Thursday, May 23, 2024

अलेक्झांडर भारतात!

 


पहिल्या दारियसने उभारलेल्या पर्शियन साम्राज्याचा अस्त तिस-या दारियस च्या काळात, म्हणजे इसपू ३३० मध्ये झाला. जवळपास दोनशे वर्ष टिकलेले हे साम्राज्य अलेक्झांडरने पादाक्रांत केले. तिस-या दारियसचा खून झाल्यानंतर त्याचा क्षत्रप बेस्ससने स्वत:ला सम्राट घोषित केले पण त्याचाही पराभव केला गेला. पुढे भारतातून परत येताना अलेक्झांडरने तिस-या दारियसच्या कन्येशी, स्टेटीराशी, सूसा येथे विवाहही केला. जिंकलेल्या पर्शियन प्रांतात (इजिप्त धरून) त्याने स्वत:च्या नावावर अलेक्झांड्रिया नावाची नगरेही स्थापन केली. सारे पर्शियन साम्राज्य काबीज करायचे असल्याने त्याचे लक्ष अकेमेनिड साम्राज्याचा भाग असलेल्या सिंध व पंजाब प्रांताकडे वळणे स्वाभाविक होते.

अलेक्झांडरचे अफगाणिस्तानात इसपू ३३० मध्ये आगमन झाले. दारियसच्या बल्ख, अरिया, अराकोशिया या आजच्या अफगाणिस्तानातील प्रांतांच्या छत्रपांच्या नेतृत्वाखाली तेथील लढाऊ टोळ्यांनी दग्दभू धोरण वापरून त्याच्या सैन्याला प्रचंड त्रस्त केले. त्याच्या सैन्यातही बंडाळीची समस्या उद्भवली. अलेक्झांडरच्या हत्येचा प्रयत्नही येथेच झाला. हा प्रयत्न करणा-या फिलोटस या बंडनेत्याला ठार मारण्यात आले. पण स्थिती हाताबाहेर जायला येथेच सुरुवात झाली. हेलमंड नदीच्या खो-यातील टोळ्यांनीही त्याला प्रचंड त्रस्त केले. त्यामुळे अलेक्झांडर अफगाणिस्तानच्या बिकट प्रदेश आणि लढाऊ लोकांबाबत म्हणतो कि, “ ...हा प्रदेश आत शिरायला सोपा पण त्यातून बाहेर पडणे अवघड...”

तक्षशिला आणि पंजाब प्रांतावर तेथे दारियसचा अंत होईपर्यंत अकेमेनिड साम्राज्याची सत्ता होती. स्थानिक राजे मांडलिक असले आणि त्यांना मर्यादित स्वातंत्र्य असले तरी अकेमेनिड सत्तेचे संचालन क्षत्रपांमार्फत केले जाई. सम्राटातर्फे करातील हिस्सा गोळा करणे, साम्राज्याला आवश्यकता असेल तेव्हा स्थानिक सैन्याची तरतूद करणे हे त्यांचे महत्वाचे काम असे. अकेमेनिड साम्राज्याचे सारे क्षत्रप हे सम्राटाचे नातेसंबंधी असत. पंजाब आणि सिंध प्रांतावर पर्शियन क्षत्रपांची नियुक्ती केली गेलेली होती. सम्राटाचा पराभव झाल्याचे वृत्त येताच स्थानिक सत्ता आणि हे क्षत्रप यांच्यात प्रचंड गोंधळ उडणे आणि अराजकाची स्थिती येणे स्वाभाविक होते.

अफगाणिस्तानमध्ये जम बसवल्यानंतर अलेक्झांडर गांधार प्रांताकडे वळाला. खैबर खिंडमार्गाने त्याची सेना सिंधमध्ये उतरली. तक्षशिलेचा तत्कालीन राजा होता अंभी. पर्शियन साम्राज्य जाऊन आता मेसेडोनियन साम्राज्य येणार याची जाणीव झालेल्या अंभीने अलेक्झांडरचे स्वागत केले. त्याला बहुमोल नजराणे अर्पण केले. अंभीचे हे कृत्य देशद्रोहाचे मानले जात असले तरी त्याला काहीही आधार नाही. दोनशे वर्ष अकेमेनिड साम्राज्याचे मांडलिक म्हणून घालवलेल्या तक्षशिलेसारख्या छोट्या राज्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. एक तर पंजाब-सिंध प्रांतात अनेक टोळीराज्ये होती. त्यांच्यात आपापसात ऐक्यही नव्हते. पर्शियन साम्राज्य नष्ट करणा-या अलेक्झांडरसमोर कोणी एखादा टिकेल याचीही शक्यता नव्हती.

पोरस हा हिंदू राजा असून त्याने अलेक्झांडरला अयशस्वी का होईना तोंड दिले याबद्दल आपल्याला गैरसमजातून आलेला अभिमान असतो. पण पोरस अथवा पुरू या राजाचा उल्लेख एकाही भारतीय साधनात आलेला नाही. येतो तो फक्त ग्रीक साधनांत. पर्शियन सम्राट पारशी धर्माचे अनुयायी होते. झरथुस्त्राच्या परिवारातील अथवा त्याच्या आश्रयदात्यांची नावे वापरली जाणे हे अन्य धर्मांप्रमाणे पारशी धर्मातही घडत होते. उदा. विश्ताश्प हे पहिल्या दारियसच्या पित्याचे नाव झरथुस्त्राला राजाश्रय देणा-या बल्खच्या राजाचे नाव होते. झरथुस्त्राच्या पित्याचे नाव पुरुशास्प्प असे होते. पंजाबमधील पोरस म्हणून उल्लेखला गेलेला पुरुशास्पचा ग्रीक अपभ्रंश आहे. त्याचा पुरू नावाच्या दाशराज्ञ युद्धात परभुत झालेल्या टोळीच्या एखाद्या वंशजाचा संबंध जुळवण्यात अर्थ नाही कारण ही टोळी भारतात कधीकाळी स्थायिक झाल्याचे उदाहरण नाही. पोरस हे ग्रीक नाव पुरुशास्प शब्दाचा अपभ्रंश असण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे हे उघड आहे. म्हणजेच पोरस हा अकेमेनिड साम्राज्यातर्फे पंजाब प्रांतात सत्ता चालवणा-या छत्रपाचे नाव होते हे उघड आहे. तो अकेमेनिड सम्राटांचा नातेवाईक असल्याने त्याने अलेक्झांडरशी झुंज दिली हे विधान सत्याच्या जवळ जाणारे असू शकते.

भारतात घुसताना अलेक्झांडरला पोरस सोडला तर अन्य टोळी राज्यांनी फारसा विरोध केल्याचे दिसत नाही. मल्ल, सुद्द, अभीर वगैरे टोळीराज्यांनी त्याला प्रतिकार केला असला तरी तो टिकलेला दिसत नाही. त्या काळात ग्रीकांचे भूगोलाचे ज्ञान मर्यादित होते. भारत जेथे संपतो तेथेच जगाचा अंत होतो अशी अलेक्झांडरची समजूत होती. अलेक्झांडर या काळात पश्चिमोत्तर भारतातील समाजस्थितीशीही परिचित झाला. त्याच्या इतिहासकारांनी केलेल्या वर्णनानुसार त्या भागात अनेक तटबंदीयुक्त शहरे होती. कलानससारखे विवस्त्र आणि त्यागी विचारवंत जैन मुनीही त्या भागात होते. कलानसला तर तो परत जाताना सोबतच घेऊन गेला होता. त्याची ग्रीक इतिहासकारांनी दिलेली कथा पुढे पाहू..

भारतीय तलम वस्त्रावर पत्रलेखन करत असत असेही ग्रीक इतिहासकरांनी लिहून ठेवलेले आहे. म्हणजे लेखनकला ही तेव्हाही सुस्थापित होती. लेखनकला भारतीय शिकले ते अकेमेनिड साम्राज्याकडून हे खरे नाही कारण सिंधू संस्कृतीच्या काळापासून त्या भागात तरी लेखनकला प्रतिष्ठापित होती हे ऐतिहासिक वास्तव आहे. दुसरी बाब अशी कि त्या काळात संस्कृत भाषा अस्तित्वात होती असा एकही निर्देश ग्रीक इतिहासात मिळत नाही. प्रत्येक टोळीराज्यात गांधारी प्राकृत शैलीतील वेगळी बोली बोलली जात असल्याचे निर्देश मात्र मिळतात. अकेमेनिड साम्राज्य तेथे स्थापित असल्याने तेथील चलनी नाणी मात्र पर्शियन घाटाची होती. या सर्व भागात पारशी धर्माचे प्राबल्य होते असेही इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे. तक्षशिलेत पारशी पद्धतीने अंतिम संस्कार केले जात असेही निरीक्षण नोंदवले गेले आहे. अर्थात अकेमेनिड साम्राज्याचा तो राजधर्मच असल्याने असे घडणे स्वाभाविक आहे.

पंजाबमधील झेलमच्या तीरावर भेरा येथे पोरसशी झालेले भयंकर युद्ध वगळता अलेक्झांडरला मोठा प्रतिकार सहन करावा लागला नाही. पोरसही त्याचा सन्माननीय मांडलिक झाला. पोरसचे राज्य ही अकेमेनिड साम्राज्याची सीमा होती. ते जिंकल्यानंतर त्याने अजून पूर्वेला जाण्याचे काही कारण नव्हते. नंद साम्राज्याच्या बलाढ्य सेनेशी प्रतिकार करावा लागेल या भितीने ग्रीक सैन्यानेच अलेक्झांडरला मागे फिरायला भाग पाडले गेले हे ग्रीक  इतिहासकारांचे लेखन ही सारवासारवी आहे हे उघड आहे. पर्शियन साम्राज्याच्या अजिंक्य फौजांना परास्त करणारा अलेक्झांडर नंद सेनेला घाबरून मागे फिरणे शक्य नव्हते. खरे तर पोरसला जिंकून अकेमेनिड साम्राज्य त्याने जिंकले होते. अधिक काही मिळवायची त्याची इच्छा नव्हती. आणि आधीच जिंकलेल्या भारतीय भागात एक विलक्षण स्थिती निर्माण झालेली होती., त्यावर नियंत्रण मिळवणे जास्त महत्वाचे होते. आणि ही स्थिती उत्पन्न केली होती चंद्रगुप्त मौर्याने. त्याला मागे फिरणे भाग होते.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...