Thursday, January 9, 2025

मानवी भविष्याचा विचार का आणि कशासाठी?





भविष्यात काय दडून बसलेय हे कधी कोणाला पक्केपणे सांगता आलेले नाही. माणसाने कितीही योजना आखल्या तरी त्या तशाच सुरळीतपणे पार पाडल्या जातील असेही नाही. आपले सरकारही पूर्वी पंचवार्षिक योजना सादर करत असे. या योजना म्हनजे पुढील पाच वर्षात साध्य करायच्या बाबी व त्यासाठीच्या तरतुदी या स्वरुपाच्या असायच्या. पण त्याही १००% कधी पार पाडल्या गेल्याचे उदाहरण नाही, कारण अनपेक्षीत घटना घडतात आणि अंदाजपत्रके कोसळत जातात. असे असले तरी त्यांचे महत्व कमी होत नाही. कारण अशा शास्त्रशुद्ध अंदाजांची जाणत्या प्रगतीशील आणि प्रगत समाजांना नेहमीच गरज असते.

पण हे झाले आर्थिक/औद्योगिक/संरचनात्मक कार्यांबद्दल. आपण एकुणातील मानवी समाजाच्या भवितव्याचे अंदाजपत्रक कधी बनवत नाही. काही समाजशास्त्रज्ञ हे आपापल्या ज्ञानशाखेनुसार आपापल्या स्तरांवर करत असतात. भविष्यवेधी कादंबरीकारही भयावह स्वरुपात का होईना भविष्यातील मानव आणि त्याचे जीवन कसे असेल यांचे रंजक चित्रण करत असतात. भविष्यवेधी लेखनाची आपल्याकडे तशी वानवाच असली तरी पुढील पंचवीस वर्षानंतरच्या भविष्याचे वास्तवदर्शी चित्रण मी “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत केलेले आहे. यात मी भविष्यातील ज्ञानयंत्रणा, अर्थव्यवस्था, तंत्र आणि शेतीव्यवस्था ते दहशतवादाची रूपे भविष्यात कशी असतील आणि या सर्वांचा एकंदरीत मानवी मानसिकता आणि समाजरचनेवर कसा प्रभाव पडेल याचे विदारक चित्रण केलेले आहे.

खरे म्हणजे भारतीय माणूस इतिहासात जास्त रमणारा. रोजचे राशी भविष्य किंवा जोतिषाकडून भविष्य पहायची सवय भारतात प्रचंड आहे. मुळात माणसाला भूत-भविष्य जाणून घेण्याचा छंद आहे. याला वैज्ञानिकही अपवाद नाहीत. तेही विश्वाची सुरुवात कशी होती आणि शेवट कसा असू शकेल याची भाकिते करत असतात. पण ते फक्त गणिती शक्यता वर्तवतात...फलज्योतिषकारांसारखी शुभाशुभ-शकुनात्मक भाकिते करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाकितांना काही अर्थ तरी असतो. पण आम्ही मानवी समाजाचे वास्तवदर्शी भविष्य काय असावे, ते काय असेल आणि हवे तसे भविष्य घडवण्यासाठी नेमके काय करावे लागेल याबाबत मात्र आम्ही सहसा विचार करण्याच्या फंदात पडत नाही. किंबहुना आम्हाला भ्रामक इतिहासात जसे रमायला आवडते तसेच काल्पनिक सुख-रंजनात्मक भविष्यात रमायला आवडते. अशात पाश्चात्य जगात कोणी नोआल युवा हरारीसारखा लेखक उत्पन्न होतो आणि तो एखाद्या तंत्रज्ञानाच्या भयावहतेचा ढोल बडवू लागतो आणि मानवी समाजात चलबिचल निर्माण करत लोकप्रियतेच्या लाटांवर आरूढ होतो. मागे अल्विन टॉफ्लर या लेखकाने ‘थर्ड वेव्ह’ नावाचे पुस्तक लिहून जगभरात अशीच खळबळ माजवली होती. असे होत राहणार. भविष्यातही असे लेखक उत्पन्न होणार आणि मागच्यांना विसरून जाणार. पण असे का होते याचा मुलगर्भात जाऊन विचार करणे भाग पडते.

ते असो. येथे आपल्याला विचार करायचाय तो पुढील ५० वर्षांत आमचे जग कोठे आणि कसे असेल याचा. आम्ही भारतीय म्हणून या नव्या वेगाने बदलत्या जगात कोठे असू? कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे खरेच मानवजात संकटात स्पडणार आहे काय? नव्या जगात आमचे स्थान काय असेल? आम्ही कोठे असू? या आणि याशी निगडीत प्रश्नांवर विचार करणे आवश्यक आहे. यात मानवी जगाला घेरून बसलेल्या तंत्रज्ञानांचे पुढे काय होईल, अजून कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्यामुळे मानवी जगात अजून कोणती क्रांतीकारी परिवर्तने होतील याचा विचार जसा अभिप्रेत आहे तसाच शेतीचे नेमके काय होईल, तिला कोणते रूप मिळेल यावरही विचार अभिप्रेत आहे. जगात कोणत्या नव्या अर्थव्यवस्थेची प्रारूपे जन्माला येतील, राष्ट्र या संकल्पनेचे ब्नेमाके काय होणार आहे, धर्म आणि तत्वज्ञान कोणते नवे दिशा पकडू शकते आणि दहशतवादाची रूपे कशी बदलतील यावरही विचार व्यक्त करणे आवश्यक आहे.

मी "आम्ही" असा शब्द वापरतो तेंव्हा त्यात आम्ही "भारतीय" म्हणून जसे येतो तसेच एक जागतीक समुदाय म्हणूनही येतो. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य हे मानवजातीच्या भवितव्याशीच निगडित असते. आपले पुढील भविष्य हे आजवरचा आपला प्रवास, वर्तमान आणि भविष्यात यशस्वी अथवा अयशस्वी होऊ शकतील अशा सर्वच क्षेत्रांतील शोधांवर आणि मानवी जगण्याच्या सध्याच्या नित्यनेमाने बदलत असलेल्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. कोणताही वर्तमान इतिहासाच्या छायांनी झाकोळलेला असतो हा आपला आजवरचा मानवी इतिहास असल्याने अगदी काटेकोर नसला तरी सत्याच्या किमान जवळ जाईल असे भविष्याबाबतचे विवेचन आपण करू शकू.

अर्थात हे चिंतन सामुहिक असेल, माझ्यासोबत सर्वांनीच ते आपापल्या वकुबाप्रमाणे करावे लागेल. आपण भारतीय मुळात मिथ्या इतिहासात रमणारे प्राणी आहोत. भारतात भविष्यकथन करणा-यांची रेलचेल असली तरी वास्तवदर्शी पायावर आम्ही उद्या कोठे असायला हवे आणि ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे याबाबत मात्र आमचे विचारवंत मूक असतात. बदलत्या जगात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल, वर्तमानातच आर्थिक व सामाजिक प्रगती करायची असेल तर आम्हाला आमच्या उथळ झालेल्या राजकीय विचारांवर मात देत ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती आधी करावी लागेल. अर्थात वर्तमानात ती कोणत्या प्रकारे आणि कशी करायची याचीही योजना आपल्याकडे आजही नाही. सरकारे येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. हा प्रवाह ध्येयहीन दिशाहीन व्हावा किंवा होतो असे नाही तर अनेकदा भरकटलेल्या मानवी प्रेरणाच आपल्या भविष्याचा नाश करत असतात. आमच्याकडे मुळात ती दृष्टी आज आहे काय याचाच आधी विचार केला नाही तर भविष्य काय असणार हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. जगाचा प्रवाह हा नेहमीच पुढे जात राहणार आहे. त्यात आमचे काही सकारात्मक आणि सर्जनशील योगदान असणार आहे काय याचाही विचार आपल्याला करायचा आहे. हा प्रवाह ध्येय ठरवून त्या दिशेने फार वेगाने गेला नाही तरी चालेल, संथपणे का होईना त्या दिशेने वाटचाल करेल यासाठी मात्र निश्चित धोरणे असावी लागतात. आपल्या देशातील नागरिकांच्या मानसिकता, क्षमता आणि त्यांची स्वप्ने यांचे वास्तवदर्शी भान असावे लागते. ते आपल्याकडे आहे काय याचा विचार प्रत्येकजण स्वतंत्रपणे करू शकतो. भविष्यात जग आणि भारत कोठे आणि कसा असेल आणि कोठे असायला हवा यावर आपल्याला विचार करत भविष्यातील जग कोठे असणार आहे यावर या लेखमालिकेत चर्चा करत जायचे आहे.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...