Thursday, March 26, 2015

मदर तेरेसा

मदर तेरेसा यांना बंगाली बांधव आई मानतात. बंगालातील जीवघेणे दारिद्र्य (म्हणजे आजही विशेष फरक पडला आहे असे नाही) आणि त्यासोबत येणा-या व्याधी, रोगराया आणि मानसिक खिन्नतांचा कळस स्वातंत्र्यपुर्व काळ ते आताआतापर्यंत देशाने पाहिले आहे. बंकिम, शरदजींच्या कादंब-यांत ते खिन्न-संतप्त उश्वास-नि:श्वास सतत जाणवत राहतात. त्यांना मायेची फुंकर घालणारी एक आई भेटली. १९५५ सालीच त्यांनी निर्मला शिशू भवन कलकत्त्यात उघडून अनाथ आणि बेघर मुलांची सोय लावली. तत्पुर्वी १९५२ सालीच हिंदुंनीच त्यागलेल्या कालीघाट मंदिरांला, सरकारी अधिका-यांच्याच मदतीने, गरीबांसाठी रुग्णालयात बदल केला. मरणोन्मुख मुस्लिम असेल तर कुराण, हिंदु असेल तर गंगाजल नि क्यथोलिक असेल तर तर बायबल....त्यांनी धर्मांत भेदभाव केला नाही. कुष्ठरोगी असो कि एड्सने ग्रस्त, लहान नवजात शिशू असेल कि मरणोन्मूख वृद्ध....सर्वांचीच निरलसपणे सेवा केली. त्यांचे काम धर्मांतराच्या मोहिमेवर निघालेल्या मिशन-याचे नव्हते तर दयेसाठी, मदतीसाठी मिशनरी अशा स्वरुपाचे होते. भारताने त्यांचा सन्मान आधी पद्मश्री देवून केला तर नंतर भारतरत्नाने भुषवले. जगाने तर नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरवले. पण त्याहीपेक्षा त्या "मदर" होत्या, सर्वांच्या, हा मोठाच बहुमान होय. 

त्यांच्या भारतातील व देशाबाहेरील कामाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. प्रचंड लिहिले गेले आहे. अगदी विरोधातसुद्धा. त्या अर्थातच धार्मिक होत्या. क्यथोलिक होत्या. त्यांचा जन्म अल्बानियातला, पण त्या भारताच्या नागरिक झाल्या. हा देशच त्यांनी आपली कर्मभुमी बनवली. पण त्य्यांचे कार्य जगभरही पसरत राहिले. १९८२ साली बैरुतच्या वेड्याच्या वेळी इस्पितळात अडकुन पडलेल्या ३७ मुलांना त्यांनी काहीवेळासाठी दोन्ही युद्धायमान पक्षांना गोळाबारी थांबवायला लावून त्यांची सुटका करायला लावली एवढे त्यांचे नैतिक वजनही होते. इथिओपियातील भुकेले असोत कि चेर्नोबिलच्या आण्विक अपघातातील बाधित असोत, मदरने आपला सेवाभाव धर्म/प्रांत/ देशाचा विचार न करता दाखवला. एकार्थाने कलकत्याची माय विश्वमाय झाली. 

त्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. युनोचे माजी सेक्रेटरी जनरल जविर डी क्युल्लर म्हणाले, "तीच संयुक्त राष्ट्रे आहे, तीच विश्वशांती आहे!" 

त्या जावून आता १७ वर्षे उलटुन गेलीत. या देशात नंतर पुलाखालुन बरेच पाणीही वाहून गेले. आता हिंदुत्ववादास प्राधान्य देणा-यांचे सरकार आहे. रा.स्व. संघ आणि त्याच्या अनेक आक्टोपसी हातांसारख्या संघटनांना चेव चढला आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून विकास, प्रागतिकता यापेक्षा वैदिक विमाने, चार ते दहा मुलें हिंदुंनी कशी प्रसवावीत याचे धडे देणारे, वैदिक गणित-विज्ञान अभ्यासक्रमात कसे अत्यावश्यक आहे हे बजावत कधीच अस्तित्वात नसलेली वैदिक विमाने जागतिक विज्ञान परिषदेत उडवणारे, बुवा-बापु यांच्या रामलीलांचे गौरवशाली इतिहास गरजणारे अचानक भुछत्रासारखे वाढले आहेत. "घरवापसी" चे कार्यक्रम राबवायला हे धट सरसावले आहेत. पम्तप्रधान एवढे स्वप्रेमात दंग आहेत कि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एकेरी "बराक" म्हणून राजनैतिक संकेतांचा, प्रोटोकालचा, भंग करत वर स्वत:चे नांव गोंदलेले सुट परिधान करत आहेत आणि जगात हसे करुन घेत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचा हा राजनयिक अवमान अमेरिकन जनतेच्या जिव्हारी लागला आहे. पण आम्हाला त्याचे गांभिर्य उरलेले नाही. एक प्रकारचा, काल-कालपर्यंत नाईलाजाने दबुन राहिलेला वैदिक माज उफाळुन येत आहे. 

आणि भागवतांचे मदर तेरेसांबद्दलचे विधान त्याचाच परिपाक आहे.

काय म्हणाले भागवत? ते म्हणाले, तेरेसांचे कार्य चांगले असेल पण त्यांचा हेतू शुद्ध नसुन धर्मांतराचा होता. त्यांची गरीबांची सेवा ही सहेतुक होती. सेवेच्या नांवाखाली धर्मांतर उचित नाही. ते हे भरतपुरला बोलले. "अपना घर" या एन्जीओच्या कार्यक्रमात. त्यांचे म्हणणे होते कि लोकांना ख्रिस्ती बनवणे हाच त्यांच्या सेवेचा मुख्य उद्देश्य होता. असा उद्देश्य असेल तर सेवेची किंमत रहात नाही. 

यामागे, असे मानले जाते कि, गेल्या काही महिन्यात दिल्ली आणि अन्य ठिकाणी चर्चेसवर झालेल्या हल्ल्यांची पार्श्वभुमी होती. या हल्ल्यांवर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी ख्रिस्ती धर्मियांना एका कार्यक्रमात कोणत्याही धर्मावर हल्ले झालेले सहन केले जाणार नाहीत या विधानाचाही संदर्भ होता. 

अपेक्षेप्रमाणे या भागवती विधानावर वादळ उठणे स्वाभाविक होते. ख्रिस्ती धर्मियांमद्ध्ये जेवढी संतप्त प्रतिक्रिया उठली त्याहीपेक्षा मोठी प्रतिक्रिया पुरोगामी विचारवंतांकडून उठली. निखिल वागळेंनी तर, "राहूल कोंग्रेसमुक्त भारत करेल तर भागवत भाजपामुक्त भारत करेल" अशा आशयाचे ट्वीट केले. सोशल मिडियात तर चर्चांना, टीका आणि समर्थनांना उधान आले. वागळेंच्या ट्वीटमद्ध्ये बराच मोठा आशय दडलेला आहे हे उघडच व्हावे असे वास्तव आहे. कारण एके काळचे मोदी आणि म्हणून भाजपासमर्थक आज आपण केलेल्या मतदानावर पस्तावत आहेत हे एक कटू असले तरी वास्तव आहे. आर्थिक विकासाच्या बाबतीत ठणाना चालु आहे. विकासपुरुष हीच मोदींची प्रतिमा भ्रामक होती हे आता उघड व्हायला लागले आहे. अटलबिहारी वाजपेयी एक वेगळ्या प्रकारचा मुखवटा होता...मोदी जरा वेगळे मुखवटे आहेत हे तर सरळ सरळ दिसते आहे. 

त्यात भागवतांनी आगीत तेल ओतले आहे. ते का आणि कशासाठी यावर चर्चा करण्याआधी भागवतांचे आणि त्यांचे समर्थन करणा-यांचे आरोप तपासून पहायला हवेत.
 



मदर तेरेसा हयात असतांना त्यांच्यावर कमी आरोप झाले नव्हते. विशेषत: गर्भपात आणि संततीनियमनाची साधने यांना मदरचा खास ’क्यथोलकी’ विरोध होता. त्यामुळे त्या प्रतिगामी आणि अंधधार्मिक वाटू शकतात. पण येथे हे ल्कक्षात घेतले पाहिजे कि १९८० सालापर्यंत खुद्द हिंदू आणि वैदिकांचा संतततीनियमन आणि गर्भपाताबद्दलचा दृष्टीकोण काय होता? इंदिरा गांधींनी चार पुरे म्हणुन संततीनियमनाचे सत्र संजय गांधींच्या देखरेखीत चालवले तर याच लोकांनी इंदिरा गांधींचे पानिपत करुन टाकले होते हा इतिहास फार जुना नाही. सरकारी अधिकारी अगदी खेड्यापाड्यात निरोधांची पाकिटे वाटत तर त्याचे "फुगे" करुन खेळणारे बाप्ये कमी नव्हते. रं. धो. कर्वे तर संततीनियमनाचा प्रचार केल्यानेच दुर्लक्षाच्या आणि उपेक्षेच्या खाईत गेले. तेंव्हा हिंदू ख्रिस्ती नव्हते, आजही नाहीत. मदर तेरेसा एका धर्माच्या नुसत्या प्रभावात नव्हे तर त्या धर्माच्या मिशनरी होत्या. त्यांनी त्यांची धर्मतत्वे व्यक्त केली असतील तर ती त्या काळच्या कोणत्याही धर्मापेक्षा फार वेगळी आणि प्रतिगामी होती असे मानण्याचे कारण नाही. आणि २०१४-१५ साली चार ते दहा पोरे प्रसवा असे वावदुक सल्ले देणा-या भाजपा/संघाच्या साध्वी ते भागवतांसारख्या प्रतिगाम्यांना तर तो अधिकारच नाही. 

दुसरा आरोप येतो तो धर्मांतराचा. मदर तेरेसा कोणी रुग्ण मरणोन्मूख असतंना बाप्तिस्मा द्यायच्या, असा. काही विचारवंत तर असे म्हणतात, अशा अंधश्रद्धांना कडाडुन विरोध केला पाहिजे. हसले पाहिजे यावर. ज्या रुग्णांना कोणी नाही, जात माहित असल्याखेरीज कोणी पुरोहित सेवाभावासाठी फिरकणार नाही, असली तरी धनदाता नातेवाईक नसेल तर कशासाठी यावे? तेंव्हा त्याचा अंतकाळी काय करायचे होते मदर आणि सिस्टर्सनी? अंत:काळी अशा अनाथ अभाग्यांना जर कोणी दयामय येशुचा रस्ता दाखवत त्यांचे अंतिम क्षण बरे करत असतील तर त्याला मानवता म्हणायचे कि अंधश्रद्धा? आपण कोणत्या परिप्रेक्षात श्रद्धा/अंधश्रद्धा आणि विज्ञानवादाची कसोटी लावतो याचे भान टीकाकारांना असले पाहिजे.

धर्मांतरांचा अरोप जरा विचित्र आणि वैदिकवाद्यांनी उठवलेला बवाल आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. भारतात २००१ च्या जनगणनेनुसार २.३% ख्रिस्ती होते. भारतात सर्वात पहिला ख्रिस्ती मिशनरी सातवाहनांच्या दरबारात उपस्थित असल्याची नोंद आहे. इस्लाम भारतात येण्याआधी ख्रिसती धर्म आला. इ.स. ५२ मद्ध्येच थोमस डिड्यमसने केरळमद्धे पहिले चर्च उभारले. अगदी मुघलकाळातही मिशनरी भारतात येतच होते. नंतर तर ब्रिटिशांचे, म्हणजेच ख्रिस्त्यांचे राज्य भारतात स्थिरस्थावर झाले, दिडशे वर्ष तरी टिकले. भारतात पुर्वोत्तर राज्ये, अन्यत्रचे आदिवासी बहूल विभाग आणि असंख्य दलित ख्रिस्ती तर झालेच पण अनेक तथाकथित उच्चवर्णियांनीही ख्रिस्ती धर्म स्विकारला. पण, मिशनरी जर फक्त येथे धर्मांतरासाठीच, गेल्क्या दोन हजार वर्षांपासून येत त्यांच्याच धर्मियांचे राज्य असुनही ख्रिस्ते धर्मियांचे प्रमाण तुलनेने नगण्य असेल तर मिशनरी येथे केवळ धर्मप्रसारासाठी नव्हेत तर सेवेसाठीही आले होते असाच अर्थ घ्यावा लागतो. शिस्तबद्ध सेवाभाव हा ख्रिस्ती धर्माचा महत्वाचा भाग आहे जो अन्य धर्मात अभावाने सापडतो. भारतातल्या ख्रिस्त्यांना हिंदुंप्रमाणे अपरिहार्यपणे जात असतेच हेही एक वास्तव आहे.

मदर तेरेसांनी किती धर्मांतरे केली? खरे तर याची कसलीही आकडेवारी उपलब्ध नाही. आहेत ते केवळ आरोप. त्या धर्माच्या मिशनरी नव्हत्या तर सेवेच्या, दयाभावाच्या मिशनरी होत्या. "मिशनरीज ओफ च्यरिटी" हे त्यांच्या संस्थेचे नांव! धर्मांतरांचा हेतू सेवाभावापेक्षा, करुणेपेक्षा प्रबळ असता तर या देशाने त्यांना आईच्या स्वरुपात पाहिले नसते. संघानेच त्यांच्यावर वैचारिक (किंवा कसेही) हल्ले चढवले असते. खरे तर त्यांना हयातीत विरोध यांनीच जास्त केला असता. फादर स्टेन आणि त्याच्या कोवळ्या मुलाला जीवंत जाळून मारण्याचे पातक यांच्या माथी जमा आहेच. तेंव्हा मात्र तसे काही झाले नाही. भारतरत्नालाही विरोध झाला नाही. आता त्या जावून जवळपास सतरा वर्ष उलटून गेलेली आहेत, मग आताच मदरचा विषय का?

ते म्हणतात, सेवेमागे कोणताही हेतू नको. या मनुष्याला बहुदा हे माहित नाही कि सेवेचा हेतु असल्याखेरीज सेवा तरी होवू शकते काय? 

यात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे हा खुद्द नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष इशारा आहे कि तुम्ही इतर धर्मियांवर होणा-या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करा. कारण त्यांचे, खुद्द तेरेसांचेच हेतू शुद्ध नव्हते, तर यांचे हेतू शुद्ध असुच शकत नाहीत! आणि दुसरे म्हणजे सत्तेचे केंद्र संघ आहे, भाजपा नव्हे हेही त्यांना सुचवायचे आहे. थोडक्यात या देशात अन्य (वैदिक वगळता) धर्मियांचे अस्तित्व हे यांच्याच मर्जीवर अवलंबुन असेल! ते ठरवतील तो सेवाभाव आणि ते ठरवतील ते संत-साध्वी!

दुर्दैवाने आहे हे असे आहे. भागवतांच्या समर्थनासाठी जेही संघवाले उभे ठाकलेत ते तर तारे तोडत वरताण करताहेत. प्रश्न असा आहे कि या देशात जे सहसा करायची हिंमत होत नव्हती ती आताच का उफाळून आली आहे? शिवाजी महाराजांवर कार्यक्रम मुस्लिमांनी ठरवला याचे कवतुक करण्याऐवजी त्या कार्यक्रमाची परवानगीच नाकारायची हिंमत कोठुन येते? अभिव्यक्तीस्वातंत्र्य आपण गारद करतो आहोत आणि नकळत विद्वेषच वाढवत आहोत याचे भान नको काय? दाभोळकर असोत, पानसरे असोत, त्यांच्या खुनांनंतर जी मुक्ताफळे उधळली जातात ती कोणत्या ख-या धर्माचे लक्षण आहे?

आता, अजुन एक मोठा आक्षेप जोमात आहे. मदर तेरेसांचा हेतू कलुषित होता, संघ बघा आदिवासी/भटक्या विमुक्तांची सेवा करतोय! वा! यात खरेच तथ्यांश असता तर वैश्विक पारितोषिके स्वयंसेवकांच्या दारात येवून पडली असती. आदिवासींबद्दल खरा कळवळा असता तर मेळघाटात, शेकडो कोटींची अनुदाने लाटणा-या, बव्हंशी संघवादीच स्वयंसेवी संस्था असतांना, तेथील कुपोषणमृत्यू कधीच थांबले असते. तसे झलेले नाही हे आकडेवारीच सांगते. खरे तर स्वयंसेवी संस्थांचे, काही टक्के प्रमाण वगळले तर, मोठे प्रमाण उघड वा छुप्या संघवाल्यांचेच सापडेल.  

मग हेतू कलुषित कोणाचा? संघाच्या आदिवासी असोत कि अन्यत्रच्या, जेथे वैदिकवादाचे वर्चस्व ठसवले जाते, ते धर्मप्रचाराचेच एक उघड रुप आहे. कारण आदिवासी वैदिक अथवा हिंदु नाहीत. त्यांचे धर्म स्वतंत्र आहेत. आदिम आहेत. वैदिकांच्या जन्मापुर्वीचे आहेत. पण त्यांच्या, म्हणजे संघशाळांच्या, अभ्यासक्रमाकडे आणि ज्या प्रार्थना करायला भाग पाडतात त्याकडे पहा....ते धर्मांतरापेक्षा भयंकर असलेले सांस्कृत्यांतराचे प्रयोग आहेत हे सहज लक्षात येईल.

मदर तेरेसांवर शरसंधान केल्याने संघ, पक्षी भाजपा, यांनी लगेच सध्य केलेली बाब कोणती तर संसदेचे सत्र गदारोळात सुरु झाले. जमीन अधिग्रहण कायदा, जो शेतक-यांच्व्ह्य मुळावर येणार आहे त्या चर्चेकडॆ दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे तर अकल्पक रेल्वे बजेटची चर्चाही मागे पडली. मग कल्पनाहीन बजेट लादायचे असेलच तर हेच अपेक्षित होते असे नव्हे काय? हा लेख लिहित असतांना बजेट आलेले नाही, पण ते जनहिताचे किती आणि भांडवलदारांचे किती असणार हे समजतेच आहे. पण त्यावरील चर्चा मदर तेरेसांकडे वळवण्याचा माध्यांतर प्रयत्न केलाच आहे तोवर भागवती कल्पनाशक्तीला अजून उधान येवू नये ही अपेक्षा आहेच.

खरी कसोटी पुरोगाम्यांची आहे. तेरेसांच्या बाबतीत ती प्रकर्षाने लक्षात आली आहे. तेरेसा शेवटी एका धर्माच्या प्रतिनिधी होत्याच. व्ह्यटिकनने तर त्यांना चमत्कार केले म्हनुन संतत्व बहाल केले आहे. चमत्कारी संतांची बाजु घेणे हे पुरोगाम्यांना अडचणीचे आहे आणि म्हणुन त्यासाठीच संघाचा विरोध करणेही अडचणीचे आहे. भागवतांनी तमाम पुरोगाम्यांना पेचात पकडले आहे हे मान्य केले पाहिजे. मानवतेचा धर्मनिरपेक्ष झरा कि धर्मसापेक्ष झरा यावर पुरोगामी सावधान होत चर्चा करतील अशी अपेक्षा बाळगतांना दोहोतील स्थिती-परिस्थितीसापेक्ष स्थितींना सामोरे जात आपली बाजु पुढे नेतील अशी काळजी घेतली तरच धर्मांधांना गप्प करण्याचे उचित साधन मिळेल. 

दरम्यान, मदर तेरेसांसारख्या करुणामयी, भल्या त्यांच्या धर्मतत्वांनी प्रेरित असतील, महिलेला लक्ष्य करुन असभ्यतेचे, मानवतेच्या स्खलनाचे विदारक दर्शन भागवतांनी घडवले आहे. कृतघ्नतेचा कळस काय असू शकतो हेहे या निमित्ताने समोर आले आहे.  ज्यांच्या हृदयाला शेकडो वर्ष मानवतेचा साधा स्पर्शही झाला नाही त्यांने चक्क मानवतावाद्यांच्या हेतुबद्दल शंका उपस्थित करून आपल्या अमानवीपणाचे दर्शन घडवावे हे या देशाचे संचित नव्हे, हृद्गत तर नव्हेच नव्हे...या देशातील माणसे माणसांच्याच पाठीशी जातात...हैवानांच्या नव्हे! 

मदर तेरेसांवर अश्लाघ्य टीका करुन भागवत त्यांचे मर्यादित मोदींवरचे वर्चस्व दाखवण्याचे केविलवाने प्रयत्न करतीलही कदाचित पण हे असले बाष्कळ प्रयत्न अंगलट येणार कारण सारे होने सोपे, अगदी या काळत तर साध्वीही, पण मदर होणे मुश्किल....आणि तेरेसा मदर होत्या हे त्यांनी विसरु नये, त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊनही! एवढेच भागवत आणि त्यांच्या आततायी समर्थकांना सांगणे!

(Published in kalamnaaama last week)

7 comments:

  1. मदर तेरेसाने कोणतीही सेवा वगैरे केली नाही . होस्पीस हा अंधश्रद्धेचा क्रूर खेळ आहे . संघ मुखातून जे काही बाहेर पडेल ते सारे अस्पृश्य आहे असे मानण्याचा पुरोगामी कल दिसतो . मदर तेरेसाबद्दल भागवत फारच सौम्य बोलले होते . तेरेसाचे भारतरत्न काढून घेऊन तिच्या सार्या संस्थांचि विधिवत चौकशी व्हायला हवी . तेरेसाबद्दल मी सविस्तर ब्लोगवर पुराव्यासकट लिहिले आहे . खरे तर व्हेटिकन ख्रिस्ती चर्च हा जागतिक पुरोगाम्यांचा चेष्टेचा विषय आहे . अंधश्रद्ध मदर तेरेसा च्या बाजूने उभे राहणे हा पुरोगामित्वाचा क्रायटेरिया आहे काय ?

    स्वकियांचा जातीय द्वेष आणि परकीय धर्माबद्दल अतोनात सहिष्णुता हे हिंदुत्वाचे प्रधान लक्षण आहे. वैदिक लोकांना वंश सम समजून केलेली कठोर टिका आणि मदर तेरेसबद्दलचा उमाळा हा आपल्या हिदुत्वाचा अविष्कार होय !

    ReplyDelete
  2. प्रियवर,, आपकी बात का उत्तर मजबूरी है..
    महिलेला लक्ष्य करुन असभ्यतेचे, मानवतेच्या स्खलनाचे विदारक दर्शन भागवतांनी घडवले आहे.
    ...इसमें महिला विरोधी या असभ्य क्या है, यह समझ से परे है....
    कृतघ्नतेचा कळस काय असू शकतो हेहे या निमित्ताने समोर आले आहे.
    ...इसमें किस बात की कृतघ्नता है, यह भी समझ से परे है..
    ज्यांच्या हृदयाला शेकडो वर्ष मानवतेचा साधा स्पर्शही झाला नाही त्यांने चक्क मानवतावाद्यांच्या हेतुबद्दल शंका उपस्थित करून आपल्या अमानवीपणाचे दर्शन घडवावे हे या देशाचे संचित नव्हे, हृद्गत तर नव्हेच नव्हे...
    ..आप किसे सम्बोधित कर रहे ही? क्या ईसाईयो के प्रवेश के पहले इस देश में मानवता नहीं थी... मेरी कोम का सिनेमा मिजोरम नागालैंड में केवल इसलिए नहीं दिखाया जा सका क्योंकि वह हिंदी में है और हिंदी सिनेमा पर वहाँ ईसाई मिशनरियों ने बैन लगा कर रखा है... क्या आपको उनकी यह अमानवी हरकत नजर नहीं आती....
    या देशातील माणसे माणसांच्याच पाठीशी जातात...हैवानांच्या नव्हे!
    .. कौन शैतान है कौन मनुष्य है.. भारत को पूरी तरह तबाह करके सेवा का नाटक करनेवाले आपको मनुष्य लगते है.. यही सबसे बड़ा मजाक है.. कळ आप विल ड्यूरेंट की किताब का जिक्र कर रहे थे.. उन्होंने अंग्रेजी राज की लूट पर क्या कहा है, कृपया उसे भी छापिए...
    मदर तेरेसांवर अश्लाघ्य टीका करुन भागवत त्यांचे मर्यादित मोदींवरचे वर्चस्व दाखवण्याचे केविलवाने प्रयत्न करतीलही कदाचित पण हे असले बाष्कळ प्रयत्न अंगलट येणार कारण सारे होने सोपे, अगदी या काळत तर साध्वीही, पण मदर होणे मुश्किल....आणि तेरेसा मदर होत्या हे त्यांनी विसरु नये, त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊनही! एवढेच भागवत आणि त्यांच्या आततायी समर्थकांना सांगणे!
    भागवत ने कहीं भी अश्लील या असभ्य टिका नही की है. आपके शब्द ज्यादा असभ्य, हिंसक और अभिव्यक्ति की स्वतंत्रता का हनन करने वाले है.

    दोस्त,
    डॉ. प्रकाश आमटे भी वही काम करते है और मदर टेरेसा से ज्यादा बड़े पैमाने पर करते है. किंतु यह काम वे ईसाइयों के लिए नहीं करते इसलिए महाराष्ट्र के बाहर उनका प्रचार नहीं है, उन्हें ईसाई दुनिया कोई संत या महात्मा नहीं मानती है.. वे किसी के मदर या फादर नहीं बने... उन्हें नोबल पुरस्कार नहीं मिला...
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  3. प्रिय मित्र
    जरा इसे भी ध्यान से पड़े कि कौन मनुष्य है और कौन शैतान..
    A Christian responds to a Christian who felt “he was a stranger in his own country”

    http://www.opindia.com/2015/03/a-christian-responds-to-a-christian-who-felt-he-was-a-stranger-in-his-own-country
    Dinesh Sharma

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी साहेब:- एवढा "संघ- द्वेष" बरा नव्हे!!
    "संघ ब्राह्मणी आहे"; "संघ दलित विरोधी आहे"; "संघ राष्ट्र द्रोही आहे" ह्या परीकल्पना आता जुनाट झाल्या। आता जरा आप्प्ल्या डोळयांवरचा "तथाकथित हिंदुत्ववाद्यानी आमचा छळ केला" हा चश्मा हटवून जगाकडे नव्या दृष्टीकोनातुन पहा।
    जग फार पुढे चाललय।

    जर आई तेरेसांचे कार्य तुम्हाला दिसते तर संघाचे लोक जी इतके वर्ष सेवाकार्य करत आहेत ते का नाही दिसत तुम्हाला??????

    की तुम्ही पण आजुनही "कांग्रेसी चश्म्यातुन" जगाकडे पहताय???

    उत्तराची वाट पाहतोय।

    तुमचा नियमित वाचक।

    ReplyDelete
    Replies
    1. @ Sumedh Limaye:
      संघाचा आणि तुमचा 'नवा दृष्टिकोणे' या विषयी जरा तपशीलात सांगितला तर बर होईल.

      Delete
    2. जर आई तेरेसांचे कार्य तुम्हाला दिसते तर संघाचे लोक जी इतके वर्ष सेवाकार्य करत आहेत ते का नाही दिसत तुम्हाला??????

      APAN SANGA KONATI SEVA KELI SANGHANE?

      Delete
  5. Dear Sanjayji,
    I Expect you to answer this article.. Else I will have reason to think that you only oppose Modi and RSS for the sake of opposing them and nothing else.
    https://mariawirthblog.wordpress.com/2015/03/30/christians-are-not-under-attack-in-india/

    Dinesh Sharma

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...