भर पावसात २५० मैलांचा झंझावाती पाठलाग....मोन्सनच्या सेनेचा पुरता खात्मा...
दरम्यान शिंदे-भोसलेंचा पराभव हा मुख्यत: घरभेद्यांमुळे झाला आहे तसे आपले होवु नये यासाठी यशवंतराव दक्ष होतेच. त्यांच्या पदरी अनेक इंग्रजी सेनानी होते. त्यापैकी काही लेकला सामील आहेत अशी शंका त्यांना आली. नंतर तसे प्रत्यक्ष पुरावे मिळाल्यावर त्यांनी तडकाफडकी दोषी व संशयितांना अटक केली. दोषींना त्यांनी तात्काळ देहांत शासन केले. यात क्यप्टन व्हिकार, टोड आणि रायनसारखे मातब्बर अधिकारीही होते. जवळपास दोनशे घरभेद्यांना फटके देवुन त्यांना हाकलुन दिले.
इंग्रजांनी आपले सर्व सामर्थ्य या युद्धात पणाला लावायचे ठरवले होते. फोसेटच्या पराभवामुळे तर गांभिर्यात अधिकच भर पडली होती. इंग्रजांचे भारतातील भवितव्य ठरवणारे हे युद्ध होते. त्यानुसार देशभरातुन त्यांच्या सेना एकत्र होण्यासाठी होळकरी राज्याकडे वाटचाल करु लागल्या. जनरल जेरार्ड लेक उत्तरेकडुन निघाला तर वेलस्ली दक्षीणेकडुन, कर्नल मरे गुजरातेकडुन निघाला तर कर्नल मोन्सन जयपुरकडुन.
यशवंतरावांचे इंग्रजी सैन्याच्या हालचालींवर पुर्ण लक्ष होते. प्रसंग तसा बाका होता. इंग्रजांच्या बाजुने देशातील सारे रजवाडे होते...आधुनिक सैन्य व तोफांची रेलचेल होती...
तर यशवंतराव पुर्ण एकाकी...स्वबळावर या परकिय साम्राज्यवाद्यांशी झुंज घ्यायला एकटे उभे ठाकलेले होते.
ते तयारीत होते. गरुड जसा भक्षावर झडप घालायला घात लावुन बसलेला असतो तसे तेही इंग्रजांवर आघात करायला सज्ज होते...
मोन्सनची बलाढ्य फौज जयपुरवरुन निघाली होती. येतांना त्याने होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन घेतला. विवक्षीत ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती. सर्व फौजा एकत्र येताच होळकरांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती.
पण ती योजना यशस्वी होवू देतील ते यशवंतराव कसले?
यशवंतरावांनी ते एकत्र येण्याआधीच मोन्सनला तोंड दाखवले, किरकोळ चमक केली आणि सरळ माघार घेतली. मोन्सनला वाटले, यशवंतराव घाबरला, त्याने यशवंतरावांचा पाठलाग सुरु केला. वाटेत अधुन मधुन यशवंतराव त्याच्याशी किरकोळ चकमक करीत आणि पुन्हा पळत सुटत.
मोन्सनने मुकुंदरा घाटही ओलांडला. यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्या प्रदेशातच घुसत राहिले. मोन्सनला आपण या नादात सापळ्यात अडकत आहोत याचे भानच आले नाही. त्याला वाटले कि यशवंतराव घाबरुन पळत आहेत. मुकुंद-यापासुन ५० मैलावर असलेला हिंगलेशगढही त्याने जिंकुन घेतला. होळकरांनी तेथेही कसलाही प्रतिकार केला नाही. येथे एक वेगळीच गंमत झाली. ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता. त्यामुळे मरेला वाटले कि यशवंतराव आपल्यावरच चालून येत आहेत. मरे व मोन्सनमधील दळन-वळन यशवंतरावांनी पार तोडून टाकले होते त्यामुळे मोन्सन यशवंतरावांच्या पाठीशी आहे हे त्याला समजलेच नाही. मरे अद्याप एकट्याने युद्ध करण्याच्या तयारीत नव्हता. तो अजून माघारी सरकत गेला.
या पाठलागाच्या नादात मोन्सनजवळ आता फार तर दोन दिवस पुरेल एवढा शिधा होता. आता तो यशवंतरावांच्या प्रदेशात होता. येथे शिधा मिळायची मारामार व्हायला लागली. आता युद्धाशिवाय वा मागे हटण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय उरला नाही. चंबळ ओलांडता येणे त्याला अशक्यप्राय होते. यशवंतरावही एव्हाना चंबळेजवळ येवुन पोहोचले होते. शेवटी नाईलाजाने न लढताच क्यप्टन ल्युकान या अधिका-याजवळ जड सामान देवुन परत वेगाने मुकुंदरा खिंडीकडे माघारी वळायचे मोन्सनने ठरवले. खरे तर त्याला दुसरी दिशाही उरलेली नव्हती.
बहिरी ससान्याने संधी मिळताच भक्षावर धाड घालावी तसे मोन्सन चंबलकाठावरून हलताच यशवंतरावांनी पुर्ण शक्तीनिशी ल्युकानच्या सैन्यावर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भिषण होता कि ल्युकानचा एकही सैनिक वा बुणगा वाचला नाही. सर्वांना कापुन काढले गेले. ल्युकानचे काय झाले हे समजले नाही पण त्याचा म्रुत्यु बहुदा होळकरांच्या कैदेत झाला असावा असा अंदाज टोम होम्बर्गसारखे पाश्चात्य इतिहासकार व्यक्त करतात. ल्युकानजवळील जड तोफा व अन्य सामग्री यशवंतरावांच्या हाती लागली.
आता स्थिती बदललली. आता मोन्सन पळत सुटला तर शिका-यासारखे आपल्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले. यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागुन येत राहिल्या.
१० जुलै १८०४ ला यशवंतरावांनी मुकुंदरा खिंडीजवळ मोन्सनला गाठले. त्यांनी मोन्सन व सर्व सैन्याला हत्यारे येथेच ठेवुन आग्र्याला निघुन जा असा आदेशच बजावला. मोन्सन तो आदेश पाळणे शक्य नव्हते. तो पळतच राहिला. त्यात यशवंतरावांचा तोफखाना व पायदळ जवळ येते आहे या वार्तेने त्याची हडेलहंबी उडाली होती. त्यात त्याच्याकडील शिधा संपला होता. उपासमार चालु होती. यशवंतरावांचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न करत त्याचे पलायन सुरुच होते. त्यात कर्दनकाळासारखा पावसाळा सुरु झाला. मोन्सनचे पलायन अजुन कठीण झाले. गाळाच्या मातीच्या त्या मैदानी प्रदेशात चिखल एवढा झाला कि रुतत रुतत पुढे सरकणे नशीबी आले. पण तरीही यशवंतरावांनी अजुन निर्णायक हल्ला केला नाही.
मोन्सनने कोट्याच्या राजाकडे, जालीमसिंगकडे, एक रात्र मुक्काम केला. अनेक दिवसांनी त्याला व त्याच्या सैन्याला पोटाला मिलाले. जालीमसिंगने दिलेल्या नावांच्या मदतीने त्याने दुथडी भरुन वाहणारी चंबळ ओलांडली. आता तरी यशवंतराव पाठलाग थांबवतील अशी आशा त्याला होती. पण येथे गाठ जिद्दी यशवंतरावांशी होती. त्यांनीही चंबळ ओलांडली. धिम्या गतीने पाठलाग सुरुच राहिला. मोन्सनला जमेल तेवढ्या वेगाने पुढे पळने आले.
चंबळेच्या परिसरातील रोंरावत वाहणा-या नाल्यांमुळे त्याची अजुनच फजीती झाली. त्या काळ्या मातीच्या चिखलात त्यांना आपल्या तोफा ओढताही येईना झाल्यावर त्या त्याला आहे तेथेच सोडाव्या लागल्या. अनेक हत्ती व उंटही चिखलात रुतुन बसु लागल्याने अनेकांना मागे सोडावे लागले. मागुन येणारे यशवंतराव त्या तोफा आपल्या ताब्यात घेत पुढे सरकत राहिले. अशा प्रकोपी नैसर्गिक स्थितीत कसे लढावे हे त्यांना चांगलेच ठावुक होते. मोन्सनच्या मदतीला आता मरे काय वा वेलस्ली काय, येणे शक्यच नव्हते. सर्वांमधील दलन-वळन पार तुटले होते. सर्व इंग्रजी सैन्याची पराकोटीची कोंडी करुन टाकली गेली होती.
२३ जुलैला मोन्सनने एक दुथडी भरुन वाहनारा चंबळी ओढा हत्तींच्या सहाय्याने ओलांडायला सुरुवात केली. तो पहिल्या दिवशी फक्त एकच गनर्सची बटालियन पार करु शकला. दुस-या दिवशी होळकरांच्या घोददळाच्या तुकडीने अचानक हल्ला केला. मोन्सनच्या सैन्यात एकच गोधळ उडाला. चकमक दिवसभर टिकली. होळकरांची सर्वच सेना तोवर आली तर आपल्याला या ओढ्यातच जलसमाधी घ्यावी लागेल हे लक्षात येताच मोन्सनने तिस-या दिवशी कर्नल डोनला दोन बटालियन्ससहित पुढे पाठवले व रामपुरा गाठायला सांगितले. स्वत: त्याने त्या दिवशी ओढा ओलांडला व वेगळ्या मार्गने रामपु-याकडे निघाला.
रामपुरा किल्ल्यात आल्यावर त्याला वाटले आता आपल्याला उसंत मिळाली. तेथे त्याला रसद, अधिकच्या बटलियन्स व खजिनाही मदतीला मिळाला.
पण होळकर शिका-यासारखे त्याच्या पाठीवरच होते. शत्रुला उसंत घेवु द्यायचीच नाही असाच जणु काही त्यांचा निर्धार होता. शत्रुचे मनोबल खच्ची करत नेत, बाकी अन्यत्र असलेल्या इंग्रजी फौजांतही अनिश्चिततेचे सावट निर्माण करण्यात ते पुर्ण यशस्वी झाले होते. मोन्सनला त्यांनी अक्षरशा खेळवले होते.
यशवंतराव अजुनही पाठलागावर आहेत हे लक्षात येताच २० आगस्ट १८०४ ला मोन्सन पुन्हा पळत सुटला. टेचून यशवंतरावांचा प्रतिकार करण्याची त्याची इच्छाशक्ती पार मावळली होती. २२ तारखेला तो बनास नदीजवळ आला. या नदीलाही पुर आलेला होता...ती ओलांडता येणे शक्य दिसत नव्हते. तरीही त्याने काही बटालियन्स व जड सामान स्थानिक नाविकांच्या मदतीने नदीपार करण्यात यश मिळवले. तोवर २४ तारखेला यशवंतराव तेथे येवुन धडकले. निम्म्यापेक्षा अधिक सैन्य नदीपार झाले असल्याने त्य्यांच्या मदतीचीही शक्यता उरलेली नव्हती. मागे रोंरावती नदी व समोर दोन्ही बाजुंनी होळकरांच्या सैन्याचा घेराव झाला. यशवंतरावांनी घोडेस्वारांना पायउतार होण्याची आज्ञा दिली.
यानंतर धमासान युद्ध झाले. अलीकडील तीरावरील मोन्सनचे सर्व सैन्य ठार झाले. त्यात त्याचे महत्वाचे १३ सेनानीही होते. होळकरी सैन्याचा भिषण आघात पाहून स्वत: मोन्सन युद्ध ऐन भरात असतांनाच नदीपार पळून गेला आणि कसाबसा कुशलगढला उरलेल्या सैन्यासह जावुन पोहोचला.
तेथे थकलेल्या सैन्याला आराम आणि पोटाला रोटी मिळते न मिळते तोच यशवंतराव पुन्हा नजिक आल्याची खबर आली. उलटुन लढाई करण्याच्या स्थितीत मोन्सन नव्हताच...त्याने धो-धो पावसात पुन्हा पळायला सुरुवात केली. आता आग्रा गाठण्याचा त्याचा इरादा होता. तेथवर यशवंतराव येणार नाहीत असा अजुन त्याचा कयास होता.
पण आताचे पलायन सोपे नव्हते. मोन्सनचे सैन्य घाबरले होते. एरवी इंग्रजी कंपू सैन्यात असलेली शिस्त प्रथमच मोडली होती. होळकरांची फौज पाठलाग करता करता गोळीबाराचा भडिमार करत होती. कोठे थांबले कि तोफांचा भडिमार होत होता. ्त्यात विनाश पाहून अनेक अधिकारी मोन्सनलाही सोडुन पळुन जायला लागले. बुणगे आणि सैन्यात सरमिसळ होवु लागली. गावा-खेड्यातील नागरिकही मोन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ले करु लागले. दगडफेक करू लागले.
फतेहपुरला मात्र यशवंतराव होळकरांनी मोन्सनवर भिषण आणि अंतिम हल्ला चढवला. मोन्सनला शरणागती पत्करण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. येथवर त्याचे जवळपास १० हजार सैनिक आणि २ ते ३ हजार बुणगे, या अडिच महिन्यात होळकरांनी पळापळी करायला लावुन केलेल्या हल्ल्यांत, ठार झाले होते.
एवढा अवमानस्पद पराभव इंग्रजांचा कधीच झाला नव्हता. पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते, लष्करी हालचाली करत नाही हा जो काही फाजिल आत्मविश्वासात व गैरसमजात जनरल जेरार्ड लेक होता तो धुळीला मिळाला होता. एखाद्या सावजाला दमादमाने दमवुन मारावे तसे मोन्सनच्या बलशाली सैन्याचे झाले होते. २८ आगस्ट १८०४ रोजी हा महाविजय, तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला.
मोन्सन ३० आगस्टला जगल्या-वाचल्या २-३०० सैनिकांसह आग्र्याला पोहोचला...
पराभुताच्या स्वागताला कोण येनार?
जनरल वेलस्ली या भिषण पराभवाची वार्ता ऐकुन हतबुद्ध झाला होता. यशवंतरावांविरुद्ध केलेली सर्व व्युहरचना अंगलट आली होती. लेक किंवा मरे मोन्सनला कसलीही मदत पोहोचवू शकले नव्हते. जी हानी व्हायची ती झाली होतीच...पण संभाव्य हानी आता कशी टाळायची याचीच विवंचना त्याला जास्त लागुन राहिली होती. त्याने अक्षरशा हादरुन एका पत्रात लिहिले..."You will have heard of Monson's reverses: I tremble for the political consequences of these events." (मोन्सनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे.) पराभव माहित नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच पण त्याचे पडसाद इंग्लंडमद्धेही उमटले.
वेलस्लीची गच्छंती अटळ झाली.
या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली. त्यांचा लष्करी माज पुरेपुर उतरला. त्यांची लषकराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यांचे सारे बेत उधळले गेले. या पराभवामुळे आता भारतीय रजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळु लागली.
यशवंतराव हे खरेच एक विलक्षण व्यक्तिमत्व होते...त्यांचे अपार धाडस, निर्णयक्षमता, हालचालींतील वेग, प्रचंड पराक्रमी व्रुत्ती...मुत्सद्दीपणा...अडिच
दुसरे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेच होते...आता ते राष्ट्र स्वतंत्र करणार होते...तेवढी क्षमता त्यांच्यात होती...इंग्रजांचा राष्ट्राला असलेला धोका त्यांनी नुसता ओळखला नव्हता...तो धोका दुर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती...भारतमातेचा खरा महान सुपुत्र अशीच इतिहासाने येथुन पुढे त्यांची नोंद घावी एवढे अचाट, लोकविलक्षण आणि अद्वितीय असे त्यांचे कर्तुत्व आहे यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही!
या युद्धाबद्दल प्रसिद्ध इतिहासकार जोन पेंबल म्हणतो... "Here was a Maratha leader who, though encumbered with something like 200 guns, managed to pursue and harass, at the height of the monsoon, through the black cotton soil of Malwa and across two rivers, a lightly equipped British force for a distance of 250 miles. It was a remarkable achievement, which, as Lake admitted, 'afforded proofs of a greater degree of efficiency and enterprise than could have been expected, and rendered it difficult to estimate what they might venture to undertake or be able to accomplish.'"
कट्टर शत्रुनेही तारीफ करावी...असा हा अशक्यप्राय विजय...जागतिक युद्धेतिहासात नोंदले गेलेले हे युद्ध...आणि आम्हा पामरांना काहीच माहिती नसावी हे दुर्दैवच नव्हे काय?
शुद्ध कर्तबगारीची दखल केवळ जाती-पातीच नव्हे तर भाषेच्याही मर्यादा ओलांडून देशभर घेतली गेली पाहिजेत. आपली परवानगी असेल तर तुमच्या ब्लॉग वरील काही लेख इंग्रजी व हिंदीत अनुवादित करावे म्हणतो. Translate करून तुम्हाला मेल करीन.
ReplyDeleteडॉ. सचिन शिंदे
०९९८७९७३९०१
अवश्य करा सचीनजी. अन्य भाषिकांनाही ते प्रेरक ठरतील. धन्यवाद.
Delete