Sunday, October 25, 2015

सर्वज्ञ तलगेरी?



माझे मूळ पुस्तक नीट न वाचताच श्रीकांत तलगेरी यांनी शुद्धोदन आहेर यांनी लिहिलेल्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकावरील अभिप्रायावर आपली प्रतिक्रिया दिली आहे असे स्पष्ट दिसते.अन्यथा त्यांनी एवढी अज्ञानमुलक विधाने आपल्या "आर्यांचे उगमस्थान - एक अज्ञान" या लेखात केली नसती.  श्री. आहेर यांनी त्यांची भुमिका नंतर स्पष्ट केली असली तरी काही स्पष्टीकरणांची अपेक्षा माझ्याकडून बाळगली आहे, त्यामुले खालील थोडक्यात प्रतिसाद.

श्री. तलागेरी यांनी माझ्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" माझ्या पुस्तकातील पहिलेच प्रकरण काळजीपुर्वक वाचले असते तर त्यांचा "आर्य वंश" गोंधळ झाला नसता. मी आर्य वंश संकल्पनेला "एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठी बौद्धिक दिवाळखोरी म्हणजे आर्य वंश सिद्धांत" असे स्पष्ट केले आहे. तथाकथित "आर्य भाषा" किंवा इंडो-युरोपियन भाषा  (इंयुभा) या ती भषा बोलणा-या एका विशिष्ट ठिकाणी राहणा-या व नंतर आक्रमणे अथवा स्थलांतराने य भाषा अन्यत्र पसरल्या असे हा सिद्धांत मानतो. युरोपियन विद्वान या इंयुभा बोलणा-यांचे मुलस्थान अजुनही शोधत असले तरी ते दक्षीण रशिया, काकेशस पर्वत, मध्य आशिया वगैरे मानतात व त्यांच्यातीलही वाद अजून संपलेला नाही. तलागेरींसारखे लोक इंयुभा बोलणा-यांचे मुलस्थान भारतातील हरियाना असून तेथील वैदिक "आर्यांच्या" काही टोळ्या अफगाणिस्तान मार्गे युरोपापर्यंत पोहोचल्याने इंयुभांचा प्रसार झाला असे हिरीरीने प्रतिपादित करत असून सिंधू संस्कृती ही वैदिक आर्यांचीच व वेद हे सिंधूपुर्व काळातील असेही प्रतिपादित करत असतात. हे सारे सिंधू संस्कृतीवर वैदिक मालकीहक्क प्रस्थापित करण्याची एक वर्चस्वतावादी राजकीय चाल आहे हे उघड आहे. 

मी माझ्या पुस्तकात वर्चस्वतावादी युरोपियन व तलागेरींसारख्या हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विद्वानांच्या मतांना छेद देणारे विवेचन असंख्य भाषिक, उत्खनित, ग्रांथिक (अवेस्ता व ऋग्वेदाची तुलनात्मक चिकित्सा) पुराव्यांवर केले असून कोणाच्याही स्थलांतर अथवा आक्रमणांनी भाषेतील काही शब्द/संज्ञा पसरल्या तरी त्यामुळे भाषागट निर्माण होत नाहीत हे सिद्ध केले आहे. उदा. तसे झाले असते तर उत्तरेतील तथाकथित आर्यभाषा आणि दक्षीणेतील द्राविडीभाषा भौगोलिक साहचर्य व संपर्क असूनही त्या वेगळ्या गटांच्या झाल्या नसत्या आणि सारा दक्षीण भारताचा प्रचंड भुगोल ओलांडून श्रीलंकेत पुन्हा तेथे कथित इंयुभा गेली नसती. त्यामुळे "भाषेचे जैविक/वांशिक संबंध" माणसे पसरल्याने अथवा आक्रमणे केल्याने निर्माण होत नाहीत हे उघड आहे. 

पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचे कोणा एका विशिष्ट स्थानातून, मग ते कोठलेही असो, स्थलांतर अथवा त्यांची आक्रमणे यामुळे आज इंयुभा गट निर्माण झाला हा सिद्धांतच मुळात आर्यवंश सिद्धांतालाच नव्या वेष्टनात गुंडाळून पेश करण्यासारखे आहे व मतितार्थही तोच आहे हे तलागेरींना माहित नसावे असे नाही. अन्यथा त्यांनी वंश व भाषागट यात घोळ घालत माझ्या पुस्तकाच्या प्रतिपाद्य विषयाकडे दुर्लक्ष करत आपले अज्ञान दर्शवले नसते. मी माझ्या पुस्तकात "भारतातून बाहेर" आणि "बाहेरुन भारतात" या दोन्ही सिद्धांतांना पुराव्यांनिशी आव्हान दिले आहे व तेच तलागेरींना खटकले आहे हे दिसते. मुळात इंयुभा विस्तार सिद्धांतच फोल असून तो अप्रत्यक्षपणे वांशिक श्रेष्ठत्वतावादाचेच निदर्शन करतो हे लक्षात घेतले पाहिजे. आर्यवंशवादी आणि आर्यभाषगटवादी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरता कामा नये. भाषांचा इतिहास पाच-सहा हजार वर्ष जुना नसून त्याला किमन ६०,००० वर्षांचा इतिहास आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

दुसरे असे कि भाषागट सिद्धांता्ची चर्चा करतच मला वैदिक धर्माचे मुळस्थान कोणते हे शोधायचे मुख्य आव्हान होते व उर्वरीत पाच प्रकरणे त्याच विषयाला वाहिली आहेत. पुस्तकाच्याच शिर्षकात "Origins of the Vedic Religion..." असे स्पष्ट नमूद असता तलागेरींना मात्र "मुलस्थान कशाचे?" हा प्रश्न विचारावासा वाटतो यात त्यांचे पुर्वग्रहदुषित अज्ञान दिसून येत नाही असे कोण सुज्ञ म्हणेन? वैदिक आर्य भारतातीलच, सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच हे हिरीरीने सिद्ध करु पाहणारे तलागेरी जर कोणी वैदिक धर्म कोठला आणि त्याचे निर्माते कोण हे शोधत असतील तर ते  मात्र "अज्ञान" "गोंधळ" वगैरे म्हणत असतील तर, श्री. आहेर म्हणाले त्याप्रमाणे, हा ज्ञानबंदीचाच वर्चस्ववादी प्रकार आहे. माझा कसलाही गोंधळ झालेला नाही, झालाच असेल तर तो सर्वस्वी श्री. तलागेरी यांचा आहे. झापडबंद वर्चस्वतावादी विचारसरणीने ज्ञान पुढे जात नसून निरपेक्ष पद्धतीनेच संशोधन पुढे जाते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

(published in today's Maharashtra Times. last few lines are edited while publishing...)




No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...