Friday, October 27, 2023

राष्ट्रप्रेम कि धर्मप्रेम?


"राजपूत संस्कृति : विधायक समालोचना" हे हरिहर वामन देशपांडे यांचे १९३६ सालचे पुस्तक. यात देशपांडे यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची एक हकीगत नोंदवलेली आहे.
धर्मसंस्थांनी राज्यसत्तांना जवळपास निष्प्रभ करुन टाकले होते. मंदिरांकडे धनसंपत्तीचे अवाढव्य साठे असतांनाही ते विपदेच्या काळातही राज्यसंस्थांना मदत करत नसत. यशवंतराव होळकरांनी इंग्रजी सत्ता हटवण्यासाठी एकहाती जंग पुकारलेली होती. इंग्रजांचा धुव्वा उडत होता. मुकंदरा, भरतपूर येथे तर इंग्रजांचा एवढा सनसनीत पराभव झाला कि त्याचे पडसाद युरोपमद्ध्येही पडले. इंग्रजांना येथील गवर्नर जनरल हटवावा लागला व भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. ब्रिटिश सत्ता अपराजित नाही हा संदेश पसरणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते. अन्यथा सर्वच वसाहती यशवंतरावांपासून प्रेरणा घेत बंड करून उठल्या असत्या आणि हे इंग्रजांना परवडणारे नव्हते.
आणि यशवंतरावांना ही सततची युद्धे करण्यासाठी पैशांचीही गरज असायची. इंग्रजांशी लढा देतांना त्यांच्यावर आधीच तीन कोटी रुपयांचे कर्ज झालेले होते. एवढ्या विनवण्या करूनही भारतातील एकही संस्थानिक त्यांच्या राष्ट्रस्वातंत्र्याच्या कामात सहभागी होत नव्हता. आता तर नवे कर्जही मिळणे बंद झालेले होते.
कोणाकडूनही काम भागेना तेंव्हा त्यांनी तत्कालीन धनाढ्य असलेल्या नाथद्वारा देवस्थानाकडे राष्ट्रकार्यासाठी आर्थिक मदत मागितली. ती "देवाला दिलेले दान परत मागता येत नाही" या सबबीवर देण्याचे टाळले गेले.
राष्ट्रकार्य मोठे कि धर्मकार्य? यशवंतरावांनी धर्माची पर्वा न करता राष्ट्रकार्यावर नजर ठेऊन नाथद्वा-यावर खंडणी बसवली व किमान दोनदा तीन-तीन लाख वसूल केले आणि पुढची युद्धे लढले. त्यासाठी राजपुतान्यातील लोक यशवंतरावांस आजही दोष देतात, पण देशपांडे म्हणतात, "परंतू त्याचा (यशवंतरावांचा) डाव यशस्वी झाला असता व इंग्रजी सत्तेचे उच्चाटन होऊन पुन्हा देशी सत्तेची स्थापना झाली असती तर मठा-मंदिरांची जेवढी संपत्ती त्याने लुटली त्याच्या दुप्पट त्यांना बहाल केली असती व त्याबद्दल आजच्या त्याला शिव्याशापांची लाखोली वाहणा-या इतिहासकारांनीच त्याचे "स्वातंत्र्यप्रेमाचे कृत्य", " सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे कार्य" म्हणून गोडवे गायले असते यात शंका नाही."
“राष्ट्रावर आपत्ति आली असता मठा-मंदिरातील संपत्ती काय चाटायची आहे काय? यशवंतरावांनी निर्वाणीच्या प्रसंगी जो निर्णय घेतला तो अत्यंत योग्य होता.” असे पुढे लेखक म्हणतो.
स्वातंत्र्यापुढे देव-धर्म क्षुल्लक आहेत हे कळनारा इतिहासातील एकमेव महानायक यशवंतराव! त्यांना जेंव्हा फुरसतीचे क्षण मिळाले त्यांनी जेजुरी व पंढरपूरला खंडोबा व विठोबाच्या मंदिरांसाठी व यात्रेकरुंसाठी अलोट कार्ये केली हाही इतिहास आहे.
आज भारताचा आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज स्मृतीदिन. विनम्र अभिवादन!
वरील पुस्तक मला इतिहासकार संजय क्षीरसागर यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचेही आभार.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...