ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!
अलेक्झांरचे भारतावरील आक्रमन फक्त तीन वर्ष टिकले असले तरी ग्रीक आणि भारतीयांचा परस्परसंपर्क पुढेही कायम राहिला. चंद्रगुप्त मौर्याने नंद सम्राटाचा पराजय करून भारतभर एकछत्री सत्ता प्रस्थापित केली ही फार मोठी राजकीय घडामोड जशी होती तशीच चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव करून ग्रीकांशी विवाहसंबंध जोडून एक अंतरराष्ट्रीय सांस्कृतीक परस्पर-सहकार्याचा पायाही घातला. हेलनचे मौर्याच्या पाटलीपुत्र येथील राजप्रासादात झालेल्या आगमणामुळे भारत व ग्रीक यांच्यात एक सांस्कृतीक अनुबंध निर्माण झाला. भारतात ग्रीकांचे येणेजाणे वाढले.
सेल्युकसने मेगास्थानिज या ग्रीक राजदूताला मौर्यांच्या दरबारी पाठवले. अनेक ग्रीक शिष्टमंडळेही येत राहिली. त्यासोबत ग्रीक विद्वान, इतिहासकार, कलाकार भारतात येत राहिले. त्यांची एतद्देशीय विद्वानांशीही चर्चा-विमर्श होत राहिले. त्यातून कला, साहित्य आणि वास्तुशैलीवरही परिणाम होऊ लागला. मेगास्थानिजने भारतातील वास्तव्यावर आधारित इंडिका हा ग्रंथही लिहिला. आज तो पूर्णपणे उपलब्ध नसला तरी त्यातील जे महत्वाचे अंश आहेत ते ग्रीक इतिहासकारांनी जतन केले आहेत.
मेगास्थानिजने लिहिलेला वृत्तांत काही प्रमाणात मिथकीय शैलीत असला तरी त्याच्या दृष्टीकोनातून लिहिलेले भारतीय भूगोल व लोकजीवनाचे वर्णन आजही महत्वाचे आहे. भारतीय समाजरचनेचे आपल्याला आज अज्ञात असलेले पैलूही त्यातून समजतात. या ग्रंथामुळे ग्रीक जगालाही भारताची ओळख पटू लागली. सांस्कृतिक देवाणघेवाणीचे पर्व पुन्हा एकदा सुरु झाले असे म्हणायला हरकत नाही.
तसा भारताला अलेक्झांडरपुर्वी ग्रीक माहीतच नव्हते असे नाही. भारताचे प्राचीन काळापासून व्यापारानिमित्त पश्चिमेकडील देशांशी संपर्क होतेच. पण मौर्यकालात हे संबंध वेगाने वाढले असे म्हणता येईल. त्यात भारताच्या सीमा आता हिंदुकुश पर्वतापर्यंत वाढलेल्या होत्या, त्यामुळे दळण-वळणही सुलभ झालेले होतेच. विशेषता: गांधार-सिंध प्रांतात तर अनेक ग्रीक स्थायीकही झाले होते. सम्राट बिन्दुसाराच्या काळातही या सीमा कायम राहिल्या. बिन्दुसाराची अमित्रघात, सिंहसेन अशीही काही बिरुदे होती. दैमेकस हा सीरियाच्या सम्राटाचा वकील म्हणून याच्या दरबारात उपस्थित होता. इजिप्तचा राजा टोलेमी (दुसरा) याचा डायनोसियस हा ग्रीक वकीलही याच्या दरबारी आला होता. जागतिक राजकिय संबंध याच्याही काळात प्रस्थापित होत राहिले.
इसपू २६९ मध्ये अशोक सम्राटपदी आरूढ झाला. पुर्वजीवनात आपल्या आजोबाप्रमाणेच जैन असलेल्या अशोकाने आपल्या चवदाव्या शासनवर्षी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने म्यानमारपासून ते हिंदुकूश पर्वतापार बल्खपर्यंत भारताच्या सीमा भिडवल्या. या काळात अफगाणिस्तान, मध्य आशिया, ग्रीस, श्रीलंका इत्यादि देशात बौद्ध धर्म फैलावला व बौद्ध साहित्याला झळाळी मिळू लागली. तिसरी बौद्ध धर्मसंगीतीही त्याच्या कारकिर्दीत व त्याच्याच राजाश्रयाने भरवली गेली. यात बौद्ध धर्मात घुसलेल्या अपप्रथांचे उच्चाटन करण्यावर विशेष जोर देण्यात आला.
सम्राट अशोकाने अकेमेनिड सम्राट पहिल्या दारियसचे अनुकरण करत त्याच्या साम्राज्यात सर्वत्र शिलालेख व स्तंभलेख कोरवून घेतले. आतापर्यंत त्याचे पस्तीसच्या आसपास शिलालेख सापडले आहेत. त्यातील काही अर्माईक भाषेतही आहेत. दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहारजवळील अशोकाच्या ग्रीक भाषेतील तेराव्या शिलालेखात कलिंग युद्धाचा संदर्भ आला असून त्यात अशोकाचे साम्राज्य कोठेकोठे पसरले होते याचे उल्लेख आहेत व अन्य समकालीन ग्रीक राजांचीही नावे आलेली आहेत. या काळात अनेक ग्रीकान्नीही बौद्ध धर्म स्वीकारला होता. मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माने आपले स्थान निर्माण केले व शेकडो स्तूप आणि विहार बांधले गेले. भारतीय धर्माने देशाच्या सीमा ओलांडायची सुरुवात सम्राट अशोकाच्याच नेतृत्वाखाली झाली.
असे असले तरी पुढे मौर्य साम्राज्यही विस्कळीत झाले. तोवर सेल्युसिड साम्राज्यही आक्रसत चालले होते. मौर्य काळापर्यंत तरी गौतम बुद्धाच्या मानवी प्रतिमा बनवल्या जात नसत. चैत्य आणि बोधी वृक्ष हीच बुद्धाची प्रतिके मानून त्यांची पूजा केली जात असे. पण पश्चिमोत्तर भागातील ग्रीकांमुळे बौद्ध व हिंदू कलेवर विलक्षण परिणाम झाला. गौतम बुद्धाच्या प्रमाणबद्ध कलात्मक मूर्ती-प्रतिमा बनू लागल्या. यातूनच पुढे गांधार शैली विकसित झाली. ग्रीकांच्या क्युपिड व वज्रपाणीच्या स्वरूपात हेराक्लीजसदृश्य प्रतिमांचा समावेश बौद्ध कलांत झाला. पुढे कुशाणकाळात तर नाण्यांवरही शिव आणि बुद्ध यांच्या प्रतिमा झळकू लागल्या. अर्थात या कलेचा देशव्यापी प्रसार व्हायला काही शतके लागली.
मौर्य सम्राट बृहद्रथाची हत्या करून पुष्यमित्र श्रुंग सत्तेवर आला. त्याच्याही दरबारी हेलीओडोरस नावाचा ग्रीक राजदूत उपस्थित होता. या काळात ग्रीकांनी पुन्हा उचल खाल्ली. मिनांडर बल्खचा राजा बनला आणि त्याने मौर्यांच्या ताब्यात असलेले अफगानिस्तानातले भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्याने लक्षशिलेचा प्रांतही त्याच्या सत्तेखाली आणला व द्वैभाषिक (ग्रीक-प्राकृत) नाणी पाडायला सुरुवात केली. त्याने प्राकृत नाव मेनांद्र असे केले असले तरी मिलिंद या नावाने तो बौद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे. मिलिंदपन्ह या ग्रंथात त्याची बौद्ध धर्माविषयीची आस्था दिसून येते. असे असले तरी त्याने मथुरा, पांचाल आणि साकेतवरही स्वारी केली होती. याच काळातील जैन राजा खारवेल याने आपल्या हाथीगुंफा शिलालेखातही (इसपू दुसरे शतक) आपण ग्रीकांना राजगृहपासून मथुरेपर्यंत कसे परतवून लावले याचा उल्लेख केलेला आहे. पुराणांनीही या आक्रमणाचे ओझरते का होईना उल्लेख केलेले आहेत. थोडक्यात मौर्य साम्राज्याचा अस्त घडवूनही पुष्यमित्र शृंगाने आक्रमणे रोखण्यासाठी कसलीही तयारी दाखवली नव्हती. या काळात भारतातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे आपल्याला दिसते.
याचा परिणाम समाजजीवनावरही होणे अपरिहार्य होते. भारहूत येथील बौद्ध स्तूपात मिनांडरची प्रतिमा मिळालेली आहे. सांची येथील स्तूपाच्या अवशेषात बुद्धिस्ट अनुयायी ग्रीक वेशात चित्रित केले गेले आहेत. स्वात खो-यातील बहुतेक बौद्ध स्तुपांत त्याची नाणीही सापडलेली आहेत व एक त्याचा नामोल्लेख असलेला लेखही सापडलेला आहे. त्यानंतरही त्याच्या अनेक वंशजांनी किमान पश्चिमोत्तर भारतावर राज्य केले. या काळात बौद्ध कला आणि प्रभामंडळातील दैवत कल्पनांत ग्रीक मिथकांचा समावेश झाला. या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी त्यांच्या संस्कृतीतील दैवतांचाही त्यांना विसर पडणे शक्य नव्हते. दोन्ही श्रद्धांत अनेकदा अजाणतेपणे कसे बेमालून मिश्रण होऊ लागते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
ग्रीकांमुळे त्यांचे खगोल व ज्योतिषशास्त्रही भारतात प्रवेशु लागले. ग्रह-राशी आधारित पंचांगाशी भारतीयांचा परिचय झाला. तत्पूर्वीचे भारतीय ज्योतिषशास्त्र नक्षत्राधारित होते. ग्रीकांच्या महाकाव्य रचनांचा प्रभावही भारतीयांवर पडला. महाभारत या महाकाव्यावर इलियडचा मोठा प्रभाव आहे हे जागतिक विद्वान दोन्ही महाकाव्यातील अनेक साम्यस्थळांवरून दाखवून देतात. थोडक्यात आक्रमणे आणि सत्ता मानवी अभिव्यक्तीवरही मोठा परिणाम करून जाते. त्याचे अंश जीवित असतात, पण ते अभिनिवेश न आणता शोधावे लागतात.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment