Thursday, August 22, 2019

जैन सरस्वतीचे मूळ!




भारतीय दैवतशास्त्र हे विलक्षण असून भारतात निर्माण झालेले विविध धर्म आणि त्यांच्या प्रधान देवता आणि त्यांची परस्पर धर्मात झालेली देवाण-घेवाण हा एक गुंतागुंतीचा असला तरी अत्यंत महत्वाचा विषय आहे. कोणती देवता मुळात कोणत्या धर्मीयांनी कल्पिली, तिचे मूळ स्वरूप काय होते हे पहणे अत्यंत आवश्यक ठरते. याच देवता अन्य धर्मीयांनी स्विकारल्यानंतर त्या देवतेवर आपल्या धर्माचे कोणते संस्कार केले आणि तिचे कालौघात अंतिम रूप काय बनले हे शोधत असतांना तत्कालीन समाजव्यवस्थेचीही आपल्याला कल्पना येते.

सरस्वती ही जैन धर्मातील एक महत्वाची देवता आहे. जैन धर्म तत्वज्ञानाच्या पातळीवर रुढ अर्थाने दैवी शक्ती असलेल्या देवतांना मानत नाही. असे असले तरी सरस्वती, लक्ष्मी, शासनदेवता, यक्ष, यक्षिणींना मात्र आपल्या शिल्पशास्त्रात आणि दैवत शास्त्रात मात्र स्थान देतांना दिसतो. जैनांना या दैवतांचे मूळ स्वरूप काय अभिप्रेत होते हे पाहण्यासाठी आपल्याला सरस्वती देवीचाच दैवतेतिहास समजावून घेतला पाहिजे.

सरस्वती ही देवता वेदांतून आली अशी व्यापक मान्यता आहे. सरस्वती ही ऋग्वेदातील एक दैवतप्रतिष्ठा लाभलेली नदी आहे. याच नदीच्या काठावर वैदिक संस्कृती इसपू १५०० च्या आसपास जन्माला आली. ऋग्वेदात या नदीला "देवीतमे, अंबितमे" अशा शब्दांत गौरवले आहे. (ऋ. २.४१.१६)  ही नदी उसळत्या जलप्रवाहाने भरलेली असून तिच्या लाटा पर्वतांना फोडून वाहतात असे वर्णन ऋग्वेदात येते. (ऋ. ६. ६१. २, ८) तिचा उगम स्वर्गीय समुद्रातून होत असून ती कधी आटत नाही. (ऋ. ५.४३.११) ती पृथ्वीला सुपीक बनवते. ती संपत्ती पौरुष, अपत्ये, आणि अमरता प्रदान करते म्हणून तिला ’सुभगा’ असेही म्हटले गेले आहे. सरस्वती ही वैदिकांची एक प्रकारे अदिती, उषस इ. देवतांप्रमाणे मातृदेवताच असून तिची तुलना वैदिक ’पृथ्वी’ या देवतेशी होऊ शकते. तिच्या आशिर्वादाने कल्याण होते, निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती होते, एवढी तिच्या प्रवाहात शक्ती आहे, (ऋ. ७.९६.४-६) असे सांगत तिच्या पाण्यत अपावित्र्याला पवित्र करण्याचीही शक्ती आहे असे म्हटले गेले आहे. ती सुफलनतेचीही देवता मानली गेली असावी असे ऋग्वेदातील अनेक ऋचांवरून दिसते. यज्ञात आहुत्या देवून इडा, भारती या देवतांसोबतच तिची प्रार्थना केली जायची.

वैदिक समाज हा मातृदेवतापूजक समाज नव्हता अर पुरुषप्रधान होता. त्यामुळे स्त्रे देवतांची संख्या अत्यंत अत्यल्प आहे. ऋग्वेदातील एकुण ६४५ देवता पाहिल्या तर महत्वाच्या अशा पाच-सहा मातृदेवता या निसर्गाचेच प्रतीकमात्र आहेत. सरस्वती ही देवतासुद्धा वैदिक समाजाला जीवनदायिनी वाटलेल्या सरस्वती नदीच्याच स्तवनातून जन्माला आली. पण ऋग्वेदात ही देवता वाणी, बुद्धी, ज्ञान व संगीताची देवता म्हणून कोठेही येत नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

ऋग्वेदात ’वाक’ नामक एक देवता असून ती मात्र वाणीची देवता मानली गेली आहे. वैदिक ऋषींच्या मंत्रवाणीत शक्ती आहे या क्ल्पनेतून वैदिकांनी या देवतेला उशीराच्या कालखंडात जन्म दिला. तिच्या साहचर्याने ऋषींना मंत्र स्फूरतात आणि ते ब्राह्मण (म्हणजे मंत्रकर्ते) बनतात (ऋ. १०.१२५) अशी संकल्पना असल्याने वाक या देवतेला अत्यंत गूढ, रहस्यमय व अद्भूत शक्ती मानले गेले. तिच्या अस्तित्वामुळे श्रवण, दृश्य, समज आणि भाषिक अभिव्यक्ती होत त्यांचे सत्य स्वरूप समजते अशीही कल्पना वैदिकांनी केली होती. वाक ही स्वर्गस्थ देवतांची राणी असल्याचीही कल्पना होती. (ऋ. ८.८९) म्हणजेच वाक या देवतेचीही अनेक रुपे वैदिक मंत्रकार ऋषींनी पाहिली. वाग्देवता या स्वतंत्र देवतेचा जन्म याच ’वाक’ पासून झाला. ब्राह्मण काळात (सनपुर्व आठवे-नववे शतक) या देवतेला जास्त महत्व आले. तिच्याभोवती अनेक मिथ्थकथा रचण्यात येत तिच्या गुढत्वाला गडद बनवले गेले. "वाक" नेच तीन वेदांना जन्म दिला असून पृथ्वी म्हणजे ऋग्वेद, हवा म्हणजे यजुर्वेद आणि आकाश म्हणजे सामवेद असेही याच ब्राह्मणकाळात मानण्यात येऊ लागले. पण त्याच वेळीस वाक ही देवता प्रजापतीच्या मनातून जन्माला आली आणि सृष्टीचे सृजन तेथुनच सुरु झाले असेही म्हणण्यात आले आहे.

थोडक्यात वैदिक वाक आणि ब्राह्मणकाळात विकसित झालेल्या वाक या देवतेत अनेक ठिकाणी सुसंगतपणा नाही. पण ब्राह्मणकाळातही सरस्वती आणि वाक या स्वतंत्र देवता होत्या. आज सरस्वती या देवतेबाबत वैदिक आणि जैनांच्या ज्या संकल्पना आहेत त्यात या देवता काही वैशिष्ट्ये वगळता साम्य नाही. वैदिक सरस्वती ही तर नदीचेच रुपक आहे तर वाक ही वेदमंत्रांचे रुपक आहे. पुढे मात्र वाग्देवता सरस्स्वतीमध्ये विलीन झाल्याचे आपल्याला दिसते कारण ते सरस्वतीचेच एक पर्यायवाची नांव बनले. पण मुळात या दोन्ही देवता बुद्धी व ज्ञानाच्या देवता नव्हत्या तर ती या देवतांशी केली गेलेली फार नंतरची जोडणी आहे. ही जोडणी वैदिकांनी स्वत: विकसित केली की समणांपासून उसणी घेतली याबाबत विचार केला गेला पाहिजे.

सरस्वती नदीला अवेस्त्यात "हरहवैती" असे म्हटले गेले आहे. ही नदी दक्षीण अफगाणिस्तानात असून सध्या ती हेल्मंड या नावाने ओळखली जाते. प्राकृतात हीच नदी सरस्सई या नावाने ओळखली जात असून हे मुळचे भारतीय रुपच बरोबर आहे. संस्कृत भाषा नंतर विकसीत केली गेल्यानंतर सरस्सईचे संस्कृत रुपांतर सरस्वती असे केले गेले. जैनांनी आपल्या साहित्यात मुळचे हेच प्राकृत रुप कायम ठेवले असले तरी जैनांना अफगाणिस्तानातील हरह्वैती नदी अभिप्रेत असल्याचे कोठेही आढळून येत नाही. किंबहूना जैनांचे मुळची मूख्य सूय (श्रूत) देवता आणि सरस्वतीबाबत वेदवाड्मयात जे उल्लेख आहेत, जी संबोधने आहेत ती पाहता श्रूत देवतेशी वैदिक सरस्वतीचा काहा संबंध असल्याचे दिसून येत नाही. वाग्देवता ही ब्राह्मणकाळातील सरस्वतीहून वेगळी आणि वाणीची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रतिष्ठित झाली. तिचे मात्र श्रूत देवतेशी काही प्रमाणात साम्य आहे. ध्वनी, स्वर आणि भाषेला तसे प्रत्येक संस्कृतीत प्राचीन काळापासून महत्व आहे. वेदमंत्रात काही अद्भूत शक्ती आहेत या श्रद्धेने वैदिकांनी वैदिक मंत्रांस ’वाक’ या देवतेचे अधिष्ठान आहे असे म्हटले. पण ही उसणवारी वैदिकांनी जिनांपासून केली असणे सहज संभाव्य आहे. याचे कारण म्हणजे भारतात वैदिक धर्म आला तोवर समण संस्कृती प्रतिष्ठापित झाली होती आणि त्या आधी किमान वीस तीर्थंकर होऊनही गेले होते. त्यांनी केलेल्या उपदेशांना, जिनवाणीला "सूयदेवता" असे म्हटले गेले. त्यामुळे वाग्देवता ही जैनांच्या श्रुत देवतेवरुन वैदिकांनी आपल्या पद्धतीने विकसीत केली असल्याची अधिक शक्यता आहे. आणि त्यासाठी अनेक भौतीक पुरावेही सुदैवाने उपलब्ध आहेत. त्याचा आपण पुढे विचार करू.

पण असे असले तरी जैनांनी ही देवता वैदिकांपासून स्विकारली असा एक मतप्रवाह आहे. त्याचे विश्लेशन करणे येथे महत्वाचे आहे. जैन धर्मात सरस्वती मुळात ’सरस्सई’ या नावाने प्रसिद्ध होती. पण त्याही आधी वाणी, बुद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणून तिला जैन श्रूतदेवता (सूयदेवता) म्हणून ओळखत होते. जिनांच्या पवित्र वाणीची देवता म्हणून हे नाव दिले गेले. जैनांनी तिचा विकास शासन देवता, म्हणजे शिक्षणाची देवता असा केला. तिचा कोणा नदीशी अथवा मंत्रांशी काही संबंध नव्हता. श्रुतदेवता ही जैनांची सर्वात प्राचीन देवता आहे यात विद्वानांना शंका नाही. वैदिक सरस्वतीशी साधर्म्य कल्पिल्यामुळे ही देवता जैनांनी वैदिकांकडूनच स्विकारली असा भ्रम निर्माण केला गेला आहे. पण येथपर्यंत तरी किमान वैदिक सरस्वती आणि सरस्स्सई  किंवा सूयदेवता यात कसलेही साधर्म्य आपल्याला दिसत नाही. ब्राह्मणकाळात वैदिक ’वाक’ देवता वाग्देवता म्हणून उन्नत झाली असली तरी तीही केवळ वाणीची देवता म्हणून पसिद्ध होती. ब्राह्मण काळ हा सनपुर्व नववे ते सहावे शतक मानला जातो. या काळात वैदिक धर्म भारतात आला होता व वैदिकांची मुळची सरस्वती नदी मागे सुटली होती. केवळ तिच्या स्मृती उरलेल्या होत्या. किंबहुना ब्राह्मणकाळातील वैदिक दैवतशास्त्रही बदलले. ऋग्वेदाचे दहावे मंडल ही खूप उशीराची आणि वैदिक धर्मप्रहारक भारतात आल्यानंतरची रचना आहे असे म्यक्समुल्लर यांनीही नोंदवून ठेवलेले आहे. ऋग्वेदातील वाक ही देवताही या उशीराच्याच मंडलांमधील आहे. ही देवता वैदिकांनी भारतीय धर्मधारेतून घेतली होती काय हा खरा प्रश्न येथे निर्माण होतो. आपल्याला त्याचेच उत्तर शोधायचे आहे.

याचे कारण म्हणजे इसवे सन चवथ्या शतकानंतर वैदिक/हिंदू पुराणांनी सरस्वती देवतेला वेगळेच स्वरूप दिले. वाक ही स्वतंत्र वैदिक देवत असूनही सरस्वतीलाच ’वाग्देवता/वाग्देवी’ असे पर्यायवाची नाव दिले. म्हणजेच वैदिक सरस्वती व वाग्देवतेचे एकीकरण करत पुराणांनी या नव्या देवतेला काय वेगळेच स्वरूप दिले हे आपण थोडक्यात पाहुयात.

पौराणिक सरस्वती

हिंदू/वैदिक पुराणांना अंतिम स्वरूप येऊ लागले ते इसवी सनाच्या तिस-या शतकानंतर, गुप्तकाळात. शिवाय पुराणांमध्ये कालौघात अनेक प्रक्षेप केले गेले. त्यामुळे पौराणिक माहिती अनेकदा गोंधळयूक्त बनल्याचे आपल्याला दिसते. असे असले तरी पौराणिक सरस्वतीचे स्वरूप आपण समजाऊन घेऊयात. याच काळात वेदातील सरस्वती व वाग्देवता यांचे एकत्रीकरण झाले आणि सरस्वतीचेच पर्यायवाची नाव म्हणून वाग्देवी स्वरुपात ते उढे आले. सरस्वतीची वागीश्वरी, वाणी, शारदा, भारती, वेदमाता, शतरुपा व वीणापाणी अशीही नावे या काळात पुढे आली. सरस्वती आता फक्त वाणीची देवता न राहता ज्ञान, बुद्धी, कला व संगीताचीही अधिष्ठात्री देवी बनली.

पुराणांनुसार सरस्वतीचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला. ती ब्रह्म्याची कन्या असुनही ब्रह्मदेव तिच्यावर आसक्त झाला त्यामुळे ब्रह्मदेव अपूज्य बनला अशीही कथा येते. पौराणिक काळात सरस्वतीचा प्रजापतीशी असलेला संबंध संपुष्टात आला आणि ब्रह्मदेवाशी जोडला गेला. पुराणांनुसार सरस्वती ही शुभ्र वर्णाची, विश्वातील आद्य शक्ती, जगताला व्यापून उरलेली, वीणा व पुस्तक धारण केलेली, अभयदात्री, अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करणारी अशी आहे. स्कंदपुराणात शैव प्रभावात ती जटामुकुटधारी, त्याअर चंद्रकोर, गळा निळा आणि त्रिनेत्र अशी वर्णीली गेली. थोडक्यात शिवाचेच प्रतीरुप म्हणून ती पाहिली गेली. कधी ती चतुर्भूजही असते. तिच्या हातातील पुस्तक हे वेदांचे प्रतीक मानले जाते. (भारतिय संस्कृतिकोश, खंड ९, पृ. ६७२-६७३, संपादक-पं. महादेवशास्त्री जोशी)

थोडक्यात वैदिक सरस्वती पुराणकाळात आपल्याला सर्वस्वी बदललेली दिसते. तिच्या हातातील पुस्तक म्हणजे वेद ही तर किमान दहाव्या शतकानंतरची कल्पना आहे आरण तोवर मुळात वेद हे लिखित स्वरुपात नव्हतेच. जैनांचे ग्रंथलेखन हे पुरातन असल्याने श्रूत देवतेच्या हातात ग्रंथ देणे स्वाभाविक होते. सरस्वतीच्या हाती पुस्तक देणे ही कल्पना जैनांकडून घेतली असावी हा तर्कही यामुळे प्रबळ होतो. 

नंतरच्या काळात अवतार संकल्पना प्रबळ झाल्यानंतर सावित्री आणी गायत्री हे तिचे अवतार मानले गेले. थोडक्यात वैदिक सरस्वतीचा विकास हा कशा रितीने झाला हे आपण पाहिले. आता जैनांची सरस्वतीची संकल्पना पाहुयात.

जैन सरस्वती

जैनांची श्रुतदेवी (सुयदेवी) म्हणजे सरस्वती (सरस्सई). श्रुतदेवी म्हणजे जिनवाणीची अधिष्ठात्री देवता. सरस्सई म्हणजे सरस+ सई= सरस्सई. सरस या शब्दाचा अर्थ प्राकृत कोशानुसार सरोवर व कमळ असा असुन सई म्हणजे स्मृती, स्मरण, चिंतन व काल असा दिलेला आहे. तर दोन्ही शब्द एकत्र येतात तेंहा सरस्सईचा अर्थ (जिनवचनांच्या) स्मृतींचा सागर, वाणी, भारती, भाषा, वाणीची अधिष्ठात्री देवी असा झालेला दिसतो.

तीर्थंकरांनी जे उपदेश केले ते जैन धर्मशास्त्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करून आहेत. त्यांनी जे उपदेश केले त्यांची वाणी दैवी असल्याने तिला श्रुत हे नामाभिमान देवून दैवत प्रतिष्ठा दिली. या उपदेशातुनच अज्ञानाच्या घोर अंध:कारात सापडलेल्यांचे अज्ञान दूर होत, मत्सरभाव, दु:ख आणि वेदनांचा अंत होत त्यांचे शिक्षण होणार असल्याने श्रुतदेवील शिक्षणाची व वाणीची देवता असेही म्हटले जाते. दिगंबर परंपरेनुसार महावीरांच्या वचनांना जेंव्हा "षट्खंडागम" रुपात लिखित स्वरुपात आले व त्यावरील धवला टीका पुर्ण झाली ते कार्य पुर्ण झाले तो दिवस ज्येष्ठ शुक्ल पंचमीचा असल्याने ही पंचमी  श्रुत पंचमी हा दिवस प्रतिवर्षी एक उत्सव म्हणून साजरा करायला सुरुवात झाली.  हा दिवस प्राकृत भाषा दिवस म्हणुनही मानला जातो.

जैन धर्माच्या इतिहासात जवळपास काही हजार वर्ष तीर्थंकरांची वाणी ही स्मरणात ठेवून ती गणधरांच्या द्वारे पसरवण्यात येत असे. त्यामुळे स्मृतीलाही महत्व होते. त्या स्मृतीवर साधु व उपाध्यायांनीही चिंतन करणे अभिप्रेत होते. श्रुतदेवतेत या सा-या अंगांचा विचार करुनच या देवतेची कल्पना जैन साधकांच्या मनात जन्माला आली. तिचाही पुढे विकास होत गेला. तीर्थंकरांचे ध्यान करतांना या देवतेचेही सोबतीनेच ध्यान करण्याचीही परंपरा होती हे आपल्याला ज्ञात धर्मसुत्रावरुन दिसते. एवढेच नव्हे तर प्राचीन जैन धर्मग्रंथ हेच तिचे अवयव व अलंकार आहेत अशीही संकल्पना विकसीत झाली. किंबहुना जैनांच्या पाचीन धर्मसाहित्यास "सुयनान" (श्रुतज्ञान) असे म्हटले जाते. व्याख्या प्रज्ञप्ती (इसवी सनाचे दुसरे शतक) आणि पऊमचरिय या महाकाव्यामध्येही हे स्पष्ट करण्यात आले आहे. जैन धर्मात ही सर्वाधिक लोकप्रिय व प्राचीन देवी आहे. या देवीचा उत्सव श्वेतांबरांत ज्ञान पंचमी म्हणून तर दिगंबरांत श्रुत पंचमी म्हणून साजर्ता केला जातो. जैन मंदिरांत या देवतेचे स्थान अनिवार्य असते. सध्या वैदिकांच्या प्रभावाखालील असलेल्या हिंदू मंदिरांतही सरस्वतीची मुर्ती अथवा प्रतिमा अगदी अभावानेच असते हा फरकही येथे लक्षात घ्यावा लागतो. किंबहुना तीर्थंकर आंणि केवलींची ज्ञानवाणी हाच जैन धर्माचा मुलाधार असल्याने तिलाच दैवतप्रतिष्ठा दिली गेली आहे असे आपल्या लक्षात येईल.

जैन पुराणकथा या संदर्भात मननीय आहे. एका पुराणकथेनुसार जंबुद्वीपाच्या एका टोकाला हिमवान (हिमालय) पर्वत असून या पर्वतावर सात मोठी सरोवरे आहेत. या सरोवरांतून वेगवान नद्या वाहत असून त्या विशाल भुभागाचे सिंचन करत समुद्राला जाऊन मिळतात. या सरोवरांमध्ये कमळे उमललेली असून प्रत्येक कमळ हे एका देवीचे निवासस्थान आहे. या सा-या देवता एकत्रीतपणे शासन (सासण) देवता म्हणून जैन पुराणांत मान्य आहेत. सासणचे संस्कृत रुप म्हणजे शिक्षण. या सासणदेवींची २४ नावे दिलेली आहेत आणि ती चोवीस तीर्थंकरांचीच प्रतीक आहेत असे मानले जाते. किंबहुना प्रत्येक तीर्थंकरासोबत त्यांची स्वतंत्र शासनदेवता आहे. दिगंबर व श्वेतांबर पंथांत ही नावे काही बदलांनी आलेली आहेत. सासणदेवींपैकी १६ देवी या विद्यादेवता मानल्या जातात. श्रुतदेवीचे पर्यायी नाम सरस्सई कसे बनले याचे उत्तर या पुराणकथेत आहे. सरस म्हणजे सरोवर आणि सई म्हणजे स्मृती किंवा स्मरण असा अर्थ असल्याने सरोवरातील कमलवासिनी शासन देवतांची प्रमुख या अर्थाने सरस्सई हा शब्द येतो हे आपल्या लक्षात येईल.

उदाहणार्थ, श्वेतांबरांनुसार तीर्थंकरांच्या सासणदेवतांचा क्रम आहे- चक्रेश्वरी, अजिता, दुरितारी, काली, महाकाली ई. तर दिगंबरांनुसार तो क्रम आहे- चक्रेश्वरी रोहिणी, प्रज्ञापती, वज्रशृंखला ई. म्हणजेच जरी शासनदेवता चोवीसच असल्या तरी त्यांच्या काही नावांत बदल झालेला दिसतो. असे का झाले असावे याबाबत आपण नंतर विचार करणारच आहोत.

जैन प्रतिमाशास्त्रात श्रुतदेवी (म्हणजेच सरस्वती) सासण(शिक्षण) अथवा विद्यादेवतांची प्रमूख मानली जाते. श्रुतदेवी म्हणजेच सरस्वती असे अभिधानचिंतामणीमध्ये आचार्य हेमचंद्रांनीही स्पष्ट केले आहे. जैन धर्मात विद्यादेवींचा उदय पाचव्या शतकानंतर झाला असे लुडविकसारख्या पाश्चात्य अभ्यासिका मानतात. (Sarasvatī: Riverine Goddess of Knowledge: From the Manuscript-carrying "Vīṇā" ...By Catherine Ludvik) पण या विद्यादेवी म्हणजे ज्ञानदेवता नसून त्या अद्भुत शक्ती असलेल्या जैन धर्मप्रचार व तीर्थंकरांबाबतची श्रद्धा वाढवण्यासाठी पाचव्या शतकानंतर या देवता निर्माण केल्या गेल्या असेही लुडविग म्हणतात, त्यात मात्र तथ्य नाही. असे असले तरी तीर्थंकर आणि केवलींच्या उपदेशांची अधिष्ठात्री देवता म्हणून श्रुतदेवता (सरस्वती) मात्र जैन धर्मात फार प्राचीन काळीच प्रतिष्ठित झाली होती याबाबत विद्वानांत वाद नाही.

जैन धर्मशास्त्रानुसार देवतांच्या निवासाचे तीन विभाग केले गेलेले आहेत. सरस्वती व लक्ष्मी या उर्ध्वलोकात राहतात, शासनदेवता अथवा विद्यादेवता मध्यलोक (तिर्यगलोक) तर यक्ष-यक्षीणी हे अधोलोकात किंवा पाताळलोकात राहतात अशी जैन पुराणांतील संकल्पना आहे. श्रुत देवतेला सरस्वती (सरस्सई) हे नाव कसे मिळाले असू शकेल हे आपण जैन पुराणकथेच्या माध्यमातून पाहिले आहे. वैदिकांची वाग्देवतेची संकल्पना आणि जैनांची श्रुतदेवतेची संकल्पना तर वेगळीच आहे पण सरस्वती व सरस्सई याही संकल्पना सर्वस्वी वेगळ्या असल्याचे दिसून येईल. त्यामुळे सरस्वती देवता जैनांनी वैदिकांच्या प्रभावात स्विकारली हे प्रचलित मत मान्य करता येत नाही. उलट्य़ वैदिकांच्घी वाग्देवी आणि बुद्धीदेवता म्हणून सरस्वती जैनांच्या प्रभावात विकसीत झाल्या असे मानावे लागते कारण जैन धर्माचा (समणांचा) इतिहास हा वैदिक काळाच्या खूप मागे जातो.

भाषेच्या संस्कृतकरणाच्या काळात सरस्सईचे सरस्वती असे ध्वनीबदल हो रुपांतर झाले आणि नामसाधर्म्यामुळे वैदिक सरस्वती आणि जैन सरस्वती एकच समजण्यात आले असावे असे आपल्याला दिसते. जैनांच्या सरस्वतीचा नदीशी दुरान्वयानेही संबंध नाही. वैदिक सरस्वती पौराणिक काळात जे बदल स्विकारत विकसीत झाली तो प्रवास आपण वर पाहिला आहे आणि आज पुजल्या जाना-या वैदिक सरस्वतीवर जैन सरस्वतीचा ठळक प्रभाव पडलेला आहे हे स्पष्ट दिसते. त्यासाठी जैन सरस्वतीचे पुरातन शिल्पशास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. येथे लक्षात घेण्याची बाब अशी की सरस्वतीची सर्वात प्राचीन शिल्पे जी मिलतात ती जैन सरस्वतीची. वैदिक सरस्वतीच्या प्रतिमा आपल्याला चवथ्या शतकानंतर, म्हणजे गुप्त काळापासून मिळू लागतात. वैदिक सरस्वती वीणाधार्णी बनली ती मध्ययुगात हेही येथे लक्षात घ्यावे लागते.

जैन सरस्वती-शिल्पे

आंध्र प्रदेशातील घंटशाला येथे यक्षप्रतिमेसहित मिळालेली सरस्वतीची मूर्ती सनपूर्व दुस-या शतकातील आहे. घंटशाला हे प्राचीन बंदर असून एथे अनेक पुरातत्वीय अवशेष मिळाले आहेत. सम्राट खारवेलाच्या काळातीलच ही मूर्ती असून कलिंग राज्य आंध्र प्रदेशालाच लागून असल्याने आंध्रातही जैनांचे त्या काळात मोठे प्राबल्य होते. सुरुवातीला या सरस्वतीमूर्ती सोबत असलेल्या यक्षाला काळभैरव समजले गेले होते. ही मुर्ती त्यामुळे वैदिक किंवा हिंदू सरस्वतीची असावी असा अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी बांधला होता. पण हिंदू वा वैदिक प्रतिमाशास्त्रात सरस्वती देवतेसोबत अन्य पुरुषदेवतेचे अस्तित्व नसते. शिवाय वैदिक धर्मात आधी मुर्तीपुजेची संकल्पनाही नव्हती. वैदिक देवता या नेहमीच अमूर्त स्वरुपात अर्चिल्या जात, त्यामुळेही वैदिक सरस्वतीही मूर्ती असणे शक्य नाही. हिंदुंनी सरस्वती देवीला कधी स्विकारलेच नाही. गणेश हाच त्यांचा बुद्धीची देवता होता. त्यामुळे ही मुर्ती हिंदुंनी बनवली असल्याची शक्यता नाही.

      उलट सासण देवीसोबत त्यांचे यक्ष असल्याची कल्पना मात्र जैन धर्मात आहे. इतकेच काय तीर्थंकरांसोबतही संरक्षक यक्षांचे पतिमांकन केले जाते. शिवाय ही मुर्ती सिंधुकालीन प्रतिमाशैलीत बनवली गेली आहे हेही पुरातत्वविदांना मान्य आहे. (Jainism: art, architecture, literature & philosophy by Haripriya Rangarajan, G. Kamalakar, A. K. V. S. Reddy, K. Venkatachalam, Sharada Pub. House, 01-Jan-2001, पृ.२०) त्यामुळे आजवर भारतात सापड्लेली सरस्वतीची प्रतिमा ही जैनांचीच असल्याचे सिद्ध होते.

यानंतर मथुरा येथे सापडलेल्या सरस्वती प्रतिमेकडे आपण वळू. ही जैन सरस्वतीची मुर्ती असण्याबाबत कसलीही शंका नाही कारण या मुर्तीच्या पादपीठावर ही मुर्ती दान देणा-याचा सात ओळीचा लेखच कोरलेला आहे. या लेखावरून तत्कालीन जैन व्यवस्थेवरही बराच प्रकाश पडतो. ही मुती सन १३२ मधील (कुशाणकाळातील) आहे. मूर्ती आता लखनौ येथील वस्तुसंग्रहालयात ठेवलेली असून ती मथुरा येथील कंकाली टीला येथे झालेल्या उत्खननात मिळाली. येथे तीर्थंकर आणि जैनांशी संबंधीत अनेक प्रतिमा आणि शिलालेख मिळालेले असून तत्कालीन जैनप्राबल्याची जाणीव या लेखांवरून होते. संस्कृतिकोशकारांनी या काळाला ’जैनकाळ असे म्हटले आहे. (भारतीय संस्कृतिकोश, हंड ९, पृ. ६७३)

ही मुर्ती खंडित झाली असली तरी तिच्या बाजुला दोन सेवक दाखवलेले आहेत. घंटशाला येथील मुर्तीसोबतही एक यक्ष सेवक दाखवला असणेही त्यामुळेच सहजशक्य आहे. या शिलालेखातील प्राकृत मजकूराचा सारांशाने अनुवाद असा- "सिद्धी असो. (कुशाण सत्तेच्या) ५४व्या वर्षी, हिवाळ्यातील चवथ्या महिन्यातील शुक्ल दशमी रोजी वरील सरस्वतीची मुर्ती मी सिहपूत्र गोव (गोप) लोहार,  आर्यदेव या कोट्टीयगणाच्या उपदेशकाच्या (वाचक) सांगण्यावरून या नृत्यगृहाला अर्पण करत आहे."

या लेखात कोट्टीय गण, स्थानिय कुल आणि वैर (वज्र?) शाखेचा उल्लेख आलेला आहे. तत्कालीन जैन धर्मीयांची विशिष्ट धर्म आणि समाजरचनेवर यातून प्रकाश पडतो असे मानले जाते. तेर्थंकरांच्या गणधरांपासून विशिष्ट गण बनत त्यातील कुटुंबांची कुळे व कुळांच्याही शाखा असल्याचा संकेत या शिलालेखातील मजकुरामुळे मिळतो. स्थानिय कूल आणि नंतरच्या स्थानकवासींमध्ये काही आंतरिक संबंध असल्याची शक्यता यातून बळावते. शिवाय एक लोहार जसा जैनधर्मीय होता तसेच अनेक सुवर्णकार जैनांचे शिलालेखही या टिल्यात मिळून आले आहेत. हा आर्यदेव तकालीन लोहार व्यावसायिकांचा मुख्य उपदेशक होता असे काही अन्य शिलालेखांतील मजकुरावरुनही लक्षात येते. सामान्य जनांतही कुशाणकाळी जैन धर्म मोठ्या प्रमानावर प्रचलित असल्याचे यावरून दिसते. "(Early Inscriptions Of Mathura A Study by Bajpayee, Kalyani Das  पृ. १४३-१५३) "अंगविज्जा" हा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथही याच काळात लिहिला गेला होता. त्या ग्रंथावरुनही तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश पडतो.

कुशाणकाळातच जैन सरस्वती ही नृत्य संगीताचीही देवी मानली जाऊ लागली होती हे नृत्यगृहालाच सरस्वतीची मूर्ती अर्पण केली गेली असल्याने सिद्ध होते. संगीत-नृत्याला जैन समाजातही सामाजिक प्रतिष्ठा होती हे येथे उल्लेखनीय आहे. वैदिक सरस्वती फार उशीरा संगीताची देवी बनली असली तरी ती नृत्याची अधिष्ठात्री देवता मात्र कधीच नव्हती.

पण आठव्या-नवव्या शतकापर्यंत जैन सरस्वती संकल्पनेवर वैदिक सरस्वतीच्या काही वैशिष्ट्यांचा आणि पुराकथांचा प्रभाव पडू लागल्याचेही आपल्याला दिसते. वाई येथील वीतरागाच्या खंडित प्रतिमेवरील प्राकृत शिलालेखावरून ही बाब प्रकर्षाने लक्षात येते. या शिलालेखात सरस्वतीला चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या मुख-सरोवरातील हंसी असे म्हट्ले आहे. हा शिलालेख कोणा भीमदेव या जैनभक्ताने राष्ट्रकुट काळात सन १०६७ मध्ये वीतरागाचे मंदिर बांधले त्याबद्दल कोरवलेला आहे. महाकवी पूष्पदंताच्या काव्याचा प्रभाव सरस्वतीचे वर्णन करतांना आला आहे असे डा. वि. भि. कोलते यांचे प्रतिपादन आहे. (महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, डा. वि. भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. १९८७, पृ. १२-१३) जैन सरस्वतीचा ब्रह्मदेवाशी कसलाही संबंध नसता तो या लेखात का जोडला गेला आहे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. गुप्तकाळानंतर वैदिक धर्माची पीछेहाट होऊ लागल्यानंतर वैदिकांनी हिरीरीने निबंधकाळात वैदिक धर्म आणि मिथककथांचे स्तोम माजवले. त्याचा परिणाम हिंदुंवर जसा झाला तसाच जैनांवरही झाला. वैदिक मिथककथांचा शिरकाव जैन व हिंदू धर्मविचारांमध्ये होत गेला. किंबहुना जैन सरस्सई  यात तादात्म्य साधण्याचा प्रयत्न यातून झाला. प्रस्तुत पुस्तकात यावर सविस्तर विवेचन येणारच असल्यामुळे येथे एवढे पुरेसे आहे. एवढेच नव्हे तर याच काळात जैनांत तंत्रांचाही शिरकाव झाला असावा असे दिसते. बाप्पाभट्टी सुरी, हेमचंद्र, मल्लीसेन, नरचंद्र सुरी यांसारख्या विद्वानांनी सरस्वतीच्या कृपेने अद्भूत प्रतिभा प्राप्त केली असे मध्ययुगेन जैन साहित्यात आले आहे. श्रुत अथवा सरस्वती देवतेला प्रसन्न करुन घेणे हा एक सरस्वती स्तवनाचा उद्देश्य बनला होता हे मात्र खरे.

पण वरील विवेचन पाहता, ठिकठिकाणी स्पष्ट केल्याप्रमाणे जैनांची श्रुतदेवी (सुयदेवी) व त्यांचीच सरस्वती (सरस्सई) ही देवता वैदिक प्रभावाखाली विकसित झाली या प्रचलित मताला अर्थ नाही हे उघड आहे. जैनांची दैवत संकल्पना सर्ववी वेगळी आहे. वैदिक काळातील वैदिकांची सरस्वती आणि पौराणिक काळातील त्यांची सरस्वती यातही मेळ नाही. किंबहुना त्यांच्या दैवत संकल्पनेत सातत्यही राहिलेले दिसत नाही. त्यांची वाग्देवताही वेगळेच वेदमंत्रांचे प्रतीक म्हणून येते आणि नंतर ती स्वतंत्र देवताही राहिली नाही तर ती सरस्वतीमध्ये विलीन करण्यात आली. वैदिक सरस्वतीची इतर पर्यायीनामे कालौघात चिकटवण्यात आली असेही आपल्याला दिसते.

हे असे का झाले हा प्रश्न चिंतनीय आहे. जैनांच्व्ह्या दैवत संकल्पनेत किमान दहाव्या शतकापर्यंत सातत्य दिसते. सरस्वती अथवा श्रुत देवता ही मुख्य तर सासण देवता (शिक्षण/विद्या) या तिच्या आधिपत्याखाली ही संकल्पना कसलाही बदल न होता सलगपणे तिचे अस्तित्व दिसते. २४ तीर्थंकरांच्या प्रत्येकी एक अशा चोविस संलग्न सासण देवता यातही कोठे बदल दिसत नाही. सरस्वतीदेवी उर्ध्व लोकांत राहते तर सासणदेवता तिर्यग म्हणजे मध्यलोकात राहतात ही संकल्पना सरस्वती अथवा श्रुतदेवतेचे सार्वभौम स्वरुप दाखवते.

वैदिकांच्या सरस्वती संकल्पनेत कालौघात वेगाने बदल होत गेले कारण त्यांनी आपल्या दैवत संकल्पनांत उधा-या करीत त्या संकल्पना एकाच देवतेला चिकटवण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेव आपलीच कन्या असलेल्या सरस्वती देवतेवर आसक्त झाला आणि तिच्या मागे लागला ही पुराणकथा एक ऐतिहासिक सत्य सांगते. किंबहुना हे दैवत-अपहरणाचे मिथक आहे. अशा पुराणकथा जैन साहित्यात मिळून येत नाहीत कारण त्या बनवण्याची त्यांना आवश्यकताही नव्हती. जैन श्रुतदेवी किंवा सरस्वती हे जिनांच्या वाणीचेच केलेले दैवतीकरण होते कारण ती वाणीच त्यांच्या धर्माचा मुलाधार होती. ते कवळ सामान्य ज्ञान नव्हते तर प्रत्येक मनुष्याला केवली, सिद्ध, अर्हत पदाकडे वाटचाल करायला लावण्यासाठीचे ज्ञान होते.

जैन सरस्वतीच्या मुर्ती खुपच प्राचीन काळात बनवल्या जाऊ लागल्या असाव्यात. अंग व पुर्व ग्रंथ लिपीबद्ध झाल्यानंतर श्रुतदेवीला वेगळेच अधिष्ठान मिळून हे ग्रंथ हेच तिचे अवयव व अलंकार मानले जाऊ लागले. तिवर केवळ स्मरणाने जिनवाणीचा प्रसार होत असल्याने श्रुतदेवतेला अमुर्त स्वरुपात तिचे आधी अस्तित्व असले पाहिजे.

आंध्र प्रदेशातील सनपुर्व दुस-या शतकातील जैन सरस्वतीची मूर्ती सिंधुकालीन प्रतिमाशास्त्राशी सरळ संबंध दाखवते. सिंधुकाळाइतका हा धर्म जुना आहे याचा हासुद्धा एक पुरावा आहे.

4 comments:

  1. आदरणीय संजयजी सोनवणी,
    जयजिनेन्द्र,
    आपली भेट वालचंदनगर येथे जैन इतिहास परिषद अधिवेशन निमित्ते झाली होती त्याची आठवण.
    आपला सरस्वती बद्द्लचा लेख अभ्यासपूर्ण व महत्वपूर्ण असा आहे.
    मी एक जैन स्तोत्राचे मराठी काव्यात भाषांतर केलेला ग्रंथ प्रकाशित करत आहे. डॉ. शरयु शहा मुंबई यानी केलेले आहे. साधारण दीसेम्बर मधे होईल.
    आपला लेख यात छापाव असा मानस आहे. आपली कनसेंट हवी.
    मीलेखिका सुरेखा शहा यांचा भाऊ आहे. आपला मो. No. कळवा. वार्ता करता येईल.
    जय जिनेंद्र.
    आपला स्नेहांकित,
    चंद्रमोहन शहा

    ReplyDelete
    Replies
    1. लेख खूप मोठा आहे खूप जण वाचत नाहीत

      Delete
  2. जैन धर्म मे माता सरस्वती का कोई जगह न था, बाद में मिथ्या साधु द्वारा लाया गया था। सरस्वती ज्ञान की देवी है, जो ज्ञान प्रधान करते है, पर वास्तव में तीर्थंकर खुद ही केवलज्ञानी है, उनसे बड़ा ज्ञानी कोई नही, वे खुद एक प्रकार से सरस्वती है।
    जो देवी जैन धर्म मे मन्यता मिला जिसे सरस्वती है वो अवधिज्ञानी देवी है, उनके पूजा से कोई ज्ञान नही मिलता, यह सब मिथ्या मत है। तीर्थंकर से बड़े कोई सरस्वती नही। उनके ज्ञान सामने सरस्वती का ज्ञान कुछ नही।

    हा, सरस्वती की मन्यता वैदिक धर्म मे है, जहां वे शाश्वत देवी और खुद ज्ञानी है, भगवान नारायण, विष्णु जैसे

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...