्यासाठी, भिन्न भाषिकांत संवाद होण्यासाठी तयार केली गेली हे मत काही प्रमाणात मान्य. प्राक्रुत भाषेला ग्रांथिक रुप देण्यासाठी जी संस्कारित भाषा विकसीत झाली ती संस्क्रुत. पण संस्क्रुत ही पाणीनीय व्याकरण येईपर्यंत प्रवाही भाषा होती...ऋग्वैदिक संस्क्रुत, ब्राह्मणांतील संस्क्रुत व औपनिषदिक संस्क्रुत या द्रुष्टीने पहाता येईल. उलट पाणीनीय व्याकरणानंतर (जरी ते जगातील आद्य आणि श्रेष्ठ व्याकरण मानले जात असले तरी...) संस्क्रुत भाषा ही क्लीष्ट बनली व हळुहळु काही शतकांत वापरातुन नष्ट झाली हे उघड आहे.
व्याकरणनिबद्धतेचा अट्टाग्रह भाषांच्या मुळावर कसा येतो त्याचे संस्क्रुत हे एक उदाहरण आहे.

२. व्याकरणाची मोडतोड भाषेला अधिक अर्थप्रवाही करण्यासाठी केली जाते. जेम्स जोयस ची कादंबरी या द्रुष्टीने पहावी. मराठीत हाच मान प्रथम मर्ढेकर तर आता ग्रेस यांच्याकडे जातो. इंग्रजी भाषा जगभर गेली असली तरी तिने स्थानिक रुपे स्वीकारली आहेत. आफिरिकान्स इंग्रजी, भारतीय इंग्रजी, मेक्सिकन इंग्रजी, टेक्सन इंग्रजी ईईई. एकाच भाषेची विविध रुपे दाखवते आणि ती सन्माननीय मानली जातात. खुद्द इंग्लंडमद्धे मध्ययुगापर्यंत इंग्रजी ही गावड्यांची भाषा होती तर उच्चभ्रु उमराव सरसकट फ़्रेन्च भाषेचा वापर करत असत.
३. भाषेचा उगमच मुळात संवादासाठी, अभिव्यक्तिसाठी झालेला आहे. कोनत्याही प्रकारची सुक्ष्मातिसुक्ष्म भावना, अवघडातील अवघड समीकरने, तर्क, तत्वद्न्यान मांडता येवु शकेल वा तशी नव-शब्दांची (स्वतंत्र वा बाह्य) योजना करत अर्थप्रवाह पोहोचवु शकेल कि नाही यावर भाषेची अंतर्गत क्षमता प्रकट होते. मराठी या द्रुष्टीने सक्षम भाषा आहे.
४. संस्क्रुत भाषा हीच मुळात ग्रांथिक कारणांसाठी प्राक्रुताला नियमबद्ध करण्यासाठी झाली असल्याने ती संस्क्रुतोद्भव आहे असे मानण्याचे कारण दिसत नाही. उलट संस्क्रुत भाषेतील सर्वच शब्द (व्याकरण सोडता) प्राक्रुतांतील आहेत असे म्हणता येईल. त्यामुळे मराठी ते अन्य भाषांतील शब्द हे मुळातले संस्क्रुत नाहीत.
५. भारतीय उपखंड हा भौगोलिकद्रुष्ट्या अखंड जोडला गेला असल्याने, व्यापार, तीर्थयात्रा, परस्परांवरील आक्रमणे ई. कारणांनी हजारो वर्ष परस्पर संपर्कात राहीला असल्याने शाब्दिक देवान-घेवान होत राहीली आहे. फारसी, अरबी, फ़्रेंच, तमिळ, तेलगुदी आणि मराठीतही अपरिहार्यपणे अशा प्रकारे अनेक शब्दांनी प्रवेश केला आहे आणि एवढा कि ते मुळ आपलेच आहेत असे प्रत्येक भाषिकाला वाटावे.
६. मराठीतील प्रादेशिक भाषा पहा...उदा. अहिराणी भाषेत (भौगोलिक सन्निद्ध्यामुळे) असंख्य गुजराथी, हिंदी आणि भिल्ल बोलींतील शब्दांचा आढळ दिसतो. सोलापुर-पंढरपुरकडे कन्नडीगांचा (हेलासहितचा) प्रभाव दिसतो.
७. भाषा हा मानवाचा स्वतंत्र मुलभुत (Innate) उद्गार असतो. ती कालौघात गरजेपोटी आणि उधार-उसनवारीनेच विकसीत होत असते. जीवन जेवढे गुंतागुंतीचे होत जाते तशी भाषाही विकसीत होते. आदिम भाषा या तुलनेने अविकसीत वाटतात त्याचे एकमेव कारण म्हनजे त्यांच्या जेवनात मुळात गुंतागुंतच कमी असते. त्यामुळे लिपी, व्याकरण, पुर्णतया स्वतंत्र अस्तित्व हे काही अभिजाततेचे निकष असू शकत नाहीत.
८. या पार्श्वभुमीवर मराठी भाषेचा विचार करायला हवा. ही भाषा सर्व प्रकारच्या भावना/संवेदना/विचार/द्न्यान/विद्न्यान ढोबळ ते सुक्ष्मातिसुक्ष्मात अभिव्यक्त करण्यास समर्थ आहे कि नाही? ही भाषा कालसुसंगत बदलत राहिलेली आहे कि नाही? अत्यंत साधेपने ते अवजडपने (म्हनजे बहिणाबाई चौधरी...मर्ढेकर) जीवनभाष्य करण्याची क्षमता या भाषेत आहे कि नाही?
९. या भाषेतील साहित्याचा सहजपणे प्रतिशब्द मिळुन अनुवाद होवू शकतो कि ही भाषाच मुळात शिकायला हवी? (मी जी. ए. कुलकर्णींच्या काही कथांचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्याचा घाट घातला होता...तो सपशेल फसला...आणि राज सुपेसारखा अनुवादक असतांना...) मी स्वता: १९९८ साली पसायदानाचा इंग्रजी अनुवाद करण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता...जो होता तो अमेरिकन बांधवांना आवडला असला तरी मुळाला त्या भाषेत प्रभावी स्पर्ष करता आलेला नाही. तुकोबांच्या गाथेचा अनुवाद झाला आहे, परंतु तेवढे सक्षम प्रतिशब्द मिळालेले नाहीत. दलित/आदिवासी मराठी साहित्याबद्दलही हेच म्हणता येईल. यातील भाषीक सौंदर्य वेगळेच आहे आणि ते सहजी अनुवादनीय नाही. उदा. "गुडसा..." या शब्दाला प्रतिशब्द देण्याची क्षमता अन्य भाषेत नाही. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
१०. मराठी भाषेतील सौंदर्य, अभिव्यक्तिक्षमता, अन्य भाषांशी असलेले मुलभुत फरक, अन्य भाषांत सहजी अनुवाद होवू शकण्याची अक्षमता, स्वतंत्र भाषिक अस्तित्व आणि इतिहास, या पायांवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असे मला वाटते.
११. या भाषेत अभिजात साहित्य का नाही असे प्रश्न काही असंवेदनाशील, परकीय समिक्षेच्या दुधावर पोसलेले काही समिक्षक (उदा. रा.ग. जाधव) विचारतात....यांनी अभिजाततेची व्याख्या काय केली आहे बरे? यांना रशियन शोलोखोब्व वा उपरोक्त जेम्स जोयस अभिजात वाटतात ते कोणत्या निकशावर? केवळ त्यांचे जवळपास सर्वच जागतीक भाषांत अनुवाद झाले म्हणुन? (कि करवले गेले म्हणुन?) साहेबाचे ते श्रेष्ठ या मानसिकतेतुन आपले समिक्षक बाहेर पडलेले नाहीत. मग अगदी द,भि. असोत कि आनंद पाटील. (द.भिं.नी रणांगणवर तीन समिक्षात्मक पुस्तके लिहिली. पण रणांगनचे अनुवाद आजतागायत किती भाषांत झाले आहेत?) देशी समिक्षेचे प्रयोग होत आहेत...ते स्वागतार्ह आहेत आणि ते अजुन खुप व्हायला हवेत. पण या भाषेत अभिजात साहित्य नाही असे आपणच कपालकरंटे म्हनतो हे दुर्दैव आहे.
१२. तुम्ही जगाकडे जा...अन्यथा जग तुमच्यावर सांस्क्रुतीक चढाई करेल, स्वता:च्या क्षमता पहा...फक्त दुस-यांची शक्ती नको...मला शिरवळकरांची "बरसात चांदण्याची" ही कादंबरी कधीही " love story" पेक्षा श्रेष्ठ वाटते. (मराठी समिक्षक फक्त इंग्रजी...वा इन्ग्रजोद्भव कादंब_यांवर समिक्षा करण्यात मग्न असल्याने त्यांना ही कादंबरी माहितही नसेल...) पण आपल्या श्रेष्ठ कादंब-या जागतीक पीठावर नेण्यात आपणच कमी पडतो. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
थोडक्यात मराठी ही अभिजात आहे, फक्त त्याची जाण आपल्यालाच नाही, इंग्रजी येत नाही म्हणुन मराठी वाचतात त्यांचीही कीव करत मी एवढेच म्हणेल कि मराठी भाषा ही अभिजातच आहे...फक्त तिचा अभिमान (मनसे वा शिवसेनेसारखा नव्हे...) नसेल तर मग काय....उरेल ती फक्त एक बोलीभाषा...पुढच्या पिढ्या इंग्रजीतच लिहितिल....लिहुद्यात....मग एक म्रुत भाषा म्हणुन तिची गनना झाली तर आस्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

फार सुंदर प्रतिसाद!तुर्तास

फार सुंदर प्रतिसाद!
तुर्तास (दुर्दैवाने आणि खरोखरच) व्यवस्थित प्रतिसाद देण्याईतका वेळ नाहि आहे. त्रोटक असहमती किंवा मतांतरे मांडत आहे. सहमत असलेल्या मुद्द्यांना पुरवण्या यथाशक्ती, यथावकाश जोडण्यात येतील Smile

१,२,३,५,६
बर्‍यापैकी सहमत आहे.. काहि पुरवण्या वेळ होताच यथावकाश जोडेन
४. संस्क्रुत भाषा ............ मराठी ते अन्य भाषांतील शब्द हे मुळातले संस्क्रुत नाहीत.
हा एक सिद्धांत आहे. असे विविध सिद्धांत आहेत
७. भाषा हा मानवाचा स्वतंत्र मुलभुत (Innate) उद्गार असतो. ......... त्यामुळे लिपी, व्याकरण, पुर्णतया स्वतंत्र अस्तित्व हे काही अभिजाततेचे निकष असू शकत नाहीत.
असहमत आहे. एखादी भाषा केवाळ बोली भाषा आहे, एखाद्या स्वायत्त भाषेची बोली आहे की एखादी स्वायत्त भाषा आहे हे वरील निकषांवर ठरते हे तर मान्य व्हावयास हरकत नसावी. अभिजातता भाषा स्वतंत्र -स्वायत्त होण्याच्या पुढली पायरि आहे हे ही मान्य असेल असे गृहित धरतो. तेव्हा अभिजात भाषेने स्वतंत्र भाषा असण्याचे किमान हे निकष पूर्ण करावेत असे मानले तर त्यात चुक ते काय?
८. या पार्श्वभुमीवर मराठी भाषेचा विचार करायला हवा. ही भाषा सर्व प्रकारच्या भावना/संवेदना/विचार/द्न्यान/विद्न्यान ढोबळ ते सुक्ष्मातिसुक्ष्मात अभिव्यक्त करण्यास समर्थ आहे कि नाही? ही भाषा कालसुसंगत बदलत राहिलेली आहे कि नाही? अत्यंत साधेपने ते अवजडपने (म्हनजे बहिणाबाई चौधरी...मर्ढेकर) जीवनभाष्य करण्याची क्षमता या भाषेत आहे कि नाही?
होय मराठीत तशी क्षमता आहे. मात्र अशी क्षमता अनेक भारतीय भाषांत आहे. त्या प्रत्येक भाषेला अभिजात म्हणायचे का?
९. या भाषेतील साहित्याचा सहजपणे प्रतिशब्द मिळुन अनुवाद होवू शकतो कि ही भाषाच मुळात शिकायला हवी? .........अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
अनुवादाला प्रतिशब्द न मिळणे हे स्वायत्ततेचे उदा म्हणूईन ठिक आहे यावरून अभिजातता कशी ठरावी? किंबहुना कोणत्याही दोन स्वायत्त भाषांतील प्रत्येक शब्द हा १००% परिवर्तनीय असेलच असे नाहि. मग प्रत्येक स्वतंत्र भाषा अभिजात धरावी का? हा प्रश्न येतो.
१०. मराठी भाषेतील सौंदर्य, अभिव्यक्तिक्षमता, अन्य भाषांशी असलेले मुलभुत फरक, अन्य भाषांत सहजी अनुवाद होवू शकण्याची अक्षमता, स्वतंत्र भाषिक अस्तित्व आणि इतिहास, या पायांवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असे मला वाटते.
इतक्याच निकषांतर कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, तेलुगु वगैरे भारतीय भाषांना अभिजात म्हणता येऊ शकेल. या प्रत्येकाला स्वतःचे असे सौंदर्य आहे, अभिव्यक्तिक्षमता आहेच आहे, अन्य भाषांशी असलेले मुलभुत फरक ठळक आहेत, अन्य भाषांत सहजी अनुवाद होवू शकण्याची अक्षमता प्रत्येक स्वतंत्र भाषेत असते, स्वतंत्र भाषिक अस्तित्व आणि इतिहास तर भारताने भाषावार प्रांतरचना करून केव्हाच मान्य केलेले आहे. तेव्हा या निकषांवर जवळजवळ प्रत्येक भारतीय 'राजभाषा' या अभिजात म्हटल्या गेल्या पाहिजेत.
११, १२.
(भावनिक मुद्द्यांवरून हा वाद घातला तर स्वरूप राजकीय अंगाला झुकु लागते हा जालावरील पुर्वोतिहास बघता) हे मुद्दे भावनिक असल्याने त्यावर मतप्रदर्शन करणे टाळत आहे.
फक्त एक की भाषेला अभिजात मानत असलो याचा अर्थ या भाषेचा अभिमान नाही असा घेतला जाऊ नये ही इच्छा + अपेक्षा

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

सुंदर प्रतिसाद

ऋ,
छान मुद्देसूद लिहिले आहेस. पण तू म्हणतोस तसे अजून तुला भर टाकता आली तर मजा येईल. मुद्द्यांना पुरवण्या नक्की जोड.
फक्त एक की भाषेला अभिजात मानत असलो याचा अर्थ या भाषेचा अभिमान नाही असा घेतला जाऊ नये ही इच्छा + अपेक्षा
इथे तुला बहुतेक नसलो असे म्हणायचे होते असे दिसते Wink चुकून का होईना पण तू मान्य केलेस की मराठी भाषा अभिजात आहे Laughing out loud

चेष्टेचा मुद्दा जाऊ देत. पण मराठी भाषेच्या अभिजाततेवर एवढी दीर्घ चर्चा तू करतोयेस यातच तुझे मराठीवरील प्रेम दिसून येते त्यामुळे तुला मराठीचा अभिमान नाही अशी शंकाही कोणाच्या मनात येणार नाही याची खात्री आहे. Smile
नक्की वेळ काढून अजून लिहि रे मित्रा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

एक विचार

भाषेच्या प्रेमावरील एक सर्वांगसुंदर असा स्वतंत्र लेखच वाचल्याची भावना झाली. श्री.संजय सोनवणी हे 'लेखका'च्या भूमिकेतून नव्हे तर मराठी भाषेच्या वृद्धीसाठी मनोभावे प्रयत्न करणार्‍या मूठभर शिलेदारासारखे व्यक्तिमत्व आहे हे त्यांच्या मुद्दे मांडणीवरून ठळकपणे जाणवते.
मूठभर एवढ्यासाठीच म्हणतो की मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळण्यासाठी शासन दरबारी जे होईल तो होईल पण आमची साहित्य संमेलने अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि परवा लंडन पॅरिस इथे भरली म्हणजे मराठीला जागतिक दर्जा आणि त्यापाठोपाठ 'अभिजात' ची मोहोर लाभेल अशा भ्रमात न राहणे पसंत करणारे जे कुणी असतील त्यात श्री.संजय दिसतात. मुळात साहित्य संमेलने भरतात तो एक उत्सवसोहळाच असतो आणि प्रकाशकांची लॉबीही 'खपतात प्रचंड प्रमाणावर पुस्तके' म्हणून त्या आयोजनासाठी पुढाकार घेतात हे उघड चित्र असल्याने भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्या मांडवाखाली काही भरीव वा दीर्घकालीन उपाय सुचविले जात नसतात [गेली पन्नास वर्षे मात्र 'बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हा ठराव नेमका पास केला जातोच, त्याशिवाय संमेलनाचे सूप वाजले असे मानलेही जात नाही.]
मात्र एक आहे संजयजी ~~ मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी धडपड करताना तुमच्यासारख्या साहित्यिकांनी इंग्रजी भाषेचे महत्वही दुर्लक्षून चालणार नाही. विशेषतः आजच्या राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉम्प्युटर आणि इंटरनेटने केलेल्या प्रगतीच्या प्रवाहात आपल्या पाल्यांना सामील होण्यास सांगणे त्याच्या आणि एकूणच समाजाच्या दृष्टीकोणातून नितांत गरजेचे आहे. हे तुम्ही मान्य करालच की भारतासारख्या शेकडो नव्हे तर हजारो लिखित आणि बोलीभाषांनी वेढलेल्या देशाला अजून अधिकृत एक भाषा नाही (त्याची कारणमीमांसा शोधण्याचे हे ठिकाण नाही) पण त्यामुळे झाले आहे असे की काश्मिरपासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून कलकत्यापर्यंत 'इंग्रजी' हीच एक लोकमाध्यमाची भाषा बनली आहे [मी हे देशभर केलेल्या प्रवासातून प्रत्यक्ष अनुभवले आहे]....आणि तिचे प्रमाण वाढते आहे हे 'पुस्तकविश्व' वरील अन्य सदस्यही नाकबूल करणार नाहीत. साहित्याचा प्रश्न काही वेळ बाजूला ठेवला तर चित्र असे आहे की आज या घडीला देशभर संपर्क भाषा म्हणून इंग्रजीला जे स्थान प्राप्त झाले आहे ते अन्य कोणत्याही भारतीय भाषेला मिळेल असे वाटत नाही.
बाहेरची राज्ये तर बाजूलाच राहू देत, पण खुद्द आपल्या मुंबई आणि पुण्यात इंग्लिश आणि हिंदीचे रोजच्या व्यवहारात वाढत चाललेले प्रस्थ पाहता मी बंगलोरमध्ये वा अहमदाबाद इथे आलो आहे की काय असा काही वेळा पुण्यात असताना मला प्रश्न पडला आहे. (मला वाटते कवि सौमित्र किंवा संदीप खरे यानीच पुण्यातील सध्याच्या भाषेला 'मिंग्लिश' असे नाव प्रदान केले आहे.)
तुम्ही साधेपणाबाबत बहिणाबाई चौधरी तर मराठीच्या प्रयोगाविषयी मर्ढेकर/ग्रेस ही नावे उदाहरणादाखल घेतली आहेत. पण आज दुर्दैवाने विद्यापीठातील अभ्यासक्रमाद्वारे अशा लेखकांचे महत्व विद्यार्थ्यांवर बिंबवले जात नाही. मुळात 'मराठी' विषय घेऊन एम.ए. होऊ इच्छिणार्‍यांची विद्यापीठातील उतरती संख्या हा देखील सध्या चिंतेचा विषय होऊ लागला आहे. कोल्हापुरातील ४००० विद्यार्थीसंख्या असलेल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये बी.ए.ला मराठी स्पेशलसाठी केवळ १३ विद्यार्थी आहेत, हे चित्र किती उदासवाणे आहे. आमचे शिवाजी विद्यापीठ तर इंटरनेटवरून मराठी विभागाची माहिती देताना इंग्रजीचा आधार घेते यातच या दैनावस्थेचे कारण लपलेले आहे. मराठीचा प्राध्यापक आपल्या फ्लॅटच्या दारावर 'प्रोफेसर' अशी पाटी लटकवितो, हे कोणत्या अभिमानाचे प्रतीक आहे ?
शासन मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करेल असे परवा मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले पण त्या आधी शासकीय पत्रव्यवहारात/आदेशात जी क्लिष्टता आली आहे ती तातडीने दूर करणे किती आवश्यक आहे हे अगोदर मंत्रालयातील 'भाषाप्रभुं'ना तुमच्यासारख्या नावलौकिक असलेल्या साहित्यिकांनी सांगणे फार गरजेचे आहे.
शासकीय कामासाठी तुम्ही कधी मंत्रालयात गेला आणि तिथल्या लेखनिकाने तुम्हाला सांगितले की, 'तुम्ही ही कागदपत्रे घेऊन 'तदर्थ समिती', 'हाट समिती', 'प्रवर समिती', 'अभिवेदन समिती' यांच्याकडे जा आणि मगच राजादिष्ट अधिकार्‍यांपुढे मत मांडा." ~ काय समजणार असल्या मराठीतून तुम्हाला ? एक उच्चशिक्षित आणि भरपूर वाचन असलेली तुमच्यासारखी व्यक्ती जर त्या लेखनिकाच्या 'बहुमोल मार्गदर्शना'मुळे गोंधळणार असेल तर मग बाकीच्या चिल्लरखुर्द्याची काय गाथा ?
हा झाला शासकीय बाज, पण दुसरीकडे आजची प्रसारमाध्यमे [दृक-श्राव्य दोन्ही] मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कितपत प्रयत्नशील आहेत याच्यासाठी कोणत्याही संशोधनाची गरजच नाही, इतकी ती भाषेची लक्तरे काढण्यात मग्न आहेत. [हा देखील एक वेगळाच विषय आहे, जो तुम्हीदेखील प्रखरपणे मांडू शकाल.]
अनुवादासंदर्भात तुम्ही मांडलेला विचार मान्यच आहे. जी.ए.कुलकर्णी, धाकटे माडगूळकर, शंकर पाटील, महादेव मोरे, उद्धव शेळके, मनोहर तल्हार आदी लेखकांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील मराठी भाषेवर पडलेल्या संस्काराचा सुरेख उपयोग करून आपापले साहित्य नटविले आहे, तो बाज जसाच्या तसा इंग्रजी अनुवादात येणे केवळ अशक्य. जीएंचा तुम्ही उल्लेख केलेलाच आहे. त्यांच्या लिखाणात असलेली बेळगावी-धारवाडी छ्टा असलेली मराठी भाषा कित्येकवेळा पुण्यामुंबईच्या मराठी वाचकाला समजत नाही. "मंगल पाप !" असे त्यांच्या 'मुखवटा' नावाच्या कथेतील एक पात्र एका लंगड्या मुलीला पाहून म्हणते. तो एक नित्याच्या बोलीतील उदगार आहे. किती वाचकांना कळेल की, त्या भागात 'पाप' म्हणजे 'बिचारी' असा अर्थ असतो ? हे झाले एक उदाहरण, अशी कित्येक आहेत तिच्यामुळे खरं तर मूळ मराठी भाषेला अनेक अलंकार मिळू शकतील, पण दुखणे असे आहे की किती विद्यापीठात जी.ए.कुलकर्णीसम लेखक अभ्यासात शिकविले जातात?
असो. खूप लिहिण्यासारखे आहे या विषयावर, विशेषतः तुमच्यासारख्या प्रगल्भ लेखकांसमवेत या माध्यमाद्वारे संवाद साधताना. तो तसा उपलब्ध करून दिल्याबद्दल 'पुस्तकविश्व'चेही आभार.
अशोक पाटील

अशोककाका, मात्र एक आहे संजयजी

अशोककाका,
मात्र एक आहे संजयजी ~~ मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी धडपड करताना तुमच्यासारख्या साहित्यिकांनी इंग्रजी भाषेचे महत्वही दुर्लक्षून चालणार नाही. विशेषतः आजच्या राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉम्प्युटर आणि इंटरनेटने केलेल्या प्रगतीच्या प्रवाहात आपल्या पाल्यांना सामील होण्यास सांगणे त्याच्या आणि एकूणच समाजाच्या दृष्टीकोणातून नितांत गरजेचे आहे.
इंग्रजी भाषेच्या तुम्ही उल्लेखिलेल्या या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत आहे.
तुम्हाला माहिती आहे की नाही हे माहीत नाही पण संजय सोनवणींचे इंग्रजी देखील तितकेच चांगले आहे.
शोध घेताना दिसले की संजय सोनवणींच्या ३ इंग्रजी पुस्तकांना विदेशी वाचकांनी देखील ५ स्टार रेटिंग दिलेली आहेत.
हा पहा दुवा

तुम्ही म्हणता तसे प्रगतीच्या प्रवाहात आपली पाल्ये सामील व्हायलाच पाहिजेत. पण मराठीचा स्वाभिमान टिकवून. दुर्दैवाने आज असे होत नाही.
संजय सर म्हणतात तसे,
फक्त तिचा अभिमान (मनसे वा शिवसेनेसारखा नव्हे...) नसेल तर मग काय....उरेल ती फक्त एक बोलीभाषा...पुढच्या पिढ्या इंग्रजीतच लिहितिल....लिहुद्यात....मग एक म्रुत भाषा म्हणुन तिची गनना झाली तर आस्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

आज आपण सर्वांनी आपलीच मराठी भाषा स्वाभिमानाने जपली नाही तर भविष्यकाळात मराठी भाषा मृत होऊ शकेल. तेव्हा प्रगती हवीच इतर भाषांचे ज्ञानही हवेच. पण मातृभाषेचे मूल्य त्यासाठी कोणी देऊ नये एवढीच कळकळीची इच्छा.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

इंग्रजी

सध्या एवढेच विचारतो, इंग्रजीला आपण अभिजात भाषा मानता का?
मिहिर

असावी

मला इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान नाहिये, पण जे आहे त्यावरुन तरी इंग्रजी ही अभिजात भाषा असावी असे वाटते आहे.
संजय सर किंवा ऋ यावर अधिक अधिकाराने सांगू शकतील.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ग्रीक, ल्यटीन, संस्क्रुत,

ग्रीक, ल्यटीन, संस्क्रुत, तमीळ ई. भाषा आज अभिजात मानल्या जातात. खरे तर यातील अनेक भाषा आज कोणाचीही बोलीभाषा नाही.
वरील चारपैकी ग्रीक आणि तमिळ या दोन भाषा अनेक लाख लोकांच्या मातृभाषा आहेत. ५०% हा आकडा दुर्लक्ष करण्यालायक नाही.
उदा. डाक्टरेटसाठी भौतिकशास्त्राचा संशोधनात्मक प्रबंध मराठीत लिहिता येणे सहज शक्य असतांना आणि तेवढी भाषा-शब्द-सम्म्रुद्धी असतांना होत नसेल तर दोष आपलाच आहे.
असा प्रबंध लिहीणं शक्य आहे, फक्त जगाने त्या प्रबंधाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूळ विज्ञानाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. भौतिकशास्त्रातलं संशोधन प्रसिद्ध करताना विज्ञान हाच महत्त्वाचा मुद्दा असतो, भाषा फक्त आधाराला येते. म्हणूनच आज अनेक देशांत संशोधन इंग्लिशमधे प्रसिद्ध करण्याची प्रथा आहे. उद्या बहुतांश जग मॅडरीन बोलायला लागलं तर इंग्लिश -> मँडरीन असं स्थित्यंतर होईल.
प्रबंध आणि संशोधन मराठीत प्रसिद्ध व्हावं असा हट्ट ठेवण्यापेक्षा शिक्षण मराठीत व्हावं हा हट्ट जास्त(?) व्यवहार्य वाटतो.

सहमत

असा प्रबंध लिहीणं शक्य आहे, फक्त जगाने त्या प्रबंधाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूळ विज्ञानाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. भौतिकशास्त्रातलं संशोधन प्रसिद्ध करताना विज्ञान हाच महत्त्वाचा मुद्दा असतो, भाषा फक्त आधाराला येते.
+१ अगदी सहमत.
ग्रीक, ल्यटीन, संस्क्रुत, तमीळ ई. भाषा आज अभिजात मानल्या जातात. खरे तर यातील अनेक भाषा आज कोणाचीही बोलीभाषा नाही.
यापैकी माझ्यामते लॅटीन व संस्कृत या मृत झालेल्या (मात्र महत्त्वाच्या)भाषा आहेत. त्या एकेकाळी (जोपर्यंत जिवंत होत्या तोपर्यंत) अभिजात होत्या हे मात्र मान्य असावे.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

होय आणि होय

यापैकी माझ्यामते लॅटीन व संस्कृत या मृत झालेल्या (मात्र महत्त्वाच्या)भाषा आहेत. त्या एकेकाळी (जोपर्यंत जिवंत होत्या तोपर्यंत) अभिजात होत्या हे मात्र मान्य असावे.
होय आणि अभिजातत भाषेची जी व्याख्या मला समजली आणि पटली आहे त्याप्रमाणे होय.
लॅटीन आणि संस्कृतचा अभ्यास अनेक भाषा शिकणार्‍यांना, उच्चारशास्त्रावर काम करणार्‍यांना उपयोगी पडत असावा. उदा: एका भाषिक-कुटुंबातल्या भाषांमधे मूळ शब्द एकच असेल आणि पुढे त्याचे उच्चार बदलत गेले आणि शब्दच वेगळे वाटावेत एवढे बदलले आहेत असं वाटतं. भारतीय भाषांच्या अतिपरिचयामुळे हे मला स्वतःला एवढं जाणवत नाही, पण पोटापाण्याच्या काळजीने का होईना, vegetarian हा शब्द फ्रेंच, जर्मन, स्पानिश, वगैरे भाषांमधे कसा म्हणतात हे विचारलं तेव्हा हे जाणवलं.

+१

संस्कृत संगणकासाठी उत्तम आहे म्हणायचे तेव्हा कळायचं नाही. पुढे पाणिनीचं व्याकरण देण्याची पद्धत पाहिली आणि कळून चुकलं की एखाद्या भाषेचा अल्गोरिदम लिहावा त्या पद्धतीने त्यांने भाषेचे नियम लिहिले आहेत. इतके काटेकोर नियम बनवलेले अन्य उदा परिचयाचे नाही.
तेव्हा अभ्यासासाठी या भाषा महत्त्वाच्या आहेतच आणि सध्या मृत असल्या तरी (हिब्रू प्रमाणे) न जाणो भविष्यात पुन्हा जिवंत व्हायच्या Smile
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

खरे सांगतो, येथे संवाद

खरे सांगतो, येथे संवाद साधण्यात जो आनंद मिळत आहे तो सहसा अन्यत्र मिळत नाही. माझी मते आग्रही असतात त्यावर जावू नका, उत्तमोत्तम मते, विरोधत जांणारी असली तरी, स्वीकाराण्याएवढा मोकळेपणा माझ्यात आहे. ऋशिकेशजी, आपण म्हटले आहे कि अनुवादक्षमता नसणे वा सोपे ते अवजड व्यक्त करण्याची क्षमता असणे हे गुण अन्य भारतीय भाषांतही आहेत. हे मान्य. जगभरच्या अनेक भाषांत (रशियन, म्यंडरीन ई. मद्धेही असतील.) ही अभिव्यक्तीची क्षमता वा संभावना असू शकते. ब-याच भाषा या प्रबळ लोकांच्या असल्याने जागतीक संवाद माध्यमाची साधने बनली. इंग्रजी हे त्याचे एक उदाहरण आहे. गोव्यावर पोर्तुगीजांचचे राज्य होते त्यामुळे तेथील भाषेवर पोर्तुगीजचे सम्स्कार आपल्याला पहायला मिलतातच. इंग्रजी आज जागतीक माध्यम बनायला उत्तर्काळात (म्हणजे ब्रिटिश साम्राज्यावरील सुर्य मावळल्यानंतर) अमेरिका सार्वभौम झाल्याचे कारण आहेच. कोणतीही भाषा संपर्काचे साधन बनायला अर्थसत्ता आणि राजसत्ता कारणीभुत ठरते. मओगल काळात फारसीचा अंम्मल भारतावर होता...ब्रिटिश आल्यावर इंग्रजीचा वाढला एवढेच. म्हणुन ती ज्ञान भाषा होती वा ती क्षमता होती असे म्हनता येत नाही. अदिती ताईंनी म्हटल्याप्रमाणे भौतिकशास्त्राचे प्रबंध मराठीत लिहिता आले तरी ते मग जागतीक कसे होणार हा प्रश्न योग्यच आहे. पण ते आधी मराठीत मांडुन नंतर इंग्रजीत नेल्याने काय फरक पडणार आहे? खरे तर मराठीबाबतच अज्ञान असल्याने मराठी अशा शास्त्रीय बाबींना व्यक्त करण्यासाठी योग्य नाही असा भ्रमच याला कारण असु शकणार नाही काय? मार्क्सने दास क्यपिटाल हा आधी इंग्रजीत नक्कीच लिहिला नव्हता. खलील जिब्रानच्या जगपरसिद्ध कविता मुळात अरबी भाषेतच लिहिल्या गेल्या व नंतर त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने इंग्रजीत अनुवादित केल्या. रविन्द्रनाथांची गीतांजली हेही एक असेच उदाहरण आहे. खरे तर आपण आपल्या भाषेचे सामर्थ्य्/बळ किती जाणतो आणि ती मुळात किती समजावुन घेतो यावरच सारे अवलंबुन आहे. मराठी समाज हा जगावर राज्य करत नाही...पण काही शतकांपुर्वी जेथे केले तेथे आजही मराठी जिवीत आहेच. राजसत्ता, अर्थसत्ता आणि ज्ञानसत्ता याच भाषांचे प्रचारण होण्याचे कारण असते. श्री. अशोकजी पाटील यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आज आपण इंग्रजीला डावलु शकत नाही हे खरेच आहे. मराठी अभिजात आहे कि नाही हे प्रथम आपल्यालाच ठरवावे लागेल. साहित्य सम्मेलने त्यात कसलीही भुमिका बजावत नाहीत. मुळात मराठी साहित्तिक अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल मौन पाळुन असतात. उदा, आताच्याच अण्णांच्या आंदोलनाबद्दल बघा. सरकारी परिपत्रकांची भाषा ही अत्यंत अवजड आणि त्याचा इंग्रजी अनुवाद (कि ती परिपत्रके आधी इंग्रजीतच बनवली जातात आणि नंतर त्यांचा मराठी (?) अनुवाद केला जातो म्हणुन?) सर्वसामान्यच काय पु. लं. नाही फेफरे आणु शकेल अशी असते यात वादच नाही. पण यामागे मुलात मराठी कोणी वाचणारच नाही/वाचत नाहीत असा शासकीय अनुभवही असू शकतो म्हणुन सोप्या मराठीचा शासनदरबारी आग्रह धरला जात नाही.
मराठी भाषेला अभिजात म्हणावे हा आग्रह अशासाठी आहे कि उत्तरभारतीय भाषा आणि दाक्षिनात्य भाषा या दोहोंपेक्षा स्वतंत्र भाषिक संस्क्रुती या भाषेला आहे. एक स्वतंत्र सामाजिक मानसिकता, अस्मिता अन्य भाषांची लेणी लेत या भाषेने टिकवली आहे. या भाषेत अन्य भाषांत सहसा न आढळनारे तत्वज्ञान्/सामाजिक विचारधारा या भाषेत आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय (त्यांचे साहित्य) हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. बंगाल आणि महाराष्ट्रातील साधर्म्य असे कि सामाजिक समतेच्या क्रांतीची भाषा यांनीच सर्वप्रथम आधुनिक युगात उद्गारली. भाषा लोक घडवतात आणि तेच तिला माध्यम म्हणुन घेत आपापल्या विचारधारा उंचावतात. अन्य भाषांचे सम्स्कार मोलाचे असतात यात शंकाच नाही...पण मराठीने अंधारयुगात घ्या कि वर्तमानातही आपले स्थान टिकवले आहे. म्हणुन तिला अभिजात म्हणावे का? तर तसेही नाही. ही भाषा अभिजात आहे असे मी म्हणतो कारण भविष्यालाही दिशा देण्याची, मानवी अंतर्मनाचा वेध घेण्याची आणि मराठी मानसांनी मनावर घेतले तर अर्थसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्तेच्या माध्यमातुन जागतीक झेप घेण्याची कुवत आहे म्हणुन. आणि ही अव्हाने पेलण्याची क्षमता मराठी भाषेत नक्कीच आहे. आपण सर्व मिळुन प्रयत्न केला तर अशक्य असे काय आहे?

मनात किंतु रहातोच

माझी मते आग्रही असतात त्यावर जावू नका, उत्तमोत्तम मते, विरोधत जांणारी असली तरी, स्वीकाराण्याएवढा मोकळेपणा माझ्यात आहे
अर्थातच याची खात्री होती. म्हणून तर संकोच न बाळगता विरोधी मते लिहितो आहे आणि तुम्हाला जो आनंद मिळत आहे, खात्री बाळगा, मला व इतर पुवि-मित्रांनाही मिळत आहेच!
मराठी भाषेला अभिजात म्हणावे हा आग्रह अशासाठी आहे कि उत्तरभारतीय भाषा आणि दाक्षिनात्य भाषा या दोहोंपेक्षा स्वतंत्र भाषिक संस्क्रुती या भाषेला आहे.
सहमत आहे. मराठी भाषिक वैषिष्ट्याची उदा द्यायची तर अभंग, फटका, भारूड, गवळण, पोवाडा वगैरे अनेक खास 'मराठी' काव्यप्रकार या भाषेत प्रसवले आहेत. गद्यात मात्र तितकेसे प्रयोग होताना दिसत नाहित. इतरही उदा देत येतील मात्र सारांश असा की मराठी ही इतर भारतीय भाषांपेक्षा/इतकीच स्वतंत्र-स्वायत्त आहे हे मान्यच आहे. प्रश्न आहे ती अभिजात आहे का?
अव्हाने पेलण्याची क्षमता मराठी भाषेत नक्कीच आहे. आपण सर्व मिळुन प्रयत्न केला तर अशक्य असे काय आहे?
+१.. याही बाबतीत सहमत आहे. मराठीची क्षमता, लोकांची इच्छाशक्ती वगैरे बद्द्ल द्विधा नाही. थोडक्यात तुमच्यासारख्या साहित्यिकांच्या योगदानापासून ते खेडोपाड्यातील मराठी बोलणार्‍या शेतकर्‍यापर्यंत सार्‍यांच्या योगदानाने एक दिवस मराठी अभिजात भाषा म्हणून मान्यता पावेलही. मात्र आज नव्या पिढीकडे पाहिलं, मराठी शाळा- तिथे दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा दर्जा पाहिला, पालकांचा+शासनाचा मराठीकडे बघण्याचा (काहिसा अपरिहार्य)दृष्टिकोन बघितला, भांडवलशाही म्हणा - मुक्त अर्थव्यवस्था म्हणा- ज्यामुळे होत असलेला बदलता भारतीय ढाचा बघितला, भारताचा होत असलेला 'मेल्टिन्ग पॉट' बघितला की मात्र मराठी भाषेत क्षमता असुनही ती अभिजात भाषा बनेल का याचे उत्तर देताना मनात किंतु रहातोच. हा मेल्टिंग पॉट मराठीच नाहि तर अनेक भारतीय भाषांना पोटात घेऊन देशांत मोजक्या भाषा ठेवेल हे निश्चित आहे. अश्यावेळी आपली मराठी (आणि शेजारची गुजरातीही) हिंदी व इंग्रजी यांपासून वेगळी समजता येणार नाही इतके आपले अस्तित्त्व टिकुन ठेवण्या इतकी सशक्त आहे की ते अस्तित्त्व हरवून बसेल हे आता सांगता येणार नाही.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

+१ असेच म्हणतो...

तुम्हाला जो आनंद मिळत आहे, खात्री बाळगा, मला व इतर पुवि-मित्रांनाही मिळत आहेच!
अगदी असेच म्हणतो... खूप आनंद मिळतोय या धाग्यावर चर्चा करताना Smile
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सागरजी, लिंक दिल्याबद्दल

सागरजी, लिंक दिल्याबद्दल आभार...मलाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मी त्यातील प्रतिक्रिया माझ्या ब्लौगवरही शेअर करतो...य तिन्ही पुस्तकांच्या २ आव्रुत्त्या झाल्या आणि त्याही आता संपल्या आहेत...व्यंकु शिबु ही नवीन इंग्रजी कादंबरी लवकरच प्रकाशित होईल तेंव्हा कळवतोच. तिचा मराठी अनुवाद विजय तरवडे करत आहेत. या कादंबरीची गम्मत अशी...ती मी स्वप्नात वाचली होती. मी फक्त तिचे पुनर्लेखन केले आहे असे म्हना ना! अगदी मुखप्रुष्ठही मला स्वप्नात दिसले तसेच बनवून घेत आहे. (नशीब स्वप्नात पाहिलेले चित्रपट मी तसेच बनवुन घेण्याच्या नादी नाही लागलो...नाहीतर बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हनायची वेळ आली असती....)

ही माहिती देऊ शकलो याचे समाधान

संजय सर,
तुमचे विदेशातही अनेक चाहते आहेत हे अ‍ॅमेझॉन.कॉम या साईट वर पुस्तकांची परिक्षणे शोधताना कळाले, म्हणून लगेच तो दुवा इथे दिला. पुस्तकांचे रिव्ह्यूज् कसे लिहिले जावेत याबद्दल अशा संकेतस्थळांवरुन शिकायला मिळते Smile

तुमच्या ३ पुस्तकांना पंचतारांकीत रेटींग आणि सविस्तर रिव्ह्यूज् पाहिल्यावर मला सुखद आश्चर्य वाटले होते. येथील कित्येक पुस्तकप्रेमी अमेरिकेतही राहतात, त्यांना तुमच्या या चांगल्या इंग्रजी पुस्तकांबद्दल माहिती व्हावी हाही एक हेतू होताच
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

'अभिजात' किंवा 'क्लासिकल'मागचं सत्ताकारण

'अभिजात' या संस्कृत शब्दाचा अर्थ माझ्या माहितीनुसार 'ज्याचा जन्म उच्च कुलात झाला आहे तो' असा (शब्दशः 'वर जन्मलेला') आहे. म्हणून तो शब्द 'एलीट' या अर्थानं वापरला जातो. भाषेच्या संदर्भात तो 'क्लासिकल' या अर्थानं वापरला जातो कारण 'क्लासिकल'मध्ये असा अर्थ अभिप्रेत असतो:
it should be ancient, it should be an independent tradition that arose mostly on its own, not as an offshoot of another tradition, and it must have a large and extremely rich body of ancient literature*
आपल्या भाषेवर आपलं प्रेम असतं आणि ती श्रेष्ठ मानली जावी असं त्या प्रेमापोटी आपल्याला वाटतं हे ठीक आहे, पण त्याची अंधश्रद्धा बनू नये असं वाटतं. उदा: पाश्चिमात्य जगात इंग्रजी ही 'क्लासिकल' भाषा मानली जात नाही कारण ती खूप नवीन आहे. कदाचित अनेकांना हे धक्कादायक वाटेल, पण काहीशे वर्षंच जुनी असणारी ही भाषा जगावर सत्ता गाजवते तरीही ती 'क्लासिकल' नाही.
मराठीचा विचार करता अन्य अनेक भारतीय भाषांहून मराठी ही धाकटीच आहे. ती सरळसरळ संस्कृतोद्भव नसली तरी ती अनेक भाषांच्या धेडगुजरी संकरातून बनली आहे. तीवर फारसी-तुर्की-अरबी, प्राकृत-पैशाची-अपभ्रंश, कन्नड-तेलुगु अशा अनेक भाषाप्रवाहांतले प्रभाव आहेत. तद्वत तिला अभिजात मानण्याचा आग्रह मला चुकीचा वाटतो.
याशिवाय पुढं जाऊन मी असंही म्हणेन की अभिजाततेचा आग्रह ही मला मुळात एक पुराणमतवादी (आणि काहीशी जातीयवादी) भूमिका वाटते. म्हणजे काय? तर उच्च कुळात जन्मणं हे श्रेष्ठत्वाचं लक्षण असतं या अर्थानं 'अभिजात' या शब्दाला परंपरेनं 'चांगला' अर्थसंदर्भ जोडला गेलेला आहे. अभिजाततेपाठी धावणं म्हणजे एक प्रकारे 'उच्चकुलीन' = श्रेष्ठ ही सत्ताव्यवस्था मान्य करणं. मला ही सत्ताव्यवस्थाच मान्य नसेल तर मग मला अशा अभिजाततेशी देणंघेणंच नाही. 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' या न्यायानं आपण मराठी भाषेत विविध प्रकारचं चांगल्या दर्जाचं साहित्य आणत रहावं, ते वाचत रहावं, इतरांबरोबर वाटून घ्यावं आणि आपल्या कुलीनतेविषयी चिंता करू नये. इंग्रजीनं हेच केलं. म्हणूनच आज इंग्रजी अभिजात नसण्यानं काहीच बिघडत नाही. इंग्रजी साहित्य आपला अव्वलपणा सिद्ध करण्यास पुरेपूर समर्थ आहे.
* - संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Classical_Language
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

:))

अभिजाततेचा आग्रह ही मला मुळात एक पुराणमतवादी (आणि काहीशी जातीयवादी) भूमिका वाटते
Smile सहमत आहे
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

कन्नड

कन्नड, तेलुगुला अभिजात का म्हणले जाते? या दोन द्रविडीयन भाषांवर संस्कृतचा मोठा प्रभाव आहे ना? तेलुगुवर उर्दूचाही प्रभाव आहे ना?
मिहिर

+१ सहमत आहे

'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' या न्यायानं आपण मराठी भाषेत विविध प्रकारचं चांगल्या दर्जाचं साहित्य आणत रहावं, ते वाचत रहावं, इतरांबरोबर वाटून घ्यावं आणि आपल्या कुलीनतेविषयी चिंता करू नये. इंग्रजीनं हेच केलं. म्हणूनच आज इंग्रजी अभिजात नसण्यानं काहीच बिघडत नाही. इंग्रजी साहित्य आपला अव्वलपणा सिद्ध करण्यास पुरेपूर समर्थ आहे.
य विचारांशी तंतोतंत सहमत आहे चिंतातुर जंतु जी Smile
मराठी आपली मायबोली श्रेष्ठ आहेच व त्यातून अप्रतिम दर्जेदार साहित्यकृती सातत्याने निर्माण होत आहेत. त्यांचा आस्वाद घेताना जो आनंद होतो तो अवर्णनीय आणि अफलातून आहे. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

एक-दोन मुद्दे स्पष्ट करतो.

एक-दोन मुद्दे स्पष्ट करतो. अभिजातता ही अभिजनतेपक्षा स्वतंत्र बाब आहे. जातीयता, कुलीनता वा पुराणपंथीयता म्हणजे अभिजातता नक्कीच नाही. एके काळी संस्क्रुत ही अभिजनांची तर प्राक्रुत ही सामान्यांची भाषा मानण्याची प्रथा होती. संस्क्रुत नाटकांतुन सामान्यांचे संवाद प्राक्रुतातुन दिले जात. इंग्रजीलाही अभिजाततेचा मान कधी मिळाला नाही...उलट फ्रेंच भाषा ही ब्रिटिश अभिजनांची नित्याची भाषा होती हे मी वरच एका दुव्यात लिहिले आहेच. अभिजाततेचा दर्जा मिळाला म्हनजे भाषा अमर होईल वा आपोआप ती व्रुद्धींगत होण्याची संभावना निर्माण होईल असेही नाही. या दर्जाचा अल्प एवढाच अर्थ आहे कि त्या त्या भाषिकांमद्धेच भाषाविषयक अभिमान निर्माण होवुन तिचा वापर वाढण्याची शक्यता. पण अभिजाततेचा आग्रह धरण्यामागे हेच एकमेव कारण नाही. अभिजाततेच्या दर्जामुळे त्या त्या भाषा जगभर विद्यापीठांतुन अभ्यासल्या जातात. त्यातील विविध साहित्याची शास्त्रशुद्ध नोंद होत त्यावर विविधांगाने अभ्यास होतो. मराठीत आजही उत्तमोत्तम कलाक्रुती निर्माण होत आहेत, अन्य भाषांत त्या भाषांतरीत होत आहेत व अन्य भाषीय साहित्यही मराठीत विपुलपणे प्रसिद्ध होत आहे ही अभिमानाची बाब आहेच...पण तेवढे पुरेसे आहे काय? एखादी कलाक्रुती अभिजात आहे असे आपण म्हणतो तेंव्हा त्याचा संदर्भ आपण जातीयतेशी (म्हणजे उच्चकुलीनादि) नक्कीच जोडत नसनार. अभिजाततेचा सरळ अर्थ आहे त्या त्या साहित्यक्रुतीतील वैश्वीकता. आणि अशा वैश्विक परिप्रेक्षातील क्रुती अनेक असणारी/तशी निर्मिती क्षमता असनारी भाषा म्हनजे अभिजात भाषा. मराठी भाषा अनेक भाषांची सरमिसळ आहे असे वरकरणी वातणे स्वाभाविक आहे व तेही त्यातील अनेक भाषीय शब्दांच्या बहुलतेमुळे. हा नियम सर्वच (आदिवासी भाषा सोडुन) भाषांना लावता येतो. त्या अर्थाने स्वतंत्र भाषा कोणत्याही भाषेला म्हणता येत नाही. पण अभिव्यक्तीसाठी भाषांचा वापर कसा केला गेला आहे हेही महत्वाचे आहे. ती भाषा कितपत प्रवाही राहीली आहे हेही पहाणे महत्वाचे आहे.

गोंधळ वाढतो आहे

>>अभिजातता ही अभिजनतेपक्षा स्वतंत्र बाब आहे.<<
ही कुणाची व्याख्या आहे आणि तिला काय संदर्भ आहे? भारतापुरता विचार करायचा झाला तर या दुव्यानुसार हे निकष आहेतः
High antiquity of its early texts/recorded history over a period of 1500-2000 years; A body of ancient literature/texts, which is considered a valuable heritage by generations of speakers; The literary tradition be original and not borrowed from another speech community; The classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the classical language and its later forms or its offshoots.
आता इतर काही मुद्द्यांकडे वळूया.
>>जातीयता, कुलीनता वा पुराणपंथीयता म्हणजे अभिजातता नक्कीच नाही. <<
अभिजाततेचा आग्रह हा एक प्रकारचा उच्चकुलीनतेच्या आग्रहासारखा असतो असा मुद्दा आहे. वरचे निकष हे स्पष्ट दाखवतात.
>>इंग्रजीलाही अभिजाततेचा मान कधी मिळाला नाही...उलट फ्रेंच भाषा ही ब्रिटिश अभिजनांची नित्याची भाषा होती हे मी वरच एका दुव्यात लिहिले आहेच. <<
पण फ्रेंचदेखील (इंग्रजीहून अधिक जुना इतिहास असूनही) अभिजात भाषा मानली जात नाहीच. उदाहरण देताना इंग्रजीचं दिलं कारण आपल्याकडे समजायला सोयीचं जातं आणि मराठी-इंग्रजीचा इतिहास काहीसा समांतर आहे म्हणून - म्हणजे अभिजनवर्गाकडून हेटाळणी वगैरे.
>>अभिजाततेचा दर्जा मिळाला म्हनजे भाषा अमर होईल वा आपोआप ती व्रुद्धींगत होण्याची संभावना निर्माण होईल असेही नाही. या दर्जाचा अल्प एवढाच अर्थ आहे कि त्या त्या भाषिकांमद्धेच भाषाविषयक अभिमान निर्माण होवुन तिचा वापर वाढण्याची शक्यता. <<
अभिमान हा शब्द संघर्षजनक वाटतो. एकंदर आपल्याकडचं अस्मितांचं राजकारण पाहता अभिमानसुद्धा (उच्चकुलीनतेच्या आग्रहासारखा) टाळावासाच वाटतो. प्रेम करा पण अभिमान बाजूला ठेवा असंच म्हणावंसं वाटतं (आणि प्रेम इंग्रजीवरदेखील केलं जाऊ शकतं. किंबहुना आज ज्या प्रमाणात इंग्रजीचा वापर बोकाळला आहे तो पाहता उलट 'अरे तिच्यावर थोडं प्रेमदेखील करा रे; निव्वळ व्यापारी उद्देशानं पोतेर्‍यासारखं फरफटत वापरू नका बिचारीला' असंच म्हणावंसं वाटतं.)
>>पण अभिजाततेचा आग्रह धरण्यामागे हेच एकमेव कारण नाही. अभिजाततेच्या दर्जामुळे त्या त्या भाषा जगभर विद्यापीठांतुन अभ्यासल्या जातात. त्यातील विविध साहित्याची शास्त्रशुद्ध नोंद होत त्यावर विविधांगाने अभ्यास होतो. <<
हे आजही होत आहेच. अभिजाततेच्या सर्टिफिकिटानं ते वाढेल असं का वाटतं? याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का? मला तरी अशी सर्टिफिकिटासाठीची ओढाताण निव्वळ अभिनिवेशी वाटते.
>>एखादी कलाक्रुती अभिजात आहे असे आपण म्हणतो तेंव्हा त्याचा संदर्भ आपण जातीयतेशी (म्हणजे उच्चकुलीनादि) नक्कीच जोडत नसनार. अभिजाततेचा सरळ अर्थ आहे त्या त्या साहित्यक्रुतीतील वैश्वीकता. आणि अशा वैश्विक परिप्रेक्षातील क्रुती अनेक असणारी/तशी निर्मिती क्षमता असनारी भाषा म्हनजे अभिजात भाषा. <<
असहमती. वर उल्लेखलेल्या (भारतीय भाषांविषयीच्या) मुद्द्यानुसार 'क्लासिकल' वाङ्मय आणि आधुनिक (समकालीन) वाङ्मय यांत फरक केलेला आहे. आधुनिक वाङ्मयातल्या काही कलाकृतींना वयोमानानुसार काही कालानं अभिजात मानलं जाता येईलही, पण उदाहरणार्थ गेल्या दहा वर्षांतल्या कलाकृतींना फार तर 'उत्तम', 'महत्त्वाची', 'पथदर्शी' वगैरे विशेषणं लावली जाताना दिसतात, पण अभिजात म्हटलेलं दिसत नाही.
>>मराठी भाषा अनेक भाषांची सरमिसळ आहे असे वरकरणी वातणे स्वाभाविक आहे व तेही त्यातील अनेक भाषीय शब्दांच्या बहुलतेमुळे. हा नियम सर्वच (आदिवासी भाषा सोडुन) भाषांना लावता येतो. त्या अर्थाने स्वतंत्र भाषा कोणत्याही भाषेला म्हणता येत नाही. <<
म्हणूनच चिक्कार वर्षांपूर्वीपासून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरलेली भाषा अभिजात गणली जाते. संस्कृत/तामिळ आकाशातून पडलेल्या नसल्या तरीही मराठीहून चिक्कार जुन्या आहेत आणि त्यांची वाङ्मयीन परंपरादेखील मराठीहून चिक्कार जुनी आहे.
>>पण अभिव्यक्तीसाठी भाषांचा वापर कसा केला गेला आहे हेही महत्वाचे आहे. ती भाषा कितपत प्रवाही राहीली आहे हेही पहाणे महत्वाचे आहे.<<
महत्त्वाचं असेलही, पण त्यामुळे त्याचा संबंध अभिजाततेशी कसा लागतो ते स्पष्ट होत नाही.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

थोडक्यात मराठी अभिजात नाही,

थोडक्यात मराठी अभिजात नाही, तिला अभिजाततेचा दर्जा मिळण्याचा शास्त्रीय आधार नाही, तसा आग्रह धरणे हे कुलीनत्वाचा आग्रह धरण्यासारखे आहे, साहित्य म्हणुन अभिजात म्हणता येईल असे काही मराठीत विशेष नाही...तो दर्जा न मिळताही मराठीचा भाषा म्हणुन अभ्यास होतोच आहे...इंग्रजीला अभिजाततेचा दर्जा नाही म्हणुन काय बिघडले? असे सारांशाने चिंतातुर जंतु यांना म्हणायचे आहे. किंबहुना या सर्वच चर्चेतील साधारण कल असाच असल्याचे दिसते. मी या सर्व मतांचा सन्मान करतो. आणि त्याशी काही प्रमाणात असहमत असण्याचा नैसर्गिक अधिकार अबाधित ठेवत मराठी भाषेला अभिजाततेचा (क्लासिकल आणि एलाइट यातील फरक लक्षात घेत) दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहील हे नक्कीच. दोस्तों...शुभेच्च्छा तरी द्याल कि नाही?

अभिजात मराठी साहित्य

>>साहित्य म्हणुन अभिजात म्हणता येईल असे काही मराठीत विशेष नाही.<<
हे विधान मात्र मी वर केलेले नाही असे म्हणू इच्छितो. बाकी शुभेच्छा.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मी तुमच्या बरोबर आहेच

संजय सर,
मी आहे तुमच्याबरोबर. केवळ प्राचिनता आणि तत्कालिन काळातील प्रचलितता हा निकष अभिजाततेच्या कसोटीवर मला तरी मान्य नाही. मराठी भाषा अभिजात आहे असे माझे वैयक्तिक मत आहेच. कुलीन - अकुलीन या वादात न पडता मराठी भाषेचे सौंदर्य (दर्जा) हा अभिजाततेसाठी मुख्य निकष मला तरी वाटतो. तांत्रिक बाबी पूर्ण करता येत नाहीत म्हणून एखाद्या भाषेचे (दर्जा आणि स्वतंत्र अस्तित्त्व असूनही) अभिजातत्त्व नाकारणे मला तरी जमणार नाही. माझे मराठीवरचे अतिप्रेम म्हणा किंवा काहीही नाव द्या त्याला. माझ्या दृष्टीने तरी मराठीसारखी रसाळ, सुंदर आणि अभिजात भाषा नाही Smile
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

मराठी

अभिजात भाषा केवळ तांत्रिकतेच्या निकषावर बघितली तर मराठी त्यात बसत नाही हे नक्कीच. पण याचा अर्थ असा नाही की मराठी श्रेष्ठ भाषा नव्हे.
सागरशी पूर्णपणे सहमत.
मराठीचा उत्कर्ष व्हावा याच हेतूने आपण सर्व प्रयत्न करत आहोतच. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मराठीला जर अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला तर यात वावगे काहीच नाही.
तेव्हा संजय सरांना शुभेच्छा तर आहेतच.

चला, मराठीचा सर्वथैव उत्कर्ष व्हावा म्हणून आपण सर्वच प्रयत्न करूयात.

+१ असेच म्हणतो...

मराठीचा सर्वथैव उत्कर्ष व्हावा म्हणून आपण सर्वच प्रयत्न करूयात. Smile
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

शुभेच्छा

शुभेच्च्छा तरी द्याल कि नाही
मराठीला 'अभिजात' मानत नसलो तरी मातृभाषेचा 'अभिमान' नाही असे नाही तेव्हा अर्थातच शुभेच्छा! तुम्हाला, प्रत्येकाला अगदी मलादेखील Smile
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

समर्थ भाषा आहेच.

श्री.संजयजी >>
मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळो अथवा ना मिळो, पण तिच्या सर्वदूर प्रसारासाठी जे जे प्रयत्न होत राहतील त्यासाठी आणि त्याबद्दल पुढाकार घेऊन ते कार्य आपल्या लिखाणाद्वारे अथकपणे करणार्‍या तुमच्यासारख्या नामवंत लेखकाच्या पाठीशी सदैव उभे राहू, हेच या शुभेच्छांच्या निमित्ताने सांगत आहे.
संस्कृत भाषेशिवाय अध्यात्मशास्त्रातील गूढे प्रकट करता येणार नाहीत असे एके काळी मानले जात होते. पण ज्ञानेश्वरांनी आणि त्यानंतरच्या संतांनी दाखवून दिले की मराठीदेखील त्या दृष्टीने समर्थ ठरू शकते.
आजच्या वेगवान विज्ञानयुगातदेखील, त्यामुळेच, मराठीचे महत्व बिलकुल कमी होण्याचे कारण नाही....होणारही नाही.

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...