Sunday, August 14, 2022

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भविष्याची आव्हाने!

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण पदार्पण केले आहे. भारतीय संस्कृती ही जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी महत्वाची अशी एक संस्कृती मानली जाते. भारतीय उपखंडाचा पुरातत्वीय इतिहासक किमान दोनेक लाख वर्ष इतका जुना जातो. या प्रदीर्घ काळात या भूमीने असंख्य परिवर्तनांना तोंड दिले आणि पचवले देखील. येथे गणराज्यरूपाने जशी आदिम लोकशाही अवतरली तशीच वंशपरंपरागत पण नीतीने बांधील अशी राजेशाहीही अवतरली. स्वतंत्रतावादी ते राज-नियंत्रित अर्थव्यवस्थेची प्राचीन प्रारुपेही या देशात अवतरली. समता, बंधुता, सहिष्णुता ही महनीय मुल्ये भारतातील प्राचीन समण संस्कृतीने रुजवलेली होतीच. भारतीय राजांनी मध्य आशिया, इराणचा काही भाग तर आपल्या अंमलाखाली आणलाच पण जावा, सुमात्रा, सिंगापूर इत्यादी दक्षिणपूर्व आशियातील भूभाग काबीज केले आणि शेकडो वर्ष आपल्या सत्ता जशा राबवल्या तशाच भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचाही प्रसार केला. भारताने भारताबाहेर जसे पाउल ठेवले तसेच मध्य आशिया, पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोपादि भागातूनही भारतात लोक आले. ग्रीक, शक, हुण, कुशाण, अरब, मंगोल, ब्रिटीश आदि शक्तींनी भारतात आपली राज्येही स्थापन केली. ब्रिटीशांनी तर समस्त भारत आपल्या सत्ताछत्राखाली आणला. राष्ट्र ही संकल्पना भारतात आधुनिक काळात अवतरली असली तरी भारत हे शिव-शक्तीप्रधान असल्याने ते सांस्कृतिक राष्ट्र म्हणून नेहमीच अस्तित्वात होते. जैन आणि बौद्ध संस्कृतीनेही या सांस्कृतिक ऐक्याला मोठा हातभार लावला. देशभर विखुरलेली जोतीर्लींगे आणि शक्तिपीठे या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे आधारबिंदू झाले. ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकवटू शकला तोच मुळात सांस्कृतिक ऐक्य जनमानसात आधीच ठसलेले असल्यामुळे. त्यामुळे पूर्वी देश अनेक राजसत्तांमध्ये वाटला गेला असला तरी आधुनिक राष्ट्रवादाच्या व्याख्येत भारतीयांनी आपले सांस्कृतिक राष्ट्रवादाची व्याख्या मिसळून टाकली. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून देश परकीय दास्यातून स्वातंत्र्य मिळवून उदयाला आला त्याला आता ७५ वर्ष होत आहेत. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

भारत आज ७५ वर्ष होत असतांना आधुनिक परिप्रेक्षात कोणत्या स्थानावर पोहोचला आहे हे आपण पाहतोच आहोत. अनेक क्षेत्रांत भारतीयांनी नेत्रदीपक कामगिरी करून जागतिक पटलावर आपला ठसा सोडला आहे. एक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. किंबहुना हे सर्व भारतीयांचे स्वप्नही आहे. पुढील पंचवीस वर्षांनी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू. तेंव्हा आमचा देश कोणत्या स्थितीला पोचलेला असावा व त्यासाठी नेमके काय करावे लागेल याचाही विचार या प्रसंगी करणे आवश्यक आहे कारण आपण एका महत्वाच्या टप्प्यावर पोचलो असतांना भविष्यातील आव्हाने पेलत आपल्याला राष्ट्राची स्वप्ने साकार करायची आहेत. आजच्या सामाजिक, आर्थिक आणि ज्ञानात्मक क्षेत्रातील राहून गेलेल्या तृटी कशा दूर करायच्या हेही आपल्यासमोरचे आव्हान आहे. एक विकासात्मक राष्ट्रीय मानसिकता निर्माण करायची असली तर आम्हाला यावर चिंतन करणे आवश्यकच आहे.

यात मला महत्वाचा वाटतो तो शिक्षणाचा मुद्दा. कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. 

विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा ती पुरेपूर आत्मसात करून समाजोपयोगी बनण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  

 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. मुळात आपली आजची शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. नैसर्गिक कलआणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संधी आम्ही नाकारलेल्या आहेत. सर्वच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत.

 

आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. ते येथेच असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच! त्यामुळे शिक्षण हा मुद्दा आपल्यासमोर एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून उभा असायला हवा कि ज्यायोगे पुढील २५ वर्षात आम्ही ज्ञानक्षेत्रात आणि म्हणूनच अर्थक्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवू शकू.

 

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्या संकल्पनेची. या मागोमाग क्वांटम कम्प्युटर हे संकल्पनाही विकसित होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यातील भरारी घेऊ शकणा-या व जगण्याच्या पद्धतीच बदलू शकणा-या या क्षेत्रात भारतीय केवळ बौद्धिक श्रमिक म्हणून राबणार कि स्वप्रतीभेने या क्षेत्रात नवे अभिनव संशोधन करत जागतिक पातळीवरील बौद्धिक व आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करणार हे पुन्हा शिक्षणावरच अवलंबून आहे.  

      भविष्यातील शेतीचे स्वरूपही आमुलाग्र बदलणार आहे. आम्ही जुन्याच पद्धतीने शेती करत राहणार आहोत कि शेतक-यांनाच कॉर्पोरेट बनू देत अत्याधुनिक शेती करू देत त्यांचे जीवनमान सुधारणार आहोत हाही एक प्रश्न आपल्यासमोर आहे. भटके-विमुक्त तर आजही आपण या देशाचे नागरिक तरी आहोत कि नाही या प्रश्नाशी झगडत आहेत. त्यांनाही मुख्य धारेत आणत विकासाचे कृतीशील घटक बनवावे लागणार आहे.

      राष्ट्रीय मानसिकता विकासाभिमुख बनवायची असेल तर तसेच व्यक्तीगत कलाधारित मुक्त शिक्षण उपलब्ध केले गेले आणि कोणतीही विचारधारा त्यांच्यावर लादली नाही तर राष्ट्राची निकोप प्रगती होणे सहजसाध्य आहे. महासत्ता बनण्याचा राजमार्ग म्हणजे प्रगल्भ नागरिकांची संख्या आधी वाढवणे. परीघावरच्या प्रश्नांना महत्व देत आम्ही त्याच्याशी झगडण्यात वेळ वाया घालवला तर मात्र स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षातही आम्ही राष्ट्राभिमानाचा वृथाभिमान बाळगत त्याच त्या समस्यांशी झुंझत राहू.

      स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!

 

-संजय सोनवणी

 (Published in Daily Punyanagari)

 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...