Sunday, October 29, 2017

संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर

Image result for sambhaji maharaj

संभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही. वा. सी. बेंद्रे, कमल गोखले इत्यादि इतिहासकारांनी त्यांच्या चरित्रावरचे अनेक ठपके साधार पुसण्याचे काम केले असले तरी त्यांचे अनेक पैलू अजुनही दुर्लक्षीत आहेत. पहिला पैलू म्हणजे त्यांच्या मृत्युचा. त्यांची संगमेश्वरला झालेली अक ते त्यांची हत्या हा ३९ दिवसांचा कालखंडही इतिहासकारांच्या दृष्टीने महत्वाचा असुनही तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न न झालेला. किंबहुना तळापर्यंत गेलो तर इतिहासाच्या अस्मितेचे काय हा प्रश्न त्यांना पडला असावा. पण इतिहासकारांना असले प्रश्न पडणे म्हणजे त्यांने इतिहासापासून फारकत घेतली आहे असेच होय. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी पण धीरोदात्तपणे स्विकारलेल्या मृत्युमुळे त्यांची संपुर्ण प्रतिमा उजळून काढायला मदत होत असल्याने त्या प्रतिमेच्या प्रकाशाच्या अंधारात अनेक सत्ये लपवण्यात आली आणि त्यात काही गटांचे स्वार्थ असावेत असे मानायला पुष्कळ जागा आहे. 

असेच दिलेरखान प्रकरणाचे. संभाजी महाराज दिलेरखानाला फितूर झाले ही त्यांचे घोडचुकच होत्य असे मत कमल गोखलेही व्यक्त करतात. सावत्र आईमुळे पिता-पुत्रात निर्माण झालेला दुरावा, संभाजी महाराजांचा कथित व्यसनीपणा आणि त्यातून संभाजी महाराजांनी खुद्द शत्रुला जाऊन मिळणे आणि स्वगृही परतही येणे, व्यथित पित्याला पश्चातापदग्ध पुत्राने भेटणे यात नाट्यच एवढे आहे की नाटककार, कादंबरीकारांना यात मानवी मनाला साद घालणारे अद्वितीय कथानक दिसणे स्वाभाविक होते. पण इतिहासकार हे कादंबरीकार नसतात. असले तरी इतिहासकाराच्या भुमिकेत शिरतांना आपल्यातला "कल्पक कादंबरीकार" दूर सारावा हे त्यांना समजले नाही. खरे तर त्यांना आधीच या संपुर्ण प्रकरणाची शंका तरी यायला हवी होती. सर्व घटनाक्रम कादंबरीकाराच्या चष्म्यातून न पाहता एका अन्वेषकाच्या दृष्टीकोनातून पाहिला असता तर जे वरकरणी दिसते ते खरे नसते हे प्रत्ययाला आले असते. त्यामुळे त्यांना ही "घोडचूक" वाटणे स्वाभाविक होते. पण यात आपण खुद्द शिवाजी महाराजांची राजकीय मुत्सद्देगिरी आअणि संभाजी महाराजांची राजकारणावर डोळा ठेउन केलेली वर्तनुक आणि योजना अयशस्वी होत आहे हे पाहताच पित्याच्याच मदतीने सटकणे व परत पन्हाळ्यावर सुरक्षित येणे या घटना समजून न घेता दोघांचाही उपमर्द करत आहोत याचे भान त्यांना आले नाही. मुद्दाम जानीवपुर्वक उठवलेल्या वावड्यांचे शहानिशा न करता ते त्यांनाच इतिहास समजले. गनीमी कावा फक्त लढायांत वापरला जात नाही तर तो बौद्धिक युद्धातही वापरला जातो हे आकलन आमच्या इतिहासकारांना आजतागायत झालेले नाही. त्यामुळे त्यांचे आकलन सदोष असणे स्वाभाविक आहे.

शाहजादा अकबराचे प्रकरणही असेच आहे. सर्वसाधारणपणे सर्व इतिहासकार संभाजीने अकबराचे लोढणे उगाचच गळ्यात अडकावून घेतले आणि औरंगजेबाला मराठ्यांविरुद्ध शस्त्र उचलायला संधी दिली असा आरोप करायला चुकत नाहीत. असे करतांना ते अकबराला मुर्ख तर ठरवतातच पण आपण संभाजी महाराजांच्या बुद्धीमत्तेवरही शंका घेत आपण आपल्याच संभाजी महाराजांच्या आकलनात विरोधाभास निर्माण करत आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. 

राजकारणात घटनांची शृंखला असते. ती अपघाती क्वचित असते. कोणत्या तरी धोरणातून अनेक घटना व योजना निर्माण करण्यात येतात आणि त्या फसल्या तरी पुढचे मार्गही आखलेले असतात. धोरण पुर्णतया सोडले जात नाही. आग्रा भेटीपासून शिवाजी महाराजांच्या धोरनाची सुरुवात होते. राजपुतांचा आपल्याला खरोखर किती फायदा होईल व ते कितपत विश्वास ठेवण्यायोग्य आहेत याची चाचपणी झालेली आहे. तहात गेलेले राज्य पुन्हा जिंकून घेतलेले नाही तर दक्षीणेत विस्ताराचे धोरनही तयार आहे. दक्षीण दिग्विजय होईपर्यंत संभाजी महाराज शांतपणे शृंगारपूरला राहतात आणि ते येताच संभाजी व दिलेरखानात पत्रव्यवहार सुरु आहे, संभाजी दिलेरखानाला मिळणार आहे हे माहित असतांनाही ते संभाजीला सज्जनगडावर, म्हणजे दिलेरखानाची छावणी जेथुन जवळ पडेल अशा असुरक्षित, पण पळून जायला सोप्या, जागेवर पाठवतात येथे दुसरा टप्पा सुरु होतो. ्मोगली साम्राज्यात "फितवा" माजवायचे संभाजीचे कारस्थान आहे असा संशय औरंगजेबाला येतो आणि येथेच संभाजी महाराज शिवाजी महाराजांनेच पाठवलेल्या अल्प सैन्याच्या मदतीने सतकून वीजापूरमार्गे पन्हाळ्याला निघून जातात. हा अयशस्वी झाला असला तरी उत्तर धोरणाचा दुसरा टप्पा होता.

अपयशातही यशाची काही बीजे असतातच जी भविष्यातील राजकारणात कामाला येतात. राजकारणात वाया काहीही जात नाही. ही योजनाही वाया गेलेली नाही. पण तत्कालीन मुत्सद्दी आणि बुद्धीमान पातशहा औरंगजेबाच्या मनात शिवाजी व संभाजी अत्यंत धोकेदायक शत्रू म्हणून नोंदले जातात. शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यु झाल्यानंतर संभाजी महाराज गृहयुद्धात अडकून सिंहासनावर बसतात खरे पण त्यांच्या मागचे दुर्दैवी शुक्लकाष्ठ सुटलेले नाही. तरीही त्यांना आपल्या पित्याचे धोरण याद आहे, कारण ते स्वत: त्या धोरणाचेच अविभाज्य भाग आहेत. येथुन शिवाजी महाराजांच्या व्यापक उत्तर-धोरणाचा टप्पा सुरु होतो. किंबहुना दक्षीण त्यांनी सुरक्षित केलीय ती यासाठीच. 

आधी आपण अकबर कोण होता हे पाहुयात. अकबर व संभाजी राजे यांच्या वयात फक्त चार महिन्यांचे अंतर. हा औरंगजेबाचा चवथा मुलगा. याचीही आई लहानपणेच वारली. १६७८ साली जेंव्हा संभाजी व दिलेरखानाच्या वाटाघाटी सुरु होत्या तेंव्हा अकबर बापावर रागावून स्वत: पातशहा बनण्याच्या इच्छेने राजपुतांना जाऊन मिळाला. इतिहासात योगायोग घडू शकतात. पण हा योगायोग एवढ्यापुरता सीमित नाही. त्यामुळे त्याला कितपत "योगायोग" म्हणायचे ते वाचकांनीच ठरवायचे आहे.

अकबरला पातशहाने आठ हजारी मनसब दिलेली होती. १६७६ साली त्याला माळव्याचा सुभेदार म्हणून नेमले होते. किसनसिंग हाडाशी झालेल्या संघर्षात हाडाचा मृत्यु झाला. नंतर अकबराच्या बदल्या करण्यात आल्या. तो कर्तुत्वशून्य होता म्हणून त्याच्या बदल्या करण्यात आल्या असा इतिहासकारांचा अभिप्राय आहे. १६७८ मधे राजा जसवंतसिंगाचा मृत्यु झाल्यावर औरंगजेबाने जोधपूर संस्थान खालसा करण्याचे ठरवले. त्यामुळे जोधपुरचे बंड उद्भवले. या बंडाचा वणवा मोठा असला पाहिजे कारण पातशहाने आजमशहा, शहाआलम आणि अकबर या तिन्ही पुत्रांना या बंडाचा बिमोड करायला पाठवले. १६८० साली चितोडच्या बाजुने लढायला गेलेल्या अकबराला अपयश येत राहिले व त्याने पाच महिने फुकट घालवले म्हणून पातशहा रागावला. त्यात अकबराने हे युद्ध बंद करण्याचा सल्ला दिल्याने तो भडकला. त्याने अकबराची कानउघाडणी केली. त्यानंतर दुर्गादास राठोड व राजा रामसिंगच्या सल्ल्याने अकबराने बापाविरुद्ध बंड पुकारले. यात सिसोदिया व राठोडांची त्याला मदत झाली. ११ जानेवारी १६८१ रोजी अकबराने स्वत:ला बादशहा घोषित केले. (येथेही योगायोग असा की संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी झाला.) एवढे करुन अकबर थांबला नाही तर त्याने स्वत:च्या नांवाने नाणीही पाडली.  औरंगजेबाने यावर प्रतिक्रिया म्हणून अकबराच्या बायकोला व साथीदारांना दिल्लीला पाठवले व त्याला मदत करना-या झेबुन्निसालाही अटक करून कैदेत टाकले. ती मरेपर्यंत कैदेतच राहिली!

इकडे अकबराचे सिसोदित्या व राठोडांच्या मदतीने औरंगजेबाविरुद्ध युद्ध सुरुच ठेवले. अजमेरजवळ अकबराचा तळ असतांना औरंगजेबाचे सैन्य मात्र कमी होते. त्याच्यावर पराभवाच्या नामुष्कीची वेळ येऊन ठेपली होती. अकबराने त्याच्यावर हल्ला करण्याची संधी दवडली की अकबर अजुन औरंगजेबाच्या पुढच्या चाली व्हायची वाट पहात होता हे समजायचा मार्ग नाही. पण औरंगजेबाने आपली कुटीलनीति पणाला लावून रजपूत सरदारांना अकबरापासून फोडले. अकबर एकाकी पडला. केवळ दुर्गादास राठोडच काय तो त्याच्याशी इमान ठेऊन राहिला. पण महत्वाचे सरदार व सैन्य गेल्याने अकबरासमोर पुढे काय हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असणे स्वाभाविक आहे.

एकतर औरंगजेबाने सर्व सरदारांना अकबराच्या सा-या वाटा अडवायचे आदेश दिले होते. ११ मेचे अकबराचे संभाजी महाराजांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यातील भाषा ही दृढ परिचिताशी असावी अशी आहे. हे पत्र लिहिण्यापुर्वीच अकबराने ९ मे रोजीच महेश्वर येथे नर्मदा ओलांडली होती. त्या पत्रात अकबराने संभाजीकडे निघून येण्याचा निर्णयही त्याने कळवला होता. या पत्रात अकबर "आश्रय द्यावा" किंवा "तु निर्णयाची वाट पहातो" वगैरे कसलेही औपचारिक न लिहिता "आलमगीर हा तुमचा आणि माझा शत्रू आहे हे लक्षात घ्यावे. आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करावा." असे म्हणतो, म्हणजे संभाजीचा रुकार त्याने गृहितच धरलेला आहे. किंबहुना संभाजीकडे जाणे हे पुर्वनियोजित व परस्पर अनुमतीने ठरलेलेच असावे असे दिसते. किंबहुना आश्रयासाठी अकबराने वीजापूर किंवा अन्य कोणत्याही भारतीय सत्तेचा साधा विचारही केलेला दिसत नाही. असे का याचाही विचार आपल्या इतिहासकारांनी केलेला दिसत नाही.

संभाजी महाराजांनी पत्रांचे उत्तर दिलेले नाही. तरीही अकबर आपली वाटचाल सुरुच ठेवतो. दरम्यान अकबर संभाजीकडेच जात आहे हे लक्षात येताच औरंगजेब अकबराला किमन दोन पत्रे लिहून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. तरीही तो बधत नाही हे पाहून दक्खनेतील सरदारांना अकबरला अटक करण्याचे आदेश काढतो. अकबर मात्र आपल्या सैन्यासह संभाजी महाराजांच्या आश्रयाला येतो. संभाजी महाराज तो आला आहे हे समजताच त्याला आनण्याची व्यवस्था करत सुधागडाजवळ त्याच्या राहण्याची सोय करतो.

आता हा घटनाक्रम पाहिला तर अकबराचे संभाजी महाराजांकडील आगमन हे अनपेक्षीत होते व तो अनाहुत पाहुण व म्हणून संकट बनला असे दिसत नाही. किंबहुना अकबराचे बंड ते फसले तर तो मराठ्यांच्या आश्रयाला येणे हा पुर्वनियोजित कार्यक्रम आहे असेच दिसते. अकबर आपल्या शत्रुचा मुलगा आहे हे संभाजी महाराजांना माहित नव्हते काय? त्याला आश्रय देणे याचा अर्थ औरंगजेबाशी कायमचे वैर घेणे हे महाराजांना समजत नव्हते काय? आपण स्वत: अंतर्गत समस्यांनी वेढलेलो असतांना ही संकटमय ब्याद कोण शहाणा अंगावर घेईल? सीमेवरुनच एकतर ते अकबराला हाकलून देऊ शकत होते किंवा कैद करुन औरंगजेबाच्या हवाली करुन स्वत:साठी तात्पुरती उसंत मिळवू शकले असते. तत्कालीन परिस्थितीत हाच उत्तम तोडगा होता. केवळ आपल्या राज्यात आला म्हणून त्याची योग्य ती व्यवस्था करायला भाग पडायला तो कोनी साधु-संन्यास्सी अथवा विद्वान पुरुष नव्हता तर तत्कालीन महासत्तेशी उघड वैर घेऊन तिला आव्हान द्यायला सहकार्य मिळवायला निघालेला महत्वाकांक्षी बंडखोर होता. त्याला आला म्हणून आश्रय दिला असे नव्हते पण इतिहासकारांनी डोळ्यावर झापडेच बांधली तर दुसरे काय निष्कर्श निघणार?

थोडक्यात, अकबराचे बंड हे अचानक उद्भवलेली घटना नव्हती. राजपुतांची मदत घेणे हेही पुर्वनियोजित होते म्हणून अकबर चितोडच्या आघाडीवर उगाचच कालापव्यय करत राहिला. त्याचीही त्याच वेळीस अनेकांशी बोलणी चालू असणे स्वाभाविक आहे. संभाजी महाराजांनी दिलेर प्रकरणापासुन जी पेरणी सुरु केली होती ती उगवून वर यायला सुरुवात झालेली होती. दुर्दैव इतकेच होते की या धोरणाचे शिल्पकार शिवाजी महाराज मात्र या वेळीस हयात नव्हते अन्यथा संभाजी महाराजांना उत्तरेतही पाठवले गेले असते. अर्थात योजनेत बदल झाले तरी योजना टाकून दिली जात नाही. अकबराने स्वत:ला पातशहा म्हणून घोषित केलेच असल्याने खुद्द औरंगजेबाच्या सरदारांत चलबिचल सुरु होणे स्वाभाविकच होते. पिढ्यानुपिढ्या पातशाहीची सेवा करनारे राजपूत अकबराला मिळावेत व बंड सुरु व्हावे, ते अयशस्वी ठरले असले तरी, पातशाहीचा पाया हादरवणारी घटना होती.  अकबराची बहीण व आपली मुलगी झेबुब्न्निसाला बंदीवासात टाकेपर्यंत औरंगजेबाची मजल गेली म्हणजे त्याने हे प्रकरण गांभिर्याने घेतले होते हे उघड होते. अकबराला पकडायच्या आज्ञा काढुनही औरंगाबादचा सुभेदार बहाद्दुरखान खानजहान व इतर सरदार अवघे चारशे सैनिक घेऊन निघालेल्या अकबराला पकडू शकत नाही ही तशी अशक्यप्राय घटना. पण ती घडली आहे. एवढेच नव्हे तर पुढे औरंगजेबानेही सर्वांवरच संशय जो घ्यायला सुरुवात केली तो अनाठायी होता असे म्हणता येत नाही. दिलेरखान प्रकरणात "संभाजी मोगलांत फितवा माजवायला आला आहे" हा जो संशय त्याला आला होता तेच खरे होते. अकबर हा त्या सर्व घडामोडींतुन गळाला लागलेला मासा होता.

औरंगजेब दक्षीणेत उतरला तो केवळ अकबराला संपवण्यासाठी नाही तर संभाजीचा समुळ नाश करण्यासाठी! तो स्वत: दक्षीणेत उतरला कारण आपल्याच सैन्यात/सरदारांवर त्याचा विश्वास उरला असने शक्य नव्हते. त्याने स्वत: शत्रुच्या गोटात फितु-या केल्या असल्याने ते शस्त्र पले शत्रुही वापरु शकतात याची कल्पना त्याला नव्हती असे नाही. शिवाय त्याचे हेरखाते प्रबळ होते. पार रायगडाच्याही बातम्या त्याला कळत व मग तो आपल्या सरदारांना आदेश पाठवी हे मुकर्रबखान संगमेश्वरकडे कसा चालून गेला हा इतिहास पाहिला की लक्षात येते.

थोडक्यात ही औरंगजेबाच्या अस्तित्वाची लढाई होती. त्याला त्यात स्वत: उतरणे आवश्यक होते. खरे तर सावज सापळ्यात आपसूक चालून आलेले होते. पण औरंगजेब कमी धुर्त नव्हता. त्यानेही आपली सारी अस्त्रे बाहेर काढलेली होती. त्यातील पहिले अस्त्र म्हणजे संभाजीला त्याच्याच मुलुखात अडकावून ठेवने व त्यासाठी हरप्रकारे उपद्रव उभे करणे. त्याला बळी पडले ते संभाजी राजांचेच मेहुणे. बाकीच्यांची मग गोष्टच कशाला.

संभाजी राजांना या काळात असंख्य लढायांना सामोरे जावे लागले. एक जीवघेणा कट तर अकबरामुळेच फसला. त्या कटात सामील असलेल्या सावत्र आईसकट अनेक मंत्री व अधिका-यांना मृत्युदंड द्यावा लागला. आपल्याच राज्यात बंडाळ्यांनाही तोंड द्यावे लागले. फितुरीचे लोण पसरले होते. औरंगजेबाने तर प्रतिज्ञाच केली की संभाजीला ठार मारल्याशिवाय डोक्यावर टोपीही घालणार नाही. (३० जुलै, १६८२). पण संभाजी महाराजांनी त्यालाही काही यश मिळू दिले नाही. रामसेज किल्लाही त्याला मिळाला नाही. रणमस्तखान कोकणात उतरला खरा पण त्यालाही सहजी एकही यश मिळाले नाही. मार्च १६८३ मध्ये औरंगजेबाने अकबराच्या विरुद्ध (म्हणजे संभाजीविरुद्ध) ज्या फौजा पाठवल्या होत्या त्या परत बोलावून घेतल्या. या परत माघारीत मोगलंचे नुकसानच झाले. उदाहणार्थ रहुल्लाखान व रणमस्तखान कल्याणहून माघार घेत असतांना रुपाजी भोसलेने अचानक हल्ला करुन मोगल सैन्याचा बराच विनाश केला. अगदी घोडेही पळवून नेले. 

म्हणजे संभाजी महाराजांना अनेक आघाड्यांवर लढत होते म्हणून "एकाच वेळीस अनेक लोखंडी कांबी विस्तवात धरण्याचा हा प्रयत्न" हा सुरतेच्या वखारीतील इंग्रजांनी दिलेला दोष जर खरा असेल तर मग औरंगजेब तरी वेगळे काय करत होता? इंग्रजांचेच म्हणने पाहिले तर, "अकबराला केवळ ममता दाखवतात ह्या केवळ संशयावरून सुलतान आझम, बेगम (जहानझेब बानू) आणि दिलेरखान यांन सर्वांसमक्ष अपमानित करण्यात आले." (२ आक्टोबर १६८३). यातील दिलेरखानाचे नांव लक्षणीय आहे. जी फितुरी औरंगजेब मराठ्यांमधे माजवत होता तीच फितुरी खुद्द त्याच्याही सरदारांत झाली होते म्हणून औरंगजेबाला कोठेही म्हणावे तसे यश मिळत नव्हते असे म्हणने भाग होते. याला केवळ औरंगजेबाचा संशयी स्वभाव म्हणता येणार नाही.

हे सारे राजकीय बुद्धीबळाचे दाव-प्रतिडाव चालले होते खरे, पण उद्देश काय होता? संभाजी महाराज अकबराला आश्रय देऊन काय साध्य करु इच्छित होते हे आपण पाहुयात.

रजपुतांवर शिवाजी महाराजांपासून मोठी मदार होती हे सर्वविदित आहेच. रजपूत आपल्या राजकीय वचनाला किती जागले हा एक वेगळा प्रश्न आहे. पण उत्तरेत मोगल पातशाही रजपुतांच्याच बळावर प्रदिर्घ काळ टिकली हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. पण संभाजी महाराजांचा (म्हणजेच शिवाजी महाराजांचाच) मनसुबा दिलेरखानाकडे जाण्यापासून ठरलेला होता. अंमलबजावनीची वेळ आता आली होती. रजपुतांची मदत घेऊन केलेला आधीचा अकबराचा उठव फसलेला होता. पण संभाजी महाराजांनी पुन्हा रामसिंगाची मदत घेऊन उत्तरेत उठाव करण्याची योजना आखली होती. रामसिंगाला तशी पत्रेही त्यांनी लिहिली. औरंगजेब आपल्या महत्वाच्या सैन्यबळासह दक्षीणेत उतरल्याचा फायदा घेऊन उत्तरेत बंड करणे आता सोपे होते. उत्तरेत बंड करून अकबराला दिल्लीच्या तख्तावर बसवून नामधारी राजेपद त्याच्याकडे ठेऊन रजपुत व मराठ्यांच्या हाती सत्ता आनण्याची ती योजना होती. उत्तरेत हे सारे चालले असतांना आपण बादशाही छावणीवर अचानक हल्ला करुन खुद्द औरंगजेबालाच कैदेत टाकण्याचेही संभाजी महाराजांनी ठरवले होते. हे सारे १६८२ पासुन सुरु होते. बदललेया परिस्थितीत योजना बदलण्यात वावगे काही नव्हते. ही योजना अत्यंत धाडसी व शिवाजी महाराजांच्या धोरणाशी अत्यंत सुसंगत होती. आणि ते शक्यही होते.

औरंगजेबाच्या सैन्याची मराठी सीमांवर फजितीच होत होती. त्याचे सेनानायक कर्तुत्ववान नव्हते किंवा त्याच्या कह्यात फितुरीमुळे राहिलेले नव्हते. अशा स्थितीत औरंगजेबाच्या छावनीवरच सरळ हल्ला करुन त्याला बंदी बनवने व अधिकृतरित्या पदच्यूत करणे किंवा ठार मारणे ही अशक्यप्राय गोष्ट नव्हती. अर्थात ही अंतर्गत योजना संभाजी महाराज अकबरला सांगने शक्यच नव्हते.

पण रामसिंगचा प्रतिसाद येथे मननीय आहे. त्याने संभाजी महाराजांना कळवले की, " तुम्ही बादशहाला विरोध करू नये आणि त्याचे सार्वभौमत्व मान्य करावे!" याचाच अर्थ असा होता की राजपुतांना औरंगजेबाचे सार्वभौमत्व मान्य होते. त्यांना आता त्याच्याविरुद्ध कसलेही बंड करायचे नव्हते. म्हनजेच ते उत्तरेतील बंडात अकबराला पाठवले तरी साथ देणार नव्हते. समजा औरंगजेबाला दक्खनेत ठार मारले अथवा कैद केले तरी रजपुतांच्या सहकार्याखेरीज पुढचा पातशहा कोण असेल हे ठरवता येणे तेवढे सोपे नव्हते. पातशहाचे अन्य तीन पुत्र होतेच व ते सारेच सत्तापिपासू होते. अशा स्थितीत रामसिंग आपल्या शब्दापासुन ढळला आणि एक भारताचे राजकीय भवितव्य बदलणारी महत्वाकांक्षी योजना तात्पुरते मागे पडली. "...या परिस्थितीत जे योग्य आहे ते करायला मी तयार आहे.." असे लिहिनारा रामसिंग नंतर संभाजी महाराजांना बादशहाचे सार्वभौमत्व मान्य करायला सांगतो याचा अर्थ इतकाच की महाराष्ट्रत येतांना त्याही आघाडीवर उपद्रव निर्माण होणार नाही यासाठी औरंगजेबाने काही व्यवस्था करुन ठेवली होती. त्यामुळे संभाजी महाराजांनी रामसिंगाला लिहिलेल्या प्रदिर्घ महत्वाकांक्षेची झेप दाखवना-या पत्राचाही रामसिंगवर काहीही परिणाम झाला नाही. औरंगजेब नक्कीच स्वस्थ बसलेला नव्हता. 

रामसिंगने नकार दिल्यानंतरही संभाजी महाराज हिंमत हरलेले दिसत नाही. अकबराची मात्र चलबिचल सुरु होणे स्वाभाविक होते. संभाजी महाराज त्याला सोबत काही युद्धांतही घेऊन गेलेले दिसतात. अकबरावर ते संतापलेलेही दिसतात. अकबर गोवेकरांकडे निसटून गेल्यानंतर व तो एक जहाज मिळवून वेंगुर्ल्याला एका जहाजात बसुन इराणला निघाला असतांनाही कवी कलश व दुर्गादास राठोडने त्याची समजूत काढत त्याला परत उतरायला भाग पाले. नंतर संभाजी महाराजांनी त्याला पोर्तुगीज-मराठा युद्धात आपला मध्यस्थ बनवले. म्हणजे संभाजी महाराजांनी अनेक दिशांनी आपत्ती येत असतांनाही आपले प्रयत्न सोले नव्हते. अकबर हे त्यांचे प्यादे होते. दिल्लीची सत्ता काबीज करण्यात त्याचाच उपयोग होणार होता. अकबर जर त्यांना ब्याद वाटली असती तर त्याला खुशाल जाऊ दिले असते. पण तसे झालेले दिसत नाही. 

दर्म्यान घत असलेल्या बाकी राजकीय घडामोडी व लढाया या विवेचनात महत्वाच्या नाहीत. पण औरंगजेब संभाजी महाराजांना छोट्या-मोठ्या लढायांत गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला. १६८४ पासुन त्याला मराठ्यांचे किल्ले जिंकण्यात यश मिळू लागले. १६८५ मधे शिहाबुद्दीन तर पार रायगड- पायथ्याच्या पाचाडपर्यंत पोहोचला व ते जाळले. फिरोजजंगाने अनेक मराठा सेनानींना लाचलुचपत देत मोगलांकडे खेचले. अब्दुल कादीरने कोंडण्याचा किल्ला जिंकून घेतला. दरम्यान मराठ्यांचे तसे मित्र राज्य जे विजापुर ते १६८६ मध्ये जिंकून घेतले. गोवळकोंड्याचाही १६८७ मध्ये पाडाव करण्यात आला. थोडक्यात संभाजी महाराजांना आधी एकाकी पाडायचे तंत्र औरंगजेबाने वापरले व त्याला त्यात यशही मिळाले.

ही सारी स्थिती पाहता अकबराने हताश होणे स्वाभाविक होते. त्याचा धीर खचू लागला होता. तरीही त्याने १६८६ मद्धे संभाजी महाराजांच्या सैन्याची मदत घेत मोगलांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. पण औरंगजेबाने येथेही काळजी घेतलेली होती. अहमदनगरला त्याने ठेवलेल्या म-हमतखानाने चाकणजवळ त्याचा पराभव केला. अकबराला पुन्हा मराठी राज्यात परतावे लागले. त्याने मग सुरतेकडे जायचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी झाला. शेवटी फेब्रुवारी १६८७ मद्धे राजापुर येथुन एका भाड्याने घेतलेल्या जहाजातून त्याने इराणकडे प्रस्थान केले. त्याच्या दृष्टीने एक पर्व संपले. संभाजी महाराजांच्या दृष्टीने एका स्वप्नाचा अंत झाला आणि आपला अंत या संपुर्ण घटनाक्रमाने शिक्कामोर्तब केला आहे हेही त्य्यांच्या लक्षात आले नसले तरच नवल.

शिवाजी महाराजांनी आखलेल्या महत्वाकांक्षी योजनेचा हा तिसरा टप्पा अयशस्वी झाला. इतिहासकार संभाजी महाराजांना दोष देतांना कधीही या योजनेबाबत मात्र दुर्लक्षच करतात. घटनांचा, पत्रांचा उल्लेख करतात मात्र त्यांचा अन्वयार्थही लावण्याचा प्रयत्न करत नाहीत. अकबराला व संभाजीला व्यर्थ दोष देत बसतात. अकबर किती बुद्धीमान होता अथव किती नव्हता हा मुख्य विषय नसून मुळत बंड कसा करतो आणि सुरुवातीला रजपुत का सहाय्य देतात आणि नंतर तेच रजपुत त्याला का अव्हेरतात याचा त्यांनी का विचार केला नाही? आदिलशाही, गोवलकोडा त्याला जायला उपलब्ध असतांन तो सरळ संभाजीच्याच राज्यात का येतो आणि संभाजी कसलाही विचार न करता त्याला जवळपास साडेपाच वर्ष, त्याचे आपल्या राज्यातील अस्तित्व हे आपल्याला धोका आहे हे समजुनही का ठेऊन घेतो याचे विवेचन का केले नाही? खुद्द मोगल सरदारांत फितुरी माजली होती हे स्पष्ट असतांना ते संभाजी महाराजांनी त्यांना कसे फितूर करुन घेतले असतील यावर तर्कसंगत का विचर केला नाही? दिलेरखान प्रकरण व अकबराच्या प्रकरणात एक आंतरिक दुवा आहे हे खरे तर समजायला फारशा बुद्धीमत्तेची गरज नव्हती. पण तेही झाले नाही.

ते सोडा, पण औरंगजेब संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आपल्या भात्यातील सारी अस्त्रे बाहेर काढतो, चक्क रायगडापर्यंत त्याचे हात पोहोचतात, सेनापती व साहसी मानले गेलेले वीर युद्ध न करता पळून जातात आणि त्यानंतर संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी कसलाही प्रयत्न होत नाही, साधा वकीलही पाठवला जात नाही या घटनाक्रमाचा नि:पक्ष विचार करणे गरजेचे नव्हते काय? संभाजी महाराजांच्या बेसावधपनाला दोष देतांना, ते नशेत होते हे सांगतात पण मग त्यांचे बाकी सैन्य, हेर व खुद्द सेनापतीही नशेत होते की काय? पण अगदी सहज संभाजी महाराज मोगलांच्या हाती लागले. कोणताही प्रयत्न त्यांच्या सुटकेसाठी केला गेला नाही याचे त्यांच्याकडे काय स्पष्टीकरण असते?

अकबराला सोबत घेऊन संभाजी महाराजांनी जी योजना आखली होती ती एवढी महत्वाकांक्षी आणि औरंगजेबाच्या दृष्टीने घातक होती की त्याला स्वत: दक्खनेत उतरणे गरजेचेच होते. संभाजी महाराजांची हत्या करायचीच हे ठरवुनच तो आला होता. त्याने आधी आजुबाजुचे संभाजी महाराजांना सहायक ठरु शकतील अशा शाह्यांचा विनाश केला. संभाजे महाराजांच्या राज्यातही त्याने फंदफितुरीचे हत्यार उपसले. जे अस्त्र संभाजी महाराज त्याच्याविरुद्ध वापरत होते ते त्यानेही वापरले. संभाजे महाराजांना पकडले. करता येईल तेवढा अवमानहे केला व अत्यंत क्रुरपणे त्यांची हत्याही केली. हत्या केल्यानंतरही त्याचा सुडाचा, तिरस्काराचा अग्नी विझला नाही. संभाजी महाराजांच्या मस्तकाला भाल्यावर टोचून गावोगावी मिरवले. हा एवढा तिरस्कार कोठून आला? 

कारण संभाजी महाराजांनी त्याच्या सार्वभौम सत्तेला त्याच्याच पुत्राला हाताशी धरत आव्हन दिले होते. मोगलांच्या गादीचे पिढ्यानुपिढा सेवक असलेले राजपूत त्याच्याविरुद्ध उठण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचे पुनरावृत्ती होणे त्याला व पुढच्या पातशहांना परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्याने दारा शुकोहलाही ज्या क्रुरतेने मारले नाही त्या क्रुरतेने संभाजी महाराजांना मारले. संभाजी महाराजांचा मृत्यु या पार्श्वभुमीवर पहावा लागतो. 

याचा अर्थ असा नव्हे की शिवाजी महाराजांनी आखलेली योजना व संभाजी महाराजांनी केलेला तिचा पाठपुरावा चुकीचा होता. खरे तर हे एक भव्य उदात्त आणि अत्यंत साहसी स्वप्न होते ज्यामुळे इतिहासाची दिशाच बदलली असती. संभाजी महाराजांनी अत्यंत यशस्वीपणे मोगली गटांत फितवा माजवला. मोगल सरदारांना आधी कोणतेच यश न मिळण्यामागे तेच कारण होते व औरंगजेबाला तो संशयही होताच. तो कमी धुर्त आणि बुद्धीमान नव्हता. रजपुतांनी संभाजी महराजांना अपेक्षेप्रमाने साथ दिली नाही, उलट बादशहाचे सार्वभौमत्व मान्य करा हे सांगितले तेथेच ही अवाढव्य योजना फसायला सुरुवात झाली. मोगल साम्राज्याची पालखी वाहण्याचे काम त्यांनी इमान-इतबारे केले. योजना मोठी होती व त्या योजनेतील एक बाजुच अशी अवसानघातकी निघाल्यावर सारा बोजा एकट्या शंभुराजांच्या अंगावर पडला. त्यात औरंगजेबाने त्यांना अनेक आघाड्यांवर गुंतवून ठेवले. आणि त्य शांत झाल्याखेरीज संभाजी महाराज औरंगजेबाकडे ल्संपुर्ण ताकदीनिशी लक्षही देऊ शकत नव्हते. तरीही त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अकबराला तब्बल साडेपाच वर्ष ठेऊन घेतले होते ते उगाच नाही. जेंव्हा आता पुढे जाणे अशक्य आहे हे लक्षात आले तेंव्हा मात्र त्याला जाऊ दिले. औरंगजेब या गोष्टीचा पुरता सूड घेणार याची त्यांना जाणीव नसेल काय? 

योजना फसतात. स्वप्ने कधी कधी उध्वस्तही होतात. त्याची किंमत चुकवावीही लागते. अत्यंत धिरोदात्तपणे त्यांनी ती चुकवलीही. येणा-या पिढ्यांना तरीही, प्रतिकूल स्थितीत का असेना, स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची उमेद देत त्यांनी अत्यंत यातनादायी मृत्युला कवटाळले. आमचे इतिहासकार आणि कादंबरीकार मात्र त्यांचा रंगेलपणा किंवा धर्मवीरतेकडेच आशालभुतपणे पहात त्यांच्या जीवनाच्या कळसाध्यायाकडे पाहण्यास चुकले.

तसाही आधीपासुनच संभाजी महाराजांवर अन्याय झाला. त्यांच्या जीवनातही आणि नंतरच्या बखरकारांपासून ते इतिहासकारांकडून! भावे पिढ्या नालायक व आत्मकेंद्री निघाल्या तर दुसरे काय होणार? असो. शिवाजी महाराजांनी दिल्लीवर सत्ता आणण्याचे स्वप्न पाहिले, त्यासाठी अंतस्थ योजना आखली, संभाजी महाराज त्या योजनेचे अग्रणी वीर बनले आणि ती पुर्णत्वास नेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही झगडत राहिले. अपयशात दैदिप्यमान यश काय असते हे त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवले. 

-संजय सोनवनी

4 comments:

  1. मस्त! छान विवेचन केलेत सर.. बऱ्याच प्रश्नांची उकल झाली..
    काही मुद्दे आहेत...
    १) संभाजी महाराजांना संगमेश्वर ला पकडले तेव्हा संताजी घोरपडे पण सोबत होते, मग संताजींसारखे त्यांना हि तीतून कसा काय निसटता नाही आले.
    २) संभाजी महाराजांना पकडल्यानंतर राजाराम महाराज आणि त्यांचा राणीवसा रायगड वरून एका चोर मार्गाने गडावरून उतरून गेले त्या वेळेस येसू बाई महाराणी आणि युवराज शाहू याना का सोबत नेले नाही.
    ३) संताजी घोरपडे म्हणत असतानी हि पंत प्रतिनिधींनी वरील दोघांना सोडवण्यासाठी काहीच हालचाल का केली नाही...
    असेच काही प्रश्न मनात येतात जेव्हा संभाजी महाराजां बद्दल वाचतो. छावा, संभाजी, किंवा संताजी हि पुस्तक पुन्हा पुन्हा वाचली पण ह्या प्रश्नांची उत्तरे काही मिळाली नाहीत.
    तुमच्या वाचनात काही आला असेल तर कृपया मदत करा.

    ReplyDelete
  2. संभाजी महाराज अशा द्रुष्टीने आज प्रथमच पाहिलं.... पण हे मात्र खर कि इतिहासात संभाजी महाराजांइतकी अवहेलना दुसऱ्या कोणत्या राज्यकर्ता ची झाली असेल

    ReplyDelete
  3. खरे संभाजी महाराज आत्ता समजले . खरेच संभाजी महाराजांना धर्माच्या चष्म्यातुन बघणे किती मुर्खपणाचे आहे हेही समजून आले . संभाजी महाराजांचे उद्दि्ष्ट्य खुप मोठे होते , त्यात त्यांना अपयश आले , याची खुप मोठी किंमत त्यांनी मोजली . औरंगजेबाचा रागही समजु शकतो . असाच एक इंग्रजी चित्रपट आहे ज्यात इंग्रज लोक एका बंडखोर निग्रो नायकाचे हाल हाल करून हत्या करतात , त्याच्या चमड्याचे चप्पल बनवतात , त्याच्या शरीराची चरबी काढून गाड्यांच्या चाकांचे इंधन बनवतात . तसाच प्रकार संभाजी राजांच्या बाबतीत घडला याची हळहळ वाटते .

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...