Thursday, May 19, 2011

विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये

http://www.loksatta.com/daily/20090601/lsv17.htm


विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये’
सातारा, ३१ मे/प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा ७५ टक्के भाग वैदिक परंपरेने बळकावून ठेवला आहे. ही ब्राह्मणी वैदिकी

पुटे दूर करून पुनर्माडणी करण्याची गरज आहे. विद्रोहींनी उतावीळपणे, उथळपणे सगळेच नाकारण्याच्या उत्साहात गुढीपाडवा, दिवाळी सणाला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथे पार पडलेल्या सहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसाहित्य, संतसाहित्य व सत्यशोधकी साहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, की संयम, विवेकाने मूळ भूमिका समजावून न घेता विरोध करीत राहिल्यास आपल्याच माणसापासून तुटण्याची वेळ येईल. केरळमध्ये ‘ओणम’ सण साजरा होतो. तसाच आपल्याकडे दिवाळी सण आहे. त्यानंतर वैदिकांची एक महिन्यानंतर देवदिवाळी येते. दिवाळी हा बहुजनांचा सण आहे.
भारतीय संदर्भात विद्रोहाची संकल्पना सूत्ररूपाने स्पष्ट करताना डॉ. साळुंखे म्हणाले, की अन्याय शोषण करणाऱ्या घटकांना व प्रवृत्तींना विरोध हा विद्रोह आहे. वेद प्रामाण्याला विरोध करून चिकित्सा केल्याशिवाय व योग्य असल्याची खात्री पटल्याशिवाय काहीही स्वीकारणार नाही. फुलण्यापासून कुणाला वंचित ठेवणार नाही. ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याचा अधिकार नव्हता त्याविरुद्ध विद्रोह करून समान संधीसाठी आग्रह. मन, भावना शुद्ध ते खरे सोवळेपण समजून पुण्यप्राप्ती, मोक्ष, कर्मकांडांचा भाग अन्यायाचा समजून त्यास विरोध, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध व नैतिकतेचे नियम दोघांबाबत समान केले पाहिजेत, असा स्त्री-पुरुष समतेचा आग्रह म्हणजे विद्रोह, संत तुकाराम व गाडगेमहाराज यांच्याप्रमाणेच संत नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, महानुभाव चक्रधर स्वामी, म. फुले यांनी केवढा मोठा विद्रोह केला आहे हे समजून घेतले पाहिजे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
लोकसाहित्यातील विद्रोही जाणिवा या विषयाची मांडणी करताना डॉ. कृष्णा इंगवले म्हणाले, की गुढीपाडवा हा मातृसत्ताक पद्धतीचा सण आहे. गुढी स्त्रीच्या गौरवाचे प्रतीक आहे, तर होळी हे यज्ञाचे विडंबन आहे.
कान्होपात्राची वेदना
‘नारी देवकरी तू जागरी, देवळाच्या मागे कान्होपात्रा भोगले’ ही ओवी म्हणजे कान्होपात्राची वेदनाच प्रकट झाली आहे. कान्होपात्राला भोगल्याचे बडव्यांचे पाप लपवण्यासाठीच तिचे मंदिर उभारण्यात आले असल्याचे डॉ. कृष्णा इंगवले यांनी सांगितले.
‘संतसाहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयाची मांडणी डॉ. अरुण शिंदे यांनी केली. ते म्हणाले, सत्यशोधकी अन्वेषण वृत्ती स्वीकारली असती तर मराठी साहित्याने उंची गाठली असती. सत्यशोधकी साहित्य वंचित शोषित घटकाला आत्मभान व प्रेरणा देणारे आहे ते आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जवळचे आहे.
संजय सोनवणी म्हणाले, की पंढरपूरचे विठ्ठल दैवत विद्रोहाचे प्रतीक आहे. ते वैदिकांनी बळकावले आहे. समतेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या संतांना समाजाने त्यांच्या त्यांच्या जातीत बंदिस्त करण्यात आले आहे.
‘सत्यशोधकी साहित्य परिवर्तनास दिशा देणारे’
सत्यशोधकी साहित्यच समग्र ग्रामीण परिवर्तनास दिशा देईल, असे प्रतिपादन प्रा. प्रवीण चव्हाण यांनी केले.
‘सत्यशोधकी साहित्यातील ग्रामीण परिवर्तनाचा विचार’ या विषयावरील परिसंवाद प्रा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. सतीश जामोदकर, डॉ. छायाताई पोवार यांनी परिसंवादात भाग घेतला.
प्रा. प्रवीण चव्हाण म्हणाले, सत्यशोधक चळवळीने काँग्रेस पक्षाला ग्रामीण पाया मिळवून दिला. सत्यशोधकी सौंदर्यशास्त्राची परखड चिकित्सा करण्याची गरज आहे. ग्रामीण परिवर्तनासाठी झालेला भौतिक संघर्ष या चळवळीने केला आहे. क्षत्रियत्वाच्या धारणांची मर्यादा या चळवळीवर येतेय का? याचा विचार झाला पाहिजे. स्त्रीला, श्रमाला प्रतिष्ठा, सत्याला सापेक्ष असे समग्र परिवर्तनाची दिशा सत्यशोधकी साहित्य देईल.
प्रा. जी. ए. उगले यांची प्रकट मुलाखत डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. गजानन जाधव यांनी घेतली.

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...