Friday, July 9, 2021

काळ ही भावनिक बाब ?

 मी जगातील सर्वात आळशी प्राणी आहे. मी स्वप्नात एक कादंबरी वाचली होती. नववीत असतांना. त्या कादंबरीचे मुखपृष्ठ ते आतील मजकुर मला आजही तोंडपाठ आहे. "व्यंकू शिबू" हे शिर्षक. मी ही कादंबरी इंग्रजीत (मराठीवर रागावल्याने) २००२ साली लिहायला सुरुवात केली होती. अर्धीमुर्धी झाली. ती सुटली ती सुटलीच. सुटलेली पुस्तके ही पुर्ण झालेल्या पुस्तकांपेक्षा जास्त आहेत आणि तेवढी तरी जपून ठेवण्याची शिस्त मला माहित नाही. त्यामुळे काय सुटले ते सुटले. पुर्ण झालेच तर झाले. नाही झाले तरी काय अडलेय? (कोणाचेही?) मी लिहितो हा माझाच मला शोध आहे, मला पडलेल्या, बालसुलभही असतील, प्रश्नांचा शोध आहे. कदाचित सर्वांचाच शोध आहे. मला कधी कधी वाटतेही कि मी एवढा आळशी जन्मायला नको होते. पण काय करणार?

काही माझे मित्र विचारतात...तुम्हाला २४ तासच असतात ना? हो. तेवढेच. तांत्रिकपणे. पण कधी कधी माझा एक तास हजार तासांबरोबरचा तर हजारो तास कधी निघून गेले तरी मी होतो तेथेच. काळ ही भावनिक बाब आहे...गणिती नाही. हा वेळेचा गुंता मला कधी समजला नाही. प्रश्नांची एक अविरत मालिका मात्र आहे. उत्तरे शोधायची आसही आहे. उत्तरे उथळ असतील, अपुरी असतील....पण ती शोधायचा प्रयत्न अविरत आहेच. विश्वात परिपुर्ण...खुद्द विश्वही जर नाही तर कोणीच कसा परिपुर्ण असेल?
हा शोध आपल्या सर्वांचा आणि आपल्या सर्वांचा आहे. तो घेत राहणे यातच आपली अपरिपुर्णता समजावून घेण्याचा मार्ग आहे. शोधमार्गावरील वाट हरवलेला प्रवासी जीवाच्या ज्या आकांताने वाट शोधतो तसेही असेल किंवा वाटच असू शकत नाही हे जाणून हतबुद्ध होऊन बसणाराही असेल....
माहित नाही.
आणि माहित नाही हेच खरे कदाचित उत्तरही असेल!

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...