वैदिक धर्मीय भारतात
आल्यानंतर त्यांनी आपल्याही मूळच्या प्राचीन पर्शियन (अवेस्तन) भाषेत स्थानिक
प्राकृत भाषांचे संस्कार करत वेदांची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली व तिच्या
नियमनासाठी व्याकरणेही लिहिली. वेदाभ्यासात एक वेदांग म्हणून व्याकरणाचाही समावेश
केला गेला. कारण व्याकरणाशिवाय वेद समजणे शक्य होत नव्हते. कुरु-पांचालात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी त्या
प्रदेशाला “आर्यावर्त” हे नाव दिले कारण वैदिक धर्माचेच मुळचे नाव “आर्य धर्म”
होते. जे आर्य किंवा वैदिक धर्मीय नव्हते ते त्यांच्या दृष्टीने अनार्य (शुद्र,
म्लेंच्छ व असुर) होते. आर्यावर्त वगळता त्यांना आधी भारतीय उपखंडाचा भूगोलही
माहित नव्हता हे वेदोत्तर साहित्यातून दिसते. इसवी सनपूर्व तिस-या शतकापर्यंत मगध
आणि विन्ध्य पर्वताच्या दक्षिण भागाकडे पाहण्याचा वैदिक आर्यांचा दृष्टीकोन दुषित
होता. नंद सम्राटांनी तर आर्यावर्तावरच हल्ला चढवून कुरु-पांचाल राज्यसत्तेचा अस्त
केल्यामुळे त्यांनी नंदांना शुद्र तर ठरवलेच पण नंदांनंतर वैदिक धर्मातील क्षत्रीय
वर्णाचा नायनाट झाल्याची घोषणा केली. सम्राट चंद्रगुप्ताकडूनही त्यांना राजाश्रय मिळू शकला नाही, म्हणून चंद्रगुप्त हा
वैदिक धर्मियांच्या दृष्टीने शूद्रच राहिला. चंद्रगुप्त मौर्य जैन धर्मीय होता तर
अशोक आधी जैन धर्मीय असला तरी नंतर बौद्ध धर्मीय बनला. मौर्य सम्राट संप्रतिनेही
जैन धर्माचा मार्ग चोखाळला. एतद्देशीय मूर्तीपुजकांचा शिव-शक्ती प्रधान तंत्रधर्मही
देशभर प्रबळ होता. त्यामुळे वैदिकांना राजाश्रय मिळणे अवघड होत असले तरी धर्मप्रचाराचे
कार्य त्यांनी चिकाटीने सुरु ठेवले.
शिवप्रधान तंत्रधर्म
लोकांत प्रबल होता. समन संस्कृतीने ध्यान, तप, आत्मा, मोक्ष, कर्मफळ सिद्धांत
प्राचीन काळापासून विकसित केलेले होते. तंत्रधर्मात (ज्यांना आपण आज हिंदू म्हणतो)
तत्वज्ञानाच्या विविध दिशा शोधल्या जात होत्या. पुनर्जन्म ही संकल्पना भारतात
लोकप्रिय केली ती तंत्र धर्माने. वैदिक धर्माला या लोकधर्मांपासून उधारी करावी तर
लागलीच पण ती “उधारी” आहे हे त्यांनी कधीच मान्य केले नाही असे जागतिक कीर्तीचे
संशोधक जोहान्स वोंकहोर्स्त म्हणतात ते योग्यच आहे. उधार संकल्पनांवर वैदिक लेपण
करून त्यांनी आपली साहित्यसंपदा तर घडवलीच पण त्यांची मालकीही घ्यायचा प्रयत्न
केला. पुढे मौर्य राजा बृहद्रथाचा खून करून पुष्यमित्र श्रुंग हा राजा सत्तेत आला.
हा वैदिक धर्मीय नव्हता पण बौद्ध राजाची हत्या करून सत्तेत आल्यामुळे त्याला वैदिकांचा
पाठींबा मिळाला. श्रुंगांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे वैदिकांनी
त्याला “ब्राह्मण” घोषित केले. पुष्यमित्राने दोन अश्वमेध यज्ञही केले व त्याची
नोंद अयोध्या येथे सापडलेल्या इसवी सनाच्या पहिल्या शतकातील धनदेवाच्या शिलालेखात
आहे. विशेष म्हणजे ही माहिती प्राकृतात आहे, संस्कृतात नाही याचे कारण म्हणजे
संस्कृत भाषा त्यावेळी विकासावस्थेत होती. असे असूनही संस्कृत ही अतीप्राचीन आणि
देवभाषा आहे असा प्रचार सातत्याने केला गेला. संस्कृत भाषेतील पहिला शिलालेख
अवतरतो तो सन १६५ मध्ये व तो शक राजा रुद्रदामन याचा आहे. इतकेच काय, विमल सुरी
लिखित “पउमचरिय” हे रामावरील आद्य रामकाव्य असतानाही तिस-या शतकानंतर गुप्तकाळात झालेल्या
वाल्मिकीला आदिकवीचे स्थान दिले गेले. प्राकृतांवर संस्कार करूनच संस्कृत भाषा
बनली हे भाषाशास्त्रीय सत्य असतानाही, व आज असंख्य विद्वान ते मान्य करत असतानाही
वैदिकांनी प्राकृत भाषांना संस्कृतोद्भव आणि दुय्यम, गावठी ठरवले. दुस-या
शतकापूर्वी लिहिल्या गेलेल्या असंख्य प्राकृत ग्रंथांचे संस्कृत या नवोदित भाषेत
वैदिक तत्वे मिसळत अनुवाद केले आणि त्यांचेही कर्तुत्व स्वत:कडे घेतले. उपनिषदे ही
तंत्र, समण संस्कृतीची मुळची रचना अर्धविकसित संस्कृतात आणून त्यातील तत्वज्ञानही
स्वत:चे ठरवले. पण यात लबाडी अशी होती कि उपनिषदांतील तत्वज्ञान वेदांतील तत्वद्न्यानाच्या
अगदी विरोधी जाते त्यामुळे ती वैदिक रचना नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही
दाखवुन दिले असले तरी आजतागायत सर्वसामान्य हिंदू, जैन व बौद्ध भ्रमात राहिलेले
आहेत. आणि हे अनुवाद झाले ते इसवी सनाचे तिसरे शतक ते सहावे शतक या दरम्यान.
पुराणे, रामायण, महाभारत इ. सारख्या संस्कृत ग्रंथांचा आणि शिलालेखांचा देशभर
उद्रेक झाला आणि प्राकृत ही राजभाषा म्हणून मागे पडली.
आणि याला कारण झाले
ते गुप्त सम्राटांनी वैदिक धर्माला दिलेला राजाश्रय. एवढा मोठा राजाश्रय वैदिक
धर्माला कधीच मिळालेला नव्हता. यज्ञाचे व क्षत्रीयत्वाचे वाढवलेले अवडंबर आणि
ब्राह्मण वर्णाची अपरंपार महत्ता त्यांना राजाश्रय मिळवण्यास कारणीभूत झाली. यातही
वावगे काही समजण्याचे कारण नाही, पण गुप्त काळात असंख्य धार्मिक व सांस्कृतिक घडामोडी
घडल्या. वैदिक धर्मियांनी प्रशासनात वरच्या जागा मिळवल्या. गुप्तांकडून
अग्रहारांच्या रुपात मोठ्या जमिनी तर मिळवल्याच पण दानरूपानेही संपत्ती मिळवायला
सुरुवात केली. वैदिक धर्मीय वरिष्ठ प्रशासन व मंत्रीमंडळातही असल्याने वैदिक
धर्माचा सामाजिक दबदबा वाढवणे त्यांना सहज शक्य झाले. बौद्ध व जैन धर्माची पीछेहाट
तर करता आलीच पण हिंदुंच्या मस्तकी वैदिक धर्मतत्वांचे माहात्म्य वाढवता आले.
भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या व्यापारी व उत्पादक श्रेण्यांचा
अध:पात सुरु झाला. श्रेण्यांना असणारे नाणी पाडायचे अधिकार काढून घेण्यात आले.
शासनच उत्पादन व व्यापारात पडू लागले आणि त्याला कारण झाले तिस-या शतकात लिहिले
गेलेले कौटिल्याचे अर्थशास्त्र. वेश्यालये, वस्त्रोत्पादन, खाणी, सोन्या-चांदीचे
व्यापार इ. बहुतेक उद्योग सरकारी व्यवस्थापनाखाली गेले. यामुळे हिंदूंची आर्थिक
स्थिती ढासळायला सुरुवात झाली. तंत्रधर्मी हिंदूंनी या वैदिक सांस्कृतिक व आर्थिक
आक्रमणाचा प्रतिकार करायला कंबर कसावी लागली. या काळात सामाजिक समानतेचे तंत्रशास्त्र
विषद करणारे हजारोंच्या संखेने ग्रंथ लिहिले गेले. वैदिक धर्म विरुद्ध हिंदू, जैन
व बौद्ध असे त्याचे स्वरूप बनून गेले. त्यातून बौद्ध धर्म भारतातून हद्दपार तर
झालाच पण जैन धर्मीयांची संख्या रोडावली. हिंदूंना एकच पर्याय राहिला व तो म्हणजे
वैदिक वर्चस्व स्वीकारणे अथवा समाजबहिष्कृत होणे. गुप्तकाळात वैदिक धर्मियांना
माहात्म्य वाढवण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या दृष्टीने गुप्तकाळ हा स्वर्णकाळ
वाटत असल्यास नवल नाही.
वैदिक धर्मात
एतद्देशीय अनेक लोक गेल्याने वैदिक धर्मातही अनेक बदल झाले. अवतार संकल्पना आणून
राम-कृष्णासारख्या एतद्देशीय महान व्यक्तीमत्वांना विष्णूचे अवतार घोषित करून
त्यांना देवत्व दिले. अगदी बुद्धालाही विष्णूचा अवतार घोषित केले गेले
असले तरी येथे मात्र ती क्लुप्ती चालली नाही व बुद्ध अवतारीकरणातून सुटला. भारतात
सांस्कृतिक संघर्षाचे बीजारोपण वैदिक धर्मियांनी केले. त्यादृष्टीने वैदिक आर्यांचे
स्थलांतर हे भारतावर कोसळलेले एक सांस्कृतिक अरिष्टच होते असे म्हणावे लागते.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment