Friday, November 3, 2017

मीच माझं आभाळ चोरलंय...




मी गेली साताठ वर्ष संगणकावर लेखन करतो. म्हणजे टायपतो. उजव्या हातालाच खिडकी आहे. मला खुले अवकाश फार आवडते. मी येथे रहायला आलो तेंव्हा या खिडकीपार कोणतीही इमारत नव्हती. आता एक उंचच उंच इमारत उभी राहतेय. माझं आभाळ चोरलं गेलय. खरं म्हणजे हाताने लिहायची मजा टायपण्यात नाही. मनात येणा-या विचारांचा धो-धो प्रवाह आणि या टायपण्याचा वेग काही केल्या मॅच होत नाही. हातातून सरळ मन झरतं, संगणकावर तसे होत नाही. पण माझं हस्ताक्षर इतकं भयंकर होऊन जातं त्या वेगात लिहितांना की आता ते बरोबर वाचून टायपणारे डीटीपीचे लोकही राहिले नाहीत. टायपतच लिहिणे भाग आहे. शिवाय प्रकाशकांपासून संपादकांची सोयही त्याने होते. पण माझं अवकाश संकुचित झालं आहे. मी हातानं जे लिहिलं असतं ते असं नक्कीच लिहिलं नसतं. हात कागदाशी बोलायचे. ते आता बंद झालं आहे. अनेकदा असं वाटतं, माझ्यातल्या लेखकाला मी छाटुन आधुनिकीकरणाच्या छोट्याशा पेटा-यात कोंबला आहे. मीच माझं आभाळ चोरलं आहे.

कसं आहे हे जग? पहायला मी खूप पाहिलं. म्हणजे भौतिक जग म्हणाल तर अर्धे जग तर नक्कीच. ते मनसोक्त भोगलेही. तरीही पाहिलं काय म्हणावं तर फार फार तर काही जागा सांगता आल्या, अनुभव सांगता आले तरी काहीही पाहिलं नाही हेही तेवढेच खरे. शरीराचा सांगाडा इकडून तिकडे हिंडला आणि सांगाडे पाहिले, अनुभवले, भोगले एवढेच. खरे तर जग पाहतांना मला जगाबद्दल समरस भावना कधीच जागली नाही. म्हणजे जणू काही मी या जगाचा हिस्सा नाहीच. अनेकदा मलाही याचे आश्चर्य वाटत आलेय की मी कोणा परग्रहावरून तर नाही ना आलोय? म्हणजे बघा, तुमची धिंड निघालीय. अट्टल गुन्हेगारासारख्या बेड्या तुमच्या हातात घालून, बेड्यातून दोरखंड ओवत काढून बैलांना जसे रांगेत मिरवले जाते तसे रस्त्याने अट्टल गुन्हेगारांबरोबर नेले जातेय. काय वाटेल तुम्हाला? मला काहीच वाटले नाही. धिंडीचे वास्तव लक्षात आले आणि माझ्या शरीरातून आत्मा जसा बाहेर पडला, जवळच्या इमारतीच्या कौलांवर, झाडांच्या शेंड्यांवर बसून मी जसजसा नेला जात होतो तसा बसत राहिला. मला पहात राहिला. जसे काही हे माझ्याशी होत नव्हतेच. अत्यंत निर्विकारपणे मी बाजारपेठेतुन मलाच जातांना पहात होतो. लोकांच्या कुत्सित नजरा, उपहास आणि करमणूक मी स्वत:च एन्जोय करत होतो. जेंव्हा परत आणतांना मात्र मागच्या दाराने बिनबेड्यांचे आणले गेले तेंव्हा तर मी चक्क हसत होतो. कोणावर हे नाही माहित मला पण हसलो खरा.

समजा तुम्ही अकरा वर्षाचे आहात. तुमची तीन धाकटी भावंडे तुमच्यासोबत आहेत. सर्वात महत्वाची म्हणजे आई. तीही सोबत आहे. वडिल परागंदा झालेले आहेत. त्यांच्या शोधाला तुम्ही विनातिकीट निघाला आहात आणि एका रेल्वे जंक्शनवर आईच तुम्हा सर्वांना सोडून देते. एकटी तिच्या माहेरी निघून जाते. तुम्ही काय विचार कराल? किंवा आयुष्यात अशी घटना तुमच्यावर काय परिणाम करेल? एक लेखक म्हणून मी कल्पना करू शकतो. पण मला काय वाटले? काहीही नाही. आजही काहीच वाटत नाही. हे सारे एका सांगाड्याशी झाले. माझ्याशी नाही. बरे हे जाऊद्या. तुम्ही विवाहित आहात. एक मुलगी तुमच्या खूप प्रेमात पडते. इतकी की तिचे लग्न ठरले तरी ती तुमच्या कडून मुल मागते. तुम्ही देता. नंतर ती येते ती त्या मुलीला घेऊनच. त्या मुलीकडे पाहतांना तुम्हाला काय वाटेल? तिच्याकडे पाहतांना काय वाटेल? मला तरी काहीच वाटले नाही. म्हणजे मी बोलत होतो, हसत होतो वगैरे खरं. पण वाटलं काहीच नाही. आता ती कोठे आहे हेही मला माहित नाही. म्हणजे मी कधी चौकशीच केली नाही.

म्हणजे मी एक सांगाडाच नाही का? सांगाड्याला भावना नसतात. जगतांना मी भावना पाळल्या असं मला वाटत नाही. मी या फार थोड्या घटना सांगितल्या. एक विवाहित स्त्री माझ्या प्रेमात पडली. दोन वर्षात जवळपास ३०-३२ रात्री मी तिच्याबरोबर घालवल्या. असंख्य रोमांटिक क्षण आले. पण मी तिच्याशी एकदाही संभोग केला नाही. पण मी दोन लग्ने केलीत आणि निभावलीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माणूस ठरवत नाहीत. माझे मित्र मला आत्मचरित्र लिहा म्हणतात. खरे आहे. जीवनात सांगण्यासारखे एवढे आहे की जगातील कोणत्याही जगप्रसिद्ध चित्तथरारक कादंबरीलाही त्यांची सर येणार नाही. पण मी नाही लिहित. म्हणजे तसा प्रयत्न केला नव्हता असे नाही. पण नाही जमले. खरे म्हणजे आत्मचरित्र लिहायचे म्हणजे स्वत:वर तरी प्रेम हवे की नको? मला माझ्याबद्दल प्रेम नाही. उदासीनता असली तर असेल. खरे तर मला आठवायचाही कंटाळा येतो. लिहायचा तर मला त्याहून मोठा कंटाळा.

असो. हे जरा व्यक्तिगत झालं. पण अर्चनाताई मला लेखकाच्या नजरेत्न लिहा म्हणून सांगताहेत तर त्यात व्यक्तिगतच येणार. व्यक्तिगत जीवन सांगाडा म्हणून जगलो असलो तरी सांगाड्याचे लेखकीय जीवन मात्र तसे नाही. ते रसरशीत आहे. म्हणजे मला तरी ते तसे वाटते. आणि तेही मला लेखक म्हनायचे ठरले तरच. मी जगाची पर्वा फारशी कधीच केली नाही. किंबहुना मी मला या जगाचा भाग कधीच समजलो नाही. माझे जग हे कल्पनांतले जग आहे जे माझ्यासाठी खरे आहे. माझी पात्रे वाचकांना निरस वाटली तरी माझ्यासाठी ती जीवंत आहेत. जगणारी आहेत. आणि त्यांच्या सोबतीत मी एवढा रमलेलो असतो की हे बाहेरचे जग काही वाटून घेण्याच्या गरजेचे आहे असे मला कधी वाटतही नाही.

म्हणजे बघा, मी एखादे भावपुर्ण गाणे ऐकतो किंवा मीच दिलेले संगीत अनाहतपणे कधी गुंजत असते तेंव्हा मी रडतो. तसे हास्यास्पद असले तरी पडद्यावरचे भावूक प्रसंग माझ्या डोळ्यात पाणी आनतात. मी लिहितांना माझ्या पात्रांशी समरस एवढा होतो की त्यांच्या वेदनांनी कळवळून मी रडतो. माझी पात्रे मीच निर्माण केलेल्या रहस्याशी झगडत असतात तेंव्हा मी त्या रहस्याच्या खोल डोहात तळाशी जाऊ पहात असतो. मला आणि माझ्या नायकांना एकाच वेळेस रहस्य उलगडते. मला माझ्या कादंबरीचा शेवट सोडा, पहिली ओळ लिहिल्यावर दुसरी काय असनार हेही मला माहित नसते. लिहिता लिहिता मलाच मी आणि माझी पात्रे उलगडली जातात. कादंबरीची कथा मला आधीच माहित झाली तर मी ती कादंबरी पुढे लिहितच नाही. मग आराखडा बनवणे, पात्रांचे परस्परसंबध आधीच निश्चित करुन मग बेतल्यासारखी कादंबरी लिहिणे तर दुरच.

खरे तर लिहिले आणि पुस्तके प्रसिद्ध झालीत म्हणून मला लेखक म्हणयचे. मी मला लेखक मानत नाही. कवी नाही की नाटककार नाही. संशोधकही नाही की तत्वचिंतकही नाही. म्हणजे बघा मी नीतिशास्त्र लिहित होतो तेंव्हा मी सहज माझ्या एका मित्राला सांगितलं. तो फिस्सकन हसला. मी आणि नीति? हसण्यासारखेच आहे हे खरे आहे. पण मी अशा असंख्य हास्यास्पद गोष्टी केल्या आहेत. नीतिशास्त्र मी पुर्ण कोठे केले तर तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तेही टिळक यार्डमध्ये. अहो, लोकमान्य टिळक देशभक्तीसाठी जेलमधे गेले आणि तेथे गीतारहस्य लिहिले आणि मी फसवणुकीच्या आरोपाखाली जेलमधे गेलो आणि नीतिशास्त्र लिहिले. आता हे हास्यास्पदच आहे हे तुम्हालाही पटेल.

तर काय सांगत होतो...लिहिण्याबद्दल. हां. तर मी लिहिले म्हणून लेखक. इतिहासाचे उत्खनन केले म्हणून संशोधक. तत्वज्ञानावर लिहिले म्हणून चिंतक. कविता लिहिल्या म्हणून कवी आणि नाटके लिहिली म्हणून नाटककार. आता लिहिले म्हणजे लेखक होतो हे खरे असले तरी न लिहिताही लेखक असू शकतातच. किंबहुना अशा महान लेखकांची संख्या अंमळ जास्तच भरेल. लिहायची कलाच सापडली नव्हती तेंव्हा किंवा आजही अनेक निरक्षर असतात याचा अर्थ त्यांच्याकडे कसलेच सांगण्यासारखे चिंतन, विचार अथवा कथा नसतात असे थोडीच आहे. तर काय तर मी लिहितो म्हणून लेखक. पण तसे तरी खरेच आहे काय? आता विचार करतोय तर हे पटते की मी लिहिले म्हणून लेखक. तसे पाहिले तर मी नसते लिहिले तरी चालले असते. पण तरीही लिहिले म्हणजे काहीतरी असले तर पाहिजे.

खरे म्हणजे मी एक शोधक आहे. शोधक म्हणण्यापेक्षा अन्वेक्षक म्हणणे योग्य राहील. एक खाजगी डिटेक्टीव्ह म्हणून मी असंख्य खाजगी रहस्ये उलगडली. जगणे हेही एक रहस्यच. कळू न म्हणता न कळनारे. या रहस्यात सुसंगतींपेक्षा विसंगतीच जास्त. आणि मला विसंगती पटकन दिसतात. समोरच असणारी सामान्य बाब दुर्लक्षित करत इतिहासकार असोत की उत्खननकार, ते जे निष्कर्ष काढतात त्यातल्या विसंगत्या मला मात्र लगेच समजतात. या विसंगत्यांना टिपत त्यांना सुसंगत करण्याचा माझा व्याप म्हणजे माझे लेखन. जगणेही अशाच विसंगत्यांनी भरलेले. त्या विसंगत्यांचे सुसंगत ताणेबाणे म्हणजे कादंबरी किंवा कथा. किंवा तत्वज्ञान. किंवा नाटक. अगदी चित्रपटही. नाट्य निर्माण होते तेच मुळी जीवनाच्या अपार विसंगतीतून! आणि या विसंगत्या कोठे नाहीत? त्या इतिहासात आहेत. त्या जगण्यात आहेत. त्या समाजात आहेत. विचारवंतांत आहेत. लेखकांत आहेत. त्यांच्या साहित्यातही आहेत.

आणि मी स्वत: तर विसंगतीचा मुर्तीमंत असुसंगत पुतळा आहे. माझ्या जगण्यात कसलीही सुसंगती नाही. त्या विसंगतीला सुसंगत करण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी ते सुसंगतपणे मला समजलेले नाही. म्हणजे जीवन कोणालाच समजत नाही हे खरे असले तरी किमान त्यात कोठेतरी सुसंगती लावता येते. मला ती लावता येत नाही. कारण सारेच विसंगत आहे.

मी एके काळी प्रचंड वाचक होतो. आजही आहे. पण वाचनाचे विषय बदलले आहेत. आधी मी कादंब-या खूप वाचायचो. आता इतिहास बोकांडी घेतला आहे. आणि मी मात्र कादंब-या लिहितोय पण वाचत एकही नाहीहे. म्हणजे प्रयत्न केला नाही असे नाही. पण नेमाड्यांच्या हिंदूमुळे माझा तो प्रयत्न अयशस्वीच ठरला. मी कादंब-या वाचायचो त्या काळात मला सुसंगती-विसंगती अस्पष्टपणे कळायच्या. त्यामुळे नावडत्या कादंब-या क्वचित असायच्या. पण आवडत्या म्हनावे तर तसेही काही नाही. आउटसाईडर वाचली तेंव्हा जरा अस्वस्थ झालो होतो हे खरे. कदाचित मी स्वत:ला नकळत आउटसायडर समजत असल्यामुळे तसे झाले असावे. पाडस आवडली ती त्यातील निरागस स्वप्नाळुपणाकडून निर्दय वास्तवी प्रौढतेकडे प्रवास करणा-या ज्योडीमुळे...नि त्याचा बाप पेनीमुळे. पण डोक्यात बसली अशी एकही कादंबरी नाही, नाटक नाही की कविताही नाही. पण सारे वाचलेले साहित्य मिळून एक विक्षिप्त कोलाज मात्र तयार झाला. Form समजण्यापलीकडे त्यांचा मला काही विशेष उपयोग झाला असे नाही. तत्वज्ञानातही तेच झाले. विसंगत्याच जास्त. मग ते ग्रीक तत्वज्ञान असो की भारतीय. बौद्ध तत्वज्ज्ञान तर विसंगत्यांचा पुतळाच.

आपला इतिहास पहावा तर तोही तसाच. म्हणजे बघा ना, आपल्या भटक्या मेंढपाळाला...धनगराला इतिहास नसतो.  फासेपारध्याला नसतो की सुतार-लोहाराला नसतो. महार-मांग-ढोर तर इतिहासातही अस्पृष्यच. अलीकडे त्या त्या जातींनीच आपापला इतिहास शोधायचा प्रयत्न सुरु केलाय पण त्यातही भ्रमांनी भरलेला अभिनिवेशच जास्त. बरे, भ्रम येतात कोठून तर ज्या साहित्यात त्यांचा इतिहास सापडण्याची सुतराम शक्यता नाही त्या साहित्याचा संदर्भ घेत आपल्या समजुती त्यावर लादल्याने. बरे, काहींना इतिहास आहे आणि काहींना इतिहास नाही असे कसे होईल? प्रश्न पडला आणि शोधाची सुरुवात झाली. विसंगत्या सुसंगत करण्याच्या प्रयत्नांत अनेक जातींचाच नव्हे तर जातिसंस्थेचाच इतिहास लिहून झाला. आता, लोकांना विसंगत्यांतून शोधलेली सुसंगती आपल्या मनाविरुद्ध असेल, समजुतींविरुद्ध असेल, प्रस्थापित मतांविरुद्ध असेल तर तो कोणाला आवडण्याची शक्यता नसते. आपल्याला समजुतींवर जगणे जास्त आवडते. अणि तरीही आपण परत "आमचा इतिहास का लिहिला गेला नाही?" हे कंठशोष करून विचारतो.  ही विसंगती आहे. विसंगत्याही सुसंगतपणे समजावून घ्याव्यात हे मात्र कोणाला वाटत नाही. बरे, इतिहासच शोधायचा तर खूप मागे जावे लागते. अगदी पुरा मानवापर्यंतच नव्हे तर सृष्टीच्या जन्माच्या इतिहासाकडेही जावे लागते. मी गेलो. सारे सिद्धांत तपासत त्यातील विसंगत्या शोधत मी नवाच सिद्धांत मांडला. विश्वनिर्मितीचा सिद्धांत. सारे विश्वच आले तरी कोठून हाच काय तो शोध. अंतिम उत्तर कोणाकडेही नाही, सापडण्याची सध्या तरी सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ शोध घेऊच नये असा तर नाही?

मला मृत्युचे अनावर कुतुहल आहे. मला मृत्युची भिती वाटत नाही असे मला वाटत होते. पण एका अपघातातून वाचलो आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. एका गुंडाने खंडणीसाठी माझ्यावर पिस्तूल रोखले आणि तरीही त्याला मी जे उत्तर दिले ते तो अजुनही विसरला नसेल. ही घटना घडली आणि मी त्याच रात्री एक गीत लिहिले, संगीतही दिले आणि पहाटे फोन करून मित्रालाही ऐकवून त्याचे शिव्याशाप खाल्ले. ते जाऊद्या. पण तरीही मृत्युचे कुतुहल कधी सुटले नाही. सारे धर्म, सारी तत्वज्ञाने अखेर मृत्युच्या चिंतनाशी, त्याबद्दल वाटत असलेल्या भयापाशी येऊन थांबतात...दिलासा कोणी पुनर्जन्मात शोधतो तर कोणी आत्म्याच्या अजरामरतेत. कोणी इश्वरात शोधतो तर कोणी बुवा-बापुत. पण आत्मा आहे काय? परमेश्वर खरेच आहे काय? शोध थांबत नाही. मी नववीत असतांना चक्क एक धर्मच स्थापन केला होता व तो भर पडत गेलेल्या तेरा अनुयायांसह चक्क पाच-सहा वर्ष टिकलाही. मी द अवेकनिंग कादंबरी लिहिली तीच मुळी मृत्युच्या शोधासाठी. नीतिशास्त्र लिहिले तेच मुळात या सनातन भयाची तत्वमिमांसा करण्यासाठी. सांगाड्याशी काय होते आहे याचा विचार करायला मला कधी फारसा वेळ मिळाला नाही. किंबहुना व्यक्तिगत सुख-दु:खांनी मी कधी उद्वेलितही झालेलो नाही. सारे क्षणिक आणि तात्पुरते. कधी कशात रमलो नाही. अगदी पुस्तकही प्रकाशित होईपर्यंतच काय असते ती उत्सुकता. नंतर मी त्याकडे ढुंकुनही पहात नाही. माझी पुस्तके, इकडे-तिकडे प्रसिद्ध झालेले फुटकळ लेखन मी कधी जपले नाही.

खरे म्हणजे मी सामाजिक आजिबात नाही. लोकांत मिसळायला मला मुळीच आवडत नाही. मला आधीपासुन मित्रच कमी. त्यातले अनेक गेले त्याचीही खंत नाही. नवे होत गेले. पण हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढेच. पण तेही कायम राहतील अशी आशाही मी कधी बाळगली नाही. आणि विसंगती ही की मी तरीही सामाजिक आहे. माणसांचा कल्लोळ नेहमी माझ्या मनात उसळत असतो. मी पालांवरील वडारांच्या, फासेपारध्यांच्या किंवा डोगरतळी मेंढरं चारणा-या धनगरांच्या, किंवा मानसिक द्वंद्वाने पछाडलेल्या दुभंग होताहेत की काय अशा धर्मांतरीत पुर्वास्पृष्यांच्या व्यथा, वेदना, आशा, आकांक्षांत जगत असतो. मला दु:ख हे नेहमी सामुहिक स्वरुपात दिसते. ते किंबहुना एक स्वतंत्र रुप धारण करत मला म्हणत राहते..."बघ माझ्याकडे...कसा करणार नष्ट मला?" आणि ते हसत असते. मला आव्हान देत राहते. हतबलतेने मी ग्रासून जातो. आशाही तशाच आणि आजवर मात करण्याच्या उमेदीही तशाच. अन्यायाचीही मी कधीही जातवार विभागणी करु शकलो नाही. अन्याय म्हणजे अन्याय. मी सोयीने कधी प्रतिगामी ठरवला जातो किंवा पुरोगामी. मी सोयीने कधी याचा द्वेष्टा ठरवला जातो किंवा त्याचा. सांगाड्याला याचा फरक पडत नाही. या सांगाड्यापार असलेला जो मी आहे तो यातुनही मानवी मनाचा आणि त्यातील अपरंपार विसंगत्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत रहातो. जमेल तसे उत्तर शोधत रहातो. ते सापडत नाही. त्याने मात्र मी उदास होतो. खिन्न होतो. पण पुन्हा पेटतो. नव्या दमाने उत्तरे शोधायला वेगवेगळे पवित्रे घेत स्वत:शीच लढत रहातो.

एक सांगाडा आहे आंणि एक मी आहे. हे द्वंद्व आहे. म्हणजे व्यक्तिगत सुख-दु:खे माझ्यावर कधी राज्यच करू शकली नाहीत. केले असेल तर अत्यंत तात्कालिक. कशातच रमणे हा मुळी माझा स्वभाव नाही. किंबहुना माझी पात्रेही बव्हंशी अशीच. अविरत कशा न कशाचा शोध घेणारी. माझी पुस्तकेही तशीच. माझ्या नजरेतून जग काही विशेष नाही. ते तसेच आहे जसे हजारो वर्षांपुर्वी होते. बदल बाह्य आहेत. समस्या नवनव्या लेबलात आहेत ख-या पण त्यांचा मुळगाभा तोच आहे. तत्वज्ञानही तेच आहे आणि वर्तनसापेक्षताही तीच आहे. संदर्भ बदलत असतील, माध्यमं बदलत असतील, पण आक्रोशही तोच आहे. या तोच तोच पणाचा लोकांना कंटाळा येत नाही हेच खरे नवल आहे. माझ्या दु:खात, सुखात, यशात किंवा अपयशात काहीच नवीन नाही. मग माझ्या नजरेतून जगात नवीन काय दिसणार? हो, दिसला, तर या कंटाळ्यावर मात करत प्रत्यक्ष जगण्याला सांगाडा करुन टाकत त्याहीपार असलेल्या अगणित ’स्वं’चा निरंतर शोध.

मी अनेक लेबले चिकटवला गेलेला माणुस आहे. मी निर्दय किंवा टोकाचा बेपर्वा वाटावा इतका अलिप्तही आहे. तथाकथित अनैतिक तर आहेच आहे. या लेबलांत मला अनेकजण शोधतात. त्यांना मी कसा सापडेल? या लेखात अगणित वेळा "मी" हा शब्द आलाय. पण तेही अपरिहार्य आहे. कारण मी आहेच. या "स्व" ला तिलांजलि देण्याचा मार्ग मला अजून तरी सापडलेला नाही. आणि भुतकाळातील लोकांनी दिलेल्या उत्तरांवर मी कधीच अवलंबूनही राहिलेलो नाही. पण माझ्या दोन मी आहेत. एक लेबलवाला, म्हणून अनेक दिसणारा - वाटनारा ’मी’ आणि दुसरा जीवनाचा निरंतर शोध घेणारा ’मी’. या दोन "मीं"मध्ये द्वंद्व होतच नाही असे नाही. पण जिंकतो तो दुसरा ’मी’.

तर, सांगायचा मुद्दा हा की मी लिहिलं म्हणून लेखक आहे. तसं काही मी ठरवलं नव्हतं. खरे तर जीवनात काय बनायचं हेही मी ठरवलेलं नव्हतं. कोणी मला तसं सांगितलंही नाही आणि सांगितलं असतं तर मी ऐकलं असत असंही नाही. जे होत गेलं ते मी होऊ दिलं. जीवन जसे आले तसे ते मी स्विकारत गेलो. हेच हवे नि ते नको असले नखरे मी केले नाहीत. हे असेच का ते तसेच का असले फालतू प्रश्न मला कधीच पडले नाही. हे हवे... ते नको याचा मग काही संबंधच नव्हता. मी उद्योजकही झालो ते काही महत्वाकांक्षेने वगैरे पेटून नव्हे. त्यामुळे उद्योग उभारले आणि ते डोळ्यांदेखत नष्टही झाले याचे मला तात्पुरते सोडले तर आनंद-दु:ख काहीच नाही. किंबहुना व्यक्तिगत गतकाळाकडे पहायला वेळही मिळत नाही आणि मिळाला तरी मागे पहायची गरजही वाटत नाही. कारण जीवनाचा शोध थांबत नाही. जीवन व्यक्तिगत असणे, त्यात रमणे, काटेरी जखमा कुरवाळत बसणे, गतकालीन यशांवर हुरहुरणे हे सारे करण्यासाठी लागणारे स्वप्रेम माझ्यात नाही. जेही झाले, बस...झाले.

तर शेवटी माझ्या नजरेतून काय आहे? माझे आभाळ चोरले गेले आहे आणि ते अज्ञात क्षितीज मला दिसेनासे झाले आहे. माझा आत्मा मला सामावून न घेऊ शकणा-या पेटा-यात बंदिस्त केला जातो आहे आणि ती तडफडच काय ती तेवढी मला अस्वस्थ करते आहे. या गगनचूंबी सामुदायिक आक्रोशांच्या तटबंद्या मला भेदता येत नाहीहेत. या वेदनांनी माझे आभाळ चोरले आहे. द्वेषांच्या उद्रेकणा-या सैतानी प्रेरणा मला एका पेटा-यात बंदिस्त करू पहात आहेत. जीवन विसंगतींनी भरलेले आहे. या विसंगतींचा शोध घेऊन घेऊन दमलो असलो तरी मी या अभेद्य वाटणा-या तटबंद्या एक दिवस कोसळवेल ही माझी अजरामर उमेद मात्र आजही कायम आहे. सांगाड्याचं काय...तो आज असेल उद्या नसेल. पण हा माझ्यातील "मी" हा सर्वांत असलेला "मी" आहे. आणि तो निरंतर शोधक आहे. असण्याचा आणि नसल्याचा, उत्पत्तीचा आणि विनाशाचा शोध घेणारा "मी". त्याला कसल्याही व्यक्तिगत व्यथा नाहीत कि वेदना नाहीत. आनंद नाही की दु:ख नाही. तो भावनोद्रेकी असुनही भावनाहीन असल्याने नैतिकही नाही की अनैतिकही नाही. या "मी" चा प्रवास अनादि आणि अजरामर आहे. जीवनात भरलेल्या अगणित विसंगत्यांना एक दिवस हे सर्व "मी" सुसंगत बनवत एका सुस्वर लयीत बदलवतील ही आशा आहे. मी लेखक नाही. मी जीवनाचा शोधक आहे.

(Published in "Dilasa" Deepavali issue, 2017)

2 comments:

  1. सर, तुम्ही एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहात, नेहमीप्रमाणे हाही लेख छान आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. जबरदस्त. शब्दांची स्फुल्लिंगे. भावना व्यक्त करायला मी आपल्यासारखा शब्दप्रभु नाही.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...