Thursday, December 25, 2025

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे असेल याचा अनेक अंगांनी आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आजचा जो वर्तमान आहे त्या आधारावर आपण भविष्याच्या तशा अज्ञात कुहरात डोकावण्याचा प्रयत्न केला. खरे तर वर्तमानही आपल्या समग्र आकलनात येत नाही तर भविष्य कोठून येणार असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण एकुणातील भविष्याची दिशा काय असू शकेल याचा ढोबळ अंदाज तरी आपण बंधू शकतो. मुळात प्रश्न आहे तो आपल्याला भावी जग कसे असावे वाटते आणि ते भविष्याच साकार व्हावे अये होण्यासाठी आपण काय करू शकतो हा. शेवटी मनुष्यच आपल्या भविष्याचा निर्माता असतो, पण ही माणसाची सामुहिक शक्ती सहसा एकत्रित कार्यरत नसते. म्हणजे ती असते पण ती शक्तीही एवढी विस्कळीत आणि परस्परविरुद्ध कार्य करणारी असते कि त्यातून निर्माण होणारे भविष्यही असेच विस्कळीत आणि अंतत: समग्र मानवी जीवनाला अधिकाधिक त्रस्त करणारे असणार यात शंका नाही. आपल्याला आपली धरती सुंदर असावी, सुखमय जीवन जगता यावे, संघर्ष जीवघेणा होऊ नये, सुरक्षित समाज-राजकीय जीवन असावे, जगण्यातील अनिश्चितता किमान कशी होईल यासाठी सरकारे प्रयत्न करतील अशी राजकीय संस्कृती असावी, सर्वांना सन्मानाचे जीवन जगता यावे अशा किमान अपेक्षा सर्वांच्याच असतात. पण आज विषमता आणि अनिश्चितता एवढ्या कमाल वेगाने वाढलेली आहे की संध्याकाळी काय होईल याचा भरोसा नाही अशी स्थिती बहुतेक जागतिक नागरिकांची असेल तर मानवी जीवनाचे भविष्य काय असणार याची चिंता कोण कशाला करायच्या भानगडीत पडेल. आणि शेवटी “हे असेच चालणार” म्हणत सुस्कारे सोडण्याशिवाय कोण काय करणार? असे असले तरी ही निराशावादी वृत्तीच अधिक अनिश्चिततेला जन्म देत असते हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल. तसे पाहिले तर आज संपूर्ण जगावर निराश मनोवृत्तीचा उद्रेक झाला आहे. या निराशेला राष्ट्रा-राष्ट्रांतील संघर्ष, हेलकावे घेणारी आर्थिक स्थिती, संवेदना हीण सत्ता, झपाट्याने बदलत जाणारे नाते-संबंध, लोकांमध्ये वाढलेली व्यक्तीवादी प्रवृत्ती, त्यामुळे समाज म्हणून पडत जाणारे छोटे छोटे गट आणि त्यांच्यामध्ये उसळणारे असमाधानाचे उद्रेक हे आजचे वास्तव बनत आहे. प्रश्न तीव्र झाले, एखादा समाजच स्वत:ला असुरक्षित समजू लागला तर मात्र उद्रेक होतात. ते कधी हिंसक पातळीवरही उतरतात, पण त्यातून त्या त्या समाजाचे कल्याण झाले आहे असे क्वचितच दिसून येते. आपल्या भावी पिढ्यांना कोणत्या पद्धतीने जगायला आवडेल याचे प्रत्येकाचे आराखडे मात्र निश्चित असतात. म्हणजे सर्वांचे कल्याण होईल, जगण्यातील अनिश्चितता संपेल, माणसाला पुरेसे स्वातंत्र्य मिळत आपल्या प्रतिभेचा मुक्त आविष्कार करता येईल किंवा सहजी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योग-रोजगारांच्या मुबलक संधी उपलब्ध असतील, जेथील पर्यावरण सुखद आणि प्रदुषण विरहित असेल, असे साधारण जग सर्वांना अभिप्रेत असते. पण पप्रत्यक्षात मात्र भलतेच घडते. आज आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला व्यक्तिवादी बनवण्ास भाग पाडलेले आहे. माणूस नुसता व्यक्तिवादीच नव्हे तर आपल्या स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीचा वापर किमान करत एक दिवस सर्वस्वे कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम कसा होईल यासाठी जगातील सारी भांडवलशाही व्यवस्था कामाला लागलेली आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आज कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेत असतानाच आपल्याला दिसून येत आहेत. हा सारा मानवाला मतीमंद्त्वाकडे नेणारा सापळा आहे हे कळूनही आम्हाला वळते आहे असे नाही. आणि याहीपेक्षा निर्माण झालेला मोठा धोका म्हणजे प्रत्येकाचे वर्तन "विशिष्ट" पद्धतीनेच व्हावे यासाठी नागरिकांना निवडक माहिते पुरवत त्यांना कळूही न देता त्याच्या मेंदूचे कंडीशनिंग केले जात आहे. आपली राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मते नियंत्रित तर केली जातच आहेत, पण तुम्हाला काय आवडावे हेही तुमच्या परस्पर ठरवले जात आहे. तुमची राजकीय मते काय असावीत हे आता तुम्ही नाही तर ही आधुनिक यंत्रणा ठरवते आहे. यातून केवळ विचारहीन गुलामच पैदा होऊ शकतात, स्वतंत्र विचारांचे, प्रतिभेचे नागरिक नाहित आणि आम्ही नकळत या धोक्याचा उंबरठा ओलांडून बसलो आहोत. आम्हाला आमचे जग भविष्यात कसे असायला हवे आणि त्यात या अशा गोष्टी बसत नसतील तर त्यांना कसे टाळायचे याचा निर्णय आम्ही आताच घेतला पाहिजे. आम्हाला आमचाच हतबल यंत्रमानव होऊ देण्याच्या आत हे पाउल उचलले पाहिजे. ही भीती काल्पनिक नाही. आजचे जग या भयकारी दिशेने आधीच निघालेले आहे, ते आम्हाला जाणवतेही आहे. पण आम्ही विचारच करू नये यासाठी सर्व राजकीय, भांडवलदारी यंत्रणा जोमाने काम करत असतील तर आम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी तरी माणसाची सर्वात श्रेष्ठ असलेली शक्ती ती म्हणजे स्वतान्र विचार आणि कल्पकता यांचा वापर करावा लागेल. तंत्रज्ञान हे शेवटी तुमचे खाजगी आणि सांगकामे निर्बुद्ध सचिव आहेत आणि त्यांच्या आहारी जात आपण आपल्या जगण्याचेच सत्व हरपून बसू हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. आम्ही व आमचे पाल्य थोडा जरी प्रयत्न करत या व्यामोहातून बाहेर पडत नव्या अनवट वाटा बनवायला सुरुवात केली तर या संभाव्य धोक्यापासून आम्ही काही प्रमाणात तरी मुक्ती मिळवू शकू आणि भविष्यातले जग माणसांना किमान सुसह्य जगता येईल असे काही करू शकू. मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटींत आपण आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पुर्णपणे स्वीकारत नाही. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. भविष्यात मानवी जीवनाची ही "विलक्षणता" टिकून राहील की नाही ही जर थोडी जरी भीती वाटत असेल तर येथेच थांबणे आणि नव्याने विचार करत, स्वत:च्या बुद्धीने नवा मार्ग शोधत पुढे जाणे इष्ट आहे. माणसांनी तंत्रज्ञान वापरणे हे ठीक पण तंत्रज्ञानच माणसांना वापरू लागले तर मात्र मनुष्यतेचा अंत होईल आणि हे कोणालाही अभिप्रेत नसणार आहे. आपण वेळीच सावध झालो तर जग आज आहे त्यापेक्षा सुंदर बनू शकते यात शंका नाही. पण या वावटळीवर स्वार होत भरकटत राहिलो तर मात्र कठीण आहे. -संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...