Sunday, July 11, 2021

“रा. स्व. संघाच्या असत्यवादी जनुकांचे काय करायचे?"

 

 


सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका भाषणात केलेल्या काही विधानांमुळे देशभर खळबळ उडाली. संघ आपली कट्टर प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहे कि उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून ही वक्तव्ये केली गेली याबद्दल देशभर तर्क लढवले जात आहेत. काय होते त्यांची विधाने? पहिले विधान हे की ते म्हणाले, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. दुसरे विधान त्यांनी केले कि मॉब लिन्चींग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. तिसरे विधान हे की मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. ही तीन विधाने तशी पाहिली तर एकूण मानवतेबद्दल कळवळा असलेल्या एखाद्या सहृदय माणसाचे उद्गार असल्याचा आभास निर्माण होईल. पण भागवतांच्या संघाची पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष कर्तुत्व पाहिले तर त्यांच्या प्रामाणिकपणाची शंका येणे स्वाभाविक आह. बाबरी मशिदीचे पतन, त्यातून उसळलेले दंगे आणि जीवित-मालमत्तेची झालेली अपरिमित हानी, गुजराथमधील नरसंहार, धारा ३७० हटवल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशभरात झालेले हल्ले आणि भाजप सरकार आल्यानंतर मॉब लिन्चींगच्या देशभरात घडलेल्या क्रूर घटना आठवल्यानंतर आणि भाजप सरकारने एकुणातील इतिहासाचेच पुनर्लेखन करण्याचे भगवे वैदिक प्रकल्प सुरु केला असल्याच्या पार्श्वभूमीवर भागवतसाहेबांना संघ कर्तुत्वाचा पश्चाताप झाल्याने ही विधाने आली आहेत असे म्हणण्याजोगी स्थिती नाही.

सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे हे एक भावनिक विधान त्यांनी केले. एक राष्ट्र-एक धर्म हे ध्येय ठेवणा-या समरसतावादी असणा-या संघाने आता “एक राष्ट्र-एक डीएनए” अशी नवी घोषणा बनवली तरी आश्चर्य वाटणार नाही. विज्ञान आणि संघ यांच्यात छत्तीसचा आकडा आहे हे सर्व तसेही जाणतात. वैदिक धर्माची श्रेष्ठता हिंदुत्वाची झुप पांघरून ठसवण्याच्या नादात सिंधू संस्कृती वैदिकांनी निर्माण केली, सरस्वती नदी भारतातीलच, रामायण-महाभारत आणि वेदरचनेचा काल जास्तीत जास्त मागे नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न यापासून ते सारे काही आमच्या पुरातन ऋषींनी शोधलेलेच होते पण ते इंग्रजांनी चोरून नेले आणि आपल्या नावावर खपवले हे असे आणि इतर अनेक अनैतिहासिक, अवैद्न्यानिक दावे आपण सर्वांनी वाचलेले असतीलच. आता सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे हेही विधान अशास्त्रीय तर आहेच पण वैदिक धर्मीयही मुळचे येथलेच हा संघाचा जुना दावा नव्या शब्दात वेगळ्या परिस्थितीत पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न आहे असा दाट संशय येण्यासारखी स्थिती आहे. आणि ही स्थिती संघ आणि संघप्रणीत भाजपा सरकारने निर्माण करून ठेवली आहे. त्यासाठी थोडा “संघीय” डीएनएचाही इतिहास पाहिला पाहिजे.

भारतीय संस्कृतीचा पाया वैदिक धर्मियांनी घातला हा गेली अनेक दशके प्रचारात असलेल्या संघीय विद्वानांच्या दाव्याचा पायाच जनुकीय (डीएनए) विज्ञानाने उखडून फेकला, हे भारतीयांची जनुके एकच आहेत हे आता सांगणा-या श्री. भागवतांना माहित नसेल असे नाही. भारतीय संस्कृतीचे जनकत्व वैदिकांकडे घ्यायचे तर सिंधू संस्कृतीवरच मालकी सांगणे आवश्यक होतेत्यासाठी त्यांनी आधी घग्गर नदी  सरस्वतीच असल्याचे सिद्ध करण्याचा घाट घातलाएवढेच करुन ते थांबले नाहीत तर सिंधू संस्कृतीचे नामकरण "सिंधू-सरस्वती संस्कृतीअसे करुन टाकलेभारतात संघ-प्रवर्तीत मोदी सरकार आल्यानंतर तर पुरातत्व खात्याच्या अहवालातही सिद्ध न झालेल्या सरस्वती नदीच्या नांवे सिंधू संस्कृतीचे वर्गीकरण अधिकृत रित्या केले गेलेशासकीय पातळीवर सरस्वतीला (म्हणजेच घग्गर नदीलापुन्हा प्रवाहित करण्यासाठी खर्चीक योजना अतिउत्साहात आखल्या गेल्यापण ऋग्वैदिक व अवेस्त्याच्या पुराव्यानुसारच वैदिक सरस्वती नदी दक्षीण अफगांणिस्तानमधलीच प्राचीन हरहवैती आहे हे सिद्ध झालेले आहे याकडे वैदिकवादी विद्वानांनी दुर्लक्ष केले कारण आर्य भारतातीलच व तेच येथील संस्कृतीचे निर्माते आहेत हे छद्मविज्ञान वापरुन का होईना पण ठसवून त्यांना सांस्कृतीक व राजकीय वर्चस्वतावाद टिकवायचा होता.

 

राखीगढी येथे डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदेंच्या नेतृत्वाखाली हरियानातील राखीगढी येथे उत्खनन सुरु झाले आणि सिंधू संस्कृतीच्या वैदिकीकरणाचा दुसरा अवैज्ञानिक अध्याय सुरु झाला. राखीगढी येथे साडेचार हजार वर्ष जुने मानवी सांगाडे आढळून आले. त्यांच्या अस्थींमधून जनुके मिळवुन हे लोक कोण होतेकसे दिसत होतेत्यांची आनुवांशिकी काय होती हे शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. पुरातत्व खात्याने आपले निष्कर्ष नि:पक्षपातीपणे द्यायचे असतात. त्यात कोणतीही स्वप्रिय राजकीय अथवा सांस्कृतीक पुर्वग्रहांना स्थान द्यायचे नसते. पण संघवादी डॉ. वसंत शिंदेंच्या ते लक्षात आले नसावे. त्यांनी या सांगाड्यांत मिळालेल्या जनुकांतून मोठी राजकीय हलचल होणार आहे हे जनुकांचे आणि तेथे सापलेल्या साधनांचे संपुर्ण विश्लेशन हाती येण्याआधीच घोषित करुन टाकले होते.

 

सुरुवातीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या काही सांगाड्यांतील जनुके मानवी संसर्गाने दुषित झाली असल्याने दुस-या सांगाड्यांमधून अधिक शास्त्रीय पद्धतीने जनुके घेण्यात येतील आणि ती तपासण्यासाठी पाठवण्यात येतील असे या टीमने नंतर जाहीर केले. किंबहुना जनुकीय संशोधनाचे निष्कर्ष जाहीर करायला वेळ का लागतो आहे हे स्पष्ट करण्यासाठी हे कारण दिले गेले. पण हार्वर्डच्या संशोधकांचा आरोप आहे की हे नमुने दुषित नव्हते तर त्यातून हाती येणारे निष्कर्ष डॉ. वसंत शिंदेंच्या व त्यांच्या सहका-यांच्या पुर्व-ग्रहदुषित मतांशी जुळत नव्हतेम्हणून ते निष्कर्ष जाहीर करण्याचे टाळले गेले.

 

पण नंतर राखीगढीलाच सापडलेल्या एका मानवी सांगाड्याचा कवटीतुन कानाच्या आतल्या भागातील हाडातुन संशोधकांना पुरेशा प्रमाणात जनुके मिळाली. ही जनुके तपासली गेलेल्या डीएनए प्रयोगशाळेचे प्रमुख निरज राय यांनी हे निष्कर्ष जाहीर केले.

 

पहिला आणि संघवाद्यांच्या पचनी न पडनारा निष्कर्ष असा की वैदिक संस्कृतीचा सिंधू संस्कृतीशी कसलाही संबंध नाही. उलट ही जनुके अन्य मानवी संस्कृत्यांतील जनुकप्रवाहांपेक्षा अत्यंत स्वतंत्र आणि प्रभावी आहेत. मध्य आशियातील कोणताही जनुक-प्रवाह सिंधू संस्कृतीत झिरपला असल्याचेही दिसत नाही. म्हणजेच "आर १ ए १" ही जनुकेज्याला स्थुलमानाने आर्यन जनुके म्हटली जातात त्यांचा सिंधू संस्कृतीत पुर्णतया अभाव आहे. याचाच दुसरा अर्थ असा की सिंधू संस्कृती संपुर्णतया एतद्देशियांचीच निर्मिती आहे.

 

ज्याला आर्यन जीन म्हटले जाते त्याचा उदय मध्य आशियातील पोंटियाक स्टेपे प्रांतात चार हजार वर्षांपुर्वी झाला असे मानले जाते. हे पशुपालकघोडे पाळनारे निमभटके लोक होते. यातीलच एका गटाने दक्षीण अफगाणिस्तानात आल्यानंतर तेथील सरस्वती (अवेस्तन नांव हरहवैती) वैदिक धर्माची स्थापना केली. ऋग्वेदरचनेचा काळ कसल्याही स्थितीत सनपुर्व १५००च्या पलीकडे जात नाही. भारतात या जनुकांचा प्रादुर्भाव इसपू १२०० नंतरच्या काळात आढळून येतो व तोही विशेष करुन उत्तर भारतीयांत. वैदिक धर्माची वाढही याच भागात आधी झालेली दिसते.

 

उदा. उत्तर भारतातील उच्च वैदिक वर्णीयांत ही तथाकथित आर्य जनुके आजही सरासरी १७.५% एवढ्या प्रमाणात आजही अवशिष्ट आहेत. वैदिक धर्म व वैदिक संस्कृतीचा प्रचंड अभिमान बाळगणा-यांत अर्थात याच आनुवांशिकीचा वर्ग मोठा आहे.

 

इंग्लंडमधील हडर्सफिल्ड विद्यापीठातील पीएच.डी करणा-या विद्यार्थिनी मारिया सिल्वा व त्यांच्या सहयोगी विद्यार्थ्यांनी केलेल्या (बीएमसी इव्होल्युशनरी बायोलॉजीमार्च २०१७) केलेल्या संशोधनानुसार आजवर अभ्यासल्या गेलेल्या  जनुकीय संकेतांनुसार भारतात झालेले  तिसरे मोठे स्थलांतर इराणमधून साडेचार हजार वर्षांपूर्वी झाले, असे दिसते. हे लोक पुरुषप्रधान संस्कृतीचे होते. पुरुष संक्रामक वाय क्रोमोझोनच्या प्राबल्यानुसार हे लोक इंडो-युरोपीयन म्हणजेच संस्कृत भाषेचेही वाहक होते. या मूळच्या लोकांपैकी काहींचे स्थलांतर युरोपमधेही झाले. तेथे संस्कृतच्या समकक्ष ग्रीक व लॅटिन भाषांचा उदय झाला. कॅस्पियन व काळ्या समुद्राच्या मधल्या भागात या लोकांचा उदय झाला व ते पुरा-संस्कृत भाषा बोलत होते. हेच लोक इराणमध्ये आले व त्यातील काही भारतात स्थलांतरित झाले. भारतातील मातृक जनुके प्राचीन असून, पैतृक जनुकांमधे मात्र सरासरी साडेचार हजार वर्षांपूर्वी झालेले नवे बदल टिपता येतात. या कांस्ययुगातील जनुकीय बदलाचे फरक तीव्र असल्याने त्यामुळे इंडो-आर्यन लोकांच्या भारतातील स्थलांतराचा तर्क खरा ठरतो, असे एकंदरीत या अहवालाचे म्हणणे आहे. याआधी २०१५ मध्ये नेचर मासिकातही मॉर्टेम अॅलनटॉफ्ट प्रभुतींनी युरोप व मध्य आशियातील १०१ सांगाड्यांतून मिळालेल्या जनुकांचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष प्रसिद्ध झाले. त्याच वर्षी सायंस मासिकात डेव्हीड राइश व आयोसिफ लाझार्डिस यांनी प्रकाशित केलेल्या अहवालात याम्नाया संस्कृतीचे चार सांगाडे मिळवून जवळपास असेच निष्कर्ष काढले होते. प्रिया नुरजानींनी तत्पुर्वी २०१३ मध्ये दक्षीण भारतीय आणि उत्तर भारतीय जनुकीय आनुवांशिकी स्वतंत्रपणे वेगळी आहे असा निष्कर्ष काढला होता.

थोडक्यात आजवरच्या जनुकीय संशोधनानुसार ‘भारतीय’ म्हणता येईल असा एकच एक डीएनए अस्तित्वात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतियांचीही आनुवान्शिकता एक नाही. वैदिक धर्मियांची जनुके येथे बाहेरून आली हे जनुकीय शास्त्र ठामपणे सांगते आहे. अशा स्थितीत श्री. मोहन भागवतांचे विधान हे केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित आहे, त्याला शास्त्राचा कसलाही आधार नाही हे सिद्ध होते. उत्तर प्रदेशातील निवडनुका असली भाबडी आणि अशास्त्रीय विधाने करून जिंकता येतील हा त्यांचा भ्रम असू शकतो. भारतीय म्हणून मानसिक भावनिक एकता साधायची असेल तर संघीयांना आधी वर्चस्वतावादी आणि विद्वेषाची मानसिकता सोडावी लागेल. आपल्यात लपलेल्या “असत्यवादी” जनुकांचे काय करायचे हे त्यांनाच गंभीरपणे चिंतन करून ठरवावे लागेल. अबुद्धिशाली “बौद्धीकांचा” उपयोग होणार नाही हे ध्यानी घावे लागेल.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...